नवीन लेखन...

प्रवाशाची विचित्र व भयानक पलंगाची गोष्ट – भाग पहिला (संक्षिप्त रूपांतरीत कथा २१)

शिक्षण संपल्यावर मी शशिकांत देशमाने कलकत्त्याला एका बंगाली मित्राबरोबर रहात होतो.
आम्ही तरूण होतो आणि त्या रंगीन नगरींत मजा करत होतो.
एकदा व्हीक्टोरीया मेमोरीअल जवळच्या भागांत आतां काय मजा करावी ह्या विचारात असताना, माझा मित्र आपण रॉयल क्लबमधे जुगार खेळायला जाऊया म्हणाला.
रॉयल क्लबच्या जुगारांत मी बरेचदा पांच/दहा रूपयांच्या खूप नोटा घालवल्या होत्या, कधी कमावल्याही होत्या.
पण रॉयल क्लबच्या जुगारी अड्ड्यावरलं वातावरण, तिथे येणारे मिजासी लोक, हे सर्व माझ्या अंगावर येई.
त्याची सूचना मला आवडली नाही.
मी म्हटले, “ह्या उच्च समाजांतील चैनी लोकांच्या जुगारी जागेपेक्षा जिथे एखाद्या रांगड्या टोपीही न घातलेल्या माणसाला प्रवेश मिळतो अशा छोट्या अड्ड्यावर जाऊया.
तो म्हणाला, “ठीक आहे.
मला असा अड्डा इथे जवळच आहे, हे ठाऊक आहे.”
दोन मिनिटातच आम्ही त्या जागी प्रवेश केला.
आम्ही वर गेलो आमच्या टोप्या व काठ्या दरवानाकडे दिल्या.
आम्हाला सरळ जिथे जुगार चालू होता त्या खोलीतच प्रवेश मिळाला.
तिथे खूप लोक नव्हते पण होते ते खरंच सर्व प्रकारचे सर्व स्तरांतले लोक होते.
आम्ही तिथे गुंड वाटणाऱ्या लोकांची अपेक्षा केलीच होती पण तिथे त्याहूनही असभ्य लोक होते.
खोलीतली शांतता भीषण होती.
एक काटकुळा, केस मानेखाली वाढवलेला, डोळे खोल गेलेला माणूस तीक्ष्ण नजरेने उलटले जाणारे पत्ते पहात होता पण कांही बोलत नव्हता.
तर एक जाडा, अंगावर व्रण असणारा किती वेळा काळ्या जिंकल्या व कितीदा लाल जिंकल्या ह्याची नोंद करत होता पण तोही गप्पच होता.
एक हिरवा कोट घातलेला, गिधाडासारखे डोळे असणारा, घाणेरडा म्हातारा आपली हलकी सोंगटीही घालवून बसला होता.
त्याला पुढे खेळायला मिळणार नव्हते तरी तो खेळावर नजर खिळवून बसला होता.
खेळ चालवणाऱ्याचा अड्डेवाल्याचा आवाजही गंभीर व एकसुरी होता.
मी तिथे हंसायला आलो होतो पण खिन्न झालो.
कांही तरी करणं अतिशय आवश्यक होतं.
मग मी जवळच्याच एका टेबलावर घुसलो व सरळ जुगारात बोली लावू लागलो.
त्याहीपेक्षा वाईट, (वाईट कां म्हणतो ते पुढे कळेलच), म्हणजे मी अगदी भरभरून जिंकू लागलो.
टेबलाभोवती जमा झालेले लोक कुजबुजू लागले, “हा मराठी माणूस अड्डेवाल्याची वाट लावणार.”
ह्या जुगाराचं नांव होतं, “रोग एट् नाॅयेर”.
युरोपमधल्या सर्व मोठ्या शहरांत हा जुगार खेळला जातो. तोच कलकत्त्यातही आला होता.
मी ना कधी जुगाराचा जिंकण्याच्या अभिलाषेने अभ्यास केला होता की कधी हरण्या- जिंकण्याची पर्वा केली होती.
जुगारी लोकांना हवासा वाटणारा फीलॉसॉफर्स स्टोन (परीसासारखाच पण कशाचही सोनं करणारा दगड, इ.) मी कधी शोधला नव्हता कारण अधिक पैसे हवे असणं म्हणजे काय हेंच मला कधी जाणवलं नव्हतं.
थोडक्यात जुगार हा माझ्यासाठी, नृत्य, संगीत, मनोरंजन, इ. सारखाच एक टाईमपास होता.
पण आजची गोष्ट वेगळी होती.
आज मला एखाद्या खेळाचा नाद लागणं म्हणजे काय तें जाणवत होतं.
माझ्या जिंकण्याने मी प्रथम चकीत झालो पण नंतर मला विजयाची नशा चढली.
खरं नाही वाटणार पण मी हिशोब करून जिंकण्यासाठी खेळलो तर हरत होतो आणि विचार न करतां बोली बोलत होतो, तेव्हां जिंकत होतो.
कांहीजण मी निवडलेल्याच पत्त्यावर पैसे लावून फायदा घेत होते पण मग मी इतकी मोठी बोली लावू लागलो की सगळे खेळांतून बाहेर गेले व माझा खेळत बघत राहिले.
मी मोठ-मोठ्या बोली लावतच राहिलो आणि जिंकलोही.
लोक आता मोठ्याने बोलू लागले.
मी जिंकलेल्या रक्कमा माझ्याकडे सरकवतांना अड्डेवालाही बंगालीमधे कांही पुटपूटू लागला.
सर्व उत्तेजित झाले होते.
पण त्या खोलीत एक माणूस शांत होता, माझ्या बाजूला बसलेला माझा मित्र.
तो माझ्या कानांत म्हणाला, “शशिकांत, जिंकलास तेवढं खूप झालं. आता खेळ थांबव आणि इथून बाहेर पडूया.”
तो हे पुन्हा पुन्हा सांगत होता पण मला चढलेली जुगाराची नशा त्याचा सल्ला जुगारत होती.
शेवटी कंटाळून तो तिथून निघून गेला.
तो गेल्यानंतर थोड्याच वेळाने माझ्या कानावर शब्द आले, “महाशय, तुमचे दोन टोकन खाली पडलेत, ते परत वर ठेवायची परवानगी द्या.
तुमचे नशीब आश्चर्यकारक आहे.
मी एक जुना, अनुभवी सैनिक आहे पण असं नशीब मी कधी कुठे पाहिलं नाही.
खेळा तुम्ही पुढे आणि अड्डेवाल्याला हरवा.”
मी मागे वळून पाहिले.
एक उंच सैनिकी वेशातला माणूस हंसत हंसत बोलत होता.
खरं तर त्याचे घाणेरडे हात, लालबुंद डोळे, त्याची खत्रुड मिशी आणि मोडकं नाक पाहून मला त्याची शिसारी यायला हवी होती.
पण माझ्यावर तेव्हां काहीच वाईट परिणाम झाला नाही.
त्यावेळच्या जुगाराच्या नशेत मला खेळायला उत्तेजन देणाऱ्या कुणाहीबरोबर मी मैत्री करायला तयार होतो.
त्या म्हाताऱ्या सैनिकाने पुढे केलेली चिमुटभर तपकीर मी ओढली, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्याला सांगितले की असा सैनिक मला कधी भेटला नव्हता.
तो परत ओरडला, “माझ्या मराठी मित्रा, खेळ आणि मालकाची वाट लावून टाक.”
मी खेळत राहिलो आणि वीस मिनिटांतच मालकाने जाहिर केले की जुगार आजच्या दिवसासाठी बंद झाला आहे.
त्याचे सर्व धन, सोने, इ. माझे झाले होते.
“महाशय, तुमचं सर्व धन तुमच्या खिशांतल्या रूमालांत बांधून घ्या.
तुमच्या धनाने खिसे फाटतील.”
माझा म्हातारा सैनिक मित्र म्हणाला.
“बरोब्बर ! थांबा आणखी एक टोकन खाली पडलाय. त्याचेही पैसे करून घ्या.”
“आता त्या रूमालाला दोन गांठी मारा. अश्शा.
आता तुमचे धन सुरक्षित आहे. सैन्यांत मी ग्रेनेडीयर होतो.”
“आता एक सैनिक म्हणून मला काय करायचे राहिलेय ?
हं, आता फक्त मित्राबरोबर बसून शँपेन पिऊन त्याचा विजय साजरा करायचा राहिलाय.
तुमचे नशीब साजरे करायलाच हवे.”
मी ही त्याला दाद दिली.
एक्स ग्रेनेडीयर हुर्रे ! चिअर्स करत शँपेनचे ग्लास रिकामे होऊ लागले.
तो म्हणाला, “मराठी माणसा, तुझ्या धमन्यांमधून उदार कर्णाचं रक्त वहातं आहे.
आणखी एक प्याला. चिअर्स.
मी जुना सैनिक एक बाटलीच मागवतोय आणि बरोबर खायला.”
मीही उत्तेजित होत म्हटले.
‘माजी सैनिका, तुझी बाटली झाली, आता माझी. आमार शोनार बांगला. चिअर्स. अड्डेवाल्याला चिअर्स.
त्याला मुली असल्या तर त्यांना चिअर्स.
सर्वांना चिअर्स.”
शँपेनची दुसरी बाटली पितांना मी विस्तव पितो की काय असा भास मला होत होता.
माझ्यावर मद्याचा असा परीणाम पूर्वी कधीच झाला नव्हता.
मी खूप उत्तेजित झालो होतो म्हणून असं होत होतं कां ?
की शॅम्पेन खरच खूप कडक होती.
“हे ब्रिटीश सैन्याच्या जुन्या वीरा, माझ्या हीरो, आता तू कसा आहेस ?
युध्दाच्या हीरो, तू मला आग लावलीयस !
आता मी तिसरी बाटली मागवतो.”
मी वेड्यासारखा बडबडत होतो.
म्हाताऱ्या सैनिकाने मान हलवली, घाणेरडे बोट मोडक्या नाकावर ठेवले, डोळे गरगर फिरवले आणि ओरडला, “कॉफी” आणि धावत आंतल्या खोलीत गेला.
त्याच्या शब्दांचा तिथे हजर असणाऱ्या इतरांवर जादूसारखा परीणाम झाला.
ते एक एक करून निघून जाऊ लागले.
बहुदा ते मी आणखी पिऊन शुध्द हरपण्याची वाट पहात होते. मग गिधाडांनी माझी पुंजी लुटली असती.
त्यांनी पाहिले की माझ्या नव्या मित्राने आता पिणे थांबवले आहे.
काही असो, ते गेले खरे.
जेव्हां तो म्हातारा सैनिक परत आला, तेव्हां तिथे फक्त आम्ही दोघेच होतो.
एका लांबच्या कोपऱ्यात अड्डेवाला बसला होता.
माझा नवा मित्र माझ्याशी आता वेगळ्याच पध्दतीने बोलू लागला.
पूर्वीचा आवेश त्यांत नव्हता.
तो मला विश्वासांत घेत म्हणाला, “माझं ऐका महाशय, आता रात्र झाली आहे.
तुम्ही तुमचं धन घेऊन घरी जायचा प्रयत्न कराल पण घरांपर्यंत पोहोचू शकणार नाही.
कारण अनेक लोकांनी तुम्ही इथे भरमसाठ जिंकलात ते पाहिलं आहे.
मी ह्या घराच्या मालकीणीशी, फार सुंदर आहे ती आणि सुगरणही, बोललोय.
तिने तुमची रहाण्याची सोय करायचे मान्य केले आहे.”
“उद्या दिवस उजाडेल तेव्हा मस्त मोठ्या गाडीत बसा आणि आपली पुंजी घेऊन जा.
तुमची कमाई सुरक्षित ठेवण्याचा हाच मार्ग आहे.
पुढे कधी तरी ह्या सूचनेसाठी तुम्हांला माझी, ह्या माजी सैनिकाची आठवण नक्कीच येईल.”
एवढ्यांत कपातून कॉफी आली.
माझ्या नव्या मित्राने नम्रपणे एक कप माझ्या पुढे केला.
मला तहान लागली होती मी कॉफी पटकन संपवली.
लागलीच मला थोडी भोवळ आल्यासारखे आणि मद्य जास्तच चढल्यासारखे वाटू लागले.
खोली फिरत्येय आणि तो सैनिक खालीवर झोके घेतोय असं वाटू लागलं.
मी खुर्चीला धरून उभा राहिलो.
मला तोल सांवरता येत नव्हता.
मला आश्चर्य वाटले, माझा मूर्खपणा जाणवला, मी असहाय असल्याची जाणीवही झाली.
मी आता घरी कसा जाणार होतो ?
माझा सैनिक मित्र म्हणाला, “मित्रा, या अवस्थेत घरी जाणे म्हणजे धन घालवून बसणे होईल.
रस्त्यांत तुझे धन चोरणे किंवा तुला मारणे सहज शक्य होईल.
इथे छान खोल्या आहेत.
छानसे पलंग आहेत.
आजचा दिवस इथेच झोंप.”
माझ्या मनांत तेव्हा दोनच गोष्टी होत्या, पहिली तो बांधलेला रुमाल सांभाळायचा आणि दुसरी छानशी झोप घेणं जरूरी आहे ही.
म्हणून मी तिथे जागा घेणं मान्य केलं.
त्या सैनिकांने पुढे केलेल्या हाताचा आधार घेतला, दुसऱ्या हातांत पैसे गच्च धरले आणि निघालो. अड्डेवाला बसला होता तिथून पुढे जाऊन आणखी कांही अरूंद वाटा ओलांडून व एक जिना चढून आम्ही झोपण्याच्या खोलीशी पोहोचलो.
सैनिकांने दार उघडून दिले आणि हस्तांदोलन करून माझा निरोप घेतला.
मी हात धुवायच्या जागेकडे धावलो.
तिथल्या भांड्यातले पाणी प्यालो.
मग थोडा वेळ पाण्यात डोकं बुडवून बसलो.
मला बरं वाटलं.
जुगाराच्या कोंदट खोलीहून इथे हवा मोकळी होती.
चक्कर येणे थांबले.
इथे रहाण्यातला धोका आणि घरी जायचा प्रयत्न करण्यातला धोका, यांची तुलना करून मी तिथेच दार आंतून घट्ट बंद करून झोपण्याचे ठरविले. दाराला एक टेबल टेकवून ठेवले.
मी प्रवासात अनेकदां ह्यापेक्षा खराब जागी झोपलो होतो.
शशिकांत देशमाने जिंकलेली रक्कम घेऊन घरी जाऊ शकला कां? हे जाणण्यासाठी पोस्ट केलेला भाग दुसरा वाचा
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द ट्रॕव्हेलर्स स्टोरी ऑफ टेरीबली स्ट्रेंज ॲंड हाॅरीबल बेड
मूळ लेखक – विल्की कॉलिन्स (१८२४-१८८९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..