नवीन लेखन...

विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत

गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते. भक्तीने चांगलीच पकड घेतली होती. त्यामुळे मूर्तीपूजा, देवालये, स्तूप, स्तंभ उभारणे यांना धार्मिक महत्व प्राप्त झाले. दानधर्म करण्याची प्रवृत्तीही वाढीस लागली होती. ब्राह्मणांना अग्रहार, मंदिरे तर बौद्धभिक्षूंना विहार दान केल्या जात होते. गुप्त राजे प्रामुख्याने ब्राह्मण धर्मानुयायी असल्याने वाजपेय, अग्निष्टोम्, अतिरात्र, अश्वमेघ इत्यादी वैदिक यज्ञ करीत. मात्र बहुजन समाजात भक्तीपंथच लोकप्रिय असल्याने देवांच्या अवतार कल्पनेचा विकास होऊन त्यांच्या अवतारांची पूजा सुरु झाली. गुप्त, चालुक्य वगैरे राजे विष्णुपंथी होते, तर नाग, वाकाटक, मैत्रक, कदंब, परिवाज्रक इत्यादी राजे शैवपंथी होते. शिवाची उपासना लिंग व मूर्ती या दोन्ही स्वरुपात होत होती. वायु व मत्स्य ही शैव पुराणे याच काळची होत. सूर्याची उपासना सुद्धा चांगली मूळ धरु लागली होती. ही देवता शकांनी पश्चिम आशियातून भारतात आणली. भूमरा येथील सूर्यमूर्ती सर्वस्वी शक राजासारखी आहे. शकांच्या भारतीयकरणांच्या मोहिमेत वैदिक व शक उपासकांचा संकर होऊन सौर पंथ निर्माण झाला. सौर-पंथाचे पुरोहित सोमक, मग, भोजक असल्याचे भविष्यपुराण सांगते. शांबपुर (मुलतान) येथील सूर्य मंदिरात सूर्याची सुवर्ण मूर्ती होती. बंगालमध्येही सौर-पंथ लोकप्रिय झाला होता. तंत्रमार्गही प्राचीन काळापासून चालत आला होता, त्याच्या आणि वैदिक धर्माच्या एकीकरणातून शाक्तपंथ उदयास आला आणि जगदंबा त्यांची प्रधान देवता झाली. आधीपासूनच चालत आलेले स्कंद, विशाख आणि कुमार कार्तिकेय हे देव गुप्त काळात एकवटले आणि एकच शिवपुत्र स्कंद निर्माण झाला. या शिवाय गणेश, यक्ष, कुबेर, यम या देवतांचीही पूजा रुढ होती.

गुप्त काळात बौद्ध धर्माचा राजाश्रय जरी तुटला असला, तरी लोकप्रियता कमी झाली नव्हती. बौद्धांच्या महायान पंथाने संस्कृत भाषा, मूर्तीपूजा व भक्ती यांचा स्वीकार केला होता. बौद्धविहार ही शिक्षणाची केंद्रे बनली होती. अशाच एका संघरामातून नालंदा विद्यापीठाचा जन्म झाला. मूर्तीपूजा रुढ झाल्याने ठिकठिकाणी चैत्य, विहार, लयन बांधल्या गेले आणि त्यात अनेक प्रकारच्या मुद्रा असलेल्या बौद्धमूर्ती खोदविल्या गेल्या. बुद्ध प्रतिमांच्या व्यतिरिक्त अवलोकितेश्वर, अभिताभ, मंजुश्री इत्यादी बोधीसत्वाच्याही मूर्ती खोदविल्या जाऊन पूजेत आल्या. तारा, श्रीमहादेवी या देवताही पूज्य झाल्या. जैन धर्मानेही तीर्थकरांची देव म्हणून पूजा आरंभ केली. त्यामुळे जैन देवालये बांधली गेली. जैनांचा उत्तरेकडील राजाश्रय सुटल्याने पश्चिम व दक्षिण भारतात जैन धर्म स्थिरावला. त्यांना व्यापारी, सावकार, अनुयायी लाभले. त्यामुळे जैन शिल्पकला निर्मितीस मोठीच मदत झाली.

गुप्त काळात भारताचा अंतर्गत व बाह्यव्यापार भरभराटीस आला होता. गुप्त राजांच्या एक छत्री अमलामुळे व सौम्य राज्यपद्धतीमुळे व्यापारावर फारशी जाचक सरकारी बंधने नव्हती. त्याकाळी वज्रलेप (सिमेंट), यंत्रे, रंग, पोलाद निर्माण करण्यात भारतीय विश्वकर्मा कारागीरांचा हातखंडा होता. परदेशातही या मालाला चांगली मागणी असायची. त्यामुळे हस्तीदंती वस्तू, मोती, हिरे, मानके, पोलाद इत्यादी वस्तू निर्यात होत व सोने, चांदी, कथील, प्रवाळ इत्यादी आयात होत असे. राजमार्गाने तसेच नद्याद्वारे सुद्धा व्यापारी वाहतूक होत असे. सागरी वाहतूक तर पुष्कळच सुधारली होती. ५०० माणसे नेऊ शकतील अशी मोठी जहाजे बिनधोकपणे ये जा करीत. मालाच्या व्यापारी वाहतुकीसाठी वेरावळ, भडोच, मंग्रोल, कल्याण, चोल, पाली, जयगड ही महाराष्ट्र व गुजरातची बंदरे, कोट्टयम, मुझिरिस, नीलकंठ, ही मलबारातील बंदरे, कौरकै, सलीऊर, पुहार, तोंडे, कंदुर, घांटसल, ताम्रलिप्ती ही पूर्व किनाऱ्यावरील बंदरे प्रसिद्ध होती. या काळात लिहिल्या गेलेले धर्मग्रंथ, काव्यग्रंथ, नीतिग्रंथ व शिल्पग्रंथ तत्कालीन बंदरांची व्यापार नगरीची बरीच माहिती देतात. समुद्रतटावर वसलेल्या व खरेदी विक्रीचा व्यवहार जेथे घडतो त्या नगराला ‘पत्तन’ असे म्हणत असल्याचा उल्लेख मानसारात (इ.स. ७वे शतक) येतो. तर अशा नगरात व्यापारी व जहाज चालविणारे राहत असल्याचा उल्लेख शिल्परत्न (१४वे शतक) या ग्रंथात मिळतो. दुसरे जे व्यापारीनगर नदीमुखावर वसलेले असे त्याला द्रोणमुख म्हणत. काही नगरे नदी आणि समुद्र यांच्या संगमावर वसलेले असून आयात-निर्यातीचे प्रतिष्ठित केंद्र असे. ताम्रलिप्तिनगर त्याकाळी असेच महत्वाचे व्यापारी केंद्र होते. अशी अनेक व्यापारी केंद्रे ही राजधानीची शहरे सुद्धा असत आणि तेथे जसे व्यापारी राहत तसे शिल्पांचीही वस्ती होती.

शिल्पी, व्यापारी आणि दलाल हे राज्याच्या उत्पन्नात भर टाकणारे घटक होते. त्यामुळे राजा कर आणि प्रशासन यंत्रणेत त्यांचा उपयोग करुन घेत असे व त्यांना आवश्यक ते महत्वही देत असे. पाचव्या, सहाव्या शतकात नगर श्रेष्ठीन (सौदागर), सार्थवाह (मुख्य व्यापारी) आणि प्रथम कुलीक (मुख्यशिल्पी) यांचा नगर प्रशासन अधिकरणात (बोर्डात) समावेश असायचा. नगर प्रशासनात तर ते महत्वपूर्ण भूमिका वठवित. त्यांच्या सहमतीविना भूमीची खरेदी विक्री सुद्धा होत नसे. उपलब्ध मातीच्या मुद्रांका (मोहरा) वरुन अशी माहिती मिळते की, वैशाली, गया आणि वाराणशीला अशा नगर प्रशासनाच्या अधिकरणांचे अस्तित्व होते. गुप्तपूर्व काळात जसे शिल्पी विनिमयासाठी स्वतःच्या मुद्रा (मोहरा) चालवित तसे या काळातही शिल्पींच्या मुद्रा अस्तित्वात होत्या, तसेच शिल्पींचे निगम सुद्धा होते. या काळात लिहिल्या गेलेल्या स्मृति ग्रंथात आणि मृच्छकटिकासारख्या नाट्य ग्रंथात अशी उदाहरणे सापडतात. पुढे मात्र ही सारी व्यवस्था विस्कळीत झालेली दिसून येते. व्यापार आणि नागरीकरणाच्या पतनाच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या जापानी संशोधक तोशियो यामाजाकी यांनी पाचव्या-सहाव्या शतकातल्या बांगला देशातील १५ ताम्रपत्रे व अभिलेखांचा अभ्यास केला व त्यांनी असे निष्कर्ष काढले की, नागरीकरणाच्या पतनास जेंव्हा गती प्राप्त झाली, तेंव्हा शिल्पी आणि सौदागर यांना नगर प्रशासनापासून वेगळे करण्यात आले. तेंव्हा पासूनच शिल्पींचे प्रशासनातील महत्व नगण्य झाले.

धार्मिक कार्यासाठी राजे आणि सरदाराकडून भूमी अनुदान देण्याची प्रथा गुप्तोत्तर काळातही कायम होती. परंतु पूर्वी अनुदान देतांना नगर शिल्पी आणि सौदागर यांचेशी जसा विचार विनियम होत असे तसा गुप्तोतर काळात दिसून येत नाही. बंगालातील पाल राजाच्या सनदात भूमी अनुदानासंबंधी गाव, विषय (जिल्हा) याचा उल्लेख आहे. त्या काळी पदाधिकारी व ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत अशा सर्वांना सूचना दिली जायची. प्रारंभिक सनदात सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती व गावातील विभिन्न वर्गाच्या लोकांची अनुमतीची चर्चा सापडते. परंतु नंतर मात्र तशा उल्लेखाचा अभाव दिसतो. यावरुन सातव्या ते दहाव्या शतकात शिल्पी आणि व्यापारातील लोकांचा सहभाग समाप्त झालेला दिसतो. भूमी अनुदानात व्यापारी, सौदागर व शिल्पींची उपेक्षा झाल्यामुळे व्यापार व नागरीकरणाचा-हास झाला.

ताम्रपत्रातील उल्लेख भूमी मूल्यावर मोठा प्रकाश टाकतात. यामाजाकी म्हणतो की, “शंभर वर्षापर्यंत जमीनीच्या किंमतीत फरक पडला नाही. इ.स. ४४३ ते इ.स. ५४३ च्या दरम्यान एक कुल्यवाय जमीनीची किंमत तीन दिनार (स्वर्णमुद्रा) इतकीच कायम होती. त्यानंतर ही किंमत चार दिनार झाली. परंतु ती सुद्धा कित्येक दशके सारखीच राहीली होती.” यामाजाकीने भूमी मूल्याच्या स्थिरतेचे कारण अवरुद्ध अर्थव्यवस्था सांगितली आहे. गुप्तकाळाच्या अंतापर्यंत शिल्पी आणि व्यापारी सक्रीय होते. नंतर त्यांच्या गति-विधी कमी झाल्या. इ.स. ६५० ते ९५० पर्यंत हीच स्थिती होती.

व्यापाराचा व शहरांचा जेंव्हा ऱ्हास होऊ लागला, तेंव्हा शिल्पी ग्रामीण भागात विखुरल्या गेले. याच काळात भिन्नभिन्न अठरा प्रकराचे काम करणारे कामगार अठरा प्रकाराच्या जातीने ओळखल्या जाऊ लागले. व त्यांना त्यांच्या कार्यानुसार श्रेष्ठत्व व हीनत्व चिकटले. पुढे त्यांनाच अनुसरुन ‘अठरापगड जाती’ शब्दप्रयोग रुढ झाला. यात विश्वकर्मा शिल्पी उदा. सुवर्णकार, लोहार, सुतार यांचाही समावेश झाला.

शहरात असताना शिल्पी एका निश्चित भागात वस्ती करुन असत. जेंव्हा ते गावात राहायला गेले तेथे सुद्धा त्याचे स्थानविशेष कायम राहिले. वाकाटकाच्या भूमी अनुदान पत्रात असलेल्या गावाच्या नावावरुन असे अनुमान लावता येते की असे सहा गाव सापडतात जेथे प्रत्येक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या एकाच शिल्पीचे आधिक्य होते. कंसकारग्रामात काशे-पितळकाम करणाऱ्या कांसार शिल्पींचे आधिक्य होते, तर सुवर्णकार ग्रामात सुवर्णकारांचे आधिक्य होते. लोहनगर म्हणजे लोहकर्म करणाऱ्याचे गाव जेथे मोठ्या प्रमाणात लोखंड गाळायच्या भट्ट्या होत्या आणि एकाच प्रकारचा फार मोठा उद्योग चालू असे. कर्मकारग्राम सुद्धा सुताराचे आधिक्य असलेले ग्राम होते. वाकाटक साम्राज्याच्या अंतर्गत पवनार, कौंडिण्यपूर तसेच अन्य शहरांचे पतन ध्यानात घेता असे लक्षात येते की शहरी शिल्पीनी जवळच्या किंवा दुरच्या प्रदेशात जाऊन वस्ती केली आणि ग्रामीण लोकांच्या सेवेवर आपली उपजीविका चालवू लागले. ज्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शिल्पी काम करीत त्यात मुद्रा विनिमयाचा लोप झाला होता, तेंव्हा त्यांचे पारिश्रमिक वस्तूरूपात मिळवावे लागले होते. अनेक शासकीय प्रतिष्ठानात जे शिल्पी काम करीत असत त्यांना आजिविकेसाठी भूमी अनुदान दिल्या गेली होती. दक्षिण भारताच्या मंदिरात ही प्रथा विशेषतः प्रचलीत होती. श्रीचंद्राच्या इ. स. ९३० च्या पश्चिमभाग ताम्रपत्रात एका मोठ्या मठाला व अन्य आठ लहान मठांना आजिविकेसाठी १२० पाटक (१८० एकर) भूमी अनुदान दिल्याचा उल्लेख आहे. ही भूमी मंदिर-मठाच्या सेवेत राहणारे शिल्पी उदा. मंदिर निर्माता ब्राह्मण म्हणजे स्थपति, दोन सुतार, दोन राजमिस्त्री, दोन लोहार यांचे सह अन्य कामगारही आहेत, अशा लोकांसाठी अनुदान दिली गेली. या व्यतिरिक्त ४७ पाटक भूमी मोठ्या मठाच्या दुरुस्ती साठी दिल्या गेली. मात्र या जमिनीतून निघालेले उत्पन्न वास्तुनिर्मिती साठी सामग्री जमविण्याऱ्या राजमिस्त्री, वास्तुकार, वाहतुककर्मी यांच्या निर्वाहासाठी ठेवण्यात आली.

या काळात शिल्पी साधारणतः तीन प्रकाराने विभक्त झालेले दिसतात. १. ग्रामशिल्पी, जे शेतकऱ्यांना सहाय्यक ठरत. २. संघटीत शिल्पी जसे धातूकर्मी, सुतार ज्यांच्या स्वत:च्या वस्त्या होत्या, आणि ३ शहरांत राहणारे शिल्पी. ग्रामशिल्पीमध्येही स्वनिवासी राहून काम करणारे आणि रोजगार देणाऱ्याकडे जाऊन मजुरीवर काम करणारे, असे दोन प्रकार होते. तर संघटीत शिल्पी हे आपले उत्पादन मागणी प्रमाणे शहरात घेऊन जात. किंवा ग्राहकांच्यानिवासी जाऊन काम करीत असत. ज्या गावात अधिनस्थ राजा म्हणजे सामंत आणि भूस्वामी राहत तेथे राजमहाल बांधण्याची व्यवस्था होती. तेथे सुतार, शस्त्र बनविणारे यासह सर्व प्रकारच्या शिल्पींची निवासाची सोय असे. अशा गावात राहणारे शिल्पी राजपरिवाराची सेवा करीत व राजा कर रुपाने वसूल केलेल्या धान्यामधून त्यांचे पारिश्रमिक देत असे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..