नवीन लेखन...

फितूर दिवसांचे संदर्भ

संदर्भाच्या फितूर होण्याचा लेखाजोगा..

ज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे.

अनेकांची भाकर  कविता लिहीता लिहीता करपतें. स्वप्नें वाहून जायला निमित्त लागतं.स्वतःच्या सावरण्याच्या वयात अनेक जण नाहक उध्वस्त होतात.कलम चालवण्याचे स्वातंत्र्यच कलम करण्यात येत आहे. अनेक स्वप्नं जगण्याआधीच कुस्करली जात आहेत, मरत आहेत. विचारांची कारंजी उडूच नयेत, विचारांचे ठिबक सिंचनही होऊ नये अशी व्यवस्था जाणीवपूर्वक केली जात आहे. निसर्गाची हिरवाई कोणासाठी तरी रेड कार्पेट पांघरण्यासाठी खर्ची पडत आहे. माणसांना श्वास घेण्यासाठी झाडांच्या मुसक्या बांधल्या जात आहेत. स्वप्निल मेश्राम यांच्या कविता केवळ अस्वस्थ करत नाहीत तर विचार करायला प्रवृत्त करतात. विचारांची बैठक एकदा पक्की झाली की आचारांची उंची सहज गाठता येतें. तुमच्या व्यक्तिमत्वावर जेंव्हा निष्ठा, मूल्य याचा परिणाम होतो तेव्हांच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतों. स्वप्निल मेश्राम यांच्या अनेक कविता आपल्या मनात रूंजी घालतात, तेव्हां त्यांचे संदर्भ जीवनात जेव्हा आपण शोधतो तेव्हा काही संदर्भ फितूर झाल्याचे आपल्याला जाणवते.

आपलेच बोट धरून चालायला लागणारे जेंव्हा, आपल्यालाच हात दाखवतात, तेंव्हा कोण आपले कोण फितूर याची सिमारेषा स्पष्ट होते. चेहऱ्यावर सारे फितूर होणारेच मुखवटे असतात, चेहऱ्यावर भाळणारे मुखवट्यावर फसतात. चेहरे स्वतःशी प्रामाणिक राहत नाहीत प्रत्येक वेळेला मुखवटे धारण करून व्यक्तिमत्त्वाचं अस्तित्व टिकवून ठेवतात.आपण ज्या चेहऱ्यावर प्रेम केलेलं असतं त्यांच्यावर आता वेगळ्याच मुखवट्यांनी राज्य केलेलं पाहिलं की आपलं मन विदीर्ण होतं.
एका कवितेत कवी म्हणतो, उत्सव करायला शिक मित्रा, आयुष्याचा आपल्या आजूबाजूचे तपासून घे चेहरे जे बदलतील केव्हाही आणि दाखवतील आपला रंग.. स्वप्नात जगणं आणि स्वप्न जगणं खरोखर दोन टोकावरचे ध्रुव आहेत मित्रा कुणाच्या मनात प्रश्नच उपस्थित होऊ नयेत, अशाप्रकारे मेंदू फ्रिज करून लोकांवर राज्य करता येतं. प्रश्नांना भिडायला कुणाकडेच वेळ नाही, दिवसच फितूर झाले आहेत व रिचार्ज संपल्याप्रमाणे माणसें संपर्क व संवाद हरवून कशीबशी जगत आहेत.

मनंच जेव्हा शरीराशी फितूर होतं, तेव्हा सांगणार कुणाला. मन आणि शरीर दिसायला रेल्वेच्या रुळासारखे समांतर पण मालगाडी सारखं आयुष्याचं ओझं वाहून नेत आहेत. स्वप्निल मेश्राम यांचा हा पहिलाच कवितासंग्रह यामध्ये एकूण कविता आहेत.

तिसरं युद्ध या कवितेत कवी म्हणतों सामान्य प्रश्नांना दखल मिळत नाही कशु हलवली जातात सूत्र कळत नाही तेव्हा इथल्या तरुणांनी कुणाकडे पाहून जगायचं? कवी म्हणतो फोटो क्लिक करण्यासारखीच असतें कविता. बुर्ज खलिफा सारख्या उंच स्वप्नांना देखील आता तडे जात आहेत.सगळ्यां प्रश्नांना कुठे वाचा फुटते? काही प्रश्नांनाच फिनिक्स होता येतं. अनेक प्रश्न जमिनीत गाडले जातात, भूकंप होण्याच्या  प्रतीक्षेत, तप्त लाव्हा बनुन उफाळण्याच्या प्रतिक्षेत जन्मोजन्मी असतात  निद्रीस्त. फोर बीएचके फ्लॅटमध्ये सुद्धा स्वप्नांना मिळत नाही स्पेस.

प्रत्येकाचे संवाद येथे कुपीबंद. आत काय आहे याचा थांगपत्ता लागू न देण्यासाठी सर्वांनी मनाला केलय बंदिस्त. आमच्या घरातला माठ या कवितेत कवी  सांगतो बाबासाहेबांना जवळून पाहिल्याचा प्रसंग “सारे आभाळ उजळून निघाले दोन सूर्य एकमेका समोर उभे होते!” आजाच्या डोळ्यांत त्यांच्या नजरेतून बाबासाहेब कसे दिसत असतील, हे आठवतो तेव्हा आमच्या घरातला माठ मला आता चवदार तळेच वाटतो! अब्राहम लिंकनची आई या कवितेत तुम्ही  लिहिलेल्या ‘मुख्याध्यापकांना पत्र’ मुळेच माझ्यावर संस्कार केलेत आईने. शिक्षकांना सांगायची ती पोरगं हुशार आहे, फक्त तुम्ही शिकवा; तो आपोआप घडेल. काही प्रश्नांची उत्तरं या कवितेत कवी म्हणतो आयुष्य जगता यायला हवं; काही प्रश्नांना टाळून ,काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत ठेवून. आयुष्य एक दीर्घ कविता या कवितेत संवेदनाच्या वस्तीत कोणी पेरावी अशांतता एवढं जगणं व्हावं मलूल? गळून पडावे सारी जगण्याची पिसं लटकवून  टाकावेत आपले दोन हात, छाटून घ्यावेत आपल्या समृद्धतेचे पंख ती अस्वस्थता कधीच नव्हती यापूर्वी.. ऋतुंनी बसावं सोबत येऊन दारात आशयाशी मैत्री केल्यावर सुचावी  आयुष्याची एक दीर्घ कविता. कुठल्याच वस्तीचं होऊ नये या कवितेत कुठल्या माणसांचा  हिरावला
जाऊ नये त्यांना मिळालेला श्वास, महासत्तेच्या सावटाखाली कुठल्या वस्तीच, शहराचं होऊ नये कधी अफगाणिस्तान!
सभोवतांलच्या भवतांलाची जो दखल घेतो, तोच खरा कलावंत व त्याच्या हातूनच कला साकारते. संदर्भ जेव्हा फितूर होतात तेव्हा मनाच्या विदीर्ण होण्याचा कोलाज आपल्याला अंतर्मुख करतो. अंतर्मुख झाल्या शिवाय मनातला फिनिक्स बाहेर येत नाही. अस्वस्थ करणारां व विचार प्रवर्तका कडे नेणारा हा काव्यसंग्रह आहे. वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखा.
फितूर दिवसाचे संदर्भ स्वप्निल मेश्राम

अष्टगंध प्रकाशन. 96
किंमत – २००₹

डॉ.अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 65 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..