अक्षय तृतीया — समग्र माहिती
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. “अक्षय” या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा, नाश न होणारा असा आहे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप हे अक्षय (अखंड) फळ देतात, अशी श्रद्धा आहे. तो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो.
हिंदू पंचागा प्रमाणे खालील साडेतीन शुभ मुहूर्त आहेत.
गुढीपाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदा): नवीन वर्षाची सुरुवात, अत्यंत शुभ दिवस
अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया): या दिवशी केलेले काम अक्षय (अविनाशी) राहते, अशी भावना आहे दसरा (विजयादशमी – आश्विन शुद्ध दशमी): विजयाचे प्रतीक, नवीन कामांसाठी उत्तम दिवाळी पाडवा/बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा): हा दिवस ‘अर्धा’ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीया हा वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येतो. या तिथीस अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण मदनरत्न या ग्रंथात दिले आहे, ते खालीलप्रमाणे :
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया |
उद्दिश्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ||
अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
अक्षय्य तृतीया २०२६: यावर्षी अक्षय्य तृतीया १९ एप्रिल २०२६ (रविवारी) आहे. या दिवशी दुपारी १२:३२ नंतर विशेष शुभ योग असल्याचे मानले जात आहे.
जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते.
या दिवसाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत:
या दिवशी वेद व्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली, असे मानले जाते. आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.
भगवान परशुराम यांचा जन्म या दिवशी झाला, त्यामुळे हा दिवस “परशुराम जयंती” म्हणूनही साजरा केला जातो.
पांडवांना वनवासात असताना भगवान श्रीकृष्णांनी “अक्षय पात्र” दिले, ज्यामुळे अन्न कधी संपत नव्हते, ही कथा प्रसिद्ध आहे.
तसेच आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते, असे मानले जाते.
धार्मिक महत्त्व:
पौराणिक श्रद्धांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली.
अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो कारण:
या दिवशी कोणतेही शुभ कार्य (लग्न, गृहप्रवेश, व्यवसाय सुरू करणे) करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. दानधर्माला विशेष महत्त्व आहे — अन्नदान, वस्त्रदान, जलदान यामुळे पुण्य मिळते. अक्षय तृतीया या दिवशी केलेले जप, तप, पूजाअर्चा यांचे फळ अनेक पटींनी वाढते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते.
सांस्कृतिक आचार:
या दिवशी जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करणे. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान. ब्राह्मण भोजन घालणे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खाणे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे.
सोन्याचे दागिने:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. सण साजरा करण्याची पद्धत:
अक्षय तृतीया विविध प्रकारे साजरी केली जाते:
सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू व लक्ष्मीची पूजा केली जाते. तुळशीला पाणी घालून पूजा करतात. गरीबांना अन्न, पाणी, धान्य दान केले जाते.
ब्राह्मणाला उदकुंभाचे दान देतांना पुढील मंत्र म्हणावा –
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।।
– धर्मसिन्धु
अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.
सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व:
• शेतकरी वर्गासाठी हा दिवस नवीन पीक कापणी व शेतीसाठी महत्त्वाचा असतो.
• अनेक ठिकाणी अन्नदान, पाणपोई, धर्मादाय उपक्रम राबवले जातात.
• समाजात दान, सेवा आणि सहकार्याची भावना वाढीस लागते.
• महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डाळ (किंवा भिजवलेले हरबरे) आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा (गौरी उत्सवाचा) अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.
आख्यायिका:
अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग’ असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं’ तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी’ ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते.मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.
महत्व:
अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक सण नसून तो दान, श्रद्धा, समृद्धी आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. या दिवशी केलेले सत्कर्म आणि सद्भावना आयुष्यभर लाभदायक ठरतात, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते.
वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हणले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते’.
या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे.
डॉ. दिलीप कुलकर्णी
१४.०४.२०२६
मोबा: ९८८१२०४९०४


Leave a Reply