नवीन लेखन...

इवान इवानोविचची गोष्ट

तुम्ही इवान इवानोविचचं नाव ऐकलंय? बहुतेक नसेलच ऐकलं! ऐकलं नसलं तर मग पुढची वाक्यं नीट लक्ष देऊन वाचा – ‘इवान इवानोविच हा पहिलावहिला अंतराळवीर होता! अगदी युरी गागारीनच्याही अगोदर अंतराळाची सफर करून आलेला… आणि तीही एकदा नव्हे तर दोनदा!’

युरी गागारीनच्याही अगोदर, हा रशियन अंतराळवीर ९ मार्च, १९६१ रोजी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आला. ही त्याची अंतराळसफर सुमारे पावणेदोन तासांची होती. आणि या अंतराळसफरीत तो एकटाच नव्हता; तर त्याच्याबरोबर प्राण्यांची एक मोठी ‘टोळी’ही होती. उतरताना त्यानं अंतराळयानातून बाहेर उडी मारली आणि हवाईछत्रीच्या साहाय्यानं तो जमिनीवर सुरक्षितरीत्या उतरला. त्यानंतर अवघ्या सतरा दिवसांतच म्हणजे २६ मार्च, १९६१ रोजी तो पुनः अंतराळसफरीवर गेला… या वेळीही प्राण्यांची टोळी घेऊनच! या वेळची अंतराळसफरही पावणेदोन तासांचीच होती. या वेळीही तो सुरक्षितपणे जमिनीवर उतरला.

मग दोनदा अंतराळात जाऊनही त्याचा उल्लेख कुठंच कसा नाही? त्याचं कारण आहे – अंतराळवीर इवान इवानोविच हा सजीव मानव नव्हता. तो एक बाहुला होता… अगदी सजीव मानवासारखा दिसणारा! त्या इवानोविचचीच हो गोष्ट आहे.

शीतयुद्धाच्या काळात, १९६० सालाच्या सुमारास अमेरिका आणि रशिया या दोन देशांतल्या तीव्र अंतराळशर्यतीला सुरुवात झाली होती. दिनांक ४ ऑक्टोबर, १९५७ रोजी रशियानं पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या सोडला आणि या शर्यतीचा पहिला टप्पा जिंकला. त्यानंतर १२ एप्रिल, १९६१ रोजी युरी गागारीनला अंतराळात पाठवण्याअगोदर, चाचण्या म्हणून इवान इवानोविच या रबरी बाहुल्याला रशियानं दोनदा अंतराळसफर घडवून आणली आणि आणीबाणीच्या परिस्थितीत हा इवान इवानोविच सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकतो की नाही, याच्याही चाचण्या घेण्यात आल्या.

युरी गागारीननं केलेल्या अंतराळसफरीच्या अगोदर झालेल्या या दोन्ही मानवरहित मोहिमा बहुविध उपयोगाच्या होत्या. यातली पहिली मोहीम होती ती कोराबल-स्पुटनिक-४ या अंतराळयानातून, तर दुसरी मोहीम होती ती कोराबल-स्पुटनिक-५ या अंतराळयानातून. या मोहिमांत, अंतराळसफरीच्या विविध टप्प्यांत अंतराळवीराला कोणता धोका निर्माण होऊ शकतो, याची चाचपणी करायची तर होतीच; पण त्याचबरोबर या मोहिमांत इतर अनेक संशोधनात्मक चाचण्याही करायच्या होत्या. यासाठीच या इवानबरोबर प्राण्यांचा एक मोठा गट अंतराळात पाठवला गेला होता.

इवानच्या पहिल्या अंतराळसफरीत, इवानबरोबर चेर्नुश्का (म्हणजे ‘काळू’) नावाचा मॉस्कोच्या रस्त्यावरून पकडून आणलेला एक भटका कुत्रा होता, चाळीस काळे उंदीर होते आणि चाळीस पांढरे उंदीर होते; याचबरोबर अनेक गिनी पिग, सरपटणारे प्राणी, अशा प्राण्यांचाही समावेश होता. या यानात या सर्व प्राण्यांबरोबरच विविध प्रकारच्या बिया, मानवी रक्ताचे नमुने, कर्करोगाच्या पेशी, विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू, अशा अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. इवान आपल्या हवाईछत्रीच्या साहाय्यानं जिथं उतरला, त्यापासून सुमारे २६५ किलोमीटर अंतरावर त्याचं अंतराळयान आपल्याकडील प्राण्यांसह उतरलं. इवानच्या दुसऱ्या अंतराळमोहिमेतही, इवानबरोबर झ्वेझडोच्का (म्हणजे ‘छोटा तारा’) नावाच्या एका कुत्र्यानं, तसंच अनेक सजीवांनी भाग घेतला. खुद्द युरी गागारीन आणि भविष्यातला दुसरा रशियन अंतराळवीर घेर्मान टिनोव्ह, हे दोघंही या संपूर्ण मोहिमांत इवानवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून होते.

इवान इवानोविचनं आपल्या अंतराळसफरी यशस्वीरीत्या पूर्ण करून युरी गागारीनच्या अंतराळमोहिमेबद्दल रशियन तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांचा विश्वास वाढवला होता. या इवान इवानोविचचा चेहरा आणि शरीर हे अगदी माणसासारखं बनवलं गेलं होतं. त्याला अंतराळवीराचा खरा पोशाखही घातला होता. इतकंच नव्हे, तर त्याच्या छातीतील पोकळीत काही उपकरणंही बसवली होती. यांतलं एक उपकरण गुरुत्वाकर्षणातील बदल मोजत होतं, तर दुसरं उपकरण अंतराळातील किरणोत्साराचं मापन करत होतं. (अंतराळात किरणोत्साराची तीव्रता अधिक असणं अपेक्षित होतं.)

या दोन मोहिमांपैकी दुसऱ्या मोहिमेत, अंतराळवीरानं केलेलं संभाषण पृथ्वीवरील नियंत्रण कक्षात ऐकू येतं की नाही, ते कळण्यासाठी ध्वनिमुद्रित संगीतही वाजवलं गेलं. आणि याशिवाय कोबीचं सूप बनवण्याची पद्धतही वर्णन केली गेली! सर्वसाधारण संदेशांऐवजी संगीत आणि पाकक्रियांचा उल्लेख करण्याचा उद्देश एकच होता – तो म्हणजे या मोहिमांबद्दल पूर्ण गुप्तता राखणं. अमेरिकेवर कुरघोडी करण्यासाठी हे अत्यावश्यक होतं. ज्यांना हे संगीत आणि पाकक्रियेचं वर्णन ऐकू येईल, त्यांना वाटावं की हा नेहमीचाच एक कार्यक्रम आहे. पण याचा परिणाम उलटाच झाला. पाश्चिमात्य देशांनी हे संगीत टिपलं. त्यामुळे युरी गागारीनच्या यशस्वी अंतराळसफरीनंतर अशी अफवा पसरली, की युरी गागारीनच्या अगोदरही रशियानं अंतराळात माणूस पाठवला होता; परंतु तो अंतराळसफरीदरम्यान मरण पावला.

इवान इवानोविच हा अंतराळवीर, जैववैद्यकशास्त्रात संशोधन करणाऱ्या एका संस्थेच्या सल्ल्यानुसार, मॉस्कोतील एका कृत्रिम अवयव बनवणाऱ्या संस्थेकडून बनवून घेतला होता. हा बाहुला इतका बेमालून बनवला गेला होता, की जमिनीवर परतल्यावर जर तो स्थानिक लोकांच्या हाती लागला, तर गैरसमज पसरू नये म्हणून त्यावर ‘माकेत’ (नकली) असं लिहून ठेवण्यात आलं होतं. तरीही काहीसा गोंधळ झालाच. दुसऱ्या अंतराळसफरीच्या वेळी इवान हा बर्फाच्छादित प्रदेशात उतरला. त्यामुळं त्याला घोड्यांकडून ओढल्या जाणाऱ्या गाडीवरून परत नेण्यात आलं. या घटनेच्या काही महिने अगोदर गॅरी पॉवर्स या अमेरिकन वैमानिकाचं विमान हेरगिरी करीत असल्याच्या आरोपावरून रशियाकडून पाडण्यात आलं होतं आणि हवाई छत्रीच्या साहाय्यानं जमिनीवर उतरलेल्या गॅरी पॉवर्सला रशियानं ताब्यात घेतलं होतं. या वेळीही असाच एखादा प्रकार घडला असावा व एखाद्या जखमी वा ठार केलेल्या अमेरिकन गुप्त हेराला नेलं जात असल्याची शंका तिथल्या स्थानिकांना आली. जेव्हा इवानच्या शरीरात एकानं प्रत्यक्ष बोट खुपसून पाहिलं, तेव्हाच हा माणूस खरा नसल्याचं त्यांना पटलं.

पण इवान इवानोविचची गोष्ट इथंच संपत नाही. कारण पुढचा प्रश्न उरतोच… तो म्हणजे हा इवान इवानोविच सध्या आहे तरी कुठं? तो आहे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन (डी.सी.) येथील, सुप्रसिद्ध नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझिअममध्ये! कारण, १९९३ साली रॉस पेरो या अमेरिकन उद्योगपतीनं तो एका लिलावात सुमारे १,८९,५०० डॉलर (आजचे सुमारे सव्वा कोटी रुपये) या किमतीला विकत घेतला आणि १९९७ साली तो स्मिथ्सोनिअन संस्थेनं उभारलेल्या या संग्रहालयाकडे सुपूर्द केला. तेव्हा या ‘पहिल्यावहिल्या’ अंतराळवीराला भेटायचं असलं तर तुम्ही भेटू शकता – नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझिअममध्ये!

— डॉ. राजीव चिटणीस.

छायाचित्र सौजन्य: www.extravaganzi.com / Eric Long – National Air and Space Museum

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..