ड्रॅक्युलाचा पाहुणा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १९)
ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली.
ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही. […]