गेल्या सहा दशकांत अफगाणिस्तानमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. या काळामध्ये ज्या भटक्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली त्यांनी आपल्याला भावले तसे या देशाबद्दल लिखाण करुन ठेवले आहे. त्यांच्यातलाच एक आहे निक डँझिगर. धाडसी प्रवृतीचा जातिवंत भटक्या पक्षी. १९८२ साली निकला `विन्स्टन चर्चिल फेलोशिप’ मिळाली. या आर्थिक बळावर पुढे निक डँझिगर याने प्राचीन `सिल्क रुट’चा प्रवास करुन त्यातील अनुभवांवर आधारलेले `डँझिगर्स ट्रॅव्हल्स’ हे पुस्तक लिहिले. कमीतकमी सामान पाठुंगळीला घेऊन व तुर्कस्था-इराणचा अधिकृत व्हिसा घेऊन निक इस्तंबुलमध्ये शिरला खरा, परंतु त्या पुढच्या प्रवासात निकने दुसऱ्या राष्ट्रांचा नवीन व्हिसा घेण्याची भानगड केली नाही की कोणाकडे परवानगी मागितली नाही. स्थानिक लोक, अतिरेकी गट यांच्यापैकी कोणाशीही मैत्री करुन निक डँझिगर एका देशाची वेस ओलांडून दुसर्या देशात जात असे.
`डँझिगर्स ट्रॅव्हल्स’मध्ये निक लिहितो की, तुर्कस्थानमधून तो आयातुल्ला खोमेनी यांच्या इराणमध्ये पदयात्रा करीत प्रवेशला. पुढे इराणमधून त्याने अक्षरश: घुसखोरी करुन अफगाणिस्तानच्या भूमीवर पाय ठेवला. अफगाणिस्तानात तेव्हा रशियाने मुजाहिदीनांच्या विरोधात लष्करी कारवाई सुरु केलेली होती.
`डँझिगर्स ट्रॅव्हल्स’मध्ये निकने अफगाणिस्तानातील जे अनुभव कथन केले आहेत ते आजच्या अफगाणिस्तानशी सख्खे नाते सांगतात. निकने पाहिलेला अफगाणिस्तान हा इतिहासाचा भाग झालेला असला तरी त्याची पुनरावृत्ती पुन्हा अफगाणिस्तानमध्ये होऊ पाहात आहे.
१९८०च्या दशकातील तो काळ. अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांमध्येही रशियनांविरुद्ध तीव्र व्देष निर्माण झालेला होता. निकने तय्यदाबादहून अफगाणिस्तानच्या हेरात या शहरात प्रवेश केला. अर्थात निककडे व्हिसा वगैरे काही नव्हतेच. निक हा सोव्हिएत नागरिक नाही हे त्याचा मुजाहिदीन मित्र आपल्या अफगाणी बांधवांना `नह शौरवी’ असे समजावून देत असल्यानेच निकचे दिवस सुखाचे जात होते. निक लंडनचा आहे हे कळल्यानंतर अफगाणी लोक त्याला थांबवून एवढेच विचारीत `बीबीबी? लंडन?’ याचे कारण म्हणजे तेव्हा अफगाणिस्तानमध्य टीव्ही नव्हता. रेडिओवरील स्थानिक अफगाणी कार्यक्रम तसेच बीबीसी लंडन रेडिओ स्टेशनवरील पर्शियन सेवेव्दारे रशियाविरुद्धच्या बातम्या ऐकणे हा सामान्य अफगाणी माणसाचा दिनक्रम होता. त्यामुळे निक डँझिगर हा बीबीसी लंडनचा वार्ताहर आहे अशीच त्या लोकांची समजूत होत असे.
हेरातला पोहोचेपर्यंत निक डँझिगरला वाटेत अनेकदा रशियन विमानांच्या बाँम्बहल्ल्यांची चुणूक दिसली. एकदा वाटेत रशियाच्या सहा विमानांनी त्याच्या डोळ्यांसमोरच एका भागावर बाँम्बफेक केली. मुजाहिदीनांकडे विमानवेधी तोफा नसल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी लपण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. रशियन विमाने आली. त्यांनी नासधूस केली. त्यानंतर काही वेळाने काहीच न घडल्याप्रमाणे हेरातनजीकच्या भागातील शेतमजूर, निकबरोबरचे मुजाहिदीन आडोशांतून रस्त्यावर आले. व आपले रोजचे व्यवहार सुरु केले. अफगाणिस्तान हा देश आधीच दरिद्री. रशियाविरुद्धच्या युद्धात कंगाल झालेला. हेरातमध्ये रशियन सैन्याबरोबर लढताना जे मुजाहिदीन जखमी व्हायचे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक `लुटुपुटु’चे रुग्णालय बनविलेले होते. निक म्हणतो की, या रुग्णालयातील पुरुषच नर्स म्हणूनही काम करायचे. हल्ल्यांपासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी ही रुग्णालये आठवड्यांतून तीन ते चार वेळा विविध ठिकाणी हलविली जायची. रुग्णांबरोबरच स्वत:चे रक्षण करण्यासाठी तेथील डाँक्टर व अन्य सेवकवर्ग हेदेखील हत्यारे बाळगत असत. असे रुग्णालय जगात दुसरे कुठेही नसावे. हेरात शहराच्या पश्चिमेची बाजू रशियनांच्या बाँम्बफेकीमुळे पार भुईसपाट झालेली होती. तेथील पाचशे कुटुंबांच्या एका गावात आता फक्त वीसच माणसे उरलेली होती.
अफगाणिस्तानमध्ये रशियनांची जी लष्करी वाहने, रणगाडे पकडले जायचे, त्यांचे सुटे भाग तसेच अमली पदार्थ विकण्याचा धंदा मुजाहिदीन करायचे. निक डँझिगरचा हेरातमधील मुजाहिदीन मित्र अहमद हा डाँलर्सचे अफगाणी चलनात त्वरित रुपांतर करुन आणायचा. आंतरराष्ट्रीय चलनबदलीचा हा व्यवहारही तेव्हा अफगाणिस्तानात तेजीत होता.
अमली पदार्थांचा धंदा करुन पैसे मिळविणे यात अफगाणी लोकांना काहीच गैर वाटत नसे. अमली पदार्थांच्या बदल्यात ते रशियन सैनिकांकडून रोख पैसे, अन्न, सिगरेट, शस्त्रे, दारुगोळा अशा वस्तू मिळवत असत. रशियनाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले त्या काळात अफगाणी लोक बीबीसी, पर्शियन रेडिओवरील बातम्या ऐकत. तो छंद मुजाहिदीनांनाही होता. रशियन सैनिकांना पकडल्यास, आपल्या माणसांच्या सुटकेच्या बदल्यात मुजाहिदीन रशियनांची सुटका करीत.
मुजाहिदीनांच्या गटांमध्ये तीव्र मतभेद होते. निक डॅझिंगर ज्या मुजाहिदीन गटाबरोबर राहात होता त्याचे नाव जमियत असून त्यात बहुसंख्य सुन्नी मुसलमान होते. ते खोमेनी व शियांचा द्वेष करायचे, तर दुसर्या बाजूस अफगाणिस्तानातील तेव्हाचे कम्युनिस्ट सरकारही दोन गटांत विभागले गेले होते.
मजल-दरमजल करीत निक अफगाणिस्तानमधील एका गावात पोहोचला. गावच्या मशिदीमध्ये स्थानिक मौलवींचे भाषण सुरु होते. तेथे जमलेल्या मुसलमानांना तो सांगत होता की, सर्व मुस्लिमांनी इस्राएल नष्ट करायला हवे. सीरियाला, पॅलेस्टाईनला मुक्त करायला हवे. अल्ला हो अकबरच्या घोषणांनी ही सभा संपली…
डँझिगर्स ट्रॅव्हल्समध्ये निकने पाकिस्तान व आणखीन काही देशांतील अनुभवांचेही चित्तथरारक वर्णन केले आहे. विन्स्टन चर्चिल फेलोशिपची रक्कम ३ हजार पौंडांची होती. कलंदराप्रमाणे फिरल्याने निक डँझिगरचा प्राचीन सिल्क रुटवरील प्रवासाचा खर्च अठरा महिन्यांमध्ये फक्त हजार पौंड झाला. हाही एक विशेषच मानला पाहिजे. अफगाणिस्तानमध्ये सामान्य नागरिकांतील इस्लामी धर्मांधता, करुणा, गरिबी या सर्वांचेच दर्शन निकला झाले. अफगाणी मुजाहिदीनांनी गनिमी काव्याने रशियन सैन्याला हरविले. मात्र त्यानंतरच अफगाणमध्ये तालिबान व ओसामा बिन लादेनने हातपाय पसरले. त्या दोघांनीच जगाला विनाशाच्या कड्यावर आणून ठेवले होते.
– समीर परांजपे
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply