नवीन लेखन...

ध्यानी, मनी ते स्वप्नी.

एक रखवालदार एका धनिकाच्या बंगल्यावर रात्रपाळी करत होता. सकाळी मालक विमानप्रवासाला निघायच्या तयारीत असताना, तो तिथे येऊन त्यांना म्हणाला, “मालक, मी स्वप्नांत पाहिले की आपण जाणार आहांत त्या विमानाला अपघात झाला. तेव्हा आपण आजचा प्रवास रहित करावा.” मालकाचा प्रवास पुढे ढकलण्यासारखा होता.त्याने विचार केला, “ह्याच्या स्वप्नाची परीक्षा प्रवासाला जाऊन करण्यापेक्षा न जाताच करावी.” मालक प्रवासाला गेला नाही. त्या दिवशी खरोखरच त्याच विमानाला अपघात झाला. कांही जण दगावले. रखवालदाराचे स्वप्न खरे ठरले. मालकाने रखवालदाराला बोलावले आणि १००० रूपये बक्षीस दिले. बरोबरच त्याचा झाल्या दिवसाचा पगारही दिला आणि सांगितले, “उद्यापासून कामावर येऊ नकोस.” आता सांगा बरं त्याने जीव वाचवला तरी त्याला कामावरून कां काढले ?“ बहुतेक ही गोष्ट तुम्हाला माहित असेलच. नसली तरी उत्तर आलंच असेल. बरोबर आहे. रखवालदाराला स्वप्न पडलं म्हणजे तो त्या रात्री झोपला होता. झोपणारा कामचुकार रखवालदार राखण करायला काय उपयोगाचा ? रखवालदारावर अन्याय झाला कां हे आपल्याला नाही विचारात घ्यायचय. आपण त्या स्वप्नाचा विचार करूया. स्वप्ने खरंच भावी घटनांची, संकटांची सूचना देतात कां ?

माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ? दिवसभर खाद्याच्या शोधार्थ फिरल्यामुळे, स्वप्नात डोळ्यांसमोर खाण्याजोगे प्राणी येत असतील की ज्यांच्याबरोबर लढाई करायला लागायची ते प्राणी किंवा दुसरे मानव समोर येत असतील ? की एखाद्या नर-मादीने हुलकावणी दिल्यामुळे तिची आठवण येत असेल ? आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नंतर मानवाने प्रगती केली. वसाहती केल्या. लिहिण्याचे तंत्र अवगत केले तसा तो इतर विषयांबरोबर ह्या स्वप्नांचाही विचार करू लागला ? स्वप्ने कां पडत असावीत ? स्वप्ने काय सुचवत असावीत, ह्याचा विचार करू लागला. स्वप्ने कोण पाडतो, ह्याचा विचार करू लागला. चांगली स्वप्ने, वाईट स्वप्ने असा भेद करू लागला. तेव्हांपासून आजवर माणूस स्वप्नांचा विचार करतोच आहे. एक मत असही आहे की अतिप्राचीन काळी माणसाला जगण्यासाठी जो भयावह संघर्ष करावा लागला, त्याचेच पडसाद म्हणून स्वप्ने अवतरली व आजही अवशिष्ट आहेत.

माणसाची प्रगती होतांना वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या संस्कृती उदयाला आल्या व लयाला गेल्या. पण त्या प्रत्येक संस्कृतींत स्वप्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला. सुमेरीयन संस्कृती ही अत्यंत प्राचीन. त्यांच्या राजाने स्वप्नांकडे बारकाईने लक्ष दिलं. इसवी सन पूर्व आठव्या शतकांत मातीचे तक्ते बनवून त्यांत जुन्या ऐकीव गोष्टींची नोंद करून ठेवली. त्यांत इ.स.पूर्व अडीच तीन हजार वर्षांपूर्वीच्या अर्धदेव आणि अर्धमानव असलेल्या गीलगामेशवर लिहिलेले महाकाव्य आहे. त्यांतील पहिल्याच प्रकरणात गीलगामेशला त्याच्या आयुष्यांत येऊ घातलेल्या स्त्रीबद्दल स्वप्नातून कळते. गीलगामेश पुढे सखोल (deep) ज्ञान असलेला म्हणून मानला जाऊ लागला. गीलगामेशची गोष्ट सांगत राहिलो तर आपला स्वप्न-विषय बाजूलाच राहील. तर ते लोक असं मानत की झोपेमध्ये माणसाचा आत्मा किंवा त्याचा एखादा भाग माणूस झोपेत असताना शरीर सोडतो आणि स्वप्नांत दिसणाऱ्या व्यक्तींना, स्थळांना तो भेट देऊन येतो. किंवा स्वप्नांचा देव त्या स्वप्न पहाणाऱ्याच्या आत्म्याला घेऊन जातो. तर असीरीयन आणि बाबीलोनीयन स्वप्नं ही भविष्यवेध घेणारी मानतच पण त्यांतही चांगली, म्हणजे देवांनी पाठवलेली आणि वाईट म्हणजे सैतानांनी पाठवलेली मानत. प्राचीन इजिप्तचे लोक ज्यांना सुस्पष्ट आणि महत्त्वाची स्वप्ने पडत त्यांना खास किंवा सिध्दी-प्राप्त मानत. स्वप्नांचा अर्थ सांगणारेही खास समजले जात.
इतकेच नव्हे तर खास चांगली स्वप्ने पडावीत व देवाकडून संदेश मिळावा म्हणून वनामधे तयार ठेवलेल्या खास स्वप्न-शय्येवर जाऊन झोपत. आता ह्या सर्वाचा फायदा उठवणारे आणि खरा खोटा धंदा करणारे तेव्हांही असणारच.

चायनीज फार फार पूर्वी मानत की आत्म्याचे दोन भाग असतात. एक जो स्वप्नात शरीर सोडून जातो तो आणि दुसरा जो शरीरांत राहतो. अर्थात् ह्या मताला आक्षेप घेणारेही होतेच. ग्रीकांच मत बरचसं इजिप्तच्या लोकांप्रमाणेच होतं. ते स्वप्नांचा भला बुरा अर्थ लावत असत. स्वप्नांना देवांकडून मिळालेल्या सूचना समजत. त्यासाठी स्वप्नाचा देव मॉर्फीस याची आराधना करत. देवळात, पवित्र स्थानांत झोपणाऱ्यांना स्वप्नांच्या माध्यमातून तो मदत करतो असे समजत. फार पूर्वी हाच देव कीहोलमधून येऊन स्वप्नं पडण्यासाठी मदत करतो व काम होताच त्याच मार्गाने परत जातो, असेही मानत. इजिप्तमधे नंतर दुसऱ्या संस्कृतींच्या प्रभावामुळे झोपेत आत्मा शरीर सोडतो असंही मानलं जाऊ लागलं. ॲंटीफॉन ह्यांने इ.स. पूर्व पांचव्या शतकांमध्ये स्वप्नांबद्दल पहिले पुस्तक लिहिले त्यांत हे नोंदले आहे. ज्याच्या नावाने आजचेही डॉक्टर शपथ घेतात, त्या हिप्पोक्रीटीसने मात्र इ.स. पूर्व चौथ्या शतकांत “आत्मा दिवसा चित्र स्वीकारतो आणि रात्री ती सोडतो” असा साधा अर्थ लावला. तत्त्वज्ञ ॲरीस्टॉटलचा विश्वास होता की स्वप्नांमुळे आजाराचं निदान करायला मदत होते व आजाराची आगाऊ सूचनाही मिळू शकते. तर सिसेरो या ग्रीक तत्त्वज्ञाने असा विचार मांडला की स्वप्न पहाणाऱ्याचे मागील कांही दिवसांतील विचार व संवाद ह्यांच्यामुळे स्वप्ने पडतात.

वेगवेगळ्या धर्मामध्येही स्वप्नांबद्दल विचार झालेला आहे. ज्यूंच्या ग्रंथात स्वप्ने जगातील अनुभवात धरली जातात व त्यांचा योग्य अर्थ लावून कांही शिकता येतं, असही त्यांत म्हटले आहे. हिब्रूंचा विश्वास होता की स्वप्नांचा व धर्माचा जवळचा संबंध आहे. ते एकेश्वरवादी असल्यामुळे सर्वांना स्वप्ने तो एकच देव पाडतो आणि स्वप्ने बरी किंवा वाईट असतात असं ते मानत. शुभ स्वप्नासाठी पवित्र स्थानी झोपत. ख्रिश्चन धर्मातही हीब्रूंप्रमाणेच स्वप्नांना धर्मात खास स्थान होते व ती पारलौकीक मानत. ओल्ड टेस्टामेंटमध्ये स्वप्ने व त्यापासून मिळणारी दैवी प्रेरणा याच्या अनेक कथा आहेत. जेकबला पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारी शिडी स्वप्नात दिसली ही कथा फार प्रसिध्द आहे. देव माणसाशी स्वप्नातून बोलू शकतो असं अनेक ख्रिश्चन धर्मगुरू प्रवचनांत सांगत. इस्लाममधील स्वप्न-प्रभावाचा अभ्यास पाश्चात्त्यांनी केला आहे. प्रेषित महंमदानंतर ज्ञान द्यायला कोणी गुरू येणार नसल्यामुळे फक्त स्वप्नांतूनच मुस्लिमांना देवाबद्दल ज्ञान प्रकटीकरण होऊ शकतं, असा त्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. हिंदु धर्मांत मांडुक्य उपनिषदांत स्वप्नाबद्दल म्हटले आहे की शरीरस्थ आत्म्याला तीन अवस्था अनुभवतां येतात, त्यांतली एक स्वप्न. बाकीच्या दोन अर्थातच जागृतावस्था व निद्रावस्था. अर्थात असाही एक मतप्रवाह आहेच की सर्व जे घडतय, तेही स्वप्नवत आणि मिथ्या आहे. हा मतप्रवाह डेस्कार्टेस ह्या तत्त्वज्ञाने सतराव्या शतकांत उचलून धरला. अमेरीका, आफ्रीका येथील मूळ निवासी जमातींमधे वेगवेगळ्या कल्पना बाळगल्या आहेत तर मध्ययुगांत स्वप्न हे सैतानाने निर्माण केलेलं प्रलोभन आहे असा विचार प्रॉटेस्टंटस ख्रिश्चनांपैकी कांही जणांनी मांडला. कॕथालीक धर्मगुरूंनी मात्र स्वप्नांनी आपल्या जीवनाला चांगले वळण लावले, असेच म्हटले आहे. बौध्द धर्मामध्ये स्वप्नांना अर्थ आहे व एकच स्वप्न अनेकांना पडू शकतं असं मानलं जातं. सिध्दार्थने घर सोडण्यापूर्वी तेथील अनेकांना तशा अर्थाची स्वप्ने पडल्याचे सांगितले आहे. सिंगमंड फ्राॕईड हा मानसशास्त्रातला एक दादा माणूस. त्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे माणसाच्या अतृप्त वैषयिक इच्छा, दडपलेल्या वासना त्याच्यावर दीर्घकालीन परिणाम करतात. सगळ्या मानसशास्त्रीय प्रश्नांचे उत्तर तो त्यांतच पहायचा. अर्थात स्वप्नांचा संबंधही त्याने दडपलेल्या वैषयिक वासनांत शोधलं नसत तरच नवल. त्याने स्वप्नांबद्दल खूप लिहिलं आहे.
त्याच्या मते खोलवर दडपलेल्या इच्छा आणि चिंता आणि एखाद्या गोष्टीची अतीव ओढ (obsession) हीच स्वप्नांमधे परावर्तित होतात. वैषयिक दडपणांतून सुटका करून घेण्यासाठी स्वप्ने पडतात. स्वप्नांचे अर्थ लावण्याचं त्याने तंत्रच निर्माण केलं आणि Interpretation of Dreams हा ग्रंथही लिहिला. पुढील मानसशास्त्रज्ञांनी हे मत खोडून काढलं. व्यक्तीगणिक स्वप्नाचा अर्थ लावणे योग्य ठरवले. स्वप्ने आपल्या हिताचा कांही संदेश देत असतात. तो समजून घेऊन भावनिक ताणतणाव कमी करता येतात. वारंवार पडणारी एकाच प्रकारची स्वप्ने नक्कीच आपण दुर्लक्षित केलेल्या मनोभावनेकडे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतात. आधुनिक जगांत स्वप्नांचा संबंध सुप्त मनाशी जोडला जातो. स्वप्नांवर स्वप्न पहाणाऱ्याचा ताबा नसतो. महाभयंकर, भीतीदायक स्वप्नांपासून गोड स्वप्नांपर्यंत अनेक प्रकारची स्वप्ने पडत असतात. मात्र आजही स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी फारसा शास्त्रीय आधार नसूनही फ्राॕईडच्या तंत्राचा आधार घेणं लोकप्रिय आहे.

स्वप्ने केव्हां पडतात ? आपण गाढ झोपेत असतो, तेव्हां स्वप्ने पडत नाहीत. किंवा पडत असली तरी कळत नाहीत.
स्वप्नाची सर्वसाधारण व्याख्या “स्वप्न म्हणजे चित्रे, भावना, कल्पना आणि संवेदना यांची झोपेच्या एका विशिष्ट काळांत मनात प्रतिक्षिप्त क्रियेने एकापाठोपाठ साकारणारी मालिका” अशी करतां येईल. स्वप्ने REM (Rapid Eye Movement) असा जो गाढ निद्रेनंतरचा थोडा सावध झोपेचा प्रकार असतो, त्या काळांतच बहुदा पडतात.
अधिक योग्य म्हणजे त्या काळांत स्वप्ने जाणवतात. स्वप्ने कांही सेकंदापासून ते २५-३० मिनिटांपर्यंत चालू रहाणारी असू शकतात. REMचा काळ साधारण दोन तासांचा असतो व सर्वसामान्य माणसाला तीन ते पाच स्वप्ने रोज रात्री पडू शकतात. तर कांहीना सातपर्यंतही पडतात. REM च्या काळांतच जाग आल्यास स्वप्ने स्पष्टपणे आठवतात. अजूनही स्वप्नांमधे येणाऱ्या गोष्टींचा, त्यांच्या कारणाचा वा अर्थाचा पूर्ण मागोवा मानवाला घेता आलेला नाही. परंतु स्वप्ने कां पडत असावीत ह्या बद्दलचे जे कांही संशोधन आहे, त्यांतील एक फार पटण्यासारखे आहे. स्वप्ने जरी REM काळांत पडत असली तरी दोघांचा थेट संबंध नसावा. झोपेमधे सुध्दा आपला मेंदूचा कांही भाग कार्यरत असतोच. मेंदूबद्दल जे संशोधन झाले आहे, त्यावरून मेंदूच्या विशिष्ट भागातच स्मृतीकोश असतात. व कोशांची क्षमता खूप मोठी असली तरी मर्यादीत असणारच. पुन्हां तात्पुरती स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती असेही भाग असतातच. निद्रावस्थेत मेंदू ठरवतो की यांतल्या कोणत्या स्मृती दीर्घकालीन स्मृतीकोशांत साठवल्या पाहिजेत. त्या बदलीच्या प्रक्रीयेमधे आपल्याला थोड्या सावध झोपेंत जे जाणवते, तीच स्वप्ने. मेंदूच्या पुढच्या भागातच स्वप्ने जाणवतात. मी आजपर्यंत वाचलेल्या माहितीवरून मानवी मेंदू हा एक महा(महा)संगणकाप्रमाणे काम करतो यांत शंका वाटत नाही. मला असे वाटते की “fast forward” “fast backward” करून तो झोपेत स्मृती ताडून पहात असतो. अनावश्यक भाग पुसून टाकतो किंवा पुसला तरी चालेल, अशा प्रकारात टाकतो. तर कांही दीर्घकाळ ठेवण्याचे ठरवतो. हे सर्व आपोआप म्हणजे प्रतिक्षिप्तपणे होते त्यावर स्वप्न पहाणाऱ्याचा ताबा नसतो. तो नसणंच योग्य आहे. नाहीतर माणूस चुकीच्या स्मृतींना, म्हणजे शरीररक्षणाच्या दृष्टीने चुकीच्या, कवटाळून बसण्याची भीती राहील. सावध झोपेच्या काळांत मेंदूचा अधिक थोडा भाग जागृत झाल्यामुळे त्या क्रिया आपल्याला स्वप्नरूपांत जाणवत रहातात. हार्ड डीस्कवर काय टाकायचं ते तो संगणक स्वतःच स्वतःच ठरवतो. ते ठरवताना तो संपूर्ण मेंदूच सहकार्य मागत नसल्यामुळे आपण पूर्ण जागे न होतां स्वप्न पहातो व तात्पुरते तेच खरेही मानत असतो.

उपनिषदांत कांहीही सांगितलेले असो परंतु भारतीय पुराणांत स्वप्ने आणि त्याबद्दलचे समज वेगळेच होते असं दिसतं. कांही सिध्दीप्राप्त ऋषी मुनी तर कुणाच्याही स्वप्नात प्रवेश करू शकत. हरीश्चंद्र राजाची कथा तर प्रसिध्दच आहे. विश्वामित्रांना त्याने स्वप्नांत राज्य दान केले. आपण याला स्वप्नात भेटलो व त्याने आपल्याला राज्य दान केले, हे विश्वामित्रांनाही कळले. आहे की नाही मजा. अशी सिध्दी कशी मिळवायची याचं पेटंट घेतलं असतं तर फार मजा आली असती. सुंदर तरूणींच्या स्वप्नांत जाऊ इच्छिणाऱ्या मजनूंची रांग कधीच संपली नसती. देव देवी तर हवे त्याच्या स्वप्नांत जाऊन काय काय सांगायच्या. अजूनही सांगतात, “अमूक ठिकाणी खणा. किंवा अमूक विहिरीत शोधा. माझी मूर्ती सांपडेल.” बरेचदा सांपडतेही. एकतर पूर्वी कोणी ती तिथे टाकलेली असावी किंवा “स्वप्न” पहाणाऱ्यानेच तशी व्यवस्था केली असावी. विज्ञानाने स्वप्न पडणे ही क्रिया मेंदूच्या कुठल्या भागाशी संबंधित आहे ते शोधून काढले आहे. (त्या भागाला इजा झाल्यास स्वप्ने पडत नाहीत.) परंतु एखाद्याला तो म्हणतोय तसंच स्वप्न पडलं की नाही, हे नाही ओळखता येत. याचा आजपर्यंत किती गैरफायदा घेतला गेला असेल कोण जाणे. जशी विश्वामित्र-हरीश्चंद्राच्या स्वप्नाची गोष्ट प्रसिध्द आहे तशीच बाणासुराची कन्या उषा आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरूध्द यांचीही भागवतातीलच कथा प्रसिध्द आहे. उषाला अनिरूध्द प्रथम स्वप्नांत दिसतो तेव्हां तिने त्याला कधी पाहिलेलेही नसते. पण ती त्याच्या प्रेमांत पडते. आपल्या सखीकडे स्वप्नांत पाहिलेल्या त्याच्या रूपाचं वर्णन करून त्याचे चित्र काढून घेते आणि त्याची माहितीही मिळवते. इकडे अनिरूध्दालाही उषा स्वप्नात नेहमी भेटत असते. बाकीची गोष्ट म्हणजे उषाची सखी त्याला गुपचूप उषाच्या महाली नेते, ते एकत्र येतात, त्यांतून कृष्णाचं आणि बाणासुराचं युध्द होतं वगैरे भाग वाढवत नाही. आपला स्वप्नापुरताच संबंध. बघा दोघांनीही परस्परांना न पाहताही एकमेकांच्या स्वप्नात गेले. स्वप्नाबद्दलचा जुना भारतीय दृष्टीकोन यावरून दिसून येतो.

सर्वच भाषांमधील चित्रपटांमधून तर स्वप्नाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. चित्रपटांत एखादं दृष्य असं दाखवलं जातं, जे पाहून आपण थक्क होतो. चित्रपट संपला की काय, असंही वाटत असतं. तोच तो माणूस डोळे चोळत बिछान्यावर बसलेला दाखवतात. मग आपल्याला कळतं की आधी पाहिलेलं दृष्य हे त्याला पडलेलं स्वप्न असतं. गोष्ट पुढे चालूच रहाते. तर कधी व्यक्ती झोपलेली दाखवून ती स्वप्नांत स्वतःमधून बाहेर पडून कांही करतेय असंही दाखवतात. किंवा झोपेंत स्वप्न पडतय असंही दाखवतात. पात्राच्या मनांतले पुढे काय घडावं किंवा घडूये याबद्दलचे विचारही स्वप्न-दृष्यांतून दाखवायला सोयीच जातं. चित्रपट वास्तववादी नाही असे कोणी म्हणू नये यासाठी तर स्वप्नासारखे दुसरे कुठलेच साधन चित्रपट करणाऱ्याकडे नसते. कारण स्वप्नांत, कल्पनेत (दिवा-स्वप्नांत) कांहीही घडू शकतं. आता नायक-नायिका पाच मिनिटांच्या गाण्यांत पाच-सहा वेगवेगळ्या एकापेक्षा एक सरस असे वेश करतात आणि प्रत्येक वेळी नाचण्याची जागाही बदलतात. म्हणजे युरोपांत लंडनमधील ब्रिजपासून स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांवरील बर्फाळ शिखरापर्यंत कोणतही ठिकाण एकाच गाण्यात दिसू शकतं. आता पांच मिनिटांत हनुमानाला, हनुमान नको तो ब्रह्मचारी आहे, त्याच्या बापाला, म्हणजे वाऱ्याला तरी एवढ्या वेगाने फिरतां येत कां ? पण चित्रपटांत ते सहज दाखवतां येतं आणि स्वप्नात दिसलं असं दाखवलं की ते वास्तवही ठरतं. चित्रपटाची गोष्ट लांबविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीही चित्रपटांतली स्वप्ने मदत करतात. कांही कांही गाणी स्वप्नच दाखवतात, तर कांही गाणी स्वप्ने रंगवतात. विशेषतः प्रियकर-प्रेयसीची. मग त्यांत आजवर कोणीही न पाहिलेला स्वर्ग सुध्दा दिसू शकतो. ढगावर पण चालू शकतो. स्वप्न ह्या शब्दाचा मुखड्यात वापर केलेली मराठी/हिंदी गाणी पाठवा म्हटले तर भराभरा पुष्कळ गाण्यांचे मुखडे मिळतील.”मेरे सपनोकी रानी कब—“, “तेरे मेरे सपने सब एक रंग है–” ही हिंदी गाणी किंवा “सत्त्यांत नाही आले, स्वप्नांत येऊ कां मी ?” आणि “तुज स्वप्नी पाहिले, रे गोपाला” ही मराठी गाणी पटकन आठवली म्हणून लिहिली. त्या मानाने नाटकांत स्वप्नाचा उपयोग करणं थोडं कठीण जातं. तरी कल्पक दिग्दर्शक ते दाखवतातच. कांही सांकेतिक गोष्टी दाखवल्या की झालं. हॕराॕल्ड राॕबिन्सची “ड्रीम मर्चंटस्” ही चित्रपटविश्वावरची १९४९साली प्रकाशित झालेली कादंबरी खूप गाजली होती. संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच ‘स्वप्नांचे व्यापारी’ म्हणून रंगवलय त्या कादंबरीत.

“मार्ग असू दे कितीही खडतर,
मध्ये असो वा कितीही अंतर,
विसरू नको तव स्वप्नांमधला
गांव तुला गाठायचाय…..”
हे आहे माझ्या “यश एका पावलावर” या पुस्तकांत दिलेल्या “एकावेळी एकच पाय तुला पुढे टाकायचाय” या कवितेच पहिलं कडवं. ह्यांत उल्लेख केलेल स्वप्न हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे. आपल्या भावी यशाची स्वप्ने पहा. स्वप्नेच नाही पाहिलीत तर मार्ग कसा सांपडणार. बऱ्याचदा कांही यशस्वी माणसं सांगतात की नाही मी कांहीच ठरवलं नव्हतं. पण ते अर्धसत्त्य असतं. टप्प्याटप्प्याने तरी कुठे जायचंय ते माणूस कळत नकळत ठरवत असतो. ठरवून त्याचा पाठलाग केला तरच ती स्वप्ने सत्यात उतरण्याची शक्यता असते. नाहीतर ती दिवा-स्वप्नेच रहातात. किंवा शेख महंमदी स्वप्ने. तोच तो अरेबियन नाईटसमधला शेख महंमद. मडकी विकायला बसलेला असतांना दिवा स्वप्न पाहू लागतो. “ही मडकी विकून यंव करीन, त्यंव करीन करत करत”, श्रीमंत होऊन, लग्न करून, बायकोला लाथ मारण्यापर्यंत त्याचं स्वप्न येऊन पोहोचतं. पण ती लाथ तो खरंच मारतो आणि समोरची मडकी फुटतात. त्याच्या दिवास्वप्नाचा असा भंग होतो.तेव्हा दिवा-स्वप्न पहात असलाच तर त्याला प्रयत्नांच बळ द्यायला विसरू नका तरच फळ मिळेल. स्वप्न कशीही पडोत तुम्ही त्याचा सकारात्मकच अर्थ लावा. आपल्याला अनुकूल, सूचक, चांगला अर्थ वाईट स्वप्नांतही काढा. बादशहा अकबरला बिरबलाने कसा स्वप्नाचा सकारात्मक अर्थ सांगितला, ठाऊक आहे ना ? बादशहाने आपले सर्व दात पडल्याचे पाहिले. त्या स्वप्नाचा अर्थ काझीने सांगितला, “तुमचे जवळचे सर्व तुमच्या आधीच मरण पावतील.” बादशहा रागावला. तोच प्रश्न त्याने बिरबलाला विचारला.बिरबल म्हणाला, “बादशहा सलामत, इसका मतलब आपको बहुत लंबी उमर है.” बादशहा खूश झाला. त्याच्या लक्षांत आले नाही की आपली ‘लंबी उमर’ सरेपर्यंत अनेक आप्त आधीच जाणार. इतिहास म्हणून नका पाहू ह्या गोष्टीकडे. सकारात्मकता कशी आली ते पहा.

“ध्यानी, मनी ते स्वप्नी” हा वाक्प्रचार स्वप्नाबद्दल किती सहजपणे बरंच कांही सांगून जातो. ज्या गोष्टींचं आपण ध्यान करतो, ज्या आपल्या मनांत वावरतात (मग सुप्त मनांत असोत की जागृत मनात) त्याच गोष्टी आपल्या स्वप्नांत येतात. “ध्यानी, मनी ते स्वप्नी” याच नांवाची एक कथा माझ्या १९९१मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या “ऋण फिटता फिटेना” या कथासंग्रहात आहे. या कथेचा संबंध आपल्या आयडीबीआयच्या मराठी स्नेह मंडळाशी आहे, किंबहुना तिचे श्रेयच मंडळाला आहे असं म्हटलं तरी ते योग्य होईल. ते १९७९ किंवा १९८०च वर्ष असावं. कै. श्री चिटणीस साहेब मंडळाचे अध्यक्ष होते. बहुदा कोजागिरीचा कार्यक्रम होता. चिटणीस तेव्हां कफ परेडला रहात. तेव्हां तो कार्यक्रम त्यांच्या घरीच झाला होता. सभासदसंख्या मर्यादित असल्यामुळे ते शक्य झालं. कार्यक्रमांत मला कथा सांगायचा आग्रह झाला. मी कोणतीही गोष्ट मनाशी न ठरवतां उभा राहिलो. बोलता बोलता जशी जुळेल तशी गोष्ट सांगत गेलो. अगदी शेवटपर्यंत. उपस्थितांना गोष्ट, तिचा शेवट, माझं कथाकथन आवडलं. त्या कथेत गुरूनाथ पाटेकरला (तेव्हा ऐनवेळी सुचलेलं नाव) सूचक स्वप्ने पडतात असे त्याला वाटत असते. योगायोगाने त्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या होताना दिसतात. ज्या बहुदा नित्यनियमाने घडणाऱ्याच असतात. म्हणजे रेल्वे अपघात, मुख्यमंत्री बदलणे, इ.सारख्या. पण त्यापायी गुरूनाथचं आयुष्यच बदलतं.

कथेच्या शेवटी गुरूनाथ लॉटरीची तिकीटे विकताना मला भेटतो. मला मोठी बढती मिळणार असं स्वप्न पाहिल्याचं आणि ज्यादिवशी मला बढती मिळते त्याच दिवशी त्याला लॉटरीत फार मोठ्ठ बक्षिस मिळाल्याचं स्वप्नही पाहिल्याच मला सांगतो. नंतर कांही महिन्यातच मला तशी बढती मिळते. परंतु गुरूनाथ त्यानंतर भेटलाच नसल्यामुळे त्याला लॉटरी लागली की नाही हे गुलदस्त्यांतच रहातं. ही ती थोडक्यात कथा. मंडळातील मित्रांच्या आग्रहाखातर तयार झालेली. आता मागे वळून पहाताना ते खरंच स्वप्नवत् वाटतं. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या कुणास आठवतं कां ? दोन चार दिवसांनी घरी एक तासांत गोष्ट लिहून काढली आणि तिचं नामकरण केलं, “ध्यानी, मनी ते स्वप्नी.” आता एक करा. ह्या लेखावर प्रतिक्रिया देतांना तुमचा स्वप्नाबद्दल कांही खास अनुभव असेल तर जरूर शेअर करा.”

-अरविंद खानोलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..