नवीन लेखन...

मुखवटा नाटीका क्रमांक २ (आठवणींची मिसळ २२)

पहिल्या नाटीकेत पाहिलतं ना नाटकांत काम करण्याची इच्छा फलद्रूप व्हायला किती त्रास झाला तो !
नाटकांतलं खरं खोटं ठरवणं मोठं मुष्किल.
समजा नाटकामधे रंगमंचावर प्रणय प्रसंग चालू आहे.
नायक-नायिका रंगात आली आहेत.
प्रेक्षकांना त्या प्रणयाच्या दृष्याने भारून टाकलंय.
ते मनाशी म्हणतायत, “किती छान अभिनय !”
त्याचवेळी पहिल्याच रांगेत बसलेल्या नायकाच्या पत्नीला मात्र तो अभिनय “अभिनयच” आहे की खरेच रंगलेत? ह्या शंकेचं काहूर छळत असतं आणि नंतर नाटक संपल्यावर तोच नायक तिच्याशी लडिवाळपणे बोलून प्रेम व्यक्त करतो, तेव्हां तिच्या मनांत येतं “आता हा अभिनय तर नाही ना?” अभिनय तर आपण सर्वच करत असतो.
जीवनांत आपण कांही भूमिका स्वीकारतो.
विशेषतः उपजीविकेसाठी, त्या भूमिकेबद्दल लहानपणापासून आपल्या कांही कल्पना तयार झालेल्या असतात.
त्या बरहुकुम ती भूमिका वठवण्याचा आपला प्रयत्न असतो.
उदाहरणार्थ शिक्षक, डॉक्टर, नर्स, पोलिस, इ. कसे असावेत हे आपण लहानपणापासून समाजाकडून, पालकांकडून, शिक्षकांकडून, सिनेमांमधून, मालिकांमधून आणि वर्तमानपत्रांकडून कळत नकळत शिकलेलो असतो.
जेव्हां ती भूमिका आपण ख-या जीवनांत स्वीकारतो किंवा ती आपल्या गळ्यांत पडते, तेव्हां आपण आपल्या मनातल्या त्या भूमिकेत स्वतःला बसवायचा प्रयत्न करतो.
कांही वेळा ते जमत नाही. कांही वेळा आपल्याला ते जमलं असं वाटतं पण इतरांच्या मनांत त्या भूमिकेच रूप वेगळचं असतं.
त्यामुळे त्यांना ती पसंत पडत नाही. कधी कधी तुम्ही ती भूमिका ईमाने ईतबारे पाडत असतां पण दुस-याला संशय येतोच.
कारण तो तुम्हाला आपल्याच चष्म्यातून पहात असतो.
आता ह्या प्रसंगातच पहा ना काय झालं ते !
मुखवटा!
(जयकिसनदास हॉस्पीटलच्या नर्सेसच्या क्वार्टर्समधील एक खोली. नर्स कुमारी अहिल्या आपटे हीची. खोली साधी पण स्वच्छ आणि नीटनेटकी. अहिल्या ड्यूटीजाण्याच्या तयारीत आहे. दारावरची बेल वाजते. अहिल्या दार उघडते. दार उघडताच एक देखणा तरूण आंत येतो.)
तो– (अदबीने) नमस्ते.
ती.– नमस्कार. आपण ? काय हवयं आपल्याला?
तो– तुम्ही ओळखलं नाही मला?
अहिल्या– माफ करा, पण नाही ओळखलं.
तो– ओळखलं नाहीत ते ठीक आहे. पण निदान पाह्यल्याचं आठवत असेल.
अहिल्या– नाही आठवत. आपली कुठे भेट झाली होती कां?
तो– तुम्ही आता ड्यूटीवर निघालांत ना? हॉस्पिटलमधे ज्या पेशंटची गेले दोन दिवस तुम्ही स्पेशल वॉर्डमधे शुश्रुषा करतां आहात… त्याचा.. अं.. मी तिथे आलो होतो. मला वाटलं आपण मला पाहिलं असेल. कालही मी डॉक्टरांबरोबर तिथे येऊन गेलो.
अहिल्या – अच्छा त्या अपघात झालेल्या पेशंटबद्दल म्हणताय कां? कामाच्या धांदलीमधे आपण आला होता याकडे माझं लक्ष गेलं नसेल. आपलं कांही काम आहे कां? मला लौकर निघायला हवं.
तो — काम तर आहेच आणि ते तुमच्या ड्यूटीसंबंधीच आहे.
अहिल्या- तुम्हाला पेशंटची काळजी वाटते कां? तो अजून सिरीयस असला तरी आता धोका टळला आहे.
तो- म्हणजे तो आता जगेल म्हणतां
अहिल्या– नक्कीच. कांही काळजी करू नका.
तो- नाही तशी काळजी नाही. पण काय हो? तुम्ही एखादं चुकीचं औषध त्याला दिलं किंवा अशीच कांही हयगय झाली, तर……
अहिल्या– (थोड्या रागाने)म्हणजे ! काय म्हणायचय तुम्हाला?
तो- नाही अलिकडे अशा चुका होतात नर्सेस किंवा डॉक्टरकडून.
अहिल्या – माझ्या हातून अशी चूक होणार नाही.
तो- फारच छान. स्वतःबद्दल इतकी खात्री आहे, ही उत्तम गोष्ट. पण तुम्ही नोकरी कां करतां हो अहिल्यादेवी?
अहिल्या– हे पहा. तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आला असाल तर मला आतां वेळनाही.
तो– नका सांगू. पण गांवाला असलेलं तुमचं कुटुंब केवळ तुमच्या नोकरीवर अवलंबून आहे, हे मला माहित आहे. खरं की नाही?
अहिल्या– हं !
तो- तेव्हां तुमच्या हातून मघाशी म्हटल्याप्रमाणे एखादी चूक झाली आणि ती उघडकीस आली तर- तर तुमची नोकरी जाईल. तुमचं कुटुंब म्हणजे लहान बहिण-भाऊ आणि आई निराधार होतील नाही कां?
अहिल्या — तुम्ही माझ्या कुटुंबाची काळजी नका करू. असं कांही होणारचं नाही.
तो– (आतापर्यंतचा अदबीचा स्वर बदलून)आतां स्पष्टच सांगतो. तो तुझा पेशंट माझा सावत्र भाऊ आहे. आणि आम्ही दोघे आहोत एका लक्षाधीशाचे पुत्र. पण वडिलांच्या पश्चात् मी फक्त लक्षाधीशाचा पुत्रच राहिलोय आणि सावत्रभाऊ, तुझा पेशंट झालाय लक्षाधीश.
अहिल्या– हे सगळं मला सांगायचं काय कारण.
तो- कारण माझी ही परिस्थिती बदलणं तुला शक्य आहे. तू मला मदत करू शकतेस.
अहिल्या– कसली मदत?
तो- (कठोरपणे) तो ह्या अपघातात वाचणार नाही, ह्याची काळजी घे, बस्स!
अहिल्या- (आश्चर्य आणि भीतीने) छे, छे ! भयंकर, अमानुष. अशक्य आहे हे.
तो– तू मनावर घेतलं तर ते सहज शक्य आहे. आणि तुला त्याचा योग्य मोबदलाही मिळेल.
अहिल्या- नाही. नाही. असलं नीच काम मी करणार नाही.
तो—त्यांत कांही कठीण नाही. शिवाय तुझ्या वर कांही बालंट येणार नाही, याची काळजी मी घेईनच.
अहिल्या– किती नीच आहात तुम्ही ! तुमच्या चेह-यावरून तुमचं अंतरंग कसाबाचं असेल अशी शंकाही कोणाला येणार नाही.
तो–माझं अंतरंग कसं आहे, हा विषय आपल्या अजेंड्यावर नाही. तू मोबदला बोल. एक लाख, दोन लाख?
अहिल्या– आग लावा तुमच्या पैशांना.
तो– आग लावणं हा पैशाचा योग्य उपयोग नाही. तुझ्या हुशार भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी त्याचा उपयोग होईल. तुझा भाऊ खूप हुशार आहे ना?
अहिल्या– माझी सगळी माहिती काढून मला फितवण्यासाठी तयारीने आलेले दिसतां. पण मी बधणार नाही. अशा कृत्यांत साथ देणं सोडाच, असं कांही होऊ नये म्हणून मी लक्ष ठेवीन.
तो– हे बघ. तू हे केलं नाहीस म्हणून दुसरं कोणीही तें करणार नाही असं समजू नकोस. हल्ली पैसा हे दैवत आहे. तुझे डॉक्टर करतील माझं काम. आळ मात्र तुझ्यावर येईल.
अहिल्या– सगळेच तुमच्यासारखे नीच नसतात.
तो– हो, आणि सगळेच तुझ्यासारखा साधुसंत असल्याचा आव नाही आणत.
अहिल्या– हो, मी आव आणला असेल पण तुम्ही इथून निघून जा.
तो—जाणारच आहे. पण तुला विचार करायला पूर्ण संधी देणार आहे. तू जर माझ्या बेताला संमती दिलीस तर इतरही कांही देऊ शकेन मी. वाटल्यास कायमचा आधार. म्हणजे माझ्याबरोबर तूही लक्षाधीश होशील.
अहिल्या– दुष्ट, नालायक. तुमच्यासारख्या काळ्या अंतःकरणाच्या माणसाची सांवलीसुध्दा नकोय मला. तुमच्याशी बोलणंही पाप वाटायला लागलय.
तो– संवयीने त्याचं कांही वाटणार नाही. फक्त तुझ्या भवितव्याचा विचार कर.
अहिल्या — तुम्ही चालते व्हा इथून की गुरख्याला हांक मारू?
तो– जातो मी. पण लक्षांत ठेव, तू माझी विनंती अमान्य करतेयस. तुझ्या सुंदर चेह-याचा तुला अभिमान असेल ना! एखाद्या दिवशी कोणी तो विद्रूप केला तर आवडेल कां ते? विचार कर. अजून वेळ गेलेली नाही. मला मदत कर.
अहिल्या– जा, जा, जा. तुमच्या धमक्यांनी कांही बदल होणार नाही. विद्रूप चेहरा सहन करीन पण तुमची संगत नाही. पुन्हां कधी माझ्या दृष्टीस पडू नका.
तो– अच्छा! मी जातो.. पण कायमचा नाही. (निघून जातो.)
अहिल्या– (रडत) हाय रे देवा! अशी विचित्र माणसं कशी निर्माण करतोस तूं?
मीना– ( अहिल्याची मैत्रीण) आम्ही अभिनंदन करायला आलो तर एक जण इथे चक्क रडतयं?अहिल्या– कोण? मीना !
मीना– नशीब माझं ! अजून ओळख आहे माझी. मला वाटलं, एवढे बडे लोक तुला भेटायला आल्यावर तूं ओळख कसली देतेस?
अहिल्या– हं! बडे. बडे पण दुष्ट, विश्वासघातकी.
मीना– म्हणजे ? तुझी नी त्याची आधीची ओळख होती? आणि त्याने तुला फसवलं?
अहिल्या– नाही. आज प्रथमच भेटलो आम्ही आणि पुन्हां त्याच तोंड पहायची इच्छा नाही.
मीना– अय्या! कमालच आहे तुझी! अग, ज्याने एकदा तरी आपल्याकडे बघावं, निदान तो आपल्याला दिसावा असं ज्याच्याबद्दल शेकडो मुलीना वाटतं — मुलीच कशाला मुलांपासून म्हातां-यापर्यंत सगळे ज्याला पहायला गर्दी करतात, तो पुन्हां भेटू नये असं वाटणारी तू अजबच आहेस.
अहिल्या– असल्या नीच माणसाला पहायला गर्दी करणारे लोक वेडेच असतील. पण तो कोण असा लागून गेलाय की त्याला पहायला लोकांनी गर्दी करावी? केवळ लक्षाधीशाचा मुलगा म्हणून?
मीना– बाई— बाई– बाई! तूं कोण समजलीस त्याला? तूं त्याला ओळखलसं तरी का?
अहिल्या– नांव नाही कळलं. पण चांगला ओळखला मी त्याला.
मीना– आता मात्र हात टेकले तुझ्यापुढे. इतकी कशी ग तू भोळी? तू सिनेमा पहात नाहीस हे ठाऊक आहे मला. पण निदान हल्लीच्या सर्वात लोकप्रिय हीरोला ओळखलंही नाहीस?
अहिल्या–कोण? कोण लोकप्रिय हीरो?
मीना- अग, तुझ्याकडे आता जी व्यक्ती येऊन गेली तीच. तो आहे आजचा लोकप्रिय हीरो शशीकुमार. नांव तरी ऐकलयसं की नाही.
अहिल्या– पण मग त्याने मला असली भयंकर गोष्ट करायला कां सांगावं?
मीना– कसली भयंकर गोष्ट? अग, त्याने तुला त्याच्या पुढच्या सिनेमात नायिकेची भूमिका देऊ केली असेल तर हो म्हण. कां तुझ्या चेहऱ्याला भुलून तुला मागणीच घातली त्याने?
अहिल्या– नाही. ह्यातलं कांहीच नाही. त्याने मला माझ्या सध्याच्या पेशंटला, त्याच्या भावाला चुकीने मारायची मागणी केली.
मीना– काय भावाचा खून? (गुरखा आंत येतो.)
गुरखा– बाईसाहेब, आता आपल्याकडे येऊन गेले त्या साहेबांनी हे पत्र दिलय आपल्याला द्यायला.
अहिल्या– नको. नको. त्याच पत्रही वाचायचं नाही मला. घेऊन जा ते.
मीना– आण. माझ्याकडे दे ते.
(गुरखा पत्र आणि कागदात गुंडाळलेलं कांही तरी मीनाकडे देऊन जातो.)
अहिल्या– मीना, फाडून टाक ते.
मीना — ऐक. मी वाचते.(पत्र उघडून वाचू लागते.)
“प्रिय अहिल्या,
कृपया तुला त्रास दिल्याबद्दल माफ कर. प्रथमच खुलासा करतो की तुझा पेशंट हा माझा सावत्रभाऊ नसून माझा ड्रायव्हर आहे. तुझ्यामुळें मी त्याच्या प्रकृतीबद्दल निर्धास्त आहे. दोन दिवसांपूर्वी मी तुला हॉस्पिटलमध्ये प्रथम पाहिले. मी येणार ही कुणकुण लागल्याने हॉस्पिटलमधे धांदल उडाली होती. पण तुला त्याची गंधवार्ताही दिसली नाही. तू तुझ्या पेशंटची देखभाल करण्यांत गर्क होतीस. खरं तर तुला पहातांच मी तुझ्या प्रेमांत पडलो. तुझा सुंदर, सौज्वळ, शांत तरीही स्मार्ट वाटणारा चेहरा आणि तुझी कामांतली कर्तव्यदक्षता ह्यांनी मी तुझ्याकडे ओढला गेलो. पण मी मुखवट्याच्या जगांत वावरणारा कलाकार. माझ्या संबंधात येणारी बहुतेक माणसं मुखवटे घालूनच वावरतात. माझी नको तितकी स्तुती करतात. साहाजिक मला शंका आली की तूही मुखवटा घालून सालसपणाचे नाटक करत तर वावरत नाहीस ना? मी डॉक्टरांच्याकडे तुझी चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतरही माझ्या मनांतली शंका जाईना. म्हणून मग तुझी ही अशी कठोर आणि विचित्र परीक्षा घेण्याचं मी ठरवलं. तू त्या परीक्षेत शंभर टक्के मार्क मिळवून पास झालीस. पण मी तुझी खूप नाराजी ओढवून घेतली. तरीही “अहिल्या तूं मला कायमची साथ देशील कां?” हा प्रश्न विचारायचा मोह मला आवरत नाही. मला ठाऊक आहे की निर्णय घेणं कठीण आहे. पण मी खात्री देतो की माझं तुझ्यावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. मी तुला कधी अंतर देणार नाही. जर तुझा होकार असेल तर आता ड्यूटीवर येतांना ह्या पत्रासोबत पाठवलेलं गुलाबाचं फूल माळून ये. तुझा नकार असला आणि गुलाबाचं फूल दिसलं नाही तर मी तुला कांही त्रास न देतां गुपचूप तिथून निघून जाईन ह्याची खात्री बाळग. पण मी आतुरतेने तुझ्या होकाराची वाट पहात आहे.पत्राच्या सुरूवातीस तुला प्रिय असे संबोधले कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहिल. पत्राखाली “तुझाच शशी” लिहिण्याची संधी देणं तुझ्या हाती आहे. तुझाच होऊ इच्छिणारा,
शशी”
(मीना कागदातलं गुलाबाचं फूल बाहेर काढते आणि अहिल्येच्या केसांत माळू लागते. अहिल्या भावना अनावर होऊन रडते आहे पण मीनाला फूल माळू देते).

समाप्त.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..