नवीन लेखन...

माझे शिक्षक- भाग ५ (प्राध्यापक) (आठवणींची मिसळ १९)

शिक्षक आणि प्राध्यापक ह्यात मुख्य फरक कोणता ?सांगण कठीण आहे.तरी प्राध्यापकाकडून त्या विषयाचा व्यापक आणि सखोल अभ्यास अपेक्षित असतो.बरेचदा वर्गात १२५-१५०च्यावर विद्यार्थी असतात.शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणं अपेक्षित असतं.अभ्यासांतील वैयक्तिक अडचणी प्राध्यापक वर्गात विचारांत घेऊ शकत नाहीत, त्यासाठी त्यांना नंतर भेटावे लागते.टीचर तास किंवा पिरीयड घेतात.प्राध्यापक भाषण म्हणजे लेक्चर देतात.त्या दृष्टीने लेक्चर श्रवणीय करणे, ही कला आहे.सर्व प्राध्यापकांकडे ती नसते.महाविद्यालयांत उपस्थिती घेतात अथवा नाही.त्यामुळे लेक्चर बुडवणे म्हणजे दांडी मारणे सोपे असते.कांही प्राध्यापक असे असतात की त्यांच्या तासाला दांडी मारावीशी वाटत नाही.मला अगदी पहिल्या वर्षापासून युनिव्हर्सिटीपर्यंत दोन्ही प्रकारचे प्राध्यापक भेटले.शिक्षक किंवा अध्यापक आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देतात, प्राध्यापक आपल्याला आपण निवडलेल्या खास विषयांची सर्वांगीण माहिती देतात.मला विज्ञान व गणित विषयांत गुण अधिक होते.परंतु १८ वर्षे पूर्ण होताच नोकरी बघायची हा विचार मनाशी पक्का असल्यामुळे विज्ञान न घेतां मी कला म्हणजेच आर्टससाठी मी विल्सन ह्या सर्वात जुन्या, चौपाटीला असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.पहिले एक वर्ष मी तिथे होतो.तिथले कांही प्राध्यापक त्याकाळी प्रसिध्द होते.मराठी साहित्यात समीक्षक म्हणून ओळखले जाणारे वा. ल. कुलकर्णी, संस्कृतचे वेलणकर शास्त्री, संस्कृतचेच गजेंद्रगडकर, स्वतः प्रिन्सिपाल आयरन, रसायनशास्त्राचे दाभोळकर, इ. ची नावे त्याकाळी प्रसिध्द होती.

मला चांगल आठवतय की आम्हाला सिव्हीक्स (नागरीक शास्त्र) शिकवायला लँग्डन नांवाचे आयरीश किंवा डच असलेले प्राध्यापक होते.पहिल्याच दिवशी त्यांचे लेक्चर होते.सुरूवात करतांना आम्हा सर्वाना उद्देशून ते “लेडीज अँड जंटलमन” म्हणाले.भाषण संपवताना “थँक यू” म्हणाले.खरं सांगतो मला त्या भाषणांतलेहे चारच शब्द कळले.बाकी संपूर्ण भाषणांतला एक शब्दही कळला नाही.त्यांचे उच्चार अजिबात कळत नव्हते.त्यानंतरही त्यांचे भाषण कळले अशांतला भाग नाही, पण ते हजेरी घेत नसत.त्यामुळे त्यांच्या लेक्चर्सना दांडी मारून कोपऱ्यावरच्या न्युयॉर्क हॉटेलमधे गाणी ऐकत बसणं आम्ही पसंत केले.मराठीचे वा.ल. कुलकर्णी उत्तम समीक्षक होते, परंतु त्यांचे भाषण क्लीष्ट वाटत असे.निदान प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना तरी ते थोडे कंटाळवाणेच असे.विद्वत्ता आणि वक्तृत्व ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.परंतु वर्गातील कांही विद्यार्थीनींना त्यांचे क्लीष्ट भाषण आवडत असे.ते ही कधी हजेरी घेत नसत.म्हणजे त्यांच्या तासालाही दांडी मारणे सोपे असे.

इंग्रजी शिकवायला कुरीयन नावाच्या प्राध्यापिका होत्या.त्यांचे शिकवणे मध्यम होते.त्यांची लेक्चर्स चुकवणे कठीण असे.कारण त्या पूर्ण म्हणजे सर्वांची हजेरी घेत.तरीही एखादा चुकवण्याचा प्रयत्न करत असे.एकदा त्यांनी हजेरी घेणं चालू केल.ए, बी, सी, डी ह्या क्रमाने रोल कॉल असे.आमच्या वर्गात बाळी दिक्षित नांवाचा क्रिकेटर होता.रिझर्व्ह बँकेतील जुन्या लोकांना ओपनर दीक्षित आठवत असेल.तो रिझर्व्ह बँकेतूनच रीटायर झाला.दीक्षितचे नांव प्रा. कुरीयन यांनी घेतले, त्यावर त्याने “येस मॕडम” असे बोलून हजेरी लावली.त्यानंतरची पुढची चार नावे होताच दीक्षित हळूच मागच्या दाराने बाहेर पडला.प्रा. कुरीयन यांच्या ते लक्षात आले.कोणीतरी हजेरी लावून पसार झाला.पण कोण बाहेर गेला हें त्यांना कळले नाही.मग त्यांनी परत रोल कॉल पहिल्यापासून सुरू केला.ज्याच्या नांवाला उत्तर मिळणार नाही तो पळाला, असे त्या गृहीत धरणार होत्या.दीक्षितचे नांव पुकारले तेव्हां मी उत्तर दिले, “येस मॕडम”.त्यानी माझ्याकडे पाहिले पण त्या ना मला ओळखत होत्या ना दीक्षितला.दीक्षितची हजेरी लागली.पळून जाऊनही तो पकडला गेला नाही.माझी मात्र त्या दिवशी गैरहजेरी लागली.माझे नांव कॉल आऊट झाल्यावर उत्तर देण्याची हिंमत मी केली नाही.कारण प्राध्यापिका सावध होत्या आणि मी दोघांची हजेरी दिली हे त्यांच्या लक्षात आले असते.

संस्कृतला आम्हाला प्राध्यापक गोडबोले होते.त्यांच्या तासाला मात्र असे कांही करणे शक्य नव्हते.गोडबोले बहुदा एकपाठी असावेत.सुरवातीला एक दिवस त्यांनी पूर्ण हजेरी घेतली आणि चेहरे लक्षांत ठेवले.नंतर हजेरी घेतांना ते मधली मधली नावे घेत.एकूण १२५ पैकी २०-२५ नावेच घेत.कधीही एखाद्या विद्यार्थ्याचा उल्लेख करावासा वाटला तर ते तो उल्लेख अचूक नावाने करत.त्यांचे शिकवणेही उत्तम होते.ते आम्हाला मेघदूत शिकवत व एक संग्रहीत पाठ्यपुस्तक होतं ते ही शिकवत.उदाहरणे चपखल आजच्या आयुष्यांतील देत.प्रेमात पडलेला माणूस हा प्रेयसीच्या प्रत्येक हालचालीचा अर्थ आपल्याला हवा तसा लावत असतो.ह्या अर्थाचा कालिदासाचा श्लोक शिकवताना गिरगांवात रहाणारे गोडबोले सांगत,”समोरच्या चाळीतली तरूणी लागोपाठ दोनदां गॕलरीत आली की ह्याला वाटतं आपल्याला पहायलाच ती परत परत बाहेर येतेय.ती येते कागदाचा बोळा टाकायला नाहीतर कपडे वाळत घालायला.पण प्रेमी आपल्याला अनुकूल अर्थ लावतो.”तुम्हाला सुध्दा पटलं की नाही ?एकदा प्रा. गोडबोलेनी संस्कृतमधे कॉलेजमधे वादविवाद (डीबेट) ठेवल्याचे जाहिर केले आणि इच्छुकांना हात वर करायला सांगितले.दोन तीन मुलींनी नांवे दिली.मग मी हात वर केला.थोडा हंशा पिकला.सरांनीही हंसत हंसत माझं नाव लिहून घेतलं.पहिली सहामाही परीक्षाही झाली नव्हती.वादविवादाचा विषय होता,”हिंदी भाषेची आवश्यकता.”माझ्या आधी बरेच जण संस्कृतमधून हिंदीच्या बाजूने बोलले.मी त्यांच्या बोलण्यांतले कांही मुद्दे लक्षात ठेवले.मी नववीत असतानाच संस्कृतच्या तीन अवांतर परीक्षा दिल्या होत्या.तिसरी परीक्षा देणारे फारच कमी होते.चौथी परीक्षा पदवीसमान मानण्यात येई.ती द्यायला पुण्याला जावे लागे.संस्कृत बोलणे मला अवघड नव्हते.हिंदीची थट्टा उडवणारे कांही मुद्दे मी आधीच मनात ठरवले होते.मी बोलतांना हिंदीवर खूप विनोद केले.माझ्या आधी बोलताना संस्कृतचे एक एम.ए. करणारे स्कॉलर म्हणाले होते की मुंबईहून पुण्याला जायचे झाले तर कोणीही गाडीनेच (अग्निरथ) जाईल.तसे हिंदीला पर्याय नाही.मी त्या मुद्द्याचा समाचार घेत म्हणालो,”पुण्याच्या गाडीमधेसुध्दा प्रकार असतात.डेक्कन क्वीन, मेल, पॕसेंजर आणि गुडस ट्रेन.आता मला सांगा”गुडस ट्रेन म्हणजे हिदी तुम्हाला चालेल कां ?”ह्या वाक्याला खूप हंशा आणि टाळ्या मिळाल्या.१०-१२ मिनिटांचे माझे भाषण संपताच टाळ्या मिळाल्या.मी पाठांतर करून बोललो नाही, हे सर्वांच्या लक्षात आले.मी स्टेजवरून उतरू लागलो तर धोतर नेसून, फेटा बांधून स्टेजवर बसलेल्या शास्त्रीबुवांनी मला थांबवले.सर्व प्रेक्षकांना पुन्हां माझा परिचय द्यायला सांगितले.मला जाहिर शाबासकी दिली.बहुदा ते वेलणकर शास्त्री होते.प्रा. गोडबोले तर माझ्यावर खूपच खूष झाले.त्यांनीच मला दाजी भाटवडेकरांच्या संस्कृत नाटकांत भाग घेण्याबद्दल विचारले होते.वर्गातील एक संस्कृत स्कॉलर विद्यार्थिनी कार्यक्रम संपल्यावर माझ्याकडे भाषणाच्या नोटस मागायला आली.माझ्याकडे नोटस नाहीत हें तिला खरं वाटेना.तिचे आणि एका विद्यार्थ्याचे नाव संस्कृत नाटकांसाठी पाठवले गेले.पुढेही मी संस्कृत आणि मराठी वादविवादात भाग घेतला.ह्या कार्यक्रमाला सर्व विषयांचे प्राध्यापक असत.ते मला ओळखू लागले.

विल्सनमधे केनेडी नावाचे एक प्राध्यापक होते.ते कॉलेजच्या होस्टेलमधेच रहात.ते लाल लाल आणि तरीही राकट असे वाटत.त्यांची उंची ६फूट ६ इंच किंवा अधिक होती.ते लांब लांब टांगा टाकत चालायचे.कोणता विषय शिकवायचे माहित नाही.विल्सनमधे बेल वाजल्यावर इकडे तिकडे फिरायची मुभा नव्हती.जिन्याचे दार बंद होई.आणि उंच धिप्पाड केनेडी सर कॉरीडॉरमधे अधून मधून फेरी घालत.तिथे फिरणाऱ्या एखाद्याला त्यांनी “कुठे चाललास?” एव्हढेच जरी विचारले तरी त्याचे भीतीने पाणी पाणी होई.खरं तर ते कांहीच करत नसत.पण त्यांच्याकडे पाहूनच दहशत वाटत असे.कॉलेजमधे आपोआपच शिस्त पाळली जाई.हिंदी शिकवायला प्रा. तिवारी होते.हिंदी विषय परीक्षेला नव्हता.तिवारींच्या तासाला सर्व प्रकारची मस्ती वर्गात चाले.ते कांहीतरी लिहायला देऊन वर्गांमधे फिरत.त्यांची पाठ असली की त्यावेळी वापरण्यात येणाऱ्या फाउंटन पेनमधून त्यांच्या कोटावर शाई उडवली जाई.खराब कोट पाहून पुढे त्यांनी वर्गात फिरणं बंद केलं.आमच्या हायस्कूलमधे देसाई बाईंचा जसा वर्गावर ताबा नसे, तोच प्रकार तिवारी सरांचा होता.

गणित शिकवायला डॉ. देशपांडे आणि प्रा. मीरा जमालाबाद होते.देशपांडे बीजगणित किंवा कॕलक्युलस शिकवीत.तर प्रा. मीरा भूमिती किंवा ट्रीग्नॉमेट्री शिकवत.मीरा जमालाबाद तरूण आणि देखण्या होत्या.विषय समजला नाही तरी कांही जणांचा वेळ चांगला जायचा.त्या नीटनेटक्या असत आणि त्यांचं वागणंही पदाला उचित असे.पुढे त्या प्रा. मीरा राव झाल्या.दोघेही चांगले शिकवत.पण मी त्यांच्याही लेक्चर्सना खूप दांड्या मारल्या.ते दोघेही मला ओळखत.ऐन परीक्षेच्या वेळी मला पुस्तकं वाचून कॕल्क्युलस आणि ट्रीग्नॉमेट्री कळली नाही.परम्युटेशन्स, कॉंबिनेशन मी स्वतः शिकून घेतले.परिणामी मी मॕथ्समधे नापास झालो.पुढच्या वर्षी फी न भरतां पहिल्या वर्षाच्या मॕथ्सच्या वर्गाला हजेरी लावण्याची परवानगी मी मिळवली.दुसऱ्या वर्षी पुढच्या बाकावर बसलो.दोघांनीही पहिल्याच दिवशी मला विचारले, “Were you not in the same class last year ?”मी म्हणालो, “येस, बट आय फेल्ड इन मॕथ्स”.त्यावर दोघांनीही मला सांगितले, “If you had not faired well in our paper, you should have told us.”ह्यावर कांही बोलण्यासारखेच नव्हते.पण दुसऱ्या वर्षी उत्तम गुणांनी मी मॕथ्स पास झालो.

स्मरणशक्ती आणि विस्मरणशक्ती वरच्या लेखांत मी दुसऱ्या वर्षी केलेला आणि नशिबाने निस्तरलेला परीक्षेचा दिवस विसरण्याचा घोटाळा मी यापूर्वीच सविस्तर सांगितला आहे.तो आता परत लिहीत नाही.दुसऱ्या वर्षी परीक्षेच्या सुमारासच मला अठरावं वर्ष पूर्ण झालं.मी नोकरी करायला लायक झालो.त्यामुळे विल्सन सोडून मी के.सी. कॉलेजला चर्चगेटला सकाळच्या वर्गात जायचे ठरवले.पण मला ॲडमिशन मिळाली ती दुपारच्या डीव्हीजनमधे.ऑफीसचे प्रमुख खूबचंद ह्यांनी मला सांगितले,”Your presence will be marked by me.Don’t worry.You can attend college in the morning division taking permission from Professors.”मी एक दोन महिने दुपारच्या कॉलेजमधे हजर राहिलो.नंतर एल.आय.सीत नोकरी लागली.सकाळच्या तासांना कांही विषयांना जाऊ लागलो.मॕथ्स घेतलेच नव्हते.दुपारी प्रा. नोटानी लॉजीक शिकवत.सकाळी प्रा. वाघ लॉजीक शिकवत.त्यांच्या वर्गात खूप गर्दी असे.मी परवानगी न घेतांच त्यांच्या लेक्चरला सकाळी जाऊन बसलो.वर्गांत १५०हून अधिक विद्यार्थी होते.ते वर्गात आले आणि प्रथम त्यांनी वर्गावरून एक नजर फिरवली.दुसऱ्याच क्षणी सहाव्या-सातव्या बाकावर बसलेल्या मला त्यांनी उभे केले.”You don’t belong to my class.Please leave the class.”त्या वाघाच्या गर्जनेने मी गुपचूप बाहेर पडलो.वर्ग संपताच त्यांना एकट्याला गांठले व माझे नांव दुपारच्या वर्गात आहे.पण नोकरीमुळे मी दुपारच्या लेक्चर्सना हजर राहू शकत नाही इ. सांगून त्यांच्या तासाला हजर रहाण्याची परवानगी मागितली.तेव्हां त्यांनी उदारमनाने परवानगी दिली.त्या परवानगीचा उपयोग मात्र मी क्वचितच केला.

माझ्या सुदैवाने इंटरपासूनच आम्हाला अर्थशास्त्र शिकवायला प्रो. गायतोंडे होते.गायतोंडे सर फार जलद नाही आणि फार संथ नाही अशा विशिष्ट गतीने बोलत.ते प्रथमच सांगत, माझ्या वर्गात हजेरी सक्तीची नाही.पण माझ्या वर्गात कोणी जांभई दिलेली सुध्दा मला चालणार नाही.तुमची हजेरी लावायची व्यवस्था होईल.उगीच येऊन बसू नका.ते अर्थशास्त्राचे नियम इतके सोपे करून सांगत की अर्थशास्त्र हा कठीण विषय वाटूच नये.अतिशय चपखल उदाहरणं देत.मध्यम उंचीचे, गोरे, सूट घातलेले गायतोंडे सर विद्यार्थ्यांमधे प्रिय होते.त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते महत्त्वाच्या अर्थशास्त्रीय संकल्पना किंवा नियम ह्यांच्यावर अत्यंत सुटसुटीत नोटस लिहून घ्यायला सांगत.तेव्हां त्यांचा बोलण्याचा वेग विद्यार्थ्यांना लिहून घेता यावं इतका कमी करत.ते अस्खलित बोलत आणि एक शब्दही त्यांना बदलावा लागत नसे.माझ्या कॉलेज जीवनामधील सर्वात उत्तम प्राध्यापक कोण म्हणून विचारल्यास मी क्षणाचाही वेळ न लावता प्रा. गायतोंडे म्हणून सांगेन.इंटर आणि बी.ए.ची दोनअसे तीन वर्षे ते अर्थशास्त्र शिकवायला होते.मी बी.ए.ला अर्थशास्त्राचे चार पेपर तर राज्यशास्त्र आणि संस्कृत या विषयांचे प्रत्येकी दोन दोन पेपर घेतले होते.आमच्याबरोबर एक टाटामधे काम करणारा चाळीसच्या आसपास वय असलेला एक विद्यार्थी होता.त्याचे नांव सुब्बारामन.तो गायतोंडेंच्या नोटस शॉर्टहँडमधे लिहून घेई.बी. ए. फायनलला अर्थशास्त्राचा केवळ एक विद्यार्थी त्यावर्षी प्रथम आला.तो हा सुब्बारामन होता.पुढे एम.ए. ला ही त्याने अर्थशास्त्रांत प्रथम वर्ग मिळवला.मी सुरूवातीला गायतोंडेंच्या नोटस वर्गात लिहून घेत असे.पण पुढे मी फक्त ऐकू लागलो.शिवाय अनेक लेक्चर्स मला चुकत.वर्गात एक आशा विजयकर नांवाची विद्यार्थीनी होती, ती नोटस व्यवस्थित लिहून घेत असे.तिचे अक्षरही सुंदर होते.पुढे मी तिच्या वह्या घेऊन त्या नोटस कॉपी करू लागलो.बी.ए. नंतर मात्र तिच्याशी कोणताही संपर्क राहिला नाही.गायतोंडेंच्या नोटस इतक्या अचूक असत की पुस्तके न वाचतां कोणीही फक्त त्यांच्या नोटस वाचून पदवी परीक्षा द्यावी.ह्या दृष्टीने आशा विजयकरची मला अत्यंत मोलाची मदत झाली.त्या वर्षी अर्थशास्त्रांत एकच जण प्रथम वर्गात आणि अठ्ठावीस द्वितीय वर्गात आले.के. सी. मधील १४ जण द्वितीय वर्गात होते.तर इतर सर्व कॉलेजेस मिळून चौदा जणच द्वितीय वर्गात होते.हा प्रा. गायतोंडेंचा प्रभाव होता.त्या अठ्ठावीसातही आम्ही सहाजण हे रिझर्व्ह बँकेतले होतो.त्यापैकी भंडारी पुढे टाटाचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून नावाजला गेला.एक जण IRS पास होऊन आयकर विभागात अधिकारी झाला.तिघे रिझर्व्ह बँकेतच राहिले आणि मी आयडीबीआयला आलो.रिझल्टनंतर एकदा कॉलेजमधे गायतोंडे सरांना जाऊन भेटलो.त्यानंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या एका चुलतमावस भावाच्या लग्नाची पत्रिका आली.वधूचे वडिल होते प्रा. गायतोंडे.लग्नांत सरांची भेट घेतली आणि फार बरे वाटले.त्यांच्या लक्षात मी रहाणं शक्य नव्हतं.पण मी त्यांच्याबद्दल त्यांच्याशी जे बोललो, त्याने ते आनंदीत झाले.

संस्कृत शिकवायला तीनही वर्षे प्रा. उपाध्याय हे एकटेच होते.अर्थशास्त्राबरोबर संस्कृत घेण्याची संधी फक्त के. सी. कॉलेजमधेच उपलब्ध होती.इतरत्र स्टॕटीस्टीक्स घ्यावं लागे.मला संस्कृत सोपे वाटत असल्यामुळे मी संस्कृत घेतलं.बी.ए.ला आम्हाला मम्मटाचे काव्यप्रकाश, स्वप्नवासवदत्ता हे नाटक आणि ५० मार्कांसाठी भगवद्गीता होती.२०० गुणांसाठी अशी भरगच्च तयारी करायला लागायची.मी इंटरला संस्कृतचे कांही तास हजर राहिलो होतो.नोकरी सुरू झाल्यावर मी संस्कृतचे टाईम टेबलही नीट पाहिलं नाही.संस्कृतच्या एकाही तासाला गेलो नाही.परंतु सहामाही आणि पूर्वपरीक्षा दोन्हीला मला उत्तम गुण मिळाले होते.के.सी. कॉलेजच्या पध्दतीप्रमाणे मला पदवी परीक्षेच्या फॉर्मवर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि संस्कृत ह्या तीनही डीपार्टमेंटसच्या प्राध्यापकांची सही घ्यावी लागे.त्यांतल्या त्यांत प्रा. गायतोंडेंच्याच लेक्चर्सना मी बऱ्यापैकी हजर राहिल्याने आणि केवळ हजेरीचा त्यांचा आग्रह नसल्यामुळे, त्यांनी तात्काळ सही केली.राज्यशास्त्र घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच असल्याने त्याचे प्रा. बुटानी यांनीही माझा चेहरा न बघताच सही केली.प्रा. बुटानी यांच्या पांच लेक्चर्सनासुध्दा मी हजर राहिलो नव्हतो.नंतर मी प्रा. उपाध्याय यांच्याकडे सहीसाठी गेलो.ते म्हणाले,”जनाब आपको तो हमने देखा भी नही कभी. साईन कैसे करूं ?”मी म्हणालो,”Sir, I am working student. Hence I could not attend your lectures, which are in afternoon.”ते म्हणाले,”Gentleman, you are not even aware that I am taking Sanskrit lectures continuously for two hours on Saturday late afternoon and there are not more than 12 students in class.How can I miss you ?”आणखी थापा मारणे शक्य नव्हते, तरीही रिझर्व्ह बँकेत शनिवारी ओव्हरटाईम करावा लागतो (ते खरंही होतं) वगैरे सांगून म्हणालो,”Sir, but please see my marks in half-yearly and preliminary exams.I have scored well.”हा मुद्दा त्यांनी मान्य केला आणि माझ्या फॉर्मवर सही केली.फायनललाअर्थशास्त्रांत आणि राज्यशास्त्रांत सेकंड क्लासचे गुण मिळाले तर संस्कृतमधे फर्स्ट क्लासचे गुण मिळाले.

विल्सन कॉलेजमधे मला बरेच मित्र मिळाले.विश्वनाथ घैसास हा पुढे कमर्शियल आर्टीस्ट म्हणून काम करू लागला.अजूनही दर वर्षी दिवाळीच्या पंधरा दिवस आधी त्याच्या हस्ताक्षरांतले सुंदर कॕलीग्राफीतले पत्र न चुकतां येते.मला परीक्षेला येताना वाटेत चक्कर आल्याचे सांगणारा तोच हा मित्र.नारायण छत्रे खूप बोलका, सढळ तोंडाने शिव्या वापरणारा अस्सल गिरगावकर पुढे हायकोर्टात वकीली करू लागला.आता तो मुलुंडला रहातो.माझी परीक्षेची धांदल तो एक किस्सा म्हणून रंगवून सांगतो.श्रीकांत चवाथे हा साधा प्रेमळ मित्र नंतर ए.सी.सी.त होता.मधुकर जोशी हा दादरच्या छाया रेस्टॉरंटच्या मूळ मालकांचा मुलगा.आदर्श लॉजिंग बोर्डींगही तेव्हा त्यांचच होतं.पण मधू आणि त्याच्या भावाने हॉटेलचा धंदा सोडला.त्याने व्यापारांत यश मिळवलं.देवस्थळी सुरूवातीला रिझर्व्ह बँकेत लागला.पण लौकरच रिझर्व्ह बँक सोडून संस्कृतचा प्राध्यापक झाला.तो कोल्हापूरला स्थायिक झाला होता.चार वर्षापूर्वी एरव्ही चांगली प्रकृति असणाऱ्या देवस्थळीचा कर्करोगाशी झुंजताना मृत्यू झाला.बाळी दिक्षित रिझर्व्ह बँकेत क्रिकेटर म्हणून आला आणि बँकेतूनच रीटायर झाला.त्याने ॲसिस्टंटच्या पुढली प्रमोशन्स घेतलीच नाहीत.आरोंदकर कॉलेजचा फास्ट बोलर होता.त्याने आधी खाजगी कंपनीत नोकरी केली.नंतर स्वतःचा कांही उद्योग केला.हे सर्व मित्र वरचेवर भेटत नसत.पण कायम संपर्कात राहिले.मी के.सी. कॉलेजला असतांना विल्सनच्या आठ दहा सहाध्यायिनी आणि हे मित्र यांनी पिकनीक काढली.मी कॉलेज सोडलं होतं तरी मला बोलावून घेण्यांत आलं.त्यानंतरही कांही वेळा मित्र एकत्र भेटत तेव्हा मला निरोप पाठवत.आम्ही विल्सनला असताना कॉलेजला १२५ वर्षे झाली होती.पुढे १५० आणि १७५ वर्षे झाली तेव्हां कॉलेजच्या कार्यक्रमांत आम्ही आवर्जून भेटलो.आता विल्सन कॉलेजला १८५ वर्षे झालीत.मोरारजी देसाई, आमची समकालीन शुभा खोटे, निस्सीम इझीकेल, पंकज उधास ही कांही विल्सोनियन्सची नावे.के. सी.कॉलेजमधे मला फार कमी मित्र मिळाले.राजा पोलेकर, भाटीया आणि मी तिघेच गप्पा मारत कॕन्टीनमधे बसायचो.स्टुडंन्टस बुक डेपोत काम करणारा टायरवाला आणि एक स्याहीवाला यांच्याशीही थोडीफार मैत्री होती.पुढे तर कुणाशीच संपर्क राहिला नाही.के. सी. कॉलेजच्या गॕदरींगमधे मी कावळे, कुत्र्यांचे भांडण, मांजराचे खेंकसणे आणि हायवे 301 मधल्या सायरन युक्त पाठलाग, कार्सच्या ब्रेकचे आवाज, बंदुकीचे बार, इ. ची मिमीक्री लाउड स्पीकरवर सादर केल्याचे आठवते आहे.अशा रितीने माझं विल्सन आणि के. सी. मधील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं.विल्सन सोडताना प्रा. गोडबोलेंना भेटलो तर ते मला विल्सनमधेच रहाण्याचा आग्रह करू लागले.मला म्हणाले,”तुला इंटरला संस्कृतची स्कॉलरशिप मिळू शकेल ह्याची मला खात्री आहे.मी स्वतः तुझी तयारी करून घेईन.”मी म्हणालो,”सर, स्कॉलरशिपवर माझं शिक्षण होईल पण मला घरासाठी पुर्णवेळ नोकरी करणं आवश्यक आहे.तेव्हां नाईलाजाने मला कॉलेज बदलणं आवश्यक आहे.”मलाही संस्कृतची गोडी होती पण संस्कृतचा प्राध्यापक होण्यांत रस नव्हता.आतां युनिव्हर्सिटीमधे दोन वर्षे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो त्यांच्याबद्दल पुढील भागात.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..