नवीन लेखन...

घेई छंद! (आठवणींची मिसळ ११)

मध्यंतरी आपल्या गृपवर डॉ. हरि नरके यांचे सह्या जमवण्याच्या त्यांच्या छंदात आलेल्या अनुभवाबाबत एक पत्र पोस्ट केले होते. त्यांच्या छंदाच त्यानी छान वर्णन झालं होतं. ज्या ज्या कार्यक्रमाला ते हजर रहात त्या त्या कार्यक्रमांतील मंचावर असणा-या सर्व मान्यवरांच्या सह्या ते घेत असत. त्या सर्वाची तपशीलवार नोंद ते ठेवत. त्यानी खूप श्रमांनी हा छंद जोपासल्याचे जाणवले. असे छंद मनापासून केल्याशिवाय जोपासणे कठीण असते. त्यासाठी चिकाटी, वेळ आणि थोडा फार पैसाही खर्च करावा लागतोच. त्यांनी पत्र लिहिलं होतं ते त्यांना आलेल्या कटु अनुभवासंबंधी. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने सही घेण्यासाठी भरपूर मोठी रक्कम मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. सर्वानीच त्या कलाकाराचा धिक्कार केला. ते सर्व वाचताना माझ्या कांही छंदाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. मग त्याही तुम्हाला सांगाव्यात असे वाटले.

शाळेमधे सहावी सातवीत मुलांना वेगवेगळ्या छंदांबद्दल सांगण्यात येते. असा एखादा छंद जोपासणे चांगले असते असे सांगितले जाते. प्रामुख्याने पोस्टाची तिकीटे जमवणे, जुनी नाणी जमवणे आणि मोठ्या लोकांच्या सह्या जमवणे, हे छंद मुलांना सांगितले जातात. भारावलेली कांही मुले असा एकादा छंद सुरूही करतात. त्यातल्या बहुतेकांच्या हौशीवर पूर्वी पालकच पाणी ओतत. परीक्षा जवळ आली की छंद बंद. मग परीक्षेनंतरच्या मोठ्या सुट्टीतल्या फिरण्यांत, हुंदडण्यात बहुतेकांना आपल्या छंदाचा विसर पडे. त्यातूनही छंद चालू ठेवणारे कांही जण आपली जमा जपत असत. बहुतेकांना तो छंद कसा जोपासावा ह्याची माहिती नसे. मग एका पेटीत किंवा बटव्यात नाणी जमवली जात. पोस्टाची तिकीटे कशीतरी कुठेतरी चिकटवली जात. सह्या वेगवेगळ्या वह्यांवर कागदांवर घेतल्यामुळे एकत्र संग्रह होत नसे. शेवटी १० किंवा पूर्वी अकरावी आल्यानंतर फारच थोड्यांना आपल्या छंदाची आठवण रहात असे. ह्यातले मोजके लोक आयुष्यभर आपला छंद जोपासत. ते खरे छांदीष्ट ! अर्थात महाराष्ट्रात छांदीष्टांकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका चांगला नव्हता त्यामुळे छांदीष्ट विशेषण फार आदराने नाही वापरत आपण. पूर्वी ह्या छंदाना पालकांचा पाठींबा क्वचितच दिसे. त्या काळी छंद म्हणजे वेळ वाया घालवणं समजलं जाई. आता पालक आपल्या पाल्याला छंद असावा म्हणून धडपडतात. पण शेवटी छंद मानगुटीवर बसवून घ्यायचा की नाही, हे त्या त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीवरच अवलंबून रहातं.

कांही शाळा मुलांच्या ह्या छंदाना उत्तेजन द्यावं म्हणून अशा जमवलेल्या विविध नाण्यांची किंवा पोस्टाच्या तिकीटांची प्रदर्शने भरवतात. हल्ली माहित नाही पण पूर्वी तर नक्कीच अशी प्रदर्शन होतं. गुरूजी सर्वाना आवर्जून त्यांत भाग घ्यायला सांगत. मुलांनाही वाटे की आपण जमा केलेली संपत्ति दाखविण्याची ही उत्तम संधी आहे. मी लोकल बोर्डाच्या शाळेत असतांना माझ्याकडली नाणी प्रदर्शनांत मांडण्यासाठी मी गुरूजींकडे दिली. प्रदर्शनांत ती मांडलेली बघून मी खूष झालो. पण प्रदर्शन बंद झाल्यावर तें गुंडाळतांना हजर रहाण्याची काळजी मी घेतली नाही. त्यानंतर मी ती नाणी कधीच पाहिली नाहीत. गुरूजीनी “कशी चोरीला गेली, कुणास ठाऊक” म्हणून हात झटकले. मला वाईट तर वाटलेच शिवाय मातुश्रींची बोलणीही खावी लागली. त्यानंतर कधीही नाणी जमवली नाहीत.

इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते बिलकुल खोटं नसावं. कारण माझ्या मुलाने बरीच वर्षे पोस्टाची तिकीटे जमवली. एका वहीत नीटपणे लावली. अनेक देशांची तिकीटे जमली होती. छान संग्रह होता. तो आठवी-नववीत असताना त्याच्या शाळेने असं प्रदर्शन भरवलं. त्याच्या वर्गाच्या गुरूजींकडे त्याने तो संग्रह दिला. प्रदर्शनात तो सर्वानी पाहिला. पण प्रदर्शनानंतर तो गायब झाला. त्याच्या गुरूजींनी तो शोधून काढण्याची खूप आश्वासनं दिली. परंतु तो अल्बम परत दिसला नाही. माझ्या अनुभवाने मी शहाणा झालो नाही आणि मुलाला आधीच अल्बमची काळजी घ्यायला सांगितले नाही. परिणामी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. त्याचा पोस्टाची तिकीटे जमवण्याचा छंद तिथेच संपला.

माझा एक मामेभाऊ क्रीकेटवेडा होता. त्याचबरोबर त्याला क्रीकेट स्टॕटीस्टीक्सचे वेड लागले. छंद हा वेडाचाच प्रकार. भारतीय क्रीकेटच्या सर्व फर्स्ट क्लास आणि जागतिक कसोटी सामन्यांचे पूर्ण रेकॉर्ड त्याच्याकडे असे. पुन्हा त्या माहितीचे पूर्ण पृथःकरण सुध्दा त्याने करून जतन केले होते. यासाठी लंडनची क्रिकेटला वाहिलेली नियतकालिकं तो स्वखर्चाने घेत असे. ही सर्व माहिती त्याने हिरव्या जाड कागदांच्या जाडजूड रजिस्टर्समधे भक्तिभावाने लिहिलेली होती. तुम्हाला फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या कोणत्याही खेळाडूची कामगीरी पृथःक्करणासकट क्षणात मिळत असे. समजा तुम्हाला अजित वाडेकर किती सामन्यामधे नॉट आउट राहिला, ही माहिती हवी आहे, ती तर तो सांगू शकेच परंतु तोच अजित कितीदा “बोल्ड” झाला, कितीदा “रन आऊट” झाला आणि कितीदा “एलबीडब्लू” झाला, हेही तो सहज सांगू शके. आउट होण्याच्या सर्व त-हांची प्रत्येक क्रिकेटरची संख्यावारी त्याने नोंद करून ठेवली होती. ह्यासाठी त्याने खूप कष्ट केले होते. बँकेच्या लेजरच्या जाडीची अशी दहा रजिस्टर्स त्याच्याकडे होती. त्यातून तो कोणतीही माहिती देऊ शकत असे. तो कोल्हापूरला रहात असे, त्यामुळे म्हणा की त्याला त्याचा उपयोग न करता आल्यामुळे म्हणा, त्याच्या या छंदाचं कसोटी क्रिकेटच्या सुवर्णकाळातही चीज झालं नाही. संगणक येण्यापूर्वी अशी माहिती जमवून तिचे विविध त-हेने पृथःक्करण करून ठेवणे किती अवघड काम असेल, याची कल्पना तुम्ही करू शकतां. दोन चार मोठ्या क्रिकेटर्सनी त्याच्या छंदाच कौतुकही केलं. कुणाच्या तरी आग्रहावरून एकदा त्याने पुण्याच्या एका प्रदर्शनात ती रजिस्टर्स ठेवली. फलश्रुती अशी की प्रदर्शनाच्या प्रेक्षकांपैकी कोणी तरी कांही रजिस्टर्समधली अनेक पानेच फाडून नेली. पुढे संगणक आले, अद्ययावत माहिती आली. त्याचेही अपघाती निधन झालं. रजिस्टर्सच पुढे काय झालं ते मलाही समजलं नाही.

सह्या जमवण्याच्या छंदापासून आपण सुरूवात केली. परत तिथे वळतो. मला स्वतःला ह्या छंदाचा व्हायरस लागला नाही. त्यामुळे सही घेण्यासाठी कुणाकडे कधी गेलो नाही. खरं तर कधीच गेलो नाही असं म्हणू शकत नाही. कारण एकदा मी एका हिदी नटाची सही घेतली. त्याचे असं झालं. १९९४ नंतर आयडीबीआय बँकेच्या नियमानुसार मी बिजीनेस क्लासने प्रवास करत असे. प्रत्येक प्रवासात कुणी ना कुणी मोठा कलाकार आजूबाजूला बसलेला असे. कधी अनिल कपूर, कधी सलमान, कधी जया भादुरी, कोणी तरी दिसत असे. घरी आल्यावर मी सहज त्याचा उल्लेख करत असे. माझ्या मुलाला आणि सुनेला कलाकारांच कौतुक असे. मी सांगतो त्यावर त्यांचा विश्वास बसत असे की नाही इतकं आश्चर्य ते व्यक्त करत. त्यानंतरच्या प्रवासांत विमानामधे माझ्या डाव्या बाजूच्या दोन जागांवर जॕकी श्रॉफ सहकुटुंब येऊन बसला. तो स्थिरस्थावर झाल्यावर, मी त्याच्याशी हंसलो. तोही हंसला. मग मी माझा परिचय सांगून त्याला म्हणालो, “मला तुम्ही सही द्याल कां? मला ती माझ्या मुलाला आणि सुनेला द्यायची आहे.” तो तात्काळ हो म्हणाला आणि माझ्याच एका कार्डामागे लिहू लागला. प्रथम त्याने दोघांची नांवे विचारून घेतली आणि ती लिहिली. मग एक छोटा संदेश लिहिला आणि खाली सही केली. त्या वाक्यात आणि त्यांच्या नावात जिथे जिथे “O” आला, तिथे तिथे त्याने बदामाकृती हृदयाचा आकार वापरला. कार्ड लिहून झाल्यावर त्याने अदबीने ते माझ्या स्वाधीन केले. विमानतळावर उतरल्यानंतर प्रत्येक पोलिसाशी हंसून तो एखाद दुसरं वाक्य बोलत बाहेर आला. हा एक प्रसंग सोडला तर अॉफीसच्या बॉसच्या एखादा प्रस्ताव मंजूर करण्याच्या सहीशिवाय मी कोणाकडे सही मागितली नाही.

मी सही देण्याचं काम मात्र बरेच वेळा केलं. पहिल्यावहिल्या उपनगर साहित्य संमेलनात मला कथाकथन करण्याची संधी मिळाली. ‘माझा लेखन प्रवास’ ह्या लेखांत तो उल्लेख होता. त्या संमेलनांत भाग घेतला तोपर्यंत माझ्या फक्त दोन तीन कथाच प्रसिध्द झाल्या होत्या. मी तरी तेव्हां स्वतःला लेखक मानायला तयार नव्हतो. (आजही लेखक म्हणवून घेण्यासारखी कामगिरी केलीय असं मला वाटत नाही. पण चार पुस्तके नांवावर आहेत म्हणून लेखक अशी समजूत). ते संम्मेलन एका शाळेत भरलं होतं. कथाकथन संपताच शाळेतल्या मुला-मुलींनी कथाकथनात भाग घेणा-या पाच सहा जणांपैकी प्रत्येकाला घेरावच घातला. सह्या घेण्यासाठी त्यांनी आपापल्या (बहुदा को-या करकरीत) डाय—या पुढे केल्या. मला खूप संकोच वाटला. सुरूवातीला मी टाळाटाळ केली. मी म्हणालो, “अरे, सही घेण्याएवढा मोठा लेखक नाही मी.” कांही मुलं माझा नाद सोडून दुस-या लेखकाकडे वळली पण तेवढीच तिथे दुसरीकडून आली. मग मला त्यांचा हिरमोड करतां येईना. मी त्यांच्या डायरीत “खूप खूप वाचा” कींवा वाचण्याविषयी इतर कांही छोटा संदेश लिहून सही करू लागलो. मग माझ्याभोवती मुला-मुलींची गर्दी वाढली. तिथून दुसरीकडे गेलो तर तिथेही गराडा पडला. ती चौथी ते दहावीची मुलं होती. आता समोर येणा-या प्रत्येकाला मी सही देत होतो. पूर्वी माझा नाद सोडून गेलेली मुलंही परत आली. एक छोटा मुलगा धांवत धावत आला आणि डायरी पुढे करून म्हणाला, ” माझ्या बहिणीला सही दिलीत आणि मला कां नाही?” मी हंसलो आणि तात्काळ त्याच्या डायरीत प्रथम सही केली. पंक्तिप्रपंचाचा आरोप नको. अगदी जाताना गेटपर्यंत कोणी ना कोणी सह्या घेत होतं. बहुतेकांच्या डाय-या लौकरच हरवल्या असतील किंवा केराच्या टोपलीत गेल्या असतील. ३४ वर्षे जर माझी सही कोणी जपून ठेवली असेल तर ते नवलंच ठरेलं.

पुढे माझ्या पुस्तकांची प्रकाशने झाली तेव्हां तेव्हा खूप सह्या कराव्या लागल्या. लेखकाची स्वाक्षरी असलेलं पुस्तक आपल्याकडे असावं असं अनेकांना वाटते. विशेषतः जर प्रकाशन समारंभाला हजर राहून पुस्तक विकत घेतलं तर नक्कीच. कांही सुहृद सात सात, आठ आठ प्रती घेत. इतरांना भेट देण्याचा उद्देश त्यात असे. त्या सर्व प्रतींवर ते सही घेत. एकूण पांच वेळा प्रकाशन समारंभ झाले आणि प्रत्येक वेळी खूप सह्या केल्या. निवृत्तीनंतर जेव्हां मी एक दिवसाची किंवा साडे तीन तासांची कार्यशाळा घेत असे तेव्हाही कांही सहभागी आवर्जून सही घेत. कांही संस्थानी किंवा महाविद्यालयांनी जेव्हां मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं, त्यावेळेसही कांहीजण सही घेत. आता मात्र सही तीसुध्दा क्वचितच चेकवर करावी लागते तेवढीच.

सही द्यावी की नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निरागस मुलं जेव्हां सही मागतात तेव्हां त्यांचा हिरमोड करावा कां? किंबहुना लहान मुलाच्याच निरागसतेने फक्त संग्रहासाठी सह्या जमवणा-या मोठ्यांचा तरी हिरमोड करावा कां? दामले नांवाचे गृहस्थ दरवर्षी नाट्यदर्पण रजनी हा रंगमंचावरच्या कलाकारांना उत्तेजन देणारा कार्यक्रम २५ वर्षे करीत असत. अरूण घाडीगांवकरच तुम्हांला त्यांच्याबद्दल जास्त सांगू शकेल. २५वा कार्यक्रम हा सांगता समारंभ होता. रंगभवनमधे मोठ्या थाटात तो साजरा झाला. बँकेतर्फे त्या कार्यक्रमाला बॕनरसाठी मदत देण्यात आली होती. त्यामुळे मला अगदी पहिल्या रांगेत दोन तिकीटे देण्यात आली होती. तेव्हा कफ परेडला रहात असल्यामुळे कार्यक्रमाला दोघेही गेलो होतो. आजूबाजूला बरीच कलाकार मंडळी बसली होती. अधूनमधून कुणी मुलं त्याच्या सह्या घ्यायला येत व एका दोघांची सही घेऊन परत जात. मध्यंतरात एक सात आठ वर्षांचा निरागस मुलगा सर्वच कलाकारांच्या सह्या घेऊ लागला. बहुतेकांनी कौतुकाने त्याला सही दिली. आमच्या आसपासच एक आंतरराष्ट्रीय चित्रपटामुळे नांव झालेल्या स्त्री कलाकार बसल्या होत्या. त्यांच्याकडे जाऊन त्याने सही मागितल्यावर त्यांनी एरव्हीही मख्ख दिसणारा चेहरा अधिकच मख्ख केला आणि “चक्” असा आवाज करून मानेनेच त्याला नकार दिला. त्याच्याकडे त्यांनी पाहिलेही नाही. त्या मुलाचा चेहरा पडला. तरी “प्लिज” म्हणून आणखी एकदा वही पुढे केली. पण त्यांच्या चेह-यावरची रेषाही हलली नाही. मुलगा हिरमुसला होऊन निघून गेला. ह्या प्रसंगाला वीस वर्षे झाली पण आम्हाला दोघांना तो प्रसंग लक्षात राहिलाय. त्या कलाकार जेव्हां छोट्या पडद्यावर दिसतात तेव्हा त्या प्रसंगाची आठवण होते. त्या प्रा. हरि नरकेना भेटलेल्या गायिकेच्या सारख्याच अहंमन्य. फक्त सहीसाठी पैसे मागत नव्हत्या एवढचं.

घेई छंद मकरंद. मधाचा जसा भुंगा ध्यास घेतो तसा एकाच गोष्टीचा ध्यास घेणं म्हणजे छंद. छंद म्हणजे an activity done regularly in one’s leisure time. छंदाचेही अनेक प्रकार आहेत. घरांत बसून करायचे किंवा मैदानी किंवा धाडसी. कोडी सोडवण्याचा छंद, ट्रेकींगचा छंद, पोहण्याचा छंद, संगीताचा छंद असे अनेक छंद जोपासले जातात. कांही कांही श्रीमंती छंद असतात. जसा जुन्या कार जमवण्याचा छंद. पूर्वीचे पालक छंदाकडे कठोर नजरेने पहात तर आता पालक आपल्या पाल्याला छंद लागावा म्हणून मोठ्या सुट्टीत इतकं वेगवेगळ्या क्लासेसच दडपण टाकतात की पाल्य कंटाळण्याचीच शक्यता जास्त. कांही जमवण्याचा छंद जोपासणा-याने मान-अपमान बघून चालत नाही. हर त-हेची माणसं भेटणार. कधी कधी गाढवाचे पाय धरावे लागणार हे लक्षात ठेवायला लागतं. सहीसाठी किंमत मागणा-या कलाकाराच्याही कांही अडचणी असतील. एकाला सही दिली आणि एकाला नाही तर भेदभावाचा आरोप येईल. आणि सह्या दिल्या तर अति प्रसिद्धीमुळे सही घेणाराच्या रांगाच लागतील. तरीही पैशाची अट घालणं चूकीचचं. छंद जोपासणा-याने आपल्या छंदासाठी प्रयत्नांची शिकस्त करायची. “कर्मण्ये एव अधिकारः ते” असं श्रीकृष्णांनीच सांगितलय. मला लहानपणी वाचनाचा छंद होता पण तो छंद मानला जात नव्हता आणि दुसरा कसला छंद लागला नाही. आता मात्र एक छंद लागला आहे. मलाच कां, अनेकांना तो छंद लागला आहे. तो म्हणजे व्हॉटसॲपचा. गप्पांच्या मेहफीलीची डीजीटल आवृत्ती आहे ती. हा छंद आता सुटेल असं वाटत नाही आणि तो सुटावा असं वाटतही नाही.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..