नवीन लेखन...

माझे आजोळ – भाग १ – पणजोबांचे घर (आठवणींची मिसळ २९)

माझे आजोळ कोल्हापूरला. माझा जन्मही कोल्हापूरचा. आमचे पणजोबा (आईचे आजोबा) कोकणांतून कोल्हापूरला आले. त्यांचे शालेय शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. पण त्यांनी कायद्याचा चांगला अभ्यास केला होता. कोकणातच त्यानी कुलमुखत्यार पध्दतीने वकिली करायला सुरूवात केली. पण तिथे त्यांचे समाधान होईना. मग ते नशिबाची परीक्षा घ्यायला कोल्हापूरांत आले. ते धर्मशाळेत रहात असतांना योगायोगाने त्यांना शाहू महाराजांनी पाहिले. त्यांची चौकशी केली. पणजोबांनी आपण कुठून आलो, काय उद्देश आहे ते सांगितले. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरांत वकिली करायची परवानगी दिली. त्यांची वकिली उत्तम चालली. कोल्हापूरांत राजकृपा आणि लक्ष्मीकृपा दोन्ही त्यांना लाभली.

ते शाहू महाराजांचे दरबारी झाले. शाहू महाराजांच्या घरांतील कोणत्याही समारंभासाठी काव्य करण्याचे काम पणजोबांकडे होते. ते शीघ्रकवी होते. नातेवाईक-मित्र यांच्याकडील विवाहासाठी मंगलाष्टकेही ते रचत. शाहू महाराजांचा सुधारणावादी दृष्टीकोन त्यांनी लगेचच स्विकारला आणि अंमलातही आणला. त्यांनी आपल्या घरीच सर्व जातीच्या लोकांसाठी सहभोजनं घालायला सुरूवात केली. भोजनाला दरबाऱ्यांनाही आमंत्रण असे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ही गोष्ट तितकी सोपी नव्हती. पण शाहूमहाराजांच्या कोल्हापूरांत ती शक्य झाली. आम्हां पुढील पिढ्यांचा जातीभेदाला दूर ठेवण्याचा दृष्टीकोन ह्यामुळे सहजच घडला.

प्रथम कोल्हापूरांत ते भाड्याच्या घरांत राहिले. तिथे पाण्याचीही सोय नव्हती. पाण्यासाठी बायकांना दूर नदीवर जावे लागे. पुढे कोल्हापूरांत त्यांची दोन ठिकाणी घरे झाली. पहिले जुने घर टाऊन हॉलजवळच्या बोळांत होते. ते त्यांनी होते तसे विकत घेतले. तिथे एक मजल्याचं एक घर आणि तीन लांबट बैठ्या चाळी होत्या. शिवाय मोठी बाग होती.त्यांत माड होते. भाज्या लावलेल्या होत्या. इतरही बरीच आंवळा, पेरू, शेवगा आदी झाडे होती. पुढे तिथले घरही भाड्याने दिले आणि शनिवार पेठेत घर बांधले. बाग मात्र स्वतःकडेच ठेवली होती. तिथे एक विहीर होती. कोणी ना कोणी रोज जाऊन झाडांना पाणी द्यायचे काम करत असे. झाडांभवती आळी असत. छोटे पाट काढून पाणी सर्वत्र फिरवलेले होते. तिथून उपसून ते झाडांच्या आळ्यामधे घालायचे असे. बागेपासून मिळणाऱ्या बहुतांश वस्तू घरांतच संपायच्या.

मी लहान असताना तिथे नगरपालिकेचा नळ आला. त्या नळावर तिथले सगळे भाडेकरू पाणी भरू लागले. पाणी अर्थातच चोवीस तास नसे. पाणी आल्यावर दुपारी बाराला जाऊन कोणी तरी त्याचे कुलुप काढून नळ उघडून देई. बायका आधीच रांग धरून, कळशा लावून उभ्या असत. नळ उघडला की तिथे बायकांची झिम्मड उडे. खास कोल्हापुरी भाषा बायकांच्या तोंडून ऐकायला मिळायची. अर्थात कधीतरी भांडणेही होत असत. मग कोल्हापुरी शिव्याही ऐकायला मिळायच्या. त्याकाळांत शिव्या देण्याच्या बाबतीत संकोच नसे. गांवातल्या बसचा कंडक्टरही क्षणोक्षणी उतारूंना शिव्या देऊन त्यांचा उध्दार करी. दोन वाजता नळ बंद करत. आजोबा गेल्यानंतर ते घर माझ्या मामांनी विकलं. तोपर्यंत हाच क्रम चालू होता.

जुन्या घरांत रहात असतांना पणजोबांनी शनिवार पेठेत कोर्टाजवळच मुख्य रस्त्यावरच मोठी जागा घेतली आणि नवे मोठे दोन मजली घर बांधले. कोर्टाची इमारत आणि वाडा यांत फक्त एक चार फुटी बोळ होता. त्या वाड्याच्या प्लॉटची लांबी साधारणपणे १२५ फूट असेल तर रूंदी साधारणपणे ६० फूट असेल. समोरच्या भागांत पहिल्या मजल्यावर सुंदर नक्षीदार कडा असलेल्या खिडक्या होत्या. दोन गॕलऱ्याही होत्या. घराच्या मागे विहीर खणायला घेतली. ४ x १२ अशा आकाराची आयताकृती विहीर होती ती. फक्त दहा फूट खणल्यावर भरपूर पाणी आलं. विहीर सदैव भरलेली असे. उतरत्या पायऱ्या होत्या. चार पायऱ्या उतरल्यावर पाणी पायाला लागे. त्याआधी नगरपालिका नव्हती. पूर्वी नळाने पाणी येत नसे. पाणी भरायला नदीवर जावं लागे. पुढे नळ आले. तरीही विहिरीच्या पाण्याचाही वापर असे.

हे घरं त्यांना लाभलं. खूप भरभराट झाली. मग त्यांनी मागच्या बाजूलाही एक दोन मजली घर बांधलं. दोन घरांच्या मधें जिना होता. मागच्या घरापासून तळमजल्यावरून निघणारा जिना पुढल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याला मिळायचा. तर तिथून फिरून तो परत दुसऱ्या मजल्याला मागल्या घराला येऊन मिळायचा. अशा प्रकारे दोन्ही घरे एकाचाच भाग असल्यासारखी जोडली होती. त्या दोन्ही घरांना मिळून मोजून बावन्न खोल्या होत्या. त्यातल्या कांही खोल्या १५ x २५ इतक्या मोठ्या होत्या तर कांही १० x ४ इतक्या लहान होत्या. आकाराचे हे अंदाज आहेत.

दर वर्षी सुट्टीत आई आम्हाला आजोळी घेऊन जाई. मुंबईच्या दहा बाय दहाच्या दोन खोल्यातून त्या घरांत गेलो की खूप मजा वाटे. मागच्या घरांत तळमजल्यावर तीन खोल्या होत्या. पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यासमोर स्वयंपाकखोली होती. तिथे आजीचं राज्य होतं. पहाटेपासून ती आणि तिची विधवा बहिण चुलीपाशी असत. तिच्या बहिणीला आम्ही मावशी आजी म्हणतं असूं. पणजोबांच्या शाहूवादी सुधारणांमुळे त्या काळांतही मावशी आजी लाल लुगडे नेसत नसे की केशवपन करत नसे. माझ्या आजीला सर्वजण वहिनी आजी म्हणत. वहिनी म्हणेल ते करायचं, एवढंच तिला माहिती. दोन मातीच्या चुली होत्या. त्यावर सतत कांही ना कांही चढवलेलं असे. त्या मागच्या दोन खोल्यात सांठवण असे. तारदाळला थोडी शेती होती. तिथूनही पोती येत. शिवाय बरीच अशीलं पैश्यांच्या ऐवजी वस्तूच पाठवून देत. स्वयंपाकाला लागणाऱ्या गोष्टी भरपूर जमवलेल्या असत. सर्व गोष्टी पोत्यांनी आणल्या जातं.

पुढल्या घराला रस्त्याकडून दोन प्रवेशद्वारं होती. तिथूनच वर दुसऱ्या मजल्याकडे जाणारे दोन जिने होते. दोन जिन्यांच्या मधल्या खोल्या दुकानांना भाड्याने दिल्या होत्या. पहिल्या खोलीत कोर्टाची कामे करणारे कारकून डेस्क घेऊन बसलेले असत. नकला उतरून देणं, कागदपत्र तयार करणं ही कामं ते करत.टाईपरायटर सार्वत्रिक होईपर्यंत त्यांच्याकडे भरपूर काम असे. पुढे सायकलचं दुकान होतं. सायकलची दुरूस्ती, हवा भरणं, सायकली भाड्याने देणं ही त्याची कामे. पुढे एक केशकर्तनालय होतं. त्यापुढे एक चांभाराच दुकान होतं. कोल्हापुरी वहाणा तो उत्तम तयार करी. पुढच्या भागात आधी पणजोबांची एक मुलगी म्हणजे माझ्या आईची आत्या, तिचं कुटुंब रहात असे. लागोपाठ तीन मोठ्या खोल्या तिच्याकडे होत्या. प्रसिध्द ध्वनीसंयोजक मंगेश देसाई या आत्याचा मुलगा. त्याच्यावर मी नंतर स्वतंत्र लेखच लिहिणार आहे.

आत्याकडे होत्या, तशाच तीन तीन खोल्यांचे दोन खण तळ मजल्यावर होते. त्यांत एक दुधदुभत्याची खोली होती.
दोन घरांच्या मधे जो चौक होता, त्यांतच एक दोन म्हशी आणि एक गाय यांचा गोठा होता. त्याशिवाय जुन्या घराकडेही सहा जनावरांचा गोठा होता. त्यामुळे दुधदुभत्याला तोटा नव्हता. दुधदुभत्याच्या खोलीत एक थंड पाण्याचा माठ असे. त्यांत वाळा टाकलेला असे. बाजूला एक मूगाच्या किंवा गव्हाच्या पीठाचे लाडू ठेवलेला डबा असे. उन्हातून धावत येऊन लाडू न खातां पाणी प्यायचं नाही अशी मुलांना सक्त ताकीद असे. पुढच्या बाजूला तळमजल्याप्रमाणेच मोठ्या खोल्या पहिल्या मजल्यावर होत्या. त्यातल्या एकीला कचेरी म्हणतं तर एकीला बैठकीची खोली म्हणत. मोठे लोक आले की त्यांच्याबरोबरची बोलणी बैठकीच्या खोलीत होत असत. तर कचेरीत टेबलाशी बसून करायची कामं होतं. कचेरीत अनेकदा कोल्हापूरच्या आसपासच्या गांवातून आलेले पक्षकार (अशील) घोळक्याने येत. बरोबर बांधून आणलेली न्याहारी तिथेच खात.
भाकऱ्या, कांदा आणि लाल मिरच्या हाच बेत बहुदा असे.

बैठकीच्या खोलीच्या बाजूची एक किंचित काळोखी खोली ही पणजोबांची खोली. तिथे एक मोठा झोपाळा होता. पणजोबा बरेच वेळा तिथेच असत. नातवंड-पतवंडाकडून पायाला मुठलं (रातांब्याचे) चोळून घ्यायचे. डोक्याला मालिश करून घ्यायचे. ही काम करण्याबद्दल खाऊला पैसेही देत असत. पहिल्या मजल्यावर त्यामागे मात्र लहान लहान खोल्या होत्या. त्यांतच एक बाळंतीणीची खोली होती. किती बाळंतपण झाली असतील तिथे ह्याची कांही नोंद नाही. पण पणजोबांच्या दोन-तीन पिढ्या तरी तिथे जन्मल्या असतील. माझा जन्म त्याच खोलीत झाला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघराच्या भागावर तीन तीन खोल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावरच्या खोल्यांमधून घरांतील वडील मंडळी असत तर दुसरा मजला हा तरूणांचा किंवा विद्यार्थ्यांचा होता. त्याकाळी कोल्हापूरचं राजाराम कॉलेज हेच कोकण-सातारा भागातलं एक काॕलेज. त्यामुळे तिथे शिकायला आलेली जवळच्या किंवा दूरच्या नात्यातली, तशीच कांही निराधार मुलेही त्या घरांत रहात असत. विशेष हे की कामे सांगताना, खाण्यापिण्यांत किंवा शिस्तपालनात, आपली आणि दुसऱ्यांची असा भेद कधी त्या घरांत झाला नाही. पणजोबा आणि आजोबा ह्याबाबतीत सारखेचं होते. ह्या लेखांत जास्त करून घराचीच ओळख करून दिली. पुढच्या भागांत थोडी व्यक्तींचीही अधिक ओळख करून घेऊ.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..