नरेंद्रची आणि माझी पहिली भेट रिझर्व्ह बँकेच्या झोनल ट्रेनिंग सेंटर, मुंबई सेंट्रलला झाली. तेव्हां मी २८ वर्षांचा होतो तर नरेन२७ वर्षांचा. नरेन तेव्हां आयएफडी (Industrial Finance Department) ला होता. नरेनची माझी मैत्री तेव्हांपासूनच झाली. नरेनची पहिली जाणवणारी गोष्ट म्हणजे त्याचा उत्साह. नरेनने ट्रेनिंगमधेही उत्साहाने रस घेतला आणि ट्रेनिंग दरम्यान होणा-या इतर कार्यक्रमांत सुध्दा. कोणताही बेत करा हा पुढे असायचा. क्लासमधे अगदी पहिल्या बाकावर नरेन बसायचा. मी मात्र अगदी शेवटच्या बाकावर बसायचो. दादा साळवी, शरद लिखिते आणि मी. तिघे तिथे बसत असूं. नरेन प्रत्येक लेक्चरमध्ये इंटरेस्ट घेत असे. तर आम्ही फक्त ट्रेनिंग सेंटरच्या फॕकल्टीला मान देत असू. नरेनचा लेक्चरमधला इंटरेस्ट त्याच्या ट्रेनरला प्रश्न विचारण्यातून दिसून येई. प्रत्येक लेक्चरला तो एक तरी प्रश्न विचारत असे.एकदा नरेनने एका एसीडीच्या गेस्ट लेक्चररला प्रश्न विचारला. नरेनची प्रश्न विचारण्याची पध्दत थोडी लांबण लावणारी असे. एका वाक्यांत ऑब्जेक्टीव्ह प्रश्न तो विचारत नसे. तर चांगली आठ दहा वाक्ये वापरून मध्ये थांबत तो प्रश्न विचारी. त्याचा प्रश्न कळण्यासाठी लेक्चररला तो नीट ऐकावा लागे. कांही लेक्चरर्स त्याला “Come again” म्हणून स्पष्ट करून घेत. पण तो एसीडीचा अधिकारी इतका पर्टीक्युलर नव्हता. त्याने अंदाजाने त्याला जे वाटले, त्याचेच उत्तर द्यायला सुरूवात केली. त्या लेक्चररच्या दुर्दैवाने रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर मलुष्टे त्यादिवशी पहाणी करायला आले होते. त्यांनी त्याला थांबवले कारण त्यांच्या लक्षात आले होते की प्रश्न वेगळाच आहे. मग त्यांनी नरेनला प्रश्न परत विचारायला सांगितले. सांगायचा उद्देश इतकाच की नरेन लेक्चर्स लक्षपूर्वक ऐके आणि त्याची बुध्दी चौकस होती. याउलट मी मागे बसून बाकाच्या खणांत पत्ते ठेवून लिखिते आणि साळवी यांच्यासह रमी खेळत असे. ही गोष्ट रेग्युलर फॕकल्टीलाही माहिती होती. ते ट्रेनिंग नॉन रेसिडेन्शियल पण दीर्घ अवधीच म्हणजे तीन महिन्यांच होतं. तेव्हा बोअरींग लेक्चर्सच्या वेळी आम्ही खेळत असू. असा आम्हा दोघांच्यात फरक असला तरी वर्ग संपल्यानंतर, लंचला नरेन आमच्याबरोबर असे. आमचा दोघांचाही स्वभाव गोष्टी वेल्हाळ असल्यामुळे आमची मैत्री तेव्हाच दृढ झाली.
▪
नरेंद्रचा चेहरा थोडासा लंबगोल, मोठा होता. त्याचं नाक छ. शिवाजी महाराजांच्या नाकाचं वर्णन ऐकतो, तसंच धारदार आणि टोकाला किंचित वळलेलं वाटायचं. डोळे बोलके होते. कपाळ भव्य होतच पण तेव्हांपासूनच वरचे केस कमी होत असावेत, त्यामुळे ते अधिकच भव्य वाटायचं. मध्यम किंचित कमीच अशी उंची. तेव्हां बारीक होता पण नंतर ब-यापैकी सुदृढ झाला होता. त्याचे वडिल उच्छळी ह्या लहान गांवामधे वैद्यकी करत असत. ते तिथे प्रसिध्द होते. गांव लहान असल्यामुळे नरेनचे शिक्षण बोर्डीला झाले. बोर्डीच्या अनेक गोष्टी तो आम्हाला सांगत असे. त्याला आपल्या गुरूजनांचा आणि शाळेचा रास्त अभिमान होता. अनेक वर्षे त्याचा आपल्या कांहीं सहाध्यायांबरोबर संपर्क होता.
▪
मी आयडीबीआयला आलो तेव्हां नरेन रीफायनान्समधेच होता. तो आणि इतर कांही मित्र मला आधीपासून ओळखणारे असल्यामुळे त्याकाळी गंभीर वातावरण असणा-या रिफायनान्समधे मला लौकर स्थिरस्थावर होता आलं. श्रीकांत देशपांडे, शिलेवंत, चित्रे, साठे आणि मी अशी आमची सांखळीच तयार झाली. आम्ही रिफायनान्सचं गंभीर वातावरण बदलून टाकलं. छोट्या मोठ्या पार्ट्या वारंवार होऊ लागल्या. सेंड ऑफ होऊ लागले. नरेन नेहमी बोलायला पुढे असे. पुढें शिलेवंत अपघातात गेला. पण आमची मैत्री कायम राहिली. आमचे कांही इंटरव्ह्यू बरोबरच झाले. नरेनची आम्हाला तयारी करताना नेहमी मदत होई. त्याने वाचून, विचार करून तयारी केलेली असे. नंतर नरेनची अकाउंटस डीपार्टमेंटला बदली झाली. आयडीबीआय रिझर्व्ह बँकेपासून वेगळी झाल्यानंतर आयडीबीआयच्या अकाउंटींग सिस्टीम्स स्ट्रीमलाईन करण्याची फार गरज होती. आयडीबीआयने त्याकरिता कल्याणजी आणि रायजी कंपनीची नियुक्ती केली. ह्या कन्सल्टंटसना आयडीबीआयतर्फे मदत करण्याच काम नरेनवर सोंपवण्यात आलं. ते त्याने चोख पार पाडलं. त्याचे नाव झाले. सर्व सिनियर स्टाफही त्याला त्या कामासाठी ओळखू लागला.
▪
त्याच सुमारास आयडीबीआयने ट्रेनिंगची व्यवस्था लोणावळ्याला केली. लोणावळ्याच्या इन्स्टीट्यूटचा परीसर तेव्हां फारच छान होता. नरेनला अकाउंटस विषयावर आणि मला फॉरेन एक्स्चेंजवर सेशन घेण्यासाठी बोलावलं जाऊ लागलं. ट्रेनिंगमधले आमचे मित्र आमचे दोघांचे सेशन एकाचा सकाळी, एकाचा दुपारी असे एकाच दिवशी ठेवत. त्यामुळे आम्ही अनेकदा प्रवासही बरोबर करत असू. आदल्या दिवशी जाऊन राहिल्यामुळे आमचा बराच वेळ एकत्र जाई. ह्या दरम्यानच माझ्या मनांत कथांनी आकार घ्यायला सुरूवात केली. मी माझ्या कथा लिहिण्याआधीच मनाशी जुळवत असे. अनेकदा कथेचा शेवट करण्याचे दोन अथवा तीन मार्ग मला दिसत. नरेन आणि मी, आमच्यात वाचन-लेखन प्रेम हा समान दुवा होता. मग गप्पा करता करता माझ्या मनात अवतरलेली कथा सर्व प्रकारच्या शेवटांच्याशक्यतासकट त्याला ऐकवत असे. कथा त्याला आवडे. तिचा एखादा शेवट जास्त बरा वाटतो आणि तो तसा कां वाटतो, हे तो मला सांगे. त्यानंतर कधीतरी मी ती कथा लिहून काढत असे.
▪
आयडीबीआयच्या एका गॕदरींगच्यावेळी त्याच्या आणि माझ्या कुटुंबीयांचीही ओळख झाली. आम्ही तेव्हां नरीमन भवनला होतो. आमच्या मित्रांची संख्या वाढली होती. बाक्रे, गुप्ते, ठोसर, जाधव, पालकर, गोखले, पटवर्धन हेही आमचे घनिष्ट मित्र झाले होते. आमच्यापैकी कांहीजण आम्ही पावसाळी ट्रीपला बायकांसह लोणावळ्याला दोन तीनदा जाऊन मनमुराद भिजलो. आयडीबीआयच्या गेस्ट हाऊसलाही, लोणावळा आणि माथेरानला आम्ही जाऊन राहिलो. आम्ही अशा वेळी खूप फिरत असू. कोणालाच चालण्याचा कंटाळा नसे. गप्पा गोष्टी, माझ्या कथांबद्दल बोलणं होई. खूप छान दिवस होते ते. एकदा नरेन मला म्हणाला, “अरविंद, माझा मुलगा निकेत माझ्या पाठी लागलाय की आपण कुत्रा पाळूया. पण मला त्याला होकार देववत नाही.” मीही त्या आधी कुत्रा पाळला नव्हता. तरीही मी त्याला म्हणालो, “मग कां नाही म्हणतोस? कुत्र्याची देखभाल कोण करणार म्हणून? की कुत्र्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून? ” तो म्हणाला, “नाही. देखभाल करण्याचा आम्हाला कंटाळा नाही. अभ्यासाचंही कांही नाही.” मी म्हणालो, “आपण मराठी माणसं मुलांना हे करू नको, ते करू नको अशी बंधनंच जास्त घालतो. मग म्हणतो कीं आमची मुलं धीट झाली नाहीत.” तो म्हणाला, “तसं नाही. कुत्र्याचं आयुष्य दहा बारा वर्षांच किंवा कमीही असू शकत. कुत्रा गेल्यानंतर मुलांना खूप त्रास होईल.” मी म्हणालो, “मग तर कुत्रा पाळायला काहीच हरकत नाही. कारण मरण हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कुत्र्याचाच काय पण आपल्या माणसांचा मृत्यूही केव्हां ना केव्हां सहन करण्याचा प्रसंग येतोच. कुत्रा गेला तर त्यांतूनही मुलं कांहीतरी शिकतीलच. त्यांचा आजचा आनंद कां हिरावून घ्यायचा?” नरेनला माझं म्हणणं पटलं. एक छान व्हाईट पोमेरीयन कुत्री त्यांच्या घरांतली सदस्य झाली. नरेनचं सर्व कुटुंब तीच्या घरी येण्याने आणिकच उल्हसित झालं. कुत्रा पाळणे हा एक अनुभव आहे. त्यांतली गंमत कुत्रा न पाळता कळणार नाही. सर्व घर त्याच्याभोवती फेर धरू लागतं. प्रथम घरांतल्या कांही जणांना श्वानाच घरातलं आगमन आवडत नाही. पण थोड्याच दिवसांत तो त्यानाही आपलंस करून घेतो. तसच नरेनच्या कडे झालं. मग एक दिवस त्या कुत्रीला चार पिल्लं झाली. दोन सफेद आणि दोन काळी. नरेन मला म्हणाला, ” अरविंद, तू अनुभव न घेतांच कुत्रा पाळण्याचा मला सल्ला दिलास. आता चार पिल्लांपैकी एक घेऊन जा आणि त्यांतल्या आनंदाचा अनुभव घे. ह्या चारांतलं हवँ ते पिल्लू निवडण्याचा पहिली संधी तुला.” माझाही मुलगा कुत्रा आणा म्हणून माझ्या मागे लागला होताच. मग मी मुलालाच पाठवले जा चारांतलं एक पिल्लू घेऊन ये. तो एक पूर्ण काळा भोर पॉमेरीयन कुत्रा घेऊन आला. यथावकाश ते महिन्याचं पिल्लू मोठं झालं. कांही वर्षांनी त्याला मेटींगला नेलं आणि एक पिल्लू घ्यायचा आम्हाला हक्क मिळाला. त्याच्या थोडं आधी चित्रेंकडली कुत्री ९-१०वर्षांची होऊन गेली होती. आम्हाला मिळालेलं पिल्लू परत चित्रेंकडे गेलं . चित्रेंच्यांत आणि आमच्या कुटुंबात एक वेगळाच ऋणानुबंध निर्माण झाला.
▪
माझ्या पत्नीच्या सख्या मावसभावाच आडनांवही चित्रे होतं. त्यामुळे साहाजिकच ओळख झाल्यानंतर नरेनला विचारलं होतं की ते चित्रे तुमचे कोण? तर ते त्याचे चुलत भाऊच निघाले. म्हणजे असंही दूरचं नात आमच्यात होतच. आम्हा दोघांमधलं मैत्रीच नातच अर्थात सर्वात महत्त्वाचं होतं. पुढे त्याची चंदीगडला बदली झाली. भेटी कमी झाल्या पण फोनवर खूप वेळां बोलणं होत असे. कांही वेळा टूरवर असतांना मी त्याला भेटलो. माझ्या कुटुंबासह सिमला, मनालीची ट्रीपही मी त्याच अवधीत केली. नरेनने मला ही ट्रीप आंखण्यासाठी खूप मदत केली. त्यानंतर सिडबीची निर्मिती झाली आणि नरेन सिडबीच्या चंदीगड ब्रँचचा मुख्य झाला. आमच्या भेटी आणखीच कमी झाल्या. पण कॉमन मित्र आणि सारख्या आवडीनिवडी यांमुळे आम्ही कायम संपर्कात असू. एकमेकांची हालहवाल जाणून घेत असू. तो चंदीगडला असतानाच त्याच्याकडची पहिली कुत्री मरण पावली. सर्व कुटुंब दुःखी असताना आपण त्यांच्याबरोबर असावं ह्या प्रबळ इच्छेने त्याने सिडबीच्या दिल्लीस्थित रीजनल मॅनेजरशी संपर्क साधायचा खूप प्रयत्न केला. सर्व प्रयत्न झाल्यावर त्याने अर्ज लिहिला व चार्ज आपल्या दुय्यम अधिका-याकडे देऊन तो मुंबईला निघून आला. हेतुतः त्याला संपर्क साधू न देणा-या त्या रीजनल हेडने ही संधी साधून नरेनला मेमो दिला. व त्याचे प्रमोशन होऊ नये असे प्रयत्न केले. पण एमडींचा नरेनवर खूप विश्वास होता. त्यांनी तसं होऊ दिलं नाही. नरेन सिडबीत एचआरचा सीजीएम झाला. पुढे सिडबीत एक वादळी आणि वादग्रस्त एम डी झाले. त्यांनी दिवसाला पाच दहा जणांच्या कारणाशिवाय ट्रान्सफर ऑर्डर्स काढायला सुरूवात केली. नरेनने एचआर सीजीएम म्हणून दिलेला सल्ला ते धुडकावून लावत. शेवटी नरेनला आयडीबीआयच्या इडी आणि चेअरमनकडे ह्या बाबतीत जाणं भाग पडलं. तो कठीण काळही नरेनने शांतपणे आणि कौशल्याने हाताळला. शेवटी लखनौलाच तो रीटायर झाला.
▪
रीटायर झाल्यावर ठाणे-मुलुंड इथे रहाणा-या मित्रांचा गृप तयार झाला. आपल्या बँकेतलेच आपटे, वर्तक, बाक्रे, ठोसर, पटवर्धन, चित्रे आणि अधूनमधून एन. जी. देशपांडे ह्यांचाच गृप तयार झाला. खरं तर पूर्वी ठाणे सीएसटी प्रवासांत हा गृप होताच. ते ट्रेनमधे ब्रिज हा पत्त्यांचा खेळ खेळायचे. आता त्याना त्यासाठी खूप वेळ मिळू लागला. एखाद्याच्या घरी ते एकत्र जमत असत आणि पत्त्यांची महफील रंगे. मीही दोन-तीनदा त्यांत सामील झालो. दूसरा उपक्रम म्हणजे जवळपासच्या चांगली सोय असणा-या ठिकाणी एक किंवा दोन दिवसांची सहल काढणे. सर्वांच्या बायकाही सहलींना येत असत. निवृत्तीनंतरचा काळ नरेन असा मस्त मजेत घालवत होता.
▪
पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे नरेनला वाचन लेखन आणि वक्तृत्व ह्या तीनही गोष्टींची आवड होती. कोणत्याही छोट्या मोठ्या गॕदरींगमधे किंवा सभेत तो उत्स्फूर्तपणे बोलत असे. माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनाला असाच ऐनवेळी तो बोलायला पुढे आला होता. लेखन करायला त्याला निवृत्तीनंतरच फुरसत मिळाली. त्याने एक कादंबरीच लिहिली. रिहॕबिलीटेशन डीपार्टमेंटच्या अनुभव, कॉर्पोरेटसचा कारभार कसा चालतो याबद्दलची माहिती याचा उपयोग करून एक चांगलं काल्पनिक कथानक घेऊन त्याने ती कादंबरी लिहिली होती. लोकप्रभा साप्ताहिकाने ती स्वीकारली आणि क्रमशः एक एक भाग छापायला सुरूवातही केली. पण दोन की तीन भाग झाल्यावर कादंबरी क्रमशः छापणं आमच्या धोरणांत बसत नाही असं सांगून पुढचे भाग छापणंच बंद केलं. मग त्याने ब-याच प्रकाशकांशी संपर्क साधला पण नवीन लेखकाची कादंबरी प्रकाशित करायला कोणी स्वीकारली नाही. त्याची इच्छा अपुरीच राहिली. तो गेल्यानंतर मी त्याच्या घरी गेलो असतांना म्हटले की त्याच्या मुलांनी स्वखर्चाने त्याची कादंबरी प्रकाशित करावी. तोही म्हणाला की आम्ही ते करणारच आहोत.
▪
गेली पांच सहा वर्षे त्याचा माझा संपर्क कमी झाला होता. बाक्रे, ठोसर यांच्याकडून खुशाली कळायची दोन वर्षांपूर्वी त्याच्या सौ. ना आठवड्यात तीनदा डायलीसिस करण्याची गरज निर्माण झाली तर त्याला गुडघेदुखीसाठी लाईट, फिजीओथेरपी घ्यायला लागली. पाच महिन्यांपूर्वी अचानक त्याला हृदयाच्या दुखण्याचा त्रास झाला. त्यांतून तो पूर्ण बरा झालाच नाही. कारखानीस, निंबाळकर आणि मी त्याला भेटायला गेलो. तो जेमतेम बाहेर येऊन बसला. आम्हाला भेटल्याने त्याला खूप आनंद झाला. तो त्याने सिडबीच्या व्हॉटसॲप गृपवर भरभरून व्यक्त केला. त्याचा हृद.याचा आजार अपरिवर्तनीय होता. त्यानंतर दोन तीन महिनेच त्याने काढले. त्याच्या कुटुंबीयानी त्याही दिवसांत त्याला उत्साहीत रहायला मदत केली. अगदी व्हील चेअरवरूनही त्याला कांही ठिकाणी नेले. त्याला वाचून दाखवणे, गाणी ऐकवणे असे सर्व. त्यानेही जे अटळ होते ते आनंदाने स्वीकारले होते.
▪
आणि मग एक दिवस संध्याकाळी त्याच्या मुलीचा फोन आला, ” काका, बाबा गेले.” नरेनला त्यावेळी ७५ वर्षे पूर्ण होऊन तीनच महिने झाले होते. आयुष्य किती होते यापेक्षा माणसाने त्याचा आनंद कसा आणि किती घेतला, हीच जर चांगल्या जीवनाची कसोटी असेल तर नरेन भरभरून आनंदाने आणि उत्साहाने जगला. भावंडात तो सर्वात मोठि होता. त्याचे जसे मित्र खूप होते तसेच आप्तही खूप होते. ह्या गणगोतांत तो रमत असे आणि दुस-यांनाही रमवत असे. सरळ साध्या निष्कपट स्वभावाच्या नरेनने सर्वांच्या हृदयांत स्थान मिळवले होते आणि ते कायमच राहिल.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply