नवीन लेखन...

माझे शिक्षक – भाग २ (आठवणींची मिसळ १६ )

माझ्या सातवीपर्यंतच्या शिक्षकांची ओळखभाग १ मधे करून दिली.
या सातवी पर्यंतच्या शिक्षणांत बरेच सहाध्यायी होते. अंधेरीमधे ही एकमेव शाळा होती. ज्या मुलांच्या आईवडीलांना ही शाळा पसंत नसे, त्यांच्या मुलांना ते पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयांत घालत. अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी होती.त्यामुळे मध्यम, उच्चमध्यम घरांतली सर्व मुलं इथेच प्रवेश घेत. मला आठवतयं की रत्नमाला या नटीचा मुलगा याच शाळेत होता.नीटनीटका वेष, तेल लावून व्यवस्थित भांग पाडलेले, चापून बसवलेले केस, ह्यामुळे तो उठून दिसायचा.पण स्वभावाने बुजरा असल्यामुळे मुलांच्या चेष्टेचा विषय व्हायचा.आडनाव पंडीत असल्यामुळे, “पंडीत, XXX कुंडीत” चा घोष व्हायचा.त्याला न्यायला कधी कधी आई कारमधून घेऊन यायची.वर्गांत प्रधान, गुप्ते, राजे, देशमुख अशी कांही उच्च मध्यम वर्गांतील मुले होती.चौथीपर्यंत गुप्ते, राजे या मुलांशी जास्त ओळख झाली.परंतु मैत्रीचे धागे जुळले असं म्हणतां येणार नाही.दुसरीकडे केरते, नाईकवाडे, पवार, मोरे, शिंदे अशी गरीब घरांमधली मुलं अंबोलीतून येत असत.ती बहुतेक वयाने मोठी होती. मी त्यांच्या बरोबरही खेळत असे.देशमुख सरांच्या पिरॕमिडमधे नाईकवडे कमान टाके आणि मी त्याच्या पोटावर उभा राहात असे.वाघ, कर्णिक, तावडे हे अंधेरी पूर्वकडून लांबून येत.त्यापैकी उमेश वाघ ह्याच्याशी तेव्हा ओळख झाली आणि पुढे मैत्री झाली.ती आजतागायत कायम आहे.चौथीनंतर बरीच मुलं हायस्कूलच्या पांचवीत गेली.तर त्याच शाळेत रहाणारी बरीच मुले सहावीपर्यंत शिक्षण सोडून गेली.मात्र गुप्ते नांवाचा एक मुलगा व्ह.फा. करून त्याच शाळेत नंतर शिक्षक म्हणून राहिला.गोरे नांवाचा एक मित्र शाळेच्याच गल्लीत राही.त्याची माझी बऱ्यापैकी मैत्री बरीच वर्षे राहिली.तो जीपीओमधे नोकरीला होता.लोकल बोर्डाच्या शाळेतील कांही मुलांचा पुढे संबंध राहिला नाही.

अंधेरीमधे माधवदास अमरसी हायस्कूल (एम. ए.) त्या काळी हे एकच हायस्कूल होते.हे हायस्कूल खूप प्रसिध्द होते.खूप जुने होते.भट नावाचे प्रिन्सीपाल कडक शिस्तीचे पण प्रेमळ म्हणून पूर्वीच्या पिढीत प्रसिध्द होते.जशी अंधेरीतली नव्वद टक्के मुलं भट डॉक्टरांच्या दवाखान्यात जन्माला आली होती,तशीच नव्वद टक्के मुलं प्रिन्सिपाल भटांची विद्यार्थी होती.अगदी मुलीसुध्दा कारण आम्ही त्या हायस्कूलला जाण्याआधी तिथे को-एज्युकेशन होतं.माझ्याबरोबरची मुलं पाचवीत गेली,तेव्हांपासून ती फक्त मुलांची शाळा झाली.मुलींसाठी वेगळे हायस्कूल बाजूलाच निघाले.तशीच लोकल बोर्डाचीही मुलींची शाळा वेगळी होतीआमच्या वेळेस प्रिन्सिपाल भट जाऊन दवे नावाचे नवे प्रिन्सीपाल आले होते.त्यांना हायस्कूलपेक्षा शेअर मार्केटमधे रस आहे असे कांहीं लोक म्हणत.ते नेहमी थ्री पीस सूट घालूनच शाळेत येत.त्यांचे अॉफीस हे हायस्कूलच्या हेडमास्तरपेक्षा एखाद्या कॉर्पोरेटच्या सीईओसारखे होते, असं आता मी निश्चित सांगू शकतो.रिव्हॉल्व्हींग खुर्ची, गुबगुबीत सोफे, फोटो फ्रेम्स, शो पीसेस, इत्यादी सर्वांनी सजवलेले. ते पहाण्याच भाग्य विद्यार्थ्याना क्वचितच लाभे.माझ्या निवृत्तीनंतर माझा अनेक प्रिन्सिपालशी संबंध आला.पण पन्नास वर्षे मधे जाऊनही हे प्रिन्सिपाल अतिशय सामान्य अॉफीस वापरत.मोठ्या हायफाय शाळांशी माझा संबंध आला नाही.त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलू शकणार नाही.ह्यांतले योग्य कोणते, ते मी सांगू शकणार नाही.

१९५२ पर्यंत त्या हायस्कूलमधे इंग्रजी माध्यमांतून शिकविण्यात येई.१९५२ पासून सरकारी हुकुमाप्रमाणे गुजराती आणि मराठी माध्यमातून शिकवण्यात येऊ लागले.हायस्कूलमधे गुजराती आणि मराठी तुकड्या वेगळ्या करण्यात आल्या.तीन गुजराती तुकड्या तर एक मराठी तुकडी अशी रचना झाली.मराठी मुलांची संख्या कमी होती.त्यामुळे मराठी शिक्षकांची संख्याही कमीच होती.घाटे, मंत्री, दाभोळकर, चितळे, साठे, कुलकर्णी, विजयकर बाई, देसाई बाई, कोठारे बाई आणि वर्तक नांवाचे अॉफीस सांभाळणारे क्लार्क हा दहाजणांचा मराठी स्टाफ.ह्यांतील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण होती.कांहीं जणांवर एक एक स्वतंत्र लेख लिहितां येईल.यांतील घाटे, मंत्री, साठे, कुलकर्णी, वर्तक हे सर्व रा.स्व.संघाचे स्वयंसेवक होते. गांधीवधानंतर संघावर आलेल्या बंदीविरूध्द सत्त्याग्रहात त्यांनी भाग घेतल्यामुळे ते सर्वच जण छोटी मोठी शिक्षा भोगून बंदी उठल्यावर तुरूंगामधून नुकतेच सुटून आलेले होते.त्यामुळे त्यांना नोकरी मिळणे कठीण झाले होते.अशावेळी त्यांच्यावर दयाबुध्दी दाखवून त्यांना एम. ए. हायस्कूलमधे शिक्षक म्हणून घेण्यांस ज्यांनी मदत केली होती, त्यांचे नांव होते मधूसुदन वैद्य.ते गुजराती होते.एम. ए. हायस्कूलचे व्हाईस प्रिन्सिपाल होते.ते हिंदीचे विद्वान मानले जात.त्यांनी संपादित केलेली हिंदी पाठ्यपुस्तके त्याकाळी सर्व शाळांमधून लावलेली असत.ते नेहमी सफेद खादीचे धोतर आणि सदरा वापरत.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचाराने ते गांधीवादी होते.मला वाटते म्हणूनच ते ह्या सर्वांना मदत करू शकले.ह्या सर्वांबद्दलही एक सांगता येईल की त्यांनीही कधी शाळेत किंवा विद्यार्थ्याजवळ इतरत्र संघाबद्दल एक शब्दही काढला नाहीकिंवा त्या विचारसरणीचा प्रचारकेला नाही. कोणत्याही प्रकारे गांधी-नेहरू यांचे अवमूल्यन होईल असेही कधी कांही बोलले नाहीत.

सातवीपर्यंत आमचे वर्ग-शिक्षकच बहुतेक विषय घेत.एखादा चित्रकला, हस्तकला, शारीरिक शिक्षण असा विषय कुणी दुसरे शिकवत असे. परंतु हायस्कूलमधे तासागणिक शिक्षक बदलत असे.वर्ग-शिक्षक असे.तो हजेरी घेणे, प्रगतिपुस्तके तपासणे आणि महिन्यातून एकदा नंबर लावणे आदी कामे करीत असे.मला हा प्रकार नवीन होता.प्रत्येक चाळीस मिनीटांनी बेल वाजे.एखादे कंटाळवाण्या सरांचा तास संपला की बेलचा आवाज खूप मंजुळ वाटे. एम. ए. हायस्कूलची बेल इलेक्ट्रीकल होती. मंजुळ मुळीच नव्हती.झोंपलेल्या विद्यार्थ्यांना जागं करायलालावल्यासारखी वाजे.मधल्या सुट्टीच्या आधी आणि शाळेच्याशेवटच्या तासाला ती थोडी दीर्घ काळ वाजे.

दाभोळकर सर आमचे आठवीचे वर्ग-शिक्षक होते.पांढरी पँट पांढरा शर्ट आणि वर करड्या किंवा पिवळ्या रंगाचा कोट असा त्यांचा सर्वसाधारण वेष असे.ते बारीक म्हणतां येणार नाहीत पण सडपातळ होते.चेहरा लांबट पण मोठा होता.नजर तीक्ष्ण होती.आठवीत ते आम्हांला इंग्रजी व गणित हे विषय शिकवत.सर दोन्ही विषय उत्तम शिकवत.इंग्रजीची भिती मुलांच्या मनातून तसे न बोलतां काढून टाकीत.तसेच गणिताचे.गणित विषय इतका सोपा करून शिकवीत की मुलांना गणिताची भितीच मनांत राहू नये.हुशार मुलाला किती कळले, हे पहाण्यापेक्षा इतर मुलांना कितपत कळले, हे ते जाणून घेत.पांचवीपासून हायस्कूलमधे आलेल्या मुलांना इंग्रजी तीन वर्षे आधीच शिकायला मिळे.माझ्यासारख्या आठवीत प्रवेश घेणाऱ्याला इंग्रजी प्रथमपासून शिकायचे असे.दाभोळकर आमच्यासाठी वेगळा जास्तीचा तास शाळेच्या वेळेनंतर घेत.सहामाहीला प्रश्नपत्रिकाही वेगळी व सोप्पी काढत.सहामाही परीक्षेच्या वेळी मी सरांना विनंती केली की मला वेगळी सोप्पी प्रश्नपत्रिका न देता, नियमित द्यावी कारण माझा तेवढा अभ्यास झाला आहे.माझ्यावर विश्वास ठेऊन सरांनी मला तशी परवानगी दिली.सहामाहीच्या नियमित इंग्रजी परीक्षेत मला सर्वात जास्त मार्क मिळाले.कारण एवढेच होते की मी घरी रोज रात्री मोठ्याने छोटी छोटी इंग्रजी पुस्तके वाचत असे.माझे वडील ते ऐकत असत व मला न कळल्यास अर्थ समजावून सांगत.सहामाहीनंतर मला जास्तीच्या वर्गाला जावे लागले नाही.

दाभोळकर सर विद्यार्थ्यांमधे प्रिय होते.दाभोळकर सर कधी शिक्षा करत नसत.परंतु लक्ष नसणाऱ्या विद्यार्थ्याला खडूचा छोटा तुकडा फेकून अचूक मारत.ते आमचे पी.टी.चे तासही घेत.खरं तर मराठी आणि गुजराती अशा सर्वच मुलांसाठी पी.टी. शिकवायला पंडीत नांवाचे एक गुजराती शिक्षक होते.ते शिस्तीच्या नावावर मुलांना छळत असत.त्यामुळे बहुदा मराठी विभागाने दाभोळकरांनापी.टी.चे कामही दिले होते.दाभोळकर सर गरीब कुटुंबातले होते.त्यांची आई अंधेरीच्या बाजारांत भाज्या विकत असे.दाभोळकर एम. ए. हायस्कूलचेच माजी हुशार विद्यार्थी होते.नियतीच्या खेळाने त्यांना इथे शिक्षक बनवलं.असं म्हटलं जायचं की इंटरच्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेच्या वेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या विद्यार्थ्याने त्यांची कॉपी केली.सुपरवायजरने दोघांनाही पकडले आणि युनिव्हर्सिटीला रिपोर्ट केले.दोघांनाही तीन वर्षांसाठी ‘रस्टीकेट’ करण्यात आले.हुशार दाभोळकर सरांचे शिक्षण बंदच झाले.मग एम. ए. हायस्कूल आपल्या माजी विद्यार्थ्याच्या मदतीला आले.हायस्कूलने त्यांना शिक्षक म्हणून घेतले.त्यांच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला.त्यांना डॉक्टर व्हायचं होतं ते राहिलं.पुढे घाटे आणि मंत्री सरांबरोबर त्यांनी उपनगर शिक्षण मंडळ, विद्यानिधी संकुल यांच्या स्थापनेत भाग घेतला.सुरूवातीला त्यांना नववीच्या वरील वर्गाना शिकवतां येत नसे.परंतु त्यांनी टीचर्स डीप्लोमा केल्यानंतर ते सर्व वर्गाना शिकवू लागले.मी पहिली शिक्षकाची नोकरी केली त्या रात्र शाळेंत ते शिकवत असत.सर फार सिगारेटस ओढत.ते पंचेचाळीशीच्या आधीच हृदयक्रिया बंद पडून मरण पावले.त्यांची मुलगी शिकली.विद्यानिधीच्या प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका झाली.

दाभोळकर सरांच्या तासाला मुलांनी गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता.त्यांची सर्व वर्गावर नजर असे.छोटीशी गोष्टही त्यांच्या नजरेतून सुटत नसे.ते विनोदीही होते.मुलं आपापसांत एकमेकांना टोपण नावं देत, ती त्यांना ठाऊक असत.कधी तरी एखाद्याला गजा, बाळ्या अशीहांक मारून चकीत करीत.विद्यार्थ्यांना आपल्याबद्दल वाटणारा आदर तर कायम राहील पण आपुलकी, जवळीकही वाटेल असे ते वागत.त्यामुळें मुलांना त्यांची भिती वाटत नसे.आपल्या अडचणी सांगायला कठीण वाटत नसे.अभ्यासातल्याच नव्हे तर वैयक्तिकही.सर त्या अडचणी ऐकून घेत आणि शक्यअसल्यास मदत करत किंवा मार्गदर्शन करत.हा मुलांचा विश्वास संपादन करण्याच्या गुणाचा रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना जास्तफायदा झाला.फी भरण्यासंबंधी, वेळेवर येण्यासंबधी आणि इतर घरगुती अडचणींवर मात करायला सर धीर देत.एक आदरणीय शिक्षक किंवा गुरू म्हणून मला स्वतःला सरांबद्दल खूप आदर वाटे.त्यांचा सहकारी शिक्षक म्हणून काम करायला मला संधी मिळाली, हे माझं भाग्यच.

कुलकर्णी सर आठवी आणि नववीला हिंदी शिकवायचे.त्यांचे जास्त तास पांचवी ते सातवीच्या मुलांना होते.ते विद्यार्थ्यांमधे खूप अप्रिय होते.पुस्तकांतलं वाचून दाखवायचं, थोडं पाठ करून आलेलं बोलायचं, ही त्यांची शिकवण्याची पध्दत.मुलांवर त्यांचा मुळीच वचक नसे.मुलं आपापसांत बोलत.ते एवढ्या तेवढ्या कारणांवरून शिक्षा देत.वर्गाबाहेर काढत.(ही मात्र शिक्षा वाटत नसे.)खूप गृहपाठ देत.हिंदीसारख्या एसेस्सीला नसणाऱ्या विषयाचं मुलांना महत्त्व वाटत नसे.त्याचा एवढा गृहपाठ ही एक शिक्षाच असे.एका सुट्टीत एका वर्गाला त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत खूपच गृहपाठ लिहून घ्यायला लावला.लिहून झाल्यावर एका वात्रट मुलाने विचारले, “बस्स, एवढाच ?”सर रागाने काळे निळे झाले.मग त्याला म्हणाले, “तुला तो कमी वाटतो म्हणून तूं हिंदीचं संपूर्ण पुस्तकचं लिहून आण.”त्याचे नाव होतं किसन दळवी.किसन उत्तम खेळाडू होता.त्याने खिलाडू वृत्तीने शिक्षा मान्य केली.पण पुस्तक पूर्ण लिहिणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर अनेक वर्गबंधूंची मदत घेऊन त्याने दोन जाडजूड वह्या भरल्या.सुट्टी संपल्यावर त्याने साळसूदपणे पुस्तक लिहून काढल्याचं सांगून वह्या सादर केल्या.त्या वह्यामधलं वेगवेगळं हस्ताक्षर पाहून कुलकर्णी सरनी ओळखलं की ह्याने दुसऱ्यांची मदत घेतली आहे.त्यांनी अशा सर्व मुलांना उभं रहायला सांगितले.जवळजवळ संपूर्ण वर्गच उभा राहिला.मग त्यांनी सर्वांची प्रिन्सिपालकडे तक्रार केली.प्रिन्सिपालनी मुलांना समजावण्याचे काम घाटे सरांवर सोंपवलं.घाटे सरांनी मुलांच्या एकजुटीचं कौतुक केलं आणि तिचा गैरवापर करू नका म्हणून सांगितलं.खरी नाचक्की कुलकर्णी सरांचीच झाली.

कुलकर्णी सरांबद्दल बोलली जाणारी एक गोष्ट सांगावी कीं नाही या संभ्रमात मी आहे.म्हणून मी सांगतो आहे त्यांत कांही तथ्यअसेलच असं नाही अशा रायडरने सुरूवात करूनच ते लिहितो.कुलकर्णी सर खाजगी शिकवण्या घेत.अशा शिकवणीला जाणाऱ्या एका मुलाशी त्यांनी गैरवर्तन केले.त्याचा बोभाटा झाला.तपशील कोणालाच कधी कळला नाही.पण मुलांना आधीच त्यांच्याबद्दल आदर कमी असल्यामुळें, मुले स्वैरपणे कांहीही सांगू लागली.त्यांच्यापासून जपून रहायला सांगू लागली.आम्ही तेव्हां अकरावीत होतो.कुलकर्णी सरांचे टोपणनांव होते भाऊ.त्यामुळे मुलांनी “होमो”ना “भाऊ-भाऊ”हें सुटसुटीत नांव दिले.आजही आम्हां मित्रामधे अशा गोष्टीचा उल्लेख “ते भाऊ-भाऊ खेळतात.” असाच होतो.आता ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असला तरीही अपरिपक्वमुलाशी असे वर्तन गैरच मानले जाते.तेव्हां तर तो मोठाच डाग (स्टीग्मा) असे.आता ह्या मुलांमधल्या वदंता असतीलही.सरांनी नंतर लौकरच शाळा सोडली.पुढे त्यांनी काय केलं मला माहित नाही.

आठवीमधे मला पांचवीपासून इंग्रजी शाळेंत आलेले माझे बरेच सहाध्यायी पुन्हां भेटले. भालचंद्र उर्फ बी.आर. राजे, दिलीप राजे, विलास गुप्ते, पूर्णानंद चाचड, प्रभाकर तावडे, उमेश वाघ, हे सर्व पुन्हां बरोबर आले. अकरावीपर्यंत हेच माझे मित्र होते.अनिल प्रधान नांवाचा सहाध्यायी त्यावेळी वेसाव्याजवळील मछलीमार कँपमधून येत असे. नंतर त्याचे कुटुंब अंधेरीला रहायला आले.विलास गुप्ते, मी, उमेश वाघ आणि अनिल प्रधान हा आमचा छोटा गृप असे. इतर कांही मित्रही कधी कधी बरोबर असत. दुपारच्या सुट्टीत खाणे, खेळणे आणि शाळेंतून परत जातांना बरोबर जाणे होई.वर्गात आसपास बसत असू. पण तशी मैत्री सर्वाशी होती. ह्यांतील उमेश वाघ आणि अनिल प्रधान हे आजही माझ्या घनिष्ठ मित्रांच्या गृपमधे आहेत.ह्या लेखांत हायस्कूलच्या शिक्षकांची थोडीच माहिती राहू शकली. माझ्या स्टार शिक्षकांबद्दल अजून लिहायचेच आहे. ते आता पुढील भागांत.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..