नवीन लेखन...

एका कुटुंबाची करूण गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २८)

कुटुंबातल्या पहिल्या पांच भावापैकी दोन वेडे म्हणून घराबाहेरच राहिले. बहिण अर्धवेडी होऊन गेली. दोन मोठ्या भावांचे उशीरा सुरू झालेले संसार रखडत झाले. फक्त पाच नंबरच्या एका भावाचा संसार ठीक झाला. घरही त्यानेच सांभाळलं पण त्याचा अशक्त मुलगा विसाव्या वर्षीच गेला. इथपर्यंतची हकीकत पहिल्या भागात आली. आता इतर पांच भावंडांची कथा.

सातव्या नंबरच्या बहिणीचं नात्यातल्याच एका मुलावर प्रेम होतं. तो सधन होता. पण ताई-अण्णांचं त्या कुटुंबाशी थोडं वितुष्ट होतं. त्या दोघांच्या प्रेमाला त्यांनी विरोध केला. मग तिचं लग्न एका पत्रकाराशी झालं. तो कांही मोठ्या वर्तमानपत्रात नोकरीला नव्हता. नोकऱ्या बदलायला लागल्या. पण दोघांनी मुलांना संस्कार दिले. मुले मोठी होऊन छोटे छोटे व्यवसाय यशस्वीपणे करू लागले. ती मुलं सुट्टीत आजोळी येत पण आजोळी रहायची वेळ त्यांच्यावर आली नाही.

तिच्यानंतरचा भाऊही जेमतेम मॕट्रीक झाला. मुंबईत चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. पण कांही यश मिळालं नाही. एखाद दोन वर्षे त्याने अंधेरीची कोळशाची वखार सांभाळली. शेवटी त्या गावातच एक मामुली नोकरी त्याला मिळाली. नंतर त्याने गावातच कोळशाची वखार काढली. त्यावरच त्याने भागवलं. त्याचा विवाह एका दूरच्या गांवातल्या मुलीशी झाला. ती घराशी समरस झाली. त्यांना एक मुलगा झाला. त्याचा तोंडवळा थेट आजोबांसारखा होता. अण्णांचच नांव त्याला देण्यात आलं. आपण त्याला बाळ म्हणूया. बाळही त्या घरांत मोठा होऊ लागला.

मोठ्या भावाची एक मुलगी, दुसऱ्या भावाची बायको नोकरी करत असल्यामुळे त्यांचे दोन मुलगे, पांचव्या नंबरच्या भावाच्या दोन मुली आणि एक मुलगा (जो विसाव्या वर्षी गेला) सहाव्या नंबरच्या बहिणीचे दोन मुलगे, सातव्या बहिणीची रजेत येणारी मुलं आणि आठव्या नंबरचा मुलाचा एकुलता एक बाळ ह्या सर्वांना त्या कुटुंबाला सांभाळायचं होतं. ते काम केलं नऊ नंबरच्या मुलीने. कुणाची मावशी तर कुणाची आत्या. मुलांचे कपडे, शाळेचे गणवेश, दफ्तरं, मुलींच्या वेण्याफण्या, एक का दोन हजार कामं पण तिने ती हसतमुखाने केली. आपण तिला बेबी म्हणूया. बेबी दिसायला सुंदर. नीटनेटक्या रहाणीची तिला आवड. कधीच अवतारांत सापडणार नाही. टापटीपीने रहाणारी बेबी बऱ्यापैकी लांब केसांची एकच जाड वेणी घालायची. दारासमोरच्या छोट्या बागेतलं फूल त्यांत माळायची. अगदी नित्यनियमाने. एवढंच नाही तर घरी येणाऱ्या कुणाही मुलीच्या किंवा विवाहित स्त्रीच्या केसांतही एखादं छानसं फूल आणून खोवायची. तिच्या चेहऱ्यावर, तिच्या गोड बोलण्यात, तिच्या सहज वागण्यांत भरभरून प्रसन्नता असे. पांच नंबरच्या भावाने घर चालवलं ते बेबीच्या भरोशावर. स्वतः नीटनेटकी रहाणाऱ्या बेबीने सर्व भाचेकंपनीवर स्वतःची छाप पाडली. सर्व भाच्या टापटिपीने रहायला शिकल्या. दोन नंबरच्या भावाच्या दोन मुलांवर मात्र तिच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडला नाही किंवा ती जरा लौकरच तिच्यापासून दूर गेली.

बेबी गृहकृत्यदक्षही होती. तिच्या मोठ्या वहिनी तिला मदत करत. परंतु ठरवायचे काम तिचेच. तिच्याशिवाय त्यांचे गाडे अडायचे. अशा ह्या सुंदर आणि गृहिणीपदाला योग्य अशा मुलीचे लग्न होऊ नये ह्याचं काय कारण असेल ? तिला स्वतःच्या संसाराची हौस होती. विवाह करायचा होता. पण मोठ्या भावांना तिचं लग्न जुळवतां आलं नाही. किंबहुना त्यांनी कोणी खास प्रयत्नही केले नसावेत. वयाच्या सत्तरीपर्यंत ती अविवाहित राहिली. बेबीने सत्तरी गांठली आणि पांच नंबरच्या व आठ नंबरच्या भावाने साठी गाठली. बाकी सर्व पन्नाशीच्या आधीच गेली. तिने आपल्या भावांचे संसार आपलेच म्हणून सांभाळले. भाचे कंपनीला त्यांच्या आई-बाबांपेक्षा जास्त प्रेम तिच्याकडून मिळालं आणि त्यांनीही तिच्यावर तसंच प्रेम केलं. बाळ तिचा सर्वात लाडका. तो अभ्यासांतही हुशार होता. वर्गात पहिला येई. पुढे त्याने रसायनशास्त्रांत डॉक्टरेट मिळवली. तिला खूप अभिमान वाटला. तो एका मोठ्या नामांकित कंपनीत अधिकारी झाला. बाळने नोकरी लागल्यावर प्रथम घराचे रूप पालटले. ते जुने कौलारू घर काळोखे होते. माजघर, स्वैंपाकघर ह्यामधे पूर्ण काळोख असायचा. उदास वाटायचं. बाळने कांही कौलांच्या जागी छान कांचा बसवून घेतल्या. घर प्रकाशाने उजळलं. बेबीला धन्य वाटलं. तोपर्यंत तिने आपल्या भावांच्या सर्व मुलींचे विवाह लावून दिले. त्यांचे सुखाचे संसार सुरू झाले. त्या मुलींना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आपल्या मामेभावांकडे नुसता शब्द टाकला नाही तर त्यांना दूर मुंबईत कुलाब्याला त्यांच्याकडे घेऊन गेली. मोठ्या बहिणीचे मुलगेही चांगले शिकले. गल्फमधे चांगल्या कंपन्यांत त्यांना नोकऱ्या मिळाल्या. सर्व जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. ती सत्तरीतही तशीच दिसत होती. पण मग परमेश्वराला तिचा अवतार संपवण्याची आठवण झाली. तिला कर्करोग झाला. बाळचे वडील आणि बाळ. बाळची आई आणि पांच नंबरच्या भावाची बायको हेच आता घरांत होते. बाळने तिच्या शुश्रूषेचा सारा भार मनापासून स्वीकारला. तिच्या भाच्या आपापल्या संसारांत गुंतलेल्या होत्या. त्या क्वचितच भेटून जात. तिचा आजार बळावल्यावर बाळने रजा घेतली. सतत तिच्या उशापायथ्याशी बसून तिची सेवा केली. पण एक दिवस ती ज्योत विझली. एवढ्याजणांची तिने सेवा केली. संसार करूनही ती कोरडी राहिली. पण वेडी भावंड, एवढी मुलं, खालावलेली आर्थिक परिस्थिती कशानेही तिचं व्यक्तीमत्त्व झाकोळलं नाही. कशाबद्दलही एका शब्दाने तक्रार केली नाही. तिच्या मुखावर सदैव ताजेपणा आणि सात्त्विक प्रसन्नता राहिली, हे आश्चर्यचं नव्हे काय ? बाळने मात्र तिला पुत्रवत प्रेम दिले, हीच तिची कमाई. कर्मयोगाने खरंच मुक्ती मिळत असेल तर बेबीला नक्कीच मिळाली असेल.

तुम्ही म्हणत असाल अकरा भावंडांचा उल्लेख केला. आतापर्यंत तर फक्त नवांचीच गोष्ट आली. दहाव्या मुलाची आणि अकराव्या मुलीचीही गोष्ट सांगतो. प्रथम अकरा नंबरच्या मुलीची गोष्ट ऐका. ह्या सर्व भावंडांत प्रत्येकी सुमारे दीड वर्षाचेच अंतर होते. त्यामुळे ती बेबीपेक्षा फक्त तीनेक वर्षांनी लहान होती. शेंडेफळ म्हणून लाडावलेली होती. लहानपणी बेबीच्या मागे मागे असे. पण पुढे अण्णा-ताई गेले. ती घुमी व्हायला लागली. फारशी बोलत नसे. तिचेही लग्नाचे वय झाले होते. तिच्या मनांत काय चालले होते कुणास ठाऊक. बेबीशिवाय तिच्याकडे पहाणारे कुणीच नव्हते. ती डीप्रेशनमधे गेली असावी. ती वेडी झाली नाही.घराच्या पुढे फुलबाग होती तशी परसदारी अळू, केळी, इ. लावली होती. तिथेच विहीर होती. रहाट होता. त्या गावांत तेव्हां नळ नव्हते. विहीरीचचं पाणी वापरायचे. धाकटीने एक दिवस तरूणपणीच ती विहीर जवळ केली. कारण कुणालाच कळले नाही. नैराश्याच्या झटक्यात ते झालं असावं.

दहाव्या नंबरचा भाऊ एसस्सी पास झाला नाही. मग अंधेरीची कोळशाची वखार सांभाळण्याचं काम त्याच्याकडे आलं. त्या भय्याच्या मदतीने त्याने कांही काळ ती चालवली. पण त्याचं मन त्यांत रमेना. त्याला देवाच्या नांवाचा जप करावासा वाटू लागला. तो अंधेरीत न राहतां भय्यावर वखार सोपवून गावांत परत आला. मात्र घरी न राहतां देवळांतच राहू लागला. बरोबर एक वळकटी आणि कांही देवाची जपाची छोटी पुस्तकं. हळूहळू त्याचं वेड हे देवाचा ध्यास न रहाता मोठ्या दोन भावांपेक्षाही भारी वेड झालं. ना आंघोळ, ना कपडे धुणं. ना केस कापून घेणं. शेवटी पुजाऱ्यांनी देवळांतून त्याला हाकलून दिलं. मग तो पुन्हा घराच्या आश्रयाला आला.

घराला दोन पायऱ्या होत्या. बाहेर दोन जनावरांचा गोठा होता. हा आपली वळकटी आणि पोथ्या घेऊन आला व दारांतच राहू लागला. घरांत कधी गेला नाही. गोठ्याच्या खाली वळकटी पसरून झोपायचा. तो आला तेव्हा घरांत बेबी, बाळचे आई बाबा, बाळ आणि बाळची एक काकी होती. त्याला दोनवेळा जेवणाचं भरलेलं ताट आणि दोन वेळा चहा मिळायचाच. त्या घराने त्याला तसाही सांभाळला. त्याचा तसा कांही त्रास नसायचा. स्वतःशी कांही बडबडायचा. कधीतरी थोड्या जबरदस्तीने त्याचे केस कापणे, दाढी करणे भाग पडायचे. ह्यासाठी त्या भैय्याची मदत व्हायची.मग क्रमाक्रमाने प्रथम बेबी, बाळची काकी, बाळचे वडील आणि बाळची आई गेली. बाळ घरांत एकटा राहिला. घरांत बाळ आणि बाहेर वेडा काका. बाळने भैय्याला तिथेच रहायला बोलावलं. भैय्या त्यांचे जेवणही बनवू लागला. एके दिवशी तो काका गेला.

बाळबरोबर भैय्या रहात होता. पण बाळला आता त्या घरांत रहाणे अशक्य होऊ लागले. तो जन्मला तेव्हा घरी बरीच माणसं होती. आता तो अगदी एकटा राहिला होता. त्याने कंपनीकडे दिल्लीला बदली मागितली आणि ती त्याला मिळाली. तो तिथे असतांना आणि आतांही त्याच्या वडीलांचा मामेभाऊ त्याला लग्न कर म्हणून सांगू लागला. पण बाळला लग्नाचा विचार मानवेना. सात भावंडाचा तो एकमेव वारसा होता. पण त्याला वंश, घराणे, ह्या कल्पनांनी लग्नाचा मोह वाटत नव्हता. एका कुटुंबाचा ढासळणारा बुरूज त्याने पाहिला होता. सर्वच त्याला माहिती होते असे नाही पण बरेच ठाऊक होते. बाळची चाळीशी आता जवळ आली. दिल्लीला गेल्यापासून तर मामेकाका म्हणू लागला की आता तू लग्न करून दिल्लीतच रहा. त्या घरापासून लांब आहेस. पण बाळला शंका असावी की प्राॕब्लेम घरामुळे कि घराण्यामुळें ? कांही असो, नुसती मुलांची संख्या त्याकाळीही आनंदपर्यवासी झाली नाही. अर्थात अशीच दहा बारा मुले असणारी पण कर्तबगार मुले असणारी कुटुंबेही पूर्वी होतीच.

त्या घरांत आता तो भय्या रहातो. त्याचे कुटुंबही तिथे आले असावे. तो भय्या इमानदार होता. वखारीचे उत्पन्न वर्षानुवर्षे तो त्यांना आणून द्यायचा. घर त्याच्यावर सोपवून बाळ दिल्लीला गेला. बाळला आतां त्या घरांत परत यावं असं वाटत असेल ? त्या घराचं भाडे भरायचा प्रश्नच नाही कारण विनाभाडे फक्त देवांची पूजा करण्याच्या अटीवर ते त्याच्या आजोबांकडे आले आहे. त्यामुळे ते विकताही येत नाही कारण त्यांच्याकडे मालकी हक्कच नाही. कोणी म्हणत त्या देवांमुळेच त्या कुटुंबाची वाताहत झाली. सुरूवातीला देवांची पूजा व्यवस्थित होई. कुटुंबावरची संकटे वाढली तशी त्यांना शंका यायला लागली. मग घरांतली देवांची खोली दिवसातून दोनदाच उघडू लागले. एकदा सकाळी पूजेसाठी आणि एकदा संध्याकाळी उदबत्त्या लावण्यासाठी. इतरवेळी दार बंद करून ठेवत. पण फार कांही फरक पडला नाही. आता पूजाही भय्याच करत असेल. भय्याचे कुटुंब त्या घरांत सुखाने नांदेल ? घरांतून लग्न करून गेलेल्या मुलींचे, मोठ्या बहिणीचा अपवाद सोडून, संसार चांगले झाले, चाललेत. पण कुटुंबात बाळ एकटाच राहिला. अशी ही एका मोठ्या कुटुंबाची करूण गोष्ट. ह्याला कारण वास्तुदोष मानायचा ? की एकाच कुटुंबातले तीन मुलगे आणि दोन मुली मनोरूग्ण/वेडसर होतात, त्यांत कुटुंबाच्या वातावरणाचा दोष होता असे मानायचे ? की जनुकीय दोष मानायचा ? तुम्हाला कोणते कारण योग्य वाटते ?
आणि बाळने विवाह करावा की नाही ? तुम्ही काय सल्ला द्याल ?

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..