नवीन लेखन...

एक जागा अद्भुत बागा!

 

“वाळवंटात फुललेली बाग तुम्ही पाहिलीत का हो?” गाडी चालवता चालवता अचानक यशोधनने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच समजेना.

“तू वेडा आहेस की काय? वाळवंटात बाग, तीही फुललेली? छे, काहीतरीच प्रश्न!” अशीच काहीशी प्रतिक्रिया माझी होती! कारण वाळवंट म्हटले की डोळ्यासमोर येतो तो वाळूचा अथांग समुद्र, त्यावर उठणारी वाळूची वादळे, त्यामुळे तयार होणाऱ्या वाळूच्याच लाटा… क्वचित त्यात दिसणारी खुरटी, काटेरी टोकदार पानांची झुडुपं व कधीकधी दिसणारे ‘उंटावरचे शहाणे’. पण जेंव्हा ‘मिरॅकल गार्डन’ कडे यशोधनने गाडी वळवली तेंव्हा पाहिलेल्या आश्चर्याने दाही बोटे तोंडात गेली असे म्हटले तरी चालेल.

जेंव्हा हाच माझा मुलगा-यशोधन-पहिल्यांदा दुबईला जायला निघाला, तेंव्हा मी दुबईची अशीच काहीशी कल्पना केली होती. म्हणजे पूर्वी कधीतरी वाचलेली ‘अगदी नुसतेच वाळवंट व त्यात तुरळक घरे’ ही लहानपणची वाळवंटाची कल्पना मागे पडून आखाती देशातही उंच इमारती, सुखसोयीयुक्त घरे, दुकाने असतात पण बाकी सर्वत्र वाळू असे चित्र मनात रुजले होते. तिथल्या माती नसलेल्या वाळवंटात झाडे, फुलबागा वगैरे नसणारच याची खात्री होती. त्यामुळे सिंगापूर सारख्या फुलझाडांनी बहरलेल्या देशातून प्रथमच दुबईला जाताना विमानातून उत्तरेपर्यंत “बाईसाहेब आता सिंगापूरची हिरवाई, फुलझाडांची नयनरम्य आरास सगळे विसरा१५ दिवस” असे स्वत:लाच बजावत होते. दिवस नोव्हेंबरचे होते. उतरताना रात्र असल्याने खाली फक्त दिव्यांचा चकचकाट व समुद्राच्या बाजूने चमकणाऱ्या दिव्यांची रोषणाई एवढेच दिसले होते. पण दुसऱ्या दिवशी उठून पहाते तर चौपदरी रस्ता, त्याला कापणारा दुभाजक दिसला. त्यावर शिस्तीत दोनच्या रांगेत लावलेली छोटीछोटी झुडपे होती व त्यावर चक्क पिवळ्याधमक व लाल चॉकलेटी रंगाची फुले वाऱ्यावर डुलताना दिसत होती. त्यांच्या मधूनच थोड्या थोड्या अंतरावर खजुराची पुरुष-दीड पुरुष उंचीची झाडे आपल्या झावळ्या पसरून उभी होती. मुलाचे घर कॉर्निशवर (समुद्राच्या जमिनीत घुसलेल्या पट्ट्यावर) होते, त्यामुळे सूर्यप्रकाशात चमचमणारे पाणी, त्यावर मधूनच बोटींच्या येण्याजाण्याने उठणाऱ्या लाटा व मधूनच पटकन पाण्यापाशी सूर मारून मासा मटकवणारे समुद्रपक्षी निसर्गचित्रात भरच घालत होते व दुबई म्हणजे फक्त वाळवंट व त्यातील घरे या कल्पनेला सुरुंग लावत होते. जसजशा माझ्या दुबईभेटी वारंवार होऊ लागल्या तसतशा दुबईतल्या वाळवंटाच्या कल्पनाही बदलत गेल्या. वाळवंटात फुले लाऊन त्याची निगा किती काळजीपूर्वक घेतली जाते याची कल्पना येऊ लागली. रस्त्याचे डिव्हायडर, चौकातले राउंड अबाऊट किंवा फ्लाय ओव्हर्सचे उतार….काहीही सोडलं नव्हतं. उपलब्ध जागेचे आकर्षक लँडस्केपिंग करून त्यावर रंगीबेरंगी फुलझाडे, खजूराची झाडे लाऊन सगळीकडे मिनीबागांची रेलचेल करणे असा प्रकार जागोजागी पहायला मिळत होता. जितके पहावे तितके कमीच अशी परिस्थिती होती. बरं ही झाडे-फुलझाडे वाटेल तशी उगवलेली नव्हती हं! दगड विटा व वाळूचे उत्तम आखीव रेखीव आकार तयार करून, त्यात मऊ मुलायम लुसलुशीत हिरवळ लाऊन त्यात आकर्षक रंगसंगती करून लावलेली होती. फुलांची भरपूर विविधता पाहायला मिळाली. समुद्राच्या कडेकडेने असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी हिरव्यागार बागा, जॉगिंग ट्रॅक, दुबईची शोभा अधिकच वाढवत होती. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा वगैरे ठिकाणी प्रचंड हिमवर्षाव होतो तेथे बर्फाखाली गाडली गेलेली फुलझाडे व बागा हिवाळा संपला की परत फुलवाव्या लागतात. दुबईत हीच गोष्ट उन्हाळ्यात होते. ४-५ महिने तरी ४० च्या वर तपमान जात असेल. त्याकाळात दुभाजकांच्यावरच्या आणि छोट्या बागा उन्हाने अक्षरश: करपून जातात तरीही मोठ्या बागा किंवा फुलझाडे आग ओकणारे ऊन, पावसाचे अत्यल्प प्रमाण, वाळूची वादळे यांना दाद न देता जिवंत रहातात याचं श्रेय इथल्या यंत्रणांना आहे. खरंतर सभोवताली पाणीच पाणी दिसत असूनही “समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही” अशी अवस्था दुबईची! त्यामुळे इतक्या ठिकाणी फुलझाडे वाऱ्यावर डुलताहेत याचे खूप आश्चर्य वाटते. घराघरातून व कारखान्यांतून वाया जाणारे पाणी शुद्ध करून या बागांसाठी वापरले जाते. त्यासाठी ते ठिबक सिंचनाद्वारे किंवा जमिनीच्या अगदी वरच्या थराखालून मुद्दाम पसरलेल्या भोकाभोकांच्या नळ्यातून मुळापाशी पोहोचवले जाते व भर उन्हाळ्यातही त्यांना जिवंत ठेवते ही पद्धत खूपच कौतुकास्पद वाटली.

मिरॅकल गार्डन म्हणजे खरोखर मानवनिर्मीत चमत्कार म्हणावा लागेल. सुमारे ८०,००० चौ.फू. जागेवर बनवलेल्या आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये सर्वांसाठी खुल्या झालेल्या या बागेत पर्यटक्रांची नुसती रीघ लागलेली असते. अप्रतिम हा शब्द कमी पडावा अशी ही वाळवंटातील अफलातून करामत ‘दुबईलँड’ या भागात आहे. तेथे पोहोचण्यासाठी एमिरेट्स मॉलपासून बस असल्याने तेथे पोहोचणे सोपे जाते. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा ठिबक सिंचन प्रकाराने वापर करून सर्वत्र हिरवीगार हिरवळ निर्माण केली आहे. रंगीत फुलझाडे मात्र बऱ्याच प्रमाणात छोट्या छोट्या कुंड्यात वा भांड्यात लावलेली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात ती सुरक्षित जागी हलविणे सोपे जाते. ऊन्हाळा संपल्यानंतर ती बागेत परत मांडताना रचना बदलता येत असल्याने, पुनः भेट देणाऱ्या अभ्यागतांना दरवेळी नवीन रचना पाहण्याचा आनंद मिळतो.

या बागेत हिरवळीखेरीज छोटेछोटे तलाव, त्यात जलचर पक्षी, फ्लेमिंगो, कारंजी व सर्वत्र दिसणारी फुले मन वेडावून टाकतात. बागेत नुसत्या जमिनीवरच्या कुंड्याच आहेत असे मात्र नाही. मोठमोठ्या कमानीतील टोपल्यात बसून थंडगार वाऱ्यावर डोलणाऱ्या फुलांनी आमचे लक्ष वेधून घेतले. कमानींवर हिरव्यागार वेली, पुष्पलता मुद्दाम चढवल्या होत्या. त्यात मूळच्या वेताच्या कमानी लपून गेल्या होत्या. त्याखालून जाणारा स्वछ लालचुटुक पेव्हर ब्लॉकचा रस्ता अगदी चित्रातल्यासारखा दिसत होता. त्या कमानींखालून जाताना खूपच छान वाटले. पायाखाली लाल पायघड्या, बाजूला व डोक्यावर लोंबणाऱ्या वेली, वाऱ्यावर डुलणारी फुले, त्यांचा मंद सुगंध आणि मधूनच येणारी वाऱ्याची थंडगार झुळूक आपल्याला स्वप्ननगरीत घेऊन जातात.

कमानीशिवाय इतरही खूप वेगवेगळे आकार तयार करून त्यावर फुले व वेली चढवलेल्या आहेत. पिरॅमिड, फेरारी मोटार, चार डब्यांची आगगाडी, दिव्यांच्या शेड, आयफेल टॉवर, सफरचंद, कमळे, सूर्यफुले असे असंख्य आकार तयार करून फुलांनी सजवलेले दिसले. एक मोठी बोटही होती, जिच्या नांगराला फुलांच्या परड्या लोंबकाळत होत्या. एका तळ्याच्या काठावर बसून झाडांना झारीतून पाणी घालणाऱ्या मुलीचे शिल्पही फार आकर्षक आहे. तिच्या केसांच्या फुलांच्या बटा अलगद पाण्यात उतरल्या आहेत. त्यांच्या रंगाचे मिक्सिंग अतिशय सुंदर जमले आहे. तिचा गोरापान रंग, लाल पांढरी फुले व हिरवी गार पाने यांनी तयार झालेल्या फ्रॉकवर उठून दिसत होता. शेजारच्या तळ्यातल्या मुलीचे अश्रू फुलांच्या रूपाने पाण्यात उतरत होते. तिचा चेहरा, केस सगळ्याची रंगसंगती अतिशय सुंदर होती, ते दृश्यही खूप छान होते. परंतु इतक्या सुंदर बागेत बसून ही का बरे रडत असावी हा प्रश्न मनात सलतच राहिला.

एके ठिकाणी १३मी. व्यासाचे भले मोठे फुलांचे घड्याळ आहे. त्यातले पांढरे ठसठशीत आकडे गुलाबी लाल रंगाच्या फुलांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. हिरव्या पानांची व चॉकलेटी रंगांच्या फुलांची गोलाकार कड घड्याळाला उठाव देत होती. घड्याळाच्या मधोमध बसलेला छोटासा पक्षी दर १५ मिनिटांनी आवाज करून आपले अस्तित्व दाखवत होता.

अरेबियन डिझाईनची वैशिष्ट्यपूर्ण कमान आम्हाला तिकडे खेचत होती. तिकडे गेल्यावर वेगळीच गंमत पहायला मिळाली. बुर्ज खलिफाची प्रतिकृती, पालथे अर्धगोल(डोम) टपोऱ्या केशरी संत्र्यांनी व पिवळ्याधमक लिंबांनी सजलेले होते. हिरव्यागार वेलींच्या मधून ही पिवळीधमक लिंबे, संत्री, बागेची शोभा आणखीच वाढवत होती. सगळे बघता बघता वेळ कसा जातो कळतच नाही. परतीच्या वाटेवर माथेरानच्या टॉय ट्रेनची आठवण करून देणाऱ्या आगगाडीने तिच्यावरील फुलांच्या रंगांनी लक्ष वेधून घेतले. इंजिनाशेजारी उभा ड्रायव्हर हात उंचावून आपल्याला निरोप देतो व नुसती चक्कर मारायच्या उद्देशाने बागेत शिरलेले आपण उल्हसित मनाने पण थकलेल्या पायांनी बागेबाहेर पडतो. अर्धा दिवस तरी फुलांच्या राज्यात सहज संपतो. मन तृप्त झाल्यावर पोटपूजेची आठवण झाली. इथे खानपान सेवा असणार हे तर उघडच होते. वेगवेगळी दुकाने विविध पदार्थ तयार करून आपली भूक आणखीनच वाढवत होती. हा भागसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण व बागेची शोभा वाढवणाराच होता. लोकांना क्षुधाशांती करण्यासाठी आरामदायी वाटिका तयार केल्या आहेत. त्यामध्ये ऊन लागू नये म्हणून रंगीबेरंगी छत्र्या उलट्या टांगून त्यांच्या दांड्यांना फुलांच्या परड्या लटकवलेल्या होत्या. नुसत्या वासाने चाळवलेली भूक पोटभर भागवून तिथून बाहेर येतांना मागे वळून पहाण्याचा मोह काही आवरत नाही. ३० डिरहॅमचे तिकिट काढतानाची सुरुवातीची चुटपुट बागेत कधीच हरवून गेलेली असते. मन भरून प्रसन्नता, फुलांचा दरवळ, फुलपाखरांचे विविध रंग.. कितीही वर्णन केले तरी कमीच! ‘Largest Vertical Garden’ अशी गिनीज बुकमधे नोंद झालेले हे उद्यान म्हणजे वाळवंटातील खरोखर ‘मिरॅकल’ आहे यात संशय नाही.

बागेच्या विकसनातील ‘मिरॅकल गार्डन’ हा पहिला टप्पा होता. मार्च २०१५ मधे या बागेच्या शेजारील सुमारे ४०००स्क्वे.मी. च्या परिसरात दुसरी फेज आकाराला आली. ती म्हणजे ‘Dubai Butterfly Garden’. ‘मिरॅकल गार्डन’ व ‘बटरफ्लाय गार्डन’ शेजारी शेजारी असले तरी त्यांची प्रवेशद्वारे, प्रवेश शुल्क आणि रांगाही वेगवेगळ्या आहेत. दोन्ही बागांची थीम भिन्न आणि म्हणून अंतर्भागातील सुशोभीकरणाचे प्रकारही भिन्न. दाराशीच एक भलेमोठे फुलपाखरू आपल्या विविध रंगांनी पर्यटकांना आकर्षित करते. त्याला फोटो व सेल्फी काढून हैराण केल्यावरच आपण आत शिरतो. आतमध्ये जिकडे बघावे तिकडे रंगीबेरंगी फुलपाखरांचे कट आऊटस दिसतात. त्यावर विविध रंगी फुलांच्या कुंड्या ठेवून त्यात रंग भरले आहेत. रंगीत फुलांवर नाचणारी खरी फुलपाखरे अतिशय विलोभनीय दिसतात. जरा पुढे गेल्यावर विविध रंगी नऊ मोठे डोम दिसले. हे डोम म्हणजे फुलपाखरांसाठी तयार केलेली उत्तम घरेच म्हणाना. फुलपाखरांना २० ते ३० तपमान आवश्यक असते. दुबईत ते अशक्यच! त्यासाठी डोममध्ये २४ से. तपमान कायम ठेवले आहे. डोममधल्या बागेत आमचे स्वागत वेगवेगळ्या फुलपाखरांनी केले. खरे तर त्यांना आमच्या खांद्यावर डोक्यावर बसून मैत्री करायची होती. पण आपल्याला एकदम दचकायला होते ना! तिथे असणारे स्वयंसेवक आपल्याला फुलपाखराला किती हळुवारपणे हाताळणे आवश्यक आहे, त्यांना अजिबात इजा न करता कसे पकडायचे हे दाखवतात. हे पहिलेच बटरफ्लाय गार्डन असावे, जिथे अभ्यागत फुलपाखरे हाताळू शकतात. या डोममध्ये २४ देशातून आणलेली विविध प्रजातींची फुलपाखरे गोळा केली आहेत. छोटी मोठी फुलपाखरे आपल्याभोवती रुंजी घालतात. आपल्याला उगीचच आपण सौंदर्यवती असल्यासारखे वाटते. या फुलपाखरांसमवेत छोटी छोटी गोबरी मुलेही गमतीजमती करत असतात, आनंदाने चीत्कारतात. मोठी मजा येते.

या डोमच्या मधोमध फुलपाखराच्या आकाराचे म्युझियम आहे. या म्युझियमलाही फुलपाखरांच्या आकारात त्रिमिती पद्धतीने फुलांच्या वेगवेगळ्या डिझाइन्सने सुशोभित केले आहे. तेथे अनेक भिन्न भिन्न कीटक, फुलपाखरे, यांच्या जाती व प्रकार पाहाता येतात. शिवाय म्युझियममधील काचेच्या घरात फुलपाखरांचे जीवनचक्रही नीटपणे अभ्यासता येते. या विभागात बरीच मुले व त्यांना माहिती देणारे पालक यांची गर्दी होती. या बागेत तीन तळीही आहेत. या तळ्यात ‘कोई’ जातीचे मासे सोडलेले आहेत. दहा वेगवेगळ्या रंगांच्या या माशांचे पोहणे, मधेच पटकन पाण्याच्या पृष्ठभागावर येणे, सुळकन पाण्यात शिरणे, कधी गप्पा मारायला एकत्र येणे व भांडण झाल्यास तडकाफडकी पाठ फिरवून निघून जाणे.. सारेच विलोभनीय!

४०००चौ.मी.चे गोलाकार बटरफ्लाय गार्डन पहाता पहाता दमणूक तर होतेच पण तहान-भूकही लागते. अर्थातच त्याचीही सोय येथे आहेच. आणि घरी परतताना फुलपाखरांची आठवण सोबत नको का? त्यांना तर नेणे शक्य नाही, पण त्यांच्या प्रतिकृती तर आपण घेऊ शकतोच ना! फुलपाखरांची रंगीबेरंगी व वेगवेगळ्या आकारातली भिंतीवर लावावयाची चित्रे, फ्रीजवर लावण्यासाठीचे लोहचुंबक, की चेन्स, टी शर्ट, स्कार्फ वगैरे घेण्याचा मोह पाडणारे एक भेटवस्तूंचे दुकानही आहे. या बटरफ्लाय गार्डनचे तिकीट ५० दिरहॅम असूनही फुलपाखरांच्या आकर्षणामुळे तिथे भेट देणाऱ्यांची गर्दी खूप आहे.

‘मिरॅकल गार्डन’च्या तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे ‘हवे तेवढे पहा, हवे तेवढे तोडा व (पैसे देऊन) घेऊन जा’ या तत्वावर उभारण्यात येणाऱ्या फळभाजीच्या बागेचे, त्यातच असणाऱ्या रोलर कोस्टर, मेरी-गो-राऊंड वगैरे मुलांच्या करमणुकीच्या साधनांनी युक्त अश्या बागेचे कामही सुरू झाले आहे. ते लवकरच पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर आहे असे समजले.

या दोन्ही बागांचे वारा, वाळूची वावटळ व वाळूकणांपासून रक्षण करण्यासाठी अगदी सोपी युक्ती वापरलेली आढळते. मुख्य रस्त्यापासून दोन्ही बागांकडे येणाऱ्या छोट्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १०-१५ फूट उंचीची अगदी दाट झाडे लावली आहेत. या झाडांमुळे एका छानशा कॉरिडॉरमधून आपण जातो हे तर छान वाटतेच, पण जवळच मोठा रहदारीचा रस्ता असूनही वाहनांच्या आवाजाचा अजिबात त्रास होत नाही व बागेचे संरक्षणही उत्तमरीत्या होते… असेच आणखी एक दुबईतील ‘झाबील पार्क’चा स्वतंत्र भाग असणारे आगळे वेगळे सुंदर उद्यान World’s First Unique Themed Park म्हणून ज्याची नोंद झालेली आहे ते Dubai Glow Garden. नुकतेच २२डिसेंबर २०१५ ला त्याचे उद्घाटन झाले. रमादान पर्यंत ही बाग प्रेक्षकांचे मन रिझवणार आहे.

या वर्षीची थीम आहे: ‘केनियन सफारी, नेदरलँडची ट्युलिप व इतर मनमोहक फुले.’ येथे जगातील सुमारे १५० कलाकारांनी एकत्रित २००,००० तास काम करून व ३ कोटी दिरहॅम खर्च करून जवळपास ४० एकर जागेत ३२ वेगवेगळ्या रचना साकार केल्या आहेत. याखेरीज येथे लेझर फाउंटन शो., चकचकीत चंदेरी कपडे घातलेल्या कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स संध्याकाळच्या आल्हाददायी वातावरणाला अधिकच आनंददायी बनवतात. वापरून टाकून दिलेल्या सामानातून कला निर्माण होऊ शकते हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा खटाटोप! दिवसाच्या उजेडात बागेचे रंग कसे दिसतात हे पहायला आम्ही मुद्दाम जरा लवकरच बागेत प्रवेश केला होता. पटकन एक चक्कर मारून येऊ असे म्हणत आत शिरलेले आपण बघता बघता बागेतील रंगीबेरंगी प्राणी, झाडे, फुले, बदके यात रमून जातो. जबडा वासलेले व चीत्कार करणारे अनेक अक्राळविक्राळ डायनॉसॉर बघून आपण नकळत तिथून पळ काढतो. हे डायनॉसॉर खोटे आहेत हे माहिती असूनही आपण घाबरतो हे मात्र खरं! अगदी मुलांपेक्षा मूल होऊन आपण या जगात हरवून जातो. हे सगळे अनुभव बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे खूप मजा वाटली. बराच वेळ बागेत भटकून आम्ही दमलो होतो. तेवढ्यात पहाता पहाता दिवस मावळला व संध्याकाळच्या केशरी, लाल, पिवळ्या प्रकाशाने आकाश व्यापून टाकले. बघता बघता आकाश निळ्या काळ्या रंगाने झाकोळून गेले व अंधाराच्या पार्श्वभूमीवर बागेचे वेगळेच रूप दिसले. झाडांच्या अंगाखांद्यावर कुंपणाच्या कडेने लाखो छोटे मोठे रंगीबेरंगी एल ई डी दिवे लखलख करू लागले व आकाशातल्या चांदण्याच आपल्याला जमिनीवर उतरून वाट दाखवताहेत असा भास झाला. परत एकदा आम्ही बागेकडे वळलो व दिवसा बघितलेलीच बाग नव्याने पहायला सुरुवात केली.

अगदी दारातच आम्हाला दुबईची स्कायलाईन असणारी इमारतीची बाह्य रेषा दिसली. १४मी. उंचीच्या, बुर्ज खलिफाच्या निमुळत्या स्तंभाने आमचे लक्ष वेधून घेतले. त्याचे उंची-आकारमानाचे प्रमाण तर उत्तम जमले आहेच पण त्या आकारमानानुसार इतर इमारतींची बाह्य रेषाही उत्कृष्ट जमली आहे. या इमारतींच्या कडांवर लावलेले दिवे लांबूनसुद्धा खूप सुंदर दिसतात. या बुर्ज खलिफाची निर्मिती विविध औषधांच्या अंदाजे ३,३०,०००रिकाम्या बाटल्यांपासून केली आहे हे समजल्यावर या कृतीच्या निर्मात्याच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटली. बागेच्या आतल्या भागाकडे वळलो तो २-३ मोठ्या कृत्रिम झाडांच्या शेजारी एक बोलणारे झाड समोर आले. हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर हे पिवळसर केशरी झाड उठून दिसत होते. बुंध्याच्या वरच्या भागात डोळे, भुवया, पापण्यांसह प्रमाणबद्ध चेहरा साकारला होता. त्यावरच्या व खोडावरच्या चॉकलेटी रेषा त्याचे वाढलेले वय निर्देशित करीत होत्या. त्याच्या शरीरातून उजळून टाकणारा प्रकाश एक प्रकारचे समाधान व तृप्ती दाखवत होता. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या हालचाल करून येणाऱ्या जाणाऱ्यांची दखल घेत होत्या. आपल्या तोंडून निघालेली वाक्ये आश्चर्योद्वार पुन: त्याच्या तोंडून ऐकू येत होते. लहान मुलांबरोबरच आम्ही मोठी माणसेही त्याला हाय, हॅलो करत होतो. पिवळ्या व हिरव्या अर्धपारदर्शी रेशमी कापडांची बनवलेली ही झाडे अंधाराच्या पार्श्वभूमीमुळे व आतून प्रकाशमान होणाऱ्या उजेडामुळे उठून दिसत होती. हिरव्या झाडांची व पिवळ्या बोलणाऱ्या झाडांची उघड्या छत्रीसारखी पसरलेली पानेही उजळून निघाली होती. ही पानेही हिरव्या पिवळ्या कापडांच्या सांगाड्यावर लावलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची बनवलेली पाहून खूपच कौतुक वाटले.

बोलणाऱ्या झाडानंतर अचानक पाटी समोर आली…BEWARE OF DINOSAURS ! मघाशी आम्ही दिवसा ह्या भागात येऊन गेलो होतो त्यामुळे यावेळी थोडे शूरपणाने आत घुसलो. आता या भागात डायनॉसॉरचे ओरडणे व अंधूक प्रकाश यामुळे वातावरण थोडेसे भीतिदायक झाले होते. आम्ही पायवाटेने पुढे गेलो तर अंधारात काही हालचाल दिसली. ते काय असावे याचा विचार करतोय तोच आमच्यापासून ३-४ फूट अंतरावर हवेत काहीतरी आडवे फिरले. एक पाऊल मागे सरलो तेव्हा लक्षात आले की ती डायनोसॉरची भली लांब काटेरी शेपटी होती. ती मागे गेली अन् त्याचा वासलेला अक्राळ विक्राळ जबडा पुढे आला. त्याचे अणकुचीदार दात व लालभडक जीभ पाहून धडकीच भरली! त्याची मोठी गर्जना ऐकून तिथून पळालो खरे पण लगेच दुसऱ्याच्या तावडीत सापडलो. हा डायनॉसॉर तर सगळीकडे पुढे मागे फिरत, नाचत होता. कुंपणाबाहेर तोंड काढून मुलांच्या टोप्या, हातातला खाऊ खेळणी पकडण्याचे नाटक करीत होता. त्याचा आवाज ऐकताच पुढे झेपावणारी बच्चे कंपनी एकदम आईबाबांच्या मागे लपत होती. कोणी फोटो काढत असेल तर डायनॉसॉर मस्त पोझही देत होता. सगळे पाहून गंमत वाटत होती. एके ठिकाणी उभारलेला तंबू, शेकोटी, डायनॉसॉरने धडक मारून मोडतोड केलेली गाडी शेजारी उभी, असे दृश्य… खोटेखोटेच, पण त्या भागातून बाहेर पडल्यावर हायसे वाटले हे खरे! एकच ठिकाण पण दिवसा व रात्री कित्ती वेगळे दिसले!

पुढचा भाग केनियन सफारीचा होता. त्यामुळे छोटीशी झोपडी, एक दोन झाडे, जंगल, तळे व त्यातले प्रकाशमान असलेले ‘बिग फाईव्ह’. जिराफ, हरणे, झेब्रे तर होतेच, पण भले मोठे हत्ती, चित्ते, तळ्याकाठी पाणी प्यायला येणारे वाघ सिंह वगैरेही त्यांच्या योग्य आकारमानाप्रमाणे होते. त्यांचे रंग प्रकाशामुळे उठून दिसत होते. शिवाय झाडांवर फुले, माकडे, विविध पक्षी, तळ्याकाठी छोटे ससे तर तळ्यात बदके व कमळेही होती. एके ठिकाणी वनराज आपली राणी व दोन राजपुत्रांसह दिमाखात खडकावर विराजमान झाले होते. झोपडीजवळ मोठमोठ्या म्हशी चरत होत्या. झोपडीबाहेर २ गोंडस मुले खेळत होती व त्यांचे आईबाबा त्यांच्या लीला पाहून हसत होते. सगळेच खूप छान होते. जंगल सफारीचे पूर्ण दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे सरकलो.

पुढचे दृश्य अगदीच वेगळे होते. सिंगापूरला लँटर्न फेस्टिवलमध्ये बरेच प्राणी, फुले, झाडे आकाशकंदिलाच्या स्वरूपात पाहिले होते. पण इथे प्रथमच मुंग्यांची भली मोठी रांग बघितली. काळसर चॉकलेटी डोके, काळे डोळे, लाल पोट व पिवळे पाय अशा २-३ फूट उंचीच्या मुंग्यांची रांग समोर दिसत होती, तर काहींच्या पाठीवर साखरेचे कण. काही जणी फळे, मिठाईचे, पावाचे तुकडे नेत होत्या. सगळ्याजणी एका भल्यामोठ्या वारुळाकडे जात आहेत, वारुळाच्या भोकातून त्यांची छोटासा मुकुट घातलेली राणी मुंगी त्यांच्याकडे बघत आहे असा अप्रतिम देखावा… कितीही वेळ पाहिला तरी मन तृप्त होत नव्हते. सगळे दृश्य त्या ठिकाणी उभे राहून डोळ्यात साठवताना शेवटी पायाला मुंग्या आल्या तेव्हाच आम्ही पुढे सरकलो.

पुढे होता एका मोठ्या तळ्याचा देखावा. त्यात विहार करणारी बदके व हंस, फुललेली विविध रंगांची कमळे, कमलपत्रांवर उडी मारून बसलेले बेडूक, कमळांभोवती रुंजी घालणारे भुंगे व मधमाश्या….. जितकं वर्णन करावे तेवढं थोडंच. एव्हाना रात्र झाली होती. त्यामुळे सगळे जास्तच उजळून निघाले होते. तेवढ्यात लाईट व साउंडचा शो सुरू झाला. छान सुरेल संगीत व प्रकाश आणि सावल्यांचे खेळ मोठे मनोहर दिसत होते. इकडून तिकडे धावणाऱ्या उजेडाच्या झोतांनी काठावरची झाडे मधून मधून उजळून वेगवेगळे रंग दाखवत होती. २-३ झाडांवर विविध रंगांची फुले उमलली होती. एकंदर खूपच नेत्राकर्षक दृश्य होते ते. हा खेळ रंगात आला असतानाच तळ्यात उभारलेल्या स्टेजवर चंदेरी कपडे घातलेले नर्तक तालात पावले टाकत अवतरले. त्यांच्या नृत्याच्या हालचाली मनोवेधक होत्या. मधुर संगीत, उजळलेली बाग, तळ्यातील कमळे सगळेच आकर्षक !

शो संपताच परतीच्या वाटेला लागलो तो, समोर मशिदीची भलीमोठी पांढरी शुभ प्रतिकृती दिमाखात उभी दिसली. जवळ जाऊन पाहिले तर दुरून संगमरवरी वाटणाऱ्या शुभ भिंती प्रत्यक्षात पोर्सिलीनच्या टाकून दिलेल्या कप, बशा यांच्या बनवलेल्या होत्या. जवळ जवळ ९०००० असे तुकडे वापरले गेले आहेत यासाठी. तसेच बागेतील प्राणी, पक्षी, दृश्ये सर्व रीसायकल्ड सिल्कची बनवली आहेत आणि जवळ जवळ ४० लाख वीज वाचवणारे बल्ब वापरले आहेत. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर करा, वीज वाचवा, पर्यावरणाचा तोल सांभाळा असा जगभर प्रचार होत आहे, पण इतक्या मोठ्या बागेच्या रूपाने असा मनोरंजक संदेश देणारा उपक्रम मी प्रथमच पाहिला…..आणि तोही वाळवंटात!! ६० दिरहॅम तिकीट-बाहेर पडताना ‘फक्त ६० दिरहॅमच’ असे वाटून गेले. या कल्पक शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच!

या तीन बागा म्हणजे कलात्मकतेचा खरोखरीच उत्तम नमुना आहे. मुलांच्या खेळण्यांनी युक्त, फुलांची पखरण असणाऱ्या इतरही बऱ्याच बागा दुबईत फुलवलेल्या आहेत पण या तीन बागा जरा हटकेच आहेत!

-अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..