नवीन लेखन...

एका कुटुंबाची गोष्ट – भाग ३ (आठवणींची मिसळ २८ ब)

मी एका कुटुंबाची गोष्ट दोन भागांत पूर्वीच तुम्हांला सांगितली होती.
(७.१२.२०१७ आणि १४.१२.२०१७).
अकरा भावंडांची गोष्ट.
त्या घरांत कशी त्या कुटुंबाची वाढही झाली आणि त्यांना दैवाशी कसं झगडावं लागलं, हे ही सांगितलं होतं.
पण माझ्या कथेत कांही कच्चे दुवे राहिले होते.
माझ्याही मनांत कांही गोष्टींबद्दल संभ्रम होता.
पण मला ठाऊक असलेल्या माहितीच्या आधारावर मी ती कहाणी लिहिली होती.
कहाणीचा शेवट “”बाळने लग्न करावं कां ?”” ह्या प्रश्नावर झाला होता.
मी ही गोष्ट लिहिली आहे, ह्याची कांहीच कल्पना नसलेल्या, त्या कुटुंबातील दुसऱ्या नंबरच्या भावाच्या मुलीने, म्हणजेच माझ्या पुतणीने अथवा आत्तेभावाच्या मुलीने (बाळच्या चुलतबहिणीने) मला अलिकडेच माझं इतर लिखाण वाचून मी त्या कुटुंबावर गोष्ट लिहावी असं सुचवलं.
किती सुंदर योगायोग.
तिने जर मला असे सुचवलं नसतं तर माझ्या कथेतले कच्चे दुवे तसेच राहून गेले असते.
त्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीवर तो अन्याय झाला असता.
तिने मला असं लिहायला सुचवल्यावर मी प्रथम तिला आधीच लिहिलेले पहिले दोन भाग पाठवले आणि ते वाचून झाल्यावर तिच्याबरोबर खूप वेळ मेसेंजरवर गप्पा केल्या.
खूप नव्या गोष्टी माहित झाल्या.
कांही जुन्या गोष्टी सुस्पष्ट झाल्या.
आजची स्थिती कळली.
ती इतकी छान वाटली की ताबडतोब तिसरा भाग लिहिणं मला आवश्यक वाटू लागलं.
तिसरा भाग हा बव्हंशी तिसऱ्या पिढीबद्दलचाच आहे.
पण आपण दुसऱ्या पिढीशी सांगड घालत, त्या तिसऱ्या पिढीकडे पाहूया.
सर्वांत मोठ्या भावाबद्दल मी म्हटलं होत की तो स्टेशन ते गांव अशा बैलगाडीच्या फेऱ्या करत असे.
त्याचा विवाह खूपच उशीरा झाला.
नंतर त्याची पत्नी घर सोडून कायमची कोकणांत निघून गेली.
ते सुध्दा एकुलत्या एक मुलीला इथेच सोडून.
त्या मुलीबद्दल मी पुढे कांहीच लिहिलं नव्हतं.
त्याची पत्नी मुलीला सोडून नव्हती गेली तर बरोबर घेऊनच गेली होती.
पण आपल्या कुटुंबातील त्या मुलीची आबाळ होऊ नये, तिला शिकता यावं, ह्या उद्देशाने दोन नंबरच्या भावाच्या पत्नीने कोकणांत जाऊन त्या मुलीला परत आणले.
ती त्या घरांत परत आली.
ती शिकली, पदवीधर झाली.
तिला टेलिफोन कंपनीत नोकरी मिळाली.
योग्य वेळी तिचा विवाह झाला.
आता तिची मुलंही मोठी झाली आहेत.
दुसऱ्या नंबरच्या भावाबद्दल मी लिहिलं होतं की त्याची पत्नी सुशिक्षित होती आणि नोकरी करत होती.
ते खरंच आहे.
परंतु घरांतील एवढा गोतावळा सांभाळण्याचे कठीण काम निभावण्यासाठी तिने लौकरच नोकरी सोडून दिली.
त्या भावंडात अविवाहित राहिलेल्या बहिणीने, बेबीताईने एकटीने ते केले असे मी आधी म्हटले होते.
पण ह्या वहिनींनी तिला एकटीला ते शक्य नाही हे ओळखून नोकरी सोडून त्या घरी राहिल्या.
मी आधीच म्हटले होते की मोठ्या भावाची एक, दुसऱ्याची तीन, पांचव्याची तीन, बहिणीची तीन, धाकट्या भावाचा बाळ असं सगळ्या अकरा जणांना सांभाळायचं होतं.
वाढवायचं होतं.
त्यांना शिकवायचं होतं.
नंतर इतर दोन भावांचीही (नंबर पांच आणि आठ) लग्ने झाली.
ह्या वहिनींनी मुलांवर, विशेषतः मुलींवर खूप चांगले संस्कार केले.
त्यांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व ठसवले.
पांच आणि आठ नंबरच्या भावांची लग्ने झाल्यावरही बरीच वर्षे ते त्याच घरी रहात.
मग विवाहानंतर चौदा वर्षांनी गृहकलह टाळण्यासाठी त्या भावाने जवळच पण वेगळं बिऱ्हाड केलं.
पुढे त्यांच्या मोठ्या मुलीने आईवडिलांना सांभाळलं.
वडील, म्हणजे दोन नंबरचा भाऊ, तो साठीच्या आसपास गेला.
माझ्या मोठ्या आत्त्याचे त्याच्यावर खूप प्रेम होते.
तो दुसरीकडे रहायला गेल्यावर ती शब्दशः खचली.
तिला खरोखरीच चालतां येईना.
पूर्वी गरज म्हणून आणि आता नाईलाजाने चुलीपाशी एके ठिकाणी बसून राहू लागली.
दुसऱ्या नंबरच्या भावाची मुलगी मोठी.
ती पदवीधर झाली.
एका चांगल्या खाजगी कंपनीत तिने नोकरीही केली.
अजूनही करते आहे.
तिने आपल्या मुलांना शिकवलं.
मुलगी हुशार होती.
एम.बी.बी.एस. झाली.
आतां सध्या डाॕक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये नोकरी करते.
मुलीचं लग्न एका डर्म्याटाॕलाजीस्टशी झालंय.
तिची दुसरी मुलगी लौकरच मॕनेजमेंट पदवीधर होईल.
ही पुतणीच माझ्या संपर्कात आहे.
तिला आपल्या बाबांचा अभिमान आहे.
तिचे बाबा आणि सर्वांत मोठे भाऊ यांनी अल्पवयांत शाळा सोडून गवताच्या गाड्या हांकण्याचे काम सुरू केले, हे मी पूर्वीच सांगितले.
ती म्हणाली, एवढं मोठं घर मुख्यतः त्या दोघांच्या कमाईवरच चालत होते.
दोघेही मेहनती होते.
व्यसनांत अडकले नाहीत.
पैसे आणून आईकडे देत.
त्या दोघांच शिक्षण अर्धवट झालं, लग्न उशीरा झाली तरी दोघांनी घरासाठी खूप केलं.
ती त्याबद्दल अभिमानाने सांगते.
दोन नंबरच्या भावाचे दोन मुलगे मात्र पदवीधर झाले नाहीत.
त्याचा मोठा मुलगा एसएसस्सी पर्यंत शिकला.
नंतर रिक्षा चालवू लागला.
दुसरा भाऊ बी.ए.पर्यंत शिकला पण परीक्षा पास झाला नाही.
पण त्याला व्यापार उत्तम जमत होता.
त्याने ट्रान्सपोर्ट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रंगकाम इ. ची काँट्रॕक्टस् मिळवून, ती पूर्ण करून खूप पैसा कमावला.
तो त्याने शेअर्समधेही गुंतवला.
पैसे कमावले आणि वाढवले पण प्रकृतीकडे लक्ष दिले नाही.
दोघेही भाऊ लग्नानंतर वेगळे राहू लागले.
आईवडिलांची जबाबदारी त्यांनी घेतली नाही.
वडील लौकर गेले.
त्यामुळेही त्यांना शिक्षण सोडून काम शोधावं लागलं.
इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
पण त्यांची मुलं शिकताहेत.
धाकट्याचा मुलगा नामांकित संस्थेमधे एम.बी.ए. करतो आहे.
मोठ्याची मुलगी पदवीधर झाली.
बहिणींमधे मोठी होती, तीही थोडी विचित्र वागे व खंगून वारली.
असे मी म्हटले होते.
तिला दोन मुलगे होते.
ती लौकर गेल्यामुळे तिच्या दोन्ही मुलांना त्या घरांतील मंडळीनीच वाढवले व दोघे आता गल्फला आहेत, असे म्हटले होते.
खरं तर ते तीन भाऊ होते.
तिसरा आई वेडसर वागत असे तेव्हांच, तिच्या मृत्यूपूर्वी थोडा आधी तो झाला.
तिचे यजमान रिझर्व्ह बँकेत होते.
तिघेही मुलगे उत्तम शिकले.
एकाने दीर्घकाळ गल्फमधे नोकरी केली.
दोघे उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेतच स्थाईक झाले.
तिच्या पाठोपाठच्या बहिणीचे यजमान पत्रकार होते.
त्यांची मुले छोटे मोठे व्यवसाय करत असे मी म्हटले होते.
तिचा मुलगा मोठा असे यशस्वी व्यवसाय करी.
आजही तो करतो.
मुख्य म्हणजे ती बहिण आज ८५ वर्षांची आहे.
अकरा भावंडात फक्त तीच आज आहे.
मोठा मुलगाच तिची काळजी घेतो.
त्याच्या बहिणी पदवीधर झाल्या.
नोकरी करू लागल्या.
एकीची मुलगी आज एका कोविड वॉर्डची प्रमुख डॉक्टर आहे.
एकीची मुलगी डेंटीस्ट झाली आहे.
मुलाची मुलगी वकील झाली आहे.
पांचव्या नंबरच्या भावाचा मंदबुध्दी आणि अशक्त मुलगा विसाव्या वर्षी नाही तर सत्तावीसाव्या वर्षी गेला.
त्याला मंदबुध्दी असूनही शिकावेसे वाटे.
जिद्दीने तो बारावीही पास झाला होता.
त्याच्या दोघी बहिणी पदवीधर झाल्या.
एक सरकारी आस्थापनांत तर एक एका चांगल्या खाजगी कंपनीत नोकरी करते.
दोघींची मुलं शिकताहेत.
दुसऱ्या पिढीत कोणीही धड शिक्षण पूर्ण केलं नाही.
दोघे भाऊ जेमतेम एसएसस्सी झाले.
परंतू तिसरी आणि चौथी पिढी चांगली शिकली.
तिसऱ्या पिढीतल्या बहुतेकांच बालपण त्याच घरांत गेलं.
एका बहिणीची मुले तिथे रहातच.
दुसरीची सुट्ट्या मिळाल्या की तिथे पळत.
सर्व एकत्र रहात.
खूप खेळत.
संध्याकाळी सर्व बंद.
पांच नंबरच्या भावाची शिस्त कडक होती.
दिवेलागण झाली की प्रथम सर्वांनी ‘शुभं करोति’ आदी श्लोक म्हणायचे.
ते सर्व श्लोक एकत्र म्हणून झाले की सर्वांनी परवचा म्हणजे तीसपर्यंत पाढे म्हणायचे.
मग गृहपाठ पूर्ण करायचा.
ह्या शिस्तीचा जसा उपयोग झाला असेल, तसाच त्यांना बेबीच्या प्रेमळ वागण्याचा परिणामही होता आणि दोन नंबरच्या वहिनींच्या संस्कारांचा.
सर्वांनी दुसऱ्या पिढीचं अपयश धुवून काढलं.
तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या.
मुलांमध्ये बाळ द्विपदवीधर झाला.
पी.एच.डीही केली त्याने.
आजी १९८०मध्ये गेली.
तेव्हां सर्वांत मोठी नात तेवीस-चोव्वीस वर्षांची होती.
आजी सर्व नातवंडांवर खूप माया करी.
घरांतील ओढघस्तीच्या परिस्थितीची त्यांना जाणीव होऊ देत नसे.
सर्वांचे लाड करी.
त्यामुळे मायाळू आजीची आठवण आजही ही मुले काढत असतात.
हे सर्व मला सांगून ती म्हणाली, “”पण सबंध घर रिकामं झालं ह्याचं दुःख वाटतं.””
बाळ दुसरीकडे रहायला गेल्यावर आता तिथे कुणीच रहात नाही.
भैय्या सुध्दा रहात नाही.
घर आता बंद आहे.
त्या भैय्याचा मुलगा अंधेरीतील कोळशाची वखार अजूनही सांभाळतो व ठराविक हिस्सा बाळकडे देतो.
बाळ सर्वांत लहान आणि सर्वच भावंडांचा अतिशय लाडका.
त्यामुळे त्याने लग्न करावं असं सर्वच बहिणींना वाटतं.
त्या वंशातले दोघेच मुलगे आहेत.
तिला वाटतं की आपल्या वडिलांचा वंश चालू रहावा.
तिच्या भावाचा शिकत असलेला मुलगा आणि बाळ हेच दोघे आहेत.
पण बाळ त्यांच ऐकत नाही.
लग्नाला नाहीच म्हणतो.
मला मात्र वंश वगैरेची चिंता आता एकविसाव्या शतकांत योग्य वाटत नाही.
“”मुलगी शिकली, प्रगती झाली.””
हे वचन सर्व बहिणींनी सिध्द केले.
तिसऱ्या पिढीतल्या सगळ्या मुली पदवीधर झाल्या.
त्यांनी नोकऱ्या केल्या.
सगळे मुलगे नाही शिकले.
मुलींनी दुसऱ्या घरांत जाऊन त्या कुटुंबांच्या आधार बनल्या.
आणखी काय हवं ?
दुसऱ्या भागापर्यंत करूण वाटणारी गोष्ट, ह्या मुलींच्या मुलांची व मुलींच्या उत्कर्षाची माहिती मिळाल्याने ती गोष्ट आता सुखान्त झालेली पाहून मला खूप आनंद झाला.
आणि तो तुमच्याशी वाटून घ्यावा म्हणजे दुणावेल असेही वाटले.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..