नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद – भाग २

त्यांच खरं नांव नरेंद्रनाथ दत्त. त्यांच्या वडीलांच नाव विश्वनाथ आणि आईच नांव होतं भुवनेश्वरी देवी. त्यांचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते. ते थोडे उदारमतवादी आणि बुध्दीप्रामाण्यवादीही होते. तर विवेकानंदांची आई ही अत्यंत धार्मिक होती. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून तिने काशीच्या विश्वेश्वराला सांकडे घातले होते. अशीही आख्यायिका आहे की भगवान शंकरानी तिच्या स्वप्नात येऊन सांगितले होते की ते स्वतः तिच्या पोटी जन्म घेणार आहेत. साधारणपणे हिंदू असं मानतात की अनाचार माजला की सज्जनांच्या संरक्षणासाठी विष्णू अवतार घेतो. परंतू ह्या कलियुगातला अनाचार, भ्रष्टाचार संपवायला एकटा विष्णू कमी पडेल असं वाटून सदाशिवानेही अवतार घ्यायचे ठरवले असावे. जर हे खरे मानले तर त्याने पुन्हां अवतार घेण्याचीही वेळ आज येऊन ठेपली आहे, असंच म्हणावं लागेल. स्वामीजींच्या अवतारांत येऊन ते आपल्याला जागे करून गेले पण आपण म्हणजे संपूर्ण मानव समाज जागा होणार नसेल तर शंकराला अवतार घेऊन तांडव करावं लागेल, अशी चिन्हे आहेत. हे थोडसं विषयांतर झालं, असं आपल्याला वाटेल पण अवघ्या चाळीस वर्षांत त्यानी केलेल्या कार्याचा आढावा घेतांना आपल्याला नक्कीच याची जाणीव होईल.

विवेकानंंदांच्या जन्मानंतरचा काळ हा बंगालच्या परिवर्तनाचा काळ होता. सिराजउद्दौलाचा पराभव करून प्लासीची लढाई जिंकून ब्रिटिशांनी प्रथम बंगालमधे हातपाय पसरले होते. ब्रिटीश ईंडीयाची पहिली राजधानी कलकत्ता होती. व्यापार-उदीमाला बहर येत होता. सरकार आणि परकीय कंपन्यांना कारकून हवे होते. उच्च वर्णीय बंगाली इंग्रजी शिकत होते व त्यांनी वेषही बदलला होता. इंग्रजी शिक्षणाचं महत्त्व जाणून ईश्वरचंद्र विद्यासागरांनी बंगालमधे शिक्षणाचा वसा घेतला होता. अगदी स्त्रीशिक्षणाचाही प्रयत्न चालवला होता. ईश्वरचंद्रांनी इंग्रजी विद्येचा प्रसार केला याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी स्वाभिमान सोडला होता. त्यांना पाश्चात्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचं महत्त्व कळलं होतं. स्वकीयांच अज्ञान दूर करण्याची निकड त्यांना जाणवली होती. त्यांच्या देशप्रेमाचं उदाहरण म्हणून आणि त्या काळची समाजाची, विशेषतः ब्रिटीश व भारतीय ह्यांच्यातील तत्कालीन संबंधाची ओळख करून देण्यासाठी थोडक्यांत हे उदाहरण पहा.

ईश्वरचंद्र ज्या महाविद्यालयात शिकवत असत तिथे जवळच दुसरे सरकारी महाविद्यालय होते. एकदा दोन्ही महाविद्यालयांचा कांही एकत्रित कार्यक्रम करण्यासंबंधी शिक्षण खात्याकडून सूचना आली होती. तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधात त्या कॉलेजमधील एका ब्रिटीश प्रोफेसरला भेटायला ते गेले. ते जेव्हां आंत गेले तेव्हां तो ब्रिटीश प्रोफेसर टेबलावर बूटासकट पाय ठेऊन बसला होता. ईश्वरचंद्र आल्यानंतर पाय तसेच ठेऊन त्याने त्यांना बसायला सांगितले. ईश्वरचंद्र शांतपणे बसले व आपले काम सांगून निघून आले. दुसऱ्या वेळी रितीप्रमाणे तो ब्रिटीश प्रोफेसर त्यांच्या भेटीसाठी आला. तो आंत आला तेव्हां ईश्वरचंद्रही बुटासकट पाय टेबलावर ठेऊन बसले होते. त्याच्या अंगाचा तीळपापड झाला. तो बसला नाही व त्याने त्याबद्दल ब्रिटीश शिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी झाल्या प्रकाराबद्दल पत्र लिहून ईश्वरचंद्रांकडे विचारणा केली. ईश्वरचंद्रांनी लिहिले की ते त्या ब्रिटीश प्रोफेसरला भेटायला गेले असतांना त्यांने असेच पाय वर ठेवले होते. तुम्ही ब्रिटीश वागण्याच्या शिष्टाचार पाळण्याबद्दल दक्ष असतां. मला वाटले कुणाच्या स्वागतासाठी बुटासकट पाय टेबलावर ठेऊन बसणे हाही तुमच्या शिष्टाचाराचाच एक भाग असावा.म्हणून प्रोफेसरांच्या स्वागतासाठी तसाच बसलो. ईश्वरचंद्राचं “जशासं तसं” उत्तर वाचून ब्रिटीश शिक्षणाधिकाऱ्याचीही करमणूक झाली आणि त्याने त्या ब्रिटीश प्रोफेसरला योग्य समज दिली. या उदाहरणावरून लक्षात येईल की कांही थोडे उदारमतवादी ब्रिटीश भारतीयांबद्दल सहानुभूती बाळगत असले तरी बहुसंख्य ब्रिटीश भारतीयांना आपले गुलामच समजत. सहानुभूती असो की तिरस्कार, दोन्ही एकाच दृष्टीकोनांतून उद्भवतात. आपण जेव्हां दुसऱ्याला कमी लेखतो तेव्हांच आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती, दया किंवा घृणा वाटते.

बंगालच्या या परिवर्तनासंबंधी दुसरी गोष्ट मला आठवतेय. ती थोडी वेगळी आहे. लोकमान्य टिळकांनी कलकत्त्याला भेट दिली, तेव्हां तिथल्या स्थानीय पुढाऱ्यांशी चर्चा करताना ते म्हणाले होते की आपली चळवळ जोरांत वाढवण्यासाठी आपल्यापुढे आदर्श हवा. तुम्ही बंगालच्या इतिहासांतील एखाद्या वीराचा, महान राजाचा आदर्श लोकांपुढे मांडला पाहिजे. कलकत्त्याचे पुढारी बुचकळ्यांत पडले. कारण बंगालच्या इतिहासात चंद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्षवर्धन, अशोक, पृथ्वीराज चौहाण, राणा प्रताप आणि छ. शिवाजी महाराज यांच्यासारखा नांव घेण्यासारखा थोर पुरूष झालाच नव्हता. लोकमान्यांनी त्यांनाही छ. शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवावा असे सुचवले पण ते त्यांना मान्य होणे कठीण होते. शिवाजीराजांना राष्ट्रीय नेता मानलं तरी बंगालचा आदर्श म्हणून बंगाल्यांसमोर ठेवणं शक्य नव्हतं. रघूजी भोसल्यांच्या स्वाऱ्यांनी बंगाली जनता भयभीत होत असे. रघूजी कधीही कलकत्त्यापर्यंत पोंचले नाहीत. परंतु ते कलकत्त्यावर चालून येणार या भीतीने कलकत्त्याभवती खणायला गेलेल्या खंदकाचे अवशेष आजही दिसतात. १८व्या शतकातल्या बंगालला एकही आदर्श दिसत नव्हता. त्याच बंगालने राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, बिपीनचंद्र पाल, रासबिहारी घोष, योगी अरविंद, रविंद्रनाथ टागोर, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, सुभाषचंद्र बोस आणि या सर्वांवर कडी करणारा आदर्श स्वामी विवेकानंदांच्या रूपांत संपूर्ण देशाला दिला या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्रचे शिक्षण सुरू झाले. अर्थातच पाश्चात्य वळणाचं अत्याधुनिक शिक्षण ते घेत होते. त्यांच्या आईचे धार्मिक संस्कार त्यांच्यावर होते. त्यांना सतत भटकंती करत रहाणाऱ्या साधु-फकीरांबद्दल अतिशय कुतुहल होतं. परंतु वडीलांमुळे व इंग्रजी शिक्षणाने ते प्रागतीक व बुध्दीप्रामाण्यवादी बनले. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करण्यात त्यांना रस होता. त्यांच वाचन अफाट होतं. साहाजिकच परमेश्वर, त्याचं अस्तित्व याविषयी त्यांना प्रश्न पडू लागले. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांना पोथ्या-पुस्तकांत मिळेनात. त्यांना एकच ध्यास लागला होता. देवाला प्रत्यक्ष पहातां येईल कां ? अनुभवतां येईल कां ? हा विषय, हा प्रश्न ते प्रत्येकाकडे काढत. पण समाधानकारक उत्तर कोणाकडेच नसे. एक दिवस वर्गात एक ब्रिटीश प्रोफेसर वर्गात वर्डस्वर्थची कविता शिकवत होते. त्यांत Trance म्हणजे तंद्रा, भाव समाधीचा उल्लेख होता. प्रोफेसरनी आपल्या परीने तो अर्थ समजाविण्याचा प्रयत्न केला. पण भावसमाधी वेगळी आणि केवळ तंद्री लागणं वेगळं. तंद्री लागलेली कळते. मग अर्थ सांगता सांगता प्रोफेसर विद्यार्थ्यांना म्हणाले, “तुम्हांला जर भावसमाधीविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर कलकत्त्याच्या बाहेर एक साधु रहातो. तो भावसमाधीबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतो असे म्हणतात. तिथे तुम्हांला Trance अनुभवता येऊ शकेल.” प्रोफेसरांचे हे बोलणे ऐकताक्षणीच नरेंद्रने त्या साधुकडे जायचे ठरवले व लागलीच कांही मित्रांना बरोबर घेऊन नरेंद्र त्या साधुकडे म्हणजेच रामकृष्ण परमहंसांकडे गेला. कांही आख्यायिकांप्रमाणे तो त्यांच्यासमोर येताच “अरे नरेंद्र, ये, मी तुझी वाटच पहात होतो,” असे उद्गार रामकृष्ण परमहंसानी काढल्याचा उल्लेख आहे. पण बहुदा त्या आख्यायिकाच असाव्यात. मात्र नरेंद्र पहिल्याच भेटीत त्यांच्याकडे आकर्षित झाला, हे निश्चित. तो आपले परमेश्वराबद्दलचे, जीवनाबद्दलचे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे वारंवार जाऊ लागला. त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. त्या उत्तरांनी त्याचे पूर्ण समाधान होत नसे पण ती उत्तरं खोडून काढणंही त्याला अशक्य होई. रामकृष्णांचा सर्व भर अद्वैतावर होता. ते देवीची पूजा करत. देवी त्यांच्याशी बोलत असे अशी समजूत आहे. पण त्यांच्या लेखी परमेश्वर सर्वत्र होता. एकदा नरेंद्रने त्यांना विनंती केली की त्यांना दीर्घकालीन समाधीचा अनुभव द्यावा. त्यावर रामकृष्ण म्हणाले, “अरे काय तुझं मन इतकं कोतं आहे की उघड्या डोळ्यांनी तू त्या अलौकिक रूपाला सर्वत्र पाहू शकत नाहीस ? तुझ्या कामांत, तुझ्या लोकांशी येणाऱ्या संबंधात तुला तोच समाधीचा आनंद मिळू शकत नाही ?”

पुढे नरेंद्रचं शिक्षण पूर्ण झालं. परंतु लौकरच त्याच्या पित्याचा मृत्यू झाला. नरेंद्रला आईच्या व भावंडांच्या हालआपेष्टा पाहवेनात. दुसऱ्या बाजूला त्यांना वेगळ्याच गोष्टी साद घालत होत्या. अशाच द्विधा अवस्थेत नरेंद्र रागारागाने परमहंसाना म्हणाला, “देवी तुमच्याशी बोलते तर तिच्याकडे माझ्या आई-भावंडांसाठी कांही मागा ना ! त्यांनी सुखी व्हावं असं कांही मागा ना !” परमहंस शांतपणे म्हणाले, “तूच माग मागायचे ते. जा, आंत एकटाच जा आणि माग.” जवळजवळ ढकलूनच त्याला आंत पाठवलं. नरेंद्र देवीसमोर उभा राहिला आणि त्याला खरोखरीच असे जाणवू लागले की देवी काय हवं ते माग म्हणतेय. आणि ज्या क्षणी देवीच ते रूप त्याला जाणवलं त्याच क्षणी तो ऐहिक सुख मागायलाच विसरला. ज्ञान, भक्ती, वैराग्य यांवाचून मागण्याजोगं कांही त्याला कांही आठवेनाच. शेवटी तो तसाच बाहेर आला. रामकृष्ण परमहंसानी “अरे, आई भावंडासाठी कांही न मागताच कसा परत आलास ?” असे म्हणून परत त्याला आत पाठवले. पुन्हां नरेंद्रला तोच अनुभव आला. असं वारंवार झाल्यावर नरेंद्रला आपल्याला काय हवंय याची जाणीव झाली आणि ऐहिक संसाराची ओढ त्याला राहिली नाही. पुढे रामकृष्ण आजारी पडले. त्यांच्या त्या दुर्धर आजारांत दोघे खूप जवळ आले. महेंद्रलाल सरकार हे त्यांचे डाॕक्टर नास्तिक होते. देव न मानणारे होते. पण रामकृष्णांना वांचवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना घशाचा कॕन्सर होता म्हणून बोलायला मनाई केली. रामकृष्णांनी ती कधीच मानली नाही. शेवटी मृत्यूसमयी त्यांनी आपल्या सर्व भक्तांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी नरेंद्रवर सोंपवली. तेव्हाच त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली.

नरेंद्रला आता त्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागला. धार्मिक आचरणाबरोबरच देशवासीयांची सेवा करायची ओढ त्याला लागली. परंतु त्याने विचार केला की ह्या कामासाठी प्रथम आपल्याला हा संपूर्ण देश आणि देशांतील जनता ह्यांची ओळख करून घेतली पाहिजे. त्यांनी संन्यास घेतला आणि भगवी वस्त्रे परिधान केली. हातांत कमंडलु आणि दंड घेतला. ते पायी पायी भारत भ्रमणाला निघाले. ते परिव्राजक झाले. त्यांनी पांच वर्षे भारत उभा आडवा पिंजून काढला. जिथे जिथे कोणत्याही धर्माचा अभ्यास होत होता त्या स्थळांना भेटी दिल्या. देशांतली धार्मिक विविधता, धार्मिक रिवाजांतली विविधता त्यांनी समजून घेतली. जनतेतलं दारिद्रय आणि हालअपेष्टा पाहून त्यांच्या हृदयांत अनुकंपा वाढली. प्रवासांत त्यांनीही अनेक हालअपेष्टा सोसल्या. मान अपमान सोसले. भिक्षा मागून त्यांनी उदरनिर्वाह केला. ते सर्व जाती धर्माच्या लोकांत मिसळले. त्यांच्याबरोबर राहिले. वाराणसी, अयोध्या, लखनौ, आग्रा, वृंदावन, हाथरस, ऋषिकेष, बद्रीनाथ, अलाहाबाद, आणि गाझीपूर येथे अनेक धार्मिक व्यक्तींना भेटले. उत्तरेतला १८७८ ते १८८० हा काळ होता तो. १८८० पासून पुढील भारतभ्रमण सुरू झालं. त्यांत ते अलमोडा, नैनिताल, श्रीनगर, डेहराडून, हरिद्वार इ. ठिकाणांना आणि हिमालयालाही भेट दिली. तिथून ते मीरतला आले. ह्या प्रवासांत त्यांचे गुरूबंधु बरोबर होते. नंतर ते एकटेच दिल्लीला गेले. तिथून अलवार, राजपुताना, जयपूर, अजमेर (दर्गा) इथे गेले. राजपुतान्यांत अजितसिंग ह्या खेत्रीच्या महाराजांशी त्यांची ओळख झाली. त्यांच्या दरबारच्या पंडीतांकडून त्यांनी पाणिनीची सूत्रे शिकून घेतली. तिथे अडीच महिने राहून ते गुजरात व महाराष्ट्राकडे वळले. अहमदाबाद, वाधवा, लींबडी येथे त्यांनी भेटी दिल्या. अहमदाबादच्या मुक्कामांत त्यांनी जैन व मुस्लीम धर्माचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. जुनागडला ते दिवाण हरिदास देसाईंकडे राहिले. तसेंच त्यांनी गिरनार, कच्छ, पोरबंदर, द्वारका, पलिताना, नडीयाद इथेही अनेकांची भेट घेतली. नियम मोडून पोरबंदरला ८-९ महिने मुक्काम करून संस्थानांतील पंडीतांकडून वेद समजून घेतले.

नंतर ते पुणे, खांडवा, इंदूर आणि काठीयावाडला गेले. काठीयावाडमधे प्रथम त्यांनी सर्वधर्मपरिषदेबद्दल ऐकलं. खांडव्याहून ते मुंबईला गेले. मुंबईहून पुण्याला जाताना त्यांची व लोकमान्य टिळकांची भेट झाली. पुण्यांत टिळकांकडे कांही काळ राहून ते बेळगांवला व पुढे वेंगुर्ला, पणजी व मडगांवला गेले. तिथे राहून त्यांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला. मग ते बंगलोरला गेले. तिथून म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना कोंचीच्या महाराजांकडे रवाना केले. त्रिचूर, एर्नाकुलम, त्रिवेंद्रम, निगरकोईल असा प्रवास करत ते कन्याकुमारीला पोंचले. तिथे त्या सुप्रसिध्द खडकावर त्यांनी तीन दिवस ध्यान केले व त्यांना आसेतुहिमाचल एकत्रित भारताचं दृष्य दिसलं. ते म्हणतात,

“Sitting on the last bit of rock — I hit upon a plan.’ We are so many sanyasis wandering about and teaching the people metaphysics – it is all madness. Did not our Gurudev say, ‘An empty stomach is no good for religion ?” We as a nation have lost our individuality and that is the cause of mischief in India. We have to raise the masses.” कन्याकुमारीहून ते मदुराईमार्गे मद्रासला आले. रामेश्वर आणि पांदेचरीला त्यांनी भेट दिली. इथे त्यांना त्यांचे निष्ठावंत भक्त भेटले व त्यांनी स्वामीजींना अमेरीकेतील सर्वधर्मपरीषदेला पाठवण्यासाठी फंड गोळा करून मदत करायचे ठरवले. त्यांच्याबरोबर मैसूर, रामनाड, खेत्री व इतर राजांनी त्यांना मदत दिली. ३१ मे १८९३ला त्यांनी शिकागोला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.अशाप्रकारे त्यांनी समुद्रबंदी मोडली. त्यांचा ह्याला विरोध होताच. या अशा प्रकारच्या व अस्पृश्यतेच्या मूर्ख कल्पनांनीच आपला देश मागे राहून दास झाला आहे, हे त्यांचे मत होते व ते त्यांनी अखेरपर्यंत ठांसून मांडले. कांही धर्ममार्तंड त्यांच्या संन्यासावरही टीका करत आणि त्यांना संन्यास घेण्याचा अधिकारच नाही असे म्हणून त्यांना शूद्र म्हणत. अशावेळी विवेकानंद त्यांच्यावर तूटून पडत. आपल्याला संन्यास घेण्याचा पूर्ण अधिकार आहे हे सिध्द करून मग म्हणत की मात्र शूद्र म्हटल्याने मला मुळीच वाईट वाटत नाही. उलट मलाही त्याची अनुभूती घेता येते.

विवेकानंद अमेरिकेला जायला निघेपर्यंत त्यांचे नाव विवेकानंद नव्हते. खेत्रीच्या महाराजांनी त्यांनी अमेरिकेतील परिषदेस हे नाव घेऊन जावे, असे सुचवले. किती सार्थ नांव. पुढे त्यांचे चरित्र लिहिणारा रोमा रोलां म्हणतो, “त्यांचे काम, त्यांचे विचार, त्यांचे आयुष्य संतुलन आणि संघटन या दोन शब्दामधे आहे. विवेक ह्या एकाच शब्दात खरं तर त्यांची सर्व वैशिष्ट्ये आहेत.” धर्मा-धर्मात, व्यवहारांत, आध्यात्मिक आचरणांत सर्वांत विवेक हा हवाच. विवेक हा मनुष्याच्या सुसंस्कृततेचा प्राण आहे आणि त्या विवेकांतच आनंद पहाणारा असे नांव धारण करून स्वामीजी अमेरिकेला निघाले. प्रथम त्यांनी जपानमधे नागासाकी, कोब, याकोहामा, ओसाका, क्योटो व टोकीयो या शहरांना भेटी दिल्या. जपानी लोकांची शिस्तप्रियता, सार्वजनिक स्वच्छता आणि उद्यमशीलता यांनी ते प्रभावीत झाले. जपानची तयारी त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांची प्रगती पाहून त्यांनी भारतियांना साद घातली. ते पत्रांत लिहितात, “तुमच्या बिळातून बाहेर पडा आणि या देशांना भेटी द्या. जपानी लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल आदर वाटतो आणि तुम्ही संकुचित कल्पनांनी ह्याने धर्म बुडतो, त्याने धर्म बुडतो, असे म्हणता. शेंकडो वर्षांच्या अंधश्रध्दाना तुम्ही चिकटून रहातां. शतकानुशतकांच्या अशा आसुरी वागण्यामुळे माणुसकीचा तुम्ही विनाश केला आहे. आणि आता तर तरूणांची महत्त्वाकांक्षा काय तर कारकून व्हायचं, वकील व्हायचं आणि शेकडो बांधवांना साध्या भाकरीपासून वंचित ठेवायचं. तुमची पोथ्या-पुस्तकं आता समुद्रात फेकून द्या. आतां नवे वेद लिहिण्याची वेळ आली आहे. पुढे तिथून स्वामीजी अमेरिकेला पोहोंचले. आज कोणीही अमेरिकेला गेला तर त्याला घ्यायला, स्वागताला कोणी तरी येतो. स्वामीजींच्या स्वागताचा प्रश्नच नव्हता. स्वामीजींकडे कुणाचही आमंत्रण नव्हतं. शिकागोला पोहोंचल्यावर त्यांच्या लक्षांत आलं की एक तर ते परिषदेच्या तारखेच्या दोन महिने आधी येऊन पोहोचले आहेत आणि आमंत्रण नसताना त्यांना परिषदेच्या कोणत्याही व्यवस्थेचा उपयोग करू देणं तर सोडाच पण नुसतं नांव नोंदवून घेणंही तिथल्या कडक शिस्तीत बसत नव्हतं. त्यांना नकार मिळाला. हॉटेलमधे रहायला पुरेसे पैसे नव्हते. रहाण्याची इतर कांही सोय नव्हती.

शिकागोला कठीण परिस्थितीत कोणीतरी त्यांना बोस्टनला जायला सुचवले. बोस्टनमधे खर्च कमी होता असे सांगितले. बोस्टनच्या प्रवासात बहुसंख्य लोक त्यांचा वेष पाहून त्यांच्याकडे विचित्र नजरेने पहात होते. पण त्याच प्रवासांत त्यांना केट सनबर्न नांवाची एक सधन व सहृदय स्त्री भेटली. तिने त्यांची हकीकत ऐकून त्यांना बोस्टनच्या आपल्या घरी पाहुणचार घेण्याचे आमंत्रण दिले. खिशांतले कमी पैसे लक्षात घेऊन स्वामीजींनी ते स्वीकारले. बोस्टनच्या वास्तव्यांत त्यांना अनेक व्यक्ती तिच्याकडे भेटल्या. बहुतेकांनी त्यांना भारताबद्द्ल अज्ञान प्रगट करणारे, भारत हा विचित्र देश आहे असे मानणारे प्रश्न विचारले. परंतु प्रोफेसर राईट व इतर एक दोघांना भारत माहित होता. त्यांना स्वामींचा हेतु व अडचण दोन्ही लक्षांत आली. प्रोफेसर राईटनी सर्वधर्मपरिषदेशी संबंधित व्यक्तींच्या नावे स्वामीजींना परिषदेत प्रवेश आणि भाषण करता यावं याची, व्यवस्था करण्यासाठी पत्र दिलं. स्वामीजी जेव्हां म्हणाले की पण त्यांच्याकडे ओळखपत्र आमंत्रण कांही नाही.तेव्हा प्रोफेसर म्हणाले, “To ask you for your credentials, is like asking Sun to show his right to shine.”परंतु बोस्टनहून परिषदेसाठी शिकागोला परत जातांना ते पत्र गहाळ झालं. शिकागोला स्वामी पुन्हां खिशांत पैसे नाहीत, कुणाची ओळख नाही, अशा अवस्थेप्रत आले. त्यांनी मदतीसाठी अनेकांचे दरवाजे ठोठावले. परंतु कोणीही दारसुध्दा उघडले नाही. शेवटी सर्वधर्मपरिषदेत भाग घेण्याच्या इच्छेने आलेले स्वामीजी सगळीकडे फिरून, दोन-तीन दिवसाच्या भुकेने व्याकुळ झालेल्या आणि प्रवासाने थकलेल्या अवस्थेत शेवटी एका रस्त्याच्या बाजूला एका दगडावर बसले.
क्रमशः
अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..