नवीन लेखन...

एका कुटुंबाची गोष्ट – भाग १ (आठवणींची मिसळ २७)

ठाणे जिल्ह्यांतील एका प्रसिध्द गांवातल्या कुटुंबाची ही गोष्ट.तिचं नाव होतं लक्ष्मी आणि त्यांच नाव होतं नारायण.
खरोखरीच लक्ष्मीनारायणाचा जोडा. नारायणांना अण्णा म्हणत असतं तर लक्ष्मीबाईंना ताई. अण्णा यशस्वी व्यापारी होते. घरांत समृध्दी होती. मुलाबाळांनी नांदतं घर होतं. गोठ्यात चार म्हशी होत्या. पूर्वीचं घर लहान होतं. ते सोडून मोठ्या घरांत रहायला आले. नवीन मोठं घर त्यांना त्या घराच्या मूळ मालकाने भाडे न आकारतां फक्त एका अटीवर दिले होते. ती म्हणजे एका लहान खोलीत मालकाचे देव होते. त्या देवांची पूजा करायची आणि ती खोली इतर कशाला वापरायची नाही. एवढ्या मोठ्या घरासाठी ही अट म्हणजे आनंददायीच होती. कुटुंब तिथे रहायला आलं. पण तिथे आल्यानंतर एका वर्षातच अण्णांच दैव बदललं. व्यापारांत मोठा तोटा आला. दिवाळे काढावे लागले. अर्थशास्त्रात १९३०-३४ च्या काळाला जागतिक मंदीचा काळ म्हणतात. भारतातही अनेकांना त्याची झळ सोसावी लागली. त्यातलेच एक अण्णा. अण्णांबरोबर कुटुंबाचेही दिवस फिरले.

ताईंची बाळंतपणे अजूनही चालूच होती. रांगेने पहिले पांच मुलगे होते आणि नंतर दोन मुली होत्या. दिवस चांगले होते तेव्हां ताई आपल्या पहिल्या पांच मुलांना अभिमानाने “माझे पांच पांडव म्हणायची”. तिला काय माहिती की पांडवांहून जास्त त्रास भोगायला लागणार होता त्यांना.पहिली सात मुले वैभवकाली जन्मली आणि त्यानंतरच्या काळांतही चार, दोन मुलगे आणि दोन मुली, जन्मली. म्हणजे एकूण सात मुलगे आणि चार मुली. कुणी म्हणायचं ताईंची तेरा बाळंतपणे झाली. दोन मुलं लौकरच गेली. असेलही. अण्णा व्यापारांत पुन्हां जम बसवायचा प्रयत्न करत होते पण यशस्वी होत नव्हते.

मोठ्या दोन मुलांनी (दादा आणि भाई) सहावी-सातवीत शाळा सोडली. १३-१४व्या वर्षी त्यांनी काम पहायला सुरूवात केली. ते गांव रेल्वे स्टेशनपासून दोन कोसावर होतं. गावात लोकांना गवत हवे असे. स्टेशनवर वाघिणींतून (वॕगन्स) आलेल्या गवताच्या गासड्या बैलगाडीवरून गावात आणल्या जात. दादा आणि भाई त्या बैलगाड्या चालवू लागले. बाकीच्या भावंडांचे शिक्षण चालू राहिले. दोघा मोठ्या भावांवर गाडीवाले हा शिक्का बसला. पुढे ते मोठे झाले तेव्हां “गाडीवाल्यांना” लग्नासाठी मुलगी मिळेना. दोघेही उंच सशक्त आणि देखणे होते. पार कोंकणापर्यंत शोध केला. पस्तीशी उलटल्यावर दोघांची लग्ने झाली. दादाला कोकणातली एका गरीब घरची न शिकलेली मुलगी मिळाली. तर भाईला गरीब घरचीच परंतु शिकलेली मुलगी मिळाली. ती शिक्षिका होती.

तीन आणि चार नंबरचे मुलगे (तात्या आणि अप्पा) मॕट्रीक पर्यंत शिकले पण मॕट्रीक पास झाले नाहीत. त्यांना गांवापासून स्टेशनपर्यंत जाणाऱ्या खाजगी बस कंपनीमधे किंवा दुकानात नोकऱ्या मिळाल्या. त्याआधी ते आपल्या मामाकडे शिकायला राहिले होते. मामा शिकलेले होते. शिक्षकही होते. पण हे मॕट्रीकपर्यंत शाळा करून परत गावात गेले. मात्र मामांकडे दोघांचही येणं जाणं कायम होतं. बस कंपनीमधे कधी कंडक्टर तर कधी स्टार्टर अशी कामे करायचे. तात्या आणि अप्पाही सशक्त आणि देखणे पण मध्यम उंचीचे होते. मोठ्या भावांची लग्ने होत नव्हती आणि हे ही लग्नाच्या वयाचे झाले होते. त्यांतच यांची कांही विफल प्रेमप्रकरणे झाली. एकामागून एक दोघेही बिथरले. ताई-अण्णा भली माणसं होती. पण मुलांना समजून घेणं माहिती नव्हतं. बिथरलेल्या मुलांवर कोणीतरी करणी केली, ते वेड्यासारखे वागताहेत असं म्हणतां म्हणतां एकामागून एक दोघेही भाऊ वेडे झाले. पहिल्यांदा अप्पाला वेडा ठरवून मांत्रिकाचे उपचार झाले. ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेऊन झाले. शेवटी त्याला घरांतून काढलं. तो बाहेर कामं शोधू लागला. हळूहळू तात्याही त्याच मार्गाने गेला. त्यालाही वेडा ठरवून घरांतून बाहेर काढण्यात आलं.

दोघे वेडे ठरवले गेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येत की काय कुणास ठाऊक पण एरव्ही तर ते नीट वागत. अप्पा एका नातेवाईकाच्या ओळखीने स्टाॕक ब्रोकरकडे कामाला राहिला. पण त्याला नोकऱ्या कधी टिकवता आल्या नाहीत. तात्या कंत्राटदारांकडे कामं करू लागला. दोघांनी आयुष्याची चोव्वीस- पंचवीस वर्षे घराबाहेर रस्त्यावर काढली. कुठे झोपले, कसे झोपले, कितीदा उपाशीपोटीच झोंपले कुणास ठाऊक. घरच्यांना तर पर्वा नव्हतीच. ते दोघे आपल्या एकुलत्या एक सख्या मामाकडे आठवड्यांतून एकदा, दोनदा हक्काने जायचे. बरेचवेळा रविवारी. मामीही त्यांना भरपेट मासे, मटणाचं जेऊ घालायची. ते ओसरीवरच थोडा वेळ ताणून द्यायचे. दुपारचा चहा पिऊन निघून जायचे. स्टॉक ब्रोकरकडे काम करतो असं सांगणारा अप्पा एक दिवस मामांच्या घरांत सिगरेट ओढू लागला. मामीला सिगरेटचा वासही सहन होत नसे. तिने सांगितलं, “इथे असतांना सिगरेट ओढायची नाही”. झालं. त्याचा अपमान झाला. त्यानंतर तो मामांकडेही गेला नाही. दोनेक वर्षांनी तो गेल्याचे कोणीतरी मामां-मामींना कळवले.

तात्या मात्र मामांकडे जात राहिला. मामा गेल्यानंतरही मामांच्या दोन्ही मुलांच्या घरी तो जायचा. तिथे जेवायचा पण रहायचा नाही. जेवल्यावर रविवारचे पेपर पूर्ण वाचायचा. चहा घेऊन निघून जायचा. नेहमी वसई-वज्रेश्वरी परिसरांत काम करायचा.आजारी पडला तर आपले औषध वज्रेश्वरीचं कुंड म्हणायचा. देवळाच्या परिसरांत जेवणाची सोय व्हायची की काय कुणास ठाऊक. एकदा तात्या खूप आजारी झाला. निपचित रस्त्याच्या कडेला पडला होता. एका पोलिसाने आणि एका माणसाने विचारल्यावर मामाच्या धाकट्या मुलाचा पत्ता त्यांना दिला. मामांच्या मुलाने तात्याला हाॕस्पिटलात उपचारांसाठी भरती केले. पण तो २४ तासांत गेला. मामाच्या मुलाने आपल्या भावाला बोलावले आणि त्याच्या दोघा भावानाही कळवले. चौघानीच मध्यरात्री त्याचे दहन केले.

दादाचे लग्न ज्या कोकणातल्या मुलीशी झाले, तीही अर्धवेडीच निघाली. तिला एक मुलगी झाली. त्यानंतर एक दोन वर्षात मुलीला तिथेच सोडून ती कोकणात पळून गेली. तिला परत आणायचा प्रयत्न दादाने केला. पण ती कांही आली नाही. त्याची मुलगी त्याच्याकडेच राहिली. अण्णांनी व्यवसायांत पुन्हां प्रयत्न म्हणून अंधेरीला कोळशाची वखार काढली होती. सुरूवातीला अण्णा एक खोली घेऊन अंधेरीला रहायचे. कोळशाच्या वखारीचे काम स्वतः पहायचे. मुलांचे मामाही अंधेरीतच होते. अण्णा बरेचदा संध्याकाळी मेहुण्याकडे जेवायला असत. एरव्हीही गप्पा मारायला येऊन बसत. त्या गप्पांत नेहमी व्यापारासंबंधी उल्लेख असत. मामांच्याकडली भाजीपासून कुठल्याही वस्तूची खरेदी केवढ्याला केली याची चौकशी करत. कांही किंमत सांगितली तरी ती त्यापेक्षा स्वस्त कुठे मिळते ते सांगत. त्या गप्पांमधे थोडी बढाई असे. कारण आपण एक यशस्वी व्यापारी होतो, हे ते विसरू शकत नव्हते.

अण्णांच्याबरोबर पाच नंबरचा भाऊ (चंदू) अंधेरीला रहायला आला. पहिल्या पाच भावात केवळ तोच मॕट्रीक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला दोन नोकऱ्यांचे कॉल आले. एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनांव एकच होते. आद्याक्षरे मित्राची जी.एन. आणि ह्याची सी.एन. होती. त्यांचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली. सात भावांत यानेच फक्त नोकरी केली आणि निवृत्तीपर्यंत टिकवली. तोही मामांकडे नेहमी येई. तो उत्साही आणि आनंदी असे. मामेभावंड थोडी लहान होती. त्यांच्याबरोबर पत्ते, कॕरम खेळत असे. पुढे अण्णा गेल्यावर तो परत वसईला जाऊन राहिला. अण्णांच्यानंतर ताईही एखाद्या वर्षाने गेल्या. कुटुंबाचा सांभाळ तोच करू लागला. मात्र पाठ फिरवून गेलेली लक्ष्मी ताई-आण्णांच्या हयातीत परत आली नाही.

अण्णांच्या पश्चात् कोळशाची वखार पहाण्याचे काम दादाने घेतले. नाहीतरी गवताच्या गाड्यांऐवजी ट्रक आल्यामुळे तो धंदा बंदच झाला होता. तो अंधेरीला एकटा राहू लागला. पुढे प्रकृतीमुळे ते झेपेना, म्हणून सात नंबरच्या भावाकडे कोळशाची वखार सोपवली. त्याच्या मदतीला एक भय्या नोकर होताच. आपल्या एकुलत्या एक मुलीची जबाबदारी भावंडांवर टाकून दादा जग सोडून गेला. भाईनेही गाडीचा धंदा बंद केला पण ट्रक भाड्याने घेऊन तो व्यवसाय करत राहिला. त्याची पत्नी शिक्षिका असल्याने त्यांचा संसार जरा सुरळीत होता. त्याला दोन मुलगे व एक मुलगी झाली. पुढे त्यांनी ते घर सोडले. जवळच एका भाड्याच्या घरांत तो राहूं लागला. पण तिथे तो गुडघ्याच्या आजाराने अंथरूणाला खिळला आणि त्याचा अंत झाला. त्याची मुलगी शिकली, नोकरी करू लागली. परंतु मुलांनी एसएसस्सीपर्यंतही मजल मारली नाही. ते दोघे रीक्षा घेऊन त्या चालवू लागले. व्यसनी मित्रांबरोबर व्यसनी बनले आणि चाळीशीतच मृत्यू ओढवून घेतला. मात्र तेवढ्यांत एकजण एक मुलगी तर एक दोन मुलींना मागे ठेवून गेला.

चंदूने सर्व कुटुंब सांभाळले, त्यालाही दोन मुली एक मुलगा झाला. त्याचेही उशीरानेच लग्न झाले. त्याची पत्नी सीधी साधी पण थोडी अजागळ होती. त्याच्या दोन्ही मुली शिकल्या, नोकरी करू लागल्या. परंतु मुलगा अशक्त आणि थोडा मंदबुध्दी होता. तो सतरा-अठरा वर्षांचा होउन गेला. बहिणींमधली मोठी होती, तिचा विवाह ज्या मित्राचा नोकरीचा कॉल घेऊन चंदू नोकरीला गेला होता, त्या मित्राशी झाले. तिला दोन मुलगे झाले. पण मुले लहान असतांनाच ती विचित्र वागू लागली. तिलाही वेड लागले, असेच ते म्हणू लागले. ती क्षयबाधेने मरण पावली. पहाणारं कोणी नाही म्हणून तिचेही दोन्ही मुलगे आजोळीच येऊन राहिले. गोष्ट अजून बरीच मोठी आहे. मोठ्या भावाची मुलगी, दोन नंबरच्या भावाची बायको शिक्षिका असल्यामुळे त्यांची तीन मुलं, पांचव्या नंबरच्या भावाच्या दोन मुली आणि मुलगा, बहिणीचे दोन मुलगे, इ.चा त्या कुटुंबात सांभाळ कुणी केला ? आतापर्यंत फक्त सहा भावंडांचीच गोष्ट आलीय. बाकीच्या पाचांच काय झालं, ह्याबद्दल कुतुहल असेल तर ह्या कुटुंबाच्या गोष्टीचा दुसरा भाग जरूर वाचा.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..