नवीन लेखन...

मजुरांचा बाजार (आठवणींची मिसळ २५)

मी सकाळी फिरायला जातो, तिथे वाटेत एक नाका लागतो. मी फिरून परतत असतांना तिथे रोजंदारीवर काम करणारे अनेक स्त्री-पुरूष बसलेले असतात. ते गटागटाने बसतात. त्यांचा कलकलाट चालू असतो. रस्ता अडवून मात्र बसत नाहीत. त्या दिवशी त्यांना कुठे काम करायला जायचय हे त्यांना ठाऊक नसतं. पण मनाशी आशा बाळगून ते मजूर तिथे बसलेले असतात. कांहीजण विनोद करत असतात. कांहीजण बरीक भांडतही असतात. आजचे काम मिळायची वाट पहात असतात. कांही ठिकाणी स्त्री-पुरूष एकत्र असतात. पण बहुदा वेगवेगळे बसतात. साधारण दोनशेच्या आसपास संख्या असेल त्यांची. त्यांत साठ-पासष्ट टक्के बायका असतात.

ते मजूर ज्या भागात रहातात, तिथून येणारा रस्ता मला आधी लागतो. त्यांची घरे मी थोडी दुरून पाहिली आहेत. चार सहा बांबूवर ॲस्बेस्टॉस शीटस टाकून केलेली घरे आहेत. त्यातली कांही स्थानिक पुढाऱ्याने अधिकृत करून घेतली आहेत. पण निम्म्या झोपड्या अनधिकृत आहेत. पुढाऱ्याच्या कृपेने सार्वजनिक पाण्याचा नळ आणि वीज त्यांना उपलब्ध आहे.

बऱ्याचजणांकडे गॕस सिलिंडरही आहे. पण अनेक घरांतून धूरही येत असतो. शहरांतली वस्ती वाढते, त्याप्रमाणांत इथलीही वस्ती वाढते. पुढाऱ्यांना हे हक्काचे मतदार वाटतात. तिथे मतदान ८०/९०टक्के होत असावं. पण अनेक जण महानगर-पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाची धास्ती घेऊन असतात. पथकातले लोकही निर्दय असल्याशिवाय कारवाई होऊच शकत नाही. ते धडाधड सगळ्या वस्तु रस्त्यावर फेंकून देतात. अगदी चुलीवर शिजलेला भातही उचलून फेकून जातात. आया बाया कळवळतात. पण दोन दिवसानी परत घर उभ रहातं.

तर सकाळी नऊ वाजतां रोजगार मिळवायला हजर व्हायच्या आधी ह्याना घरचं सर्व काम करायचं असतं. त्यांतही ९०% काम बायकांचच. मुलांना सकाळीच गणवेश घालून शाळेत पाठवायचं. हे काम बहुदा जास्त वर्षे चालत नाही. सर्वाना “नाश्त्या”साठी कांही द्यायचं. मग सर्वांचे डबे भरून देऊन दुपारच्या जेवणाची सोय करायची. नळावरून पाणी भरून आणायचं. बाजूच्या तळ्याच्या पाण्यात कपडे धुवायचे. ही सर्व कामं ती बाई करते. त्यानंतर तयारी करून ती कामावर जायला निघते. घरांचा दर्जा सोडला, तर साधारणपणे नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय स्त्रीची कामे आणि जबाबदाऱ्याही ह्याच असतात की नाही.

मी जेव्हां तिथून जात असतो, तेव्हां त्या झोपड्यांच्या दिशेने मोठ्या संख्येने त्या बायका नाक्यावर निघालेल्या असतात. कुणी दोघी असतात, कुणी चौघी एकत्र असतात. तर क्वचित् एखादी एकटीही असते. त्यांत अगदी चौदा/पंधराची वाटणारी मुलगीही असते अन चार मुलींची आईही असते. फार वयस्क मात्र कुणी दिसत नाही. साधारण सगळ्या १५ ते ३५मधल्या असतात. मजुरीचं काम करायला शक्ती तर हवी. तरूण असल्यामुळे त्या भराभर चालत असतात. बऱ्याच जणींच्या चालण्यांत डौल असतो. मेहनतीमुळे अंगावर मांस तसं कमीच पण अशक्तपणा नाही. कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या कमनीय स्त्रिया ह्याच तर नव्हेत असा प्रश्न माझ्या तरी मनात येतो.

सर्व गोष्टींत नजरेत भरणाऱ्या गोष्टी दोन. पहिली केशभूषा आणि दुसरी वेशभूषा. प्रत्येकीचे केस अगदी व्यवस्थित असतात. झिंज्या असा शब्द त्यांच्या केसांच्या बाबतीत अगदी बाद. केसाला तेल असते पण चेहऱ्यावर तो तेलकटपणा नसतो. केसांचा नीट भांग पाडून थोडी वेगवेगळी केशरचना केलेली. ह्या फॕशन्स ह्यांना कोण शिकवतं ? त्या सिनेमातल्यापेक्षा वेगळ्या आणि परंपरेने आलेल्या असाव्यात. पण प्रत्येकीची केशभूषा आकर्षक असते. त्याला कधीतरी एखादी रिबीन लावते तर एखादी प्लॕस्टीक पीना. घरची कामे उरकून, डबे पिशवीत घेऊन, निघणाऱ्या या बायकांना अशी नीटस केशभूषा करायला वेळ कधी आणि कसा मिळत असेल ? आवड हेच खरं ! बहुदा त्या एकमेकींना केशभूषा करायला मदत करत असाव्यात. अगदी अलिकडे एकाद दुसरी बॉय कट केलेलीही दिसते. बहुदा तो एखाद्या केसांत होणा-या आजारावरचा उपाय असावा.

केशभूषेइतकीच किंवा कांकणभर सरस अशी त्यांची वेशभूषा असते. त्या पांचवारी, सहावारी साड्या क्वचित नेसतात. त्यांची साडी वेगळीच असते. कमरेभोवती जेमतेम एक फेरा होतो न होतो अशी. पदर मात्र लांबलचक. घागरा (परकर) घोळदार पण काठीयावाडी स्त्रियांइतका नाही. त्याचा रंग उठावदार आणि खाली त्याच कापडाची लेस. घागरा, साडी आणि ब्लाऊज तिन्हीचा रंग वेगवेगळा पण रंगसंगती उत्तम. क्वचित चार रंग दिसतील पण तीनापेक्षा कमी कधीच नाही. ब्लाऊजची फॕशनही वेगवेगळी. कपडेही नीट बेतलेले. कोठे असतात यांचे टेलर ? त्यांच्याच वस्तीत ? कांही असो, पण त्यांच्यापैकी एकीच्याही वेशाला गबाळा हे विशेषण लावणं अशक्यच. उलट त्यांना सरळ रॕम्पवर पाठवायला हरकत नसावी, इतका उमदेपणा. याशिवाय बांगड्या किंवा कडी, जोडवी, कर्णभूषणे, ही स्वस्तातली पण उठून दिसणारी असतात. पुरूष मात्र साधे असतात. साधा वेष. उन्हाने रापलेला देह. हातांत बायकोने दिलेली पिशवी. अर्थातच जेवणाच्या डब्ब्यासाठी. अगदी अलिकडे त्यांच्यातल्या कांही स्त्रिया रोजंदारीपेक्षा आजूबाजूला होणा-या नव्या फ्लॕटसमधे मोलकरणीची कामे करू लागल्या आहेत. पण हे अपवाद थोडेच.

त्यांचे असे घोळके जाताना पाहून “चालला, चालला लमाणांचा तांडा” या ओळींची आठवण येते. पण ती तितकीच. कारण हा तांडा दुज्या गांवाला नव्हे तर आजच्या कामाच्या शोधाला नाक्यावर निघालेला असतो. काम म्हणजे विटा, सिमेंट किंवा मलबा यांनी भरलेली घमेली डोक्यावरून वहाणे. त्या वस्तू उचलून कडीयाकडे देणे. मेहनत आहेच. कधी कधी उन्हात, तर कधी कुठे घरांत, जिथे काम असेल तिथे. त्या स्त्रिया आणि त्यांच्यातलेच पुरूष असे सगळे त्या नाक्यावर साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान जमा होतात. कांही पुरूष थोडी अधिक कामे, म्हणजे गवंडी कामातील प्राथमिक स्वरूपाची कामे म्हणजे छिन्नी आणि हातोड्याने भिंतीचा खराब भाग पाडणे, थापीने सिंमेट मारणे, इ. करायला शिकलेले असतात.

मग तिथे मुकादम आणि कंत्राटदार यायला लागतात. त्यांचा पण एक ठराविक वेश असतो. पांढरा बुशशर्ट. त्याच्या खिशाला पेन लावलेलं. खिशांत छोटी डायरी. पँट खाकी किंवा सफेदच. आता बहुतेक ही आसामी टू व्हीलरवरून म्हणजे मोटारसायकलवरून येते. दोनचार पुरूष त्याच्याकडे धाव घेतात. मजुरीचे दर साधारण ठरलेलेच असतात. ह्यांना त्यांत बोलायला वावच नसतो. पण किती काम आहे आणि किती पुरूष आणि किती बायका लागतील त्याचा अंदाज घ्यायचा असतो. शाळेंत शिकवल्या जाणाऱ्या “काळ-काम-वेग” ह्यावरील गणितांचा इथे बिलकुल उपयोग नसतो.ते ठरल्यावर त्या गटातले पुरूष आणि बायका जायला सज्ज होतात. हल्ली त्यांना पायी किंवा बसने जायला लागत नाही. रिक्षामधे चार पाच जणांना कोंबलं जातं. संख्या जास्त असली तर एखादा जीप घेऊन येतो तर एखादा टेम्पोच घेऊन येतो. लगबगीने वहानात बसताना आनंदाला उधाण आलेलं असतं. बघतां बघतां ती गर्दी रोडावू लागते. दोन चार जणांना काम मिळालंच नाही, असंही होत असेलंच एखाद्या दिवशी. बाजाराचेच नियम तिथेही आहेतच.

माझी आविष्कारमधे प्रसिध्द झालेली पहिली कथा रोजंदारीने काम करणाऱ्या मजूराचीच आहे. पण त्यांत मी अशा बाजाराचे विस्ताराने वर्णन नव्हतं केलं. हा बाजार चैतन्याने भरलेला असतो. आशेने फुललेला असतो. मोठ्या मनोऱ्यांची स्वप्नं नसतात. आजचा डबा बरोबर असतो. आज फक्त उद्याच्या डब्याची सोय करायची असते. आपण वर्तमानपत्रांतले मुक्त बाजारपेठेवरचे लेख वाचणार असतो. ही अनेक वर्षे अस्तित्वात असलेली बाजारपेठ आपल्या खिजगणतीतच नसते. अन् त्या बाजारपेठेलाही तुमची नीट ओळख नसते. पण ती रोज भरते. प्रत्येक मोठ्या गांवात एक नाका ह्या बाजारासाठी असतो. तुम्ही सर्वांनीही तो पाहिला असेलच. मी रोज त्यांची जगण्याची धडपड पाहून, त्यांत आनंद शोधण्याची वृत्ती बघून, कमी मिळकतीतही केशभूषा आणि वेशभूषा यांची कलात्मकता जपण्याची हौस पाहून प्रभावित होतो. मनावर मरगळ येऊ पहात असेल तर ती चटकन झटकली जाते. बाजार मजूरांचा असला तरी त्यांच्यातली माणसे आपण पाहिली तर आपल्याला त्यांच्याकडून खूप कांही शिकता येण्यासारखे आहे असे वाटते.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..