आता मी जे दोन प्रसंग सांगणार आहे ते कदाचित पूर्वी कुठेतरी मी थोडक्यात लिहिलेही असतील.त्यातला पहिला प्रसंग माझ्यासाठी इतका गंभीरनव्हता पण मजेदार होता. तर दुसरा फारच गंभीर प्रसंग होता आणि त्याची परिणती वेगळी झाली असती तर मला ते प्रकरण महाग पडलं असतं. पहिले दोन प्रसंग लोकल प्रवासांत घडले तर हे दोन्ही प्रसंग लांब पल्ल्याच्या प्रवासात घडले.एक जम्मुला तर एक तामीळनाडूमधे. देशाच्या दोन टोकांना घडलेल्या प्रसंगामधे दोन्हीकडच्या पोलिसांच्या वागणुकीत थोडा फरक होता.पण ते सर्व कांही तात्पर्य काढायचं ते तुम्हीच काढा. मी फक्त दोन्ही प्रसंग जसे घडले तसे तुम्हाला सांगतो. खाली पहिला लिहिलेला प्रसंग १९८०च्या सुमारचा आहे. तर दुसरा आधीचा म्हणजे १९७६चा आहे.
▪
माझी करीअरमधे मी माझ्या ऑफीसर्स असोसिएशनमधल्या सहभागाचा उल्लेख केलाच आहे. त्या वर्षी असोसिएशनच्या सेंट्रल कमिटीची मिटींग चेन्नईला घेण्यात आली.आम्ही मुंबईचे पांच सहा सदस्य चेन्नईला गेलो.मिटींग दोन दिवसात आटपल्यावर आम्ही परत निघालो.तेव्हां कारखानीस प्रेसिडेंट होते.मी मुंबईचा सेक्रेटरी होतो.कारखानीस, जेटली, मी आणि इतर दोन सदस्य आम्ही परतताना एकत्र होतो.असोसिएशनची आर्थिक क्षमता बघून दोन्ही वेळचा, म्हणजे जायचा व यायचा, प्रवास आम्ही एसी थ्री टायरनेच केला.जाताना प्रवास निर्विघ्न झाला.येताना घडलेला एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला. इतर मित्र तो विसरलेही असतील.गाडी चेन्नईहून सुटल्यानंतर कांही तासांनी जेवणाची वेळ जवळ येऊ लागली.तेव्हां जेवणाची ऑर्डर घ्यायला एकजण डब्यांत आला. सर्वांनीच थाळीची ऑर्डर दिली. तो ऑर्डर घेऊन निघून गेला. जेवण पुढचे स्टेशन आले की मिळेल असे त्याने सांगितले.
▪
पुढचे स्टेशन येईपर्यंत दीड तास होऊन गेला. सर्वांना खूप भूक लागली होती. दिवसाची वेळ असल्यामुळे आम्ही गप्पा मारत होतो.कोणी झोपलं नव्हतं. पुढच्या स्टेशनवर जेवणाच्या थाळ्या गाडीत आल्या. गाडी चालू झाली आणि थाळ्या ऑर्डरप्रमाणे देण्यात आल्या.ती राईस प्लेटच होती.चपात्या त्यात नव्हत्याच.डाळ, भाजी, पापड, लोणचं नांवाला होतं.सर्वजण भुकेलेले असल्यामुळे त्याही जेवणावर तुटून पडले.पण जेवण्याचा उत्साह दुसऱ्या घासापुरताही उरला नाही.पहिल्याच घासाला सर्वाना कळून चुकलं की आपल्याला जेवायचं असेल तर दर एक तांदुळाच्या दाण्यामागे दोन ते तीन खडे खायचे आहेत.खाणं म्हणजे चावणं आणि पचवणं ओघाने आलंच.एक वेळ ते खडे पचवता आले असते.पण ते खडे चावणं म्हणजे दिव्यच होतं.पहिलाच घास सर्वांच्या तोंडात फिरू लागला.एक घास बाजूला ठेऊन दुसरा घेतला तर तोही तसाच.दोन तीन मिनिटांतच सर्वानी ताटे तशीच बाकाखाली सरकवली.डब्यातला ऐंशीच्या ऐंशी जणांच्या ताटात भात जवळजवळ तसाच होता.तांदळांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर खडे चुकून येऊ शकत नाहीत. ते कोणाचं तरी “प्रॉफीट मार्जीन” होतं.मीही एक घास खायचा प्रयत्न केल्यावर ताट बांकाखाली सरकवलं.सर्वांनाच ते जेवण आवडलं नाही.पण सर्वांनी ते स्वीकारलं. पैसे तर तो ऑर्डर घेणारा आधीच घेउन गेला होता.
▪
आमचं सर्वांच त्याबद्दल बोलणही झालं.पण त्यावर कांही करायला हवं असं कुणालाच वाटलं नाही.अर्ध्या पाऊण तासानंतर एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आला.तो बांकाखालची ताटे गोळा करू लागला.जेव्हां तो माझं ताट उचलायला आला तेव्हा मी त्याला माझं ताट दिलं नाही.मी त्याला ताट घ्यायला मज्जाव केला.तो तरीही ते उचलायला बघू लागला, तेव्हां मी त्याला अडवलं.मी त्याला म्हणालो, “जिसने हमारा राईस प्लेटका ऑर्डर लिया, उसको बुलाके लावो और बादमे थाली लेके जाओ.हमने चावलका ऑर्डर दिया था.पत्थरका नही.”तो म्हणाला,”वह आदमी अभी पिछेके स्टेशनपे उतर गया.आप थाली दे दो.”मी म्हणालो,”देखो, मै यह थाली देनेवाला नही.मै इसको मुंबई लेके जाऊंगा और बेच दूंगा.मेरा थोडा पैसा मै ऐसा वसूल करूंगा”.तो ऐकेना बळजबरीने ताट घ्यायला पाहू लागला.मग जेटलीनी पण त्याला दम भरला.इतर प्रवासी सुध्दा वैतागलेलेच होते. तेही माझी बाजू घेऊ लागले. तसा तो बिथरला. तो म्हणाला,”आप थाली नही देंगे तो मै ट्रेनका चेन खिचुंगा. त्यावर सर्वानीच त्याला सांगितले,”क्या पागल हो क्या? चेन खिंचनेके लिये क्या हो गया है? ” तरी तो पुन्हां तेच म्हणाला.आम्ही त्याला म्हणालो,”हम तो आपको थाली नही दे रहे.चेन मत खेंचो इस लिये.”पण त्याने जाऊन चेन खेंचलीच.
▪
गाडी फर्लांगभरही पुढे न जातां दोन स्टेशनांच्या आडजागी मध्येच थांबली.थोड्याच वेळांत गार्ड, दोन रेल्वे पोलिस, एवढा वेळ गायब असलेला आमच्या बोगीचा टी.सी. अशी रेल्वेची फौजच आली.आमच्या इथली सांखळी ओढल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारले,”What happened ?”आम्ही झाला प्रकार सांगितला.कारखानीसांनीही त्यांना समजावून सांगितले.सुदैवाने आमचं म्हणणं त्याना पटलं.थाळी तिथेच राहिली आणि त्याला ते पकडून घेऊन जाऊ लागले.मी म्हणालो,”आमची तक्रार जेवणाबद्दल आहे.त्याच्याबद्दल नाही.”पण ते त्याला घेऊन गेले.पुढचे स्टेशन मोठं होतं व गाडी बराच वेळ तिथे थांबणार होती.रेल्वे पोलिस आणि टी.सी. त्याला घेऊन परत आमच्याकडे आले.पोलिस अधिकारी म्हणाला,”अभी बच्चा है. आप इसे माफ कर दो. अगर आपकी कंप्लेंट है तो मुझे उसे जेलमे भेजना पडेगा.”त्या मुलाला त्यानी जमिनीवर नाक घासून आमची माफी मागायला सांगितले.आम्ही परत त्यांना सांगितले आमची तक्रार जेवणाबद्दल आहे.त्याला सोडून द्या.मग टी.सी.म्हणाला,”उसके लिये मैने हरएकके लिये एक फॉर्म लाया है.उसमे लिख दो.इतना कम्प्लेंट आयेगा तो वह कंट्राक्टर बदली हो जाएगा.”मग ऐंशी लोकांनी भरलेले तक्रारीचे फॉर्म तो घेऊन गेला आणि ते तिथल्या स्टेशनमास्तरकडे अधिकृतपणे सुपूर्त केले.तक्रारीची कांहीतरी दखल घेतली गेल्यामुळे मी ते ताटही न्यायला सांगितले.ते प्रकरण तेवढ्यावरचं मिटले.त्या काँट्रॕक्टरचं काम काढून घेण्यांत आलं की नाही ते पुढे कधीच कळणार नव्हतं.पण हळूहळू पण निश्चितपणे दूर पल्ल्याच्या गाड्यामधे चांगल्या जेवणाची सोय होत गेली.मला वाटते जर लोकांनी आपल्या हक्कांबद्दल जागरूकता दाखवली नाही तर त्यांच्या वाट्याला अनास्थाच येणार.अर्थात हक्काबद्दल जशी जागरूकता हवी, तशीच नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही हवी.
▪
दुसरा प्रसंग माझ्यासाठी फार गंभीर वळण घेऊ शकत होता. १९७६ सप्टेंबरची ही गोष्ट आहे. आमचा सोळा जणांचा गृप तेव्हा काश्मीर पाहून परतत होता.जम्मू स्टेशनवर आम्ही संध्याकाळी ४ च्या सुमारास पोहोचलो.पुढे आम्हाला अमृतसरला जायचं होतं.आमच्याकडे रिझर्व्हेशन नव्हतं.अमृतसरहून पुढे मुंबईच्या सर्व प्रवासाचं रिझर्व्हेशन होतं.आम्ही चौकशी केली.आम्हाला अमृतसरची तिकीटे सहज मिळाली.त्याशिवाय अशी माहिती मिळाली की प्लॕटफॉर्म नंबर एकवर असलेली एक खिडकी सात वाजता उघडेल आणि साडेआठला सुटणाऱ्या गाडीच्या एका पूर्ण डब्याच, म्हणजे साधारणपणे ८० जागांच रिझर्व्हेशन तिथे होईल.
▪
आम्ही तात्काळ त्या खिडकीकडे पोहोचलो.तिथे रांग लागायला सुरूवात झाली होती.एकाला कदाचित सोळा तिकीटे मिळाली नसती म्हणून मी व आणखी दोघे त्या रांगेमध्ये उभे राहिलो.सात वाजेपर्यंत आम्ही रांगेत उभे राहून कंटाळलो होतो.बरोबर सात वाजता खिडकी उघडली आणि आम्हाला हायसं वाटलं.चौथा नंबर असल्यामुळे दहा पंधरा मिनिटांत आमचा नंबर येईलसे वाटले.पण पंधरा मिनिटे तर पहिल्या माणसाला तिकीटे मिळायलाच लागली.दुसऱ्यालाही तसाच वेळ लागला.रांगेत उभे राहून मी बऱ्याच गोष्टींची मनाशी नोंद केली.पहिली गोष्ट ही की अनेक प्रवासी बाजूलाच असलेल्या दरवाजातून आत जात होते आणि त्याच खिडकीवर त्यांना राखीव जागा मिळत होत्या.अर्थात त्या खिडकीवरच्या क्लार्कला अधिक पैसे देऊनच.रांग पुढे न सरकण्याच ते प्रमुख कारण होतं.रांगेत उभे असणारे त्याबद्दल काहीच बोलत नव्हते.दुसरी गोष्ट मी पाहिली ती अशी की तिथे फलक लावलेला होता.”If you have any complaint ask for complaint book here.”तिसरी गोष्ट की तिथे जरी खिडकी होती तरी तीच खोली कुणा अधिकाऱ्याची कचेरी होती.तिसऱ्या माणसाने तिकीटे घेतली आणि तो निघाला आणि आमचा नंबर आला.पण त्या क्लार्कने “सब रिझर्व्हेशन खतम हुआ” असं म्हणून आमच्या समोरची खिडकी आंतून बंद केली.तीन माणसांना ८० तिकीटे दिली काय ?ते शक्यच नव्हतं.म्हणजे बहुतांश तिकीटे त्याने दरवाजांतून आत आलेल्या लोकांना विकली होती.माझे लक्ष पुन्हा “कम्प्लेंट बुक”च्या पाटीकडे गेलं.पण त्याच वेळी त्याच प्लॕटफॉर्मवर अमृतसरला जाणारी गाडी आली.रिझर्व्हेशन न मिळाल्यामुळे सर्वसाधारण डब्यात निदान सर्वांना बसायला जागा मिळवणे भाग होते.आम्ही बाकीच्या गृपकडे धावलो आणि सामान घेऊन सर्वसाधारण डब्ब्यात गाडी चालू असतानाच शिरून शक्य तितक्या जागा मिळवल्या.आमची सर्वांची झोंपण्याची नाही पण निदान बसण्याची सोय झाली.
▪
गाडी सुटायला तीस चाळीस मिनिटांचा अवधी होता.माझ्या डोक्यातून त्या क्लार्कने एवढा उघड केलेला गैरव्यवहार आणि तक्रारीविषयीची ती सूचना जात नव्हती.आमचा सर्वसाधारण डबा नेमका त्या खिडकीच्या साधारण समोरच होता.मला खूप संताप आला होता.एका क्षणी मी कांही विचार न करता, बरोबरच्या मंडळीपैकी कोणालाही न सांगता गाडीतून उतरलो आणि सरळ त्या अॉफीसमध्ये आत शिरलो.त्याच वेळी एक प्रवासी तिकीट घेण्यासाठी आत आला व एका टेबलपाशी उभा राहिला.खिडकीवरचा क्लार्क हिशोब करत होता.तिथे बसलेल्या दुसऱ्या एका क्लार्कला मी म्हणालो,”मुझे कंप्लेंट बुक चाहिये.”त्याने विचारले “क्यूं ?”मी रागातच म्हणालो,”I want to write a complaint against this clerk, who has booked tickets inside by receiving bribe.”हे ऐकताक्षणीच त्या खिडकीवरच्या क्लार्कने आपल्या गल्ल्यातल्या बचक्यात येतील तेवढ्या नोटा उचलल्या आणि माझ्याजवळ येऊन माझ्या शर्टाच्या गळ्याकडून माझ्या शर्टाच्या आत खोंचल्या.त्याचबरोबर तिथे असलेल्या पोर्टरला दार बंद करायला आणि पोलिसांना बोलवायला सांगितले.मी अंगावरच्या नोटा काढून टाकल्या.पण दार बंद केल्यामुळे मी आंत अडकलो.पळून जाण्याचे माझ्या मनातही आले नाही.बाहेर जाणाऱ्या पोर्टरला मीही सांगितले,”पोलिसके साथ स्टेशन मास्टरकोभी बुलाईये.”दार बंद केल्याने तो दुसरा प्रवासीही आतच राहिला.मी त्या तरूणाला विनंती केली,”Please be here as you have witnessed what has happened.”
▪
पाच सहा मिनिटांतच दरवाजा वाजला.त्या क्लार्कने आतली कडी काढली.पोर्टर पोलिसाना घेऊन आला होता.त्यांत एक इन्स्पेक्टर व एक पोलिस होता.मी सांगितल्याप्रमाणे सुदैवाने पोर्टर स्टेशन मास्तरनाही घेऊन आला होता.ती सर्व मंडळी दाखल होताच, त्या क्लार्कने इन्स्पेक्टरना मी गल्ल्यातली रोकड चोरल्याचे सांगितले.इन्स्पेक्टरनी मला कांही न विचारतां, माझ्याशी कांही न बोलता आपल्या बरोबरच्या शिपायाला लिहायला सांगू लागला.त्याने “डीक्टेशन” सुरू करताच, मी स्टेशन मास्तरना म्हणालो,”I am an officer of the Reserve Bank of India.Allegation of stealing cash is baseless.He is trying to implicate me because I want to register a complaint against him that he was taking bribe and issuing reservation inside, while we waited in queue outside.”स्टेशन मास्तरनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं.परंतु इन्स्पेक्टर साहेब भडकले आणि म्हणाले,”आप रिझर्व्ह बँकके अॉफीसर होगे या प्राईम मिनीस्टरके बँकके.हमको उससे कुछ लेना देना नही.हमारे पास कम्प्लेंट आयी है, हम कारवाई करेंगे.”मी पुन्हा स्टेशन मास्तरना आणि पोलिस इन्स्पेक्टरलाही उद्देशून म्हणालो,”You may go ahead with your charges but remember they won’t stick as I am Reserve Bank Officer (it was option period though I was in IDBI). Secondly, my relatives are sitting in the train on the platform, please inform them about it. You can also ask this gentleman about how notes were thrist upon me to implicate me.”तो तरूण प्रवासी त्यावर स्वतःहून बोलला,”क्या तमाशा चल रहा है ये ?”मग स्टेशनमास्तरनी पोर्टरला हुकुम केला,”दरवाजा खोल दो.”पोर्टरने दरवाजा उघडला.मग स्टेशन मास्तर मला म्हणाले,”आप जाईये.”मी म्हणालो,”But I want to record the complaint.”क्लार्क घाबरला,”इनको मत छोडीये. बम्बई जाकर ये कंप्लेंट देंगे.प्लीज इनको मत छोडीये.”मग इन्स्पेक्टर त्याच्यावर ओरडले,”चूप. कंप्लेंट आयेगी तब देखा जायेगा.”स्टेशन मास्तर मला म्हणाले,”If you insist for your complaint, I will have to take his complaint also on record.Please don’t insist for your complaint and leave.”माझा नाईलाज होता.मी घड्याळांत पाहिले तर गाडी सुटायला आठ दहा मिनिटेच राहिली होती.माझ्या बरोबरच्या मंडळींना माहितही नव्हते की मी कुठे आहे ?मी मुकाट्याने बाहेर पडलो आणि गाडीत जाऊन बसलो.गाडी लगेचच सुटली सुध्दा.
▪
मी त्या खोलीत बंदीस्त असताना माझ्याबरोबर रेल्वेत नोकरी करणारे एक नातेवाईक गाडीत होते.त्यांनी प्रवासासाठी घेतलेला रेल्वे पास हरवला होता.हरवला म्हणजे रांगेतून परत जाताना त्यांच्या हातातून प्लॕटफॉर्मवर पडला.गाडीत स्थिरस्थावर झाल्यावर ते पास शोधू लागले.ते आणि एक जण प्लॕटफॉर्मवर पास शोधत असल्यामुळे आणि सर्व जण त्याच चिंतेत असल्यामुळे माझी २०-२५ मिनिटांची अनुपस्थिती कोणाच्या फारशी लक्षात आली नाही.गाडीत बसलेल्या माझ्या कुटुंबियांना वाटलं की मीही पास शोधायला उतरलो होतो.मला त्यांचा पास हरवल्याच माहितही नव्हतं.गाडी सुरू झाल्यावर मी माझ्यावरचा प्रसंग सांगितला.मी बालंबाल बचावलो असंच सर्वांच मत झालं.माझ्या पत्नीला तर काय झालं असतं त्याच्या कल्पनेनेच भीती वाटली.ते आणीबाणीचे दिवस होते.एकदा पकडला गेलो असतो तर किती काळ कुणालाही पत्ता न लागता खितपत पडलो असतो कुणास ठाऊक ?गल्ल्यातले पैसे चोरल्याचा आरोप रिझर्व्ह बँक अॉफीसरवर टिकला नसताच.पण आरोप काय बदलता येतात.माझी ओळखही त्यांनी वेगळीच दिली असती तर !केवळ स्टेशन मास्तरच्या सद्बुद्धीमुळे वाचलो.मुंबईला आल्यावर त्या क्लार्कविरूध्द पत्राने तक्रार करणे फोल वाटले.एक तर त्याची दाद बहुदा घेतली गेली नसती आणि त्या तक्रारीच्या पाठपुराव्यासाठी जर मला जम्मूच्या एक दोन फेऱ्या जरी घालायला लागल्या असत्या तरी मलाच ते क्लेशदायक झालं असतं.त्याचं कर्म आणि तो, असा हिंदु तत्त्वज्ञानाशी सुसंगत विचार करून मी तक्रारीचा विचार सोडून दिला.असे हे दोन प्रसंग.ह्यानंतर मी सावध राहून नाकासमोर बघून प्रवास केला आणि पोलिसांचा संपर्क सर्व शहाण्या मुंबईकरांप्रमाणे मीही टाळला.पण पहिल्या व दुसऱ्या भागातले अनुभव अनेकांपाशी बोललो कारण “पुढच्यास ठेंच, मागचा शहाणा” ह्या न्यायाने त्यानी सावध रहावं म्हणून.पहिल्या भागानंतर अनेकांनी त्यांचे रेल्वे पोलिसांबद्दलचे सादृश्य असलेले अनुभव सांगितले.तुम्हीही काळजी घ्या.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply