नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ६ – संपूर्ण कोकणाला सुंगंधीत करणारा – सुरंगी वृक्ष

सुरंगीचे शास्त्रीय नाव Mammea suriga.हा कॅलोफायलेसी कुळातील वृक्ष आहे. (गोडी उंडी, पुन्नाग; हिं. नागकेसर, सुरंगी; गु. रतिनागकेसर; क. गार्दुंडी, पुने; सं. पुन्नाग, नागकेसर; लॅ. Mammea suriga). सुमारे १२–१८ मी. उंचीचा (घेर साधारण १.८मी.) हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत (समुद्र सपाटीपासून पासून सु. ६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. तो ओडिशा, बिहार तसेच मादागास्कर, न्यू गिनी, आफ्रिका व फिजी येथील प्रदेशांत लावलेला आढळतो.

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली परिसरात आढळणारा एक वृक्ष. सुरंगी ही पश्‍चिम घाटाची मक्‍तेदारी आहे. तरीही पूर्ण पश्‍चिम घाटात हा वृक्ष आढळत नाही. यावर फारसे संशोधनही झालेले नाही; मात्र वेंगुर्ले तालुक्‍यातील काही गावांची अर्थव्यवस्था पूर्णतः सुरंगीवर अवलंबून आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्‍यातील काही भाग यासाठी पोषक मानला जातो. आरवली, सोन्सुरे, टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल, कोलगाव, आकेरी या गावांमध्ये सुरंगीची संख्या बऱ्यापैकी आहे. या भागातील जवळपास ८०० कुटुंबे सुरंगीच्या माध्यमातून आपले अर्थार्जन चालवतात. कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार जिल्हाभर सुरंगीच्या पसरलेल्या नैसर्गिक लागवडीचे क्षेत्र साधारण ४० ते ४२ हेक्‍टर इतके आहे.

साल विटकरी रंगाची, जाड, खवलेदार व काळसर ठिपक्यांची असून त्यातून लालसर डिंक स्रवतो. पाने साधी, मोठी, रुंद, अंडाकृती, संमुख, चिवट, तीक्ष्णाग्र, कडा किंचित तरंगित; फुले (फेब्रुवारी-मार्चमध्ये येणारी) कक्षास्थ, बहुयुतिक, पांढरी व त्यावर नारिंगी रेषा, सुगंधी, साधारण १•७ सेंमी. व्यास असलेली व झुबक्यांनी येतात. संदले २, प्रदले ४ व लवकर गळणारी; केसरदले असंख्य; स्त्री-पुष्पात वंध्य केसरदल; किंजपुटात दोन कप्पे; फुले होळीच्या वेळी फुलतात. मृदुफळे पावसाळ्यात पिकतात. ती रसाळ व खाद्य असतात. फळ साधारण गोल व तीक्ष्णाग्र असते; बिया १–४ असतात. या वृक्षाची पाने तकतकीत असतात. याच्या खोडालाच भरपूर फुले लागतात. ही फुले दिसावयास फार सुंदर असतात.

फळाच्या पिवळट सोनेरी रंगावरुन या झाडाचे लॅटिन प्रजातिवाचक नाव (ऑक्रो –पिवळे; कार्पस –फळ) हे जुने लॅटिन नाव पडले होते. समोरासमोर चार इवल्याश्या पाकळ्यांचा पांढरा पुष्प संभार, चार पाकळीचे फूल तसं क्वचितच दिसते.
हा वृक्ष महाराष्ट्र,गोवा, व पश्चिम किनारपट्टीवर मर्यादित आहे. साधारणतः सुमुद्रकिनारी व पक्षांनी बिया वाहून आणल्यामुळे घाट जंगलात आढळतो. तळकोकणातील सिंधुदुर्गात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. सुरंगी हे संरक्षित करण्याची गरज असलेले झाड आहे. ते (पश्‍चिम घाटातील) सर्वच भागात होत नाही. जो लागवड योग्य भाग आहे तेथे प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत दोन झाडे लावली तरी हा वृक्ष संरक्षित होईल व त्या कुटुंबाला यातून उत्पन्नही मिळेल.

सुरंगीचे झाड साधारण चिकू, आंब्यासारखे मोठे असते. हे झाड चिवट असते. सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते ७०-८० वर्षे जगते. फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चपर्यंत साधारण दोन बहरात फुलते. याच्या खोडालाच कळ्या येतात. ह्याच्या खोड-फांद्यांतून विशिष्टपणे लागणार्या कळ्या म्हणजे जणू देठाला लागलेले मोतीच.
सुरंगीमध्ये दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हींची झाडे सारखीच असतात. फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात, तर वासाच्या सुरंगीत कमी.

सुरंगीच्या फुलांचे वैशिष्ट :

निसर्गाने मुक्तहस्ते उधळलेली ही सुगंधयात्रा. होळी जवळ आली की सुरंगीच्या गजऱ्यांची आठवण येते. आजकाल खूप दुर्मीळ झालेली सुरंगी ही मार्च महिन्यापासून दोन बहरांत फुलते. सुरंगीच्या कळ्या झाडाच्या खोडालाच लागतात. सुरंगीच्या कळ्या काढणे म्हणजे जोखिमीचे काम असते. कळ्या काढण्यासाठी झाडावर चढावे लागते व एक एक झालेली कळी काढावी लागते. ह्या कळ्याच काढाव्या लागतात. जर फूल उमलले तर गजरा करताना त्रास होतो. साधारण १० वाजता म्हणजे सुर्यप्रकाश पूर्ण आल्यावर ह्या कळ्यांचे फुलात रूपांतर होऊन झाड पिवळे दिसू लागते.

फुलांच्या सुगंधामुळे ह्या झाडावर साप येतात असेही म्हणतात. एवढी जोखीम आणि मेहनत घेऊन सुरंगीच्या ह्या गजऱ्यांना जास्त भाव नसतो. झाडाच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्‍य होते. फुले छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. शिवाय तो संध्याकाळी कोमेजतो. सुरंगीच्या फुलांचा मंत्रमुग्ध करणारा वास स्त्रियांना आकर्षित करतो. केसांमध्ये माळलेला गजरा सुकल्यावर काढला तरी पूर्ण दिवस ह्या फुलांचा वास केसांमध्ये राहतो. पूर्वी होळीला ह्या गजऱ्यांना खूप मागणी असे.तेव्हा हे गजरे भेट म्हणूनच वाटले जायचे. गोव्यातील व कोकणातील स्त्रियांना सुरंगीची वेणी खूप आवडते. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसर पांढऱ्या फुलांचा सुगंध आसमंतात दरवळतो. झाड बहरायच्या वयात आल्यानंतर किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो. सुरंगीचे फुल हे भारतातील सुंगंधीत फुलांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर येते.

एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण ३० – ३५  किलो सुरंगी मिळते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो. फुलांमधील मधूरस टिपण्यासाठी ह्या झाडावर माशांचीही सुरात भुणभूण चालू असते.
सुरंगीच्या गजर्‍याला कोंकणांत प्रचलित असणारे वळेसर हे नाव त्या गजर्‍याच्या कलाकृतीला अगदी समर्पक आहे.
यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. सुरंगीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे खूप आहेत. हा जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. याची विशेष देखभाल घ्यावी लागत असल्याने खते व इतर खर्च होत नाही. असे डॉ. पराग हळदणकर सारखे शास्त्रज्ञ म्हणतात. परंतु सद्धया ह्या वृक्षांची संख्या कमी होऊ लागली आहे. यासाठी कोकणातील वाडी वस्तीत प्रत्येक घरापुढे हे वृक्ष लावावयास हवेत.

उपयोग:

सुकलेल्या कळ्या रेशमाला लाल रंग देण्यास वापरतात; त्यांना ‘तांबडा नागकेसर’ असे व्यापारी नाव आहे. सुवासिक फुले पूजेसाठी व शरीर सुशोभित करण्यास वापरतात तसेच त्यापासून अत्तर काढतात. लाकूड लाल, कठीण व टिकाऊ असल्याने घरबांधणीस उपयुक्त असते. ताज्या कळ्या सौम्य उत्तेजक, वायुसारक आणि स्तंभक असून अग्निमांद्य व मूळव्याधीवर गुणकारी असतात.

सुरंगी फुलापासून पूर्वी उत्तम प्रतीचे अत्तर मिळत होते. पण ह्या घडीला कच्च्या मालाची वानवा आणि अत्तर काढण्याची कला माहित असणारे लोक मिळत नाहीत.

सुरंगीचे अर्थकारण:

आरवली, सोन्सुरे,टाक, आसोली, धाकोरे, फणसखोल, वडखोल या वेंगुर्ले तालुक्‍यातील सात गावांत खऱ्या अर्थाने सुरंगीचा व्यापारी दृष्टिकोनातून विचार होतो. कोलगाव, आकेरीत सुरंगीचे गजरे करण्याचा व्यवसाय चालतो. इतर गावांत मात्र सुरंगीचे कळे सुकवून ते विकले जातात. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण ३० ते ३५ किलो सुरंगी कळा
मिळतो. याचा दर साधारण एक हजार रुपयापासून अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत असतो. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ८०० कुटुंबांचा सहभाग असतो. एका कुटुंबाला यातून एका हंगामाला पन्नास हजार ते साडेपाच-सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो. प्रत्येकी सर्वसाधारण उत्पन्न दोन लाखाचे धरले तरी एकूण उलाढाल १६ कोटींची होते. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही. अवघे पंधरा-वीस दिवस काम करून त्यावर वर्षभर आरामात जगणारी कुटुंबेही या भागात आहेत. अवघ्या पंधरा-वीस दिवसांचा मोसम असला तरी त्यासाठीची मेहनत तितकीच मोठी आहे.

असे आहे अर्थकारण. सुरंगीचा व्यापार करणाऱ्या गावांची संख्या ९, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभार्थी कुटुंब -८०० प्रत्येक कुटुंबाचे प्रतिहंगाम सरासरी उत्पन्न २,००,००० रुपये. प्रतिहंगाम वार्षिक उलाढाल १६ कोटी

सुरंगीच्या विकासाचे प्रयत्न:
सुरंगीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे खूप आहेत. हा जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. याची विशेष देखभाल घ्यावी लागत असल्याने खते व इतर खर्च होत नाही. याच्या फुलांमध्ये परागीकरणाची क्षमता जास्त असल्याने आंबा, काजूसह इतर पिकांना फायदा होतो; मात्र प्रमाणित कलम किंवा झाड नसल्याने आत्तापर्यंत याची स्वतंत्र
लागवड होत नव्हती. ग्रामीण विकास क्षेत्रात काम करणाऱ्या लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने २०१४ मध्ये यावरील संशोधनाला चालना दिली. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने सुरंगीवर संशोधन केले. बऱ्याच प्रयत्नानंतर सुरंगीचे प्रमाणित रोप बनविण्यात यश आले; मात्र अद्याप पुरेशा प्रमाणात याची कलमे बनविण्यात आलेली नाही. त्यामुळे ती सहज उपलब्ध नाहीत. लुपिनतर्फे सुरंगी कलम बसविण्याचे प्रशिक्षण नर्सरीधारकांना दिले जाणार आहे. यामुळे पुढच्या काळात सुरंगीची कलमे सहज उपलब्ध होणार आहे.

ह्या वृक्षाचे उतिसंवर्धन द्वारा जतन व संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात शिमोगा विद्यापीठातील डॉ. कृष्णा यांच्या बरोबर असलेल्या चमूचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे सुधारित व उत्कृष्ट्य रोपे उपलब्ध होतील. सुरंगीला संरक्षित प्रजातींमधील झाड म्हणून घोषीत करण्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली आहे.

सुरंगीचे कळ्या गोळा करण्याचे काम खूप जोखमीचे आहे. नंतरही ते नीट सुकवून सुरंगीची लागवड पूर्ण पश्‍चिम घाटात होऊ शकते. याच्या लागवडीला चालना देणे गरजेचे आहे. याला चांगले मार्केट आहे. ‘एमआरजीएस’सारख्या योजनेखाली सुरंगी लागवड आणून याला प्रोत्साहन देणे शक्‍य आहे. उत्कृष्ट आंतरपीक ठरणाऱ्या सुरंगीमुळे मधमाशांची संख्या वाढून आंबा, काजू आदी पिकांना परागीकरणासाठी फायदा होतो.

सुरंगी क्षेत्र वाढले तर
• शेतबांधाच्या कडेवर लागवड शक्य
• जंगली श्‍वापदांपासून धोका नाही
• वातावरण बदलाचा विशेष परिणाम नाही
• मशागतीचा खर्चही कमी
• आंतरपीक म्हणून लागवड शक्य
• चांगली बाजारपेठ उपलब्ध
• परागीकरणाची क्षमता जास्त असल्याने इतर पिकांना फायदा
• अवघे पंधरा-वीस दिवस काम करून त्यावर वर्षभर आरामात कुटुंबाला जगता येते.

साहित्यातील सुरंगी:

“बांधिला सैलसा बुचडा मानेवरी,माळिला सुरंगी गजरा गं त्यावरी … मोकळ्या बटा या रुळती भाळावरी,
केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा, आई मला नेसव शालू नवा…” अशा शब्दात कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर, यौवना, तिच्या केसांच्या बटा, शालू आणि सुरंगीचे फुल यामधल्या नात्याचा मोहक कशिदा विणतात. मत्त करणारा सुवास! उंडीभर फुले! हं! म्हणून रान उंडी होय ह्याचं नाव! अशी एक पारंपरिक कविता आहे.

नक्षत्रांचे देणे लाभलेल्या खानोलकरांना मृत्यूशय्येवर देखील स्फुरले हे अद्भुत काव्य अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज पडावे आणि सरावा प्रवास सारा .”

संदर्भ:

विकिपेडिया

गुगल वरील बरेच लेख.

दैनिक गोमन्तक १३ जानेवारी,२०२२

जागू-प्राजक्ता- १४ मार्च २०१७- लेखक – मु. महाजन

SEED GERMINATION AND MICROPROPAGATION STUDIES OF MAMMEA SURIGA KOSTERM Sudhesh Shastri, Krishna Venkatarangaiah, Ajith Sheshagiri (2020) Biotechnology Vol. 10 No. 2

योगेश प्रभू,

(व्यवस्थापक, लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग.)

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 68 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ६ – संपूर्ण कोकणाला सुंगंधीत करणारा – सुरंगी वृक्ष

  1. डॉ.कुलकर्णी ह्याचा सुरंगी वरचा लेख नुकताच वाचनात आला. तसा मी कोकणातला, परंतु पुण्यात आयुष्य गेल्याने सुरंगी व्रृक्ष अपरीचीतच. विविध औषधी गुणाने परिसंप्पन असलेला हा व्रृक्ष आदिवासी ना वरदानच म्हणावं असा आहे. सुरंगी चा फुलांचा हंगाम केवळ २-३ आठवडे असुन सुद्धा एक कुटुंब ५० हजार ते २ लाख रुपये परेंत कमवते व वर्षभर आरामात
    ह्या उपजिवेकिवर काढू शकते ह्या चे खर्च आश्चर्य वाटते.तसे बघीतले तर मग, फळ फारसी उपयोगी नाही. साहित्याची सुरंगी म्हणत लेखकाने अगदी कल्पकतेने ग दि या ची कवितेची कडवी जोडलीत त्या त्यातच लेखाचा सारांश आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..