नवीन लेखन...

संत ज्ञानेश्वर – शुभारंभाचे दोन शब्द

‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे. आपापल्या व्यवस्थापनाची भरभराट ‘याची देही याची डोळा’ पाहिली! काय आहे हे व्यवस्थापनशास्त्र? ज्याला आपण इंग्रजीत Manegement असं म्हणतो, ही कल्पना खरं तर पूर्वीपासूनच आपल्याकडे होती. गेल्या दोन-तीन दशकांत ‘मॅनेजमेंट’ या विषयावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आणि ती हातोहात खपली सुद्धा. ‘व्यवस्था’ आणि ‘तिची कार्यपद्धती’ या दोन्हीचा समावेश ‘व्यवस्थापनशास्त्रा’त होतो आणि मग जेव्हा त्याला आपण इंग्रजी भाषेचा मुलामा चढवतो तेव्हा ते ‘Manegement Science’ होते. सुदैवाची गोष्ट अशी की, आपल्याकडील संतसाहित्यात या व्यवस्थापनशास्त्राची पाळेमुळे अगदी स्पष्टपणे आढळतात, त्यापैकी एक मननीय, चिंतनीय आणि श्रवणीय असलेला ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’!

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे. आत्तापर्यंत लक्षावधी जनता या ज्ञानेश्वरीच्या पारायणाने, श्रवणाने पावन झाली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ म्हणजे ‘अध्यात्म’ आहे आणि आता कशाला अध्यात्माच्या नादाला लागायचं. वयाच्या साठी नंतर पाहू, असा विचार करणारी महान मंडळी याच महाराष्ट्राच्या पावन भूमीत आहे, फरक एवढाच की, माझ्यासारखे वाचक जीवनाला चिरंतन समृद्ध करणारे साहित्य म्हणून ज्ञानेश्वरी वाचनाकडे वळतात आणि इतरांना मात्र हा (अध्यात्माच्या मार्गाला लागला असं वाटतं. ‘ज्ञानेश्वरी’ ज्या काळी लिहिली गेली, त्या वेळी जरी तिची भाषाा सर्वांना सुबोध होती, तरी कालांतराने तिच्यामध्ये बदल होऊन तिचा अर्थ लोकांना कळेनासा झाला याची दोन कारणे होती. एक तर नकलाकारांच्या अज्ञानामुळे किंवा निष्काळजी-पणामुळे ती दूषित झाली किंवा तिच्या भाषेत कालांतराने बदल झाला. पहिल्या कारणामुळे ज्ञानेश्वरीला प्राप्त झालेला दुर्बोधपणा घालविण्यासाठी संत एकनाथांनी तिची पाठशुद्धी केली.

ज्ञानेश्वरी वाचताना शब्दांचे अर्थ पाहून ओव्यांचे अर्थ लावता येतीलच, असे नाही. ज्ञानेश्वरीत अनेक शब्द निरनिराळ्या अर्थी आलेले आहेत, त्यांच्या छटांमध्येही आमूलाग्र वैविध्य आहे. यासाठी निरनिराळ्या संदर्भात आलेले शब्द जर एकत्र केले व व्यवस्थापनाच्या दृष्टीने ते संदर्भ देऊन, अन्वय लावून समजावून घेतले तर ओव्यांचे अर्थ लावणे सोपे होईल, असा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. ज्ञानेश्वरीतील विविध अध्यायांतील ज्या ज्या ओव्यांमध्ये व्यवस्थानाचं सूत्र प्रमुख्याने वर उल्लेखिल्याप्रमाणे अर्थ लावून जाणवले, त्या त्या ओव्यांचाच विचार या पुस्तकात केला गेला आहे. ज्ञानेश्वरीचे वाचन, अध्ययन, मनन, चिंतन आणि संशोधन करण्याच्या दृष्टीने उपयोगी असणारी वै. सोनोपंत दांडेकर यांची ज्ञानेश्वरी प्रमाण मानली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ या बहुआयामी ग्रंथाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, त्यात काय शोधायचा प्रयत्न करतो, त्यानुसारच ती ‘ज्ञानेश्वरी’ आपणास दृष्टांत देते. मूळ भगवद्गीतेवर आधारित अशी ही ज्ञानदेवांनी लिहिलेली ‘भावार्थ दीपिका’ ही खरं तर सर्वच क्षेत्रांतील अभ्यासकास मार्गदर्शक आहे. हे पुस्तक म्हणजे व्यवस्थापनशास्त्राचे इत्यंभूत ज्ञान देणारे अथवा व्यवस्थापनशास्त्राविषयी परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही; परंतु जगातील तमाम तथाकथित ‘मॅनेजमेंन्ट गुरु’ जे शिकवतात, त्यातला काही भाग तरी या ज्ञानेश्वरीत आपल्याला आढळतो का? व्यवस्थापनशास्त्राचे प्रतिबिंब ज्ञानेश्वरीत आपल्याला कुठे कुठे जाणवते? या उद्देशाने एक व्यवस्थापनशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागलो, तेव्हा माझ्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्त असे ‘व्यवस्थापनाचे’ पैलू मला ज्ञानेश्वरीत आढळले आणि मला जसे समजले तसे ते वाचकांपुढे सादर करण्यात आले. या ज्ञानेश्वरीतील व्यवस्थापन संशोधनाच्या कार्यात ज्येष्ठ उद्योजकीय साहित्यिक लेखक व कवी गंगाधर महाम्बरे यांचे मला अनमोल असे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या श्रद्धेय श्रीगुरू सुषमा करंदीकर पबारी यांचेही आशीर्वाद लाभले. संतसाहित्याचे अभ्यासक व पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांचे मार्गदर्शन लाभणे ही माझ्यासाठी एक पर्वणीच होती. आमचे कौटुंबिक स्नेही समस्त शरदचंद्र तथा आबा अवचट आणि कुटुंबीय तसेच माझे स्नेही श्री. अरविंद बीडकर व अरुंधती पोतदार यांनी या लेखन काळात सातत्याने प्रोत्साहनाची व संदर्भ साहित्य पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या पुस्तकाला परमसंगणक निर्माते शास्त्रज्ञ संतसाहित्य अभ्यासक डॉ. विजय भटकर यांनी प्रस्तावना लिहून माझा उत्साह द्विगुणीत केला. माझ्या कार्यालयीन सहकारी राजश्री मिरजकर, संतोष कपटकर आणि माझे कुटुंबीय यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नसता. ‘व्यवस्थापनतज्ज्ञ – संत ज्ञानेश्वर’ या पुस्तकाचे उत्साही तरूण प्रकाशक ‘नंदिनी पब्लिशिंग हाऊस’चे सौ. नंदिनी आणि संतोष तांबोळी यांनी अत्यंत देखणी अशी मांडणी केली आणि त्याला चित्रकार नितीन बुधगावकर यांनी तितकेच तोलामोलाचे मुखपृष्ठ करून दिले. या सर्वांचेच पाठबळ केवळ ज्ञानेश्वर माउलींच्याच कृपेने प्राप्त झाले. जिज्ञासू वाचकांना, अभ्यासकांना ज्ञानेश्वरीचा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा मागोवा निश्चितच उपयुक्त ठरेल अशी खात्री वाटते.

-मंगेश कश्यप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..