नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ४ – त्रिफळा चूर्णातील महत्वाचा घटक – बेहडा वृक्ष

लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट.
बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी ने शहारलेला, हिरव्यागार पानांनी नटलेला आणि पिवळसर बहराने लगडलेला अशी आल्हाददायक तर पूर्ण पानझडी होऊन फक्त खोड राहिलेला निष्पर्ण अशी वर्षभर नानाविध रूप धारण करणारा बेहडा. हाच बेहडा अनेक वेळा आपल्या ढोल्या असणाऱ्या खोडामुळे ढोलीत घरटे करणाऱ्या पक्ष्यांचा आवडता वृक्ष.. पोपट, मैना, पिंगळा, मलबारी धनेश, राखी धनेश, महा धनेश, घुबडं असे अनेक पक्षी याच्या ढोल्यांमध्ये आपल्या पिलांना जन्म देतात.

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया बेलिरिका आहे. तो मूळचा आग्नेय आशियातील असून फळे व लाकूड यांसाठी त्याची लागवड करतात. हिरडा, अर्जुन आणि ऐन या वनस्पतीही याच कुलातील आहेत. म्यानमार, श्रीलंका आणि भारत या देशांतील मिश्रवनांत बेहडा आढळतो. कोकणात त्याला भेडा किंवा हेला असेही म्हणतात. तो एक आकर्षक वृक्ष असून वनीकरणासाठी, रस्त्याच्या कडेला सावलीसाठी व बागांमध्ये शोभेसाठी लावतात. कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत, वामनपुराण इ. ग्रंथांत याचे उल्लेख आले आहेत.

भारतीय भाषां मधील याची नावे:

शास्त्रीय नाव: Terminalia bellirica

इंग्रजी: bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan

आसामी: बौरी

बंगाली: বহেড়া बहेडा

गुजराती: બહેડા बहेडा

हिंदी: बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल

मराठी: बेहडा , बिभीतक , कलिद्रुम, वेहळा, हेळा किंवा भेळा

बेहडा आणि हिरडा हे प्रामुख्याने सदाहरित जंगलात आढळतात. हे वृक्ष भारतात बहुतांश ठिकाणी आढळतो. या वृक्षांचे औषधी उपयोग तर आहेतच, शिवाय त्याच्या लाकडाचेही उपयोग होतात. इतर वनवृक्षांच्या मानाने या वृक्षाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे वनीकरणासाठी या वृक्षांची लागवड करावी. हा उंच वाढणारा सदाहरित/पर्णझडी वृक्ष आहे.

भारतामध्ये सखल भागात अगदी हिमालयाच्या पायथ्यापासून, समशीतोष्ण आर्द्र पर्णझडी, शुष्क पर्णझडी जंगलामध्ये हा वृक्ष आढळून येतो. महाराष्ट्रात पश्चिम घाटात आंबोली, पाचगाव,चांदोली, महाबळेश्वर, गगनबावडा इत्यादी ठिकाणी हा वृक्ष आढळून येतो. साल वृक्ष व साग वृक्षांच्या जंगलात हा वृक्ष प्रामुख्याने आढळतो. सुमारे १०-१२ मीटर वाढणाऱ्या या वृक्षाच्या खोडाच्या तळास “बट्रेस’मुळे असतात. फांद्यांच्या टोकाला घोळक्‍याने पाने आलेली असतात. काहीशी अंडाकृती, गोलाकार पाने असतात. फुले पिवळसर-पांढरट गुच्छात बिनदेठाची असतात. साल राखाडी रंगाची असून त्यावर अनेक लहानलहान उभ्या भेगा असतात. कोवळी पालवी लालसर रंगाची असते. पाने साधी, एकाआड एक व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकाला एकत्रितपणे वाढलेली असतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात फळे गोलाकार परिपक्व झाल्यानंतर बदामी होतात. यामध्ये च्युबुलॅजिक ऍसिड, इलाजिक ऍसिड, इथिल ईस्टर, गॅलिक ऍसिड; ग्लुकोज, मॅनीटॉल, रामनोज हे रासायनिक घटक असतात. फळांचा उपयोग मुख्यत्वे करून त्रिफळा चूर्णामध्ये एक घटक म्हणून केला जातो.

हिरडा व बेहडा हे एकाच कुळातील वृक्ष आहेत पण प्रजाती (species) वेगळी आहे. परंतु त्यात महत्वाचे फरक आहेत.

हिरडा बेहडा
१. १५-२० मीटर उंच ४० ते ५० मीटर उंच वाढतो
२. पानांचा आकार लांबट पानांचा आकार लहान व कपासारखा
३. खोड व लाकूड टणक व टिकाऊ लाकूड टिकाऊ नसते
४. खोडाची साल टणक पण मऊ खोडाची साल खरबरीत जाड व भेगा असलेली
५. फळे गोलसर लांब, आकाराने लहान फळे मोठी, अंडाकृती, टोकांना निमुळती फिक्कट गुलाबी रंगाची राखाडी रंगाची. प्रत्येक फळात एकच बी असते.
७. मंजिरी सरळ असतात. मंजिरी लोम्बत्या असतात.

                                                
फेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाने गळून पडतात आणि त्यानंतर बेहडा फुलायला लागतो. फुले अगदी लहान व पिवळट असून त्यांना एक प्रकारचा उग्र वास असतो. अनाकर्षक फुलांच्या असंख्य तुऱ्यांनी वृक्ष मोहरल्यावर जमिनीवर वाळलेल्या फुलांचा सडा पडतो. बेहडा वृक्ष त्याच्या फळांसाठी प्रसिद्ध असून फळे उन्हाळ्यात लागतात. फळे (म्हणजे बेहडे) आठळीयुक्त, २-३ सेंमी. व्यासाची, लंबगोल आणि तपकिरी असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. ही फळे पक्षी, खारी, माकडे आणि शेळ्यामेंढ्या तसेच हरिणे खातात. उन्हाळ्यात बेहड्याच्या झाडाखाली फळे पडलेली दिसून येतात.

लागवड:

परिपक्व फळे रोगविरहित मध्यम वयाच्या झाडापासून गोळा करून ती सावलीत वाळवावीत. फळांवरील आवरण पक्षी, माकडे, खारूताई, प्राणी आवडीने खातात, असे बियाणे जमा करून पेरल्यास रोपे चांगली येतात. एका किलोत ५०-६० ताजी फळे असतात. फळावरील आवरण काढून टाकल्यास ४००-५०० बिया एका किलोत असतात. आवरण काढून बियाणे चांगले वाळविल्यास ते एक वर्षापर्यंत साठविता येते. आवरण काढण्यासाठी फळे २४ तास पाण्यात ठेवल्यास ते काढण्यास सोपे जाते. साठवून ठेवलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता ८५ते ९५ टक्केपर्यंत मिळते, परंतु रोपेनिर्मितीसाठी ताजे बियाणे वापरले असता रोपे दर्जेदार होतात. त्यामुळे ज्या वर्षीचे बियाणे त्याच वर्षी वापरावे. बियाणे गादीवाफ्यावर पेरताना दोन ओळींतील अंतर २० सें.मी. व दोन बियांतील अंतर पाच सें.मी. ठेवून पेरावे. साधारणतः २१ दिवसांनंतर बियाणे उगवण्यास सुरवात होते. रोपांना आवश्‍यकतेनुसार पाणी देणे आवश्‍यक असते. तणकाढणी, खते, कीडनाशकांची फवारणी रोपांच्या वाढीनुसार करावी. सुरवातीला रोपांवर पाने कुरतडणारी अळी आढळून येते. रोपे एक महिन्याची झाल्यानंतर पिशवीत इजा न होता टाकून घ्यावी.बेहडा वृक्षाची लागवड बियांपासून, रोपे तयार करून, खुंटांपासून केली जाते. खुंटनिर्मितीसाठी १२-१५ महिन्यांची रोपे वापरावीत. लागवडीसाठी २ x २ x २फुटांचा खड्डा घेऊन ७ x ७ मीटर अंतराने लागवड करावी. मध्यम निचरा होणारी जमीन या वृक्षास चांगली मानवते.

लागवडीनंतर सुमारे आठ ते दहा वर्षांनंतर फळे मिळण्यास सुरवात होते. चांगल्या मोठ्या वाढलेल्या झाडापासून ५० ते १०० किलोपर्यंत फळे मिळतात.

उपयोग:
फळांचे टरफल जुलाब व कफ कमी करणारे आहे, तसेच सर्दी, पडसे, खोकला, दमा विकारात उपयुक्त असते. स्वरभंगावरती बेहडा फळे भाजून चघळतात. लाकडाचा उपयोग इमारत व मोटारीचे साटे, फळांसाठी खोके, प्लायवूड, ब्लॅकबोर्ड तयार करण्यासाठी केला जातो. ब्रूहत् संहितेत याचा घरबांधणीस उपयोग करू नये असेही नमूद आहे.

औषधी उपयोग:

१) डोळ्यात अंजन करून घातल्यास डोळ्याचे रोग दूर करतो.
२) शरीरातील कुठल्याही प्रकारची जळजळ असेलतर दोन तीन चमचे चुर्ण पाण्यात घालून प्या दोन वेळा, त्वचेची आग होत असल्यास लेप देणे जळजळ थांबते.
३) अपचन दुर करुन आमाशय स्ट्राँग बनवतो भूक वाढवतो.
४) मुळव्याधीत अत्यंत गुणकारी.
५) घशाचे विकार, आवाजाच्या त्रासात ही लाभदायक. वातदोष दूर करतो,पित्त दोष दूर करतो,कफ दोष दूर करतो.
६) दमा, अस्थमा, श्वसनासंबधीत आजारात गुणकारी.
७) रोज तीनचार ग्रँम मधात घेतल्यास मुत्रमार्गातील जळजळ इनफेक्शन कमी होते.
८) बेहड्याच्या ताज्या फळांचा मुरंबा कुठल्याही प्रकारचा खोकला दुर करतो.
९) बेहड्याची चारपाच पाने व साखर व थोडी साल ताजी पाण्यात उकळून प्यावे कफ मोकळा होतो बेटका पडणे बंद होते.
१०) बेहड्याची साल तोंडात धरा कफ खोकला कमी होतो.
११) लहान मुलांना पोटसाफ होत नसेलतर फळ उगाळून अर्धा ते पाव चमच तो रस दोन चमचे दूधात देणे.
१२) बेहड्याचा सालीचे चुर्ण दोन ते पाच ग्रँम लवंग चुर्ण दोन लवंगांचे एकत्रित करून मधात चाटवा कसलेही जुलाब बंद होतील.
१३) बेहड्याचा फळाचे चुर्ण दोन चमचे भांडभर पाण्यात भिजवून सकाळी ते लावा. केस गळणं काही दिवसात बंद होत. केस काळेच राहतात अथवा पांढरे काळे व्हायला लागून गळतीची समस्या बंद होते तीन महीन्यात पुर्ण फरक दिसतो.लावल्यानंतर चार तासाने धुवायचे.
१४) बेहड्याची साल ४०ग्रँम, नवसागर दोन, एक ग्रँम सोन गेरु च मिश्रण करुन ते रोज दोन ग्रँम चुर्ण मधात रोज सकाळी संध्याकाळी घ्या. दमा, अस्थमा दुर होतो, दम्याच्या पंपाची गरज बंद होते.
१५)  बेहड्याच्या सालीचे चुर्ण बकरीच्या दूधात शिजवून थंड झाल्यावर दिवसात तीन वेळा गर मधात दोन ते तीन ग्रँम खालल्यास ही दमा, अस्थमा यातून मोकळीक मिळते.बकरीचे दूध न मिळाल्यास पाच ग्रँम चुर्ण दूधात उकळून हळद व दोन चमचे मध घालून दोनदा घ्या कोठासाफ होऊन श्वसनासंबधीत सर्व विकार दुर होतील.
१६) बेहड्याच एक पान धोतर्याचे एक पान,तमालपत्र एक पान पाने वाळलेली चुर्ण करून रिकाम्या सिगरेटमध्ये अगर चिलमीत घालून प्यायल्यास दमा दुर होतो.पण धोतर्याची मात्रा वाढल्यास माणूस वेडा होतो ,गुंगी येते,नशा चढते रोज प्रयोग करु नये अती त्रास असल्यास करावा.
१७) बेहड्याची साल हिरवी रोज विड्याच्या पानात दोन बदाम व एक गोडांबी घालून खालल्यास कसाही नपुसंक पणा असो महीनाभरात दुर होतो फक्त महीनाभर ब्रम्हचर्य पाळावे.
१८) जनावरांच्या जखमान मध्ये किडे पडलेले असल्यास खत झालेले असल्यास बेहड्याचा सालीचा गर रोज खाण्यात मिक्स करुन दिल्यास आराम पडतो.
१९) डोकेदुखी मध्ये उत्तम.
२०) गुळण्या केल्यास बसलेला घसा ठिक होतो.
२१) रक्तदोष दूर करतो.
२३) पोटातील कृमीनाशक आहे.
२४) राजयक्ष्मा/टीबी/क्षयरोगात लाभदायक.
२५) खोबरेल तेल तिळ तेल पन्नास पन्नास ग्रँम व पन्नास ग्रँम बेहड्याच्या फळांचे चुर्ण घालून उकळून तेल उकळवा गाळून भरून ठेवा रोज रात्री लावा एक केस गळणार नाही
२६) बेहड्याचा५०ग्रँम काढा सकाळी घेतल्यास ताप उतरतो.
२७) बेहडा व जवस यांचा काढा रोज सकाळी दुपारी संध्याकाळी पन्नास एम एल घेतल्या पित्त शांत होते,कफ,सर्दी, खोकला, ताप कमी होतो.
२८) बेहडा चुर्ण पाच ग्रँम, अश्वगंधा चुर्ण पाचग्रँम एकत्रित उकळून नियमितपणे घेतल्यास ह्रदयविकारात आराम मिळतो,बीपी नाँर्मल होते.
२९) जेवणानंतर पाच ग्रँम चुर्ण घेत गेल्यास पचनशक्ती वाढते सर्व अन्न न कुजता पचते.
३०) खोबरेल तेल तिळ तेल पन्नास पन्नास ग्रँम व पन्नास ग्रँम बेहड्याच्या फळांचे चुर्ण घालून उकळून तेल उकळवा गाळून भरून ठेवा रोज रात्री लावा एक केस गळणार नाही.
३१) बेहड्याचा फळांचा लेप उगाळून रांजणवाडी वर बाहेरून लावा रांजणवाडी जाईल.
३२) बेहड्याचा फळांचा लेप शितपित्तावर लावा अंगावरील गांध चट्टे जातील व पाचसहा ग्रँम पावडर मधात घालून घेत जा
३३) तोंडातून खूप लाळ गळत असेलतर बेहडा चुर्ण दोन ग्रँम दोनदा मधात चाटवत जा फरक काही दिवसात दिसेल.
३४) हर्निया च्या गाठीवर बेहड्याचा लेप लावा फरक लगेचच दिसायला लागेल.
३५) सारखी खाज खरूज येतेय बेहड्याच तेल लाव आराम पडेल.
३६) एरंडेल तेलात बेहड्याच्या साली चे चुर्ण उकळून त्याचा लेप गळवा वर लावा ते लवकरच मोकळे होईल.
३७) डोळ्याची दृष्टी सतत कमी होत असेलतर बेहडा चुर्ण दोन ग्रँम बाळंतशेपा दोन ग्रँम व खडीसाखर दोन ग्रँम रोज दोनवेळा खा
३८) बेहड्याच्या फळांचे तेल पिंपल्स, मुरुम, तारुण्यपिटीका,पिंपल्स वर लावल्यास वात,पित्त कफाचे न जाणारे पिंपल्स ही जातात.
३९) बेहड्याची फळे जाळून पाव चमचा भस्म निम्मे सैधव एकत्रित करून घेतल्यास आजारात गेलेली शक्ती परत येते.माणूस नवजवान होतो.
४०) भाजणे,पाखरू चावणे याने त्वचेवर आलेले फोड जाण्यासाठी फळांचा उगाळून लेप लावा
४१) महीलांना कामेच्छा नसल्यास रोज फळ उगाळून ते दोन ग्रँम प्या.
४२) आवळा मुरंब्या सोबत चमचाभर बेहड्याच्या सालीचे चुर्ण घेतल्यास कँल्शियम ची कमतरता पुर्ण होते हाडे,मासपेशी स्ट्राँग होतात.
४३) सोळा कुष्ठ प्रकारा पैकी कुठल्याही प्रकारचे कुष्ठ बेहड्याच्या सालीचे ताजे चुर्ण घेतल्यास दुर होते.
४४) सफेद कोड,गुलाबी डाग,तसेच इतर डाग असणाऱ्या मंडळी नी हे ताज्या सालीचे चुर्ण घेतल्यास कोड कमी होतं ते गोमुत्रात कालवून लावल्यास डाग फिक्के होतात व त्वचा पुर्ववत होते,फक्त वेळ लागतो.
४५) सारख्या उलट्या होत असल्यास दोन ग्रँम चुर्ण मधात चाटवा.
४६) पोटात वायगोळा, वात येत असेल तर दोन ग्रँम मधात घ्या दोनदा.
४७) बेहड्याच्या सालीचे चुर्ण पाण्यात सकाळी संध्याकाळी घेतल्यास कावीळ कमी होते
४८) बेहड्याच्या चुर्णात चमचाभर मध घालून चाटण करा उचकी लगेचच थांबेल. सेवनविधी २ते ५ग्रँम चुर्ण एका वेळी.

झाडाचा औषधी गुणधर्म खरं त्याच्या फळांमध्ये असतो. या झाडाला भरपूर प्रमाणे मध्ये मध्ये फळे येत असतात. फळांचा आकार अंडाकृती असून भुरकट रंगाचा असतो. फळावरील जो वरील भाग असतो तो औषधांमध्ये वापरला जातो. या फळांमध्ये जी बी असते ती फोडल्यानंतर त्यामध्ये गर असतो.

हा गर खायला चवीला काजू सारखा लागतो. हा गर जर जास्त प्रमाणात खाल्ला तर गुंगी येण्याची शक्यता सुद्धा असते. शिवाय डोकेदुखीचा त्रास वाढत जातो.

बेहड्याच्या पावडरचा उपयोग प्रामुख्याने घशाचे विकार असतात तसेच कफप्रधान विकार असतात ते विकार दूर करण्यासाठी केला जातो. जुना श्वास घेण्यास संबंधित व खोकल्याचा आजार असेल तर तो दूर करण्यासाठी बेहडा पावडर मदत करतो.जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहड्याचा पावडर सोबत मध खाल्ल्यास खोकला लवकर बरा होतो. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, खाल्लेले पचत नसेल तर जेवण झाल्यानंतर वेड्याची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये घेतल्यास पोट व पचनसंस्था काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतात.

बेहड्याच्या बियाचे तेल सुद्धा काढतात. या बियांचा पासून बनवलेले तेल यामुळे केस गळतीची समस्या ,केस पातळ झाले असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे तेल सांधेदुखीवर सुद्धा रामबाण औषध ठरते.

आपल्या घशाचा दाह होत असेल तर अशा वेळी बेहड्याची टरफले फक्त चघळली तरी आपल्याला लवकर फरक पडतो.
जर तुम्हाला सतत उचकी येण्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहाडा याच्या बिया मधील गर चाटावा.

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा व्यक्तींनी बेहडाच्या सालीचा चूर्ण म्हणून वापर करावा.
जर तुमची नजर कमजोर असेल यासाठी सुद्धा बेहडा चूर्ण उपयोगी पडते.

बेहडाची पूड आणि मधु यांना एकत्र करुन त्याचा उपयोग काजळ म्हणून करु शकता. त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळण्यास मदत मिळेल.

त्वचा रोगावरही बेहड्याच्य तेलाचा उपयोग करुन त्वचेवर लावल्यामुळे त्वचेवरील खाज, पुरळ कमी होण्यास मदत मिळते.
लेख लिहतांना नवीन जुन्या पुस्तकाचा आधार तसेच इतर संदर्भ यासाठी अभ्यासले असून काही उपाययोजना निरिक्षण व अनुभवातून दिलेल्या आहेत.प्रयोजन केवळ औषधी वनस्पतीची व त्यांच्या उपाययोजना ची सखोल माहिती सर्वांना व्हावी व निरामय आयुष्य जगताना ही औषधे सहाय्यक व्हावीत हे आहे. या शिवाय ही अनेक आयुर्वेदिक औषधे, होमिओपॅथी ची औषधे, वेगवेगळ्या चिकित्सा पध्दतीचे उपाय ही आहेत. वरील उपाय हे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखाली करावेत.

— दिलीप कुलकर्णी.

संदर्भ:

Anil Kumar Dhiman (2006), Ayurvedic drug plants, Daya Publishing House, Delhi
आयुर्वेद प्रचार मासिक, मार्च १०, २०२० वैद्य गजानन

Baheda पेपरबैक – १ जानेवारी २०१९ लेखक डॉ. अनुराग विजय वर्गीस
पॉप्युलर प्रकाशन, जयपूर

बेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच. टीम इये मराठीचिये नगरी एप्रिल १३, २०२२.

मराठी विकिपीडिया

गूगल वरील लेख

आभार: डॉ. दीक्षित जी. बी. माजी विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 68 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ४ – त्रिफळा चूर्णातील महत्वाचा घटक – बेहडा वृक्ष

  1. डॉ. कुलकर्णी ह्यांचा बेहडा वरचा लेख वाचला. बेहड्याचे औषधी गुणधर्म थक्क करणारे आहेत. जणू काय वनस्पती मधील कामधेनू.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..