नवीन लेखन...

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ  – भाग 3

बद्रीनाथपासून साधारण ३ कि.मी. अंतरावर मूर्तीमातेचे मंदीर आहे. सहस्रकवच राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी नर-नारायणाच्या रूपात मूर्तीमातेच्या उदरात प्रवेश केला व भूतलावर प्रगट झाले. त्यामुळे मूर्तीमाता बद्रीनाथाची आई समजून तिची पूजा केली जाते. मूर्तीमातेच्या मंदिराला माता मंदीर म्हणतात. वामन द्वादशीच्या दिवशी बद्रीनाथाची व मातेची भेट घडवून आणली जाते. शृंगारलेली बद्रीनाथाची चांदीची चतुर्भूज उत्सवमूर्ती वाजत गाजत या ठिकाणी आणली जाते. मोठा उत्सव होतो. प्रसाद शिजवला जातो. संपूर्ण दिवस बद्रीनाथ आपल्या मातेच्या सहवासात असतात. या दिवशी बद्रीनाथाचे मंदीर बंद असते.

माता मंदिरापासून २-३ कि.मी. अंतरावर ‘माना’ हे छोटेखानी गाव आहे. प्राचीन काळी या गावाचे नाव ‘मणिभद्र’ असे होते. मणिभद्र या नावाचा एक यक्ष या ठिकाणी रहात होता व त्याच्या नावावरून हे गाव ओळखले जाते, असे या भागातील हे शेवटचे गाव! हे साडेदहा हजार फूट उंचीवरील गाव एके काळी भारत-तिबेट या मधील व्यापार केंद्र होते. माना गावापुढे कोणतेही गाव किंवा वस्ती नाही. माना मार्गे एकेकाळी प्रवासी/यात्रेकरू तिबेट, कैलास-मानसला जात असत. या गावातील एका चहाच्या दुकानावर दुकानदाराने दुकानाची पाटी ‘भारत की आखिर की चाय की दुकान’ अशी लिहून माना गावाची ओळख करून दिली आहे. तसेच वास्तवाची कल्पना दिली आहे.

भोटिया जमातीचे लोक या ठिकाणी राहतात. ह्यांच्या एकूण रूपावरून ते मंगोलियन वंशांचे असावेत असे वाटते. सौंदर्य ही या लोकांना मिळालेली दैवी देणगी आहे, असे त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटू लागते.

हे स्थान तीन गोष्टींसाठी ओळखले जाते. व्यासगुंफा एका प्रचंड शिलाखंडाखाली ही गुंफा निर्माण झाली आहे. या ठिकाणी महर्षी व्यासांनी वेद-पुराणांची रचना केली असे सांगितले जाते. व्यास गुंफेच्या जवळच गणेश गुंफा आहे. या ठिकाणी महर्षी व्यासांनी महाभारत सांगितले व ते श्रीगणेशाने लिहून घेतले असे सांगितले जाते. जवळच, मुचकुंद गुहा आहे. पुढे साधारण अर्धा कि.मी. अंतरावर भीम पूल आहे.

स्वर्गारोहणासाठी पांडव पुढे जात होते त्यावेळी सरस्वती नदीच्या एका मोठ्या घळीने त्यांचा मार्ग अडवला. तेव्हा भीमाने एक प्रचंड शीळा या घळीवर ठेवली व मार्ग मोकळा केला. या शिळेलाच भीमपूल म्हणतात. साधारण १०-१२ फूट लांब व ३-४ फूट रुंद अशी ही शिळा आहे. या ठिकाणी निसर्गाचे एक रौद्र स्वरूप पहायला मिळते. घळीतून प्रचंड आवाज करत वेगाने वाहणारा सरस्वती नदीचा प्रवाह पहाणे मनात भिती उत्पन्न करतो. ह्या निसर्ग निर्मित पुलावरून निसर्गाचे हे रौद्र सौंदर्य अनुभवणे हा एक विलक्षण अनुभव आहे. पुलाच्या एका टोकाला भीमाचे एक छोटेसे मंदीर आहे. या घळीत वाहणारी सरस्वती नदी पुढे थोड्याच अंतरावर अलकनंदेला मिळते. या संगमस्थानाला ‘केशव प्रयाग’ म्हणतात.

मानापासून साधारण ३ कि.मी. अंतरावर ‘वसुधारा प्रपात’ आहे. साधारण ४०० फूट उंचीच्या कड्यावरून जमिनीकडे झेपावणारी जलधारा या परिसरातील निसर्गाचं सौंदर्य खुलवून टाकते. अष्टवसूंनी ह्या जलधारांच्या कुशीत तपोसाधना केली होती अशी श्रद्धा आहे. महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व भीष्माचार्य या अष्टवसूंपैकी एक! वसुधारेपासून ३-४ कि.मी. अंतरावर ‘लक्ष्मीवन’ आहे. ही लक्ष्मीदेवीची तपोभूमी. हीच वाट पुढे सतोपंथ सरोवराकडे जाते. सतोपंथ सरोवर हे अलकनंदा नदीचे उगमस्थान. या परिसरातून स्वर्गरोहिणी पर्वतशृंखलेचे सुंदर दर्शन होते.असे सांगतात की पांडवांनी आपला शेवटचा प्रवास या मार्गाने केला होता.

हा सर्व मार्ग अतिशय रमणीय आहे. अनेक पौराणिक घटना या मार्गाशी निगडित आहेत. पण माना नंतर या वाटेवर कोणत्याही प्रवासी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अनुभवी मार्गदर्शक व किमान ५-६ दिवस पुरेल एवढी अन्नसामुग्री व इतर व्यवस्था बरोबर घेणे आवश्यक आहे. ही सर्व वाट अतीउंचीवरची आहे. हवामानात व वातावरणात होणारे बदल लक्षात घेऊन आवश्यक सामुग्री जवळ असणे आवश्यक आहे व मानसिक तयारी पण हवी.

बद्रीनाथ मंदिराच्या मागे पर्वतात ‘चरण पादुका’ म्हणून एक स्थान आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी डोंगरात ५००-६०० फूट चढून जावे लागते. या ठिकाणी एका शिलाखंडावर पादुका सारखे चिन्ह आहे. हे चिन्ह श्रीविष्णूंच्या पादुकांचे आहे, या श्रद्धेने भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणाहून ‘निळकंठ’ या हिमाच्छादित पर्वतशिखराचे तसेच बद्रीधामाचे फार सुंदर दर्शन होते.

बद्रीधाम जवळ बामणी नावाचे गाव आहे. या गावात उर्वशी मंदिर आहे. उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा! नर-नारायण तप करत असताना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने तिला पाठवले. पण नर-नारायणांनी आपल्या योगबलाने उर्वशीच्या कामशक्तीचे आत्मशक्तीत रूपांतर करून इंद्राचे गर्वहरण केले, अशी आख्यायिका सांगतात. या मंदिरात उर्वशी श्रीविष्णूंच्या मांडीवर बसलेली आहे असे रूप दाखवणारी श्रीविष्णूंची मूर्ती आहे. ही मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे.

हिमालयात जागोजागी शिवस्थाने आहेत. असे असताना हे विष्णूस्थान हिमालयात कसे? असा एक प्रश्न पडतो. प्राचीन काळी तिबेटमध्ये अनेक हिंदू श्रद्धास्थाने होती. (तिबेटचे प्राचीन नाव ‘त्रिविष्टप’) असेच एक स्थान म्हणजे थोलिंगमठ! पण कालांतराने भारत-तिबेटच्या सीमाभागात बौद्ध धर्माचा प्रसार वाढला. त्यामुळे थोलिंगमठचे हे श्रद्धास्थान स्थलांतरित झाले असावे. पण हे का, केव्हा व कसे? याचा तपशिल ज्ञात नाही. पुढे स्थलांतरित भागातही बौद्ध धर्माचा प्रसार वाढला. तेव्हा बद्रिनाथाची मूर्ती गाभाऱ्यातून काढून नारदकुंडात फेकण्यात आली. नवव्या शतकात आद्य शंकराचार्य या ठिकाणी आले होते त्यांनी नारदकुंडातील ही मूर्ती काढून तिची प्रतिष्ठापना केली. मंदिराचा जीर्णोद्धार केला. हिंदू ही मूर्ती भगवान श्रीविष्णूंची मानतात तर बौद्ध लोक गौतम बुद्धाची! जैन लोक ही मूर्ती पहिले तीर्थंकर पारसनाथ किंवा ऋषभदेवाची मानतात. पण बौद्ध, जैन भाविक या ठिकाणी फारच क्वचित येतात.

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..