‘हिमशिखरांच्या सहवासात’ या ‘अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण लोंढे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना….
भारताच्या वायव्येकडे पसरलेल्या हिंदुकुश आणि काराकोरम या पर्वतरांगांपासून पार अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत पसरलेल्या हिमालय या पर्वताचे जगभरच्या लोकांना अपार कौतुक आणि आकर्षण आहे. या आकर्षणापोटी गेली हजारी वर्षे जगभरचे अनेक प्रवासी या पर्वतांत प्रवासासाठी येतात. हिमालयात भटकंती करायला येणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने चार पाच वर्ग पडतात. काही लोकांना हिमालयाचा अभ्यास करायचा असतो, हिमालयाची भौगोलिक जन्मकथा अतिशय रंजक आहे. तो गाळाच्या खडकांपासून बनलेला आहे आणि आजही त्याची उंची वाढत आहे. त्या शिवाय त्याच्या विविध उंचीवर असलेल्या वनस्पती आणि प्राणी जीवनाचाही अभ्यास करणे हाही एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. दुसऱ्या प्रकारच्या लोकांना त्याच्या रौद्र रूपाचे आणि भव्य उंचीचे आकर्षण असते. हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर पाय ठेवण्याच्या प्रयत्नांत अनेक धाडसी गिर्यारोहकांनी जीवही गमावलेले आहेत. दुर्दैवाने असा प्रयत्न करणाऱ्यात फारच थोडे भारतीय होते. माणसाच्या साहसाला, पौरुषाला आव्हान देणाऱ्या या हिमालयाकडे हे दुसऱ्या प्रकारचे लोक आकर्षित होतात. तिसऱ्या प्रकारच्या लोकांना तेथील समाजजीवनाचा अभ्यास करायचा असतो. भारत चीन युद्धानंतर सामरिक कुतूहलाने येणारे अभ्यासकही आहेत.
यापैकी अखेरचा प्रकार म्हणजे हिमालयाकडे धार्मिक आणि श्रद्धाळू दृष्टीने येणारे लोक. जास्तीत जास्त भारतीयांचा यात समावेश होत. प्रकाश लेले यांनी हे पुस्तक प्रामुख्याने अशा वाचकांसाठी लिहिलेले आहे.
भारतीय पोथ्या-पुराणातून वर्णिलेल्या अनेक ऋषिमुनींनी हिमालयात आपले आश्रम स्थापन केलेले होते. आजही तेथील लोक या जागा दाखवितात आणि श्रद्धाळू व्यक्ती तिथे डोकी टेकून त्यांच्या खात्यावर पुण्य जमा करतात. शिवाय हिमालयात अनेक प्राचीन देवालये आहेत. ही प्रामुख्याने शंकराची आहेत. त्यांच्या यात्रा करणे अतिशय पुण्यप्रद असते असे मानले जाते. यातील काही स्थळांना बौद्ध आणि जैन धर्मियांच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. या सर्व स्थळांना श्री. लेले यांनी भेटी दिलेल्या आहेत. तेथे कसे जायचे, पाहण्यासारखे काय काय आहे, यात्रेकरूंसाठी काय सुखसोयी आहेत, या स्थळांशी निगडित अशा विविध पुराणातील कथा-दंतकथा काय आहेत याचा त्यांनी या पुस्तकात विस्तृत उल्लेख केलेला आहे.
श्री. लेले १९९३ साली प्रथम हिमालयात गेले आणि तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ दरवर्षी ते हिमालयात जातच आहेत. या सर्व ट्रिप्समध्ये त्यांनी परिश्रमपूर्वक गोळा केलेला हा माहितीचा खजिना त्यांनी एखाद्या पुस्तकांत ग्रंथित करून वाचकांना उपलब्ध करावा अशी मी त्यांना विनंती केली होती. ती आज त्यांनी या पुस्तकाच्या रूपाने पूर्ण केली आहे. श्रद्धाळू वाचक या पुस्तकाचे यथोचित स्वागत करतील अशी मला आशा आहे.
-लक्ष्मण लोंढे
‘हिमशिखरांच्या सहवासात’ या ‘अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख
Leave a Reply