नवीन लेखन...

वनवासींचे राम

आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते. आणि म्हणूनच हजारो वर्षे उलटून गेल्यावरही संपूर्ण भारतात गुढीपाडवा ते रामनवमी हा काळ प्रभु रामाची रसाळ कथा वारंवार ऐकून त्यांच्या सद्गुणांचे स्मरण करीत, त्यातील एखादा अंश तरी आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून त्यांचीच प्रार्थना करण्यात प्रत्येकजण व्यतीत करीत असतो.

ज्या अयोध्येत प्रभू रामचद्राचा जन्म झाला, तेथे त्याचे भव्य मंदिर व्हावे ही प्रत्येक भारतीयाची मनीषा होती आणि तिला मूर्त रूप येण्याचा काळ आता जवळ आला आहे. 22 जानेवारीला प्रभुरामचंद्र विशाल मंदिरात विराजमान होणार आहेत.

या राममंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन करण्यासाठी अनेक कार्यकर्ते घरोघरी गेले. त्यांचे अनुभव फारच उत्साहवर्धक होते. अगदी पालाच्या झोपडीत राहणाऱया एखाद्या जनजातीतील बांधवाला किंवा दुसऱयाच्या घरी धुणीभांडी करणाऱया कष्टकरी भगिनीला दहा रुपये दे, असे म्हटल्यावर त्यांनी शंभर, दोनशे, पाचशे रुपयाची पावती फाडायला सांगितल्याची अनेक उदाहरणे समोर आली. सिग्नलवर लहान सहान वस्तू विकणारी मुले, कार पुसणारी मुले, घरोघरी पेपर टाकणारी मुले, अशा, ज्यांना आपण दारिद्र्य रेषेखालील लोक म्हणतो त्यांनी स्वत: आपणहोऊन राम मंदिराच्या उभारणीत आपला सहभाग नोंदवला. याचे कारण स्पष्ट आहे. राम हा आम्हा सर्वांच्या जीवनातच नव्हे तर आमच्या रक्तात, आमच्या डी एन ए मध्ये पिढÎानुपिढÎा सामावून गेलेला आहे व सामावून राहणार आहे.

परंतु ज्यांना आपल्या समाजातील ही एकी बघवत नाही अशी नतद्रष्ट माणसे मात्र स्वत:चे वेगळेच तत्त्वज्ञान घेऊन पुढे येताना दिसत आहेत. येथील जनजाती म्हणजे आदिवासी असून त्यांना बाहेरून आलेल्या आर्यांनी जंगलात हाकलून दिले. त्यांची संपत्ती हडप केली. त्यांना गरीब केले असे ही मंडळी आजही सांगत असतात. इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करायला ही विचाराधरा प्रस्तुत केली होती. तिला डॉ. आंबेडकरांसारख्या अनेक प्रकांड पंडितांनी विरोध केल्यावर आता स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी, वनवासी समाज किंवा जनजाती या हिंदू नाहीतच अशी एक विचार धारा घेऊन तिचा प्रचार करीत आहेत. त्याला खिश्चन मिशनरीज साथ देत आहेत. मिशनरीजना येथे त्यांच्या धर्माचा प्रचार करायचा आहे तर पुरोगाम्यांना आम्हीच मानवतेचे खरे उपासक आहोत असे म्हणत येथील जनजाती समाजाचा बुद्धिभेद करायचा आहे व त्यायोगे भारतीय समाजात फूट पाडायची आहे. जी वामपंथी विचार धारा आज जगाने त्याज्य ठरवली आहे, तिचे पुनरुज्जीवन करून स्वत:ची सत्ता प्रस्थापित करणे हा त्यांचा छुपा कार्यक्रम आहे. त्यासाठी आधी येथील समाजाला तुकडÎा तुकडÎांमध्ये विभाजित करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच जनजाती समाज किती गरीब आहे, त्यांच्यावर किती अन्याय व अत्याचार होत आहेत असा प्रचार ही मंडळी करत आहेत. माओवादी मंडळी विकासाची गंगा या लोकांपर्यंत पोचूच नये म्हणून शस्त्राच्या धाकावर वनांमध्ये रस्ते, दूर संचार यंत्रणा उभारल्या जाऊ नयेत यासाठी सतत प्रयत्न करत असतात. इतकेच कशाला, इथे शाळा सुरु होऊच नयेत असाही त्यांचा प्रयत्न असतो. भारताचे तुकडे तुकडे करून येथे आपले साम्राज्य प्रस्थापित करावे हा त्यांचा छुपा हेतु सतत पुढे येत आहे. त्याला शहरी नक्षलवाद्यांची साथ असते, मार्गदर्शन असते व मदतही असते. यासाठी जनजाती समाजाला त्यांच्या धर्मापासून तोडण्याचे काम ही मंडळी सातत्याने करीत असतात. एकच खोटे तुम्ही शंभरदा सांगितले तर ते लोकांना खरे वाटू लागते या ग्लोबेल्सच्या प्रचार तंत्रावर या मंडळींची जबरदस्त पकड आहे. त्यामुळे जनजाती समाज हा हिंदू नाही असा प्रचार ही मंडळी सतत करत असतात. वास्तविक हिंदू हा धर्म नाही तर ती एक जीवन पद्धत आहे, हे ज्यांनी धर्म या संकल्पनेचा अभ्यास केला आहे त्यांना माहित असते. म्हणून जनजाती समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवायचे, लहानग्या वयात त्यांच्या हातात शस्त्रे द्यायची व त्यांना हिंसेसाठी उद्युक्त करायचे हे मोठे षडयंत्र सध्या मानवतेच्या नावाखाली आपल्या देशात सुरू झाले आहे. यात पुन्हा शहरी भागात परिषदा, मेळे, साहित्य संमेलने घेऊन जनजातीतील सुशिक्षित लोकांमध्ये बुद्धीभ्रम पसरवण्याचे काम ही मंडळी करत असतात. शंकर आणि रुद्र वेगवेगळे आहेत, कैलास पर्वत वगैरे सगळे थोतांड आहे, म्हणून आपल्या मृत लोकांच्या नावामागे कैलासवासी लिहू नका, रावण, महिषासुर हे आपले देव आहेत, विठ्ठल, रुखमाई, काळूबाई, गणपती ही आपली दैवते नाहीत असा अपप्रचार केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘तुम्ही हिंदू नाही’ असे बजावून सांगणारी मंडळी स्वत:च्या शासकीय दाखल्यावर मात्र हिंदू लिहितात.

या सर्व गोष्टींना राम मंदिर निधी संकलनाने खूप मोठे प्रत्युत्तर दिले आहे. मुळात रामायण लिहिणारे वाल्मिकी ऋषी हे वाल्या कोळी म्हणजे जनजातीतीलच होते. वनवासाच्या काळात राम हे वनवासी लोकांबरोबरच रहात होते. रामाच्या वनवासाची सुरुवातच निषाद राजाच्या राज्यात मुक्काम करण्यापासून झाली होती. हे काही अचानक घडले नव्हते. युवराज म्हणून बालपणापासून कार्यरत असताना रामाने जे अनेक मित्र जोडले होते त्यात हा केवट म्हणजे निषाद राजा होता. रामाने त्याच्या राज्यात प्रवेश करताच तो रामाला आपल्या राजवाडÎात चलायची विनंती करतो. पण आपण वनवास स्वीकारला असल्यामुळे आता गावात येऊ शकत नाही. कोणीही दिलेले सुग्रास अन्न खाऊ शकत नाही म्हणून राम नकार देतात; पण गंगा नदी पार करण्यासाठी त्याची मदत मागतात. तो रामाला आपले राज्य द्यायलाही तयार असतो, यावरून रामाची आणि त्या निषाद राजाची मैत्री कशी होती याची कल्पना येऊ शकते. रामाला गंगा नदी पार करून देणारा केवट हा जनजातीचाच. तो रामाला म्हणतो, ‘मी तुम्हाला गंगा नदी पार करून देतो, तुम्ही मला हा भवसागर पार करून द्या.’ वनवास संपवून परत जाताना आपल्याकडे येण्याचे वचन तो रामाला मागतो. रामाला अयोध्येला परत नेण्यासाठी जेव्हा भरत निघालेला असतो, तेव्हा हा रामाचा घात करील या आशंकेने तो भरताशी युद्ध करायला तयार होतो. असा हा रामाचा परम मित्र – जनजाती समूहातील निषाद राजा!

आपला चित्रकूट पर्वतावरील मुक्काम हलवून राम जेव्हा निबिड अशा दंडकारण्यात मुक्काम करायचे ठरवतात, तेव्हा त्यामागील मुख्य कारण रावणाने जे राक्षस सैन्य तेथे ठेवलेले असते, त्यांचा नि:पात करणे हे होते. या नरभक्षक राक्षसांना संपवण्यामागे दंडकारण्यातील जनतेला राक्षसांच्या भयापासून मुक्त करणे हेच होते.

या ठिकाणी मला एक गोष्ट पुन:पुन्हा नमूद करावीशी वाटते की वनात राहणाऱया लोकांना वनवासी न म्हणता त्यांना आदिवासी म्हणायची सुरुवात इंग्रजांनी येथील समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठीच केली होती. तत्पूर्वी भारतात शहरात म्हणजे नगरांत राहणारे ते नगरवासी, खेडÎात म्हणजे ग्रामात राहणारे ते ग्रामवासी आणि जंगलात म्हणजे वनात राहणारे ते वनवासी अशीच येथील समाजाची रचना होती. हे सर्वजण आपापल्या सांस्कृतिक परंपरा पाळत होते आणि एकमेकांना सहाय्य करत अतिशय सौहार्दपूर्ण जीवन जगत होते.

सुजलाम् सुफलाम् अशी ही समृद्ध भूमी असल्याने हिच्यावर सतत आक्रमणे होत होती. शक, हूण अशा आक्रमकांना या भूमीने आपल्यात सामावून घेतले तर मुस्लीम आक्रमकांना येथे सतत विरोध होत राहिला. ‘आपण येथे बाहेरून आलेलो असलो तरी येथील वैदिक परंपरा पाळणारे आर्य हे सुद्धा आपल्यासारखेच आक्रमक आहेत’ असे सांगत येथील सुशिक्षित समाजाचा बुद्धिभेद करण्याचा इंग्रजांनी सतत प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणजे येथील मूळ निवासी म्हणजे वनात राहणारे वनवासी – त्यांना इंग्रजांनी आदिवासी अशी संज्ञा दिली.

रामाला सीतेच्या शोधासाठी मार्ग दाखवणारी शबरी ही  भिल्ल जमातीच्या मुखीयाची मुलगी होती. भक्तांनी शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा रचून तिला रामभक्त बनविले. वास्तविक शबरी ही एका मेंढपाळ भिल्ल समूहाच्या प्रमुखाची अतिशय संवेदनशील मुलगी होती. दंडकारण्याच्या दक्षिण टोकाला या भिल्लांची वस्ती होती. आजही या भागात भिल्लांची वस्ती आहे. त्याकाळातील परंपरेला अनुसरून वयाच्या आठव्या – दहाव्या वर्षी शबरीचा विवाह ठरतो. आपल्या विवाहात ज्यांच्याशी आपण रोज खेळतो त्या मेंढÎांच्या पिल्लांची हत्या करून विवाहाच्या दिवशी पाहुणचार करण्यात येणार आहे, हे तिला कळते. आपल्या वडिलांना असे करू नका म्हणून ती विनंती करते. तिची विनंती अमान्य होते, कारण त्यांच्या समाजाची ही रूढी असते. काय करावे असा त्या छोटÎा मुलीला प्रश्न पडतो.आपण विवाहच केला नाही तर त्यांचे प्राण वाचतील असा विचार करून ती एका रात्री आपले घर सोडते. आपला शोध घेतला जाईल याची जाणीव असल्याने, ती लहानगी मुलगी रात्री निबिड अरण्यातून प्रवास करते आणि दिवसा एखाद्या उंच झाडावर लपून बसते. असे करता करता ती मतंग ऋषींच्या आश्रमात पोचते. एकदम आश्रमात कसे जायचे, या विचाराने ती आश्रमाबाहेरील एका वृक्षावर आश्रय घेते. रोज पहाटे आश्रमाची झाडपूस करून आश्रम लख्ख करते. आश्रमातील सर्वांनाच प्रश्न पडतो की हे कोणाचे काम असावे. शेवटी एकदिवस शबरीचे हे बिंग फुटते. मतंग ऋषींसमोर तिला नेण्यात येते. तिची कहाणी ऐकल्यावर मतंग ऋषी तिला आश्रमातच एक कुटी बांधून रहायला सांगतात. आश्रमाची नित्य कामे करतानाच महर्षी मतंग जे शिष्यांना शिकवीत ते शबरी मनोभावे ऐकत असते. मतंग ऋषींचे तेथील विद्यादानाचे काम संपते. तो आश्रम सोडून जायची सर्वांवर वेळ येते. आश्रमातील प्रत्येकाला ऋषी कोणत्या ठिकाणी, कोणत्या कामगिरीवर जायचे हे संगतात. ते स्वत: हिमालयात तप करण्यासाठी जाणार असतात. आपण काय करायचे, कुठे जायचे या विचाराने शबरी अस्वस्थ झालेली असते. पण गुरुदेवांना कसे काही विचारायचे, असा तिला प्रश्न पडलेला असतो. आश्रमातून बाहेर पडताना मतंग ऋषी तिला सांगतात की ‘तुला येथेच राहायचे आहे. प्रभु रामचंद्र जेव्हा येथे येतील तेव्हा त्यांना सुग्रीव रहात असलेल्या ऋष्यमुक पर्वताचा रस्ता दाखवून सुग्रीवाशी सख्य करायला सांगायचे. हेच तुझ्या जीवनातील अंतिम कार्य असेल.’ शबरी वर्षानुवर्षे रामाची वाट पहात आश्रमात थांबलेली असते. राम कधीही येऊ शकतो म्हणून रोज त्याच्यासाठी वनातली फळे फुले घेऊन येत असते. बाल्यावस्थेत आश्रमात आलेल्या शबरीचे तारुण्य संपून ती आता वृद्ध झालेली असते. डोळ्यात प्राण आणून ती रामाची वाट पहात असते. शेवटी सीतेच्या शोधासाठी निघालेले राम आश्रमात येऊन पोचतात. त्यांचा यथोचित आदर सत्कार शबरी करते. ‘माते’ म्हणून राम त्याचा स्वीकार करतात. माता म्हणून तिला दंडवत घालतात. शबरीच्या आयुष्याचे सार्थक झालेले असते. तेथील यज्ञ वेदीवर शबरी अग्नी उत्पन्न करून प्रभु रामचंद्रांची अनुज्ञा घेऊन शबरी आपल्या आपल्या नश्वर देहाचा शेवट करते. राम जेव्हा अयोध्येला जातात तेव्हा राज्याभिषेकानंतर त्यांना अनेक ठिकाणी भोजनाची निमंत्रणे येतात. त्यावेळी तेथील सुग्रास अन्नाचे सेवन करताना ते लक्ष्मणाला म्हणतात की कितीही चांगले अन्न असले तरी त्याला शबरीच्या बोरांची सर नाही. आणि म्हणून आपल्याला वाटत रहाते की शबरीने रामांना बोरे अर्पण केली. आणि त्यातील चांगली बोरे निवडण्यासाठी शबरीने ती उष्टावली असे आपले लेखक सांगतात. शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा अशी आहे. असो! त्यातून रामाचा वनवासी लोकांशी असलेला संबंधच अधोरेखित होतो, नाहीका? नगरवासी रामाचा वनवासी लोकांशी संबंध असा होता.

वाल्मिकी रामायणाच्या बाल कांडातील सतराव्या सर्गात असे वर्णन आहे की विष्णु दशरथाच्या पोटी मानव म्हणून जन्म घेणार असतात त्याच वेळी ब्रह्मदेव सर्व देवतांना म्हणतात, देवांनो भगवान विष्णू वीर, सत्यप्रतिज्ञ आणि आम्हा सर्वांच्या हिताची इच्छा करणारे आहेत. त्यांच्या मदतीकरता तुम्ही अशा पुत्रांची उत्पत्ती करा की जे बलवान, मनाप्रमाणे रूप धारण करणारे, माया जाणणारे, शूर, वायूप्रमाणे वेग असणारे, नीतीज्ञ, बुद्धिमान, विष्णूप्रमाणे पराक्रमी, पराभव न पावणारे, दिव्यशरीर धारण करणारे आणि अमृतपान करणाऱया देवांप्रमाणे पूर्ण अस्त्रविद्या जाणणारे असतील.

या आज्ञेला अनुसरून अनेक पराक्रमी देव, गण, गंधर्व आदी मानवरूपात रामाच्या सहाय्यासाठी जन्म घेतात. यातील चमत्कृतीचा भाग वगळला तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या अनेक भागात त्यावेळी अनेक शूर वीर प्रतिभासंपन्न माणसे रहात होती. आणि या सर्वांना पीडण्याचे काम रावण आणि त्याचे राक्षसगण करीत होते.

हनुमान, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत ही सर्व मंडळी वनवासी समाजातीलच होती. अनेकांची अशी समजूत आहे की हे सगळे वानर होते. याचा थोडा खोलात जाऊन विचार केला, तर असे लक्षात येते की, वानर, ऋक्ष (अस्वल), गोलांगुल (गाईसारखे प्राणी) हे प्राणी नसून त्या प्राण्यांप्रमाणे वेशभूषा केलेली ती मानवी जमातच होती.

सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवायचा जटायू प्रयत्न करतो आणि त्यासाठी प्राणार्पण करतो. त्याचा अंत्यसंस्कार राम करतात. याचाच अर्थ जटायू, नंतर भेटलेला संपाती आणि राम-लक्ष्मणाला नागपाशातून मुक्त करणारा सुपर्ण हे गरुड पक्षी नसून उड्डाण करून हवेतून वेगाने जाणारी आणि कदाचित डोक्यावर शस्त्र म्हणून एखादे चोचीसारखे आयुध बाळगणारी वनवासी जमात असावी.

रामायणात वानरांच्या शेपटीचा उल्लेख येतो. पंडित सातवळेकरांच्या मते हे पुच्छ म्हणजे पाश. ते कमरेला गुंडाळून ठेवण्याची प्रथा असावी आणि त्याचे एक टोक मोकळे सोडलेले असावे. शत्रूला या पाशाच्या सहाय्याने आपल्या जवळ खेचून त्याला मारले जात असे. राम, लक्ष्मण म्हटले की त्यांचे धनुष्य आपल्या नजरेसमोर येते तसेच या वनवासी समुदायातील लोकांचे पुच्छ असे. एरवीही हे समाज युद्धासाठी दगड-धोंडे आणि मोठाले वृक्ष समूळ उपटून किंवा तोडून अस्त्र म्हणून वापरत असत. त्यातील हनुमान हा किश्किंधेच्या राज्याचा प्रधान मंत्री होता. सुग्रीव आणि वाली हे राजे होते. ही सर्व जमात उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीची आणि अतिशय पराक्रमी होती. हे लोक शाकाहारी होते. झाडावर चढण्यात पटाईत होते. आजही दक्षिण भारतातील नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडणारे आणि एका झाडावरचे नारळ तोडून झाले की सहजगत्या वरच्यावरून दुसऱया झाडावर जाणारे लोक आपण पहातो. तशीच ही मंडळी होती. काही सामाजिक परंपरा वेगळ्या असल्या (मृत भावाच्या पत्नीशी विवाह करणे वगैरे) तरी सगळ्यांचे सांस्कृतिक बंध एकच होते.

नल हा सुग्रीवाचा सेनापती होता. हा वालीची पत्नी तारा हिचा भाऊ होता. जाम्बुवंत किंव जाम्बवान हे तारेचे वडील होते. निल हा विश्वकर्म्याचा मुलगा म्हणजे इंजिनिअर होता. सुषेण हा वनौषधींची माहिती असणारा वैद्य होता. वानर ही वनवासी जमात भारताच्या सर्व भागांमध्ये समूह करून रहात होती. सुग्रीव हा त्यांचा प्रमुख होता. या जमातीला धातुशास्त्र अवगत होते. पण धनुष्य किंवा तलवारी सारखी शस्त्रास्त्रे माहित नव्हती.

सुग्रीवाशी सख्य केल्यावर त्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे श्रीराम वालीचा वध करतात. सुग्रीव राजा झाल्यावर रामाला दिलेले वचन विसरून विलासात रममाण होतो तेव्हा हनुमान त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. नंतर सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्यासाठी जे नियोजन केले ते त्याची बुद्धिमत्ता दर्शवणारे होते. वाल्मिकी रामायणात भारताचा उल्लेख जम्बूद्वीप असा आहे. या जम्बुद्वीपाच्या पलीकडे कोणकोणते देश आहेत याचे ज्ञानही सुग्रीवाला आहे आणि पूर्वेकडे चीन, मंगोलिया, मंचुरिया आणि उत्तरेकडे पार उत्तर ध्रुवापर्यंत सगळ्या समाजाची त्याला माहिती आहे. सीतेच्या शोधासाठी तो चारी दिशांना सैन्य पाठवतो. प्रचंड मोठे सैन्य त्याने जमवलेले आहे. परंतु नंतर मात्र सैन्याची सर्व सूत्रे रामाच्या हाती सोपवून सर्वांनी रामाच्या आज्ञेत राहावे असे तो सर्व यूथ प्रमुखांना सांगतो.

हनुमान ज्यावेळी सीतेचा शोध घेऊन परत येतो, त्यावेळी, ‘तुला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही, मी तुला फक्त आलिंगन देऊ शकतो’ असे म्हणून वनवासी राम हनुमानाला कडकडून मिठी मारतात. रामाचे वनवासी लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे आलिंगन स्पष्ट करते, नाही का? या वनवासी वीरांच्या सहाय्याने रामाने रावणाला पराभूत केले.

रावणाशी युद्ध करताना राम अयोध्येपासून दूर होते. परंतु सुग्रीवाशी मैत्री केल्यावर मात्र सगळे वनवासी बांधव त्यांच्या सहाय्यासाठी एकत्र आले. ज्यावेळी ऋष्यमुख पर्वतावर बसलेला सुग्रीव राम लक्ष्मणाला पहातो, तेव्हा ते कोण आहेत, कशासाठी इतक्या निबिड अरण्यात आले आहेत, याचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठावतो. त्यावेळी सुग्रीव सांगतो, ‘तू सामान्य वेशात जा. तुझा वानरवेश उतरवून ठेव.’

आजही सर्व देशांमध्ये सैनिकांचे वेगवेगळे गणवेश असतात, हे आपल्याला माहित आहे. वनवासी लोकांच्या पोशाखाचा विचार केला तर आजही पूर्वांचलातील किंवा आफ्रिकेच्या निबिड अरण्यातील जमाती एखाद्या प्राण्याच्या वैशिष्ट्यांचा उपयोग आपल्या पोशाखात करताना दिसतात. काही जमाती आपल्या डोक्यावर शिंगे लावतात, काही मोरपिसे लावतात तर काही इतर प्राण्यांची कातडी वस्त्र म्हणून पांघरतात. प्रत्यक्ष युद्धापूर्वी राम सर्व सैनिकांना सांगतात की मी, लक्ष्मण, बिभीषण आणि त्याच्या बरोबर आलेले इतर 4 जण असे सात जण सोडून तुम्ही सर्व वानर वेशात रहा. रावणाच्या मायावी सैन्यापासून आपले सैन्य ओळखता यावे या साठी हा वानरवेशाचा गणवेश आवश्यक होता.

रावणाचा पराभव झाल्यावर राम अयोध्येला परत जायला निघतात तेव्हा या वनवासी समाजातील निवडक लोकांना सपत्नीक बिभिषणाच्या पुष्पक विमानातून घेऊन जातात. अतिशय प्रेमाने त्यांचा अयोध्येत पाहुणचार करतात. काही काल अयोध्येत व्यतीत करून बाकी सर्व मंडळी परत जातात. परंतु हनुमान मात्र रामाजवळ कायम रहातात. हनुमानाला रामाजवळ रहावेसे वाटते यातूनच वनवासींचा राम कसा होता हे स्पष्ट होते.

मूळ वाल्मिकी रामायणात कोणत्याही चमत्कारांना स्थान नाही. परंतु इतर भक्तांनी लिहिलेल्या रामकथा निवडून, त्यातील फक्त चमत्कारांचा उल्लेख करून रामायण आणि राम हे सर्व काल्पनिक होते, असा बुद्धिभेद आमचे तथाकथित विचारवंत करत असतात. त्यांच्यापासून सावध राहणे हीच आजच्या काळाची गरज आहे.  खरा रामजन्मोत्सव साजरा करायचा म्हणजे रामाचे गुण – पितृआज्ञा पालनासाठी त्याने घेतेले कष्ट, त्याचे भरतावरील व लक्षमण आणि शत्रुघ्नावरील निस्सीम प्रेम, त्याचे जनजाती बांधवांना गळाभेट देणे, त्याचे प्रजानुरंजन, धर्म व न्याय नीतीने वागणे, एक पत्नीव्रत, सीतेचा त्याग केल्यावर सर्व सुखोपभोग वर्ज करणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  किष्कीनधेचे किंवा लंकेचे राज्य मिळत असताना सुद्धा, जननी जन्म भूमिश्च / स्वर्गादपि गरीयसी असे म्हणत अयोध्येला परत येणे ही पराकोटीची राष्ट्र निष्ठा – हे सर्व गुण आठवून ते आपल्यात आले पाहिजेत या साठी प्रयत्नरत झाले पाहिजे इतकेच! अशी प्रेरणा आम्हा सर्वांना मिळो हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना.

डॉ छाया नाईक, नागपूर
मो. 9890002282

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..