नवीन लेखन...

श्रीराम कथा सदा विजयते

यावत् स्थास्यन्ति गिरय: सरीतश्च महीतले । 

तावत् रामायणी कथा लोकेषु प्रचरिष्यति ।।

अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे. या महाकाव्याने जसे काव्य रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे तसेच श्रीरामभक्तांना भावविभोर केले आहे. आज हजारो वर्षानंतर देखील या काव्याची लोकप्रियता यत् किंचितही कमी झालेली नाही. ‘क्षणें यन् नवताम उपैयति तदेव रूपं् रमणीयताया: ।’  या वचनाचा प्रत्यय प्रत्येक वेळी रामायण वाचताना येतो. ही रामकथा आजही भारतीयांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजविते. तिचा प्रभाव प्राचीन काळापासून आजपर्यंत भारत देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये झालेला आढळतो. आणि हा प्रभाव कल्पांतापर्यंत कमी होणार नाही असा दृढ विश्वास प्रत्येक भारतीयाच्या मनात चिरंतन आहे. रामकथेचा हा प्रभाव साहित्य, इतिहास आणि संस्कृती या तीन क्षेत्रांमध्ये विशेषत्वाने जाणवतो.

साहित्य क्षेत्रात राम कथेचे स्थान अनन्यसाधारण आहे. एक संस्कृत आर्ष महाकाव्य या दृष्टीने ते महत्त्वाचे तर आहेच पण त्याच बरोबर हे रामायण सर्व भाषीय साहित्यिकांसाठी आकर ग्रंथ ठरले आहे. रामकथेचे बीज घेऊन अनेक संस्कृत कवींनी आपल्या दिव्य प्रतिभेने रामकथा विविध प्रकारे शब्दांकित केली आहे. महाकवी कविकुलगुरू कालिदासाचे  रघुवंशम् महाकाव्यम्, भवभूतीची महावीर चरितम् आणि उत्तरराम चरितम् ही विख्यात नाटके भास कवीचे प्रतिमा अभिषेकम् इत्यादी नाटके ,या सर्व साहित्यकृतीचा  आधार रामकथा आहे. तर हनुमन्नाटकम् , आश्चर्य चुडामणी या नाटकांचा आधार देखील रामकथा आहे. अर्वाचीन संस्कृत महाकवी डॉ. श्री.भा. वर्णेकर यांचे श्रीरामसंगीतिका हे नृत्य नाटिका रामकथा चित्रित करते.

केवळ संस्कृत कवीच नव्हे तर अन्य भाषिक कवींनी देखील राम कथेला आपल्या साहित्य कृतींचा आधार केले आहे आणि ते सर्वच साहित्य रसिकांना गौरविले आहे. तुलसी रामायणाला मिळालेली ख्याती शब्दातीत आहे. मराठी कवींनी रामाला उद्देशून अनेक भजने, भावगीते, कथा, कादंबऱया, रचल्या आहेत. ग. दि. माडगूळकरांचे गीत रामायण माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. हे ‘गीत रामायण’ स्वरबद्ध करून सुधीर फडके यांनी राम कथेची लोकप्रियता शतगुणित केली आहे. रामायणामुळे अनुष्टुप छंद निर्माण झाला आणि कविप्रिय ठरला आहे. अनेक संस्कृत कवींनी अनुष्टुप छंदामध्ये रचना केलेल्या आढळतात. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील रामायणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

इतिहास दृष्ट्या रामायणाचे महत्त्व अनितरसाधारण आहे. या रामकथेमुळे केवळ रघुवंशाचा इतिहास ज्ञात होतो असे नाही तर नगररचनाशास्त्र, स्थापत्यशास्त्र, ऋषींचे जीवन या सर्वांचा इतिहास ज्ञात होतो. महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली नसती तर या संपूर्ण ऐतिहासिक ज्ञानापासून आपण वंचित झालो असतो. ईक्ष्वाकु कुळाचा आणि प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मापासून त्याचे अवतार कार्य समाप्त होईपर्यंतचा संपूर्ण इतिहास तत्कालीन अन्य राजे, त्यांच्या नगरी, त्यांचे परस्परसंबंध या सर्व गोष्टी रामायणामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अयोध्येपासून लंकेपर्यंत वाटेत लागणारे पर्वत, नद्या, अरण्ये ,ऋषींचे आश्रम या सर्वांची माहिती रामकथा आपल्याला सांगते. श्रीरामांचे व्यक्तिमत्व घडविणारे वशिष्ठऋषी विश्वामित्र, भारद्वाज इत्यादी ऋषी प्रभू रामचंद्राची प्रतीक्षा करत असणारी अहल्या, शबरी आणि श्रीरामाला ‘आदित्य हृदय’ स्तोत्राचा उपदेश करून त्याच स्तोत्र द्वारे सूर्याची उपासना करावयास सांगून सूर्यवंशी श्रीरामाचा आत्मविश्वास वाढविणारे अगस्ती ऋषी या सर्वांची माहिती रामकथा आपल्याला पुरविते. शस्त्रात्रे तयार करणाऱया जया आणि सुप्रभा या दोन ऋषी कन्या या रामायणात आपल्याला भेटतात. अयोध्येचे वर्णन तत्कालीन नगर रचना शास्त्राची जाणीव करून देते. अशाप्रकारे वाल्मिकींची रामकथा म्हणजे केवळ मनोरंजक कथा नसून विविध शास्त्रांचे विषयांचे ज्ञान देणारे जणू काही ज्ञानकोषच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

आपल्या भारत वर्षाच्या सांस्कृतिक जीवनात रामायणाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली भारतीय संस्कृती श्रुती-स्मृती पुराणोक्त आहे. या पुराण वाङ्मयात रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथाचा अंतर्भाव आहे. आपले सांस्कृतिक जीवन तर राममय आहे. प्रतिवर्षी अत्यंत उत्साहाने साजरे केल्या जाणारे गुढीपाडवा, श्रीराम नवरात्र, रामनवमी, हनुमान जयंती, विजयादशमी या सर्व उत्सवांचा संबंध रामकथेशी आहे. आजही घरोघरी लहान मुलांना राम कथा सांगून रामाप्रमाणे वागावे रावणाप्रमाणे नव्हे असा हळुवार उपदेश केला जातो. रामाची पितृभक्ती, बंधूप्रेम, आज्ञापालनवृत्ती, दृढनिश्चयीपणा, अध्ययनातील एकाग्रता, ऋषीमुनींविषयी आदर, संघटन – कौशल्य, युद्धकौशल्य, निर्लोभीपणा, कर्तव्य कठोरता हे सर्व गुण आजही आदर्श मानले जातात.

अहल्या-द्रौपदी-सीता-तारा-मंदोदरी तथा

पंचकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशकम् ।।

या प्रात:स्मरणीय श्लोकामध्ये चार स्त्रिया रामायणातील आहे हे विशेष. लक्ष्मणाला रामासोबत जावयास सांगणारी सुमित्रा, पत्त्यनुगामिनी सीता, वालीला त्याच्या आचरणातील चुका शांतपणे समजावून सांगणारी तारा, रावणाला दुष्कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी धडपडणारी मंदोदरी, रामभक्त हनुमान, ज्येष्ठ बंधू वर जीवापाड प्रेम करणारे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आपल्याला रामकथेत भेटतात. आजही उत्तर भारतातील असंख्य लोकांना रामचरितमानस मुखोद्गत आहे. रामावरील भजने आणि भावगीते अत्यंत भक्तीभावाने ऐकणारे रामभक्त अनेक आढळतात. श्रीरामरक्षा स्तोत्र आणि हनुमानचालीसा यांच्या पठणाने मनातील भय दूर होते. या भावनेने घरोघरी सांजवात लावल्यावर या स्तोत्रांचे पठण केल्या जाते. भारतीयांच्या हृदयसिंहासनावर रामकथा जे अधिराज्य गाजवीत आहे त्याला तोड नाही. अनेक परिवारांमध्ये श्रीरामाला कुलदेवता म्हणून नित्य पूजिल्या जाते. ही पूजनीयता श्रीरामाला प्राप्त झाली आहे. ती त्याच्या गुणसंपदेमुळे आणि त्याच्या कर्तृत्वामुळे प्राप्त झालेली आहे. भारतीयांचे जीवन श्रीरामांशिवाय शून्य आहे ही भावना दृढ मूल आहे. मराठी माणसाच्या तर दैनंदिन जीवनात ‘राम’ पुरेपूर आहे. नमस्कार या अर्थी रुढ झालेले ‘राम राम’ हे शब्द ‘मला कशात राम वाटत नाही’, ‘या कामात काही उरला नाही’, अमुक अमुक व्यक्तीने राम म्हटलं ‘रामा रे रामा’ अशी विविध अर्थांची वाक्य आपल्या संभाषणात रोज येतात. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा तेरा अक्षरी मंत्र जपणाऱया लोकांची रामभक्ती स्पष्ट आहे.

अशी ही रामकथा म्हणजे जणू काही एक अमृत आहे. गोडी अवीट आहे. हे रामकथामृत कितीही प्राशन केले तरी रामभक्ताचे मन तृप्त होत नाही. रामकथेने जसे प्रतिभा संपन्न कविवरांना प्रेरित केले आहे तसेच काव्यरसिकांना मोहित केले आहे. विविध प्रकारच्या ज्ञानाने वाचकांना समृद्ध केले आहे. आणि भारतीयांचे सांस्कृतिक जीवन संपन्न केले आहे.

-डॉ. शारदा रमेश गाडगे

विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..