नवीन लेखन...

ताना तोराजा

सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता.
सूनसान आणि अधे मध्ये जंगल असलेल्या रस्त्यावरून गाडी दीड तास धावत होती. ऑईल कंपनीच्या जेट्टी वर साडे सहा वाजता पोचलो. सात वाजता डॉक्टर येऊन त्याने ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर चेक करून बोट मध्ये बसायला फिटनेस सर्टिफिकेट दिले.
साडेसात वाजता बोट नदीतून निघाली आणि मग खाडी आणि खाडीतून समुद्रात चालत राहिली. वारा असल्याने लाटा उसळत होत्या क्रू बोट ला स्पीड मिळत नव्हता. साडे तीन तासाने बोट समुद्रात माझ्या जहाजावर पोचली. त्या जहाजावर नवीनच जॉईन झाल्याने हळू हळू जहाजावरील मशीनरी आणि सिस्टीम यांच्याशी फॅमिलीअर होत होतो. एखाद्या जहाजावर पहिल्यांदाच गेल्यावर जहाजावर फॅमिलीअर किंवा सेटल व्हायला दहा ते पंधरा दिवस लागतात. पहिल्यांदा जॉइन करणाऱ्यांसाठी सगळंच नवीन असते त्यामुळे तेवढा वेळ लागतो आणि सेटल होईपर्यंत स्ट्रेस असतो.
शिवाय इतर अधिकारी आणि क्रु पण अगोदर न भेटलेले असतात त्यांच्याशी जुळवून घेणे सुद्धा महत्वाचे असते.
आमच्या इंजिन डिपार्टमेंट मध्ये अकीन नावाचा एक वाईपर होता. वाईपर म्हणजे जहाजावर साफ सफाई करणारा एक खलाशी किंवा थोडक्यात एक हेल्पर ज्याच्यावर फारसे जबाबदारीचे काम नसते. जहाजावर माझ्या हाताखाली काम करणारे इंजिनीअर्स आणि सगळे खलाशी हे इंडोनेशियन होते. सकाळी दिवसभराच्या कामाचे प्लॅनिंग करताना आणि टी ब्रेक मध्ये सगळे इंजिन कंट्रोल रूम मध्ये एकत्र जमायचे. मग प्रत्येकाला कामं देऊन झाल्यावर ती कामं करताना कोणती काळजी घ्यायची, कोणाची काय जवाबदारी असणार, कोणासोबत कोण काम करणार याबद्दल चर्चा झाली की काहीवेळ प्रत्येक जण हास्य विनोद करत बसायचे.
अकीन मात्र फारसा कोणाशी बोलायचा नाही, गप्प गप्प असायचा. सगळे हसत असले तरी त्याचा चेहरा उतरलेला असायचा. त्याचं कामात लक्ष असायचे पण तो सतत उदास आणि तणावात आहे असं जाणवायचे. जहाजावर अकीन हा एकटा इंडोनेशियन ख्रिश्चन होता बाकी सगळे मुस्लिम होते. मी जफ्फार नावाच्या थर्ड इंजिनिअरला विचारलं की हा अकीन का बरं एव्हढा उदास आणि तणावात असतो. जफ्फार म्हणाला सर हे तुम्ही त्यालाच विचारा, तो सांगेल तुम्हाला.
एक दिवशी टी ब्रेक नंतर अकीन ला थांबवले आणि विचारले की तू असा तणावात का असतो, नेहमी उदास, कोणाशी बोलत नाहीस की हसत नाहीस. असं जहाजावर कामाशिवाय कोणाशीही इतर काही न बोलता तू कसा काय राहतो. घरी वगैरे तरी फोनवर बोलतोस की नाही. तुझे लग्न झाले आहे का? मुलं वगैरे आहेत की नाही. अकीन पंचविशीतील तरुण होता इकडे इंडोनेशियात विशी नंतर तरुणांची लग्न होतात. काहीजणांच्या तिशी पर्यंत दोन किंवा तीन बायका पण झालेल्या असतात. बऱ्याच जणांना तर मी हाऊ मेनी चिल्ड्रन्स ऐवजी हाऊ मेनी वाइफ असं गमतीने विचारत असतो.
अकीन सांगू लागला, तिचे नांव अदिना, एकदम गोरीपान, एव्हढी गोरीपान की तिच्या शरीरातील नसा दिसायच्या. हसली तरी गाल लाल व्हायचे. दिसायला अत्यंत नाजुक आणि सुंदर. दाट आणि काळे केस डोळे किंचित हिरवे. आमच्या येथील सगळ्याच मुली अशा सुंदर असतात. अदिना सुद्धा त्यांच्यापैकीच एक सामान्य मुलगी.
मी सुलावेसी प्रांतातील तोराजा या डोंगराळ भागात राहतो. आमच्याकडील डोंगराळ भागात अलौकिक नैसर्गिक सौंदर्य आहे. जमीन सुपीक आणि उपजाऊ आहे. आमची इथल्या घरांचा आकार होडी सारखा असतो. छप्पर होडीसारखे आणि उंचावर असते. जेवढा सुंदर निसर्ग तेवढी देखणी आमची घरं असतात. मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असल्याने कसेबसे शेती करून पोट भरतो. बाविसाव्या वर्षी अदिना चे नी माझं लग्न झालं ती वीस वर्षांची होती. शेतीत पिकवायचे आणि पोटभर खायचे आणि खाऊन एकमेकांवर प्रेम करायचे एवढंच आमचं आयुष्य. माझ्या घरी माझे आई वडील आहेत त्यांना अदिनाचे खुप कौतुक लग्न झाल्यापासून तर त्यांचा माझ्यापेक्षा तिच्यावरच जास्त जीव. तिला दिवस गेले आणि घरात सगळ्यांना काय करू न काय नको असं होऊन गेले. चौथ्या महिन्यांत तिला दवाखान्यात डॉक्टर कडे नेले होते, डॉक्टर कडून परत येत असताना ती रस्ता ओलांडत होती आणि त्याचवेळी तिला एका भरधाव ट्रक ने उडवले. धडक एव्हढी भयानक होती की तिने जागच्या जागी माझ्या मिठीतच जीव सोडला. जीव सोडताना ती बोलली, अकीन मला वाचव, मला तुला एकट्याला सोडून नाही जायचंय मला जगायचे आहे.
अदिना त्या दिवशी गेली पण आजही ती माझ्या घरात आहे. तिचे प्रेत आम्ही घरी आणले. आई बाबांनी तर त्या दिवसापासून बोलणेच टाकून दिले. आजही दररोज तिच्या प्रेतावरना ते मायेने हात फिरवतात. माझी आई अदिनाचे कपडे बदलते. मी इथे असलो तरी ती दोघं जे खातात त्यातील एक भाग अदिना समोर मांडतात. जवळपास दोन वर्ष व्हायला आली अदिनाचे प्रेत अजूनही आमच्या घरात आहे. तिला अजून मुक्ती मिळाली नाही. हे सगळं ऐकल्यावर मला एकदम चक्रावल्या सारखं झालं.
हा काय बडबडतो आहे, असं कोणी अपघात झाल्यावर प्रेत घरात ठेवतं का? त्याचे कपडे बदलून, प्रेतासमोर ताट मांडतो का? अकीन तू हे काय सांगतो आहेस हे असं असतं का कुठे. सर कुठे नसले तरी आमच्याकडे आहे. आमच्या तोराजा मध्ये अशी परंपरा आहे. एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रेताला गावाबाहेर जंगलात एका डोंगरावर नेले जाते. तिथं डोंगरात भुयार करून त्यात त्या व्यक्तीचे प्रेत तसेच सोडुन दीले जाते. मग वर्षातून एकदा त्या प्रेताला किंवा उरलेल्या सांगाड्याला नवीन कपडे घातले जातात, त्याच्या आवडत्या खाद्य पदार्थांना त्याच्या समोर मांडले जाते. सिगारेट पिणाऱ्यांच्या जबड्यात सिगारेट धरली जाते.
तसे पाहिलं तर सर्वपित्री अमावस्येला आमच्यात पण घराच्या कौलांवर पित्रांसाठी दारू सोडा, मटण मच्छी , गोड धोड ठेवण्याची पद्धत आहेच. अकीन मग तू अदिनाचे प्रेत डोंगरावर का नाही नेले? घरात का ठेवले आहेस अजून? कारण सर मी गरीब आहे. ताना तोराजा म्हणजे उंचावर राहणाऱ्यांची भूमी. आमच्या इथे अशा रूढी आणि परंपरा आहेत की ज्या आजही पाळल्या जातात, ज्यामधे मृत्यू पश्चात अंत्यसंस्कार करण्याची एक पद्धत आहे. एखादी व्यक्ती मरण पावल्या नंतर एका म्हशीचा किंवा रेड्याचा बळी द्यावा लागतो. बळी दिल्यानंतर संपूर्ण गावाला गाव जेवण द्यावे लागते. सगळी लोकं गावातील मैदानात एकत्र नटून थटून जमतात.
त्यानंतरच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकं प्रेत डोंगरावर त्या मेलेल्या व्यक्तीचे प्रेत डोंगरावर सोडून येऊ शकतात. असे केल्यानंतरच त्या मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती मिळून तो स्वर्गात जातो. जोपर्यंत रेड्याचा बळी देऊन गाव जेवण घातले जात नाही तोपर्यंत ते प्रेत घरातच सांभाळावे लागते. प्रेताला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यावर कॉफी पावडर, औषधं किंवा केमिकल लावले जातात. ज्यावेळी त्या कुटुंबाची बळी देण्याची आणि गाव जेवण घालण्याची ऐपत होईल तेव्हाच त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करून ते प्रेत डोंगरावर नेले जाते. डोंगरावर नेऊन ते प्रेत गाडले न जाता तसेच ठेवले जाते.
मी माझ्या अदिनाच्या अंत्यसंस्कारासाठी अजूनही पैसे जमवतो आहे. दोन वर्षच काय दहा वर्ष लागली तरी मला रेड्याचा बळी द्यावाच लागेल. माझी अदिना अजुनही माझ्या घरी आहे, तिचे मरतानाचे ते शब्द अजूनही माझ्या कानात सतत ऐकू येत असतात. ज्या बायकोवर अकीन ने जीवापाड प्रेम केले तिला गर्भावस्थेत मरताना बघून त्याला काय वाटले असावे. घरात तिचे प्रेत,ते प्रेत सोडुन येऊन काही महिन्यांनी पुन्हा त्या प्रेताला बघताना त्याला काय वाटत असेल? प्रेत कसले हाडांचा सांगाडाच उरला असेल आता आणि त्या सांगाड्यावर घातलेले कपडे.
मी जफ्फारला विचारले अकीन जे सांगतो ते खरं आहे का? त्यावर तो म्हणाला गुगल वर सर्च करा मग समजेल तुम्हाला.
जफ्फार एखाद्याची लहान मुलं जरी मेली तरी त्यांच्यावर पण असेच अंत्यसंस्कार केले जातात का? श्रीमंत असतील ते दुसऱ्याच दिवशी बळी देउन अंत्यसंस्कार करत असतील मग हे गरीब लोकं असेच घरात प्रेतांसोबत राहतात का?
जफ्फार म्हणाला आता लोकं बाहेर पडत आहेत ते ताना तोराजा सोडून इतरत्र राहायला जातायत पण जे अजूनही तिथं राहतात त्यांना या रूढी परंपरा पाळाव्या लागत आहेत.
प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनिअर
कोन,भिवंडी,ठाणे.
Mob. 8928050265

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 185 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..