नवीन लेखन...

हिमशिखरांच्या सहवासात – मनोगत

हिमालयात सातत्याने पर्यटन केलेले श्री प्रकाश लेले यांच्या ‘हिमशिखरांच्या सहवासात’ या ‘अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख ‘मराठीसृष्टी’च्या वाचकांसाठी क्रमश: प्रकाशित करत आहोत.


हिमालयाचे मला पहिले दर्शन घडले ते १९९३ साली ‘यूथ हॉस्टेल’ने आयोजित केलेल्या हिमाचल प्रदेशातील ‘सारपास’च्या पदभ्रमंतीच्या निमित्ताने! आणि तेव्हापासून हिमालयाच्या निसर्गवैभवाचे वेड लागले ते लागलेच! ध्यानी-मनी-स्वप्नी हिमालयच दिसायचा. मग दरवर्षी हिमालयाच्या वाऱ्याच सुरू झाल्या. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पाहायला मिळत होते, शिकायला मिळत होते, अनुभवायला मिळत होते.

हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, आध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील पर्वतशिखरे, नद्या, सरोवरे, मंदिरे, निरनिराळी स्थाने यांच्याशी जोडलेल्या कथा, मिथकं ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येक भागातील चालीरिती, रिवाज, सण, उत्सव, श्रद्धास्थाने, देव-देवतासुद्धा वेगळ्या आणि त्यांना जोडले आहेत पुराणकथांचे, निरनिराळ्या घटनांचे संदर्भ! हे सर्व अनुभवायचे असेल तर अनवट वाटांवर केलेल्या पदभ्रमंतीसारखा दुसरा पर्याय नाही.

हिमालयात भटकताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्या म्हणजे, अशा वाटांवर भ्रमंती करताना भारतीय लोकांपेक्षा परदेशी लोकांचीच संख्या जास्त दिसते. हे लोक फार अपेक्षा न बाळगता, आहे त्या परिस्थितीशी सहज जमवून घेतात. परदेशातसुद्धा हिमालय हा मोठा आकर्षणाचा, कुतूहलाचा विषय आहे, हे त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवते. हिमालयाच्या निसर्गाचा हे लोक मनमुराद आनंद लुटतात.

आजच्या तरुण पिढीचा पदभ्रमंतीकडे कल वाढू लागला आहे. अनेक संस्था असे पदभ्रमंतीचे कार्यक्रम आयोजित करतात. पुण्यातील ‘युवाशक्ती’ व ‘झेप’ या दोन प्रतिष्ठित संस्था तर अशा कार्यक्रमाचे आयोजन.फार चांगल्या रितीने करतात असा माझा अनुभव आहे. ‘यूथ हॉस्टेल’ तर अतिशय माफक दरात राष्ट्रीय स्तरावर अशा कार्यक्रमाचे आयोजन करते. पण एकूण पहाता अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. माझे तर प्रत्येकाला सांगणे आहे, निदान एकदा तरी पदभ्रमंतीचा अनुभव हा प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. हा अनुभव खूप काही शिकवतो. दैनंदिन जीवनात हा अनुभव खूप उपयोगी पडतो.

हिमालयातील प्रसिद्ध स्थळांची माहिती देणारी साचेबद्ध पुस्तके उपलब्ध आहेत. पण एकूण पहाता त्यांची संख्या खूप मर्यादित आहे. मराठीत तर अशा पुस्तकांचे प्रमाण खूपच कमी आहे. हिमालयात अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्थाने आहेत की ज्याची माहिती फारशी प्रसिद्ध नाही. खूप लोकांना ही स्थाने, तिकडचे रितीरिवाज, सण, उत्सव, यात्रा यांची काहीच कल्पना नाही.

हिमालयातील जास्तीत जास्त श्रद्धास्थाने उत्तराखंड राज्यात आहेत. ही भूमी ‘देवभूमी’ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी धार्मिक भावनेने खूप लोक बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री अशा प्रसिद्ध स्थानांना भेट देतात. पण या स्थानांशिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्थाने उत्तराखंडात आहेत, की जी फारशी कोणाला माहित नाहीत. त्यामुळे फारसे कोणी तिकडे फिरकत नाही. अशाच काही स्थानांची माहिती देण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे. कोणत्याही स्थळाला किंवा स्थानाला भेट देण्याअगोदर त्या स्थानांची वैशिष्ट्ये व इतर माहिती आपल्याला असेल तर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्या स्थानाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळाच असतो. अशा वेळी ही दिलेली भेट खूप आनंददायी, समाधानाची होते असा माझा अनुभव आहे. मला आशा आहे की श्रद्धाळू भाविकांना तसेच पदभ्रमंतीची आवड असलेल्या निसर्गप्रेमींना या पुस्तकातील माहिती आवडेल व उपयोगी पण ठरेल.

माझ्या या भटकंतीत मला कायम साथ मिळाली ती माझ्या सहप्रवासी अनंत करंदीकर याची! आम्ही सर्वजण त्याला ‘प्रमोद’ म्हणून संबोधतो. हिमालयाच्या अनवट वाटांवर आम्ही मनसोक्त भटकलो. गर्दीची ठिकाणे आम्ही मुद्दाम टाळली. स्थानिक लोकांमध्ये मिसळलो. खूप गप्पा झाल्या. या लोकांकडून जेवढी माहिती मला मिळाली तशी माहिती मला कोठल्याच प्रसिद्धी माध्यमांद्वारे मिळाली नसती. हे केवळ सर्व प्रमोदची साथ होती म्हणूनच घडू शकले. प्रमोदची साथ नसती तर आयुष्यातील एका मोठ्या आनंदाला मी पारखा झालो असतो. या पुस्तकाच्या निर्मितीचे फार मोठे श्रेय मी प्रमोदला देतो.

पुण्याच्या ‘झेप’ या संस्थेने १९९८ साली आयोजित केलेल्या ‘पंचकेदार’ च्या पदभ्रमंतीच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. ही सर्व पवित्र स्थाने मुख्य रस्त्यापासून दूर आहेत. प्रवासी सोयीसुविधाही फारशा उपलब्ध नाहीत. पण निसर्गाचे विलोभनीय रूप या पदभ्रमंतीत अनुभवायला मिळते. या स्थानाची माहिती सर्वांना कळावी म्हणून मी एक लेख लिहिला व तो प्रसिद्धीसाठी ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाकडे पाठविला. मी लिहिलेला हा पहिला लेख! त्या वेळी श्री. प्रदीप वर्मा हे लोकप्रभा साप्ताहिकाचे संपादक होते. एके दिवशी त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले. गप्पा झाल्या. चर्चा झाली. लेखनातील गुणदोष त्यांनी मला दाखविले. लिखाणाविषयी त्यांनी मला काही सूचना केल्या. एक दिशा दाखवली. एका प्रकारे त्यांनी माझ्या लेखनाला प्रोत्साहनच दिले. लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर मी हिमालयातील भटकंतीत पाहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानांवर लेख लिहिले व ते सर्व लेख लोकप्रभा साप्ताहिकात प्रसिद्ध झाले. एका मोठ्या माणसाचे मोठेपण मी या निमित्ताने अनुभवले. हे पुस्तक म्हणजे लोकप्रभामध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या काही लेखांचे संकलन आहे.

अशा लेखांचे संकलन करून पुस्तक करण्याची कल्पना मराठीतील ख्यातनाम साहित्यिक श्री. लक्ष्मण लोंढे यांनी मला सुचवली आणि विशेष म्हणजे हीच कल्पना माझे मित्र श्री. अजित देशमुख व माझ्या सहकारी सौ. पूर्णिमा शेंडे ह्यांनी पण मांडली. प्रथम मी तिकडे दुर्लक्ष केले, पण ह्या तिघांनी माझा पाठपुरावा सोडला नाही. त्यांच्या मदतीचा हात सदैव पुढे होताच. नंतर मलापण त्यांचा हा विचार आवडला. मग ठरवले, मूळ लेखात माहितीची आणखी काही भर घालावी, काही बदल करावेत. पण मुख्य अडचण होती ती पुर्नलेखनाची! आणि ही जबाबदारी उचलली ती श्री. अविनाश फटिंग व श्री. दशरथ शेट्ये या माझ्या मित्रांनी! आणि हसत हसत आनंदाने ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या सर्व प्रवासात मला आपुलकीने साथ दिली ती सौ. विद्या राव, सौ. राजेश्वरी नायर, सौ. सविता जोशी, श्री. तुकाराम जाधव, श्री. गोपाळ मुळगुंद, श्री. वांगे व माझ्या इतर कार्यालयीन सहकारी मित्रांनी!

एक महत्त्वाचा टप्पा आम्ही पार पाडला. पण आता पुढे काय? आणि एके दिवशी योगायोगाने श्री. व सौ. नाले यांची भेट झाली. खूप गप्पा झाल्या, चर्चा झाली व नाले दाम्पत्याने मला सांगितले, “अनघा प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करेल.” अनघा प्रकाशनासारखी मान्यवर संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे, हे ऐकल्यावर शब्दच संपले. क्षणभर मनात विचार आला, ‘याचसाठी केला होता अट्टाहास…’

या पुस्तकाच्या अक्षरजुळणीचे काम सौ. स्मिता विजय भावे यांनी केले तर अनुरूप असे मुखपृष्ठ तयार करण्याचे काम सुमन रघुनाथ यांनी फार छान रितीने पार पाडले.

या पुस्तकाची प्रस्तावना साहित्य क्षेत्रातील नामवंत व श्रेष्ठ व्यक्तीने द्यावी अशी माझी इच्छा होती. आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून समर्पक अशी प्रस्तावना श्री. लक्ष्मण लोंढे यांनी दिली व माझी अपेक्षापूर्ती केली.

हे पुस्तक म्हणजे या सर्व हिमशिखरांनी माझ्यावर केलेल्या आपुलकीचा, प्रेमाचा वर्षाव आहे. त्यांचे आभार कोणत्या शब्दांत मानायचे हेच मला कळत नाही. ह्यांच्या ऋणातच मी तृप्त आहे, आनंदी आहे! त्यांचे हे प्रेम असेच सदैव लाभो अशी परमेश्वरापाशी प्रार्थना!

– प्रकाश लेले

‘हिमशिखरांच्या सहवासात’ या ‘अनघा प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..