गंगा ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. सर्व पुराणात गंगेचे महात्म्य वर्णन आहे. स्कंदपुराणात———
तद्तत् परमं ब्रह्म द्रव रूप महेश्वरि ।
गंगारूपं यत् पुण्यतमं पृथिव्यामागतं शिवे ।।
म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे.
गंगाजल हे पवित्र आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोणतेही विषाणू गंगेच्या पाण्यात जास्तवेळ जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे गंगेचे पाणी कितीही वर्षे ठेवले तरी खराब होत नाही. नासत नाही. गंगेच्या पाण्याच्या या वैशिष्ठ्यपूर्ण गुणधर्माचा जागतिक पातळीवरच्या अनेक संस्थांनी अभ्यास केला पण कोणत्या कारणामुळे हे गुणधर्म गंगेच्या पाण्यात आहेत याचे ते निष्कर्ष काढू शकले नाहीत. लंडनचे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. हाईनकेन यांना गंगाजलात असे अनेक वैशिष्ठ्यपूर्ण गुणधर्म आढळून आले की जे इतर कोणत्याही पाण्यात पहायला मिळत नाहीत. ‘गंगाजल हे अत्यंत पवित्र जीवनदायिनी शक्ती असलेले पाणी आहे,” असे उल्लेख जुन्या ग्रंथात आढळतात.
मोगल सम्राट अकबर गंगेच्या पाण्याशिवाय दुसरे पाणी पीत नसे. गंगेचे पाणी आणण्यासाठी त्याने एक खास पथक स्थापले होते, असा उल्लेख अबुल फजलने लिहिलेल्या ‘आयने अकबरी’मध्ये पहायला मिळतो.
हिंदू धर्मात गंगा ही सर्वात पवित्र नदी समजली जाते. गंगेच्या स्मरणाने मनुष्याचे चित्त, स्तवनाने वाणी व स्नानाने अंग शुद्ध होते. आयुष्यात एकदा तरी गंगास्नान घडावे असे प्रत्येक श्रद्धाळू मनाला नेहमीच वाटत असते. हिंदू माणसाच्या जीवनात गंगेला महत्त्वपूर्ण स्थान आहे. हिंदू संस्कृतीचे तिने ममतेने पालन पोषण केले आहे. हिंदू संस्कृतीच्या वैभवाची तसेच विनाशाची ती साक्षी आहे. आपल्या पूर्वजांनीही गंगेचे महत्त्व जाणले होते. म्हणूनच विविध पौराणिक ग्रंथातून गंगेची स्तुती केलेली आढळते. अनेक ऋषी-महर्षी, तपस्वी, आचार्य पंडितांनी गंगेवर खूप रचना केल्या आहेत. श्री शंकराचार्यांचे गंगास्तोत्र, जगन्नाथ पंडितांचे ‘गंगालहरी अशा अनेक रचनातील भक्तिरसाचे सेवन करताना मनाला एक वेगळीच अनुभूती येते.
जगातील दहा मोठ्या नद्यांमध्ये गंगा नदीची गणना होते. हिमालयात उगम पावल्यापासून जवळजवळ २५०० कि.मी. प्रवास करून गंगासागरपाशी ती विशाल सागरात हरवून जाते. गंगेचा हा सर्व प्रवास देशी-विदेशी लोकांचा एक कुतूहलाचा, आकर्षणाचा विषय आहे. गंगा नदीच्या मुखापासून उगमापर्यंत दोन्ही तीरावरील निसर्गसौंदर्य पाहणे, नदी खोऱ्यातील संस्कृती, भाषा व प्राणी यांचा अभ्यास करण्याच्या हेतूने सर एडमंड हिलरी यांनी ‘ओशन टू स्काय’ या मोहिमेची आखणी केली होती. त्यासाठी त्यांनी न्यूझिलंडमध्ये फायबर ग्लासच्या तीन यंत्रचलित बोटी बनवल्या. विविध विषयातील तज्ज्ञ अशा १७ लोकांनी त्या मोहिमेत भाग घेतला होता. २४ ऑगस्ट १९७७ रोजी या मोहिमेची सुरुवात झाली व ८ ऑक्टोबर १९७७ रोजी गोमुखपाशी या मोहिमेची सांगता झाली. या प्रवासात गंगोत्री ते गोमुख हा प्रवास त्यांनी पायी केला होता. त्यांच्या या अनुभवावर आधारित त्यांनी लिहिलेले ‘ओशन टू स्काय’ हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे.
धार्मिकदृष्ट्या गंगेचे उगमस्थान ‘गंगोत्री’ समजले जाते. हिमालयातील चारधामांमध्ये गंगोत्रीचा समावेश होतो. पण हा उगम प्रत्यक्ष गंगोत्रीला होत नाही. तसे पाहता गंगेची सुरुवात नेमकी कोठून होते हे आजपर्यंत कोणालाच शोधून काढता आलेले नाही. ढोबळ मानाने आपण एवढेच म्हणू शकतो की गढ़वाल हिमालयातील गंगोत्री ग्लेशिअरचा एक शेवट ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी गुहेसारख्या असलेल्या जागेतून गंगेचा प्रवाह प्रथम दृष्टीस पडतो. याच स्थानाला ‘गोमुख’ म्हणतात. हे स्थान गंगोत्रीपासून १८ कि.मी. दूर आहे व हे गंगेचे मूळ उगमस्थान समजले जाते. असाही एक मतप्रवाह आहे की हे स्थान फार वर्षांपूर्वी गंगोत्री या ठिकाणी होते. वातावरणातील बदलांमुळे ते आता १८ कि.मी. मागे सरकले आहे.
इक्ष्वाकु कुळातील चक्रवर्ती राजा भगीरथाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन स्वर्गलोकीची गंगा पृथ्वीवर अवतरली. तिच्या वेगवान प्रवाहापासून पृथ्वीचे संरक्षण म्हणून आशुतोष महादेवाने तिला आपल्या मस्तकावर धारण केले व जटात बंद केले. तो दिवस होता वैशाख महिन्यातील शुक्ल सप्तमीचा! मग श्रीशंकराने सुमेरू पर्वतावर प्रस्थान केले व गंगेस आपल्या जटातून मुक्त केले. गंगेचा प्रवाह सात धारातून भागीरथी, जडगंगा, भिलनगंगा, मंदाकिनी, ऋषिगंगा, अलकनंदा व सरस्वती या नावाने विविध शिखरावरून धावू लागला. तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल दशमीचा! आजही या दोन दिवशी गंगोत्री व परिसरात ‘गंगा-दसरा’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सात प्रवाहात भागीरथी, अलकनंदा व मंदाकिनी हे प्रमुख प्रवाह म्हणून समजले जातात. बंदरपुच्छ पर्वतापासून नंदादेवीपर्यंत गंगेचे हे प्रस्त्रवण क्षेत्र किंवा सात धारांचे उगमक्षेत्र १२-१४ हजार फूट उंचीपर्यंत पसरले आहे. हे सर्व उगमक्षेत्र प्राचीनकाळी ‘गंधमादन पर्वतराजी’ म्हणून ओळखले जात असे. या सातही धारांचा संयुक्तप्रवाह ‘देवप्रयाग’ येथे एकत्र येतो व पुढे गंगा म्हणून ओळखला जातो.
ऋषीकेशपासून गंगोत्रीचे अंतर आहे २४८ कि.मी.! साधारण १२ ते १३ तासांचा हा बस प्रवास आहे. या मार्गावर पारंपरिक लोककथांची लेणी मिरवणारी, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे असलेली अनेक गावे आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या दंतकथा व मिथक मनाला आश्चर्यमुग्ध करून टाकतात.
ऋषीकेश परिसर सोडता सोडता रस्ता पवित्र हिमाईच्या कुशीत शिरतो व नाचत-बागडत, वेडीवाकडी वळणे घेत पर्वतशिखराला वाकुल्या दाखवत, मध्येच धुक्यात लपून बसत, वृक्षराजीला खुणावत तर कधी स्फटिकजलाने वाहणाऱ्या प्रवाहाचे, त्याच्या प्रपाताचे सौंदर्य न्याहाळत उत्तरकाशीकडे धावत असतो. धरासू आल्यावर श्रद्धाळू मनाने तो यमुनोत्रीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे पाहतो तर पुढे नाकुरी आल्यावर बचेंद्रीपालला आदराने अभिवादन करतो. नाकुरीच्या या हिमालयकन्येला लहानपणापासून पर्वत शिखरांचे वेड! २३ मे १९८४ रोजी या मुलीने एव्हरेस्ट शिखरावर पदन्यास केला. एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ही जगातील पाचवी तर पहिली भारतीय महिला! १४८ कि.मी.चा प्रवास करून दमला-भागलेला रस्ता शेवटी उत्तर काशीला पोहोचतो.
भागीरथीच्या किनाऱ्यावर वसलेले ११५८ मीटर्स उंचावरील उत्तर काशी या मार्गावरचे प्रमुख ठिकाण आहे. उत्तरकाशी जिल्ह्याचे हे मुख्यालय असून या गावात व परिसरात अनेक वैशिष्ठ्यपूर्ण पुरातन मंदिरे आहेत व विविध पुराणकथा या स्थानाच्या संदर्भात सांगितल्या जातात. प्राचीन काळी हे स्थळ बाडाहाट म्हणून ओळखले जात होते. केदारखंडात या स्थानाचे विस्तृत वर्णन पण केले आहे. या स्थानाचा उल्लेख ‘सौम्य काशी’ असा पण केला आहे. या गावाने अनेक भौगोलिक परिवर्तने पाहिली आहेत. असे सांगतात की पूर्वी गंगा या ठिकाणी उत्तरवाहिनी होती. उत्तरकाशीपासून काही अंतरावर असलेल्या झाला गावाजवळ भागीरथीच्या पात्रात भुस्खलनाने प्रचंड दरडी कोसळल्या व प्रवाहात बांध तयार झाला. परिणामी प्रवाह बंद होऊन त्या ठिकाणी मोठा तलाव निर्माण झाला. काही वर्षानंतर पाण्याचा दाब सहन न होऊन हा बांध फुटला. पाण्याच्या या प्रचंड वेगाने नदीचे पात्र बदलले व गंगा पूर्ववाहिनी बनली. १८०३ साली झालेल्या भूकंपामुळे सुद्धा गंगेचे पात्र बदलले.
असे सांगितले जाते की या ठिकाणी जगदग्नी ऋषींचा आश्रम होता. त्यांच्याकडे कल्पवृक्ष व कामधेनू होती व त्यामुळे ते कोणतीही इच्छा पूर्ण करू शकत. एके दिवशी कीर्तवीर्य अर्जुन राजा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला असता त्याने कामधेनु व कल्पवृक्ष पाहिला. राजाने कामधेनुची जमदग्नी ऋषींच्याकडे मागणी केली. त्यांना अनेक प्रलोभने दाखवली. पण ऋषींनी कामधेनु देण्यास नकार दिला. तेव्हा राजाने जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला. जमदग्नी ऋषींचा पुत्र परशुराम याला हे समजले तेव्हा तो संतप्त झाला व त्याने प्रतिज्ञा केली की मी ही पृथ्वी नि:क्षत्रिय करीन व त्याने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा वध केला. त्याने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली व वारणावत क्षेत्रात येऊन शिवाची आराधना करू लागला. शिवाच्या आराधनेने त्याला शांती मिळाली. राग निवळला. स्वभाव सौम्य झाला म्हणून या क्षेत्राला ‘सौम्यकाशी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
उत्तर काशीचे महत्त्व हिमालयस्थित काशी असेच सांगितले जाते. या पुरातन शहराला एकेकाळी राजधानीचा दर्जा असावा. कारण राहुल सांस्कृत्यायनप्रमाणे ‘हाट’ हा शब्द ‘राजधानी’ दर्शवतो. हिमालयन गॅझेटियरचे लेखक एटकिन्सन यांच्या अनुमानानुसार चिनी यात्री ह्यु-एन-त्संग याने या स्थानाला भेट दिली होती व त्यावेळी या ठिकाणी एक शक्तिस्तंभ उभा होता, असे त्याने लिहून ठेवले आहे.
उत्तरकाशी हे मंदिरांचे गाव आहे. पण या सर्व मंदिरात महत्त्वाचे म्हणजे ‘विश्वनाथ मंदीर’. मंदिराच्या प्रांगणात श्रीगणेशाचे व शक्तिदेवीचे मंदीर आहे. मंदिरासमोर एकवीस फूट उंचीचा व साधारण अडीच फूट गोलाईचा एक त्रिशूळ उभा आहे. या त्रिशूळाचा वरचा भाग लोखंडाचा तर खालचा भाग तांब्याचा आहे. केदारखंडातील एका आख्यायिकेनुसार देव-दानवांच्या शक्तिरूपाने हा त्रिशूळ आकाशातून खाली पडला व तेव्हापासून तो या ठिकाणी आहे. या त्रिशूळावर पाली भाषेत काही ओळी लिहिल्या आहेत. इ.स. पूर्व ५०० वर्षे कोणी राजाने त्या आपल्या राज्याभिषेकाच्या समारंभाने लिहिल्या असाव्यात असा पुराणवस्तु संशोधकांचा अंदाज आहे.
महाभारतकाळात हा सर्व परिसर वारणावत म्हणून ओळखला जात होता. वारणावत पर्वतातून उगम पावणारी वारणा नदी व भागीरथीचा या ठिकाणी संगम होतो. संगम स्थळी वरूणेश्वराचे पुरातन मंदीर आहे.
उत्तरकाशीहून साधारण १ कि.मी. अंतरावर लक्षेश्वर महादेवाचे मंदीर आहे. याच ठिकाणी कौरवांनी लाक्षागृह निर्माण करून पांडवांना मारण्याची कूटनीती अवलंबली होती, असे सांगतात.
उत्तरकाशीहून साधारण ८ कि.मी. अंतरावर साडेआठ हजार फूट उंचीवर एक सुंदर सरोवर आहे. ‘नचिकेत सरोवर’ म्हणून हे ओळखले जाते. कठोपनिषदातील यम आणि नचिकेत यांचा संवाद या ठिकाणी झाला, असे सांगितले जाते. नचिकेत हा उद्दालक ऋषींचा मुलगा. हा मुलगा मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी यमाच्या द्वारी गेला व त्याने यमाकडून मृत्यूचे रहस्य जाणून घेतले.
उत्तरकाशी परिसरात पुराणवस्तू संशोधन खात्याने खूप शोध घेतले आहेत व त्यातच पुरातन लेणी, गुंफाचित्रे, शिलालेखांचा शोध लागला आहे. त्यांच्या अभ्यासामुळे या परिसरातील तसेच हिमालयातील मानवी संस्कृतीवर खूप प्रकाश पडेल. अज्ञात गोष्टी ज्ञात होतील. उत्तरकाशी परिसरात सुंदर मूर्तीपण आढळल्या आहेत तर अनेक उपेक्षित मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्या आहेत. आपले दुर्दैव!
३०-३५ हजार वस्तीच्या या गावात सरकारी कार्यालये, साधू-संन्याशांचे मठ व आश्रम आहेत. संस्कृत पाठशाला आहेत. योगाचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, तर पन्नास एकर जागेत ‘नेहरु माऊंटेनेयरिंग इन्स्टिट्यूट’ ही संस्था उभी आहे. या ठिकाणी गिर्यारोहणारे तंत्रशुद्ध शिक्षण दिले जाते. भारतातील या नामांकित संस्थेत गिर्यारोहणाचे शिक्षण घेण्यासाठी देश-परदेशातून अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात.
उत्तरकाशीहून १० कि.मी. अंतरावर येते ‘भटवाडी.’ स्कंदपुराणात या स्थानाचा उल्लेख ‘भास्कर प्रयाग’ असा केला आहे. या ठिकाणी भास्करेश्वराचे मंदिर आहे. नवला, शंखधारा व मोक्षनदी या नद्यांचा या ठिकाणी संगम होतो आणि मग हा प्रवाह भागीरथीला मिळतो. नंतर १५ कि.मी. अंतरावर येते ‘गंगनाणी’. ही पराशर मुनींची तपोभूमी. या ठिकाणी पराशर मुनींचे मंदिर आहे. मंदिराखालून गरम पाण्याचा झरा उगम पावतो. गंगोत्रीची पायी यात्रा करणारे भाविक या ठिकाणी मुक्काम करतात.
सुखी-झाला मार्गे मग येते ‘हरसिल.’ गढवाल हिमालयातील हे अत्यंत सुंदर स्थळ आहे. हरसिलचे सौंदर्य शब्दात सांगणे अशक्य आहे. चहुबाजूंनी पसरलेल्या हिमाच्छादित पर्वतशिखरांच्या कुशीत हरसिल स्वत:ला हरवून गेले आहे. डोंगरावर पसरलेले चीड-पाईन वृक्ष तर पायाशी पसरलेली हिरवी कुरणे व त्यामधून वेडीवाकडी वळणे घेत, लहान मुलासारखी धावणारी गंगा. जॉर्ज विल्सन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी तर हरसिलच्या प्रेमातच पडला. आपल्या वास्तव्यासाठी त्याने हरसिलला बंगला बांधला. सफरचंदाची लागवड केली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन इतर लोकांनीपण सफरचंदाची लागवड केली. आज या ठिकाणी उत्तम दर्जाची विपुल सफरचंदे तयार होतात.
हरसिलपासून १३ कि.मी. अंतरावर आहे ‘लंका’ ही वस्ती! या ठिकाणी असलेला जडगंगा नदीवर पूल हा स्थापत्यशास्त्राचा एक थक्क करून टाकणारा नमुना आहे. एका दरीवर बांधलेला हा पूल म्हणजे खरंच एक अजब काम आहे. साधारण ८०-१०० फूट लांबीच्या पुलावरून खाली नजर टाकली असता नजरेस पडते ती साधारण ७५० फूट खोलीवरून वाहणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या जडगंगेच्या पाण्याची रेघ. सूर्याची किरणे या पाण्यावर पडलेली असतात व पाणी चमकत असते. हा एक विलक्षण अनुभव आहे. जगात जास्तीत जास्त खोली असलेल्या पुलामध्ये या पुलाचा समावेश होतो. पूर्वी जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा गंगोत्रीला पोहचणे खूप अवघड होते. या पुलाला मधे कोणताही आधार नाही.
-प्रकाश लेले
Leave a Reply