नवीन लेखन...

गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

‘नारायण, नारायण’ असा जप करीत नारदमुनी त्रिखंडात संचार करत होते. असाच जप करीत त्यांनी हिमालयात प्रवेश केला आणि एक विचित्र दृश्य त्यांच्या समोर आले. एका ठिकाणी काही स्त्री-पुरुष त्यांच्या नजरेस आले. नारदमुनी उत्सुकतेने त्यांच्याजवळ गेले. त्यांना दिसले की हे सर्व स्त्री-पुरुष विद्रूप आहेत. कोणाला कान, तर कोणाला डोळे नाहीत तर कुणाला नाक नाही तर कुणाला हात-पाय! पण त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज झाकले जात नव्हते. नारदमुनींनी ओळखले की हे कोणी सामान्य स्त्री-पुरुष नाहीत. नारदमुनींनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली व “आपण कोण आहात?” असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले, “आम्ही संगितातील राग-रागिणी आहोत.” नारदमुनींनी त्यांना विचारले, “मग तुमची ही अवस्था कुणी केली?” राग-रागिणी काहीच बोलेनात. नारदमुनींनी निरनिराळ्या मार्गाने त्यांना विचारले, पण कोणीच काही उत्तर देत नव्हते. नारदमुनींनी त्यांना अभय वचन दिले. शेवटी एकाने उत्तर दिले. तो म्हणाला, “मुनिवर्य हे सर्व आपल्यामुळे झाले आहे.” नारदमुनी आश्चर्यचकीत झाले. पुढे तो सांगू लागला, “मुनिवर्य, आपण जे गायन करता ते चुकीचे करता व त्यामुळे आमची ही अशी अवस्था झाली आहे.” नारदमुनी स्तब्ध झाले, आठवू लागले. त्यांना संगिताचे ज्ञान श्रीशंकराकडून प्राप्त झाले होते. माझ्यासारखा संगितातील ज्ञानी कोणीच नाही याचा त्यांना गर्व झाला होता. नारदमुनी लज्जित झाले. त्यांनी ओळखले की सर्व भगवंताची लीला आहे.

खजील झालेल्या नारदमुनींच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी सर्व स्त्री-पुरुषांना वंदन केले. आपल्या अपराधीपणाची त्यांना लाज वाटली. विनयशील मुद्रेने त्यांनी सर्वांना विचारले, “माझ्या चुकीचे हे प्रायश्चित्त आपण भोगत आहात. मला क्षमा करा व आपणास पूर्वीसारखे रूप कसे प्राप्त होईल ते मला सांगा.. आपण सांगाल ते मला मान्य आहे.” तेव्हा त्या स्त्री-पुरुषांनी सांगितले की जर कोणी अधिकारी वाणीने केलेले गायन आमच्या कानावर पडले तर आम्हाला पूर्वस्थिती प्राप्त होईल. मग अशी संगितातील अधिकारी देवता कोण? तर शंभू महादेव! शंभू महादेवांचे गायन आमच्या कानावर पडले तर आम्हाला पूर्वरूप प्राप्त होईल.”

नारदमुनींनी कैलासाकडे प्रस्थान ठेवले व लज्जित मुद्रेने श्रीशंकरापुढे हात जोडून उभे राहिले. श्रीशंकरांनी सर्व जाणले व चेहऱ्यावरचे स्मित कायम ठेवत नारदमुनींना येण्याचे कारण विचारले. अपराधी मुद्रेने नारदमुनींनी श्रीशंकराला सर्व काही सांगितले व आपल्या गायनाने राग-रागिणींना पूर्वरूप प्राप्त करून देण्याची प्रार्थना केली. श्रीशंकरांनी नारदमुनींची प्रार्थना मान्य केली पण सांगितले की मी असे कुणापुढेही गायन करणार नाही तर माझे श्रोतेपण तसेच अधिकारी असले पाहिजेत. जर ब्रह्मदेव व श्रीविष्णू येत असतील तरच मी गायन करीन.

नारदमुनींना आनंद झाला. लगबगीने ते ब्रह्मलोकी गेले. ब्रह्मदेवासमोर उभे राहून त्यांनी ब्रह्मदेवांना वंदन केले व सर्व काही सांगून ब्रह्मदेवांना श्रीशंकराचे गायन ऐकण्यासाठी येण्याची प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना परमानंद झाला. त्यांनी नारदमुनींची प्रार्थना आनंदाने मान्य केली.

लगबगीने नारदमुनींनी वैकुंठलोकी प्रयाण केले. भगवान श्रीविष्णू शेषशायीवर विश्रांती घेत होते. नारदमुनी श्रीविष्णूसमोर हात जोडून उभे होते. मुखातून नारायण, नारायण जप करीत होते. नारदमुनींना पाहून श्रीविष्णूंना खूप आनंद झाला. त्यांनी नारदमुनींचे स्वागत केले. मनोमनी सुखावलेल्या भगवंताला नारदमुनींनी सर्व काही सांगितले. शंभू महादेवाचे गायन ऐकायला मिळणार हे समजल्यावर श्रीविष्णू आनंदाने उत्साहित झाले व त्यांनी नारदमुनींची प्रार्थना आनंदाने मान्य केली.

भगवान श्रीविष्णू, ब्रह्मदेव यांच्यासारखे श्रोते मिळाल्याचे समजल्यावर शंभू महादेव खूप आनंदित झाले. ब्रह्मदेवाचे, श्रीविष्णूचे आगमन झाले. श्रीशंकरांनी गायनाला सुरुवात केली. वेळ कसा जात होता हे कोणालाच समजत नव्हते. सर्व परिसर भारावून गेला होता. एक पवित्र सुगंध वातावरणात दरवळत होता. श्रीशंकर बेभान होऊन गात होते. वारा स्तब्ध झाला होता.सूर्य थबकला होता. ब्रह्मदेव तर भान हरपून गेले. श्रीविष्णू तर इतके भावनाविवश झाले की त्यांच्या अंगा-अंगाचे पाणी होऊ लागले व एक जलधारा त्यांच्या पायापासून वाहू लागली.

गायन संपले. राग-रागिणींना आपले पूर्वरूप प्राप्त झाले. भानावर आलेल्या ब्रह्मदेवांनी पाहिले की श्रीविष्णूच्या पदकमलापासून एक जलधारा वाहत आहे. त्यांनी आपल्या कमंडलूत त्या जलधारेला गोळा केले. श्रीविष्णूंनी, ब्रह्मदेवांनी तृप्त मनाने शंभू महादेवाला वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले व श्रीविष्णूंनी वैकुंठाकडे तर ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूतील जलासहीत ब्रह्मलोकी प्रयाण केले. श्रीविष्णूंच्या पदकमलापासून निघालेल्या कमंडलूतील पवित्रजलाचे ब्रह्मदेवांनी ‘गंगा’ असे नामकरण केले.

प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला. सगर राजाने विधीपूर्वक घोडा सोडला. ही गोष्ट इंद्राला समजली. तो भयभीत झाला. यज्ञ पूर्ण झाल्यावर सगर राजा आपले इंद्रपद प्राप्त करेल या भीतीने इंद्राने या यज्ञात विघ्न आणायचे ठरवले व अश्वमेध यज्ञाचा घोडा त्याने कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवला. घोडा परत न आल्या कारणामुळे सगर राजा चिंतेत पडला. सगर राजाचे सर्व पुत्र घोडा शोधण्यासाठी बाहेर पडले. पण राजाचा एक पुत्र दिलीप राजाजवळ थांबला.

सगर राजाच्या पुत्रांनी घोड्याचा त्रिखंडात शोध घेतला. पण घोडा काही सापडला नाही. शेवटी हे सर्व पुत्र कपिलमुनींच्या आश्रमात आले व त्यांना घोडा दृष्टीस पडला. त्यावेळी कपिलमुनी साधना करीत होते. त्यांना हा काहीच प्रकार माहीत नव्हता. घोडा पाहून सगर पुत्रांनी कपिल मुनींच्या आश्रमात हैदोस घालण्यास सुरुवात केली. समाधीस्थ कपिल मुनींची ते विटंबना करू लागले. त्यामुळे कपिलमुनींचा समाधीभंग झाला. आश्रमात चाललेला गोंधळ पाहून ते क्रुद्ध झाले. रागावलेल्या नजरेने त्यांनी सगर पुत्रांकडे पाहिले व त्या दाहाने सर्व सगर पुत्रांचे भस्म झाले.

खूप वाट पाहूनही आपली मुले परत का आली नाहीत या चिंतेने सगर राजा काळजीत पडला व तो आपल्या मुलांच्या शोधार्थ बाहेर पडला. शोध घेत एके दिवशी तो कपिल मुनींच्या आश्रमात आला व त्याला सर्व प्रकार समजला. दुःखित सगर राजा कपिलमुनींच्या समोर उभा राहून क्षमायाचना करू लागला. आपल्या येण्याचे प्रयोजन त्याने कपिलमुनींना सांगितले.

कपिलमुनींनी अंर्तज्ञानाने सर्व काही जाणले. हे सर्व इंद्रामुळे झाले हे त्यांच्या लक्षात आले. झाल्या प्रकारावरून ते उदास झाले. अपराधी भावनेने ते सगर राजासमोर उभे राहिले व त्यांनी राजाला सांगितले की, राजा ब्रह्मलोकीच्या गंगेला तू प्रसन्न करून घे. तिच्या पाण्याचा प्रवाह तुझ्या मुलांच्या भस्मावरून प्रवाहित झाला तर तुझी मुले परत जिवंत होतील.

कपिलमुनींच्या सांगण्याप्रमाणे सगर राजाने गंगेची तपश्चर्या सुरू केली. पण ही तपस्या फलद्रूप झाली नाही. सगर राजाच्या नंतर त्याचा पुत्र दिलीप याने गंगेची तपश्चर्या सुरू केली. पण त्यालाही गंगा प्रसन्न झाली नाही. दिलीप राजाला भगीरथ नावाचा पुत्र होता. एके दिवशी त्याला हा सर्व घटनाक्रम समजला. आपल्या आजोबांची इच्छा पूर्ण करण्याचा त्याने निश्चय केला. त्याने राज्याचा त्याग केला व तो हिमालयात पोहोचला. हिमशृंग पर्वतावरील श्रीकंठ शिखरावर त्याने आपले आसन मांडले व घोर तपश्चर्येला सुरुवात केली. हजारो वर्षे तो तप करीत होता आणि एके दिवशी त्याची कठोर तपश्चर्या पाहून गंगा त्याला प्रसन्न झाली. भगीरथ राजाने तिला आपल्या तपश्चर्येचे कारण सांगून पृथ्वीवर येण्याची प्रार्थना केली. गंगेने राजाची इच्छा मान्य केली पण तिने पुढे सांगितले की, “मी जेव्हा देवलोकातून पृथ्वीवर पदार्पण करेन तेव्हा माझ्या जलप्रवाहाचा वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. ती भंग पावेल. तू शंकराला प्रसन्न करून घे व माझ्या वेगावर नियंत्रण घालून पृथ्वीचे रक्षण करायला सांग. माझ्या वेगाला धारण करण्याची शक्ती त्रैलोक्यात फक्त श्रीशंकराकडेच आहे.

भगीरथ राजाने आता श्रीशंकराची तपश्चर्या सुरुवात केली. वर्षांमागे वर्ष उलटत होती. तपाचा प्रभाव वाढत होता व एके दिवशी या तपाच्या प्रभावाने शंकराचे आसन डगमगू लागले. त्यांचा समाधीभंग झाला. श्रीशंकराने सर्व जाणले. प्रसन्न मुद्रेने ते भगीरथ राजासमोर उभे राहिले व इच्छित वर मागण्यास सांगितले. भगीरथ राजाने सर्व काही श्रीशंकरांना सांगितले. गंगेचे हे पृथ्वीवरील अवतरण हे सर्वांसाठी कल्याणकारी ठरणार होते. शंकरांना आनंद झाला. गंगेला धारण करण्याची भगीरथ राजाची प्रार्थना त्यांनी आनंदाने मान्य केली. आपल्या जटा सोडून ते उभे राहिले व त्यांनी गंगेला पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले.

आकाश दिव्य तेजाने उजळून निघाले. प्रचंड गडगडाट होऊ लागला. पृथ्वी डगमगू लागली. एका प्रचंड वेगाने येणाऱ्या जलस्रोताच्या रूपात गंगा पृथ्वीकडे झेपावली. श्रीशंकरांनी गंगेला आपल्या जटात झेलले व तिला बद्ध केले. गंगेचा वेग आता खूप नियंत्रित झाला.

श्रीशंकरांनी आपल्या जटा सैल केल्या. जटेत बद्ध झालेल्या गंगेचा एक प्रवाह वाहू लागला. भगीरथ राजाने श्रीशंकराला वंदन करून त्यांची स्तुती केली. प्रसन्न होऊन श्रीशंकरानी भगीरथ राजाला सांगितले की राजा तू आता पुढे चालू लाग. तुझ्या पाठोपाठ ही गंगा येईल.

भगीरथ राजा कपिलमुनींच्या आश्रमाकडे चालू लागला. मागून येणाऱ्या गंगेच्या पाण्याचा खळखळाट तो ऐकत होता. वाटेत जन्हु ऋषींचा आश्रम आला. अचानक पाण्याचा खळखळाट थांबला. भगीरथ राजाने मागे वळून पाहिले. त्याला समजले की गंगेच्या प्रवाहामुळे ऋषींचा आश्रम उद्ध्वस्त झाला. त्यामुळे राग येऊन ऋषींनी गंगेचा प्रवाह पिऊन टाकला.

भगीरथ राजा जन्हु ऋषींच्या समोर उभा राहिला व त्यांना सर्व हकीगत सांगितली. जन्हु ऋषी समाधान पावले. त्यांनी आपली मांडी कापली व मांडीतून गंगेचा प्रवाह प्रवाहित केला. गंगेची आता ओळख ‘जान्हवी’ अशी झाली.

भगीरथ राजा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचला. गंगा सगर पुत्रांच्या रक्षेवरून वाहू लागली. सर्व सगरपुत्र जिवंत झाले. सर्वत्र आनंदीआनंद पसरला.

भगीरथ राजाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणून लोक तिला ‘भागीरथी म्हणूनही ओळखू लागले. ज्या ठिकाणी भगीरथ राजाने तपश्चर्या केली ते स्थान ‘गंगोत्री’ हे एक पावन तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही गंगा वाहात आहे. लाखो लोकांचे जीवन समृद्ध करीत आहे.

या झाल्या पुराणकथा.

पण काही विचारवंतांचा असा एक विचार आहे की सगर राजाच्या राज्यात एकदा भयानक दुष्काळ पडला. प्रजेसमोर जीवन-मरणाचा प्रश्न पडला. अशा आपत्तीवर मात करण्यासाठी व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सगर राजाने हिमालयातील गंगेचा प्रवाह वळवून आपल्या राज्यात आणण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या साठ हजार प्रजाजनांना या कामावर नियुक्त केले व गंगेचा प्रवाह वळवण्याचे काम सुरू केले. हिमालयातील प्रचंड थंडी, वातावरणातील बदल किंवा काही नैसर्गिक उत्पातामुळे या प्रजाजनांचा अंत झाला असावा. राजा आपल्या प्रजेला पुत्रवत मानतो. म्हणून सगर राजाच्या साठ हजार पुत्रांचा अंत झाला हे विधान अशा संदर्भात असावे. हा प्रवाह वळवण्याचे काम सगर राजाच्या तिसऱ्या पिढीने पूर्ण केले असावे. त्यासाठी भगीरथ राजाने राज्याचा त्याग करून पूर्ण वेळ या कामावर देखरेख केली असावी.

काहीही असो. गंगेच्या प्रवाहाच्या मार्गक्रमणाचा मार्ग पाहिला असता, हा मार्ग कुणीतरी विचार करून, आखून वळवल्यासारखा किंवा तयार केल्यासारखा वाटतो. जर या विचारात काही वास्तव असले तर ज्याने हे काम केले त्याच्याकडे स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ठ ज्ञान असले पाहिजे व जनकल्याण हेच त्याचे ध्येय असले पाहिजे हे निश्चित!

-प्रकाश लेले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..