महाकवी कालिदासाने आपल्या ‘कुमारसंभव’ या महाकाव्याच्या पहिल्याच श्लोकात नगाधिराज हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणून गौरविले आहे. हिमालयातील उच्च वातावरण म्हणजे एक नि:शब्द शक्ती, पवित्र शांततेचे एक मूर्त स्वरूप आहे. ज्ञानी महात्मे सांगतात, “सूक्ष्म व कारणदेहातीत देवदेवता हिमालयाच्या गिरिशिखरांवर संचार करत असतात. वास्तव्य करत असतात.” देवाधिदेव महादेवाचे तर हे सर्वात प्रिय निवासस्थान. हिमालय ही भरतखंडाची पुण्यभूमी आहे. देवभूमी आहे. हिमालयाच्या महान, उत्तुंग, नित्य हिममय शिखरांच्या सान्निध्यात केदारनाथाचे मंदिर शतकानुशतके उभे आहे. बारा ज्योतिर्लिंगातील हे ११ वे ज्योतिर्लिंग! “आयुष्यात एकदा तरी गंगास्नान घडावे व बद्रिनाथ-केदारनाथचे दर्शन व्हावे” असे स्वप्न प्रत्येक भाविक आपल्या उराशी बाळगून असतो.
महाभारत, स्कंदपुराण, लिंगपुराण, वामनपुराण, ब्रह्मपुराण, वायुपुराण इ. अनेक पुराणांत केदारनाथचे माहात्म्य वर्णिले आहे. आख्यायिका-कथा सांगितल्या आहेत. या पवित्र स्थानाची महती आदिमाया पार्वतीला सांगताना श्रीशंकर म्हणतात, “मी ज्याप्रमाणे अनादिकाळापासून या विश्वात वावरतो, त्याप्रमाणे ही केदारभूमी प्राचीन आहे. ब्रह्मरूप धारण करून याच ठिकाणी मी सृष्टी निर्मितीची रचना केली.तेव्हापासून ही केदारभूमी अस्तित्वात आहे. ही देवदुर्लभ पवित्र भूमी आहे.”
या स्थानाशी निगडित अशा दोन कथा सांगितल्या जातात. जेव्हा ईश्वराने मानवी सृष्टी निर्माण केली तेव्हा तिच्या रक्षणार्थ नरनारायणांना त्याने पृथ्वीवर पाठवले. जगाच्या कल्याणासाठी नरनारायणानी गंधमादन पर्वतावर आशुतोष महादेवाची तपोसाधना केली. श्री शंकर प्रसन्न झाले. त्यांनी नरनारायणाना वर मागण्यास सांगितले. तेव्हा नरनारायणांनी श्रीशंकराला विनंती करून सांगितले, “विश्व कल्याणासाठी आम्ही आपले स्मरण केले. आपण या पर्वतात सदेह प्रकट स्वरूपात कायम वास्तव्य करावे. आपल्या दर्शनातून संसारी मानवाला मुक्ती लाभेल.” श्रीशंकराने ही विनंती आनंदाने मान्य केली.
तर दुसरी कथा महाभारताशी निगडित आहे. महाभारतातील युद्धात झालेला महासंहार, कुलक्षय यामुळे पांडवांना खूप नैराश्य आले. महर्षी व्यासांच्या उपदेशानुसार महादेवाच्या दर्शनासाठी ते काशीला निघाले. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी श्रीशंकर हिमालयात निघून गेले. पांडवांना हे समजताच ते दु:खी झाले व त्यांनीपण हिमालयाकडे प्रस्थान केले. एकवेळ अशी आली की ते श्रीशंकराच्या खूप जवळ पोहोचले. आता पांडवांना चुकवण्यासाठी महादेवाने महिषरूप धारण केले व जवळ असलेल्या म्हशीच्या कळपात प्रवेश केला. हे भीमाच्या लक्षात आले. त्याने रेड्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रेड्याने जमिनीत प्रवेश केला व भीमाच्या हाती रेड्याचे फक्त शेपूट आले. आता महिषाच्या हालचालीवर प्रतिबंध आले व त्याच्या शरीराचे पाच भाग भूपृष्ठावर प्रगट झाले. त्यापैकी पाठीचा भाग म्हणजे केदारनाथ. नाभीस्थळ – मदमहेश्वर. बाहु – तुंगनाथ. नेत्र – रूद्रनाथ व जटा म्हणजे कल्पेश्वर! ही पाच पवित्र स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून ओळखली जातात. तुंगनाथ वगळता ही सर्व स्थाने मुख्य रस्त्यापासून खूप दूर गिरीकुहरात दडली आहेत. केदारनाथ वगळता इतर ठिकाणी प्रवासी सोईसुविधा, पण फारशा उपलब्ध नाहीत. आहे ते फक्त निसर्गाचे भान हरवून टाकणारे रूप! येथील निसर्गाचे सौंदर्य, भव्यता व उदात्तता अभिजात आहे.
इक्ष्वाकु कुळातील पुण्यशील भगीरथ राजाच्या कठोर तपोसाधनेने देवलोकीची गंगा पृथ्वीवर अवतरली. तेव्हा पृथ्वीचे रक्षण व्हावे म्हणून श्रीशंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केले व जटात बद्ध केले. मग त्यांनी सुमेरू पर्वतावर प्रस्थान केले व जटाबद्ध असलेल्या गंगेला मुक्त केले. गंगेचा प्रवाह सात धारांतून भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी, जडगंगा, ऋषिगंगा, भिलनगंगा व सरस्वती नावाने गिरीशिखरावरून झेपावू लागला. या सातही धारांचा संयुक्तप्रवाह देवप्रयागपाशी एकत्र आला व गंगा म्हणून सागराकडे धावू लागला. गंगेच्या जटातील वास्तव्यामुळे श्रीशंकराच्या जटा ओल्या झाल्या. अशा. ओलाव्याला संस्कृतमध्ये ‘केदार’ म्हणून संबोधतात. असा ओलावा मस्तकावर धारण करणारा नाथ – तो केदारनाथ ! केदारनाथ या नावाची उत्पत्ती काही ग्रंथात अशी सांगितली आहे
ऋषिकेश ते केदारनाथ हे अंतर २२३ कि.मी.! त्यापैकी ऋषिकेश ते गौरीकुंड हा २०९ कि.मी.चा बसप्रवास आहे तर गौरीकुंड ते केदारनाथ हे १४ कि.मी.अंतर पायी पार करावे लागते. या सर्व मार्गावर पारंपारिक लोककथांची लेणी मिरवणारी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे असलेली अनेक गावे आहेत. त्यांच्याभोवती असलेल्या दंतकथा व मिथक मनाला मंत्रमुग्ध करून टाकतात.
हरिद्वार-ऋषिकेशपासून सुरू झालेला रस्ता देवप्रयाग, श्रीनगर मार्गे रुद्रप्रयागला येतो. रूद्रप्रयागहून एक रस्ता बद्रिनाथकडे तर दुसरा रस्ता तिलवाडा, गुप्तकाशी मागें गौरीकुंडला पोहोचतो.
रूद्रप्रयाग नंतर साधारण १५-१८ कि.मी. अंतरावर अगस्तीमुनी ही वस्ती येते. अगस्ती मुनींची ही तपोभूमी. हा परिसर बराचसा मैदानी आहे. जवळच भगवान विष्णूंचे मंदिर आहे.
हा रस्ता पुढे कुंडमार्गे गुप्तकाशीला पोहोचतो. श्रीशंकर पांडवांना चुकवण्यासाठी काशीहून हिमालयात आले व या ठिकाणी गुप्त रूपाने राहू लागले, अशी श्रद्धा आहे. गुप्तकाशीजवळ एका टेकडीवर श्रीशंकराचे पुरातन मंदिर आहे. मंदिरासमोर एक जलकुंड असून इथे दोन जल प्रवाह वेगवेगळ्या गोमुखातून प्रवाहित होत असतात. त्यांना गंगा व यमुना म्हणून ओळखले जाते.
गुप्तकाशीजवळ शोणितपूर म्हणून एक गाव आहे. पुरातनकाळी या सर्व परिसरावर बाणासूर नावाचा असुर राज्य करीत होता. बाणासूर शिवभक्त होता. शोणितपूर ही बाणासुराची राजधानी. बाणासुराची कन्या उषा हिने आपली सखी चित्रलेखा हिच्या मदतीने श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचे अपहरण केले होते व त्याच्याशी विवाह केला होता. यामुळे भगवान श्रीकृष्ण व श्रीशंकर यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते.
गुप्तकाशीनंतर नारायणकोटी ही वस्ती येते. या ठिकाणी लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. या परिसरात श्रीविष्णूच्या खूप मुर्ती पाहायला मिळतात. पुढे येते मैखंडा. देवीने दैत्यांच्या शरीराचे तुकडे करून या परिसरात टाकले म्हणून या गावाला मैखंडा म्हणतात. पुढे येते फाटा व मग रामपूर ही वस्ती.
रामपुराहून एक रस्ता त्रियुगी-नारायणाकडे जातो. रस्त्याने हे अंतर आहे साधारण १३ कि.मी. पण मधल्या वाटेने चालत गेल्यास ५ कि.मी. आहे. त्रियुगी नारायण हे स्थानसुद्धा हिमालयातील एक महापवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीशंकर व पार्वतीचा विवाह श्रीविष्णूंच्या साक्षीने या स्थळी ओळखले झाला अशी श्रद्धा आहे. म्हणून हे स्थान त्रियुगी नारायण म्हणून जाते. या ठिकाणी भगवान नारायणाचे मंदिर आहे व या ठिकाणी शिव-पार्वतीच्या विवाहाच्या रूपाने शिव व शक्ती एकरूप झाल्या. अशी श्रद्धा आहे की, या मंगल प्रसंगी प्रज्वलित करण्यात आलेला अग्नी आजही प्रज्वलित आहे. येणारा श्रद्धाळू भाविक मोठ्या श्रद्धेने या होमकुंडात समिधा अर्पण करतो व स्वत:ला भाग्यशाली समजतो. मंदिरासमोर जी तीन कुंडे आहेत ती सरस्वतीकुंड, ब्रह्मकुंड व रूद्रकुंड म्हणून ओळखली जातात.
त्रियुगी नारायणापासून २-३ कि.मी. अंतरावर कृष्ण सरोवर म्हणून छोटेसे सरोवर आहे. पण इधून दिसणारे निसर्गाचे रूप मोहवून टाकणारे आहे. हिरवाईने नटलेल्या जमिनीवर निळ्या पाण्याने भरलेले हे छोटेसे सरोवर व त्याला लाभलेली हिमाच्छादित पर्वतरांगांची पार्श्वभूमी! सरोवरात या पर्वत शिखरांचे प्रतिबिंब तर या निसर्ग सौंदर्यात भर घालत असते. वातावरणातील पवित्र शांतता, सुखद गारवा व परिसरातील निसर्ग चित्तवृत्ती उल्हासित करतात.
रामपूर जवळच सोनप्रयाग आहे. वासुकीतालमधून उगम पावणारी सोनगंगा व मंदाकिनीचे हे संगम स्थान सोनप्रयागपासून गौरीकुंड हे अंतर ५ कि.मी. आहे.
गौरीकुंड ते केदारनाथ हे अंतर साधारण १४ कि.मी. आहे. हा रस्ता चढणीचा आहे. शेवटचा २ कि.मी.चा रस्ता मात्र बराचसा सपाटीचा आहे. थोडे अंतर पुढे चालल्यावर साधारण त्रिकोणी आकाराच्या पठारावर वसलेल्या केदारपुरीचे व केदारनाथ मंदिराच्या सुवर्णकळसाचे प्रथम दूरदर्शन होते. आसमंतात पसरलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांकडे दृष्टी वळताच मनात विचार येतो की, या अपरंपार व अगम्य अशा शुभ्र हिमराशी आपल्या धवल स्मितानें अनंताचा महिमा व्यक्त करत आहेत. या शुभ्र ज्योर्तिमय, सुविशाल हिमराशीपासून तेज:पुंज दिव्य अशी असंख्य किरणे प्रसृत होऊन साऱ्या भूमंडळाला उजळून टाकत आहेत. हा हिमालय अनंत तत्त्वांनी परिपूर्ण आहे. मग वाटू लागते की या मंदिरासाठीच या उंच शिखरांचा अग्रभाग नगाधिराज हिमाद्रीने मुद्दाम सपाट बनवला आहे.
केदारकंठ, हनुमार टोप, भृगुपंथ इ. स्वर्गरोहिणी मालिकेतील शुभ्र हिमशिखरांच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले हे केदारनाथाचे मंदिर अतिशय शोभिवंत दिसते. पुराणात हिमालयाची व्याप्ती पाच खंडात सांगितली जाते. त्यातला मध्यवर्ती भाग म्हणजे ‘केदारखंड’. या मध्यवर्ती भागाच्या केंद्रबिंदूवर केदारनाथ मंदिराचे स्थान आहे, असे मानले जाते. कत्युरी शैलीतील जवळजवळ ६५ फूट उंचीच्या या मंदिराची स्थापना ८-१० फूट उंचीच्या चौथऱ्यावर केली आहे. प्रत्येक शिवमंदिराप्रमाणे या ठिकाणीसुद्धा मंदिराबाहेर एक खूप मोठा नंदी विराजमान आहे. याच ठिकाणी आशुतोष महादेवाला नंदीची प्राप्ती झाली व त्याने नंदीचा वाहन म्हणून स्वीकार केला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
गाभारा व दोन दालनांचा सभामंडप अशी या मंदिराची रचना असून गाभाऱ्यात एखाद्या शिखराप्रमाणे भासणारा ग्रेनाईटसारखा पाषाणखंड आहे व हेच नैसर्गिक शिवलिंग! गाभाऱ्यात सदैव तेला-तुपाचे दिवे प्रज्वलित केलेले असतात. बाहेरील सभामंडपाच्या भिंतीत काही आकृत्या कोरल्या आहेत. त्या पांडवांच्या, द्रौपदी व कुंतीच्या मूर्ती आहेत असे मानतात. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर द्वारपालांच्या मूर्ती कोरल्या आहेत.
पुराणकथा असे सांगतात की, या मंदिराची मूळ रचना पांडवांनी केली तर सभामंडप जनमेजयाने बांधला व त्यानेच पांडवांच्या स्मृती प्रतिमांच्या रूपात सभामंडपात कोरल्या. पुढे शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. लोकसमजुतीप्रमाणे माळव्याचा राजा त्रिभुवन नारायण यांनी इ.स. १०००-१०५० या काळात हे मंदिर बांधले. इ.स. ११४३-७३ या कालखंडात कुमारपाल यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. इ.स. १७६५-९५ दरम्यान साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिरावर सुवर्णकळस चढविला. सध्याच्या मंदिराची उभारणी १८०३-१५ या कालखंडात झाली आहे. लाल रंगाच्या मजबूत दगडांनी बांधलेले हे मंदिर पाहताना या ३५८४ मीटर इतक्या उंचीवर पूर्ण प्रतिकूल परिस्थितीत हे मंदिर बांधलेच कसे हा पहिला प्रश्न पडतो.
पहाटे साधारण ५-५।। वाजता मंदिर उघडते. सकाळच्या पूजेला निर्वाण-दर्शन म्हणतात. यावेळी अभिषेक, प्रसाद केला जातो. शिवलिंगाला भाविक स्पर्श करू शकतात. यावेळी सोवळ्या-ओवळ्याचा प्रश्न येत नाही. पाण्याच्या अभिषेकाऐवजी शिवलिंगाला तूप लावण्याची येथे प्रथा आहे. साधारण दुपारी १ ते ४ वाजता मंदिर बंद असते. दुपारच्या पूजेला शृंगारदर्शन म्हणतात. केदारनाथची शृंगारमूर्ती पंचमुखी आहे. आता शृंगारमूर्तीच्या कंठात सुवर्ण, हिरे माणकांचे दागिने, सुवासिक फुलांचे, ब्रह्मकमळाचे हार घातले जातात. शिवसहस्रनाम, शिवमहिमा, रूद्राचे पठण होते. सारे वातावरण पावित्र्याने भारून जाते. यावेळी मात्र गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. रात्री साधारण ९.०० वाजता उत्तरपूजा होऊन मंदिर बंद होते.
या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना ‘रावळ’ अशी उपाधी टिहरीच्या राजघराण्याकडून प्राप्त झाली आहे. हे रावळ आपला मूळपुरुष शिवगण ‘भुकुंड’ होता असे मानतात. केदारनाथचे पौरोहित्य त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालत आलेले आहे. आजतागायत झालेल्या अशा तीनशे वीस पुजाऱ्यांच्या नोंदी देवस्थानाकडे उपलब्ध आहेत.
केदारनाथ मंदिराजवळच्या विस्तीर्ण पठारावर नवदुर्गाचे मंदिर आहे. मंदिरात दुर्गेच्या नऊ अप्रतिम मुर्ती होत्या. आज मात्र पाचच आहेत. कारण चार मूर्ती चोरीला गेल्या.
मंदिरापासून साधारण १ कि.मी. अंतरावर एक प्रचंड शिळा आहे. तो आहे शिवगण ‘भैरव’. या भैरवनाथाला ‘बुढाकेदार’ असेही म्हणतात. हिवाळ्यात हा सर्व परिसर हिममय होतो. बर्फात झाकला जातो. त्या काळात या परिसराचे रक्षण व पावित्र्य राखण्याची जबाबदारी या भैरवनाथावर असते. तेथून पुढे एक गुंफा आहे. तिला भीमगुंफा म्हणतात. पुढे ६ कि.मी. अंतरावर ६८५६ मी. उंचीचे भृगुपंथ शिखर आहे. या शिखरातून स्वर्गद्वारा धार खाली येते. या शिखराकडे जाण्यासाठी जी पाऊलवाट आहे तिला ‘स्वर्गरोहिणी वाट’ म्हणतात. या शिखराखाली खूप खोल दरी आहे. तिला महापंथ म्हणतात. याच ठिकाणाहून धर्मराजाने सदेह स्वर्गात गमन केले अशी आख्यायिका सांगतात. या शिखरावरून खाली दरीत पवित्र मनाने उडी घेतल्यास साक्षात इंद्र स्वागताला येतो व त्या मानवाला स्वर्गात घेऊन जातो अशी श्रद्धा आहे व केवळ या श्रद्धेपोटीच १२५०० पेक्षा जास्त लोकांनी इथून देहत्याग केला आहे. ही हकीकत युरोपियन प्रवासी स्किनर याने आपल्या हिमालयातील प्रवास वर्णनात लिहून ठेवली आहे. हा देहत्याग म्हणजे एक मोठा समारंभ असे. १८८३ साली त्यावेळचे ब्रिटिश कमिशनर टेल यांनी या स्वर्गरोहणाच्या पद्धतीवर बंदी घातली.
शंकराचार्य हे हिंदुधर्माचे मोठे आधारस्तंभ. केरळमधील कालडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला व आपले जन्मग्राम सोडले. सर्व भारतभ्रमण करून या दिव्य महापुरुषाने अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. हिंदुधर्माची पुन: प्रतिष्ठापना करून त्यांनी हिंदू धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली. हिमालयात त्यांनी अनेक मंदिरांची स्थापना केली. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मठ स्थापन केले व या स्थानांना अध्यात्मविद्येची शक्तिशाली केंद्र बनविली. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केदारनाथला केली. केदारनाथ मंदिराजवळ त्यांचे समाधिस्थान आहे.
केदारनाथ मंदिरापासून साधारण २ कि.मी. अंतरावर चुरावाडी म्हणून एक सरोवर आहे. या सरोवरातून मंदाकिनी नदीचा उगम होतो. मंदाकिनीसोबत केदारनाथजवळच्या पर्वतशृंखलेतून आणखी चार नद्यांचा उगम होतो. कालभूषणमधून मधुगंगा, भृगुपंथमधून सरस्वती व स्वर्गद्वारा आणि सतोपंथमधून क्षीरगंगा! हसत, खिदळत नाचत या सख्या मंदाकिनीच्या गळ्यात पडतात व स्वतःला हरवून बसतात. कौंचतीर्थ, ब्रह्मकुंड, हंसकुंड, अमृतकुंड, रेवसकुंड अशी अनेक कुंडे मंदिर परिसरात आहेत. जून २०१३ मध्ये झालेल्या ढगफुटीच्या वेळी चुरावाडी सरोवर भंग पावले व बाहेर पडलेल्या पाण्याच्या लोंढ्याने सर्व परिसरात प्रलय माजवला.
केदारनाथपासून ६ कि.मी. अंतरावर ‘वासुकीताल’ नावाचे अतिशय सुंदर सरोवर आहे. या सरोवरातून सोनगंगा नदी उगम पावते. तिला वासुकीगंगा असेही म्हणतात. सोनप्रयागपाशी ती मंदाकिनीला मिळते. कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी स्थानिक लोक या ठिकाणी जाऊन वासुकी तळ्याची पूजा करतात. वासुकी तालकडे जाणारा मार्ग मात्र खडतर आहे. त्यामुळे या सरोवराकडे जाण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकाची मदत घेणे आवश्यक आहे. केदारनाथहून काही धाडसी यात्रेकरू, गिर्यारोहक वासुकी तालमार्गे बद्रीनाथला जातात. हे अंतर अवघे ३६ कि.मी. आहे. हा मार्ग अतिशय रमणीय असला तरी अत्यंत अवघड व बिकट आहे. मार्गात अनेक पर्वतशिखरे, ग्लेशिअर्स ओलांडावे लागतात.
या परिसराचे खरे सौंदर्य खुलते ते सरत्या पावसात, ऑगस्टच्या शेवटी व सप्टेंबर महिन्यात! हिमालयात हा फुला-फळांचा मोसम ! निळ्या आकाशाचा वेध घेणारी हिमाच्छादित शुभ्रधवल पर्वतशिखरे, त्यावर मध्येच रेंगाळणाऱ्या मेघमाला, पर्वतावर उठणाऱ्या प्रपातांच्या धवल रेषा, आसमंतात बहरलेली हिरवाई व त्यावर डोलणारी नाजूक फुले! पायात मध्ये-मध्ये येणारा एखादा निर्झर थोड्या उंचीवर बहरणारी ब्रह्मकमळे, हिमकमळे! दिवसाच्या प्रत्येक क्षणी निसर्गाचे हे चित्र एक नवीनच मोहक रूप धारण करत असते. सूर्योदयाच्या-सूर्यास्ताच्या वेळी होणारी रंगांची उधळण व हिमशिखरांचे क्षणाक्षणाला बदलणारे रंग तर मन बहरून टाकतात, तृप्त करतात. सर्व परीसर एखाद्या सुस्नात लावण्यवतीसारखा मोहक दिसत असतो.
दिवाळी संपते. कार्तिक मास सुरू होतो. हवामान झपाट्याने बदलू लागते. गार वारे वाहू लागतात. आकाशाचा रंग बदलतो. मध्येच हलकासा पाऊस तर कधी भुरभुरणारा बर्फ! वातावरणात नीरव शांतता पसरते आणि एके दिवशी केदारनाथची स्वारी आपल्या शीतकालीन मुक्कामाकडे म्हणजे ‘उखीमठला’ प्रस्थान करते. केदारेश्वराचे भोगसिंहासन मंदिराबाहेर काढले जाते. मंदिराचे दरवाजे बंद होतात. सर्वजण केदारपुरीचा निरोप घेतात. आता इथे कोणीही थांबत नाही. सर्व परिसर निर्मनुष्य होतो. बर्फवृष्टी वाढू लागते. बघता बघता सर्व परिसर बर्फात दिसेनासा होतो.
चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. सर्व परिसराला जाग येऊ लागते आणि एका शुभदिनी केदारनाथची स्वारी वाजत-गाजत समारंभपूर्वक आपल्या स्वस्थानी येते. मंदिराचे दरवाजे उघडतात. आपल्या स्थानावर केदारनाथ विराजमान होतात व आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहू लागतात. कारण भक्त हेच त्यांचे सर्वस्व आहे व भक्तांच्या भक्तीत आता त्यांना हरवून जायचे आहे.
महाद्रिपाश्वच तटे रमन्तं ।
संपूज्यमानं सततं मनिंद्रेः ।।
सुरासुरैर्यक्षमहोन गादयैः ।
केदारमीशं शिवमेरुमीडे॥
(टीप – जून २०१३ पर्यंत केदारनाथला जाणं खूप सुकर होते. गौरीकुंड-रामपाडा-केदारनाथ असा हा रस्ता होता. रस्ता प्रशस्त होता. वाटेवर चहा फराळाची छोटी दुकाने होती. राहण्याच्या व्यवस्था होत्या. निवारे होते. स्वच्छतागृहे होती. घोडा, कंडी, दंडी अशी प्रवासाची साधने होती. चाल व चढण सोडल्यास या मार्गावर काहीच अवघडपणा नव्हता. केदारक्षेत्रीसुद्धा खूप धर्मशाळा, निवासाच्या व्यवस्था, उपहारगृहे, दुकाने होती. सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध होत्या. हजारो भाविक दररोज श्रीकेदारनाथला दर्शनासाठी येत व कृतार्थ होत.
पण १६-१७ जून २०१३ च्या दरम्यान या परिसरावर ढगफुटीचे आभाळ कोसळले. फार थोड्या वेळात प्रचंड पाऊस पडला व सर्व परिसरात हाहा:कार उडाला. मंदाकिनीच्या पाण्याच्या प्रचंड वेगवान प्रवाहाने संपूर्ण केदारक्षेत्र, रामपाडा, गौरीकुंड या वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. उरले फक्त भग्न अवशेष! किती जण मृत्युमुखी पडले तर किती बेपत्ता झाले याची गणतीच नव्हती. तर प्राणी-घोडे इत्यादींची गणना कोण करणार? भूस्खलनाने, दरडी कोसळल्यामुळे रस्ते-वाटा उद्ध्वस्त झाल्या. केदारनाथची वाटही बंद झाली. सर्व परिसराला स्मशानकळा प्राप्त झाली. पण विशेष म्हणजे या महाप्रलयाची कोणतीही क्षती केदारनाथ मंदिराला पोहोचली नाही. आजही मंदिर पहिले होते तसेच उभे आहे.
आता परत काही लोक केदारनाथला जात आहेत. पण हे जाणे तेवढे सुकर राहिलेले नाही. कारण आता या सर्व मार्गावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शिवाय मनात असलेली एक अनामिक भिती.
केदारनाथ हे करोडो भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सद्यस्थिती बदलेल हे निश्चित. तसे सर्व यंत्रणेद्वारे प्रयत्नही सुरू असतील. कदाचित भविष्यकाळात केदारनाथला जाणे हे पूर्वीपेक्षा सुकर ठरेल. भाविकांची गर्दी वाढेल व या स्थानाला परत पहिले वैभव प्राप्त होईल. पण हे सर्व लवकर घडू दे अशी आपण केदारनाथच्या चरणी प्रार्थना करूया. कारण सर्व कर्ता व करविता तोच आहे!
– प्रकाश लेले
Leave a Reply