नवीन लेखन...

अजिंक्य रहाणे : क्रिकेटमधील सद्गृहस्थ

Cricket is Gentlemen’s Game – अर्थात “क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ आहे” हे क्रिकेटबाबतचे एक लोकप्रिय वचन. इंग्लंडमध्ये या खेळाची रुजवात झाली तेव्हा तेथे हे खरेही असेल. परंतु गेल्या ५० वर्षांतील जगभरातील अनेक खेळाडूंची वागणूक बघितल्यावर यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या उक्तीची थोडीफार बूज राखण्याचे काम गेल्या काही वर्षात केले असेल तर ते भारत व न्यूझीलंडच्या काही क्रिकेटपटूंनी. भारताचे बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे, विश्वनाथ, तेंडुलकर, कुंबळे, द्रविड हे क्रिकेटमधील सभ्य गृहस्थ म्हणून ओळखले जात. याच परंपरेतील अलिकडचे अपवादात्मक उदाहरण म्हणजे, अस्सल मराठमोळा मुंबईकर ‘अजिंक्य मधुकर रहाणे’.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मूळ गाव असणारा अजिंक्य आधी मुलुंडकर आणि आता दादरकर असला तरी त्याचे बालपण आणि शालेय जीवन गेले ते डोंबिवलीत. डोंबिवली पूर्वेच्या ‘स. वा. जोशी’ शाळेत त्याचे शिक्षण झाले आणि तेथेच क्रिकेटची गोडी लागली. शाळेपासूनच तो मधल्या फळीतील फलंदाज म्हणून चमकू लागला. सराव सामने व स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी लोकल ट्रेनच्या घुसमटवणाऱ्या गर्दीतून कराव्या लागलेल्या डोंबिवली-मुंबई रेल्वे प्रवासाने अजिंक्यला कणखर बनवले. तसेच कराटेच्या ब्लॅक-बेल्ट पर्यंतच्या प्रशिक्षणाने त्याला मानसिक व शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत झाली. १७ व १९ वर्षांखालील वयोगटात धावांचा पाऊस पाडल्याने त्याला २००७ साली १९व्या वर्षी मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळाले. रणजीतही सलग पाच वर्षे धावांची टाकसाळ उघडून, मुंबईला ३ वेळा रणजी विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या कामगिरीने त्याला २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय व टी२० सामन्यांत, तर मार्च २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले. अजिंक्यने ९० एकदिवसीय आणि २० टी२० सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी तो प्रामुख्याने कसोटी क्रिकेटचा भरवशाचा फलंदाज म्हणून ओळखला जातो.

आतापर्यंत ८५ कसोटी खेळलेल्या अजिंक्यने ५,००० धावांचा पल्ला पार केलाय, ज्यात त्याची १२ शतके आणि २६ अर्धशतके आहेत. अजिंक्यच्या फलंदाजीची खासियत म्हणजे ताकदीचा फार वापर न करता, अचूक टायमिंग व प्लेसमेंट साधत केलेली फटकेबाजी. ऐन भरातील अजिंक्यची बचाव व आक्रमण मिश्रीत शैलीदार फलंदाजी बघणे हा आनंददायी अनुभव असतो. न्यूझीलंडविरुद्धचे २०१४ मधील पहिले कसोटी शतक, २०१४ मधील भारताला विजयी करणारे इंग्लंडविरुद्धचे लॉर्डसवरील सुंदर शतक, २०१५ मध्ये आफ्रिकेविरुद्ध दिल्ली कसोटीतील दोन्ही डावातील शतके, २०१४-१५ व २०२०-२१च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवरील कठीण प्रसंगीची अप्रतिम धीरोदात्त शतके, जून २०२३ मध्ये ‘कसोटी विश्वचषका’च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही डावात केलेली झुंजार फलंदाजी हे अजिंक्यच्या कारकीर्दीतील सर्वोच्च मानबिंदू म्हणता येतील. विशेष म्हणजे मायदेशापेक्षा परदेशात अजिंक्यची कामगिरी सरस राहिली आहे. २०२२ साली काहीश्या डळमळीत फॉर्ममुळे व संघव्यवस्थापनाचा पुरेसा पाठिंबा नसल्याने त्याला सव्वा वर्ष भारतीय संघाबाहेर राहावे लागले. पण मधल्या काळातील चांगल्या कामगिरीमुळे अजिंक्य २०२३ च्या ‘कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या’ अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात परतला.

एक उत्तम फलंदाज असण्याबरोबरच अजिंक्य एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कल्पक कर्णधार आहे. मैदानावर कुठेही चपळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या अजिंक्यचे ‘थ्रो’ अगदी अचूक असतात आणि झेल पकडण्याच्या बाबतीत तो अतिशय विश्वासार्ह आहे. कसोटीत त्याचे १०० झेल आहेत ते इतर अनेक क्षेत्ररक्षकांच्या मानाने फार कमी सामन्यांमध्ये. २०१५ साली त्याने गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध एका कसोटीत ८ झेल घेण्याचा विश्वविक्रम केला जो अजूनही अबाधित आहे. नेतृत्वाच्या बाबतीतही अजिंक्य सर्व स्तरांवर आणि क्रिकेटच्या सगळ्या प्रकारांत नेहमीच प्रभावित करत आलाय. बरीच वर्षं भारताचा उपकर्णधार राहिलेल्या अजिंक्यला आतापर्यंत सहाच कसोटीत कप्तानपदाची संधी मिळालीय, पण त्यात ४ वेळा भारताला जिंकून देत तर २ वेळा सामना अनिर्णित ठेवत त्याने आपल्या ‘अजिंक्य’ नेतृत्वाची चुणूक दाखवलीय. त्याने नेतृत्व केलेल्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांत भारताचा विजय झालाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात संघांनी रणजी, दुलिप, मुश्ताक अली अश्या स्पर्धांचे जेतेपद मिळवले आहे.

क्रिकेटचा उत्कृष्ट अभ्यासक असणाऱ्या अजिंक्यच्या नेतृत्वाची खरी परीक्षा झाली ती २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, जेव्हा पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार कोहली कौटुंबिक कारणांनी घरी परतला. पहिल्या अॅडलेड कसोटीत अवघ्या ३६ धावांत सर्वबाद होत भारताला दारुण पराभव स्विकारावा लागला. अश्या वेळी भारतीय संघावर चोहोबाजूंनी कडवट टीका झाली आणि अनेक क्रिकेट-पंडितांच्या मते भारत ही मालिका आता ०-४ ने गमावणार होता. त्यातच भारताचे अनेक खेळाडू एकएक करून जायबंदी होऊ लागले. पण अजिंक्यच्या कणखर नेतृत्वाखालील भारतीय संघाने या सर्वांचा दबाव न घेता, आपला प्रामाणिक प्रयत्न व संघर्ष चालू ठेवला. मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीत अजिंक्यने एक महान शतक झळकावत भारताला आश्चर्यकारक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पुढेही त्याच्या प्रभावी नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम खेळ करत ही मालिका २-१ अशी जिंकली आणि टीकाकारांची तोंडे गप्प केली.

असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो. अतिआक्रमक, आक्रस्ताळ्या कप्तान कोहलीच्या तुलनेत उपकर्णधार अजिंक्यचा हा स्वभाव अधिकच उठून दिसे. मैदानावरही अजिंक्य तुम्हाला कधीच अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ, आक्रमक हावभाव किंवा चित्रविचित्र हातवारेही करताना दिसणार नाही. कप्तान म्हणून एकाच वेळी कल्पक, अभ्यासू, खिलाडू; पण त्याचवेळी ठाम, कणखर, शिस्तप्रिय भूमिका घेण्याची अनोखी हातोटी अजिंक्यकडे आहे. २०२१ च्या सिडनी कसोटीत भारताचा नवोदित गोलंदाज ‘सिराज’ला प्रेक्षकांतील काही गोऱ्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजी करत हिणवल्यावर, अजिंक्यने पंच व सामनाधिकाऱ्यांकडे तीव्र निषेध नोंदवत दोषी प्रेक्षकांनी माफी मागेपर्यंत सामना थांबवण्याची कणखर भूमिका घेतली.

दुसरीकडे दुलिप चषकाच्या अंतिम सामन्यात आपल्याच संघातील युवा खेळाडू ‘यशस्वी जयस्वाल’ प्रतिस्पर्धी खेळाडूवर मर्यादेबाहेर ‘स्लेजिंग’ करताना दिसल्यावर त्याला अर्धा तास तंबूत बसवण्याची शिक्षा करणारा अजिंक्य प्रसंगी कठोर बनतो. २०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याअंती कप्तान म्हणून विजेतेपदाचा चषक स्वत: न मिरवता, प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंच्या हातात चषक सोपवणारा अजिंक्य अतिशय वेगळा ठरतो. त्याचवेळी स्वत:च्या विजयाच्या आनंदात प्रतिस्पर्धी संघाच्या ‘लायन’ या फिरकी गोलंदाजाने ४०० बळी मिळवले हे न विसरता, त्याला मंचावर बोलावून त्याचा सत्कार करतो. याच विजयानंतर मायदेशात जंगी स्वागत झाल्यावर, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या ‘कांगारू’चे चित्र असलेला केक कापण्यास नम्र नकार देणाऱ्या अजिंक्यबद्दलचा आपला आदर द्विगुणित होतो. नुकत्याच संपन्न झालेल्या रणजी करंडक स्पर्धेमध्ये आपल्या कुशल नेतृत्वाने मुंबईला अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या अजिंक्यने पारितोषिक वितरण समारंभात आपल्या युवा सहकाऱ्यांना यशाचे श्रेय देतानाच प्रतिस्पर्धी विदर्भ संघाच्या जिगरबाज खेळाचे कौतुक करताना अजिबात कंजूषी केली नाही.

अर्जुन पुरस्कार विजेता अजिंक्य सामाजिक भान जोपासायला विसरत नाही. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या यांबद्दल त्याला विशेष आस्था असून त्यांना विविध माध्यमांतून मदत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. शेती, फळबागा, जलयुक्तशिवार यांसबंधी काही संस्थांशी तो निगडीत आहे. अनाथ, गरीब, कॅन्सरग्रस्त मुलांची सेवा करणाऱ्या संस्थांना भेटी देताना तो दिसतो. दुष्काळ, पूर, कोविड अश्या आपत्तींच्या वेळी पंतप्रधाननिधी आणि मुख्यमंत्रीनिधीला त्याने सढळ हस्ते मदत केली आहे.

समारोप करताना म्हणावेसे वाटते, की पूर्वी सद्गृहस्थांच्या मानल्या गेलेल्या क्रिकेट खेळात आता सभ्यता,  विनय,  संयम,  खिलाडूवृत्ती हे गुण लोप पावत चाललेले दिसतात. मात्र अजूनही हे गुण अंगभूत असलेल्या काही मोजक्या खेळाडूंपैकी ‘अजिंक्य’ एक आहे. यापुढच्या काळात क्रिकेटची ही जुनी ओळख राखायची असेल तर ‘अजिंक्य’सारख्या सद्गृहस्थांची संख्या या खेळात वाढली पाहिजे हे निश्चित. मराठी मातीशी घट्ट नाळ जुळलेल्या, महाराष्ट्राच्या या गुणी सुपुत्राला भावी कारकिर्दीसाठी आणि संपन्न आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!

– गुरुप्रसाद दि पणदूरकर (मुंबई)               

Avatar
About गुरुप्रसाद दिनकर पणदूरकर 4 Articles
एका अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँकेत २६ वर्षे कार्यकाळाचा अनुभव. मराठी साहित्य, खेळ व भारतीय इतिहास यांची विशेष आवड. क्रिकेट व बँकिंग यासंबंधी विविध संकेतस्थळे, मासिके व दिवाळी अंकांतून लिखाण, विशिष्ट संकल्पनांवर आधारित शब्दकोडी रचण्याचा छंद
Contact: Twitter

3 Comments on अजिंक्य रहाणे : क्रिकेटमधील सद्गृहस्थ

  1. धन्यवाद जितेंद्रजी व काशीनाथ सर

  2. फारच छान लेख आहे. बरीच नवीन माहिती समजली. खरंच अजिंक्य उत्तम खेळाडू आहे. लेखाबद्दल धन्यवाद!

  3. मी श्री. गुरुप्रसाद पणदूरकर हे माझे बँकेतील सहकारी. वाचन हा त्यांचा श्वास आहेच परंतू त्यांनी ज्या सफाईदारपणे वरील लेखन केले आहे त्यावरून हेच सिद्ध होत आहे की वाचन आणि लेखन हा त्यांचे श्वासोच्छ्वास आहे.
    लेख उत्तम जमला आहे, पणदूरकरजी !
    👍👍

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..