नवीन लेखन...

शेरूच्या केसची दीर्घकथा

” सर, शेरु आलाय ”

दररोज सकाळी ऑफिसला आल्या आल्या आमचे वरिष्ठ सहकारी इन्स्पेक्टर चंद्रकांत भोसेकर हे संपूर्ण स्टाफला समोर उभं करून “All’s well” घेत असत. त्या दरम्यान आमच्या गोळे हवालदारांनी शेरू मुंबईत स्पॉट झाल्याबद्दलची खबर दिली. भोसेकर साहेब सावरून बसले. ” कधी समजलं तुला ? “” काल रात्री सर . माझा शेजारी माटुंग्याला डीटेक्शनला आहे . त्याने सांगितलं . पाच सहा दिवसांपूर्वी रात्री सायकल पेट्रोलिंग करताना त्यांच्या जवळ जवळ हातात आला होता . पण थोडक्यात सटकला . ” भोसेकर साहेबांनी सर्वप्रथम दुसऱ्या एका हवालदारांना , गुन्हे शाखेचाच भाग असलेल्या , ” गुन्हे कार्यप्रणाली शाखा” ( मोडस ऑपरँडी ब्यूरो ) या उपशाखेत रवाना करून तेथील अधिकाऱ्याला फोन करून शेरुचे डॉकेट मागविले.हे डॉकेट म्हणजे गुन्हेगाराची कुंडलीच. जन्म कुठे झाला, शिक्षण किती आणि कुठे झाले , शाळा कोणती ,शिक्षणाचे माध्यम कोणते , भावंडे किती , शरीरावर जन्मखूणा काय आहेत , व्यसने कोणती , नातेवाईक कोण इथपासून त्याच्या नावावर किती गुन्हे आहेत , ते कोणत्या पोलिस स्टेशन मध्ये , कोणत्या कलमांखाली दाखल होते , आधीच्या अटका कधी आणि कोणत्या पोलिस अंमलदारांनी केल्या होत्या, त्याला आतापर्यंत किती वेळा आणि किती शिक्षा लागली इथपर्यंत नोंदी आणि त्याच्या सर्व बोटांच्या ठशांचा संच जोडलेला असे असते. शेरूचे डॉकेट हातात पडल्या पडल्या भोसेकर साहेब गोळे हवालदारांना घेऊन आमच्या सीनिअर इन्स्पेक्टर साहेबांकडे आणि तिथून ते तिघेही ए सी पी ( डीटेक्शन ) साहेबांकडे गेले. ते परत येईपर्यंत ए सी पी सरांनी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ( प्रशासन ) यांच्यामार्फत त्या वेळच्या आमच्या , ” डीटेक्शन ऑफ क्राईम ब्रँच , सी आय डी ” च्या सगळ्या युनिट्सना शेरू मुंबईत दिसल्याच्या नुकत्याच मिळालेल्या खबरीबाबत सेंसिटाईझ केले होते .आम्हाला बरेच वर्ष सीनिअर असलेल्या इन्सपेक्टर भोसेकरसाहेबांचा क्राईम डीटेक्शनचा अनुभव दांडगा. या आधी त्यांनी घाटकोपर , कुर्ला अशा पोलिस ठाण्यांत डीटेक्शन ऑफिसर म्हणून काम केले होते . करड्या शिस्तीचे आणि हाताखालच्या लोकांकडून काम करून घेण्यात तरबेज असलेले असे ते अधिकारी . पोलिस अधिकारी म्हणून माझ्या नोकरीच्या उमेदीच्या काळात मी जेंव्हा कुर्ला पोलिस ठाण्यात नेमणुकीस होतो, तेव्हा भोसेकरसाहेब तिथे डीटेक्शन ऑफिसर होते. प्रोबेशन काळ नुकतेच संपवलेले आम्ही नवीन सब इन्स्पेक्टर्स ( पोलिस परिभाषेतील बाबले ) त्यांच्याकडूनच क्राईम डीटेक्शनचे धडे घेत असू . तेंव्हा पासून मी त्यांना ओळखत होतो. आत्ताही योगायोगाने ” डीटेक्शन ऑफ क्राईम ब्रँच ” मधे त्यांचा कनिष्ठ सहकारी म्हणून त्यांच्याच युनिटमधे मी नेमणूकीस होतो . भोसेकरसाहेबांना त्याची खबर मिळताच खुर्चीतून तातडीने उठून कामाला लावणारा ” शेरु “नावाचा गुन्हेगार कोण असावा हे जाणून घेण्याची मला प्रचंड उत्कंठा लागली होती.मी त्याचे डॉकेट चाळले . ज्याच्या नावावर ” रात्रीच्या घरफोड्या आणि चोरी ” च्या असंख्य केसेस आहेत असा तो सराईत गुन्हेगार होता.

त्याच्याच विचारात असलेल्या भोसेकर साहेबांनी शेरुला ओळखणाऱ्या स्टाफला प्रथम एकत्र केले. क्राईम ब्रँच मधील अत्यंत जुन्या जाणत्या आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगताची इत्थंभूत माहिती तोंडावर असलेल्या आमच्या परब जमादार यांनी , ” मागल्यावेळी शेरुला नागपाडा पोलिस स्टेशन हद्दीतून उचलला होता . मोती टॉकीजच्या बाजूच्या छोटया कासूच्या क्लबमधून .” असे सांगितले . इतकेच नाही तर , त्या क्लबमधे पत्त्याचा जुगार खेळायला येणाऱ्यांसाठी लागणाऱ्या चहा आणि नाश्ता साठी क्लबचे उधारीचे खाते बाजूच्या कोणत्या हॉटेलमधे आहे हेही त्यांना माहीत होते. कुलाब्याच्या दांडीपासून इकडे मुलुंड आणि तिकडे दहिसरपर्यंत पसरलेल्या मुंबईतील अट्टल गुन्हेगारांची चालती बोलती जंत्री असलेल्या परब जमादारांची माहिती केवळ अचूक असे . मला डॉकेटवरील शेरूच्या फोटोच्या प्रती काढून तयार ठेवायला सांगून भोसेकर साहेबांनी आम्हा अधिकारी आणि स्टाफला काही सूचना दिल्या. गोळे हवालदार , माटे हवालदार आणि पूर्वी नागपाडा पोलिस ठाण्यात सेवा बजावलेले निकम हवालदार त्या क्लबच्या इमारतीची आणि आसपासची दिवसा बाहेरून पाहणी करून आले. क्लबची व्याप्ती तळमजला आणि पहिला मजला अशी होती. निकम हवालदार त्या क्लबला चहा नाश्ता पुरवणाऱ्या जवळच्याच एका छोट्या परंतु सदोदीत गजबजलेल्या हॉटेलच्या मालकाला ओळखत होते. त्याला भेटून क्लबमधे चहा नाश्ता घेऊन जाणारे रात्रपाळीचे नोकर कोण कोण असतात ते त्यांनी जाणून घेतले. त्यापैकी एका मध्यम वयाच्या गांजेकस नोकराला निवडून , बोलावून घेऊन विश्वासात घेतले गेले. पुढील आठवडाभर त्यालाच रात्री क्लबच्या ड्यूटीवर पाठवण्याबाबत मालकाला निक्षून सांगण्यात आले. नोकराचा खिसा गरम करण्यात आला. त्याला शेरूचा फोटो देण्यात आला. त्याला आणखी काही योग्य त्या सूचना देऊन स्टाफ परत आला. क्लबची रचना आणि तेथील परिस्थितीबद्दल आमची एकत्र चर्चा झाली . दुसऱ्याच रात्री साडेअकरा वाजता गोळे हवालदारांच्या घरी ” त्या ” हॉटेल नोकराने पाठवलेला एक टॅक्सी ड्रायव्हर पोहोचला. ” तुम्हारा पंछी क्लबमें पहले मालेपे बैठा है l बहोत उड रहा हैं l टोकन का ढेर लेके बैठा है l सुबह तक नहीं उठेगा l “. एवढं सांगून टॅक्सी निघून गेली . मुंबईत आड रस्त्याला पत्यांच्या जुगाराचे असे अनेक छुपे क्लब असत . रात्रंदिवस चालू असलेल्या अशा क्लबमधे बारा महिने चोवीस तास रमी आणि तीन पत्ती हे पत्त्याचे जुगार चालू असतात. तिथे जाणारे केवळ गुन्हेगार असतात असे नाही . व्यापारी , व्यावसायिक , दुकानदार , नोकरदार ,शोरुम मालक , टॅक्सी ड्रायव्हर्स , अगदी सगळ्या सगळ्या थरातील लोक . तिथे जात पात , गरीब , श्रीमंत , वयाने लहान मोठा … काही म्हणजे काहीही अपवाद नसतात. सदैव जुगार खेळण्याचे व्यसन ही एकच गोष्ट त्यांच्यात सामाईक. अशा क्लबमधे येणारा प्रत्येक जण अट्टल जुगारी असतो. तो क्लबमधे येतो. काऊंटर वर पैसे भरून तेवढ्याची टोकनस् घेतो . आणि गोल टेबलाभोवतीची रिकामी जागा पकडतो. बाजूला बसलेला इसम त्याच्या ओळखीचाही नसतो. पत्ते पिसण्याचा एक राऊंड झाला की पत्यांचा नवीन कॅट वापरात येतो. अशी ऐट. खेळायला येणारे खिशात पैसा आला की तो संपेपर्यंत दोन दोन , तिन तिन दिवस क्लब मधून उठत नाहीत . या व्यसनापायी अगणित लोकांचे व्यवसाय आणि संसार उध्वस्त झालेले आम्ही पाहिले आहेत . जुगार खेळणाऱ्यांच्या चहा नाश्त्याची इतकेच नव्हे तर काही ठिकाणी आंघोळीचीही सोय क्लबमधेच केलेली असते . त्याकाळी मोबाईल फोन , पेजर वगैरे काहीही नव्हते .माझ्या घराजवळील पोलिस आऊट पोस्टमधील एक पोलिस शिपाई , रात्री ” मेसेज बुक ” घेऊन घरी आला.
” पो.स. इ . अजित देशमुख यांनी तात्काळ नागपाडा पोलिस स्टेशन हद्दीत दोन टाकी चौकी येथे इन्स्पे.भोसेकर यांना रिपोर्ट करावा. “. …… असा आदेश मला प्राप्त झाला. मला लगेच अंदाज आला. माझे सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन माझ्या बुलेटवर मी निघालो. त्या काळी आजच्यासारखी वाहतूक नसल्याने आणि वेळही रात्रीची असल्याने अर्ध्या तासात नागपाडा पोलिस ठाण्याच्या कंपाउंड मधे बुलेट पार्क करून मी टॅक्सीने दोन टाकी चौकीला पोहोचलो. भोसेकर साहेब नुकतेच तिथे आले होते. स्टाफ होताच. आम्ही सर्वजण आमच्या ऑफिसच्या अँबॅसेडर कारने मोती टॉकीज पासून काही अंतरावर गेलो. कार तिथेच ठेवली आणि एकमेकांपासून दूर परंतु नजरेच्या टप्प्यात राहून छोटा कासूच्या क्लबच्या गल्लीकडे चालत निघालो. हा सगळा परिसर वेश्यावस्तीचा. दिवसभर सुस्त राहून रात्री उजळून निघणारा. मध्यरात्री दोन अडीचचा सुमार असला तरी पूर्ण गजबजलेला. चेहरे रंगवलेल्या तरुणी आणि बायका रस्तोरस्ती फिरत होत्या , तसल्याच बऱ्याच जणी तोंडावर रंग थापून खुराड्यांसारख्या खोल्या असलेल्या जुन्या , दोन – तीन मजली इमारतींच्या तळमजल्यावर, दरवाज्यात उभं राहून रस्त्यावरून चालणाऱ्या पुरुषांना हाका मारत उत्तानपणे खुणावत होत्या. काही खोल्यांतून तृतीयपंथी सुध्दा नटून थटून त्याच उद्योगात होते. फुटपाथवर पानवाले , गजरेवाले , तयार खाद्य पदार्थ विकणारे फेरीवाले यांचा सराईतपणे धंदा चालू , हातगाडीवर तयार केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचा दरवळ आसमंतात पसरलेला , टोपलीत गरमागरम समोसे , कबाब घेऊन फिरत्या विक्रेत्यांची लगबग , त्या भागात मुद्दाम शौक करण्यासाठी आलेले पुरुष टॅक्सीतून उतरत आहेत, रिकामी झालेली टॅक्सी पकडण्यासाठी इतर लोक धावत आहेत, अनेक दिवे आणि फेरीवाल्यांच्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या उजेडात आपले चेहरे लपवत पुरुष लगबगीने चालत आहेत . रस्त्यावरील भगभगता प्रकाश काय किंवा त्यावेळी तिथे वावर असलेल्या सगळ्यांच्या चेहेऱ्यांवरील वरील भाव … सगळच कृत्रिम . रस्त्यांवर चहाच्या किटल्या आणि ग्लासेसचे ट्रे घेऊन जाणाऱ्या हॉटेलच्या मुलांची इकडून तिकडे ये जा , असा सगळा माहौल पार करत आम्ही एकमेकांना नजरेने धरत छोटया कासूच्या क्लबकडे लगबगीने निघालो.

त्या रस्त्यावर मध्यरात्री दिसणाऱ्या पुरुषांच्या चेहऱ्यांवरील ठराविक छटा माहीत असलेली , इकडून तिकडे पळणारी हॉटेलची चहावली पोरं आमच्याकडे वळून वळून पहात होती. त्यांच्या सरावलेल्या नजरेने आम्ही पोलिस आहोत हे ओळखल्याचे जाणवत होते. पाच सात मिनिटात आम्ही क्लबच्या इमारतीचा लाकडी जिना चढत होतो .
आरोपीच्या अटकेचा महत्वाचा क्षण जवळ येत होता. अशावेळी पोलिस पथकातील सर्व सदस्यांच्या मनाची स्थिति सर्वसाधारण पणे सारखीच असते. आरोपी अटक टाळण्यासाठी काय करेल याचा नेम नसतो. मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न समजू शकतो परंतु बऱ्याच वेळा आरोपी जोरदार प्रतिकारही करतात. साहजिकच त्या मानसिकतेत असतानाच क्लबचा मुख्य दरवाज्यात आम्ही पोहोचलो . मी रिव्हॉल्वर होलस्टर मधून हातात घेतले. माटे आणि देसाई हवालदार क्लबच्या पहिल्या मजल्यावरील भागामधे प्रथम शिरले आणि थेट मागच्या दरवाज्यात जाऊन त्यांनी तो अडवला. मागोमाग मी आणि गोळे हवालदार . बाकीचे आमच्या मागे. आत बऱ्यापैकी मोठा हॉल . त्यात सुमारे पाच ते सहा गोल आकाराची टेबलस् होती ., प्रत्येक टेबला भोवताली पाच सहा खुर्च्या लावलेल्या . प्रत्येक खुर्ची समोर टेबलवर एक खाच . त्यात प्लास्टिकची टोकनस् . सर्व खुर्च्या भरलेल्या. सगळेजण जुगारात दंग . दखल घेण्याइतपत कुणाचही आमच्याकडे लक्ष नव्हतं.

सकाळी डॉकेटमधला शेरुचा फोटो आठवत मी सभोवार नजर टाकली. एका टेबलाशी त्याच्या चेहेऱ्याशी साधर्म्य असलेला पस्तीशीचा इसम मी हेरला. गोळेही त्या टेबलाच्या दिशेने पुढे झाले. शेरूच होता तो. मी लगबगीने पुढे सरसावणार तोच शेरुचे लक्ष गोळे हवालदारांकडे गेले. आणि इथपासून शेरू नावाचा सर्वस्वी वेगळा गुन्हेगार मला कळू लागला. अर्धे ध्यान पत्यांकडे आणि अर्धे गोळे यांच्याकडे ठेवत हातातला पत्ता खेळून उरलेले सावकाश टेबलवर ठेवत त्याने जांभई देत मोठ्ठा आळस दिला. ” क्या…. गोलेसाब ! ” म्हणत तो हसला. त्या हसण्यात आपण अपेक्षेपेक्षा लवकर पकडलो गेल्याची विषण्णता होती. तो उभा राहिला. साधारण पाच फूट उंचीच्या मध्यम बांधाच्या त्याने , सवयीने अंगझडती करुन देण्यासाठी स्वतःचे हात वर आडवे धरले. गोळे हवालदारांनी त्याची चाचपून झडती घेतली आणि ” चल ” म्हणाले. त्याने ” एक सिगारेट तो पिने दो ना भाय ! ” म्हणत टेबल वरचे बर्कले सिगारेट चे पाकीट आणि काडेपेटी उचलली. माझ्याकडे पहात ” पिऊ ना साब ? ” असे विचारले. गोळे हवालदारांनी ” ओढू द्या त्याला ” अशी मला डोळ्याने खूण केली . त्याचा हात धरून गोळे आणि निकम हवालदार भिंतीजवळच्या बाकावर जाऊन बसले. शेरू सिगारेटचा आस्वाद घेत दोन हवालदारांच्या मधे बसला होता.

क्लबमधे जुगार खेळत बसलेल्या बाकीच्यांना एव्हाना कल्पना आली होती. सी आय डी वाले आलेत याची त्यांना जाणीव झाल्यापासून ते जागच्या जागी थिजले होते. आता या आरोपी बरोबर आपलीही वरात निघणार या विचाराने त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. भोसेकर साहेबांनी क्लबच्या लँड लाईनवरून नागपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना क्लब मधे येऊन जुगार खेळणाऱ्या त्या अन्य लोकांवर कारवाई करण्यास सांगितले. क्लबमधील बाकड्यावर बसल्या बसल्या तिथेच गोळे आणि निकम हवालदार यांनी हलक्या आवाजात शेरुचे interrogation चालू केले होते. मी बाजूलाच होतो .
” इस टाइम किधर बजाया काम शेरु ? ” ” सायन में . कोलीवाडा को रोड जाता है देखो ! उधर l दो मालेकी बिल्डिंग हैं l मालीक अकेला रेहेता हैं ” शेरू
” कभी किया ? ”
” चार दिन पहले “शेरु.
” माल क्या था ? ”
” सब असली हीरेके जेवर .” शेरू
” किसको दिया ? ”
” किशोर दाढी . भुलेश्वरवाला ” शेरू.
कुठे कसलीही लपवाछपवी नाही . जणू काही दुसऱ्याच कोणीतरी केलेल्या घरफोडीची हा माहिती देतोय. गुन्हेगाराचा हा नमुना मला तेंव्हा नवीन होता. नंतर अनेक अट्टल गुन्हेगार अनुभवले. पोलिसांपासून लपवून काहीही उपयोग नसतो हे कळून चुकलेले. मात्र त्यातूनही काही जण थोडाफार तपशील गाळून सांगणारे असतात. शेरू मात्र पूर्ण वेगळा. स्वतःच सहजपणे साद्यंत माहिती देत होता . तो पर्यंत आमच्या युनिटची Ambassador कार , क्लब जवळ खाली आल्याचं कळलं. आम्ही निघालो . निघताना गोळे हवालदारानां , शेरूला बेडी घालायला मी खूण केली . त्यावर हसत हसत ” जरुरत नही साब , शेरु कही नही भागेगा ” असं शेरूच माझ्याकडे पहात म्हणाला . गोळेंनीही मला डोळ्याने निश्चिंत रहा असे खुणावले.

नागपाडा पोलिस ठाण्याजवळ कार मधून उतरून मी माझी मोटर सायकल घेतली आणि इतरांच्या पाठोपाठ आमच्या ऑफिसमधे पोहोचलो. परब जमादारना कुठे घरात चैन पडायला ! तेही ऑफिसमधे येऊन पोचले होते आणि interrogation मधे खंड नको म्हणून त्यांनी येताना शेरुसाठी भेंडी बाजारातून बूर्जी पावचे पार्सलही आणले होते. लॉकअप मधे ठेवलेल्या आरोपींना ठराविक वेळेलाच जेवण ( पोलिस भाषेत ” भत्ता ” ) दिले जाते. त्या वेळेपुरतीही शेरूची चौकशी थांबता कमा नये हा परब यांचा हेतू . ऑफिसला पोहोचताच , माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपशील मी क्राइम बुलेटिन वरून काढला . लोखंड आणि स्टील मार्केटमधील एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी शेरुने घरफोडी करून सात लाखांच्या वर किंमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी केली होती . तिथला क्राईम रजिस्टर नंबर माहीत झाल्यावर , तो घरफोडी आणि चोरीचा गुन्हा पुढील तपासा करीता क्राईम ब्रँच कडे वर्ग करून घेण्यासाठी आवश्यक ते मेमो वगैरे ए सी पी साहेबांच्या सहीसाठी तयार ठेवण्याच्या कामास मी लागलो होतो.
पहाटे पहाटे भोसेकरसाहेबांनी आमच्या ए सी पी साहेबांना फोन करून शेरु ताब्यात असल्याचे कळवले आणि त्या गुन्ह्याचा तपशील सांगितला.

शेरुचे पहाटेचे भोजन चालू असताना परब जमादार समोर बसून शेरुला सतत प्रश्न विचारत होते.
” ये टाइम एकदम सायन कोलीवाडा कैसा चुन लिया? ” ,
” तेरेको इस सेठके बारेमें टीप किसने दिया ? ” ,
” तू पिछले टाईममें आर्थर रोड में था तब तेरे लिये वकील खडा करनेवाला , हाफ मर्डरमे बंद था वो धारावी का बटल्या नाडर तुमको मिलता हैं क्या? ”
इथपासून
” तू छुटनेके बाद कहाँ कहाँ रहता था ? ” …
इथपर्यंत .

परब जमादार शक्य तितकी माहिती काढून घेत होते आरोपीच्या शेजारी बसून , कपाळावर आठी आणि बारीक डोळे करून मालवणी चालीत हिंदीतून एकामागोमाग एक प्रश्न विचारत , त्या गुन्ह्यातील सगळ्या धाग्यांची टोके जुळे पर्यंत परब जमादारांचे चित्त जाग्यावर नसे. त्यांच्या हातात कधीही कागद पेन नसे . मात्र एकदा ऐकलेली माहिती ( पोलिसांच्या भाषेत क्रिमिनल इंटेलिजन्स ) त्यांच्या डोक्यात कायमची फिट्ट होऊन बसे . दुपारपर्यंत शेरूच्या अटकेची आणि त्याला कोर्टाकडून पोलिस कस्टडी रिमांड मधे घेण्याची प्रक्रिया मी पूर्ण केली . गोळे आणि माटे हवालदार जरा लवकर निघून परस्पर ऑपेरा हाउस येथील ” प्रसाद चेंबर्स ” या मोठ्या हिरे मार्केटमधील , त्यांच्या माहितीतील हिऱ्यांच्या जुन्या दलालांशी संपर्क करण्यात गेले होते . किशोर दाढीची बरीचशी माहिती जमा झाली . रहायला तो व्ही पी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिक्का नगरच्या आसपास असल्याचे कळले. ते दोघे त्याच्याच मागावर गुंतून राहिले. किशोर दाढी संध्याकाळी पाच नंतर प्रसाद चेंबर्स मधे येतो हे कळल्यावर आम्ही वेळ घालवणे शक्य नव्हते . शेरुला घेऊन दोन पंच साक्षीदारांसह आम्ही त्वरेने प्रसाद चेंबर्सच्या गेट बाहेरील भेळ,रगडा पॅटीसच्या गाडीच्या आड थांबलो. शेरुला एका स्टूलावर बसवून त्याला हातात रगडा पॅटीसची एक प्लेट दिली. त्याच्या बाजूला मी आणि निकम हवालदार उभे.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास किशोर दाढी एका टॅक्सी तून उतरून घाईघाईने प्रसाद चेंबर्स इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना दिसला. शेरूने आम्हाला खूण केली आणि ” अय किशोर भाय” अशी त्याने जोरात हाक मारली . त्याने शेरुला पाहिलं आणि तो शेरुकडे चालत येऊ लागला. तोपर्यंत आमचा स्टाफ दोन्ही बाजूंनी त्याला चिकटूनच चालत आहे हे किशोर दाढीच्या लक्षातच आले नाही . शेरु उभा राहीला आणि तो साध्या कपड्यातील पोलिसांच्या ताब्यात आहे हे पाहून किशोर दाढी समजायचे ते समजला. रडवेल्या आवाजात हात जोडून म्हणाला , ” साब दया करो , परिवार वाला हूं l ” ” गाडी में बैठ l ” हवालदारांनी दरडावून सांगितल्यावर तो चटकन आमच्या गाडीत जाऊन बसला.

इथे काहीतरी पोलिस अँक्शन चालू आहे याचा एव्हाना पुसटसा अंदाज आल्याबरोबर तिथे घोळक्या घोळक्याने उभं राहून हिऱ्यांची दलाली करणाऱ्या तरूणांची अकारण झालेली पळापळ माझ्या अजून लक्षात आहे. आपण कधीतरी अनाहूतपणे केलेल्या दलालीतील हिऱ्यांचा संबंध कोणत्या एखाद्या गुन्ह्याशी असला तर काय घ्या ! असे विचार त्यांच्या मनात आले असावेत.

किशोर दाढीला रीतसर ताब्यात घेऊन त्याच्यासह क्राईम ब्रँच सी आय डी ऑफिस मधे आम्ही परतलो . हा चाळीशीचा इसम हीरे पारखण्यात माहीर होता. एका दुसऱ्या पोलिस स्टेशनच्या केस मधे तो अटक असताना ऑर्थर रोड जेल मधे काही वर्षांपूर्वी शेरुही तिथे होता. त्यांची ओळख झाली . ही चोरी केल्यानंतर मिळालेले घबाड इतके मोठे होते की ते बाजारात वटवणे किंवा कुठेतरी सुरक्षित ठेवणे शेरूसाठी फारच कठीण होते. चोरी झाल्यावर शेरू किशोर दाढीला भेटला आणि सगळा चोरीचा माल त्याच्याकडे विकण्यासाठी सुपूर्द केला.

दुपारपर्यंत माटुंगा पोलिस ठाण्या मधून गुन्ह्याची मूळ कागदपत्रे क्राईम ब्रँच कडे आली होती. स्टील मार्केट मधे मोठी उलाढाल असणाऱ्या व्यापारी शेठजींनाला स्वत:लाच समजत नव्हते की ही चोरी झाली कशी ! माटुंगा पोलिस ठाण्याचे अधिकारीही चक्रावून गेले होते. शेठजी झोपायच्या आधी दररोज बाजूच्या खोलीतील तिजोरीचे कपाट नीट बंद केले आहे की नाही हे कटाक्षाने पहात असत. त्यात ते कधीही चुकत नसत . त्या रात्रीही दहाच्या सुमारास त्यांनी कपाट व्यवस्थित बंद असल्याची खात्री केली आणि चाव्यांचा जुडगा उशीखाली ठेऊन झोपले होते . त्यांनी सकाळी स्वतःचा चहा स्वतः बनवला . परत आपल्या खोलीकडे येत असताना त्या कपाटासमोर एक छोटया आकाराचा , अंगठीचा रिकामा बॉक्स पडलेला त्यांना दिसला. आश्चर्य वाटून त्यांनी कपाटाचा दरवाजा तपासून पाहिला आणि ते चरकले. कपाट उघडे होते . आतला तिजोरीचा कप्पाही लोटलेला परंतु त्याला चाव्या लटकत होत्या. . त्यातील सर्व ऐवज गायब होता. त्यांनी 100 क्रमांक फिरवला आणि स्थानिक पोलिस तिथे पोहोचले. “घरफोडी आणि चोरी” चा गुन्हा दाखल झाला. पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी सात लाखाच्या वर किंमतीच्या तयार हिरेजडित दागिन्यांचा ऐवज बाजारात विक्रीला नेणे किशोर दाढी याला तो स्वतः हिरे व्यवसायातील जुना दलाल असूनही जोखमीचे वाटत होते. त्याने शेरुला काही हजार रुपये आगाऊ म्हणून दिले आणि आठवडाभराने भुलेश्वर येथे भेटायला ये असे सांगितले.

दरम्यानच्या काळात किशोर दाढीने सगळा ऐवज त्याचा बँक अकाउंट जिथे होता त्या बँकेच्या Safe Deposit vault मधे ठेऊन दिला होता. रात्र झाली होती . कालपासून कोणी घरीही गेले नव्हते . अर्थात ते कुणाला नवीन नव्हते. गुन्ह्याचा तपास करताना त्याची उकल होऊ देणारे दुवे समोर येऊ लागले की तो गुन्हा डीटेक्ट होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि स्टाफ यांना घर आणि घड्याळ विसरावेच लागते. शेरू ने सेठजीच्या घरून चोरलेले सर्व च्या सर्व दागिने त्याच स्थितीत आम्ही रीतसर पंचनाम्याखाली दुसऱ्याच दिवशी बँक उघडल्या बरोबर ताब्यात घेऊ शकलो . त्यातील प्रत्येक नग हिरेजडीत होता. दोन अंगठ्या आणि एक ब्रेसलेट तर प्लॅटिनम धातूमधे घडवलेले होतें होते. स्वतः झोपण्यापूर्वी तिजोरीच्या चाव्या उशीखाली जपून ठेवूनही चोरी कशी झाली असेल याचं उत्तर काही शेठजीना मिळत नव्हतं . पोलिसांनी वॉचमनकडे चौकशी केली परंतु तो गेट मधून रात्रभर न हलल्याची पोलिसांची खात्री पटली होती. आणि मुख्य म्हणजे शेठजींनी वॉचमन असे काही करणे शक्य नाही असे पोलिसांना सांगून वॉचमनला त्रास देऊ नका अशी विनंती केली होती.. इमारतीच्या भिंतीवर , ड्रेनेज पाइप्सवर कुठेही कोणी वर चढल्याच्या खुणा नव्हत्या . कपाटावरील आणि दागिन्यांच्या बॉक्सेस वरील बोटांचे ठसे अस्पष्ट होते.

शेरू पोलिस कस्टडी मधेच होता. केस मधील संपूर्ण माल हस्तगत झाला असला तरी दररोज त्याला लॉक अप बाहेर काढून मी , परब जमादार आणि स्टाफ त्याच्याकडे चौकशी चालू ठेवत असू. यामागे मुख्यतः अशा आरोपींनी असेच आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याचा तपास करणे हा हेतू असतों. शेरु च्या बाबतीत खरं तर तो प्रश्न नव्हता. त्याचे जगणे आणि जगण्यासाठी केलेली कृत्ये याबाबत तो किंचितही लपवाछपवी करत नव्हता . हे आमच्या स्टाफने पूर्वीही तो अटकेत असताना अनुभवले होते. त्यांना त्याबद्दल खात्री होती हेही मला त्यांच्याकडे पाहून कळत होते. या सराईत गुन्हेगाराच्या अशा मानसिकतेचं मला आश्चर्य वाटत होतं. त्याला खोदून खोदून विचारलं तरी त्याने आधी सांगितलेल्या तपशीलात किंचितही बदल नसे.

” सच बोल रहे हो ? ” असं विचारलं तर म्हणायचा
” साब , मै क्यूँ टाईम बरबाद करू सबका ? “.
पोलिसांपासून लपवून काही फायदा नसतो हे अनुभवाने समजून असलेले बरेचसे गुन्हेगार , ही गोष्टसुद्धा जाणून असतात की आपण गुन्हा केलाय , आता पोलिस त्यांचे काम करत आहेत .

आरोपींच्या चौकशीत मानसशास्त्राला फार महत्त्व आहे . सराईत गुन्हेगाराच्या बाबतीत तर फारच.अटक झाल्यावर अशा गुन्हेगारांच्या कलाने घेणे ही एक strategy असते हे क्राईम डीटेक्शनशी संबंधित पोलिस अधिकारी आणि अंमलदार अनुभवाने शिकतात.

यातूनच जेल मधे सध्या कोण कोण गुन्हेगार एकत्र येत आहेत , कोण कुणाला जाऊन मिळालाय , कोणाच्या जामिनासाठी कोणी वकील पुरवला , नजीकच्या भविष्यात कोण कोणाचा सूड उगवण्याची शक्यता आहे , चोरी किंवा लूटीतील माल घेणारे नवीन ” मालखाऊ ” कोण निर्माण झालेत अशी अनेक प्रकारची रेकॉर्डवर नसलेली माहिती मिळवण्याचे पोलिस कामासाठी अत्यावश्यक असलेले स्त्रोत निर्माण होतात.

ज्या समाजात , पोलिस केसमधे एकदा शिक्षा झालेला तरुण त्याच्या कुटुंबाकडूनही वाळीत टाकला जातो , तिथे इतरांनी त्याला लांब ठेवले तर आश्चर्य वाटायला नको. नोकरी धंदा गमावून बसलेल्या त्याला पोटासाठी पुनः गुन्हे करत राहण्याशिवाय गत्यंतर नसते . त्याचे ते दुष्टचक्र त्या त्या गुन्ह्याला साजेसे वय सरे पर्यंत अव्याहत फिरत असते. आणि एकदा का त्या विश्वात त्याचा असा प्रवेश झाला की त्याची समाजाकडे , जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. पाप पुण्य तोलायचा तराजू मोडीत निघतो , योग्य अयोग्य ठरविणारी प्रचलित परिमाणे बदलतात , भाषेवर जनसामान्यांना अगम्य असलेल्या शब्दांचा वर्ख चढतो. वावर सुध्दा अशा जगात बंदिस्त असतो की ज्याबद्दल , पोलिस सोडून बाकीचा सर्वसाधारण समाज पूर्णपणे अनभिज्ञ असतो. एक पाऊल जेल मधे आणि एक बाहेर या पलीकडे जीवन स्वीकारायचे हक्क नियती कायमचे काढून घेते , तेंव्हा अशा आरोपींमधे एक प्रकारचा कोडगेपणा येतो .

वाघ म्हटलं तरी खातो , वाघोबा म्हटलं तरी खातो अशा विचाराने समाजाप्रती त्यांच्या मनाची घडण बदलून जाते.
शेरूही त्यातलाच. परब जमादार त्यांच्या शिरस्त्या प्रमाणे त्याच्या बरोबर सावलीसारखे बसून त्याला बोलता ठेवत असत . त्यावेळीं ” सर या , बसा ” असे सुचवून मलासुद्धा ” तयार ” करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे. शेरुने हा गुन्हा कशा पद्धतीने केला हे ऐकण्या सारखे होते .

जेल मधून बाहेर आल्यावर हाताशी काही काम नसताना एखादी घरफोडी करण्यासाठी तो रात्री चालत फिरून नवीन ठिकाण शोधत होता. माटुंगा , हिंदू कॉलनी , वडाळा मधील उच्चभ्रू वस्तीत तो फिरला. पण तिथल्या जागा त्याला पसंत पडल्या नाहीत. त्याने आपला मोर्चा सायन कोळीवाडा कडे वळवला. सायन कोळीवाडा दरम्यान फिरत असताना एका रात्री गस्ती पोलिसांच्या सायकली समोरून येताना त्याला दिसल्या. पळत सुटलो तर संशय येईल आणि पाठलाग करून पकडतील अशा विचाराने तो रस्त्यावरून संथ चालत राहिला. जेल मधुन बाहेर आल्या आल्या लगेच पोलिसांच्या हातात पडण्याची त्याची इच्छा नव्हती. काही तरी ” काम बजाके ” , त्यात मिळालेल्या मालावर चार दिवस मजा करून नंतर मग आपल्या ” गजाआडच्या दुसऱ्या घरात ” जाऊ असा त्याचा विचार होता. त्या काळी रात्रीच्या गस्तीला पोलिस अंमलदार सायकलचा सर्रास उपयोग करत असत. सायकल गस्तीवरील पोलिसांच्या डाव्या हातात सायकलचे हॅण्डल आणि उजव्या हातात बॅटरी असे. मधल्या दांडीला समांतर लाठी अडकवलेली. सायकल चालवता चालवता फूटपाथवर आणि दोन इमारतीतील बोळी मधे , drainage पाइप वर बॅटरीचे झोत टाकत काही संशयास्पद आहे का हे पहात पोलिसांची गस्त चाले. बॅटरी वाले सायकलस्वार पोलीसच असणार हे शेरुने ताडले . त्याने शर्टाचे एक बटण सोडून बाकीची सर्व बटणे सोडून ठेवली . पोलिसांच्या दोन सायकली दोन बाजूने समोरून आल्या. शेरुच्या तोंडावर बॅटरीचा झोत पडला. त्या दोन हवालदारांपैकी एकाने शेरुला ओळखले. ” अरे ! ….शेरु …” ते ओरडले आणि दोघांनी दोन बाजूने त्याचा शर्ट पकडला. शेरूने चटकन शर्टाचे उरलेले बटण सोडले , हात वर केले आणि खाली बसला. हवालदारांच्या हातात त्याचा शर्ट आला. ते सायकलवरून उतरायच्या आत शेरु वेगाने बाजूच्या गल्लीतून अंधारात गायब झाला. दुसऱ्या रात्रीपासून त्याच भागातील घरफोडीसाठी सोयीस्कर इमारत शोधण्यासाठी मध्यरात्रीच्या आधीची वेळ निवडून त्याने अधिक सावधपणे पाहणी चालू ठेवली.

दोनच दिवसांनी त्याला दोन मजली इमारत नजरेस पडली . पूर्ण बिल्डिंग मधील फक्त पहिल्या मजल्यावरील दोनच खोल्यांतील दिवे चालू असल्याचे त्याच्या एका संध्याकाळी लक्षात आले. तासाभराने त्याने फिरून पाहीले तरीही तोच प्रकार. त्या इमारतीचा वॉचमन एका खुर्चीवर गेट जवळ बसला होता. त्याच्या जवळ जाऊन शेरुने आपण काहीतरी काम शोधतअसल्याची बतावणी केली . त्या इमारतीत काही काम मिळेल का अशी विचारणाही करत वॉचमनशी माफक ओळख करून घेतली. दुसऱ्या दिवशी रात्री पुनः तिथे जाऊन तो वॉचमनला भेटला. एका हॉटेलात आचाऱ्याची नोकरी मिळाल्याचे सांगून त्या खूषीच्या प्रीत्यर्थ एक दारूची क्वार्टर वॉचमनला भेट देऊन त्याला खूष केले. वॉचमन पूर्वी बिल्डिंग मालकाकडे घरातच हरकाम्या म्हणून कामाला होता . नंतर तो शेठजींचा आचारी झाला होता .

शेठजीं विधुर होते . त्यांची एकुलती एक मुलगी परदेशातून काही महिन्यांसाठी वडिलांना भेटायला आली होती. तिच्यासाठी तिला हवे तसे हिऱ्यांचे दागिने शेठजींनी नुकतेच करून घेतले होते . ते तिजोरीत ठेवलेले वॉचमनच्या बोलण्यातून आले होते .इथल्या वास्तव्यात मुलीला आचाऱ्याने बनविलेले जेवण पसंत नसे . जाण्यापूर्वी तिने आचाऱ्याला कामावरून दूर करून त्यांच्या पद्धतीच्या जेवणाचा रात्री डबा सुरू केला. शेठजिंनी त्याचे काम बंद झाले म्हणून त्याला वॉचमन चे काम.दिले. मुलगी सध्या पर्यटनासाठी काही आठवडे बाहेर गेली होती.

वॉचमन कडून शेरूने शेठजींविषयी पूर्ण माहिती काढून घेतली . त्यांचा दिनक्रम जाणून घेतला . संपूर्ण निर्व्यसनी असलेले शेठजी दररोज रात्री साडेआठ वाजता जेऊन साडेनऊ वाजता झोपत असत. सकाळी उठले की स्वतःचा चहा स्वतः बनवत असत . नाश्ता झाला की ते त्यांच्या रोजच्या टॅक्सी ने त्यांच्या कार्यालयात जात असत. संध्याकाळी आठ वाजता ते त्याच टॅक्सीतून घरी येत असत. कार्यालय सोडल्यास ते कुठेही जात नसत . त्यांना मित्र परिवार नव्हता. त्यांच्याकडे कधीही कोणी पाहुणा आल्याचे या नोकराने पाहिले नव्हते.

शेठजी वृत्तीने अत्यंत कंजूष असल्याचे वॉचमन वारंवार सांगत असे. त्यांनी त्याचा पगारही पूर्ण दिला नव्हता. तिजोरीच्या चाव्या ते सतत स्वतःजवळ ठेवत असत. रात्री झोपताना सुद्धा चाव्या ते त्यांच्या उशीखाली ठेऊनच झोपत असत. शेरूने घराच्या रचनेचीही इत्थंभूत माहिती वॉचमन कडून काढून घेतली . शेरूला हवी असलेली भरपूर माहिती वॉचमन कडून मिळाली होती. ऐकता ऐकता त्याच्या डोक्यात घरफोडीची एक नामी आखणी चालू होती .

मूळ गाव नेपाळ सीमेलगत असलेला वॉचमन पैशाचा लोभी असल्याचे त्याने ओळखले होते. शेरूने त्याचा प्लॅन नक्की केला. ” कल आधी रात सिर्फ एक डेढ घंटा तू बिल्डींगकी तरफ मत देख l तुझे मालामाल करुंगा. ” शेरुने, त्याच्याच भाषेत सांगायचं तर ” उसको लॉलीपॉप दिखाया ” . वॉचमन राजी झाला. तिथून शेरु जो निघाला तो दमण येथे. त्याने एका ओळखीच्या चोरीचा माल विकत घेणाऱ्या. ” मालखाऊ ” चा फोन नंबर फिरवला . तो इसम त्याला स्टेशन जवळ भेटायला आला. एकमेकांना फार पूर्वी जेल मधे भेटल्यापासूनची त्यांची ओळख . त्याला स्वस्तात सोन्याची बिस्किटे आणून देतो असे पटवून त्याने तब्बल रोख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून उचलले आणि त्याच पावली मुंबईत आला.
रात्री वॉचमनला भेटला . त्याला पंचवीस हजार रुपये कबूल केले. आपण आता मुंबई सोडून जाणार आणि परत येणार नाही असे वॉचमनने त्याला सांगितले. शेठकडे तुला घबाड मिळणार असल्याने पंचवीसवर भागणार नाही हे सुनावले . हो ना करता करता त्याला पस्तीस हजार रुपये एकरकमी देऊन शेरू एक प्रकारचा जुगार खेळला. जुगारीच तो !

इमारतीला लागून शेठजींच्या बेडरुम समोर एक बदामाचे झाड होते . त्याची एक उंचीवरची जाड फांदी शेरू ने निवडली.
रात्री एकनंतर शेरु त्या झाडालगत कंपाऊंडच्या भिंतीवर चढला. घरफोडीची आयुधे ठेवलेली त्याची छोटी पिशवी बरोबर होतीच. त्या व्यतिरिक्त एक नायलॉनची लांब , जाडसर दोरी आणि तीवर हाताची चांगली पकड यावी म्हणून सुती कापडाचे तुकडे त्याने बरोबर घेतले होते. शेरूने फांदीला दोरी बांधली . अंदाज घेतला आणि दोरीच्या सहाय्याने टांगोळी घेऊन तो शेठजींच्या बेडरूमच्या गॅलरीत अलगद उतरला . त्याने दोरीचे टोक गॅलरीच्या खिडकीच्या कडीला बांधले. तो काही मिनिटे गॅलरीत खाली हालचाल न करता बसला. नंतर खिडकीच्या कडेवर पाय ठेऊन तो वर झाला आणि त्याने व्हेंटिलेटर वर उचलला. पुन्हा अंदाज घेतला. आत हात घालून बेडरुमच्या दरवाजाचा बोल्ट आवाज न करता खाली ढकलला. गॅलरीत उकीडवा बसून राहिला. शेठजी घोरत आहेत याची खात्री केली आणि दरवाजा अगदी थोडा थोडा उघडत त्याने बेडरूम मधे प्रवेश केला. शेठजी गाढ झोपेत होते. आत गेल्याबरोबर त्याने गॅलरीचा दरवाजा लोटून बंद केला . खाली बसून रांगत शेठजींच्या कॉट जवळील ड्रेसिंग टेबलजवळ पोचला. जवळील छोट्या विजेरीच्या प्रकाशाचा झोत त्याने एकदाच क्षणभर ड्रेसिंग टेबल वर मारला. त्याला हवी तशी वस्तू त्याला आढळली नाही . तसाच तो रांगत शेजारच्याच तिजोरीच्या खोलीकडे गेला. तिथे विजेरीच्या प्रकाशात खोलीभर नजर टाकली. तिजोरी चे कपाट बाहेरून साधेसे दिसणारे लोखंडी कपाट होते. आत खास तिजोरी बांधून घेऊन तिला बाहेरून हा साधा पेहेराव चढवला आहे हे चाणाक्ष शेरूच्या लगेच ध्यानात आले. तिजोरीसमोरच्या भिंतीला लागून एक टेबल आणि लाकडी खुर्ची होती. शेठजी बहुदा तिथे बसून हिशोब लिहीत असावेत. त्या टेबलवर असलेला एक काचेचा पेपरवेट शेरूने उचलला आणि तो पुन्हा रांगत शेठ झोपलेल्या खोलीत आला आणि शेठजींच्या कॉट खाली जाऊन अंगाचं मुटकुळ करून स्तब्ध राहिला . त्याने काही वेळ जाऊ दिला. शेठजींचे घोरणे थोडे कमी झाल्यावर शेरुने आपल्या हातातील पेपर वेट अगदी संथपणे तिजोरीच्या खोलीच्या दिशेने जमिनीवर घरंगळत सोडला आणि पुन्हा स्वतःचे स्तब्ध मुटकुळे केले. पेपर वेट नेमका तिजोरीच्या खोलीच्या दरवाज्याशी जाऊन थांबला.

शेरुच्या अपेक्षेप्रमाणे शेठजीना त्या आवाजाने जाग आली . ते कॉटवर उठून बसले. उशी उचलून त्यांनी ती उलटी केली. उठून दोन खोल्यांमधील भिंती वरचे लाईटचे बटण ऑन केले. लादीवर पडलेला पेपर वेट त्यांना दिसला. त्यांनी तो उचलला . तिजोरीच्या खोलीतील टेबलवर ठेवला आणि ते स्वयंपाक घर आणि तिजोरीची खोली यामधे असलेल्या बाथरूम मधे गेले. बाथरूमचा दरवाजा लावण्याचा जसा आवाज आला तसा क्षणाचाही विलंब न लावता शेरु कॉटखालून बाहेर आला आणि एका बाजूने उशी हलकेच उचलून शेठजींचा जीवापाड जपलेला चाव्यांचा जुडगा त्याने ताब्यात घेतला. दुसऱ्याच क्षणाला तो कॉट खाली जाऊन पुनः मुटकुळे बनला . शेठजी कॉटवर येऊन पुन्हा झोपले. शेरूने काही वेळ जाऊ दिला. शेठजी पुन्हा घोरू लागले . शेरु याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने योजलेले पंचाहत्तर टक्के डावपेच यशस्वी झाले होते . आडाखे खरे ठरले होते.

शेठजींच्या वॉचमन सारखी पैश्याची लोभी व्यक्ती इमान विकणारच आणि शेठजींइतक्या वयाचा वयस्क पुरुष मध्यरात्री झोपेतून जागा झाला की बाथरूम मधे जाणारच याची खात्री शेरूच्या योजनेची बलस्थाने होती. शेरु कॉटखालून बिलकुल आवाज न करता रांगत तिजोरीच्या खोलीत गेला. विजेरीने एकदाच कपाटाचे चावीचे भोक आणि चाव्यांचा जुडगा तपासला आणि पुढील काही क्षणातच त्याच्या विजेरीचा झोत आतल्या तिजोरीच्या वरच्या खणातील दागिन्यांच्या बॉक्सेस वर पडला. खालच्या खणात शेठजींच्या खतावण्या एकावर एक ठेवल्या होत्या.त्याने दागिन्यांचे बॉक्सेस अलगद जमिनीवर ठेवले. खतावण्यांच्या गठ्ठयामागे काही ऐवज आहे का हेही तपासले. खिशातून नायलॉनची पिशवी काढली. विजेरीचा कमीत कमी वापर करत पिशवीत बॉक्सेस मधील हीऱ्यांचे दागिने काढून भरले. चाव्यांच्या जुडग्याचे काम संपल्याने तो तिजोरीलाच लावलेल्या अवस्थेत सोडला. पुन्हा एक एक करत सर्व बॉक्सेस हातातील फडक्याने पुसून वरच्या खणात ठेऊन तिजोरीचा आणि त्यावरील कपाटाचे दरवाजे एक एक इंच लोटत बंद केले. ते दरवाजेही फडक्याने पुसले. दागिन्यांची पिशवी पोटाशी सदऱ्याखाली बांधली आणि मिनिटभर स्वस्थ बसून तो मांजराच्या पावलांनी गॅलरीच्या दरवाज्याकडे गेला. कॉटवर झोपलेल्या शेठजींकडे नजर ठेवत दरवाजाकडे पाठ करून त्याने दरवाजा हळू हळू उघडला. बाहेर गॅलरीत आला. न जाणो , त्या दिवशीसारखे सायकल पेट्रोलिंगवाले पोलिस असले तर त्यांच्या बॅटरीच्या झोतात यायला नको म्हणून खाली बसून उकीडव्याने , कडीला बांधलेली नायलॉनची दोरी त्याने सोडली आणि एका झोक्यात बदामाच्या झाडावर पोहोचला. दोरी सोडवून घेतली. ती एका प्लॅस्टिक च्या पिशवीत ठेवली . आणि सगळ्या दिशांना दूर वर नजर टाकत अंदाज घेऊन तो झाडावरून खाली उतरला. वॉचमन त्याच्या खुर्चीत पेंगत होता. त्याची झोपमोड न करता शेरु सायन हॉस्पिटल कडे चालत निघाला. तिथे टॅक्सी मिळण्याची खात्री होती. मात्र आधीच त्याला टॅक्सी मिळाली आणि तो बांद्र्याकडे निघाला. बांद्रा स्टेशन बाहेर एका हातगाडीवर काही विकत घेऊन पोटपूजा केली . थोडा वेळ काढला आणि त्याने लोकल ट्रेनने वसईकडे प्रयाण केले. तिथे एका साध्याश्या हॉटेलमधे आंघोळ वगैरे उरकली. हॉटेल सोडले .

तेथून तो सर्व ऐवज घेऊन तो भुलेश्र्वरला आला. किशोर दाढीने पूर्वी शेरुशी बोलताना तो दररोज सकाळी अकरा पासून दुपारपर्यंत भुलेश्वर आणि मुंबादेवी मंदिरा जवळील धनजी स्ट्रीट येथे कोणत्या ठिकाणी हिरे दलालांबरोबर वावरत असतो ते सांगितले होते . शेरु दुपारपर्यंत त्या दोन जागांवर आळीपाळीने लक्ष ठेऊन होता. दुपारी किशोर दाढी त्याला दिसला. भेट झाली . दोघे एका हॉटेलमधे बसले. बाकी कोणताही तपशील न देता शेरुने हिऱ्यांचे बरेच दागिने आपल्याकडे असल्याचे किशोर दाढीला सांगितले. किशोर दाढी त्याला घेऊन धनजी स्ट्रीट वरील एका जुन्या इमारतीमधे गेला. तिथे एका रिकाम्या दुकानाचे सुतारकाम चालू होते . ते सगळे कामगार जेवायला गेल्यामुळे त्या गाळ्यात तेंव्हा कोणीच नव्हते. तिथेच शेरुकडील दागिन्यांवर किशोर दाढीची सराईत नजर फिरली . दागिने पाहिल्यावर ” कलसे मार्केटमें रुकना भी हराम है l कुछ दिन माहौल गरम रहेगा l तूने जहांसे ये माल उठाया हैं वहाँके डीटेक्शन वाले मार्केट छान मारेंगे l हर नग के हिरे अलग करके सोना पिघलाकेही काम होगा l सबर करनी है तो ठीक , नहीं तो दुसरा दलाल पकड l ” असे त्याने असे शेरुला सांगितले .
शेरुला हा ऐवज सांभाळणे महाकठीण होते. किशोर दाढी कडून पंधरा हजार रुपये आगाऊ घेऊन त्याने सगळी पिशवी किशोर दाढीच्या हवाली केली . तिथून त्याने , कामाला रुजू होणापूर्वी मोठया बोटींवरच्या खलाशांची एकदोन रात्रींसाठी सोय करणाऱ्या माझगावमधील अनेक हॉटेल्स पैकी एका स्वस्त हॉटेलात मुक्काम ठेवला . इथून त्याला छोटया कासूच्या क्लबमधे जाणेही सोयीचे होते.

त्याने जे योजले ते सर्व काहीही आड न येता आतापर्यंत पार पडले होते . मात्र मुंबई पोलिससुद्धा अशा महाभागांना पुरून उरणारे . त्यामुळे गुन्हा घडल्या पासून चारच दिवसात शेरुचे दिवस भरले , तो आणि किशोर दाढी पुन्हा ” हम-हवालात ” झाले . चोरीचा सर्व च्या सर्व माल परत मिळाला. वॉचमन गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याच्या गावी निघून गेला होता. शेठजींना त्याचे गाव माहीत नव्हते की पूर्ण नाव. बाबू या टोपण नावापलिकडे त्याची काहीही माहिती शेठजींना नव्हती. यथावकाश शेरू आणि किशोर दाढी दोघांनाही न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

नंतरच्या काळात जेव्हां जेव्हां मला ही केस आठवत असे , तेव्हां कधीही मी या केसकडे केवळ पोलिसी चातुर्याची गोष्ट म्हणून पाहिले नाही . गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांसाठी आवश्यक अशा अनेक बाबींचे दर्शन मला या गुन्ह्याच्या निमित्ताने झाले होते. गोळे हवालदारांना ते घरी असताना , माटुंगा पोलिस ठाण्यात डीटेक्शन स्टाफ मधील शेजारी राहणारे हवालदार भेटतात काय ! ड्यूटी वर नसले तरी एकमेकांशी बोलताना दोघांच्याही डोक्यात विषय पोलीस कामा संबंधीचेच असणे , गोळे हवालदारांनी मिळालेली ती खबर ताबडतोब वरिष्ठांच्या कानावर घालणे , बातमी कनिष्ठ सहकाऱ्या कडून प्राप्त झाली असली तरी तिचे महत्त्व लक्षात घेऊन वरिष्ठांनी तिचा गांभीर्याने पाठपुरावा करणे , अनुभवी परब जमादारांनी आरोपी कुठे मिळण्याची शक्यता आहे हे सहजपणे बिनचूक सांगणे आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल वरिष्ठांनी निःशंक राहून पूर्ण खात्रीने तात्काळ पुढच्या कार्यवाहीच्या तयारीस लागणे , आरोपीची फोटो सकट तपशीलवार माहिती क्राइम ब्रँचच्या MOB रेकॉर्ड वर असणे आणि तिचा उपयोग करणे , कारवाईच्या जागेची आधीच बारकाईने पाहणी करणे , आरोपी अटक झाल्यावर चौकशी दरम्यान त्याची मानसिकता लक्षात घेऊन , त्याच्या कलाने घेण्याची क्लृप्ती वापरून चौकशीचा वेळ वाचवणे , निवृत्ती जवळ आलेल्या परब जमादारांना कार्यवाही चालू असता घरी स्वस्थ बसणे अशक्य होणे , प्रत्येकाने स्वाभाविकपणे घर आणि घड्याळ विसरून जाणे, ज्याच्याकडे चोरीचा माल गेलाय त्याचा माग काढण्यासाठी वेळ न दवडता स्टाफने आदेशाची वाट न पाहता निघणे, आरोपी पोलिस कस्टडी मधे असताना न कंटाळता त्याला जास्तीत जास्त वेळ बाहेर काढून त्याच्याकडून माहिती काढण्या साठी त्याला बोलता ठेवणे , यशाचे श्रेय कोणाचे याचा विचार कोणाच्याही मनाला न शिवणे…………. एक ना अनेक गोष्टी …

कर्तव्याप्रती निष्ठा , जबाबदारीचे भान , मेहेनत , कळकळ, निष्काम वृत्ती आणि सांघिक कृती याचे यापेक्षा उत्तम उदाहरण कुठे पहायला मिळेल ? यशाला कारणीभूत ठरणाऱ्या , मात्र केस डीटेक्ट झाल्याच्या आनंदात एरवी नजरेआड होणाऱ्या अशा असंख्य अढळ गुणांच्या आऱ्यांवर बेतलेली यशोरथाची मजबूत चाकेच मुंबई पोलिस दलाला वेगाने , जगात सर्वांच्या पुढे नेतात , अगदी स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्याही . अशा उत्तुंग कीर्तीच्या पोलिस दलाच्या ” डीटेक्शन ऑफ क्राईम ब्रँच सी आय डी ” या मानाच्या शाखेत अनेक वर्षे कर्तव्य बजावण्याची संधी मिळाल्याचा मला कायम अभिमान आहे.
……………………..
© अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त.
9892944007
ajitdeshmukh70@ yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..