नवीन लेखन...

भिकारी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३४)

“बाबा, ओ बाबा, दया करा.
जरा ह्या गरीब, भुकेलेल्या भिकाऱ्याकडे पहा.
साहेब, तीन दिवसांचा उपाशी आहे, साहेब.
ह्या थंडीत रात्री कुठे आसरा घ्यायचा तरी पांच रूपये द्यावे लागतात.
मी शपथ घेऊन सांगतो, साहेब मी एका गांवात शिक्षक होतो पण दुसऱ्या मास्तरांनी हिशोबात गडबड केली आणि माझी नोकरी गेली.
खोट्या साक्षीदारांनी मला बळीचा बकरा केला साहेब.
एक वर्ष झालं, मला भाडं न भरतां आल्यामुळे मला खोलीही सोडावी लागली.
मी रस्त्यावर आलो.”
सरकारी वकिल साठे, यांनी त्यांच्या दारात येऊन ही बडबड करणाऱ्या इसमाकडे पाहिलं.
त्याचा फाटका काळा कोट, त्याचे दारू पिऊन तांबारलेले डोळे, गालांवरचा लालसरपणा पाहून त्यांना वाटलं की त्यांनी ह्याला पूर्वी कुठे तरी पाहिलं आहे.
तो छोट्या चणीचा भिकारी पुढे बोलू लागला, “आता तर एक नोकरी पण मला सांगून आलीय पण त्या गांवी जायला प्रवासासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत.
साहेब, मला तुम्ही थोडी सढळ हाताने मदत करा.
तुम्ही उदार वाटतां.
मला भीक मागायला लाज वाटते पण परिस्थितीने माझां नाईलाज केलाय.”
तेवढ्यात साठे वकीलांच लक्ष त्याच्या पायांतल्या बूटांकडे गेलं.
एक बूट कॅनव्हासचा होता तर एक चामड्याचा होता.
अचानक त्याला कुठे पाहिले होते, हें त्यांना आठवले.
ते म्हणाले, “काय रे, तुला आठवतंय कां ? आपण परवां लक्ष्मी रोडवर भेटलो होतो ?
तू तेव्हां मला शाळेत शिक्षक असल्याचं बोलला नव्हतास.
तेव्हा तू म्हणाला होतास की विद्यार्थी असतांनाच तुला शाळेतून काढून टाकलं होतं ? आठवतंय ?”
भिकारी म्हणाला, “असं असूच शकत नाही.
मी शिक्षकच होतो.
तुम्हाला हवं असेल तर तें सिध्द करायला माझ्याकडे कागदपत्र आहेत.”
साठे वकील रागाने लाल होत म्हणाले, “खूप झालं तुझं खोटं बोलणं.
तू विद्यार्थी असल्याचं व तुला कोणत्या कारणाने शाळेतून काढून टाकलं, तेंही तू मला सांगितलं होतंस !
तुला आठवतंय ? कां सांगू मी ?”
साठे वकील वैतागाने त्या भिकाऱ्यापासून दूर जाणार होते.
ते परत रागाने त्याला म्हणाले, “ही लबाडी आहे. उबग आणणारा खोटेपणा आहे.
थांब, मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो.
तू गरीब आहेस, भुकेलेला आहेस, हे खरं आहे पण त्यामुळे तुला धडधडीत खोटं बोलायला लाज वाटत नाही ?”
भिकाऱ्याने दरवाजाला घट्ट धरलं आणि असहाय्यपणे इकडे तिकडे मदतीसाठी पाहिलं.
तो म्हणाला, “मी खोटं नाही बोलत. माझ्याकडे कागद… कागदपत्र आहेत.”
साठे वकिल अजूनही रागांतच होते, ते म्हणाले, कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर ?
तुझी दया यावी म्हणून तू गांवच्या शाळामास्तरांचं आणि विद्यार्थ्यांच नांव घेतोस !
हे अगदी नीचपणाचं आहे. वाईट. किळस वाटणारं आहे.
अशाने उद्या खऱ्या गरजू माणसाला कोणी मदत करणार नाही.”
साठे वकील त्या भिकाऱ्याला टाकून बोलले.
त्यांच्या मते तो गुन्हा होता.
ते संवेदनाशील, सहृदय होते आणि त्यांच्या अंत:करणात गरीबीने नाडलेल्या लोकांविषयी अनुकंपा होती.
अशांना मदत करायला ते नेहमी तयार असत व त्याचा त्यांना अभिमान होता.
त्याच्या खोटेपणामुळे त्यांच्या कनवाळुपणाला धक्का पोहोचवला होता.
ते गरीबांबद्दल शंका न घेतां सढळ हाताने मदत करत.
ह्याने त्याच्या खोटी कारणे सांगण्याने त्यांच्या त्या विश्वासालाच आव्हान दिले होते.
भिकाऱ्याने प्रथम स्वतःच्या खोटेपणाचा बचाव केला.
शपथा घेतल्या मग तो एकदम गप्प झाला.
त्याची मान शरमेने खाली गेली.
मग त्याने गळ्यावर हात ठेवत सांगितले, “साहेब, मी खोटंच बोलत होतो. मी विद्यार्थीही नाही आणि गांवचा शाळामास्तरही नाही.
ह्या सगळ्या कल्पित गोष्टी होत्या.
मी बँडपथकात एक वादक होतो.
पण दारू पिण्याच्या व्यसनामुळे मला त्यांनी काढून टाकले.
मी आता काय करू शकतो ?
खरं सांगितलं तर मला कोण भीक देईल कां ?
मी खरं सांगितलं तर भुकेने आणि थंडीने रस्त्यावरच मरेन.
तुमचं म्हणणं मला कळतय, पटतय पण माझा नाईलाज आहे. मी काय करू ?”
साठे वकिल म्हणाले, “ काय करावंसं ?
तू स्वत:लाच विचार, तू काय करावंसं ते ?”
ते त्याच्या जवळ जाऊन ठामपणे म्हणाले, “तू काम करायला पाहिजेस, काम ! समजलास ?”
भिकारी म्हणाला, “मी काम करायला पाहिजे, हे म्हणणं ठीक आहे पण मला काम कोण देणार ?”
साठे वकिल त्याला न्याहाळत म्हणाले, “तू तरूण आहेस, निरोगी आहेस.
कांही ना कांही काम तुला नक्कीच मिळेल.
पण तू आळशी, बेवडा आणि खोटारडा झाला आहेस.
तुझ्या अंगाला दारूचा वास येतो.
खोटेपणा आणि नीचपणा तुझ्यांत आतून बाहेरून अगदी ठासून भरला आहे.
त्यामुळे तू भीक मागणं आणि खोटं बोलणं याशिवाय कांही करूच शकत नाहीस.
तू चांगला वागला असतास तर एक वादक, एखाद्या सरकारी कचेरीत काम करणारा, एखाद्या क्लबमधे काम करणारा झाला असतास.
तिथे तुला नियमित पगार मिळाला असता आणि कोणतीच अडचण आली नसती.
तू सध्या मेहनतीचं काम करशील ?
मला माहित आहे, तुला मजूर किंवा हमाल म्हणून काम करायला आवडणार नाही.
तू त्या कामांसाठी नाजूक आहेस ना !”
तो भिकारी कडवटपणे हंसला आणि म्हणाला, “तुम्ही काय बोलता आहांत ?
मला शारिरीक मेहनतीचे काम कोण देणार ?
मी दुकानात विक्रेता नाही होऊ शकत कारण तिथे काम करायला चौदा, पंधरा वर्षांच्या मुलांनाच घेतात.
घरात नोकर म्हणूनही कोणी मला ठेवून घेणार नाही आणि मी कोणत्याही यंत्रावर काम करायला न शिकल्यामुळे कारखान्यांत कोण नोकरी देणार ?”
“मूर्खपणा ! तुला नेहमी सबबी पुढे करायची संवय लागलीय.
तू लाकडं फोडशील ?”साठे वकिलांनी स्पष्ट विचारल.
तो म्हणाला, मी ‘नाही’ म्हणणार नाही.
परंतु नेहेमीच्या सराईत लाकुडफोड्यांनाच आता काम मिळत नाही.”
साठे वकिल म्हणाले, “ तू सारख्या सबबी शोधत असतोस.
कांही काम देऊ केलं की कांही ना कांही सबब सांगू नकार देतोस ?
लंगड्या सबबी चालणार नाहीत.
मी स्पष्ट विचारतोय ! माझ्यासाठी लाकडं फोडणार कां ? बोल.”
भिकारी म्हणाला, “होय, नक्की. मी तुमच्याकडची लाकडं फोडीन.”
साठे वकिल म्हणाले, “फार छान ! उत्तम. बघूया आपण.” घाईघाईंनी थोड्याश्या आसुरी आनंदाने त्यांनी त्यांच्याकडे स्वैपाकाचं काम करणाऱ्या रागीट वत्सलाकाकूंना स्वैपाकघरांतून बोलावून घेतलं.
त्या येतांच ते म्हणाले, “काकू, ह्या माणसाला परसदारी घेऊन जा आणि त्याला थोडी लाकडं फोडायला द्या.
गोंधळात पडलेल्या भिकाऱ्याने खांदे उडवले व तो मुकाट काकूंच्या मागून गेला.
त्याच्या एकंदरीत अवतारावरून त्याने लाकडे फोडण्याचे काम भुकेमुळे किंवा पैसे कमावण्यासाठी स्वीकारले नव्हते तर तो त्याच्या शब्दांत पकडला गेला होता आणि आता नाही म्हणायला त्याला लाज वाटत होती.
हें स्पष्ट दिसत होते की दारूचा थोडा फार अंमल असल्यामुळे त्याला अजून ठीक वाटत नव्हते आणि लाकडे फोडण्याची त्याची अजिबात तयारी दिसत नव्हती.
साठे वकिल घाईघाईने स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेले व बाहेर पाहू लागले.
एका पत्र्याच्या छोट्या खोलीत लाकडाचे मध्यम आकाराचे ओंडके रचलेले होते.
वत्सलाकाकू आणि त्यांच्यामागून मान खाली घालून पुटपुटत ढकलल्यासारखा जाणारा भिकारी त्यांनी पाहिला.
वत्सलाकाकूंनी पुन्हां रागाने त्या भिकाऱ्यावर नजर टाकली आणि त्या लांकडाच्या खोलीचे कुलुप काढले व दरवाजा सताड उघडून टाकला.
काकूंचा आवेश पाहून साठे वकिल मनांत म्हणाले, “काकूंच्या वामकुक्षीत व्यत्यय आल्याने बहुदा त्या भडकल्या असाव्यात.
किती तिरसट आहेत काकू.”
मग त्यांना दिसलं की तो भिकारी तिथल्या एका ओंडक्यावर बसला व विचारात गढून गेला होता.
त्याच्या मास्तरीण बाई असाव्यात अशा पध्दतीने काकू त्याच्यावर पुन्हां खेंकसल्या.
त्यांनी कोपऱ्यातली कुऱ्हाड आपल्या त्या नकली विद्यार्थ्याच्या पायाशी टाकली आणि बहुदा काकू त्याला लाखोली वाहू लागल्या.
धडपडत उठून त्या भिकाऱ्याने कुऱ्हाड उचलली व काकूंनी त्याच्याकडे ढकललेला ओंडका त्याने जेमतेम पायांत धरला.
मग त्याने आपल्या पायावर लागू नये म्हणून जपत कुऱ्हाडीचा घाव ओंडक्यावर घातला.
तो ओंडका त्याच्या पायांतून निसटला.
काकूंच्या ओठांच्या हालचालीवरून साठे वकिलांनी ओळखलं की त्यांनी त्याच्यावर आणखी शिव्यांची सरबत्ती केली असावी.
त्या भिकाऱ्याने तो ओंडका जवळ ओढला व परत पायांत धरला.
आपले पाय, बूट ह्यांना लागू नये म्हणून जपत त्याने पुन्हा एक घाव घातला आणि तो ओंडका परत त्याच्या पायांतून निसटला.
एव्हाना साठे वकिलांना त्याची दया वाटू लागली.
एका प्यायलेल्या श्रमाची संवय नसलेल्या कदाचित आजारी भिकाऱ्याला आपण कठीण काम करायला लावतोय, याचे त्यांना थोडे वैषम्य वाटले.
पण त्यांनी विचार केला, “असू दे. करू दे त्याला जमेल तेवढं काम.
मी त्याच्या भल्यासाठीच हें करतोय ना !”
ते परत आपल्या दिवाणखान्यात येऊन बसले.
तासाभरानंतर काकूंनी येऊन सांगितलं की लाकडं फोडून झालीत.
साठे वकिल म्हणाले, “बरं झालं. त्याला तीस रूपये द्या आणि हवं तर दर पंधरवड्यांतून एकदा येऊन गरजेपुरती लाकडं फोडू द्या.
त्याला म्हणावं तो येईल तेव्हा त्याला कांही ना कांही काम दिलं जाईल.”
साठे मनांत म्हणाले, “काकूंच्या शिव्यांच्या माऱ्यापुढे त्याच्यासारखा निर्ढावलेला आळशीही अखेर नमला तर !”
त्यानंतर दर पंधरा दिवसांनी तो येऊ लागला.
दुसऱ्या वेळी तो धड उभाही राहू शकत नव्हता.
तरी प्रत्येक वेळी त्याला कांही ना कांही काम दिले जाई.
बरेचदा लाकडं फोडण्याचं तर कधी परसदारीचा सगळा केर गोळा करण्याचं किंवा सर्व गाद्यांवर काठीने आपटून त्या बडवून साफ करण्याचं.
प्रत्येक वेळी काकू साठे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तीस, चाळीस रूपये रूपये देत.
कधी तरी त्याशिवाय एखादा धड सदरा वा विजारही त्याला मिळत असे.
जेव्हां साठे वकिल त्या शहरातून दुसरीकडे जायला निघाले, तेव्हा त्यांनी सामानाची बांधाबांध करणाऱ्यांबरोबर त्यालाही कामाला बोलावले.
त्या वेळी भिकारी उदास व गप्प होता.
तो न पितां आला होता.
त्याने क्वचितच कांही सामानाला हात लावला.
तो गाड्यांच्या मागे गेला नाही की त्याने आपण कामांत असल्याचे नाटकही केले नाही.
तो फक्त थरथरत होता.
इतर मजूर त्याचा अवतार आणि आळशीपणा पाहून त्याला हंसत होते पण त्याचंही त्याला कांही वाटत नव्हतं.
सर्व सामान बांधून निघायची वेळ आली तेव्हां साठे वकिलांनी त्याला बोलावले.
साठे वकिल त्याला म्हणाले, “तू माझं म्हणणं ऐकलसं.
आज तर तू प्यालेलाही दिसत नाहीस.
आता तुझी काम करायला हरकत दिसत नाही.
फार बरे वाटले.
हा घे तुझ्या आजच्या कामाचा मोबदला.”
त्यांनी शंभर रूपयांची नोट त्याच्या हातांत ठेवली.
त्यांनी विचारले, “तुझे नाव काय ?”
तो म्हणाला, “साहेब माझे नांव किसन”
साठे वकिल म्हणाले, “किसन, मी तुला ह्या कठीण आणि मेहनतीच्या कामाऐवजी सोपे काम देतो.
मी देतो ती चिठ्ठी माझ्या मित्राला नेऊन दाखव.
तो तुला लेखनिकाचे काम देईल.
पैसेही बरे देईल.
परंतु पुन्हा दारू पिऊ नकोस आणि मी सांगितलेले लक्षांत ठेव. अच्छा !
आम्ही आता दुसऱ्या गांवी निघालो.”
साठे वकिलांना मनापासून आनंद वाटत होता की एका माणसाला आपण विनाशाच्या मार्गावरून परत चांगल्या मार्गावर आणले.
त्यांनी किसनच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व मित्राला लिहिलेली चिठ्ठी किसनच्या हातात ठेवली.
त्याचे हात क्षणभर धरले व नमस्कार करून त्याचा निरोप घेतला.
तेव्हांपासून किसन तिथे परसदारी लाकडं फोडायला यायचा बंद झाला.
दोन वर्षे मधे गेली.
एकदा साठे वकिल शहरांतील एका नाट्यगृहाच्या खिडकीवर तिकिटाचे पैसे देत होते.
त्यांच्यापाठी एक बावरलेला, बारीक माणूस तिकिट काढायला उभा होता.
त्याने तिकिटाच्या खिडकीतील कारकूनाकडे आपल्या हातातली बरीच नाणी सरकवली व एक बाल्कनीचे तिकिट मागितले.
साठे वकिलांनी त्याला न्याहाळले व विचारले, “किसन, तू !”
साठे वकिलांनी आपल्या पूर्वीच्या लाकडे फोडणाऱ्याला बरोबर ओळखले व विचारले, “तू इथे काय करतोयसं ?
तुझं ठीक चालू आहे ना !”
किसन म्हणाला, “उत्तम चालंलय साहेब.
मी आता नोटरीची काम करतो.
मला महिन्याला दहा हजार रूपये मिळतात.”
साठे वकिल म्हणाले, “यासाठी देवाचेच आभार मानायला हवेत.
किसन, तुला मी माझ्या मुलासारखाच मानतो.
तुझी प्रगती झालेली पाहून मला खूप आनंद झाला.
मी तुला चांगला मार्ग दाखवला.
तुला आठवतंय, तू खोटं बोललास म्हणून मी किती बोललो होतो तुला !
तेव्हा तुला खूप लाज वाटली.
असो पण आता माझं सांगणं ऐकून तू सुधारलास हे पाहून मी खूप आनंदीत झालो आहे.
तुला खूप धन्यवाद.”
किसन म्हणाला, “मीही तुमचा खूप आभारी आहे.
त्या दिवशी जर मी तुमच्या घरी आलो नसतो तर कदाचित अजूनही रस्त्यावर नोकरी गेलेला शाळाशिक्षक किंवा काढून टाकलेला विद्यार्थी म्हणून मी भीक मागत असतो.
तुमच्या घराने मला वाचवले.
मी दलदलीतून बाहेर आलो.”
साठे वकिल म्हणाले, “तुझे हे शब्द ऐकून मी धन्य झालो.
खूप आभारी आहे मी तुझा !”
किसन म्हणाला, “वकिलसाहेब, तुमचे दयाळू शब्द आणि तुम्ही केलेली मदत मी आजन्म विसरू शकणार नाही.
तुम्ही त्या दिवशी केलांत तो उपदेश योग्यच होता.
मी तुमचा आणि तुमच्या स्वयंपाकीणबाई वत्सलाकाकूंचा कायम ऋणी राहीन.
त्या मूर्तिमंत दयेची देवी असलेल्या काकूंवर देवाची नेहमी कृपा राहो.
तुम्ही सांगितलेत ते मी ऐकलं पण नेहमीसारखं ते पालथ्या घड्यावर पाणी झालं असतं.
खरं तर त्या वत्सलाकाकूंनी मला वाचवलं !”
साठे वकिलांनी कुतूहलाने विचारलं, “तें कसं काय ? त्या तर तुला शिव्यांची लाखोली वहात.”
किसन म्हणाला, “साहेब, त्याचं असं झालं.
मी तुमच्याकडे लाकडं फोडायला आलो की काकू आपला तोफखाना चालू करत.
‘आलास बेवड्या ! ये.
देवाने वाळीत टाकलेला माणूस आहेस तू ! तरी मेल्या मरत नाहीस !’
मग त्या माझ्या समोरच्या ओंडक्यावर बसत.
माझ्याकडे पहात, पश्चात्ताप करत, माझ्याकडे मायेने बघत ओरडत असत. ‘अरे, अभाग्या, ह्या जगात तर तुला आनंद नाहीच मिळणार पण मेल्यावरही नरकांत यातना भोगशील.
अरे बेवड्या, तुझी दोन्हीकडे सुटका नाही, समजलास !’
काकू नेहमीच असं बोलत.
तुम्हाला ठाऊक असेलच.
त्यांची जीभ तिखट होती.”
“त्या माझ्यावर कितीदा रागावल्या आणि कितीदां त्यांनी माझ्यासाठी अश्रु गाळले, त्याला सीमाच नव्हती.
पण सगळ्यात माझ्यावर कशाचा परिणाम झाला असेल तर तो ह्याचा की हे सर्व असं रागाने बोलत असतांना काकू स्वतःच ती सर्व लाकडं माझ्यासाठी फोडत असत.
मी खरं सांगू साहेब, तुमच्या घरातल्या एकाही लाकडाच्या ओंडक्याचा एक तुकडा पण मी पाडला नाही.
काकूच स्वतःच ते सगळं काम पुर्ण करत असत व तुम्हाला येऊन सांगत की ह्याने काम पूर्ण केलं म्हणून.
असं त्यांनी मला वाचवलं आणि असाच त्यांनी माझ्यात बदलही घडवला.
त्यांच्याकडे पाहता पाहता मीही बदललो.
माझं दारूच व्यसनही सुटलं.
हे कसं झालं तें मी सांगू शकत नाही पण त्यांच ते कळकळीचं टोंचून बोलणं आणि त्यांची ती दयाळू उदात्त कृती ह्यांनी माझ्यात आमुलाग्र बदल घडवला आणि मी हे त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही.
पण चला, तिसरी घंटा व्हायची वेळ झाली.”
किसनने मला वाकून नमस्कार केला आणि तो बाल्कनीच्या दिशेने निघून गेला.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द बेगर

मूळ लेखक – अँटोन चेकॉव्ह (१८६० – १९०४)

वि.वि.

डॉक्टर अभिजीत सोनावणे पुण्यात प्रॕक्टीस करतात.
विशेष म्हणजे ते भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणुनही काम करतात.
सोमवार ते शनिवार रोज सकाळी १०-२ वाजेपर्यंत मंदिर / मस्जिद / चर्च/ गुरुद्वारा या ठिकाणी भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर रस्त्यावर मोफत उपचार करतात.

हे करत असतांनाच त्यांनी भीक मागणं सोडुन काम करावं म्हणुन प्रोत्साहित करतात आणि जे काम करायला तयार आहेत त्यांना झेपेल असं काम देतात.
भिक्षेकरी ही आपल्यासारखीच माणसं आहेत आणि आपण त्यांना आपल्यात माणुस म्हणुन सामावुन घ्यावं…… ह्याचसाठी त्यांची ही धडपड आहे.
ह्या धडपडीची दखल म्हणून असाच विचार मांडणारी ही कथा त्यांना अर्पण केली आहे.

त्यांचा तपशील :

डॉ. अभिजीत सोनवणे.

डॉक्टर फॉर बेगर्स

9822 26 73 57

abhisoham17@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..