नवीन लेखन...

शिकारी क्वार्टरमेनची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १८)

सर हेन्री कर्टीस हे उत्तम मेजवानी देणारे यजमान म्हणून प्रसिध्द आहेत.
त्यांच्याकडल्या अशाच एका मेजवानींत मी ही गोष्ट ऐकली.
अनेकांनी कर्टीस आणि कॅप्टन गुड ह्यांनी अलिकडेच आफ्रिकेतील इजिप्शियन्सनी किंवा किंग साॅलोमनने लपवलेल्या एका मोठ्या हिऱ्याच्या साठ्याचा शोध लावल्याची बातमी ऐकली असेल.

गुप्त खजिन्याबद्दल एक औत्सुक्य असतंच.
मी तिथे विचारल्यावर कर्टीसनी ती बातमी खोटी म्हटली नाही पण त्यांनी आणि कॅप्टन गुडनी ती सांगायला नकार दिला.
ते म्हणाले, “मी सांगितली तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार.
आता एवढ्यातच शिकारी क्वार्टरमेन येईल.
तो आमच्याबरोबर अनेक वर्षे होता.
त्याच्या मदतीशिवाय कांहीच शक्य नव्हतं.
सगळे पाहुणे ऐकायला खूप उत्सुक होते पण त्या दोघांनी तोंडातून ब्र काढला नाही.
मधेच कॅप्टन गुडनी एक मोठा हिरा खिशातून काढला व सर्वांना दिसेल असा धरला.
तो ४० ते पन्नास कॅरॅट वजनाचा सहज असेल आणि ह्याहूनही मोठे हिरे त्यांच्याकडे आहेत असे ते म्हणाले.
तेव्हांचे सर्वांच्या चेहऱ्यावरले आश्चर्य व साहस कथा ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
त्याच क्षणी दरवाजा उघडला आणि ॲलन क्वार्टरमेन आल्याची वर्दी दिली गेली.

कर्टीस दाराशी जाऊन एका छोट्या चणीच्या आणि किंचित लंगडणाऱ्या गृहस्थाला घेऊन आले व त्याची सर्वांना ओळख दिली, “सभ्य स्त्रीपुरूषहो, जगांत सर्वांत जास्त हत्ती आणि सिंह यांची शिकार करणारा सर्वांत उत्तम नेमबाज शिकारी, ॲलन क्वार्टरमेन.”
सर्वांनी नम्रपणे त्याच्याकडे पाहिले.
तो छोटा वाटला तरी त्याच्या डोळ्यात चमक होती, चेहरा रापलेला होता.
एकूण शिकारी जीवनाने तो वेगळा व पहावासा वाटत होता.
त्याने सर्वांना अभिवादन केले.
त्याचे उच्चार वेगळेच होते.
त्याची जागा नेमकी माझ्या बाजूलाच होती.
मी त्याला शिकारी जीवनाबद्दल बोलता करायचे खूप प्रयत्न केले पण तो बधला नाही.
तो मलाच लंडनच्या जीवनावर प्रश्न विचारू लागला.
त्याने फक्त तो कर्टीस आणि कॅप्टन गुडबरोबर त्यांच्या खजिन्याच्या शोधात होता, एवढेच मान्य केले.

आम्ही जेवायला बसलो होतो त्याच्यासमोरच दोन हत्तीचे मोठे सुळे आणि त्याच्याखालीच रेड्याची शिंगे लावलेली होती.
ॲलन क्वार्टरमेन परत परत त्यांच्याकडे पहात होता.
मी ती संधी साधून त्याला त्याबद्दल कांही माहीत आहे कां, असे विचारले.
तो म्हणाला, “असायलाच पाहिजे कारण त्या सुळ्यांनी आमच्या बरोबरच्या एकाचे दोन उभे तुकडे केले तर ती शिंगे मला मृत्यूमुखीच पाठवणार होती पण त्यांनी माझ्या एका प्रिय नोकराचा अंत केला.”
सर्वांना हिऱ्यांच्या शोधाची कहाणी ऐकायची होती.
एक ललना म्हणाली, “कर्टीस आणि डॉक्टर गुड यांनी आमच्यापासून उगाचच गुपित राखलंय.”
ॲलन क्वार्टरमेन म्हणाला, “मी तुमची माफी मागतो पण मी नाही सांगू शकणार.
आफ्रीकेतील शिकारींबद्दल अनेक खऱ्या खोट्या, बऱ्याचशा खोट्या, गोष्टी छापल्या गेल्या आहेत.
आता आम्ही जरी आमची साहसकथा सांगितली तरी ती खोटीच वाटेल, तेव्हां नकोच.”
त्याच्या बोलण्याला कर्टीस आणि डॉक्टर गुड यांनी दुजोरा दिला.
ह्यावर एक युवती जरा तिखटपणे म्हणाली, “म्हणजे तुम्ही आम्हाला फसवताय तर ?”
त्यावर ॲलन क्वार्टरमेन म्हणाला, “माझं बरचसं आयुष्य जंगलात गेलंय, तरीही तुमच्यासारख्या एखाद्या सुंदर युवतीला फसवणं मला नाही जमणार.”
ह्यावर मी म्हणालो, “तुम्ही किमान ते सुळे आणि ती शिंगे ह्यांची तर गोष्ट सांगू शकता !”
ॲलन क्वार्टरमन म्हणाला, “सुळ्यांची नाही सांगत कारण तो इतिहास “किंग सॉलोमन्स माईन्स” मधे लवकरच प्रकाशित होणार आहे पण त्या शिंगाबद्दलची दहा वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो.”

वाईनचा एक घुटका घेत त्याने सांगायला सुरूवात केली.
“दहा वर्षांपूर्वी मी आफ्रिकेच्या दाट जंगलांत कोब नदीजवळील गॅटगारा भागांत शिकारीसाठी गेलो होतो.
माझ्याबरोबर तिथले चार स्थानिक लोक होते.
एक ड्रायव्हर, लिडर, एक खोई जमातीतला हॅन्स आणि एक मॅशुन नांवाचा झुलु योध्दा, जो माझ्याबरोबर पांच वर्षे होता.
मग मी एक तंबू लावायसाठी चांगली हिरव्या कुरणाची जागा शोधली.
तिथून चारी बाजूला शिकारीला, विशेषत: हत्तींच्या, जायला सोपे होते.
पण माझे नशीब चांगले नव्हते.
मला फार थोडेच हस्तिदंत जमवतां आले होते.
तिथून ३०मैलांवर हत्तींचा मोठा कळप आहे, ही बातमी ऐकून मी खूष झालो.
गाडी घेऊन जायचा विचार केला तर ती दरी विषारी माशांमुळे खतरनाक आहे असे कळले.
माणसाला मात्र त्या कांही करू शकत नसत.
मग मी ड्रायव्हर आणि (लाकडी) गाडी (wagon) तिथेच सोडली व फक्त हॅन्स आणि मॅशुन ह्यांना बरोबर घेऊन निघालो.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही निघालो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जिथे हत्तींचा कळप असल्याची बातमी आली होती, तिथे पोहोचलो.
पण हत्ती तिथे नव्हते.
ते बराच काळ तिथे थांबून गेल्याच्या अनेक खूणा म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा, पाडलेली झाडे, इ. होत्या.
मग आम्ही त्यांच्या मागावर निघालो.
पंधरा दिवस आम्ही त्यांचा माग घेत होतो.
दोनदां अगदी जवळ पोहोचलो पण पुन्हा त्यांनी आम्हाला चकवले.
शेवटी तिसऱ्यांदा ते आम्हाला दिसले आणि मी जेमतेम एक हत्ती मारू शकलो.
मग ते अशा अवघड वाटेने नाहीसे झाले की पाठलाग अशक्य होता.
त्या एका हत्तीचे सुळे घेऊन वैतागून मी परत फिरायचे ठरवले.”
“पाच दिवसांनी मी टेकडीवर पोहोचलो, जिच्या पायथ्याशी माझी गाडी मी सोडली होती.
शहरी माणसाला जसे आपले घर पाहून आनंद होतो, तोच शिकारी माणसाला आपली गाडी (वॅगन) पाहून होतो.
पण तिथे गाडी नव्हती आणि पांढरा तंबूही नव्हता.
एक जळलेल्या गवताचा मोठा पट्टा मात्र होता.
जाण्यापूर्वी मी ड्रायव्हरला असे काही होऊ नये म्हणून तंबूभोवतीचं पंधरा फूटांपर्यंतचं गवत कापायला सांगितलं होतं.
पण सुरक्षिततेसाठी सांगणं आणि करणं ह्यांत मोठ अंतर आहे.
मी ते स्वतःच करायला हवं होतं.
ड्रायव्हर आणि कॅप्टन बहुदा माझ्या रागाला भिऊन पळून गेले होते.
माझ्याकडची दुसरी बंदूक, दारूगोळा, इतर सामान सर्व भस्मसात झालं होतं.
गाडीचे थोडे अवशेष दिसत होते.
झऱ्याकाठी एका मोकळ्या जागी मी बसलो.
आता माझ्याकडे अंगावरचे कपडे, एक आठ बोअरची बंदुक कांही काडतुसे, ह्या खेरीज कांही राहिलं नव्हतं.
आम्हाला मदत मिळण्याची शक्यता असलेलं ठिकाण साधारण तीनशे मैलांवर होतं.
खरं सांगतो मला तेव्हां रडावेसे वाटत होते.

हॅन्स डचमधे तर मॅशुन झुलू भाषेत त्या पळपुट्यांना शिव्या घालत होते.
त्यांच्याकडेही एक साधी रायफल व थोडी काडतुसे ह्या खेरीज काहीं नव्हतं.
शिकारी जीवनांत अनेक कठीण प्रसंग येतात, पूर्वीही आले होते.
त्यातल्या त्यात उत्तम मार्ग निवडणे आवश्यक होते.
रात्र तळमळत घालवून सकाळी आम्ही आमच्या दीर्घ प्रवासावर निघालो.
आता त्या प्रवासातल्या अनंत छोट्या मोठ्या अडचणी, कथा न सांगता ह्या दुःखद स्मृतिचिन्हाची म्हणजे शिंगांची गोष्ट तेवढी सांगतो.”
“एक महिन्याच्या प्रवासानंतर आम्ही खूप थकलो होतो, पायाला भेगा पडल्या होत्या, पोटभर खायला नव्हतं.
त्यांत मला ताप आला होता.
डोळ्यासमोर अंधारी येत होती.
बमंगवॅटोपासून चाळीस मैलावर आमचा मुक्काम होता.
आतापर्यंत आमच्याकडची काडतुसेही संपत आली होती.
माझ्याकडे एकच शिल्लक होतं तर हॅन्स आणि मॅशुनकडे दोघात मिळून त्यांच्या रायफलीची तीन काडतुसे होती.
सूर्य मावळल्यावर एका तासाने आम्ही मुक्काम केला व शेकोटी पेटवली.
ते ठिकाण फार छान होतं मधेच उंचावर तळे होतं आणि सभोवताली अनेक पाने होती.
आमच्याकडे खायला काही नव्हतं.
दोन दिवसांपूर्वी मी मारलेलं हरिण आता खाऊन संपले होतं.
मग हॅन्सने तीनातली दोन काडतुसे घेतली व तो कुठे छोटी शिकार मिळते कां पहायला बाहेर पडला.
मॅशुनने एक प्रकारची झुडुपं ओढून आणून सभोवताली संरक्षणासाठी रचायला सुरूवात केली.
आतापर्यंतच्या परतीच्या प्रवासात सिंहांनी आम्हाला हैराण केले होते.
झुडुपांचा संरक्षक तट रचून झाला, तोंच जवळपास बंदुकीची बार ऐकू आला.
मॅशुन म्हणाला, “हॅन्सचा नेम चांगला आहे. आता आपल्याला खायला मिळेल.
आमची छोटी पोटं भरतील.
हॅन्स हलक्या जमातीचा आहे पण नेमबाज आहे.
आता आपण खाऊन तृप्त होणार.”
आणि असेच काही तरी आशावादी तो बडबडत होता गाण्यात बोलत होता.

शेवटी मी त्याला गप्प केले.
लवकरच अंधार पसरला.
आफ्रिकन जंगलातील भयाण रात्र जाणवू लागली.
सिंह यायला अजून वेळ होता.
ते उशीरा येतात.
स्मशानशांतता पसरली होती.
शेवटी मी म्हणालो, “मॅशुन, हॅन्स कुठे आहे ?”
मॅशुन म्हणाला, “वाट चुकला असेल किंवा थकून झोपला असेल.”
मी जोरांत विचारले, “मॅशुन, कधी खोई जमातीचा माणूस वाट चुकल्याचे ऐकलेयस ? कधी तो थकून वाटेत झोपल्याचे ऐकलेयस?”
मॅशुन म्हणाला, “नाही, नाही, कधीच नाही.”
“आम्ही असं बोलतं पुढे निघालो पण दोघेही हॅन्सचं काही वाईट झालं असावं हे उघड मानायला तयार नव्हतो.
शेवटी मी मॅशुनला म्हणालो की तळ्याकडे जाऊन हिरवा पाला काढून आण, मला खूप भूक लागली आहे.
पण मॅशुन तिथे भुते असतात अशी सबब सांगून टाळाटाळ करू लागला.
मॅशुन दिवसा शूर होता पण रात्री त्याला भुताखेतांची फार भिती वाटे.
मी म्हणालो, “मग मी जातो.”
मॅशुन म्हणाला, “नाही, तुम्हाला जर आजारी बायकांसारखं वाटेल ते खावं असं वाटत असेल तर खाऊ देत मला भुतं. मीच जातो.”
थोड्याच वेळात तो भरपूर पाला घेऊन आला मी तो खाऊ लागलो.
त्याला झुलू भाषेत विचारले, “तुला भूक नाही लागली ?”
तो म्हणाला, “आजच्यापेक्षा अधिक भूक कधी लागली नव्हती.”
मी म्हणालो, “मग खा ती पाने.”
तो म्हणाला, “मी नाही खाऊ शकत ही पाने.”
मी म्हणालो, “भुकेने मरायचे नसेल तर खा.”
त्याने शेवटी थोडी पाने उचलली आणि तोंडात कोंबली.
मग खाता खाता म्हणू लागला, “मी कशाला जन्माला आलो?
बैलासारखी पाने खायला ?
काय माझं नशीब?
माझ्या आईला आधी कळतं तर तिने मला लहानपणीच मारून टाकले असते.”
म्हणून पश्चात्ताप करत होता.
झुलूंना पाला खाणं बिलकूल मान्य नव्हतं.”

”मॅशुनने पाल्याने पोट भरलं तोच सिंहाचा “उफ्” आवाज जवळच ऐकू आला.
सिंह आम्ही बांधलेल्या संरक्षक झुडुपांच्या पासून जवळच होता.
मला अंधारात चमकणारे त्याचे डोळे स्पष्ट दिसले.
आम्ही जोरदार आवाज केला.

मॅशुनने शेकोटीत दोन चार मोठ्या काटक्या टाकून जाळ वाढवला.
अपेक्षित परिणाम झाला.
तो सिंह दूर गेला.
मग पौर्णिमेचा चंद्र त्याच्या पूर्ण कलांनिशी आकाशांत झळकू लागला.
वहीतली टीपणंही त्या प्रकाशात वाचतां येत होतं.
तळ्याकडे जाणाऱ्या एका वाटेवर थोडी वर्दळ दिसू लागली.
एक एक प्राणी पाणी प्यायला जाऊ लागला.
एक मोठे सांबर पाहून मला शेवटचे काडतुस वापरायचा मोह वाटला पण चंद्रप्रकाशात एवढ्या अंतरावर ते फुकटही गेलं असतं.
एवढ्यांत कोणीतरी जोरांने पळाल्याचा आवाज ऐकू आला.
मी मॅशुनला म्हणालो, “हा कसला आवाज ?”
मॅशुन म्हणाला, “सिंहांचं सावज निसटलंय.”
तेवढ्यात सिंहाची डरकाळी ऐकू आली.
मला दोन सिंह दिसले.
मी मॅशुनला म्हणालो, “मी थोडी झोप घेतो. तू सावध रहा. नाही तर सिंह आपली चटणी करतील.”
मॅशुन म्हणाला, “तुम्ही, निर्धास्त झोंपा. माझे डोळे ताऱ्यासारखे उघडे रहातील आणि ताऱ्यासारखीच मी तुमच्यावर नजर ठेवीन.”
अशक्तपणा, तापाने दुखणारं डोकं, हॅन्सचं काय झालं ह्याची चिंता आणि अजून चाळीस मैलांचा उरलेला प्रवास, ह्यांनी झोप येईना.
त्यातच दोन भुकेले सिंह आसपासच कुठेतरी फिरताहेत ही भिती होतीच.
शेवटी थोडी झोप आलीच आणि मी स्वप्नात पहात होतो की माझे उघडे पाऊल एका नागावर पडणार तोच तो शेपटीवर उभा राहून माझ्या नांवाने हांक मारू लागला.”
“शेवटी मी त्या हाकांनी जागा झालो.

मॅशुन मला हांका मारून दाखवत होता, “तिकडे, तिकडे पहा.”
त्याने दाखवलेल्या दिशेने मी पाहिलं आणि अनेक वर्षांचा अनुभव असूनही माझ्या पोटात भितीचा गोळा आला.
आम्ही बांधलेल्या झुडुपांच्या संरक्षक भिंतीपासून थोड्या अंतरावर छोट्या वारूळांच्या टेकाडावर चारी पाय जवळ घेऊन एक मोठी सिंहीण आत झेप घेण्याच्या विचारात होती.
मॅशुनने त्याची रायफल माझ्या हातात दिली आणि म्हणाला, “काडतुस भरलयं, रायफल चालवा.”
पण मला सिंहीणीवर रायफल चालवणे सुरक्षित वाटेना.
मी फार तर तिला जखमी नक्की केले असते.
रायफलीला नेम धरायला कांही व्यवस्था नव्हती.
मी खाली पडून कागदाचा एक तुकडा काढला आणि तो रायफलीच्या तोंडाशी वर बसवला.
तेवढ्यात मॅशुनने जवळच दुसरा सिंह असल्याचे सांगितले.
मी म्हणालो, “तुला भितीपोटी सर्व दोन दिसताहेत.”
पण मॅशुनने दाखवलेल्या बाजूला एक प्रचंड सिंह तिथे फिरत होता.
त्याचा रूबाब पहाण्यासारखा होता.
तोही अशाच उंचवट्यावर उभा होता.
मॅशुन म्हणाला, “गोळी घाला. तो आता झेप घेणार नक्की,”
सिंहाने मागे वळून पाहिलं.
झेप घेण्याआधी सिंह नेहमीच मागे पहातो.
मग त्याने पुढचे पाय समोर रोंवले व झेप घ्यायला सिध्द झाला.
मी नेम धरून रायफलचा बार काढला आधी नाही, नंतर नाही, बरोबर वेळेवर.
तो झेप घेत असतानाच गोळी त्याच्या शरीरांत शिरली.
आमच्या पासून चार फुटांवर त्याची झेप पोहोचली.
रायफलीचा आवाज रात्रीच्या शांततेत खूप दणाणला.
तो सिंह पडला आणि तडफडत गडबडा लोळू लागला.
त्या गडाबडा लोळण्याने आमची सारी झुडुपांची तटबंदी विसकटून टाकली.
तरीही तो कसाबसा बसला आणि त्याने एकामागून एक डरकाळ्या फोडल्या.
मग तो कुशीवर पडला.
माझ्या लक्षांत आले.
तो नक्कीच मेला.
माझी गोळी वर्मी लागली होती.
मी सिंहीणीकडे पाहिले.
ती आश्चर्याने तिथेच थबकली होती.
ती शेपूट आपटत होती.
वळून वळून पहात होती पण मग एक छलांग मारून ती तिथून जंगलाच्या दिशेने नाहीशी झाली.
आम्ही थोडे निर्धास्त झालो.”

“सावधपणे आम्ही त्या सिंहाच्या धूडाकडे गेलो.
तो मेला होता.
मॅशुन झुलू गीत गाऊ लागला.
माझी स्तुती करू लागला.
मी त्या सिंहाचीच उशी करून झोंपलो.
त्याच्या आयाळीला उग्र वास येत होता तरीही मला तशीच झोप लागली.
पहाटेचे तारे क्षितिजावर लुकलुकत असतांना मी जागा झालो.
मॅशुनला शेकोटी वाढवायला सांगितली.
सकाळ झाल्यावर हॅन्स येईल अशी आशा वाटत होती.
मी सिंहाचे मांस कापून काढले व शेकोटीवर भाजून आम्ही दोघांनी पोटभर खाल्ले.
सिंहाचे मांस खायला छान लागते.
गाय-बकऱ्यांच्या बछड्याच्या मांसासारखे.
तळ्यावर जाऊन पाणी प्यालो.
उरलेला सिंह, तरस आणि लांडग्यांच्यासाठी सोडून आम्ही हॅन्सला शोधायला निघालो.
आम्ही माग काढण्यात हुशार झालो होतो.
हॅन्सच्या पावलांचे ठसे आम्ही शोधून काढले.
पुढे ते एका रेड्याच्या ठशांबरोबर पुढे जात होते.
म्हणजे हॅन्सने रेड्याचा पाठलाग केला होता तर !
पुढे एका कांटेरी झाडाकडे बोट दाखवत मॅशुन म्हणाला, “बघा, बघा, हॅन्सचे काय झाले ते.
तो इथे उभा होता.
त्याने इथून गोळी झाडली.
त्याच्याच पावलाचा ठसा आहे हा !
हॅन्सची गोळी रेड्याला लागली होती.
हे पहा रक्त.”
“बरोबर आहे पण मग हॅन्स कुठे आहे ?” मी विचारले.
बाजूच्याच एका कांटेरी झुडुपांकडे माझं लक्ष त्याने वेधलं.
एका कांटेरी झाडांच्या बेचक्यात हॅन्सचं शरीर लोंबकळत होतं.
चिडलेल्या रेड्याने शिंगांनी उडवलेलं.
त्याचा एक पाय लोंबकळत होता.
विशेष म्हणजे एऱ्हवी शाकाहारी असणाऱ्या रेड्याने दुसऱ्या पायाचे चाटून लचके काढले होते.
पूर्वी मी अशा गोष्टी ऐकल्या होत्या पण त्यावर ‘कल्पित’ असा शिक्का मी मनांत मारला होता.
आता भयाण वास्तव समोर होतं.

आम्ही स्तब्ध राहून दुःखद अवस्थेत ते बघतच राहिलो.
एवढ्यांत समोरची झुडुपे फाकली गेली आणि तो रेडा सरळ आमच्या अंगावर धांवून आला.
तेवढ्यांतही मला त्या रेड्याच्या खांद्याला हॅन्सच्या गोळीने झालेली जखम आणि सिंहाबरोबरच्या झटापटीतल्या जखमाचे व्रण दिसले.मी हे सांगत असतांना आता दहा वर्षानंतरही तो धांवून येतोय तसाच मला दिसतोय.
“तो आला, पळा.” असं मोठ्याने ओरडून मॅशुन बाजूच्या झुडुपात शिरला.
क्षणभर रेड्याला कुणाच्या मागे जावं याबद्दल संभ्रम झाला.
मी प्रतिक्षिप्त क्रियेने माझी आठ बोअरची बंदुक उचललीच होती.
ही संधी मिळताच माझं उरलेलं काडतुस मी वापरलं.
त्याच्या खांद्याचा टवका उडवून गोळी आत शिरली.
तो आणखी क्षणभर थांबला पण गोळी त्याला थांबवू शकली नाही.
तो माझ्या दिशेने आला.
मी खाली झोपलो व कांटेरी झडुपांच्या आंत घुसलो.
तिथल्या एका प्राण्याने केलेल्या बिळांत मी कसाबसा शिरलो.
एका क्षणात तो रेडा माझ्यापाशी पोंचला.
आपली धडक माझ्यापर्यंत पोंचत नाही हे लक्षांत येताच आपल्या शिंगाने तो मला बाहेर काढायचा प्रयत्न करू लागला.
प्रथम त्याने धडक मारली ती झाडाच्या खोडावर बसली व त्याच्या शिंगाचे बारीक टोंक उडाले.
तसेंच ते आता तुम्हाला समोर दिसते आहे.

मग तो हुशारीने प्रयत्न करू लागला.
अर्धवर्तुळाकार फिरून येऊन धडका मारू लागला.”
“धडका माझ्यापर्यंत पोहोचत नव्हत्या.
परंतु प्रत्येक धडकेने बिळं मोठ होत होतं आणि त्याचे नाकाड माझ्या बरगड्यांवर आपटत होतं.
त्याची लाळ गळत होती आणि श्वासोच्छ्वास जोरात होत होता.
मी विरोध न करताच मरणार असं वाटत असतांना त्याची लोंबणारी जीभ मला दिसली व मी ती पकडून जोरांत फिरवली.
वेदनेने तो रेडा एकदम इतक्या जोरांत मागे गेला की जीभेला लोंबत मीही बिळाच्या कांही इंच बाहेर आलो.

त्याने क्षणात पुन्हा धडक मारली आणि मी त्याच्या तावडीत सांपडलो.
मी ओरडलो, “मॅशुन, मला गांठले त्याने. त्याला मार.”त्या रेड्याच्या शिंगानी मला बिळाच्या बाहेर काढले.
तेवढ्यात बाजूच्या झुडुपांतून बाहेर पडून मॅशुनने झुलूंचे शस्त्र “ॲस्सेगाई” (भाला) रेड्याच्या बाजूने पूर्ण ताकदीनिशी एक फूटभर आंत घुसवले व तो पळून जायसाठी वळला.
क्षणाच्या फरकाने उशीर झाला आणि तो रेडा रक्ताळलेल्या अवस्थेत मॅशुनवर धांवून गेला.
त्याला शिंगानी उंच उडवून, तो पडल्यावर पायाखाली तुडवू लागला.
मी कांहीतरी मदत करावी, काय करणार होतो कुणास ठाऊक, म्हणून पुढे झालो, तोच तो रेडा मोठ्याने गुरकला आणि खाली बाजूवर पडला. तो रेडा एवढ्या आघातांनी शेवटी मेला होता.
मी मॅशुनकडे गेलो. त्याने विचारले, “तो मेला कां ?मला दिसत नाहीय.”
मी म्हणालो, “हो, मेला.”
मॅशुनने परत विचारले, “त्या काळ्या सैतानाने तुम्हाला काही इजा केली कां ?”
मी म्हणालो, “माझ्या मित्रा, कांही गंभीर नाही.”
मॅशुन म्हणाला, “हे ऐकून खूप आनंद झाला.”

मग थोडा वेळ शांतता पसरली. पुन्हा मॅशुन म्हणाला, “तुम्ही आहात ना ? मला स्पर्श जाणवत नाही.”
मी म्हणालो, “मॅशुन, मी आहे इथे.” मॅशुन त्यावर म्हणाला, “मी आतां चाललो. जग गोल गोल फिरतच राहिलं पण मी काळोखात चाललो. मला खात्री आहे की तुम्हाला माझी पुढे आठवण येईल की मॅशुन तुमच्या सदैव बाजूला उभा राहिला, हत्ती मारतांना, सिंह मारतांना आणि…….”असे म्हणून त्याने डोळे मिटले.
मी त्याचे शरीर ओढून त्याच झाडाखालच्या बिळांत लोटलं.

त्यांच्या पध्दतीप्रमाणे तो शेवटच्या लांबच्या प्रवासाला असुरक्षित जाऊ नये म्हणून त्याचे “ॲसेगाई’ शस्त्र त्याच्याजवळ ठेवले. मला सांगायला लाज वाटत नाही की मग मी बायकांप्रमाणे ढसाढसा रडलो.”

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – हंटर क्वार्टरमेनस् स्टोरी

मूळ लेखक – एच. रायडर हॅगार्ड (१८५६-१९२५)


तळटीप – किंग सॉलोमन्स माईन्स हा चित्रपट अनेकांना ठाऊक असेल.
ती कादंबरी आणि त्यावरील चित्रपट खूप गाजला.लेखक हॅगार्ड ह्यांनी स्वतः दीर्घकाळ आफ्रिकेत वास्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथा कादंबऱ्यांना वास्तवाचं रूप येत असे.
प्रस्तुत कथा ही किंग सॉलोमन्स माईन्सची कथेची प्रस्तावनाच असल्यासारखी आहे.
मूळ कथा ६५००हून अधिक शब्दांत आहे. मी ती २४६० शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे.
ब्रिटीश कसे साहसी होते व त्यांना त्या त्या देशांतील लोकांनी कशी साथ दिली, ह्याचाही प्रत्यय येतो.
मागच्या वेळची कथा ही खोट्या शिकारीची होती तर ही खरोखरीच साहस आणि भय असलेली शिकारकथा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..