नवीन लेखन...

बचावाचे निवेदन (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३५)

विशेष सूचना- शेरलॉक होम्स ह्या खाजगी गुप्त हेराच नांव ऐकलं नाही असा वाचक नसेल. तो इतका प्रसिध्द झाला की लंडनमधे बेकर स्ट्रीटवर त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. खरं तर शेरलॉक होम्स हे ॲार्थर कॉनन डायल ह्या लेखकाने निर्माण केलेलं एक पात्र आहे, जे लेखकापेक्षा प्रसिध्द झालं. आजची कथा ही ॲार्थर कॉनन डायल यांनीच सुरूवातीला लिहिलेली कथा आहे. संपूर्ण कथा हे एका आरोपीने ज्यूरीला केलेलं बचावाचं निवेदन आहे. कृपया वाचकांनी स्वत:ला ज्यूरीचा सदस्य समजून कथा वाचावी व निर्णय द्यावा.


मला पकडलं तेव्हा मी माझी कैफियत मांडली पण कोणी ऐकली नाही.
मी पुन्हां तीच खटल्यांत जशी घडली तशी सांगितली.
मेहताबाई किंवा मी जे बोललो आणि केलं, ते जसंच्या तसं सांगितलं पण वृत्तपत्रांनी लिहिलं, “कैद्याने चांचरत एक बिनमहत्त्वाची माहिती दिली, जी उघड अविश्वसनीय होती आणि सिध्द करणारा कांही पुरावा नव्हता.”
मी पुन्हां सांगतो की मी माझ्या डोळ्यांनी मेहतांचा खून होतांना पाहिले आणि मी निरपराधी आहे.
साहेब, सर्व कांही आता तुमच्या हातात आहे.
तुम्ही हे वाचून मेहताबाईंची पूर्ण चौकशी करावी.
तुम्ही एखादा चांगला गुप्तहेर नेमून खात्री करून घ्या की माझी हकिकत खरी आहे. तुम्ही जर होऊ घातलेला अन्याय थांबवला तर तुम्हांला नांवलौकिक मिळेल.
जर तुम्ही हे केलं नाहीत तर तुम्हाला वारंवार हा विचार छळेल की तुम्ही एका निरपराध्याला तुरूंगात धाडलंत!
ह्या गुन्ह्यामुळे कुणाचा फायदा झाला असेल तर तो केवळ मेहताबाईंचा.
एक नाखूष बाई, आता लाखोंच्या संपत्तीची मालकीण झालेली मेहताबाई.
साहेब, मी चोरीच्या आरोपाबद्दल कांहीच बोलत नाहीय कारण तो मला मान्यच आहे.
ती चोरीच होती आणि माझी तीन वर्षे त्यासाठी गेलीतच.
खटल्यांत दाखवण्यात आलं की रामपूरच्या चोरीत पूर्वी मला एक वर्षांची शिक्षा झाली होती.
जो एकदा गुन्हेगार ठरवला जातो त्याला नंतर कधीच योग्य न्याय मिळत नाही.
मी चोरी मान्य करतो पण खून नाही.
ह्या खूनाच्या आरोपाने मला फांशीच्या जवळ आणून सोडलं आहे पण मी सांगू इच्छितो की मी निरपराधी आहे.
आता आपण १८९४च्या सप्टेंबरच्या तेरा तारखेला काय झालं ते पाहूया.
मी देवाशपथ खरंच सांगणार आहे.
ह्यातला शब्दही खोटा नाही.
मी तेव्हां कामासाठी सगळा विदर्भ फिरलो.
मिळतील ती काम करून मी गुन्हेगारीपासून लांब रहायचा प्रयत्न करत होतो.
पुन्हा सरकारी पाहुणा व्हायची इच्छा नव्हती.
एकदा नांवाला बट्टा लागला की काम मिळणे दुरापास्त होते आणि मला जीव जगवण्यासाठी फक्त चोरी करता येत होती.
पंधरा दिवस लांकडं किंवा दगड फोडत मी अगदी थोड्या पैशानिशी वाघापूरला येऊन पोहोचलो.
मी थकलो होतो.
मी वाटेतल्या खानावळीत रात्रीपुरता आसरा घेतला.
जेवणानंतर मालक येऊन माझ्याशी गप्पा मारत बसला.
त्याने मेहता मॅन्शनच्या श्रीमंतीबद्दल सांगायला सुरूवात केली.
मी विचारलं, “म्हणजे इथे येताना रस्त्यावर डाव्या बाजूला, बाहेर मोठी बाग असलेला बंगला कां?”
मालक म्हणाला, “बरोबर! तोच सफेद बंगला.”
मी येतानाच बंगला व त्या बंगल्याला असणा-या अनेक काचेच्या खिडक्या व दरवाजे पाहिल्या होत्या.
माझ्या मनांत आले की या बंगल्यात सहज घुसतां येईल!
तो विचार मी मनातच दडपला होता पण मालक तोच विषय काढून मला मेहताशेठ किती श्रीमंत आहेत, ते सांगत होता.
तो म्हणाला, “मेहताशेठ तरूणपणापासूनच श्रीमंत पण कंजूष. तेव्हाच त्यांनी खूप माया जमविली होती. आता ती किती पटीने वाढली असेल कुणास ठाऊक? त्यांनी संपत्तीमुळे एक गोष्ट मात्र मिळवली!”
मी विचारले, “पैसे खर्च न करता अशी कोणती गोष्ट त्यानी मिळवली?”
मालक म्हणाला, “त्याने ह्या प्रांतातील सर्वांत सुंदर आणि आपल्याहून २४ वर्षांनी लहान स्त्रीशी लग्न केलं. तिनेही त्याच्या संपत्तीच्या लोभानेच त्याच्याशी लग्न केलं. लग्न केल्यावर तिला त्याचा कंजूष स्वभाव जाणवू लागला. तिला दमडी खर्चायचा अधिकार नाही.”
मालक पुढे म्हणाला, “ती गरीब आणि सामान्य घरांतली होती. नाच करून पोट भरणारी. एकदा मेहताशेठ प्रवासाला गेले होते व तिकडेच लग्न करून तिला बरोबर घेऊन आले. मानाच्या धनाढ्य घराण्यात प्रवेश मिळाला म्हणून ती प्रथम खूष होती. जसा तिला त्याच्या कंजूष आणि तिरसट स्वभावाचा त्रास होऊ लागला तसा तिचा भ्रमनिरास झाला. मेहताशेठचा स्वैपाकी मला सांगत होता की ती आली तेव्हां आपल्या प्रसन्न वृत्तीने घर उजळून टाकलं पण जसा जसा तिला नव-याचा स्वभाव कळू लागला तशी ती उदास राहू लागली. त्याला कुणीही घरी आलेलं आवडत नाही. त्याची जीभ अगदी तिखट आहे. कोणी म्हणतात, तिचं कुणावर तरी प्रेम होतं परंतु तिला मेहताशेठच्या संपत्तीचा मोह झाला.”
साहेब, मला ह्यात रस नव्हता.
मेहताशेठ आणि त्यांची पत्नी ह्यांच्या भांडणाबद्दल ऐकण्यात मला काय मजा वाटणार?
ते तिला नोकरांपेक्षा वाईट वागवत असत, बोलत असत.
असेल पण मला त्याच काय?
मला फक्त एकच माहिती हवी होती की मेहताशेठनी आपली संपत्ती कुठे आणि कशी ठेवली होती.
शेअर्स, हुंड्या, रोखे, ह्यांचा मला उपयोग नव्हता.
ते वटवणे कठीण होते.
हिरे व सोनं ह्या गोष्टी कुठे कशा विकायच्या हे मला चांगलं ठाऊक होतं.
योगायोगाने खानावळीच्या मालकाने नेमकं तेंच मला सांगितलं.
तो म्हणाला, “मेहताशेठने सोन्याची अनेक पदकं तयार करून घेतलीत. असं म्हणतात की ती जर एका गोणीत भरली तर ह्या गांवचा पहिलवान सुध्दा ती गोण उचलू शकणार नाही.”
त्यानंतर खानावळीच्या मालकाला त्याच्या बायकोने हांक मारली व तो निघून गेला.
मी माझ्या बचावासाठी खोटं सांगणार नाही.
साहेब, ध्यानात घ्या.
एका चोराला ह्या सर्व गोष्टी खूप मोहांत पाडणा-या होत्या.
मी बिछान्यावर पडलो होतो, खिशात शेवटचे दोन रूपये होते.
हातात काम नव्हतं.
मी प्रामाणिकपणे रहायचा प्रयत्न केला.
मला लोकांनी परत गुन्हेगारीकडेच ढकलले.
सावकाराची सोन्याची पदकं वितळून घेणं हे डाव्या हाताचं काम होतं आणि एवढ्या खिडक्या असलेल्या घरात शिरणं सोप्पं होतं.
मी बिछान्यांत उठून बसलो, मनाशी निश्चय केला.
आज एवढं श्रीमंत व्हायचं की परत कधी चोरी करायला लागूच नये नाहीतर कैद आहेच.
मग मी उठलो.
कपडे घातले.
दोन रूपये तिथेच टेबलावर ठेवले.
चांगली वागणुक देणा-या खानावळवाल्याचे पैसे मला बुडवायचे नव्हते.
बंगल्याच्या बागेभोवतीची उंच भिंत ओलांडणं थोड कठीण होत पण जमलं.
बंगल्यात कुठे हालचाल नव्हती. ”
मी ठरवलेली मागली खिडकी माझ्या चाकूच्या सहाय्याने सहज उघडली आणि पडदा हातांनी दूर सारला.
तोंच आतून आवाज आला, “या, आपलं स्वागत आहे.” आयुष्यात कधी असा आश्चर्याचा धक्का बसला नव्हता.
समोर एक उंच, डौलदार बांध्याची, अतिशय सुंदर बाई मेणबत्ती हातात घेऊन उभी होती.
संगमरवराचं शिल्पच वाटणा-या बाईंचे डोळे आणि केस काळेभोर होते.
तिने अंगात झोंपताना श्रीमंत बायका घालतात तसा गाऊन घातला होता.
तीचं एकूण स्वरूप पाहून मला ती अप्सरा वाटली.
मी पडद्याचा आधार घेतला.
खरं तर मी तिथून पळून जायचा प्रयत्न करायला हवा होता पण माझ्या पायांतलं त्राणच गेलं होतं.
ती म्हणाली, “घाबरू नकोस.” घराच्या मालकीणीने चोराला असं सांगणं विचित्रच होतं.
ती पुढे म्हणाली, “झाडाखाली उभं राहून तू ह्या खिडकीकडे पहात असतांनाच मी तुला पाहिलं. मी वर आले. थोडा थांबला असतास तर मीच तुला खिडकी उघडली असती.”
माझ्या हातांत अजून तो चाकू होता.
रस्त्यावर भटकण्यामुळे माझा चेहरा रापलेला होता.
अशा अवतारातल्या माझ्यासमोर उभं रहायची हिंम्मत बाळगणारे कमीच पण ह्या बाई प्रेयसीला ठरल्या वेळी प्रियकर भेटावा तशा आनंदीत दिसल्या.
त्यांनी माझी बाही पकडली व मला आत ओढले.
मी चाकू दाखवत त्यांना म्हणालो, “हे काय चाललंय? माझ्याशी लबाडी करायचा प्रयत्न करू नका. मला उगीच भडकावू नका.”
त्या म्हणाल्या, “मी तुझ्याशी कोणताही डाव खेळत नाही. मी तुला मदतच करीन.”
मी म्हणालो, “माझा विश्वास नाही. तुम्ही मला कां मदत कराल?”
त्या म्हणाल्या, “त्यासाठी तशीच कारणं आहेत. मी त्याचा तिरस्कार करते. आलं लक्षांत!”
मला हाॅटेल मालकाचं बोलणं आठवलं आणि त्या कां तिरस्कार करतात तें लक्षांत आलं.
त्यांच्या नव-याला प्रिय असणारा पैसा चोरीला गेल्यानेच आयुष्यात मोठ्ठा धक्का बसणार होता.
त्यासाठी आपली प्रतिष्ठा विसरून माझ्यासारख्या चोराला सहकार्य द्यायला त्या तयार होत्या.
मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांच्या चेह-यावर तिरस्कार मला स्पष्ट दिसत होता.
त्यांनी विचारले, “आता माझ्यावर विश्वास ठेवशील?”
मी म्हणालो, “होय, बाईसाहेब.”
त्यांनी विचारले, “ तू ओळखतोस मला?”
मी म्हणालो, “आपण कोण आहांत याचा मी अंदाज बांधू शकतो.”
त्या म्हणाल्या, “मला ठाऊक आहे गांवात माझ्याबद्दल काय बोललं जातं! पण त्याला कुठे त्याचं कांही वाटतं? त्याला फक्त जगांत एकच गोष्ट महत्त्वाची वाटते आणि ती तू आज घेऊन जा. तुझ्याकडे पिशवी आहे?”
“नाही बाईसाहेब.” मी म्हणालो.
त्या म्हणाल्या, “पडदा बंद कर म्हणजे उजेड बाहेर जाणार नाही आणि माझ्या मागून ये. तू सुरक्षित आहेस. सर्व नोकर बंगल्याच्या दुस-या भागांत झोपतात. मी तुला सर्वांत किंमती वस्तु कुठे ठेवल्यात त्या दाखवते. तू कांही सर्व नेऊ शकणार नाहीस. तेव्हा आपण त्यांतील उत्तम निवडू.”
थोड्याच वेळात आम्ही अशा खोलीत पोहोचलो की तें एखाद्या म्युझियममधील दालन असावं.
वेगवेगळी कातडी, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या मूर्ती, तलवारी, इ. अनेक वस्तू तिथे पसरलेल्या होत्या.
अनेक प्रकारचे चित्रविचित्र कपडे होते.
त्या बाईंनी त्यांतली एक पातळ चामड्याची बॅग खाली काढली आणि म्हणाल्या, “आता मी तुला सोन्याची पदकं कुठे आहेत ती दाखवते.”
मालकीणच स्वत: मला तिचं घर लुटायला मदत करत्येय ह्या कल्पनेने मला हंसू आलं असतं पण त्यांच्याकडे पाहून मी हंसण्याऐवजी स्तब्ध झालो होतो.
त्या हातातली मेणबत्तीची दिवटी धरून पुढे जात होत्या.
मी ती बॅग हातात घेऊन त्यांच्या मागे निमूटपणे चालत होतो.
म्युझियमच्या दुस-या टोंकाला असलेल्या दारातून आम्ही एका छोट्या, चारी बाजूने पडदे असलेल्या, खोलीत पोहोचलो.
त्या पडद्यांवर चित्र रंगवलेली होती.
तिथे टेबलाच्या उंचीच्या लांबड्या पेट्या होत्या.
त्या उत्तम लाकडाच्या होत्या.
त्यावर कांचेचा दरवाजा व आणि पितळी मूठ बसवलेली होती.
त्यांत ती लहान, मोठी सोन्याची पदकं होती.
लाल व्हेलवेटवर ती चमकत होती.
माझ्या हातांना खाज सुटली.
मी पुढे झालो आणि माझ्या चाकूने सहज त्यातली एक पेटी उघडली.
तेवढ्यात मेहताबाई म्हणाल्या, “थांब, ह्या पदकांपेक्षा तुला सोन्याची बॅगभर नाणी कशी वाटतील?”
मी म्हणालो, “ती तर केव्हांही सरसच.”
त्या म्हणाल्या, “मग बाजूच्या खोलीतील जिन्याने वरच्या खोलीत जा. सावकारांच्या बिछान्याखाली अशा नाण्यांनी भरलेला पत्र्याचा डबा आहे.”
मी म्हणालो, “नको. त्यात धोका आहे. सावकार जागे होण्याची खूप शक्यता आहे. बाईसाहेबांनी मला मदत केली, त्याने मी खूष आहे.”
बाईसाहेब तुच्छतेच्या स्वरात म्हणाल्या, “हं! एका म्हाता-याचा सामना करायला घाबरतोस? मी समजत होते, तू निर्ढावलेला आहेस. मला वाटतं तू चुकीचा धंदा निवडलायस!”
मी म्हणालो, “झटापटीत खून होऊ शकतो आणि खून माझ्या नियमात बसत नाही.” मेहताबाई म्हणाल्या, “तू त्यांना न मारता फक्त बांधून ठेऊन हे करू शकतोस. खूप नाणी आहेत परंतु तुझ्यात ती हिम्मत नसेल तर राहू दे. तू प्रयत्न न केलेलाच बरा!”
त्या मला अशा हिणवत होत्या की मी चिडून ते करायला उत्तेजित व्हावं.
मी झालोही असतो पण मला त्यांच्या नजरेत क्षणभर कावेबाजपणा व सावकाराचा सूड घेण्यासाठी मला आपल्या हातचे बाहुले बनवण्याचा विचार दिसून आला.
पुढच्याच क्षणी त्यांनी चेह-यावर दयाळूपणाचे भाव आणले.
पण मी सावध झालो होतो.
मी वर जायला स्पष्ट नकार दिला.
मी म्हणालो, “इथे आहे ते मला पुरेसे आहे. मी वर जाणार नाही.”
त्या म्हणाल्या, “ठीक आहे. तू ह्या बाजूने ही पदके गोळा करायला सुरूवात कर. ही जास्त मौल्यवान आहेत आणि त्यांची आवडती आहेत. ह्या पेट्या उघडायला फक्त वरची मूठ दाबली की झालं.”
असं म्हणत त्यांनी एक पेटी उघडली देखील.
मी पुढे झालो.
तोंच वर कोणी तरी पाय ओढत चालल्यासारखा आवाज आला.
पेटीचे झांकण पूर्ववत बंद करत त्यांनी ओठावर बोट ठेवून मला गप्प रहायला सांगितले.
मग हलक्या आवाजांत म्हणाल्या, “बहुदा मेहताशेठ खाली येताहेत. तू ह्या पडद्यामागे लप.”
मला पडद्यामागे ढकलून त्या शेजारच्या जिना असलेल्या खोलीत गेल्या.
माझ्या लपण्याच्या जागेवरून त्या मला दिसत होत्या.
त्यांनी विचारले, “कोण? तुम्हीच कां?”
पावलांचा आवाज जवळ आला आणि मला दारात एक चेहरा दिसला.
चेह-याला झांकणारं, टोकाशी वळलेलं मोठं लांब नाक, संपूर्ण चेह-यावर सुरकुत्या, वर सोन्याच्या फ्रेमचा चष्मा. मेहताशेठ उंच होते.
शरीरही बोजड होतं.
दाढी मिशाविना चेहरा बाकी गुळगुळीत होता.
डोक्यावर पांढरे कुरळे केस होते.
चष्म्यातून समोर पहातांना त्यांना मान उचलावी लागत होती.
अंगावरच्या सैल पायजमा आणि सदरा ह्यामुळे ते पूर्ण दार व्यापून उभे असल्यासारखे दिसत होते.
त्यांची पत्नीकडे पहाणारी नजरच सांगत होती की जितका त्या त्यांचा तिरस्कार करत होत्या, तितकाच तेही बाईंचा तिरस्कार करत होते.
मेहता सावकार म्हणाले, “ह्यावेळी काय करते आहेस? झोपली कां नाहीस?”
“मला झोप येत नव्हती.” त्या वैताग न लपवतां म्हणाल्या.
“माणसाचं मन साफ असलं की चांगली झोप लागते.” ते त्यांना डींवचत म्हणाले.
त्या म्हणाल्या, “हे खरं नाही. कारण तुम्ही तर गाढ झोपतां.”
मेहताशेठ म्हणाले, “मला फक्त एकाच गोष्टीचा पश्चात्ताप होतोय! तुला चांगलंच माहिती आहे तो कशाबद्दल वाटतोय तें! ती चूक झाली माझी आणि चूकीची शिक्षाही बरोबरच आली.”
त्या म्हणाल्या, “शिक्षा तर मलाच झाली आहे.”
मेहताशेठ म्हणाले, “तुला तक्रार करायला कांही कारण नाही. उपाशी राहिली असतीस. मी तुला चांगल्या घरात आणली.”
त्या तिरस्काराने हंसल्या, “हं! म्हणे चांगल्या घरांत! सगळ्या गावाला माहित आहे किती चांगलं घर आहे हे! मग मला घटस्फोट कां नाही देत?”
मेहता तितक्याच हेटाळणीच्या सुरात म्हणाले, “आपल्या चुका आणि दु:ख असं वेशीवर टांगायचं नसतं. ही खाजगी गोष्ट राहिलेलीच बरी आणि मला तुला तुझा यार एकनाथ पटवारीकडे नाही जाऊ द्यायचं.”
बाईसाहेब किंचाळल्या, “दुष्ट! अरे भित्र्या, दुष्ट राक्षसा!”
मेहताशेठ आणखीच चिडवत म्हणाले, “माहित आहे मला! तुझी गुप्त इच्छा त्या याराकडे परत जाण्याची आहे पण मी जिवंत असेपर्यंत ते शक्य नाही आणि मी मेल्यावरही तुला त्याच्याकडे भिकारी म्हणून जावं लागेल. माझे पैसे खर्च करण्याचा आनंद मी तुम्हा दोघाना घेऊ देणार नाही. तू हे समजून रहा.”
इकडे तिकडे नजर फिरवून ते म्हणाले, “त्या खिडकीचा पडदा कां उघडा आहे?”
मेहताबाई म्हणाल्या, “मला मोकळी हवा पाहिजे होती.”
मेहताशेठ म्हणाले, “त्यांत धोका आहे. एखादा भुरटा चोर आत शिरला तर! तुला माहित आहे? माझ्या पदकांची किंमत जगातल्या अशा कोणत्याही संग्रहापेक्षा जास्त आहे. तू दरवाजा पण उघडा टाकलायस! एखाद्याला त्या पेट्यांवर डल्ला मारण्यापासून कोण रोखणार?”
मेहताबाई म्हणाल्या, “मी होते इथे.”
“मला ठाऊक आहे, तू इथे होतीस! काय करत होतीस इथे एवढ्या रात्री? मी तेंच पहायला आलो खाली.” मेहताशेठ गरजले.
मेहताबाई म्हणाल्या, “पदकं पहात होते. आणखी काय करणार इथे?”
मेहताशेठ म्हणाले, “हा नवा छंद कधीपासून लागला तुला?”
मेहताबाईंकडे संशयाने पहात मेहताशेठ पदकांच्या खोलीत येऊ लागले.
माझं लक्ष मी तिथेच विसरून ठेवलेल्या चाकूकडे गेलं. मेहताबाईंच लक्ष चाकूकडे आधी गेलं.
त्यांनी हातातला दिवा असा धरला की त्या चाकूवर प्रकाश पडणार नाही.
आत येताच त्यानी पटकन डाव्या हाताने चाकू उचलला व आपल्या गाऊनच्या बाजूला मेहताशेठना दिसणार नाही असा धरला.
मेहताशेठ आत येऊन पेट्यांवरून नजर फिरवत होते.
एकदा तर ते इतके जवळ आले की मी त्यांच तें लांब नाक हाताने ओढू शकलो असतो.
तिथे कांही संशयास्पद नव्हतं. त्यामुळे मेहताशेठ कुरकुरत, पुटपुटत पुन्हां बाजूच्या खोलीत गेले.
आता मी काय पाहिलं हे न सांगता काय ऐकलं ते सांगणार आहे.
मला कधीतरी चित्रगुप्तासमोर हिशोब द्यावा लागेल.
तेव्हा मी आजही खरं तेंच सांगणार आहे.
बाहेरच्या खोलीत गेल्यावर त्यांनी त्यांच्या हातातील मेणबत्तीची दिवटी टेबलावर ठेवली हे मी पाहिलं.
ते आरामखुर्चीत बसले आणि माझ्या नजरेआड झाले. मेहताबाई त्यांच्या पाठीमागे गेल्या असाव्यात कारण त्यांच्या हातांतील दिवटीमुळे मेहताशेठची पुढे पडलेली लांब सांवली मला दिसू लागली.
ते बसून पुन्हा त्या एकनाथबद्दल बोलू लागले. त्यांच बोलणं अत्यंत विषारी होतं.
मला सर्व स्पष्ट ऐकू येत नव्हतं कारण अधूनमधून ते हळू बोलत होते.
मेहताबाईंना नक्कीच तें चाबकाच्या फटका-यांसारखं लागत असावं.
त्या हे कसं सहन करत असतील अशी शंका माझ्या मनांत आली.
एवढ्यांत अचानक मेहताशेठ तीव्र स्वरात ओरडले, “पुढे ये. माझ्या मागे काय करत्येयसं? माझी मान सोड. मला मारायची तुझी हिम्मत कशी झाली?”
मग एखादा फटका मारावा तसा कांहीतरी आवाज झाला. मग “थड्” असा आवाज झाला आणि लागलीच मेहताशेठ ओरडले, “बाप रे! रक्त! अग राक्षसीणी! तू .. तू..” मग त्यांचा आवाज बंद झाला.
मी माझी पडद्यामागची जागा सोडून त्या खोलीत धावलो. माझा भीतीने थरकांप उडाला. म्हातारे मेहताशेठ खुर्चीतून घसरले होते.
त्यांची मान एका बाजूला लोंबत होती.
रक्त नेमकं कुठून येतय हे कळत नव्हतं पण जमिनीवर सतत ठिबकत होतं.
त्यांच तोंड उघडं पडलं होतं.
बाईसाहेब मागे उभ्या होत्या.
मेणबत्तीच्या उजेडांत त्यांचे डोळे चमकत होते.
त्यांचे ओठ घट्ट मिटलेले होते.
गालांवर लाल रंग दिसत होता.
त्या क्षणी त्या मी पाहिलेली सगळ्यात सुंदर स्त्री वाटल्या.
“तुम्ही काय केलं हे?” मी विचारले.
त्या शांतपणे म्हणाल्या, “हो. मी केलं हे.”
“आता काय करणार तुम्ही? तुम्हाला नक्कीच खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होईल.” मी विचारले.
त्या म्हणाल्या, “माझी फिकीर करू नकोस. मला जगण्यासारखं काही राहिलं नाही. कांही फरक पडत नाही. मला जरा ह्यांना खुर्चीत नीट बसवायला मदत कर. असं बघणं भयानक दिसतं.”
मी मेहताशेठचा देह सरळ खुर्चीत ठेवायला मदत केली.
देह थंड लागत होता आणि थोडं रक्तही माझ्या हातांना लागलं.
मला शिसारी येत होती.
मेहताबाई म्हणाल्या, “तुला ती पदकं हवीत ना! ती घेऊन जा.”
मी म्हणालो, “मला कांही नको. मला फक्त इथून निघून जाऊ दे. मी अशा भानगडीत कधी पडलो नव्हतो.”
“मूर्खपणा करू नकोस! तू पदकांसाठी इथे आलास. ती तू घेऊन जा.” मेहताबाई मला म्हणाल्या बॅग अजून माझ्या हातातच होती.
त्यानी ती उघडली आणि आम्ही दोघांनी मिळून सुमारे शंभर पदकं बॅगेत भरली.
ती फक्त एका पेटीतील होती.
आणखी घ्यायला मला तिथे अधिक काळ थांबायचे नव्हते कारण तो बंगलाच मला विषारी वातावरणाने भरलेला वाटायला लागला होता.
मी बॅग घेऊन खिडकीकडे गेलो.
मी मागे वळून पाहिलं.
मी आलो तेव्हा जशी ती उंच आणि सुंदर दिसली होती तशीच आताही वाटत होती. तिने मला निरोप देण्यासाठी हात हलवला.
मीही हात हलवून तिचा निरोप घेतला व खिडकीबाहेर पॅरापीटवर उडी मारून बाहेरच्या रस्त्याकडे जाण्यासाठी निघालो.
16.
मी देवाचा आभारी आहे की मी शपथेवर सांगू शकतोय की मी कधी खून केलेला नाही.
कदाचित मेहताबाईंच्या मनांतले विचार जर मला आधीच ध्यानांत आले असते तर कदाचित एकाऐवजी दोन प्रेतं त्या बंगल्यात मिळाली असती.
निरोप देतानाच्या त्यांच्या हंसण्याचा अर्थ माझ्या लक्षांत आला असता तर मी कदाचित त्यांना ठारच केले असते.
त्या माझ्याच गळ्याभोवती फास अडकवतील अशी शंकाही माझ्या मनांत आली नाही.
मला फक्त तिथून सुरक्षितपणे बाहेर पडायचं होतं.
मी खाली उतरून जेमतेम तीन चार पावले टाकली असतील, तोंच सर्व गांवाला जाग येईल अशा मोठ्या आवाजांत किंचाळी ऐकू आली, “खून…” मग पुन्हा! मग पुन्हां. मेहताबाईंच्या किंचाळ्यांनी सर्व परिसर भरून गेला.
तें भीतीदायक किंचाळणे माझ्या मस्तकातून गेले.
बंगल्यात, जवळच्या इतर घरांत दिवे पेटू लागले.
खिडक्या उघडल्या गेल्या.
मी जीवाच्या आकांताने फाटकाकडे धावलो पण जाण्यापूर्वीच ते बंद केल्याचा आवाज आला.
मग मी बॅग एका झुडुपात दडवली आणि मी बागेतून पळू लागलो.
कोणीतरी चंद्रप्रकाशात मला पळतांना पाहिले.
मग पाच सहा माणसे आणि कुत्रे माझ्या मागे आले.
कुत्र्यांनी मला धरले.
नशीब की मागून माणसे लौकर आली नाहीतर कुत्र्यांनीच मला फाडले असते.
त्यानी मला पकडले व त्याच खोलीत नेले.
17.
त्यांच्यापैकी एक मेहताबाईंचा स्वैपाकी होता.
त्याने मला धरून पुढे उभे केले व विचारले, “बाईसाहेब, हाच कां तो माणूस?” बाईसाहेब रुमाल तोंडावर धरून, मेहताशेठच्या देहाशेजारी बसून रडत होत्या.
त्या पक्क्या नाटकी होत्या.
अत्यंत क्रोधाने त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, “होय! हाच, हाच तो माणूस. अरे दुष्टा! म्हाता-या माणसाला असं मारतांना तुला जराही दया आली नाही!”
त्यातच एक पोलिस तिथे होता.
त्याने माझ्या खांद्याला धरून विचारले, “ह्यावर तुझे काय म्हणणं आहे?”
मी ओरडलो, “खून त्या बाईंनी केला आहे.”
मेहताबाईंची माझ्या नजरेला भिडलेली नजर जराही हलली नाही.
पोलिस म्हणाला, “दुसरं कांही सांग! हं!”
तेवढ्यात नोकरांपैकी एकाने मला ठोसा मारला.
मी म्हणालो, “मी खरंच सांगतो. त्या बाईंनी चाकूने दोनदा त्यांना भोसकले. त्यांनी मला प्रथम चोरी करायला मदत केली आणि मग त्यांचा खून केला.”
त्या नोकराने मला परत मारायसाठी हात उगारला पण मेहताबाई म्हणाल्या, “त्याला मारू नका. त्याला काय शिक्षा द्यायची तें कायदाच ठरवेल.”
18.
पोलिस म्हणाला, “बाईसाहेब, ते तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही ह्याने गुन्हा करतांना प्रत्यक्ष पाहिले आहे ना?”
मेहताबाई उदगारल्या, “होय, होय. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. फार भयानक होते तें. आम्ही दोघे आवाज ऐकून खाली आलो. माझे बिचारे पती पुढे होते. ह्या माणसाने एक पेटी उघडली होती आणि त्यातली पदकं तो चामड्याच्या बॅगमधे भरत होता. ती घेऊन तो जाऊ लागला. माझ्या पतींनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. थोडी झटापट झाली. त्या झटापटीत ह्याने दोनदा चाकूने मारले. त्याच्या हातांवर रक्त आहे पहा आणि माझी चूक होत नसेल तर त्याचा चाकू अजून माझ्या पतींच्या शरीरातच असेल.”
मी ओरडलो, “बाईंच्या हातावरचं रक्त पहा.
स्वैपाकी म्हणाला, “ अरे खोटारड्या, बाईसाहेब साहेबांच डोकं वर धरून बसल्या होत्या.”
तेवढ्यात आणखी एकजण हातात ती चामड्याची बॅग घेऊन आला आणि म्हणाला, “ही पहा बाईसाहेब म्हणत होत्या ती बॅग. खाली झुडुपात लपवलेली सांपडली.”
पोलिस म्हणाला, “बॅगेत पदकं आहेत. एवढा पुरावा आम्हाला पुरेसा आहे. आजचा दिवस इथेच त्याला आम्ही सुरक्षित ठेवू व उद्या तालुक्याच्या मुख्यालयांत पुढील कारवाईसाठी नेऊ.
मेहताबाई म्हणाल्या, “बिच्चारा! माझ्याकडून मी त्याच्या खोटेपणाबद्दल माफ करते. काेणत्या कारणाने त्याला गुन्हा करायचा मोह झाला, कुणास ठाऊक. कायदा आणि त्याचे मन त्याला गुन्ह्याची योग्य शिक्षा देईलच. माझ्या शापाची भर त्यांत नको.”
त्यांच्या बोलण्याने मी इतका चकीत झालो की कांही उत्तर देऊ शकलो नाही.
माझं गप्प रहाणं ही माझी संमती मानून मला पोलिसांनी बंगल्याच्या तळघरांत रात्रीसाठी कुलुपबंद केले.
19.
साहेब, मेहताशेठच्या खूनासंबंधीची संपूर्ण हकिकत आणि मेहताबाईंनी १३ सप्टेंबरच्या रात्री त्यांचा खून करायला कारण ठरलेला सर्व घटनाक्रम मी तुम्हाला सांगितला आहे.
कदाचित तुम्हीही त्या पोलिस किंवा मॅजिस्ट्रेट ह्यांच्याप्रमाणेच माझ्या ह्या बचावाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष कराल.
कदाचित तुम्हाला माझ्या बोलण्यातलं तथ्य जाणवेल व तुम्ही अधिक चौकशी करून सत्त्य शोधून काढाल आणि तुमचं एक निष्पक्ष न्यायमूर्ती म्हणून नाव होईल.
असं झालं तर जन्मभर मी देवाप्रमाणे तुमची पूजा करीन.
मला ह्या खोट्या आरोपांतून केवळ तुम्हीच सोडवू शकतां!
पण जर तुम्ही असं केलं नाहीत तर मी सांगतो की मी गळफास लावून आत्महत्त्या करेन आणि जर एकाद्या मृत माणसाला मृत्यूनंतर दुस-याला जर भंडावून सोडतां येत असेल तर मी तें करेन.
माझं मागणं साधं आहे की बाईंची अधिक चौकशी करा.
एकनाथ पटवारी नांवाचा त्यांचा मित्र होता की नव्हता, त्यांचे संबंध काय होते आणि आहेत, हातात आलेल्या संपत्तीचा त्या कसा वापर करताहेत, ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा.
त्यातून तुम्हाला मेहताबाईंचे खरे रूप दाखवणारा आणि माझे म्हणणे सत्त्य ठरवणारा किंवा माझ्या म्हणण्याला दुजोरा देणारा काहीतरी पुरावा नक्की मिळेल आणि एका निरपराध्याला न्याय मिळेल.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – बी ट्वेंटीफोर

मूळ लेखक – ॲार्थर कॉनन डायल (१८५९-१९३०)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..