नवीन लेखन...

त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

पाच वर्षांपूर्वी माझं संपूर्ण आयुष्यच बदलणारी गोष्ट घडली.
इतरांनाही त्यापासून कांही धडा घेता यावा म्हणून मी हे लिहितोय.
मी जेव्हां अगदी तरूण होतो तेव्हां साहित्यसेवा करायचे ठरवले.
साहित्यातील पदवी घेतल्यानंतर बरेच वर्षे फारसा मोबदला न मिळता मेहनत करत राहिल्यानंतर, मी लेखक म्हणून थोडासा स्थिरस्थावर व्हायला लागलो होतो.
अनेक नियतकालिकांच्या संपादकांना आता माझे नांव माहित झाले होते आणि मी लिहिलेले लेख, मग ते गंभीर, विनोदी, ललित, वास्तव किंवा आधुनिक, कसेही असले तरी ह्या संपादकांना ते छापण्यायोग्य वाटू लागले होते व बहुतेक सर्व लेखन प्रसिध्द होऊ लागले होते.
सामान्य वाचकांमधे माझ्या लिखाणाने कोणतीही खळबळ उडवली नव्हती आणि माझे नावही लोकप्रिय झाले नव्हते.
मला लेखनातून खूप चांगले उत्पन्नही मिळत नव्हते.
तरीही माझे सर्व लेखन स्विकारले जात होते आणि त्यापासून मला मिळणाऱ्या उत्पन्नावर माझा चरितार्थ ठीक चालू होता.
त्याचवेळी मी विवाह केला.
आम्ही दोघांनी वर्षापूर्वीच विवाह करायचे ठरवले होते पण मला लेखनातून मिळणारे उत्पन्न त्यासाठी पुरेसं आहे, अशी आमची खात्री पटली, तेव्हांच विवाह केला.
कुठले लेखन कोणत्या संपादकाकडे पाठवावे व कुणाकडे ह्या लेखनाला चांगला मोबदला मिळेल, ह्याचे गणित आता मला बरोबर समजले होते.
आम्ही कांही श्रीमंत झालो नव्हतो परंतु माझी प्राप्ती पुरेशी होती आणि मला त्यांत समाधान होते.
माझ्या वाचकांतले जे विवाहित असतील त्यांना अनुभवाने ठाऊकच असेल की विवाहानंतरच्या पहिल्या कांही आठवड्यांमधे कशी वेगळीच धुंदी अनुभवायला मिळते.
त्या दिवसांत सर्वत्र फुले बहरलेली दिसू लागतात, सूर्यप्रकाश आल्हाददायक असतो, काळ्या ढगांची नावनिशाणी नसते, सर्व प्रकारची फळे मधुर लागतात, हवा आल्हाददायक असते, माणसाचे मन तृप्त असतं आणि तो एका अनोख्या विश्वात गढून गेलेला असतो.
अशावेळी त्याची कल्पनाशक्ती पूर्वीपेक्षाही अधिक तरल झालेली असते.
निदान मला तरी हा अनुभव आला.
माझे साधे सरळ मन अतर्क्य विचारांच्या हिंदोळ्यावर डोलत होते आणि माझी बुध्दी अतिशय तल्लख झाली होती.
अशा अवस्थेत असतांना मी एक कथा लिहिली.
माझ्या मनांत अचानक एका वैशिष्ट्यपूर्ण कथेचं बीज रोवलं गेलं आणि मी आनंदात कथा लिहायला बैठक मारली व नेहमीपेक्षा कितीतरी कमी वेळांत कथा लिहून पुरीही केली.
कथेला नांव दिलं, “त्याच्या पत्नीची मृत बहिण”.
मग मी ती कथा माझ्या नवपरिणीत पत्नीला वाचून दाखवली.
तिला ती कथा खूप आवडली.
त्या कथेतल्या चढउतारांनी ती अधेमधे इतकी भावविवश होत होती की मलाही वाचतांना डोळ्यातल्या ओलाव्याने अक्षरे फिकट दिसत होती.
जेव्हा कथा वाचून झाली, तेव्हा डोळे पुसत पत्नी म्हणाली, “ही कथा तुमचे नशीब घडवेल. खांडेकरांनंतर गेल्या अनेक वर्षात असं सहृदय, डोळ्यातून पाणी आणणारं लेखन कोणी केलं नाही.”
ज्या संपादकाचा माझ्यावर जास्त लोभ होता व ज्याला मी आतापर्यंत जास्तीत जास्त साहित्य पाठवलं होतं, त्याला लगेचच दुसऱ्या दिवशी मी ती कथा पाठवून दिली.
लौकरच त्याचे पत्र आले.
त्याने कथेची पूर्वी कधी केली नाही अशी स्तुती केली होती.
त्याने असंही लिहिलं होत की “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ही कथा त्याच्या सगळ्याच स्टाफला अतिशय आवडली होती.
एवढंच नव्हे तर त्यांचा म्हातारा प्रूफ रीडर, जो कधीही लिखाण प्रूफ रीडींगला येईपर्यंत वाचत नसे, त्यानेही ही कथा आधीच वाचून तिचे कौतुक केले होते.
तो असंही म्हणाला की चाळीस वर्षांपूर्वी त्याचे वडिल गेले, त्या घटनेनंतर आज प्रथमच त्याच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.
संपादकाने आश्वासन दिले होते की कथा नियतकालिकांत लौकरच प्रसिध्द केली जाईल.
ह्या पत्राने आम्हां दोघाना खूप बरं वाटलं, आमच्या आयुष्यात एक वेगळीच खुशी आली.
लौकरच ती कथा छापली गेली आणि वाचकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतली.
संपादकाने त्या कथेवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
माझे मित्र त्या कथेबद्दल माझ्याशी उत्साहाने बोलू लागले.
समीक्षकांनी वृत्तपत्रांतून कथेवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
त्या कथेने मला साहित्यिक यश मिळवून दिले.
मला माझ्या लेखनाबद्दल आत्मप्रौढी नाही आणि माझी पत्नीही मला नेहमी सांगत असते की उगाच त्याचा बाऊ करू नका.
पण मला ‘त्याच्या पत्नीची मृत बहिण’ या गोष्टीने मिळालेल्या यशाचा सार्थ अभिमान आणि आनंद नक्कीच वाटला.
त्यामुळे कांही मला खूप आर्थिक लाभ झाला नाही परंतु माझी पत्नी म्हणाली, “ह्या गोष्टीच्या यशामुळे तुमची लेखक म्हणून कारकीर्द उभी रहायला हरकत नाही.”
तें मला पटलं.
ह्यानंतर सुमारे एक महिन्यातच अगदी अनपेक्षित घडलं.
ज्या संपादकाने “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ही कथा प्रसिध्द केली होती, त्यानेच माझ्या दुसऱ्या गोष्टीची मूळ प्रत परत पाठवली.
त्याने मला कळवलं, “ही चांगली कथा आहे. तरीही ती “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेइतकी प्रभावी नाही.
तू नुकतीच एक उत्कृष्ट कथा लिहिल्यामुळे तुला एक उच्च स्थान मिळालं आहे.
तू आता पाठवलेली कथा छापल्यास तुझ्या नावलौकीकाला बाधा येईल.
तेव्हा ही न छापलेलीच बरी.”
मला माझं लिखाण असं “साभार परत” मिळण्याचा फारसा अनुभव नव्हता, त्यामुळे पत्र वाचताना माझा चेहरा भकास झाला.
मी माझ्या पत्नीला ती कथा परत आल्याचे सांगितले नाही कारण आमचा चांगल्या चाललेल्या संसारात मला मीठाचा खडा नको होता.
मी ती कथा दुसऱ्या एका नियतकालिकाला पाठवून दिली.
पण आठवड्याभरांतच ती कथा परत आली आणि मला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला.
ह्या संपादकांनी लिहिलं होतं, “तुमची गोष्ट मी अत्यंत जड अंतःकरणाने परत पाठवत आहे पण तुम्ही जर “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेच्या तोडीची दुसरी कथा पाठवाल तर मी ती नक्की प्रसिध्द करीन.”
आता मला या विषयाबद्दल पत्नीशी बोलणे आवश्यक वाटू लागले.
तिलाही आश्चर्य वाटले पण मला बसला होता तसा तिला धक्का बसला नाही.
ती म्हणाली, “तुमची कथा आपण परत वाचूया.”
मग आम्ही दोघांनी ती परत आलेली कथा पुन्हा वाचली.”
पत्नी म्हणाली, “कथा तर ठीक आहे. पूर्वी तुमच्या कथा छापल्या गेल्या आहेत, तितकीच ही कथा चांगली आहे.
हां, अर्थात ती “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेच्या तोडीची नाही, हे खरं आहे.”
मी म्हणालो, “अर्थातच ! ती एक विलक्षण कल्पना होती आणि अशा कल्पना रोज थोड्याच सुचतात !
ह्या परत येणाऱ्या गोष्टीत कांहीतरी बिघडलं असावं किंवा माझ्या यशाने हुरळून मी ती लिहितांना हयगय केली असावी.”
पत्नी म्हणाली, “मला नाही असं वाटत.”
मी म्हणालो, “कांही असू दे. आता ही गोष्ट बाजूला ठेवतो व दुसरी लिहायला घेतो.”
कांही दिवसांतच माझी नवी कथा लिहून पूर्ण झाली.
मी ती कथा माझ्या आवडत्या नियतकालिकाला पाठवून दिली.
ती कांही आठवडे ठेऊन घेऊन संपादकाने परत पाठवली.
त्याने लिहिलं, “तू तुझ्या पायरीवरून खाली येणं योग्य नाही.
अजूनही तुझ्या “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेला मागणी आहे.
तुझी ही गोष्ट छापणं म्हणजे आमचे जे अनेक वाचक त्या कथेच्या लेखकाच्या नवीन कथेची आतुरतेने वाट पहात आहेत, त्यांची निराशा करणं होईल.”
मी तीच गोष्ट आणखी चार नियतकालिकांना पाठवली पण प्रत्येकाने “ही कथा बरी आहे परंतु “त्याच्या पत्नीची मृत बहिण”च्या तोडीची नाही” हेच कारण देऊन परत पाठवली.
एका सुप्रसिध्द मासिकाच्या संपादकाचं ‘आमच्या विशेषांकासाठी कथा पाठवा’ असं मला पत्र आलं.
मग मुद्दाम एक नवी गोष्ट लिहून मी त्याला पाठवली.
त्याने ती परत पाठवतांना लिहिलं, “मी जेव्हा तुमच्याकडे कथेची मागणी केली, तेव्हा मला “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेसारखी कथा अभिप्रेत होती, अशी नव्हे.
आपण माझी निराशा केलीत.”
हे पत्र वाचून मला इतका राग आला की मी वैतागाने ओरडलो, “ह्या ‘त्याच्या पत्नीची मृत बहिण’ कथेच्या….”
माझी पत्नी आश्चर्याने ऐकत होती.
मी म्हणालो, “मला क्षमा कर.
मी असं बोलणं बरोबर नाही पण त्या कथेने माझी करीअर बरबाद करणं चालवलं आहे.
ती कथा विस्मृतीत जाईपर्यंत बहुदा कोणी संपादक माझे कांही लिखाण प्रसिध्द करेल असं वाटत नाही.”
पत्नी म्हणाली, “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ही कथा इतकी चांगली आहे की ती कधी विस्मृतीत जाणार नाही.”
हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होते.
पुढचे कांही महिने मी केलेल्या माझ्या कथालेखनाच्या प्रयत्नांबद्दल बारीकसारीक सांगत बसत नाही.
एवढं मात्र खरं की माझ्या त्या कथेमुळे माझ्या कथा प्रसिध्द करणाऱ्या संपादकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या म्हणून ते माझ्या नव्या कथा छापत नव्हते आणि इतर नियतकालिकांना नवी गोष्ट पाठवल्यास ती कमी दर्जाची कथा पाठवून मी त्यांचा अपमान करतोय, असं समजून तेही ती कथा परत पाठवत.
खरी गोष्ट अशी होती की माझ्या यशस्वी कथेने माझी लेखक म्हणून करीअर बरबाद केली होती.
माझे उत्पन्नच बंद झाले होते.
शिल्लक संपत आली होती.
मला हे पसंत नव्हतं.
नवीन विवाह झाल्यावर एका तरल अवस्थेत मी “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ही कथा लिहिली होती.
प्रत्येक वेळी तशी कथा लिहिण्यासाठी मी विवाह नक्कीच करू शकत नव्हतो.
माझी पत्नी म्हणाली, “खरंच फारच बिकट परिस्थिती आहे.
मला जर बहिण असती आणि तिचा मृत्यू झालेला असता, तर मला वाटले असते की हा सारा माझाच अपराध आहे.”
मी म्हणालो, “तरीही ती तुझी चूक नसती आणि माझीही चूक नाहीय.
मी कांही कोणाला फसवू इच्छित नव्हतो की मी त्या तोडीच्या गोष्टी मी सतत लिहू शकेन.
अशी अपेक्षाच चुकीची आहे.
राफाएल सारख्या चित्रकाराने “सिस्टाईन मॅडोना’च्या तोडीचे चित्र काढले नाही म्हणून त्याची चित्रे घ्यायचे लोकांनी थांबवले कां ?”
माझ्या पत्नीला ह्या बाबतीत जास्त माहिती होती.
ती म्हणाली, “परंतु ते त्याने करीअर संपतानाच काढले.”
मी म्हणालो, “हो पण त्याचे कारण त्याने विवाह केला नव्हता, हे असावे.
विवाह केला असता तर त्याने ते खूप आधी काढले असते.”
मी एकदा घरी परतताना मला चंद्रकांत बोरकर हा लेखक भेटला.
तो पन्नाशीचा होता पण म्हातारा वाटत होता.
मी लिहायला सुरूवात केली, तेव्हांपासूनची माझी त्याची ओळख होती.
केस, दाढी पांढरी होती.
कपडे अगदी जुनाट वाटत होते.
तो अगदी थकलेला वाटत होता पण त्याच्या डोळ्यात एक दयाळू वृत्तीची चमक होती.
तो मला म्हणाला, “कसा आहेस ? कसं चाललं आहे ? असा संभ्रमात कां दिसतो आहेस ?”
त्याने मला पूर्वी मदत केली होती, त्यामुळे त्याला माझी परिस्थिती जाणून घेण्याचा हक्क होता.
मी कांहीही न लपवतां त्याला खरं ते सर्व सांगितलं.
माझं बोलणं संपल्यावर तो म्हणाला, “माझ्याबरोबर माझ्या खोलीवर चल.
मला तुला कांही सांगायचंय.”
मी चंद्रकांतबरोबर त्याच्या खोलीवर गेलो.
एका आडगल्लीतल्या जुनाट इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्याची खोली होती.
त्या गल्लीत कधी वाहने येऊ शकत नसत.
फक्त फेरीवाले ओरडत येत.
चंद्रकांत म्हणाला, “ही कांही फार चांगली जागा नाही.
पण ठीक आहे.”
चंद्रकांतची खोली त्या गल्लीहून खराब होती.
पुरेसा उजेड नव्हता.
धूळ पसरली होती आणि कोळीष्टके सर्वत्र लटकत होती.
खोलीत पडलेल्या कांही खुर्च्या आणि जुन्या टेबलावरची पुस्तकं पाहून वाटतं होतं की एखादी भयंकर रोगाची साथ येऊन गेली की काय ?
सर्वांची मलपृष्ठे आणि खुर्च्यांच्याही पाठी गायब होत्या.
एका पलंगावर गादीवर चादरीऐवजी चक्क वर्तमानपत्रे पसरलेली होती.
माझी पलंगावरची नजर पाहून चंद्रकांत म्हणाला, “पेपर हा चादरीपेक्षा झोपायला चांगला.
पूर्वी मी इंग्रजी वर्तमानपत्रे वापरत असे.
आता मराठीच वापरतो.”
खोलीला छोटी खिडकी होती, तिथे थोडा उजेड होता.
त्या उजेडात तिथे एका टेबलावर एक छोटा ग्राईंडर ठेवलेला होता.
चंद्रकांत म्हणाला, “खिडकीच्या विरूध्द बाजूला माझा स्टोव्ह आहे पण मी तिथला मेणबत्तीचा दिवा लावल्याशिवाय तुला तो दिसणार नाही.
मला वाटत नाही की तो पहाण्यात तुला कांही रस आहे !
तेव्हा मी दिवा लावणार नाही.
तू काडेपेटी लावून आजूबाजूला पाहिलंस तर अनेक वस्तू विस्कळीत पडलेल्या दिसतील तुला परंतु तू तसं न केलेलच बरं !
त्या सगळ्या वस्तू फेकून देण्याच्या लायकीच्या आहेत.
फक्त हे पहा.”
असं म्हणून तो मला एका फोटो फ्रेमजवळ घेऊन गेला.
ती फ्रेम खिडकी जवळच होती.
त्यात एका जुन्या सुप्रसिध्द नियतकालिकांतील एक पान फ्रेम केलेलं दिसत होतं.
तो म्हणाला, “हे पहा, एकेकाळी हे नियतकालिक फार गाजलं होतं.
मी त्यांत नियमित लिहित असे, हे तुला आठवत असेल.”
मी म्हणालो, “हो, आठवतंय तर !
आणि तू लिहिलेलं ते विनोदी प्रहसन “बुवाची करामत” फार आवडलं होतं.
मी माझ्या मित्रांबरोबर मी कितीदा ते पाहिलं आहे आणि आम्ही मनसोक्त हंसलो आहोत.”
चंद्रकांतने माझ्याकडे नजर रोखली आणि म्हणाला, “ह्या फ्रेममधे त्याच प्रहसनाचं छापील पान आहे.
मी ती फ्रेम तिथे अशासाठी लावलीय की काम करतांना ते मला दिसावं.
ह्या प्रहसनाने मला बरबाद केलं.
त्या मासिकासाठी मी लिहिलेलं ते शेवटचं लिखाण ठरलं.
मला ते कसं सुचलं कुणास ठाऊक ?
लेखकाला अशी स्फूर्ती आयुष्यात कधीतरी एकदा अचानक येते.
ते प्रहसन खूपच लोकप्रिय झालं.
इतकं की त्यानंतर मी जे कांही लिहिलं ते कुणाला आवडलं नाही.
उलट उपहासाचं कारण झालं.
मला लेखनावर जगणं दिवसेंदिवस कठीण जाऊ लागलं.
मग मी शेवटी सध्या करतो ते काम करायला लागलो.
हे जे ग्राईंडींग मशीन आहे त्याने मी टांचण्या बनवतो.
हे काम करून मला माझं दिवसाच जेवण, चहा, खोलीच भाडं वगैरे मिळतं.
कधीतरी बटाट्याची भजीही घेता येतात.
एकदा एक फेरीवाला खालच्या गल्लीत तंतुवाद्यावर सुंदर धून वाजवत होता.
मी ती धून ऐकण्यात मग्न झालो आणि भूतकाळात गेलो.
जेव्हां मला थिएटरमध्ये पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळे.
जेव्हा मी ज्याच्यावर कधीही पडदा पडणार नाही, अशा माझ्या भावी उत्कर्षाचं सुंदर स्वप्न पहात असे.
त्यात किती वेळ गेला कुणास ठाऊक !
माझं नेहमीच पिना तयार करण्याचं काम सुरूच होतं.
बऱ्याच वेळाने मी भानावर आलो.
त्या दिवशी तयार केलेल्या पिना अतिशय सुंदर झाल्या होत्या.
अगदी उत्तम.
त्या पाहिल्या आणि मी घाबरलो.
मी भराभर त्या गोळा केल्या आणि बाहेर कचऱ्यांत टाकून आलो.
त्या जर मी त्या पिना मालकाला दिल्या असत्या तर नक्कीच रोज त्याला तशाच पिना हव्या झाल्या असत्या आणि माझं हे कामही गेलं असतं !”
मी स्तब्ध होऊन ऐकत होतो.
थोड्या वेळाने चंद्रकांत पुन्हा बोलू लागला, “तेव्हा मित्रा, ही फ्रेम पहा, हा ग्राईंडर पहा, घरी जा आणि ह्यावर विचार कर.
मला आता सूर्य मावळेपर्यंत बनवतां येतील तेवढ्या पिना बनवायच्या आहेत.”
मी चंद्रकांतला मधल्या काळांत विसरलो होतो.
मला वाटत होते की त्याचे चांगले चालले असणार.
ज्या चंद्रकांतने “बुवाची करामत” हे प्रहसन लिहिलं होतं, त्या चंद्रकांतला अशा दरिद्री अवस्थेत हात मशीन्सने पिना बनवतांना पाहून मला खूप धक्का बसला होता.
परत जाताना माझ्यासमोर माझ्या भविष्याचं एक विदारक चित्र उभं राहिलं.
चंद्रकांतने दिलेला धडा मनांत खोलवर गेला होता.
घरी पोचल्यावर मी चंद्रकांतची अवस्था माझ्या पत्नीला सांगितली.
तिने त्याबद्दल उत्सुकतेने ऐकलं.
तिला वाईट वाटलं.
ती म्हणाली, “आपली परिस्थिती जर लवकर पालटली नाही तर आपल्यालाही असे दोन पिन ग्राईंडर घ्यावे लागतील.
मला हे काम जमेल.
मीही तुम्हाला मदत करेन.”
बराच वेळ आम्ही त्या विषयावर बोलत बसलो आणि पुढचे बेत ठरवू लागलो.
अद्याप पिन ग्राईंडर घेण्याची वेळ येणार नाही असं माझं मन मला सांगत होतं.
पैसे तर कमावलेच पाहिजेत नाहीतर उपाशी मरायची वेळ येईल.
दुसरं कांही काम करावं तर त्यासाठी मी कांही तयारी केली नव्हती.
मी खूप मनापासून लेखक व्हायचे ठरवलं तसं शिक्षण घेतलं.
माझं माझ्या कामावर प्रेम होतं, ते सोडून द्यायला माझं मन तयार नव्हतं.
माझी लेखणी म्यान करण्याचा विचार मलाच मान्य नव्हता.
दुसऱ्या बाजूला चंद्रकांत बोरकरची खोली, ती फ्रेम आणि तो पिन ग्राईंडर दिसत होता.
आम्ही खूप रात्री उशीरापर्यंत बोलत बसलो पण कांही सुचलं नाही.
मी एवढच ठरवलं की दुसऱ्या दिवशी माझ्या त्या संपादकाला, ज्याच्यासाठी मी सर्वात जास्त लिहिलं होतं व ज्याने माझी “त्याच्या पत्नीची मृत बहिण” ही गोष्ट छापली होती, त्याला भेटून सर्व खरं खरं सांगायचं.
तो संपादक भला माणूस होता.
त्यांनी माझं सर्व बोलणं लक्षपूर्वक ऐकलं व मला सहानुभूतीही दाखवली.
मी त्यांना म्हटलं, “मला काय सल्ला द्याल ?”
ते म्हणाले, “मी तुला जे लिहिलं आहे, ते योग्यच होतं.
तुला “त्याच्या पत्नीची मृत बहिण” कथेमुळे जे नाव मिळालं होतं त्याला बट्टा लागू नये म्हणूनच आम्ही तुझी दुसरी कथा नाकारली.
तुझ्या नंतरच्या कथा वाचून त्यांचा विरस झाला असता आणि त्यामुळे तुझंच नांव खराब झालं असतं.
आता तू म्हणतोयस की तुझ्या पोटापाण्याचा प्रश्न समोर उभा आहे.
नुसत्या प्रसिध्दीवर जगतां येत नाही, हे मीही जाणतो.
तेव्हां मी तुला एक सुचवू कां ?”
मी म्हणालो, “सांगा !”
ते म्हणाले, “तुझ्या ह्या कथा आपण टोपणनांवाने प्रसिध्द करूया.
त्या वाईट आहेत असं नाही.
छापतां येतील पण तुझ्या नांवावर नाही.
दुसरं नांव घे.
आम्ही तुला पैसे नेहमीसारखेच देऊ. चालेल?”
मी त्यांच्या ह्या प्रस्तावाला आनंदाने होकार भरला.
मी म्हणालो, “माझं नाव मला सध्या महत्त्वाचं नाही.
मी तयार आहे.
एक नवा लेखक म्हणून लोकांसमोर जायला माझी कांहीच हरकत नाही.”
संपादक म्हणाले, “मला वाटते हे थोड्या दिवसांसाठी आहे.
तुला पुन्हा ‘त्याच्या पत्नीच्या मृत बहिण’ सारख्या कथा लौकरच सुचतील.”
माझ्याकडे तयार असलेल्या सगळ्या कथा मी त्या संपादकांना पाठवून दिल्या.
यथावकाश त्या प्रसिध्द होत राहिल्या.
माझं टोपणनाव “महेश मोंडकर” ह्या नावाने त्या छापल्या गेल्या.
ते मीच सुचवलं होत.
माझ्या सर्व कथांचं श्रेय “महेश मोंडकरला” मिळू लागलं.
पुन्हा मला पैसे मिळू लागले.
आम्ही स्थिरस्थावर तर झालोच परंतु थोडीशी चांगली परिस्थितीही आली आणि भरभराटीची स्वप्नेही पाहू लागलो.
काळ भराभर पुढे सरकत होता.
एक वर्ष होऊन गेलं आणि आम्हाला एक मुलगा झाला.
छोटं बाळ घरांत आलं.
लग्नानंतरचा आनंद मोठा की पहिलं मुलं जन्माला आल्यानंतरचा आनंद मोठा, ह्या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे.
माझ्यापुरतं म्हणायचं तर मी दोन्हीवेळा तेवढाच आनंदीत व उत्साही झालो.
पुन्हां एकदा मनाची तीच तरलता मी अनुभवली आणि पुन्हा मनांत तशीच एक भन्नाट गोष्टीची कल्पना मनांत उमटली.
मुळीच वेळ न घालवतां मी कथा लिहायला बसलो.
आमचा मुलगा सहा आठवड्याचा असतांना माझी कथा लिहून झाली.
रात्री जेवल्यानंतर बाळ झोंपल होतं.
आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो.
मी पत्नीला नव्या कथेबद्दल सांगितले व तिला ती लगेचच वाचूनही दाखवली.
गोष्ट वाचून होताच पत्नीने मला मिठीच मारली.
ती म्हणाली, “मला तुमचा अभिमान वाटतो. फारच सुंदर कथा लिहिलीत तुम्ही.
ही कथा ‘त्याच्या पत्नीची मृत बहिण” ह्या कथेइतकीच छान झाली आहे.”
तिचे बोलणे ऐकताना माझ्या अंगातून एक भीतीची लहर दौडत गेली.
तिचा उत्साह, तिची शाबासकी, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्यांचा मला क्षणात विसर पडला.
मी तिच्यापासून थोडा दूर झालो.
दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काय झालं हे तिच्याही लक्षांत आलं !
ही कथा ‘त्याच्या पत्नीची मृत बहिण’ ह्या कथेइतकीच” चांगली आहे, ह्या तिच्या शब्दांनी आम्ही सावध झालो.
पुन्हा ही कथा प्रसिध्द झाली की तितक्याच चांगल्या गोष्टींची मागणी आणि इतर कथांना नकार.
मग पुन्हां पैसे मिळवण्याचा मार्ग बंद.
पिन ग्राईंडर डोळ्यांसमोर चमकला. लेखक म्हणून हे भवितव्य मला भयानक वाटू लागलं.
आताच कुठे आमच्या संसाराची गाडी रूळावर आली होती.
पुन्हा जर माझ्या लेखनाला नकार मिळू लागला तर.
माझ्या नवजात मुलाचही भवितव्य धोक्यात येईल ?
माझी पत्नी परत जवळ आली. तिने माझा हात हातात घेतला.
ती म्हणाली, “तुम्ही धीर धरा.
ही गोष्ट प्रसिध्द करण्याने तुमच्यापुढे धोका आहे पण मी तुझी नेहमी साथ करीन.”
मी तिचा हात दाबला. मग पुढे आमचं कांही बोलणं झालं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते हस्तलिखित एका चांगल्या जाड कागदात गुंडाळलं.
मग जवळच्या दुकानांत जाऊन एक पत्र्याचा लांबट गोल बिस्कीटांचा असतो तसा डबा आणला.
ती हस्तलिखिताची गुंडाळी त्यांत ठेवली त्यानंतर मी तो डबा घेऊन लोहाराकडे गेलो.
त्याला तो डबा घट्ट झाकणाने बंद करून त्यावर वेल्डिंग करायला सांगितले.
मग घरी परत येऊन माळ्यावर एक जुनी आजोबांच्या काळची पैशांची पेटी (कॅश बॉक्स) पडली होती, ती काढून आणली.
पेटी जड होती. तिला दोन कुलुप होती. ती उघडून त्यांत तो डबा ठेवला व पुन्हा पेटी कुलुपबंद केली.
एवढं झाल्यावर मी पत्नीला हांक मारली व त्या पेटीत काय आहे ते सांगितले आणि म्हणालो, “बाहेर गेलो की ह्या चाव्या मी आता नदीत फेकून देणार आहे.”
माझी पत्नी माझ्याकडे कुतुहलाने पहात होती. माझ्या वागण्याचा अर्थ तिला समजत होता.
तिच्या चेहऱ्यावर किंचित आनंद परतताना दिसत होता.
ती म्हणाली, “ह्यावर आणखी लाखेच सील वगैरे लावूया कां ?”
मी म्हणालो, “नको. कोणी हे फोडायचा प्रयत्न करेल असं मला वाटत नाही.
तुझ्याशिवाय ह्यात काय आहे, हे कुणालाही माहित नाही आणि कोणी ही जड पेटी फोडून उघडायचा प्रयत्न करणार नाही.
पुढे आपल्या मुलाला कधीतरी ते समजेल.
मी तोपर्यंत या जगात बहुदा नसेन.
त्यावेळी जर मुलाने ही पेटी फोडून ते हस्तलिखित बाहेर काढलं आणि ही कथा प्रसिध्द केली तर कांहीच हरकत नाही.
कारण मग मला जी प्रसिध्दी मिळेल ती तितक्याच चांगल्या गोष्टी लिहून टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर असणार नाही.”
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – हीज वाईव्हज डिसीजड् सिस्टर
मूळ लेखक – फ्रँक स्टॉकटन.
तळटीप: असे अनेक कलाकार, साहित्यिक, सिने दिग्दर्शक, चित्रकार होऊन गेले की ज्यांची एखादी निर्मिती लोकांनी डोक्यावर घेतली व पुढे तो तशीच उत्तम निर्मिती न केल्यामुळे नामशेष झाला. कांही “वन फील्म वंडर” नट, दिग्दर्शक होऊन गेले. लेखकाने ही गोष्ट ह्याचा उपहास करण्यासाठी लिहिली आहे. सारखीच उच्च दर्जाच्या निर्मितीची अपेक्षा चुकीची आहे, हे त्याला सांगायचं आहे. “लेडी आॕर टायगर” (वाघ की सुंदरी) ही
पूर्वी आलेली कथा फ्रँक स्टॉकटनचीच आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..