नवीन लेखन...

वैज्ञानिक वानर (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३)

एका जंगलात अत्यंत घनदाट झाडीमध्ये खूप एप जातीचे वानर रहात होते.
त्या झाडांच्या मध्ये एक घर होते.
त्या घरांत विच्छेदन करून प्रयोग करणारा एक वैज्ञानिक रहात होता.
एकदा अपघाताने एक वानर त्या वैज्ञानिकाच्या हाती लागला आणि त्याने त्याला नेऊन आपल्या प्रयोगशाळेतील पिंजऱ्यांत ठेवला.
तो वानर तिथे चालणाऱ्या गोष्टी पाहून खूप घाबरला परंतु तिथे त्याला जे ऐकायला मिळत होते त्यांत त्याला खूप रस निर्माण झाला.
शिवाय त्याला प्रयोगशाळेच्या आपल्या प्रयोगातून (प्रयोग क्रमांक ७०१मधून) लौकरच निसटतां आलं व फक्त एक पाय किंचित अधू होण्यावर निभावलं.
ह्यामुळे ती घटना त्या वानराला एकंदरीत फायद्याचीच वाटू लागली.

तो कळपात परत येताच स्वत:ला डाॅक्टर म्हणवून घेऊ लागला आणि सर्व शेजाऱ्यांना एकच प्रश्न विचारून हैराण करू लागला, “आपण एप वानरे प्रगतिशील कां नाही ?”
एक वानर म्हणाला, “प्रगतीशील म्हणजे काय मला नाही कळत” आणि त्याने एक नारळ तोडून आपल्या आईकडे फेकला.
“मलाही कांही माहिती नाही आणि मी त्याची फिकीरही करत नाही.”
दुसरा वानर म्हणाला आणि एक मोठा झोका घेऊन तो जवळच्या दुसऱ्या झाडावर गेला.
“बंद कर हा मूर्खपणा,” तिसरा ओरडला.
“बोडक्याची प्रगती !” टोळीचा बलदंड, शिस्तप्रिय आणि कडक प्रमुख म्हणाला, “त्यापेक्षा आतां वागतां त्यापेक्षा जरा नीट वागायला शिका.”

पण जेव्हां वैज्ञानिक वानराला टोळीतले तरूण नर एकटे भेटत, तेव्हां ते त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत.
“माणूस हा एप वानरापासूनच प्रगत झाला आहे.”
तो एखाद्या उंच फांदीवर बसून आपली शेपूट हलवत म्हणे.
“उत्क्रांतीचा इतिहास नीट लिहिलेला नसल्याने त्यासाठी किती वर्षे लागली हे सांगतां येत नाही आणि आपल्यालाही त्याची वाट अनुसरायला किती वेळ लागेल माहित नाही.
परंतु माझ्या ज्ञानाने मी जी पध्दत निर्माण करतोय त्यांत स्वत:ला जोरदारपणे झोंकून देऊन मी सर्वांना चकित करेन, ह्याची मला खात्री आहे.
माणसाने प्रगती करण्याऐवजी अनेक वर्षे धर्म, नीती, काव्य, इ. सटरफटर गोष्टींवर खूप वेळ वांया घालवला.
शुध्द विज्ञानापर्यंत पोंचायला त्याला अनेक शतके लागली आणि आता अगदी अलिकडेच तो विच्छेदन करून ज्ञान मिळवू लागलाय.
आपण त्याच्या उलट करू आणि विच्छेदनापासूनच सुरूवात करू.”
यावर एक वानर म्हणाला, “आणि नारळाची शपथ घेऊन सांग की विच्छेदन म्हणजे काय ?”
डॉक्टरने प्रयोगशाळेंत पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींवरून परिश्रमपूर्वक विच्छेदन म्हणजे काय ह्याचे स्पष्टीकरण केले. त्याने त्याचे कांही श्रोते भारावून गेले पण सर्व नाही.

“मी असं भयानक पशुवत वर्तन कधी ऐकलं नव्हतं,”
आपल्या आत्याबरोबरच्या भांडणात कान गमावून बसलेला एक वानर म्हणाला.
दुसऱ्याने विचारले, “आणि ह्यापासून फायदा काय ?”
“तुझ्या लक्षांत येत नाही ?”
डॉक्टरने विचारले, “माणसाचे विच्छेदन करून आपण पाहू की एप वानर कसे बनतात आणि मग प्रगति करू.”
“पण आपण एकमेकांचच विच्छेदन कां नाही करून पहायचं ?”
त्याच्या दुसऱ्या एका वादपटु शिष्य वानराने विचारलं !
“चुप हो. मी इथे बसून असं बोलणं ऐकून घेणार नाही.
निदान सर्वांसमोर तर नाहीच.”
डॉक्टर त्याच्यावर डाफरला.
“निदान गुन्हेगारांवर प्रयोग करायला काय हरकत आहे ?” वादपटुने विचारलं.
“योग्य आणि अयोग्य (वर्तन) ही कल्पनाच आधी संशयास्पद आहे.
मग तुझे गुन्हेगार कुठे राहिले ?”
डॉक्टरने उत्तर दिले.

डॉक्टर पुढे म्हणाला, “आणि जनता हे मान्य करणार नाही. शिवाय मानव तसेच आहेत. त्यांचे व आपले जीन्स समानच आहेत.”
“माणसावर असा प्रयोग करणं अन्याय आहे.” एक कान गमावलेला वानर म्हणाला.
“सुरूवातीला हे लक्षांत घ्या की माणसाच्या मते आपल्याला कांही त्रास सहन करावा लागत नाही आणि आपण आत्मकेंद्रीत आहोत.”
डॉक्टर सांगू लागला, “मग मलाही त्यांच्याबद्दल तेच म्हणण्याचा अधिकार आहे.”
“हा निव्वळ मूर्खपणा आहे.” वादपटु म्हणाला, “शिवाय हा आत्मघातकी विचार आहे.
ते जर आत्मकेंद्रीत असतील तर ते आपल्याला आपल्याबद्दल कांही शिकवू शकणार नाहीत आणि ते आपल्याबद्दल काही शिकवू शकत नसतील तर नारळाशपथ, त्यांना त्रास भोगू दे.”
“माझाही विचार बराचसा तुझ्या सारखा आहे.”
डॉक्टर म्हणाला, “आणि हे तत्त्व फक्त मासिकांतून छापायला योग्य आहे.
ठीक आहे, मान्य की माणूस त्रास भोगतो. पण तो एखाद्या कनिष्ठ प्रजातीसाठी असा त्रास भोगायला तयार असला तर ते न्याय्य ठरेल.
जे त्यांना स्वत:लाही खूप उपयोगी पडतील, असे शोध आपण नक्कीच लावू हे संशयातीत आहे.”

वादपटु म्हणाला, “पण जिथे काय शोधायचे हेंच आपल्याला ठाऊक नाही तिथे आपण संशोधन कसले करणार आहोत ?”
“देव माझ्या शेपटाचे रक्षण करो.”
डॉक्टर प्रथमच आपली प्रतिष्ठा सोडून ओरडला, “मला वाटते, ह्या बेटावर सर्वांत अवैज्ञानिक मेंदू असलेला वानर तूच असशील.
काय शोधायचं हे माहीत असणं ?
खऱ्या विज्ञानाला त्याच्याशी कांही देणं घेणं नसतं.
तुम्ही फक्त विच्छेदन करत रहातां आणि दैवयोगाने तुम्हाला एखादा शोध लागला तर तुम्हीही इतरांसारखेच आश्चर्यचकीत होतां !”
वादपटु म्हणाला, “मला ह्यांत आणिक एक अडचण दिसत्येय.
मी मान्य करतो की माणसाचे विच्छेदन करून पहाणं मलाही खूप मौजेच वाटतयं !
पण माणूस खूप बलवान आहे.
त्याच्याकडे बंदूकही असते.”
“आणि म्हणूनच आपण
माणसाची बाळं प्रयोगाला आणायची” डॉक्टरने वादाचा निष्कर्षच जाहिर केला.

त्या दिवशी दुपारीच डॉक्टर वैज्ञानिकाच्या बागेत जाऊन घरात शिरून खिडकीतून दोन वस्तरे पळवून घेऊन आला.
दुसऱ्याच फेरीत पाळण्यातलं बाळही उचलून आणण्यात यशस्वी झाला.
झाडांच्या माथ्यावर बरंच कांही करण्यासारखं होतं.
एक कानवाल्या वानराने, जो स्वभावत: दयाळू होता, बाळाला हातात घेऊन जोजवायला सुरूवात केली तर दुसऱ्याने बाळाच्या तोंडात दाणे कोंबले.
बाळ दाणे खात कां नाही ह्याचे त्याला आश्चर्य वाटत होते.
तो रागावून म्हणाला, “बाळाला अक्कलच नाही.”
एक कानवाला म्हणाला, “पण मला वाटतय बाळाने रडावे. ते असे अगदी वानरासारखेच वाटते आहे.”
“हा सर्व बालिशपणा आहे,”
डॉक्टर म्हणाला, “आणा तो वस्तरा इकडे.”
पण हे शब्द ऐकताच सुस्वभावी एक कानवाल्याचे हृदय कळवळले आणि तो डॉक्टरवर थुंकला.
बाळाला घेऊन पळाला आणि जवळच्या दुसऱ्या झाडावर उंच फांदीवर जाऊन बसला.
तिथून तो ओरडला, “स्वतःचं विच्छेदन करून घे.”

ह्या शब्दांनी वानरांच्यात एकच कलकलाट माजला.
ते एकमेकांचा पाठलाग करत चीत्कारू लागले.
त्या आवाजाने जवळपासच माशा मारत बसलेल्या प्रमुखाला तिथे यावे लागले.
तो ओरडला, “हे काय चाललंय ?”
जेव्हां काय झालंय हे वानरांनी त्याला सांगितले, तेव्हां त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि तो पुन्हां ओरडला, “नारळाची शपथ ! हे खरं ऐकतोय मी की हे स्वप्न आहे ? वानर इतके खालच्या पातळीवर येऊन जंगली बनू शकतात ? त्या बाळाला जिथून आणलं तिथे नेऊन ठेवा, जा.”
डॉक्टर म्हणाला, “वैज्ञानिक विचार समजण्याची तुझी कुवत नाही.”
प्रमुखाने उत्तर दिले, “वैज्ञानिक विचार करणारे मन मला आहे की नाही, हे मला ठाऊक नाही पण माझ्याकडे एक जाडजूड काठी आहे.
तू आपले नख जरी बाळाला लावलेस तर त्या काठीने तुझे डोकेच फोडीन.”
मग त्यांनी ते बाळ नेऊन त्या बागेत वैज्ञानिकाच्या नजरेस पडेल असे ठेवले.
तो शरीरविच्छेदक वैज्ञानिक एक मायाळू गृहस्थ होता.
बाळ परत आल्याने त्याला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरांत तो दिवस संपण्यापूर्वीच त्याने तीन नवे विच्छेदनाचे प्रयोग सुरू केले.
– अरविंद खानोलकर.
मूळ कथा : द सायंटीफीक एप
लेखक : रॉबर्ट एल. स्टीव्हनसन (१८५०-१८९४)

*तळटीप:*
स्टीव्हनसनचे वाङ्मय खूप प्रसिध्द आहे. डाॅक्टर जेकील आणि हाईड ही त्याची दीर्घकथा सर्व वाचकांच्या व सिनेरसिकांच्या परिचयाची आहे. अवघ्या ४४ वर्षांच्या (आतापर्यंतचे तीनही लेखक ॲास्कर वाईल्ड ४६, अँटन चेकॉव्ह ४४ आणि स्टीव्हनसन ४४ अल्पवयीच म्हणायचे) आंतच चौदा कादंबऱ्या आणि सहा कथासंग्रह लिहिले.
त्याने अरेबियन नाईटस् या नांवाखाली युरोपबद्दल सुरस कथा लिहिल्या. ट्रेझर आयलँड ही त्याची कादंबरीही प्रसिध्द आहे.

स्टीव्हनसनच्या बहुतेक कथा ह्या दीर्घकथाच आहेत. कथांमध्ये घटना असतात, तपशीलही बराच आढळतो.
पण त्याचबरोबर त्या मानवी जीवनाचं मर्म, उणीवा, इ. वर बरोबर बोट ठेवतात. द सायंटीफीक एप ही कथा मात्र वेगळीच आहे. ही त्याची सर्वांत लहान कथा आणि वेगळ्याच धाटणीची. ह्यांत घटना जवळजवळ नाहीतच. पण त्या काळच्या मानवी जीवनावर केवढे मोठ भाष्य केलेलं आहे. ही कथा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दहा वर्षांतली आहे. अनेक वैज्ञानिक शोध अजून लागायचे आहेत. पण ते लागणार हे क्षितिजावर दिसू लागलं आहे.
सायंटीफीक दृष्टीकोन दृढ होत आहे. पण त्या बरोबरच विज्ञानामुळे माणसाचं वागणं बदलत आहे. मानव विज्ञानाच्या नादांत नीती विसरेल की काय अशी भीती वाटते आहे. महायुध्दं अजून व्हायची आहेत. विमाने अजून यायची आहेत. ग्रामोफोन, टेलीफोन येऊ घातलेत. अशा काळांत ही गोष्ट लिहिली आहे. सायंटीफीक मनाने वानरांमधील एकी हरवेल, प्रेम हरवेल, अशी भीती त्याच्या प्रमुखांना वाटते. निरागस वानरांनी मानवासारखं पशुवत न जगतां वानरच रहावं असं तो सांगतो. हा मानवजातीला इशारा आहे. विज्ञानापायी मानव काय हरवून बसणार आहे ह्याची झलक आहे. माणसाची विसाव्या शतकांतील वाटचाल पहातां ही भीती अनाठायी नव्हती हेच दिसतं.
आजही सामान्य मानव आर्टीफीशीयल इंटलीजन्स आपल्या जीवनावर काय परिणाम करेल या बाबत साशंक आहे. विज्ञानाने माणसाला रोगराईपासून बरेच मुक्त केले, आयुष्याची लांबी वाढवली. परंतु माणसं मनाने एकमेकांपासून दूर जाताहेत. नैराश्याचं, व्यसनांच प्रमाण वाढते आहे. कौटुंबिक जीवनाची परिभाषाच बदलते आहे. गरीब व श्रीमंत यामधील दरी वाढते आहे. आर्टीफीशीयल इंटलीजन्स सेवेला आल्यावर किती रोजगार कमी होणार आहेत ? संपत्ती निर्माण तर होईल पण कांही लोक सोडले तर बहुतांश लोकांना सरकारी मदतीवर कमी प्रतीचे जीवन जगावे लागेल ? आजपर्यंत प्रगति करू न शकलेले देश जलद प्रगती करून इतरांच्या बरोबर येऊ शकतील ? त्यांना येऊ दिलं जाईल ? असे अनेक प्रश्न ही कथा वाचून मनापुढे उभे रहातात. काळच त्यांचे उत्तर देईल.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..