नवीन लेखन...

शेवटचं पान (संक्षिप्त रूपांतरीत कथा २९)

शिमला आणि मनाली ह्यामधे कुलू येतं.
पर्वतराजी आणि आजूबाजूच्या प्रदेशाची चित्रें रेखाटू इच्छिणारे अनेक चित्रकार तिथे कांही काळ स्थायिक होतात.
हॉटेलात दीर्घ काळ रहाणं त्यांच्या किंमतीमुळे केवळ अशक्य असतं.
तशातच ह्यांतल्या अनेक चित्रकारांच अजून नाव झालेलं नसतं.
त्यांच्या चित्रांना हवा तसा मोबदलाही मिळत नाही.
तेव्हां तिथे भाड्याने घर घेऊन रहाणं हा एकच मार्ग चित्रकारांसमोर असतो.
एका भागांतली बरीच छोटी छोटी एकमजली, दुमजली घरं अशी भाड्याने दिली होती.
त्याला पेंटर मोहल्ला असें म्हणत.
पेंटर मोहोल्ल्यांत एक दोन मजली घरं होतं.
सुनिता आणि ज्योती ह्यांनी त्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आपला मुक्काम केला होता.
सुनिता आणि ज्योती ह्यांची ओळख दिल्लीत एक चित्रप्रदर्शन पहातांना झाली होती.
सुनिता बंगाली होती तर ज्योती पंजाबी.
पण चित्रकलेच्या समान धाग्याने त्यांना जणू बहिणीच बनवल्या होत्या.
मग दोघींनी सिमला-कुलू-मनाली ह्या भागांत मनसोक्त चित्रं काढायचा बेत दोघींनी आंखला होता.
शेवटी ह्या परवडणाऱ्या ठिकाणी येऊन त्या राहिल्या होत्या.
तेव्हां मे महिना होता.
एक वर्ष राहून सर्व ऋतुंत हिमालयाची चित्रे काढायचा त्यांचा विचार होता.
१९८९च्या नोव्हेंबर महिन्यात एक नवाच फ्लू नावाचा आजार सर्व जगभर, विशेषतः जिथे जिथे ब्रिटीश वसाहती होत्या, त्यांतून पसरला.
डॉक्टर त्याला न्युमोनिया म्हणत.
आपल्या बर्फाळ थंड हातांनी इथे एकाला तर तिथे दुसऱ्याला स्पर्श करत तो जगभर फिरू लागला.
विशेषतः पूर्वेकडल्या देशांत शेकडो लोकांचा त्याने बळी घेतला.
तो हलकेच हिरव्या गार गवतांतून सिमला-कुलू भागांतही पोहोचला.
न्युमोनिया हा कांही दयाळू आणि उदार अंतःकरण असलेला नव्हता.
नाहीतर छोट्या चणीच्या नाजूक सुनिताला त्याने कसा स्पर्श केला असता ?
पण त्या दुष्टाने सुनिताला पकडले.
सुनिता आपल्या पलंगावर पडून बाजूच्याच खिडकीतून बाहेर समोरच्या विटांच्या घराकडे पहात झोपून राहू लागली.
अगदी क्वचितच ती हालचाल करत असे.
आपल्या कामांत खूप व्यग्र असणारे डॉक्टर खन्ना एका सकाळी सुनिताला तपासायला आले.
परत जातांना ज्योतीला बाजूला नेऊन म्हणाले, “ही वांचण्याची फक्त दहा टक्के शक्यता मी देईन.”
थर्मामीटर झटकत डॉक्टर पुढे म्हणाले, “हे असे रोगी आमच्या वैद्यकीय शास्त्राला निकामी ठरवतात.
असे मरणाची वाट पहाणारे रोगी काय उपयोगाचे !
तुझी मैत्रिण जगण्याची इच्छा हरवून बसली आहे.
आपण ह्यांतून बरी होणारच नाही, असं ती मनाशी धरून बसली आहे.
तिच्या मनावर कांही दडपण आहे कां ?”
“नाही. ती म्हणत असे की तिला एकदा कैलास पर्वतावरील मानस सरोवराचे चित्र रंगवायचे आहे.”
“चित्रण ! तें करू द्या तिला.
कुणी पुरूष किंवा कांही प्रेम वगैरेमुळे कसले दडपण मनावर आहे कां ?”
ज्योती म्हणाली, “पुरूष ? प्रेम करण्याच्या लायकीचे पुरूष कुठे भेटतात ? तें असो.
पण सुनिताचं असं कांही नाही.”
“मग फक्त अशक्तपणा आहे.
हे बघ, ज्योती, मी माझे संपूर्ण वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य पणाला लावून तिला औषधांनी बरी करायचा प्रयत्न करीन.
जेव्हा आजारी व्यक्तीच आपल्या शवयात्रेची कल्पना करू लागते, तेव्हा डाॅक्टर हतबल होतो.
तू जर तिला हिवाळ्यानंतरच्या दिवसांबद्दल बोलायला लावशील तर मी तिच्या जगण्याची शक्यता दहा टक्क्यांवरून पन्नासावर नेईन.”
डॉक्टर गेल्यानंतर ज्योती आपल्या खोलीत गेली व खूप रडली.
मग तिने आपला चित्र काढण्याचा बोर्ड उचलला व उसने अवसान आणून एक गाणं गुणगुणत, ती सुनिताच्या खोलीत आली.
सुनिता खिडकीकडे तोंड करून स्तब्ध पडलेली होती.
ज्योतीला वाटले ती झोपली असावी.
तिला जाग येऊ नये म्हणून तिने आपले गुणगुणणे आवरते घेतले.
बोर्ड मांडून ती एक चित्र काढू लागली.
ती एका कथेसाठी चित्र काढत होती.
कथांबरोबर अशी चित्रे दिली की कथाकारांना अधिक प्रसिध्दी मिळते.
ती एका घोड्यावर स्वार झालेल्या लढवय्या नायकाचं चित्र काढत असतांना तिला एक हलका आवाज दोन तीनदा ऐकू आला.
ती सुनिताजवळ गेली.
सुनिताचे डोळे सताड उघडे होते आणि खिडकीबाहेर पहात ती कांही तरी उलट मोजत होती.
“बारा” ती म्हणाली.
आणखी थोड्या वेळाने म्हणाली, “अकरा”.
त्यानंतर दहा, नऊ, आठ, सात” जवळजवळ एकाच दमात म्हणाली.
ज्योतीने खिडकीतून बाहेर पाहिलं.
पहाण्यासारखं तिथे कांही नव्हतंच आणि मोजण्यासारखं तर नव्हतंच.
तिथून सुमारे वीस फुटांवर समोरच्या घराच्या कुंपणाची भिंत दिसत होती.
बाकी सगळं ओसाड होतं.
त्या भिंतीच्या आधाराने तिच्यावर वाढत गेलेल्या एका वेलीच्या शुष्क फांद्या अगदी त्या भिंतीलगत चिकटलेल्या दिसत होत्या.
वेलीचं मूळही जमिनीच्या आधाराने अजून तग धरून होतं.
परंतु वेलीवरची बहुतेक पाने ह्या हिवाळ्यांतल्या जोरदार वाऱ्यांनी पाडली होती.
ज्योतीने सुनिताला विचारले,
“काय पहाते आहेस, सुनिता ?”
सुनिता कुजबुजल्यागत उद्गारली,
“सहा. आता ती भराभर पडताहेत.
तीन दिवसांपूर्वी सुमारे शंभर तरी होती.
मोजतां मोजता माझे डोके दुखू लागले होते.
आता ती मोजणे सोपे आहे.
ते बघ आणखी एक पडलं.
आता फक्त पांच राहिली.”
“काय पाच सुनिता ?”
“अग, त्या समोरच्या वेलीची पाने. त्यातलं शेवटचं पडलं की मीही जाणार.
गेले तीन दिवस मला हे लक्षांत आलंय.
डाॅक्टरनी सांगितलं नाही तुला ?”
ज्योती मोठ्या बहिणीचा आव आणून ओरडली, “छे: ! कांहीतरी बेवकूफी.
मी कधी असं ऐकलं नाही.
त्या पानांचा तुझ्या बरं होण्याशी काय संबंध ?
तुला तर ती वेल खूप आवडायची !
असे कांहीतरी विचार करू नकोस.
डॉक्टर मला म्हणाले की तू वाचण्याची खूप शक्यता आहे.
आपण मोठ्या शहरांत उलट सुलट जाणाऱ्या वाहतुकीच्या मधून रस्ता ओलांडताना आपण वाचण्याची जेवढी शक्यता असते, तेवढीच शक्यता तुला बरं व्हायची आहे.
आता थोडी गरमगरम पेज देते, ती घे आणि मला माझं चित्र पुरे करायला जाऊ दे.
हे चित्र पोंचलं की संपादक आपल्याला पैसे पाठवेल.
मग तुझ्यासाठी थोडी वाईन आणि मला माझ्या आवडीचे मटन चाॅप खायला आणिन.”
सुनिता म्हणाली, “माझ्यासाठी वाईन आणायची आता जरूरी नाही.
तें बघ, आणखी एक पान पडलं.
नको मला पेजही नको.
आता फक्त चार राहिली.
जाण्यापूर्वी मला तें शेवटचं पान पडतांना पहायचं आहे.
ते पडलं की मीही कायमची अंधारात जाईन.”
ज्योती तिच्यावर ओठंगून म्हणाली, “सुनिता, मला वचन दे बघू.
आतां तू डोळे बंद ठेवशील आणि खिडकीबाहेर बघत रहाणार नाहीस.
मला आता थोडं काम करायचं आहे.
ती चित्र उद्यापर्यंत पाठवली पाहिजेत.
नाहीतर मी खिडकीचा पडदा लावून टाकला असता.”
सुनिता म्हणाली, “तू तुझ्या खोलीत जाऊन काम करशील कां ?”
ज्योती म्हणाली, “नाही. मला तुझ्याजवळ थांबायचय आणि तुला ती फुटकळ पानंही पाहू द्यायची नाहीत.”
“तुझं झालं की मला सांग.”
सुनिता डोळे मिटत म्हणाली.
ती एखाद्या तांबूस पुतळ्यासारखी पलंगावर पडली होती.
“मला ते शेवटचं पान पडतांना पहायचं आहे.
मी ते पडण्याची वाट पाहून थकले आहे,
विचार करून थकले आहे.
तें शेवटचे पान वाऱ्यावर कसें भिरभिरत खाली येईल.
मीही तशीच त्या थकलेल्या पानासारखी भिरभिरत हळूवार खोल, खोल अंधारात जाईन.”
ज्योती म्हणाली, “झोप आतां.
मला आता खालच्या खोलीतल्या बेहरामला मॉडेल म्हणून बोलवायला हवं.
मला एका म्हाताऱ्या खाणकामगाराचं चित्र मासिकाला पाठवायचय.
मी दोन मिनिटात परत येते.
तोपर्यंत उठायचा प्रयत्न करू नकोस.”
म्हातारा बेहराम वाडिया सुध्दा चित्रकार होता.
तो त्याच इमारतीत तळमजल्यावर रहात असे.
त्याचं वय साठाहून जास्त होतं.
त्याने वाढवलेली दाढी एखाद्या महर्षीसारखी छातीपर्यंत लोंबत होती.
बेहराम चित्रकार म्हणून अयशस्वी ठरला होता.
चाळीस वर्षे त्याच्या हातात ब्रश होता पण त्याची कमाई त्याला महिना काढायला सुध्दा अपुरी असे.
त्याची इच्छा नेहमी एक सर्वोत्कृष्ट चित्र काढण्याची असे परंतु अजून त्याच्या हातून त्या सर्वोत्कृष्ट चित्राची सुरूवातच होत नव्हती.
अनेक वर्ष अधूनमधून जाहिरातीसाठी एखाद दोन चित्रे काढण्यापलिकडे त्याची मजल जात नसे.
ज्या चित्रकारांना व्यावसायिक मॉडेलचे मानधन परवडत नसे त्यांच्यासाठी मॉडेल म्हणून काम करून तो पैसे मिळवत असे.
तो त्याचे आवडते मद्य रोज पीत असे.
इतरवेळी मात्र तो भडक डोक्याचा होता आणि ज्याच्या त्याच्यावर खेंकसत असे.
सुनिता व ज्योती ह्या दोघींच पालकत्व मात्र त्याने स्वतःच स्वतःकडे घेतलं होतं आणि त्यांचा संरक्षक असल्यासारखा तो वागे.
अंगाला मद्याचा वास असलेला बेहराम हलकासा उजेड असलेल्या तळमजल्यावरच्या त्याच्या मठीतील स्टुडीओत भेटला.
त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्राची २५ वर्षे वाट पहात असलेला बोर्ड कोऱ्या कॅनव्हाससह खोलीच्या एका कोंपऱ्यांत उभा होता.
अजून त्याच्यावर पहिली रेषा पण काढली नव्हती.
सुनिताने मनाशी घेतलेलं वेड आणि तीची पानासारखी भिरभिरत खोल जाण्याची भीती ह्याबद्दल ज्योतीने त्याला सांगितलं.
म्हाताऱ्या बेहरामचे डोळे लाल लाल झाले व तो अशा मूर्ख कल्पनेबद्दलच्या तिरस्काराने ओरडला, “काय ? जगात असेही पागल लोक आहेत की ज्यांना वाटतं त्या फालतु वेलीची पाने पडल्यामुळे मरण येणार आहे !
मी कधी असली गोष्ट ऐकलेली नाही.
तुझ्या चित्रासाठी मी मॉडेल म्हणून येऊन तुझ्या पागल मैत्रीणीला मदत करणार नाही.
बिच्चाऱ्या न्हान्या छोकरीच्या मनांत असला भेदरटपणा तू येऊच कसा देतेस ?”
ज्योती म्हणाली, “ती खूप आजारी आहे आणि अशक्त झाली आहे.
तिच्या सततच्या तापाने तिचं मन सैरभैर झालंय आणि वाईट-साईट कल्पना तिच्या मनांत येतात.
बरं, मिस्टर बेहराम, तुम्ही मॉडेल म्हणून येणार नसेल तर राहू दे.
पण मी सांगू ?
तुम्ही काळीज नसलेले फक्त एक नंबरचे चमत्कारीक बाताडे आहांत.”
“तू पण पगली, येडी डिकरी आहेस,” बेहराम ओरडला, “कोण म्हणतं मी मॉडेलिंग करणार नाही तुझ्यासाठी ?
गेला हाफ अवर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय की मी तुझ्यासाठी मॉडेल म्हणून काम करेल !
ओ गॉड, सुनिता सारख्या एवढ्या चांगल्या डीकरीला बिमार पाडायची ही जागा आहे काय ?
काळजी करू नकोस.
एक दिवस मी माझं सर्वोत्कृष्ट चित्र काढीन मग आपल्याकडे खूप ‘मनी’ येईल.
मग आपण सर्व इथून जाऊ.”
ती दोघं वर गेली तेव्हां सुनिता गाढ झोपली होती.
सुनिताने खिडकीचा पडदा बंद केला व हाताने बेहरामला दुसऱ्या खोलीत यायला खूण केली.
बाजूच्या खोलीच्या खिडकीतून दोघांनी एक भयभीत नजर त्या वेलीवर टाकली.
मग दोघांनी एकमेकांकडे न बोलतां क्षणभर पाहिलं.
सतत पावसाच्या थंड धारा वर्षत होत्या आणि मधे मधे बर्फही पडत होता.
म्हातारा बेहराम एका मोडवर, जणू एखाद्या दगडावर टेकून म्हातारा खाण कामगार बसला आहे, अशी पोज घेऊन बसला.
एका तासाच्या झोपेनंतर ज्योती जेव्हा दुसऱ्या दिवशी जागी झाली तेव्हा तिला खिडकीच्या हिरव्या पडद्याकडे सुनिता आपली खोल गेलेली नजर लावून बसलेली दिसली.
ज्योती उठलेली दिसताच ती हलक्या पण हुकमी आवाजात म्हणाली,
“उघड तो पडदा. मला पहायचंय.”
ज्योतीने नाराजी दाखवतच तो पडदा बाजूला केला.
पण काय आश्चर्य !
त्या काळरात्री झोडपणारा पाऊस आणि वादळी वारा ह्यांना तोंड देऊन सुध्दा त्या वेलीचे भितीलगतचं एक पान अजून टिकून होतं.
ते वेलीवरचं शेवटचं पान होतं.
त्याच्या देठाजवळ ते अजूनही गडद हिरवं होतं.
त्या जून व विरलेल्या पानाच्या कडा पिवळसर दिसत होत्या पण ते फांदीला धीटपणे घट्ट चिकटून उभं होतं.
सुनिता पुटपुटली, “हे शेवटचं पान आहे.
मला वाटलं होतं की रात्रीच पडलं असेल.
मी वाऱ्याचा आवाज ऐकला.
आता ते आज पडेल.
त्याच वेळी मी पण जग सोडून जाईन.”
ज्योती सुनिताची उशी नीट करत म्हणाली,
“अग, माझ्या प्रिय सखये, कांहीतरी माझा विचार कर.
तू अशी गेलीस तर माझं काय होईल ? मी काय करू ?”
सुनिताने उत्तर दिलं नाही.
जेव्हा माणसाचा आत्मा दूरच्या अनोख्या सफरीवर निघायची तयारी करत असतो, तेव्हा तो अगदी एकाकी असतो.
मनातल्या त्या विचारांनी तिची इतकी पकड घेतली होती की केवळ मैत्रीचेच नव्हे तर एक एक करून सगळेच बंध हळूहळू गळून पडत होते.
दिवस ढळला, संध्याकाळ झाली तरी ते एकाकी पान फांदीला लगटलेल्या आपल्या देठानिशी भिंतीलगत दिसत होते.
पुन्हा त्या रात्रीही उत्तरेकडून येणारा वारा घोंघावतांना ऐकू येत होता.
पाऊस खिडकीवर थडथडत होता.
वरच्या छोट्या पट्टीतूनही पाणी आत शिरत होतं.
जेव्हां सकाळी पुरेसा उजेड आला तेव्हा कठोरपणे सुनिताने ज्योतीला पडदा दूर करायला सांगितले.
त्या वेलीवरचे ते पान अजून तिथेच होते.
सुनिता बराच वेळ त्या पानाकडे पहात राहिली.
ज्योती आत स्टोवर चिकन सूप तयार करत होती.
सुनिताने तिला हांक मारली.
ती येताच सुनिता म्हणाली, “मी वाईट वागले.
मी कशी दुष्टपणा करत होते हे दाखवण्यासाठीच कशाने तरी ते पान तिथेच राहिले आहे.
मरावसं वाटणं, हे पाप आहे.
हे आता मला उमगलं.
मला सूप आणि पेज दे.
मी घेईन थोडं, थोडं.”
थोडं थांबून ती म्हणाली, “नंतर थोडं दूधही दे, त्यांत थोडा मध घालून आणि जरा उशा लावतेस इथे म्हणजे मी बसेन आणि तुला काम करतांना पाहू शकेन.”
एका तासानंतर सुनिता म्हणाली, “ज्योती, मला आशा आहे की मी कधीतरी मानस सरोवराचे रम्य चित्रण करीन.”
दुपारी डॉक्टर खन्ना आले आणि त्यांनी सुनिताला तपासले.
डॉक्टरांना सोडायला ज्योती बरोबर गेली.
डॉक्टर तिचा हात हलकेच थोपटत म्हणाले, “आता ती वांचण्याची पन्नास टक्के शक्यता आहे.
तिची योग्य काळजी घे, तू ही लढाई जिंकशील.
मला आता जायला पाहिजे.
तळमजल्यावर दुसरा पेशंट बघायचाय.
कोणी बेहराम वाडिया नांवाचा चित्रकार आहे म्हणे.
बहुदा त्यालाही न्यूमोनिया झालाय.
तो म्हातारा आणि अशक्त आहे आणि त्याला आलेला तापाचा झटका जबर आहे.
तो वाचण्याची कांही आशा नाही पण आज त्याला हाॅस्पिटलमधे हलवतो आहोत.
तिथे त्याला थोडा आराम तरी मिळेल.”
दुसऱ्या दिवशी सुनिताला तपासतांना डॉक्टर ज्योतीला म्हणाले, “आता हिला धोका नाही. तू जिंकलीस.
आता फक्त चांगला आहार व थोडं लक्ष ठेव. तेवढं पुरे आहे.”
दुपारी सुनिता पलंगावर पडली होती तिथे ज्योती आली.
सुनिता एक निळा स्कार्फ उगाचच विणत होती.
सुनिताभोवती हात लपेटत ज्योती म्हणाली, “सुनिता, ससुली, मला तुला कांही सांगायचंय !
मिस्टर बेहराम आज हॉस्पिटलांत मरण पावला.
तो फक्त दोनच दिवस आजारी होता.
गुरख्याने पहिल्या दिवशी तळमजल्यावरच्या खोलीत त्याला तापाने फणफणलेला आणि वेदनांनी तळमळत असलेला पाहिला.
त्याचे बूट भिजलेले होते.
त्याचे कपडे ओले होते.
त्यातून पाणी निथळतं होतं.
सगळं अगदी बर्फासारखं थंडगार होतं.
त्यांना कल्पना येईना की एवढ्या वादळी पावसांत तो कुठे गेला होता ?
मग त्यांना एक शिडी वाटेत पडलेली दिसली.
जवळच एक कंदील अजूनही पेटलेलाच होता.
तिथेच ब्रश पडले होते.
रंगाची ताटली होती.
तिच्यात पिवळा आणि हिरवा रंग तयार केलेले दिसत होते.
सुनिता, जरा खिडकीतून बाहेर त्या भिंतीवरलं वेलीचं शेवटचं पान पहा.
आपल्या लक्षांत कसं नाही आलं की एवढा वारा वहात असतांना ते पान जरा देखील कसं हललं नाही ?
माझ्या प्रिय मैत्रिणी, ती बेहरामची सर्वोत्कृष्ट कलाकृती होती.
ज्या रात्री ते शेवटचं पान पडलं, त्याच रात्री तिथे जाऊन भिंतीवर त्याने ते पान रंगवलं.”
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द लास्ट लीफ्
मूळ लेखक – ओ हेन्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..