नवीन लेखन...

कविकुलगुरु कालिदास

संपूर्ण भारतात कविकुलगुरु कालिदासाचे नाव ऐकले नाही अशी सुशिक्षित व्यक्ती सापडणे मुष्किल. त्याच्या बहुतेक सर्व कलाकृती – खंडकाव्ये, महाकाव्ये, नाटके – भारतीय वाङ्मयात अजरामर आहेत. त्याच्या कलाकृतींमध्ये ऋतुसंहार व मेघदूत ही खंडकाव्ये, कुमारसंभव व रघुवंश ही महाकाव्ये, मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम् व अभिज्ञानशाकुंतलम् या नाटकांचा समावेश आहे.

दुर्दैवाने बहुतेक प्राचीन भारतीय लेखकांप्रमाणे कालिदासाच्याही व्यक्तिगत किंवा ऐतिहासिक संबंधांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. शब्दशः ‘कालिदास’ चा अर्थ “कालीचा सेवक” असा असल्याने ते एक विशेषणही होऊ शकते आणि त्यामुळे एकापेक्षा अधिक व्यक्ती स्वतःला कालिदास म्हणवून घेऊन काव्यरचनाही करू शकतात हे दृष्टीआड करून चालणार नाही.

अनेक विद्वानांनी, कालिदासांची संख्या व त्यांचा काळ याबद्दल विविध मते व्यक्त केली आहेत. त्यातील काही ठळक प्रवाह खालीलप्रमाणे आहेत.
बहुतेक सर्वांनी कालिदासाचा काल इ. स. पूर्व १५० ते इ.स. ६३४ च्या दरम्यान कोणा शककर्त्या विक्रमादित्याचा ठरविला आहे.
टी.एस.नारायणशास्त्री यांच्या मताने नऊ कालिदास होऊन गेले.

१. इ.स.पू. ६व्या शतकात उज्जैनचा राजा हर्ष विक्रमादित्य याच्या दरबारात ’मातृगुप्त’ कालिदास होऊन गेला, ज्याने सुप्रसिद्ध तीन नाटके व सेतुबंध महाकाव्य रचले.

२. इ.स.पू. ५० च्या आसपास मालव नरेश विक्रमार्क (माळवा) याच्या दरबारात ’मेधारुद्र’ कालिदास होता, ज्याने कुमारसंभव, रघुवंश व मेघदूत रचले.

३. इ.स. ४७० च्या कालखंडात कामकोटी पीठम् चे मूक शंकर यांचा शिष्य ’कोटिजीत’ कालिदास झाला, ज्याने ऋतुसंहार, शृंगारतिलक, श्यामलादंडक
इ. रचना केल्या.

४ धाराधीश मुंज चा समकालीन ’पद्मगुप्त’ कालिदास होता, ज्याने नवसाहसांकचरित काव्य रचले.

५. नलोदय काव्याचा प्रणेता ’यमककवि’ कालिदास.

६. ’चंपू भागवत’ रचणारा ’नव’ कालिदास.

७. अकबराच्या दरबारातील समस्यापूर्ति करणारा कालिदास.

८. ’लंबोदर’ प्रहसन रचणारा कालिदास.

९. ’संक्षेप शंकरविजय’ रचणारा ’माधव’ कालिदास.

दुस-या एका संशोधकांच्या मते ही संख्या तीन आहे.

या विविध अभ्यासकांनी कालिदासाच्या काळाबद्दल खालील शक्यता मांडल्या आहेत.

• शुंग घराणे – अग्निमित्र शुंगाचा आश्रित (इ.स.पू. १४९-१४१) ?

• इ.स.पू.५६ – उज्जैन येथील गुर्जर राजा विक्रमादित्याच्या पदरी ?

• गुप्त घराणे – इ.स. ३७० ते ४५० ?
यासाठी त्यांनी खालील तथ्यांचा आधार घेतला आहे.

* विख्यात बौद्ध वाङ्मय लेखक अश्वघोष रचित ’बुद्धचरित’, ’सौन्दरनंद’ व कालिदासाच्या रघुवंश व कुमारसंभवात अनेक साम्यस्थळे आहेत. अश्वघोषाच्या अनेक कल्पना कालिदासाने अधिक विस्ताराने मांडल्या आहेत. त्यामुळे कालिदासाचा काळ अश्वघोषाच्या नंतरचा असला पाहिजे.

* इ.स. ४७३ मध्ये मंदसोरचा शिलालेख लिहिणा-या वत्सभट्टीने मेघदूत व ऋतुसंहारातील श्लोकांचे अनुकरण केले आहे. त्यामुळे कालिदासाचा काळ ५व्या शतका पुढे जाऊ शकत नाही.

* इ.स. ३९० ते ३९९ च्या दरम्यान चंद्रगुप्त विक्रमादित्य दुसरा याने हूणांवर विजय मिळविला, या विजयाचे वर्णन रघुवंशात आले आहे. त्यामुळे कालिदास यानंतरच्या काळात झाला असावा.

* ऋतुसंहारमधील काही कल्पना तसेच शाकुंतलातील एका प्रसिद्ध श्लोकातील मूळ कल्पना कालिदासाने कामसूत्रातून घेतलेली दिसते. वात्सायनाचा काळ इ.स. तिस-या शतकाच्या मध्यात असल्याने, कालिदासाचा काळही त्यानंतरचा असला पाहिजे.

या सर्वांचा विचार करता कालिदासाचा काळ इ.स. ३७५ ते ४७५च्या दरम्यान असू शकतो.

म.म. वा. वि. मिराशी यांच्या मते कालिदासाचा जन्म काश्मीरमध्ये झाला. त्याच्या अनेक कृतींमध्ये हिमालय व परिसर, उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशातील अनेक स्थळांचे मनोहारी वर्णन आले आहे. उज्जैन ही त्याची अतीव प्रिय नगरी. तेथेच त्याच्या प्रतिभेचा विकास व आविष्कार, समृद्ध व ऐश्वर्यपूर्ण वातावरणात, चंद्रगुप्त विक्रमादित्य – द्वितीय च्या राजसभेतील नवरत्नांसमवेत झाला.

कालिदासाची काव्यसंपदा – खंडकाव्ये ऋतुसंहार, मेघदूत ; महाकाव्ये कुमारसंभव व रघुवंश.

ऋतुसंहार ही कालिदासाची पहिली रचना आहे. काही विद्वानांच्या मते हे काव्य कालिदासाने रचले तेव्हा त्याला राजाश्रय प्राप्त झाला नव्हता व त्याच्या काव्याचा रसास्वाद घेणारे केवळ समकालीन (इसवी कालगणनेच्या सुरुवातीच्या शतकांतील) रसिक नागरिकच होते. त्याला कोणातेही कथानक नाही. त्यामुळे त्याच्या इतर काव्यातील उच्च आशय, अभिव्यक्तीतील सौंदर्य, मानवी भावभावनांची तरलता यांचे त्यात दर्शन होत नाही. ती त्याच्या अवखळ तारुण्यातील कलाकृति आहे. मेघदूतातील माधुर्य त्यात नसेल, तरीही तो रसिकांच्या मनाला भिडण्यास समर्थ आहे. ऋतूंचे वर्णन रामायणासकट इतर काव्यांमधून आढळते. कालिदासालाही निसर्ग व ऋतुवर्णनाची मोठी आवड होती व ती त्याच्या सर्व काव्य़ांतून एक न एक ऋतूच्या वर्णनातून स्पष्ट जाणवते. रघुवंशात बहुतकरून सर्वच ऋतूंचे तर कुमारसंभवात वसंत, विक्रमोर्वशीय आणि मेघदूतात वर्षा आणि शाकुंतलात ग्रीष्माचे वर्णन आले आहे. पण केवळ ऋतूंवर लिहिलेले ऋतुसंहार हे संस्कृत भाषेतील एकमेव काव्य आहे. ऋतुसंहारात सर्व ऋतूंची तसेच अनेक वृक्ष व फुलांची वर्णने आहेत. त्याचे प्रत्येक ऋतुचा एक असे सहा सर्ग असून काही सर्गात (वर्षा) मध्य भारत, माळवा, विन्ध्य पर्वत यांचे विशेष सौंदर्यप्रकटीकरण केले आहे, तर थंडीच्या दिवसांचे वर्णन विशेषे करून उत्तर भारत व हिमालयाला लागू पडते. प्रत्येक सर्गात निसर्गाच्या मनोज्ञ वर्णनाबरोबरच त्याच्या प्रेमीजनांच्या मनोव्यापारावर पडणा-या प्रभावाचेही सुंदर चित्रण आहे. चार सर्गांची सुरुवात प्रियेच्या संबोधनाने तर शेवट रसिक श्रोत्यांना ’ हा रमणीय ऋतु आपल्या मनीच्या इच्छा पूर्ण करो, मनात नवा उत्साह निर्माण करो व विलासी सुखही देवो ’ अशा सदिच्छेने केला आहे.

मेघदूताचे सुमारे २७ मराठी अनुवाद झाले आहेत. मेघदूत काव्याची गोष्ट अगदी साधी आहे. हिमालय पर्वतात अलका नगरीतील एका यक्षावर कुबेराची खप्पा मर्जी झाल्याने त्याला एक वर्ष तडीपार व्हावे लागले. तो नागपूरजवळच्या रामटेक येथे वास्तव्य करून होता. अत्यंत उदास चित्ताने विरहाचे आठ-दहा महिने त्याने मोठ्या दुःखाने काढले. पुढे वर्षाकाळ येऊन ठेपला तेव्हा त्याला आपल्या स्त्रीची मोठी चिंता लागून राहिली व तिला आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी उपाय म्हणून एक दूत तिच्याकडे पाठवावा असा विचार करून त्याने पर्वतशिखरावर धडका देणार्‍या काळ्याकभिन्न ढगाला आवाहन केले. तेच हे रसिकांना प्रिय, अत्यंत हृदयस्पर्शी आणि सुरेख निसर्ग वर्णनाने नटलेले खंडकाव्य मेघदूत. त्याच्या दुसर्‍या श्लोकातील चरण ‘आषाढस्य प्रथम दिवसे….’ याला अनुसरून आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाकवी कालिदास दिन साजरा केला जातो.

मेघदूताचे पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असे दोन भाग आहेत पूर्व मेघामध्ये विषयाची सुरुवात व यक्षाने मेघाला सांगितलेला अलका नगरी पर्यंतचा मार्ग याचे वर्णन आहे. खरे तर रामटेकहून अलका नगरीपर्यंत सरळ मार्ग असताना, आपल्या उज्जैन नगरीवरील प्रेमापोटी कालिदास मेघाला मुद्दाम वाकडी वाट करून उज्जैनवरून जायला सांगतो. या सर्व मार्गाचे वर्णन इतके सुरेख आणि वास्तववादी बिनचूक आहे की कालिदासाने या प्रदेशाची हवाई पाहणी केली होती की काय अशी शंका यावी. (पुण्याचे डॉ भावे यांनी या मार्गावरून विमान प्रवास करून या सर्व भूवर्णनाची खात्री करून घेतली आहे.) उत्तर मेघात यक्षाने केलेले अलका नगरीचे मनोहारी वर्णन, घराच्या खाणाखुणा, विरहामुळे दुःखीकष्टी झालेली त्याची प्रिया यांचा उल्लेख येतो. तिला माझा निरोप दिल्यानंतर तिचे उत्तर घेऊन परत मजकडे ये अशी गळही घालायला तो विसरत नाही. हे सर्व वर्णने मोठे मनोरम व प्रत्ययकारी आहे.

कुमारसंभव (कुमार कार्तिकेयाचा जन्म) महाकाव्याचे एकूण १७ सर्ग उपलब्ध आहेत. तथापी काही अभ्यासकांच्या मते त्याचे २२ सर्ग होते, तर काहींच्या मते ८ च सर्ग असून ते अर्धवट सोडले आहे. नावाप्रमाणेच हे काव्य शंकर पार्वती यांचा पुत्र कार्तिकेय याच्या जन्माच्या कथेवर आधारित आहे. श्री शंकराचे वास्तव्य हिमालयात असल्याने हिमालयाचे वर्णन कालिदासाने मोठे मनोरम व हृदयंगम केलेले आहे. ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुराने सर्व देवांना त्राहि भगवान केल्याने त्यांनी शंकराची प्रार्थना करून कार्तिकेयाच्या अवताराची मागणी केली. साहजिकच कालिदासाच्या शृंगार रसप्रधान प्रवृत्तीमुळे त्यात पार्वतीच्या सौंदर्याचे व शंकर-पार्वती प्रणयाचे वर्णन ओघानेच येते. कार्तिकेयाने जन्म घेतल्यावर तो देवांचा सेनापती झाला व त्यांच्या युद्धात त्याने देवांना विजय मिळवून दिला हा कथाभाग या काव्यात येतो. तसेच मदन दहन व रती विलापही आहे, परंतु मुख्य भर शंकर व पार्वती यांच्या प्रणयावर आहे. यामुळे जनमत कृद्ध होऊन त्याला हे काव्य अर्धवट सोडावे लागले असे काहींचे मानणे आहे. अभ्यासकांच्या मते पहिले आठच सर्ग कालिदासाने रचलेले असून उर्वरित अन्य कोणा कवीचे असावेत.

कालिदासाला ‘रसेश्वर’ हा किताब प्रदान करणारे रघुवंश हे कालिदासाचे श्रेष्ठ महाकाव्य आहे. सर्व नवरसांचा उत्कट परिपोष व विविध ऋतूवर्णनाने विनटलेल्या रघुवंशात १९ सर्ग असले तरी खरे महत्त्वाचे १८ सर्ग आहेत. या काव्याचे नाव रघुवंश असले तरी त्याची सुरुवात रघूचा पिता दिलीप याच्या कथेपासून होते. पहिले दोन सर्ग दिलीपाच्या कथेसाठी दिलेले आहेत. यात प्रख्यात कामधेनू आणि नंदिनी ची कथा आलेली आहे. तिसऱ्या सर्गामध्ये रघुचा जन्म, शिक्षण तर चौथ्या सर्गामध्ये रघूने केलेल्या भारतवर्षातील दिग्विजयाचे वर्णन येते. पाचव्या सर्गात कुबेराने रघुला दिलेली खंडणी आणि अजाचा जन्म यांची कथा आहे . सहाव्या सर्गात इंदुमती स्वयंवर व तत्कालीन स्वयंवर पद्धतीचे अतिशय उत्कृष्ट चित्रण केलेले आहे. ‘दीपशिखा कालिदास’ ही पदवी याच वर्णनातून आलेली आहे. सातव्या सर्गामध्ये इंदुमती व अज यांचा विवाह त्याचबरोबर अज आणि इतर राजांचे झालेले युद्ध याचे वर्णन आहे. प्रख्यात अजविलाप आठव्या सर्गात येतो. नवव्या सर्गात दशरथाची कथा आणि वसंत ऋतू वर्णन आहे. सर्ग दहा पुत्रकामेष्टी यज्ञ, राम जन्म, बाललीला यांना वाहिलेला आहे. अकराव्या सर्गात मूळ रामायणापेक्षा थोडेसे वेगळे असे राम सीता विवाहाचे वर्णन येते. मूळ रामायणातील अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड व युद्धकांड यातील काही भाग, एवढा कथाभाग कवीने अर्थ आणि रसभंग होऊ न देता केवळ एका सर्गात संकलित केला आहे तो सर्ग १२. तेराव्या सर्गात पुष्पक विमानातून प्रवास आणि अयोध्येला पुनरागमन. चौदाव्या सर्गात मुख्यत्वेकरून सीतेचा त्याग व वनवास. पंधराव्या सर्गात लव-कुश यांचा जन्म, शिक्षण त्यांची अयोध्या भेट आणि श्रीरामाचे स्वर्गारोहण. कुशाचा कारभार, त्याचा विवाह आणि मोडकळीस आलेल्या अयोध्येला पूर्वीचे ऐश्वर्य प्राप्त करून देणे हा भाग येतो सोळाव्या सर्गात. कुशाचा मुलगा अतिथी याचे राज्यारोहण व राज्यकारभार सतराव्या सर्गात, तर अठराव्या सर्गात अतिथीच्या पुढील एकवीस राजांची वंशावळ व त्यांचा कारभार येतो. एकोणिसावा सर्ग हा रघुवंशातील अखेरचा (नादान) राजा अग्निवर्ण याचे वर्णन करणारा आहे .

मालविकाग्निमित्रम् हे पाच अंकी नाटक म्हणजे कालिदासाची सुरुवातीची नाट्यकलाकृती असावी. कदाचित या नाटकाच्या काळात कालिदासाला राजाश्रय नसेलही आणि या नाटकाने त्याला दरबाराची वाट सुकर करून दिली असेल अशीही शक्यता आहे. शुंग घराण्यातील सम्राट पुष्यमित्र शुंग याचा मुलगा सम्राट अग्निमित्र व मालविका यांच्या प्रणयाची कथा या नाटकामध्ये रंगवलेली आहे. इतर नाटकांप्रमाणे या नाटकालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कदाचित जनमानसात रुजलेल्या कथेलाच कालिदासाने हे नाटकाचे रम्य रूप दिले असेल.

विक्रमोर्वशीयम् नाटक हे उर्वशी व पुरुरवा यांच्या फार प्राचीन प्रणयकथेवर आधारित आहे ही कथा शतपथ ब्राह्मणात तसेच थोडाफार फरकाने मत्स्यपुराणातही आलेली आढळते. परंतु या कथेचे मूळ हे उर्वशी व पुरुरवा यांच्या ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील संवादांमध्ये सापडते. अतिशय कौशल्याने रंगवलेल्या या नाटकाची कथा गायन व नृत्य या दोन्हीच्या सादरीकरणातून पुढे सरकते.

कालिदासाच्या तिन्ही नाटकांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले सर्व जगभर प्रसिद्ध असलेले आणि रसिकांनी डोक्यावर घेतलेले नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुन्तलम्. महाभारतातील आदिपर्व तसेच पद्म पुराणातही दुष्यंत शकुंतला यांची कथा आहे. या आख्यानावरून कालिदासाने शाकुंतल नाटक रचले. परंतु ही कथा जशी आहे तशीच सादर करण्याऐवजी ती नाट्य सादरीकरणाला सोयीची व्हावी यादृष्टीने कालिदासाने दुष्यंत या पात्रामध्ये काही बदल घडवून आणले, तसेच मूळ कथेत नसलेली अंगठी व काही काल्पनिक पात्रेही रंगवून हे सात अंकी विविध मानवी भावभावनांनी नटलेले नाटक सादर केले. जगातील अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली असून सर्व जगभर त्याला एक श्रेष्ठ नाट्य कलाकृती म्हणून मान्यता मिळालेली आहे .

पहिल्या तीन अंकात दुष्यंत आणि शकुंतला यांचा अनुराग, प्रेम व त्याची गांधर्व विवाहात परिणती ही मोठ्या रसिकतेने रंगविली आहेत. प्रेमिकांच्या मनातील भावना या प्रसंगांत मोठ्या बहारीने रेखाटल्या आहेत. त्यात अस्वाभाविक, ग्राम्य किंवा अनैतिक असे काहीच नाही. तरुण जनांच्या शृंगारचेष्टा यात सुंदर रीतीने चित्रित केल्या आहेत. चौथ्या अंकातील आकाशवाणी, वनस्पती व निसर्गातील इतर प्राणिमात्रांनीही शकुंतलेची केलेली पाठवणी इत्यादी गोष्टींनी करूण रसाचा मोठा परिपोष झालेला आहे. ‘काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुंतला । तत्रापि चतुर्थोंऽकः तत्र श्लोक चतुष्टयम् ॥’ हा श्लोक अगदी सार्थ करणारा हा अंक आहे. पाचव्या अंकात राजा आणि शकुंतला समोरासमोर येतात परंतु शकुंतलेची हरवलेली अंगठी आणि राजाची विस्मृती यामुळे राजा शकुंतलेचा धिक्कार करून तिला घालवून देतो. तिला तिची आई मेनका घेऊन जाते. मूळ कथा येथे संपते. परंतु तिचे नाट्य सादरीकरण व नायक नायिकेचे मीलन घडवून आणण्यासाठी अंक ६ व ७ ची योजना केलेली आहे.

हा झाला कालिदासाच्या कलाकृतींचा एक त्रोटक आढावा. उद्देश फक्त वाचकाला या रसाळ कलाकृतींचा धावता परिचय करून देणे व त्याबद्दल कुतूहल व आवड जागृत करणे हा आहे. त्याच्या श्रेष्ठ कलागुणांचे रसग्रहण एका लेखात करणे केवळ अशक्य ! त्याची भाषा प्रासादिक आहे. शब्दालंकार व अर्थालंकारांनी नटलेली आहे. ‘उपमा कालिदासस्य’ हे तर आपण लहानपणापासून ऐकलेलेच असते. रसिकांच्या मनाला भिडणारी अर्थगर्भ शब्दरचना, मानवी भावभावनांचे सूक्ष्म कंगोरे टिपून त्यांचे तरल प्रकटीकरण हा तर त्याचा हातखंडा ! बदलत्या ऋतुचक्राचा मानवी मनावर होणारा परिणाम त्याच्या नजरेतून सुटत नाही. निसर्ग सौंदर्याचे मार्मिक निरीक्षण व त्याचे विलक्षण बोलके शब्दचित्रण ही त्याची हातोटी आणि ते पाहताना त्याच्या मनी हुरहुर दाटते हे त्याचे वैशिष्ट्य ! शृंगार रस हा त्याचा स्थायी भाव ! काही वेळा त्याचा अतिरेक होतो की काय असे वाटावे. कालिदास व शृंगार या दोघांना एकमेकांपासून विलग करणे दुरापास्तच ! वेदांपासून कामसूत्रापर्यंत विविध वाङमय प्रकारांचा गाढा अभ्यास व संस्कृत भाषेवर विलक्षण प्रभुत्व, चित्रकला, गायन, नृत्यकलांचा जाणकार असलेला आणि तरीही अत्यंत विनयशील प्रकांड पंडित ! रघुवंशाच्या सुरुवातीचे श्लोक याची पुष्टी करण्यास पुरेसे आहेत. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शणारी सुभाषिते आणि सुविचार तर ठायी ठायी विखुरलेले !

कविवर्य वसंत बापट यांनी कालिदासाचे फार मार्मिक आणि हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. ते म्हणतात,

“जीवीचा जिवलग कालिदास”

कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्‍या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.”

— धनंजय बोरकर.

(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..