नवीन लेखन...

उघडी खिडकी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३८)

“आपण बसा ना ! माझी मावशी थोड्याच वेळात खाली येईल.
आपलं नांव नानासाहेब नाफडे म्हणालात ना !”
मावशींची पंधरा वर्षांची नटखट भाची बंगल्यात नुकताच प्रवेश केलेल्या पाहुण्यांना म्हणाली.
ती पुढे म्हणाली, “तोपर्यंत मी आहे ना तुमच्याशी बोलायला. चालेल ना !”
थोड्याच वेळांत तिची मावशी खाली येणार आहे हे लक्षात घेऊन पण ह्या क्षणी त्या भाचीला खूष करता येईल असे काय बोलावे, याचा विचार नाना नाफडे करत होते.
त्यांच्या मनांत एक दुसराही विचार येत होता.
ते इथे खास विश्रांतीसाठी आले होते.
अशा अपरिचित लोकांना भेटून विश्रांतीने बरे होण्याचा उद्देश साध्य होईल कां ?
अशी शंका त्यांच्या मनांत डोकावत होती.
मुंबईत अनेक डाॅक्टर्स आपल्या रूग्णांना तेव्हां बरं होण्यासाठी विश्रांती घ्यायला सांगत.
ते म्हणत, “तुमच्या नर्व्हजवर खूप ताण आहे.
तो फक्त शांत जागी विश्रांती घेऊनच कमी होईल.”
ही पध्दत त्यांनी अर्थातच ब्रिटीशांकडून उचलली होती.
विश्रांती घ्यायला खंडाळा, लोणावळा, पांचगणी, महाबळेश्वर ह्यांतलं एखादं ठिकाणही सुचवीत.
नानासाहेब नाफडे इथे यायला निघाले, तेव्हां त्यांची थोरली बहिण त्यांना म्हणाली, “मला माहित आहे की पांचगणीसारख्या ठिकाणी तुला स्वतःला स्वतःशीच बोलायची वेळ येईल कारण तिथे दुसरा कोणी भेटणंही कठीण आहे आणि एकटेपणामुळे तुझ्या मनावर आणखीच ताण येईल.
मी तुला तिथे रहाणाऱ्या कांही ओळखीच्या व्यक्तींना पत्रे लिहून देते.
माझ्या आठवणींप्रमाणे ज्या व्यक्तींचा अनुभव मला चांगला आला अशाच व्यक्तींना पत्रे लिहिन मी.”
नाना नाफडे मनांत विचार करत होते की ज्या श्रीमती वसुंधरा पंडित यांच्या नावे बहिणीने पत्र दिले होते, त्यांच कुटुंब व विशेषत: स्वतः श्रीमती वसुंधरा पंडित चांगल्या लोकांत मोडत होत्या की विरूध्द बाजूच्या होत्या
तेवढ्यात बराच वेळ आपण कांहीच बोललो नाही, हे शिष्टाचाराला धरून नाही असे वाटून वसुंधराबाईंच्या भाचीने विचारले, “तुम्ही इथल्या बऱ्याच रहिवाशांना ओळखत असाल ना !”
नाना नाफडे म्हणाले, “तसं मी स्वतः नाही ओळखत कुणाला पण माझ्या बहिणीने कांही लोकांना उद्देशून पत्रे लिहून दिलीत.
हळू हळू होईल ओळख.”
हे बोलतांना त्यांना मनांत थोडा विषाद वाटत होता आणि बहिणीकडून ही पत्रे घेतली त्याचा पश्चात्तापही.
ती नटखट तरूणी म्हणाली, “म्हणजे तुम्हाला माझ्या मावशीबद्दल कांहीही ठाऊक नसणार तर !”
“मला फक्त तिचे नांव आणि पत्ता माहित आहे.” पाहुण्यांनी कबुल केले.
नाना नाफडे विचार करत होते ह्या श्रीमती पंडित सधवा होत्या की विधवा ?
दिवाणखान्याच्या रचनेवरून तो एखाद्या पुरूषाच्या आवडीप्रमाणे सजवलेला होता.
“मावशीच्या आयुष्यांतली भयानक शोकांतिका बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला तिच्या आयुष्यात घडली.
बहुदा तुमची बहिण इथे येऊन गेली त्यानंतर लगेचच.” ती मुलगी म्हणाली.
“त्यांची शोकांतिका ?” नाना नाफडेंनी विचारलं.
ह्या शांत सुंदर गांवात शोकांतिका घडणं त्यांना स्वाभाविक वाटलं नाही.
“तुम्ही बसला आहात त्याच्या बरोबर समोर एक मोठी फ्रेंच विंडो दिसत्येय.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या अशा हवेत आम्ही ती खिडकी पूर्ण उघडून कां ठेवली असेल ?”
एका मोठ्या खिडकीकडे बोट दाखवत ती भाची म्हणाली.
प्रवेशद्वार त्यांच्या उजव्या हाताला होतं आणि ती प्रचंड खिडकी समोरच होती.
तिची खालची बाजू जमिनीपासून दीड फूटांवरच होती आणि समोर नीट गवत कापून केलेले छोटे अंगण (Lawn) दिसत होते.
“ह्या ऋतुमधे ह्या गांवी सध्या हवा थोडी विचित्र आहे पण त्या खिडकीचा आणि त्या शोकांतिकेचा कांही संबंध आहे ?” नानासाहेबांनी तिला विचारले.
ती तरूणी म्हणाली, “तीन वर्षांपूर्वी ह्या खिडकीतून मावशीचे यजमान आणि तिचे दोन धाकटे भाऊ हातात बंदुका घेऊन नेहमीप्रमाणे शिकारीसाठी बाहेर पडले.
ते कधीच परत आले नाहीत.
त्यांना आवडणाऱ्या पक्षांच्या शिकारीसाठी योग्य जागेच्या दिशेने जात असतांना ते अचानक दलदलीत रुतले.
थोड्याच अवधीत ते तिघेही दलदलीत आंत नाहीसे झाले.
त्या वर्षी अवकाळी पाऊस जास्त झाल्यामुळे अशी दलदल बऱ्याच ठिकाणी झाली होती.
त्यामुळे एऱ्हवी सुरक्षित वाटणाऱ्या जागा अचानक दगा देत होत्या.
त्यांचे देहही सांपडले नाहीत.
ही त्यांतली भयानक गोष्ट होती.”
हे सांगताना एऱ्हवी धिटाईने बोलणाऱ्या त्या तरूणीचा आवाज हळवा आणि कातर झाला होता.
ती पुढे सांगू लागली, “माझ्या बिचाऱ्या मावशीला अजूनही वाटतं की ते तिघे कधी तरी परत येतील व त्यांच्याचबरोबर गेलेल्या स्पॅनिएल जातीच्या कुत्र्यासह नेहमीच्या संवयीप्रमाणे त्या समोरच्या खिडकीतून आत येतील.
म्हणून खिडकी अगदी काळोख होईपर्यंत उघडी ठेवलेली असते.
बिचारी माझी मावशी पुन्हा पुन्हा ते कसे बाहेर गेले, तिच्या यजमानांनी कसा पांढरा रेनकोट खांद्यावर घेतला होता, तिचा धाकटा भाऊ राजन कसे “अंधार कां पसरला चहूंकडे” हे गाणे म्हणवून तिला चिडवत होता.
मावशीला ते गाणं आवडत नसे, ते तिला उदास करत असे.
तुम्हांला माझ्या मनातलं सांगू ? अशा शांत संध्याकाळी माझ्या मनांत भयानक विचार येतो की ते सगळे खरंच तर त्या खिडकींतून आंत येणार नाहीत ना !” बोलतांना तिच्या अंगावर शहारे आले असावेत आणि ती थांबली.
जेव्हां श्रीमती वसुंधरा पंडित बाहेर यायला उशीर लागल्याबद्दल पाहुण्यांची क्षमायाचना करत बाहेर दिवाणखान्यात आल्या, तेव्हा नाना नाफडेंना हायसं वाटलं.
त्या म्हणाल्या, “मला वाटते आमच्या सुनिताने तुमची चांगली करमणूक केली असेल ना !”
नाना नाफडे म्हणाले, “तिचं बोलणं खूपच मन वेधून घेणारं होतं.”
श्रीमती पंडितनी चटकन त्यांना विचारलं, “आणि हो, ही समोरची मोठी खिडकी उघडी आहे त्याचा तुम्हाला कांही त्रास वाटत नाही ना !
माझे यजमान आणि भाऊ शिकार आटोपून परतले की नेहमी तिथूनच प्रवेश करतात.
आज ते दलदलीतील पक्षी मारण्यासाठी गेलेत.
येतील तेव्हा त्यांचे बूट वगैरे इतके खराब असतील की माझी कार्पेट खराब करून टाकतील.
तुम्ही सर्व पुरूष ह्या बाबतीत सारखेच ! होय की नाही ? “
श्रीमती पंडित उत्साहाने बडबडत होत्या.
शिकारीविषयी, मारायला पक्षी कमी झाल्याबद्दल, सध्याच्या हंगामात बदके मिळण्याबद्दल, इ. वर अधिकारवाणीने कांही सांगत होत्या.
नाना नाफडेंना मात्र ते सर्व भयानक वाटत होतं.
ते अधूनमधून तिची गाडी दुसऱ्या एखाद्या विषयाकडे वळवायचा प्रयत्न करत होते पण त्यांत फारसं यश येत नव्हतं.
त्यांना दिसत होतं की तिला त्याच विषयावर बोलायचं होतं आणि तिची नजर बरेचदा समोरच्या खिडकीतून दूरवर पहायचा प्रयत्न करत होती.
नाना नाफडेनी भेटीसाठी आजचाच, तिच्या शोकांतिकेला तीन वर्ष पूर्ण करणारा, दिवस निवडावा, हे त्यांना त्यांच दुर्दैव वाटत होतं.
ते म्हणाले, “दोन तीन डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घ्यायला आणि मेंदूवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले आहे.
तसेच जास्त थकवा येईल असे शारिरीक कामही टाळायला सांगितले आहे.”
अनेक लोकांचा जसा समज आहे तसं त्यांनाही मनातून वाटत होतं की ऐकणाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीचे आजार व त्यावरील औषध ह्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला क्वचितच उत्सुक असतात.
तरीही ते पुढे म्हणाले, “परंतु खाण्याचं पथ्य मी काय पाळावं, ह्या बाबतीत मात्र डॉक्टरांच एकमत नाही.”
ऐनवेळेस येऊ घातलेली जांभई दाबून श्रीमती पंडित अचानक उत्साहाने बोलू लागल्या.
मात्र ते बोलणं नाना नाफडेंच्या आजाराबद्दल नव्हतं.
त्या म्हणाल्या, “ते पहा, ते आले एकदाचे.
बरोबर चहाच्या वेळी आले आणि चिखल अगदी त्यांच्या डोळ्यांपर्यंत लागलेला दिसतोय.”
नाना नाफडेंच अंग भितीने किंचित थरथरू लागलं आणि ते भाचीकडे वळले व नजरेतून तिला सहानुभूती दर्शवू लागले.
ती मुलगी खिडकींतून बाहेर पहात होती आणि तिच्या नजरेत आश्चर्ययुक्त भीती दाटून आली होती.
एकाएकी धक्का बसल्याप्रमाणे नाना नाफडे खुर्चीत बसूनच गर्रकन खिडकीकडे वळले व बाहेर त्याच दिशेला पाहू लागले.
संध्याकाळनंतरचा काळोख दाट होत होता आणि तीन व्यक्ती त्या पटांगणातून खिडकीकडे येत होत्या.
तिघांच्याही खांद्याला बंदुका अडकवलेल्या होत्या आणि एकाच्या खांद्यावर पांढरा रेनकोट होता.
एक थकलेला स्पॅनिएल कुत्रा त्यांच्याबरोबरच चालत येत होता.
आवाज न करता तिघेही घराच्या जवळ आले आणि मग त्यांतला एक तरूण गाण्याची ओळ गाऊ लागला, “अंधार कां पसरला चहूंकडे“.
नाना नाफडेंनी आपली काढून ठेवलेली टोपी पटकन घातली, बाजूलाच ठेवलेली हातातली कांठी उचलून घेतली आणि मग अशा वेगाने पळत ते मुख्य रस्त्यावर आले की त्यांना दिवाणखान्याचं प्रवेशद्वार, बंगल्याकडे येणारा रस्ता आणि बंगल्याचे फाटक नुसते नजरेखालून गेल्यासारखे भासले.
तिथूनच जाणाऱ्या सायकलस्वाराने ब्रेक दाबल्यामुळे होऊ घातलेला अपघात टाळला.
“आलो बरं कां बाईसाहेब.” खिडकींतून आत येत पांढरा कोट खांद्यावर घेतलेला गृहस्थ पंडित बाईंना म्हणाला.
“वाटेत मधेमधे चिखल होता पण बहुतेक वाट सुकी होती.
काय ग ! आम्ही आत येतांना दिवाणखान्यांतून पळून जाणारी व्यक्ती कोण होती ?”
“एक अगदी वेगळा आणि विचित्रच इसम होता, नाना नाफडे नांवाचा.”
बाईसाहेबांनी खुलासा केला. “तो फक्त त्याच्या आजाराबद्दल बोलत होता आणि निरोपाचा एक शब्द किंवा अचानक जावं लागतंय म्हणून माफी वगैरे कांही न मागताच तो तुम्ही येताच पळाला.
कुणाला वाटेल की त्याला इथे भुत दिसले.”
भाची शांतपणे म्हणाली, “मला वाटते की ह्या स्पॅनिएल कुत्र्यामुळे ते पळाले.
ते मला म्हणाले होते की त्यांना कुत्र्यांची खूप भीती वाटते.
एकदा नदीकिनारी एक गावठी कुत्र्यांची झुंडच त्यांच्या मागे लागली होती.
शेवटी त्यांना जवळच्या ख्रिश्चन स्मशानांत खणलेल्या एका खड्ड्याचा आश्रय रात्रीसाठी घ्यावा लागला होता आणि ते सर्व गांवठी कुत्रे वरून भुंकत होते.
अशा प्रसंगामुळे एखाद्याच्या मनांत कुत्र्यांबद्दल कायम भीती बसली तर त्यांत काय नवल ?”
सुनिताने कांही सत्त्य बोलण्याचं व्रत घेतलं नव्हत; ऐन वेळी रोमांचक कथा रचणं आणि त्या खऱ्या वाटतील अशा पध्दतीने सांगण, ही त्या मुलीची खासियत होती.

शिकारीहून परतणा-या पंडित बाईंचे यजमान आणि भाऊ ह्यांना ते भूतच समजले व “य: पलायते, स जीवते”, हे धोरण अवलंबून ते तिथून धांवण्याचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडत जे पळाले, ते आपल्या पाचगणीतल्या तात्पुरत्या मुक्कामावर म्हणजेच एका चांगल्या लॉजवर आले.
अशोक लॉज कांही फार मोठा नव्हता.
एका बंगल्याचे चार भाग करून चारजणांना देत असत.
ॲाफीस आऊटहाऊसमधे होतं.
नाना नाफडेंनी त्यांतले चांगले दोन भाग स्वत:ला आरामांत रहाता यावं म्हणून घेतले होते.
त्यांनी त्या जागेचं चांगलं महिनाभराच भाडं आगाऊ भरलं होतं.
ते अशोक लॉजपर्यंत जरा वेग कमी करून पण धांवतच आले.
कधी एकदा लॉजवर पोहोचतोय असं त्यांना झालं होतं.
तरीही जेव्हा ते लॉजवर पोहोचले तेव्हा ते सरळ आपल्या खोलीत गेले नाहीत.
ते ॲाफीसमधे गेले.
ॲाफीसमधे तेव्हा मॅनेजर नव्हता.
तो जेवायला घरी गेला होता.
तिथे शिरपा बसलेला होता.
शिरपा लॉजमधे केअरटेकर ते हमाल अशी अनेक प्रकारची कामे करत असे.
नाना नाफडे ॲाफिसमधल्या सोफ्यावर धपापत्या उरानिशी बसले.
शिरपाने विचारलं, “सायेब, काय वाघ वगैरे मागे लागला काय? कधीमंदी गावात येतो एखादा वाघ.”
नाना नाफडे म्हणाले, “नाही रे बाबा, वाघ नाही. वाघाला काय मी घाबरतो काय?” लॉजवर पोचल्यावर नानांना तरतरी येऊ लागली होती.
“मंग काय झालं म्हणायचं?” शिरप्याने प्रश्न केला.
नाना म्हणाले, “भूत दिसलं बाबा भूत. माझ्या ह्या डोळ्यांनी पाहिलं मी.”
भूत म्हणजे शिरपाचा खूपच आवडता विषय.
साहेबांसाठी बियरचा ग्लास भरत तो म्हणाला, “भूत दिसलं! आसलं, आसलं! हिथ लई भूताटकीचे वाडे आहेत. ते त्या पारशाचं दिसलं की काय?”
बियरचे घुटके घेत नाना नाफडे म्हणाले, “नाही, अरे अख्खी भुतावळ दिसली मी कसा सुटलो तिथून, माझं मलाच माहित?”
शिरप्याच कुतुहल वाढलं, “आख्खी भुतावळ, म्हणजे किती?”
नाना म्हणाले, “पांच दिसली, पाच!”
शिरप्याने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, “अगागागा! पावनं सुटलात तुम्ही.”
नाना म्हणाले, “सुटलो म्हणजे काय! अरे पहिल्या दोन भुतांशी तर मी त्यांना जिवंत माणसं समजून त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या. ती दोन भुतेच सारखी मला आणखी तीन भुतं येणार आहेत, असं सांगत होती. थोड्या वेळाने ती तीन भुत खरंच आली.” नाना नाफडेंनी बियरचा ग्लास रिकामा करून खाली ठेवला.
शिरपा म्हणाला, “सायेब, तुम्ही त्यांचे पाय बघून ओळखलं कां?”
नाना नाफडे मान हलवत म्हणाले, “हो रे शिरपा! ती भुत खिडकीतून आत आली खिडकी वर त्यांनी एकेक पाय ठेवला तर तीनही पाय उलटे. मग मी त्या पहिल्या भुतांकडे पाहिलं तर त्यांचे पण पाय उलटे.”
ती तीन भुतं आत यायच्या आधीच मी तिथून पळालो. ती तीन भुतं अशी काळोखात अचानक दिसायला लागली. ती तीनही भयानक होती. अंगाला चिखल आणि राख फांसली होती त्यांनी. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पण वेगळ्याच होत्या.”
ती मुलगी काही तरी खाणाखुणा करत होती. बहुदा मला कसं खायचं ते सांगत होती.”
शिरपाने विचारलं, “हा कोणाचा बंगला म्हणायचा?”
नाना नाफडे तोंड वांकड करत म्हणाले, “मी ‘लॉंग शॅडो’ हे बंगल्याचं विचित्र नाव ऐकूनच जायला नको होतं तिथे. तो माळाच्या टोकाला आहे तो! आता पंडितांना शोधत मी तिथे गेलो होतो.”
शिरपा म्हणाला, “सायेब, कुठले पंडित! अहो, इथे गो-या सायबांची भूतं खूप!”
शिरपा हाताची बोटं मोजत म्हणाला, “हा आठवा बंगला भूतांचा!”
नाना म्हणाले. “आठवा! मी चाललो बाबा मुंबईला! उद्या सकाळीच.”
शिरपा म्हणाला, “अहो, तुम्ही महिन्याचं भाडं भरलंय!”
नाना नाफडे म्हणाले, “माझी विश्रांती झाली आणि आजच्या धांवण्याने नर्व्हज पण ठीक झाल्या असाव्यात. आता बास्स!”
नाना नाफडे ठरवल्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी मुंबईला निघून गेले. संध्याकाळपर्यंत शिरपाने कमीत कमी पंधरा-सोळा बंगल्यांच्या केअरटेकर्सना आणि तेवढ्याच प्रवाशांना लोंग शेडोतल्या भूतांच्या विविध कहाण्या ऐकवल्या.
त्या पसरत गेल्या.
पंडितांच्या कानावर नाही आल्या पण सर्वत्र झाल्या.
सहा महिन्यांनी पंडित कुटुंब पुण्याला रहायला गेले.
आणखी सहा महिन्यांनी पंडितांनी पांचगणीचा तो बंगला विकायचा ठरवले.
पुण्याचा एक दलाल त्यांच्या घरी आला होता. त्याने पांचगणीतल्या मित्राशी संपर्क साधला होता.
तो दलाल आला तेव्हां भाची सुनिता तिथेच होती.
तो पंडितांना म्हणाला, “साहेब, तुमचा बंगला विकला जाणं कठीण आहे.”
पंडित आश्चर्याने म्हणाले, “कां? इतका सुंदर बंगला!”
सुनिता म्हणाली, “हो, तिथे किती छान छान कल्पना सुचतात.”
तो दलाल तिच्याकडे, विशेषत: तिच्या पायांकडे पहात चांचरत म्हणाला, “माफ करा, पंडितसाहेब पण तो बंगला पांचगणीत भुताचा बंगला म्हणून ओळखला जाऊ लागलाय. बंगल्याच्या दिवाणखान्याच्या खोलीतल्या बंद खिडकींतून आंत बाहेर करणारं, एका पंधरा-सोळा वर्षांच्या
गो-या मुलीचे भूत पाहिल्याचे अनेकजण शपथेवर सांगताहेत.”
सुनिताचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द ओपन विंडो.

मूळ लेखक – साकी (एच. एच. मन्रो १८७०-१९१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..