नवीन लेखन...

इस्पिकची राणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २०)

मेजर शिंदे यांच्या घरी रात्रभर पत्त्यांचा जुगार चालू होता.
सकाळी पांच वाजतां नाश्ता दिला गेला.
तोपर्यंत जिंकलेल्यांनी तो खूप आवडीने खाल्ला तर हरणाऱ्यांच्या तोंडाची चव गेली होती.
एकजण म्हणाला, “माझं नशीब जुगारांत नेहमीच दगा देतं.”
एकाने दुसऱ्या एका इंजिनीअर्सच्या तुकडीतील हरीरामला विचारले, “हरीराम, आश्चर्य आहे ! तू कधीही पत्त्यांना हातही लावत नाहीस ! तरीही तू आमच्याबरोबर रात्रभर बसतोस !”
हरीराम म्हणाला, “मला खेळ खूपच आवडतो. परंतु गरजेच्या वस्तुंसाठी लागणारा पैसा अनिश्चित गोष्टींवर घालवणं नाही आवडत.”
ह्यावर राजाराम होळकर म्हणाला, “हरीराम हा मूळचा व्यापारी आहे. त्यामुळे स्वभावानेच काटकसरीने रहाणारा आहे.
पण मला आश्चर्य वाटते ते माझी आजी चे.”
एकाने राजारामला विचारले, “कां ? ८० वर्षांच्या तुझ्या आजीला जुगार खेळावासा वाटत नाही, ह्यांत आश्चर्य काय ?”
राजाराम म्हणाला, “तुला तिची गोष्ट माहित नाही तर !”
गोष्ट म्हणताच सर्व ऐकायला उत्सुक झाले.
राजाराम म्हणाला, “ आम्ही होळकरांच्या मुख्य घराण्यांतले नाही पण खानदानीच. साठ वर्षांपूर्वी माझी आजी यमुनादेवी होळकर पॅरीसला गेली होती.
ती फार सुंदर दिसत असे.
तिला ‘इंडीयन राणी’ म्हणून ओळखत व तिला पहायला गर्दी होत असे.
एकदा ऑर्लिन्सच्या राजपुत्राबरोबर खेळतांना यमुनादेवी खूपच मोठी रक्कम हरली व खूप मोठे कर्ज झाले.
तिने आपल्या नवऱ्याला सरदार होळकर ह्यांना तें सांगितले पण त्यांनी ते कर्ज फेडायला साफ नकार दिला.
मग तिने बडोदा संस्थानचे एका जामकर सावकार, जे त्यावेळी लंडनला होते, त्यांना बोलावून घेतले.
जामकरांच्या श्रीमंतीबद्दल, छंदांबद्दल, त्याने केलेल्या जीवनामृत, परीसासारखा दगड, आदी संशोधनांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल.
जामकर मैत्रीला जागतील अशी तिला खात्री होती.
त्याप्रमाणे जामकर तिला येऊन भेटले.
तिने आपल्या पतीचा अनुदारपणा वाढवून सांगून त्यांच्याकडे कर्जाची मागणी केली.
सर्व शांतपणे ऐकून घेऊन जामकर सावकार म्हणाले, ‘यमुनादेवी, मी तुम्हांला कर्ज हवं तेव्हां देईन.
परंतु मी तुम्हाला चांगलं ओळखतो.
माझ्या कर्जात रहाणंही तुम्हाला त्रासदायकच वाटेल.
त्यापेक्षा मी एक दुसरा मार्ग सांगतो.’
ती म्हणाली, ‘माझ्याकडे आता थोडेही पैसे नाहीत.’
सावकार म्हणाले, ‘ह्यासाठी पैसे लागणारच नाहीत.’
असं म्हणून त्यांनी तिला जे गुपित सांगितलं ते जाणून घेण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण भली मोठी किंमत द्यायला तयार होईल.”
आतां सर्वांची उत्सुकता खूप ताणली गेली होती.
पाईपचे दोन मनसोक्त झुरके घेऊन राजाराम होळकर पुढे सांगू लागला, ‘दुसऱ्या दिवशी माझी आजी यमुनादेवी थेट राणीच्या खेळाच्या टेबलावर जाऊन बसली.
तिने कांहीतरी कारण सांगून उधारीवरच खेळ पुढे सुरू केला.
त्याकाळी ‘फॅरो’ नांवाचा जुगार लोकप्रिय होता.
आॅर्लीन्सचा राजपुत्र पत्ते काढत होता.
पत्त्यांच्या दोन जोडांपैकी एकांतून रक्कम लावणाऱ्यांनी पत्ता निवडून घ्यायचा व दुसऱ्या जोडांतून काढलेल्या पत्त्याबरोबर जुळवायचा.
माझ्या आजीने जादूचा प्रभाव टाकला. एकामागोमाग प्रत्येक डावाला अचूक पत्ते काढू लागली व सर्व डाव जिंकू लागली.
थोड्याच वेळांत तिने पूर्वीचे सर्व कर्ज फेडले.’
‘छान कहाणी आहे’ एकाने चेष्टेने म्हटले.
दुसरा म्हणाला, “तुझ्या आजीला असे गुपित माहित आहे आणि तू हरतोयस.”
राजाराम म्हणाला, ‘माझ्या आजीचे चार मुलगे.
चौघांनाही जुगाराचा नाद होता.
कुणालाही तें गुपित तिने सांगितले नव्हते.
पण माझा धाकटा काका, जो गरीबीतच गेला, त्याने एकदा एवढेच मला शपथेवर सांगितले की एकदा जुगारांत तो तीन लाख रूपये हरवून बसला होता आणि एवढे कर्ज फेडणे त्याला कधीच शक्य नव्हते.
तेव्हां त्याची दया येऊन, पुन्हां न खेळण्याच्या अटीवर तिने एका वेळेसाठी जादूने प्रभावित ते गुपित त्याला सांगितले.
दुसऱ्या दिवशी त्याने एका डावांत प्रत्येक पत्त्यावर पन्नास हजार रूबल लावले व सर्व कर्जांतून तो मुक्त झाला.”
दिवस उजाडला तसा एक एक करून सगळे सैनिकी अधिकारी तिथून निघून गेले.
~~~~~~~~~~~~~~~
राजाराम होळकरची आजी म्हणजे यमुनादेवी होळकर कलकत्त्यांतील वाड्यांत तेव्हां आरशासमोर बसल्या होत्या.
तीन दासी त्यांची वेशभूषा, केशभूषा, इ. करायला मदत करत होत्या.
ह्या वयांत अजूनही आपण सुंदर दिसतो अशा भ्रमांत त्या नव्हत्या.
तरीही तरूणपणी जेवढा वेळ यासाठी त्या देत तितकाच वेळ त्या अजून देत असत.
त्यांची सखी नंदिनी खिडकीजवळ विणकाम करत बसली होती.
तिथे प्रवेश करत राजाराम म्हणाला, “आजी, कशी आहेस ?
माझ्या एका मित्राची तुझ्याशी ओळख करून द्यायची आहे.
तो तुला मंगळवारी नाटकाला घेऊन जाईल.”
यमुनादेवी म्हणाल्या, “मग मला प्रथम त्या दिवशी नाटकाला घेऊन चल आणि तिथे त्याची ओळख करून दे.”
मग असंच इकडचं तिकडचं कांहीतरी बोलून तो जायला निघाला.
खिडकीशी बसलेल्या नंदिनीने तो निघतांना विचारले, “कुणाची ओळख करून देणार आहेस ?”
राजाराम म्हणाला, “ बाळाजी शिंदेची, तू ओळखतेस त्याला ?”
नंदिनी म्हणाली, “नाही. तो सैनिक आहे कां ?”
राजाराम म्हणाला, “होय. मेजर आहे.”
नंदिनीने विचारले, “इंजिनिअरींग तुकडीतील आहे का ?”
राजाराम म्हणाला, “नाही पण तू असं कां विचारतेयस ?”
नंदिनी हंसली पण तिने कांहीच उत्तर दिले नाही.
राजाराम निघून गेला.
नंदिनीने खिडकीबाहेर नजर टाकली.
एक गणवेशातला तरूण सैनिकी अधिकारी तिला कोपऱ्यावर आलेला दिसला.
तिने मान आणखीच खाली घातली आणि विणकामावर लक्ष देऊ लागली.
अलिकडे हा अधिकारी रोजच तिथे येत असे व तिच्याकडे पहात पहात जाई.
ती त्याला मुळीच ओळखत नव्हती.
तो इंजिनिअरींग तुकडीतील असावा हे त्याच्या कॅपवरून सहज कळत होते.
बहुदा तो तिच्या प्रेमात पडला असावा असेच तिला वाटत होते.
वाटेवरच्या कुणाही सैनिकाला पाहून विरघळणाऱ्यांतली ती नव्हती.
तरीही एक दिवस ती त्याच्याकडे पाहून हंसली.
त्याच्या चिकाटीला यश आले.
नंदिनीच्या मनांत एक वेगळीच भावना उमलू लागली.
वाचकांना हे सांगायची गरजच नाही की तो हरिराम होता.
राजारामने सांगितलेली, तीन जादूचे पत्ते आणि त्याची आजी यमुनादेवी, यांची गोष्ट यांनी तो भावी जुगारी भारला गेला होता.
तो मनाशी म्हणे, “कांही करून यमुनादेवींचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि ते गुपित जाणून घेतले पाहिजे.”
याच उद्देशाने तो रोज तिथे येऊन त्या खिडकीतल्या सुंदर चेहऱ्याकडे, नंदिनीकडे, पहात आपले दैव आजमावत होता.
एक दिवस नंदिनी आपल्या मालकीणी पाठोपाठ घोडागाडीत चढायला उभी असतांना तिच्या हातांत एक चिठ्ठी कोंबून हरिराम निघून गेला.
नंदिनीने ती चिठ्ठी आपल्या हातमोजांत दडवली.
परतल्यानंतर तिने ती चिठ्ठी वाचली.
ते एक प्रेमपत्र होते.
तें एका इंग्रजी कादंबरीतून हरिरामने ते शब्दशः उचललून भाषांतरीत केले होते.
अर्थात नंदिनीला हें (कॉपी प्रकरण) माहित नव्हते.
तिला ते पत्र आवडले पण आपण अशा मैत्रीला उत्तेजन देता कामा नये, हा तिचा विचार पक्का होता.
तिने त्याला दोन चार ओळी लिहून नम्र नकार कळवला.
तो अधिकारी जात असतांना खिडकीतून तिने चिठ्ठी खाली टाकली.
हरिरामने घाईघाईने ती एका हॉटेलात बसून वाचली.
नकार वाचून तो निराश झाला नाही.
त्याने संधि पाहून दुसरी चिठ्ठी लिहिली.
तिचे उत्तर त्याला मिळालेच नाही.
स्त्रीहृदय असेच असते असा विचार करून तो एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त करतच राहिला.
अखेर त्याला नंदिनीने खिडकीतून खाली टाकलेली अशी चिठ्ठी मिळाली, “आज रात्री “आम्ही राजदूताच्या सभागृहात नृत्याला जाणार आहोत.
आम्ही तिथे दोन वाजेपर्यंत असू.
आम्ही गेल्यावर सर्व नोकर बहुदा निघून जातील किंवा झोपतील.
साडेअकरा वाजतां धीटपणे आंतल्या ओटीवर प्रवेश कर.
जर कोणी पाहिलंच तर बाईसाहेबांची म्हणजे यमुनादेवींची चौकशी कर.
नाही तर पायऱ्या चढून डावीकडे वळ आणि दरवाजा लागेपर्यंत सरळ जा.
तो दरवाजा बाईसाहेबांच्या शयनकक्षामधे उघडतो.
पडद्यांच्या मागे तुला दुसरा एक दरवाजा दिसेल जो माझ्या खोलीकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावर उघडेल.
मी परत येईन तेव्हा माझ्या खोलीत तुझी वाट पाहिन.”
जसजशी ठरलेली वेळ जवळ येऊ लागली तसा हरिराम थरथर कांपू लागला.
त्याने सूचनांचे तंतोतंत पालन केले.
म्हाताऱ्या यमुनादेवींच्या शयनकक्षापर्यंत पोंचायला त्याला कांहीच अडचण आली नाही.
तिथे गेल्यावर मात्र तो (नंदिनीच्या कक्षाकडे न जातां) यमुनादेवींच्या खोलीमधील कपाटांतच लपला.
वेळ फार हळू हळू सरकत होता. अखेरीस त्याला गाडीचा आवाज आला.
दिवे लावले गेले.
नोकरांची लगबग सुरू झाली.
शेवटी म्हाता-या यमुनादेवी लटपटत खोलीत शिरल्या.
त्या पूर्ण थकलेल्या होत्या.
त्यांच्या दासींनी त्यांच्या अंगावरची झूल उतरवली आणि त्यांच्या झोपण्याची तयारी करू लागल्या.
हरिराम हे सर्व कुतुहल आणि अनामिक भिती यांच्या मिश्रणांतून पहात होता.
शेवटी त्या दासींनी एक साधा झगा आणि डोक्याला टोपी एवढाच तिचा झोपी जायचा वेश ठेवला. नृत्यासाठी त्यांनी घातलेला सोन्याचा कशिदा काढलेल्या वेशापेक्षा आता त्या कमी विचित्र भासत होत्या.
त्या संवयीप्रमाणे झोपण्याआधी बाजूच्या आराम खुर्चीत बसल्या आणि सर्व दासी निघून गेल्या.
आजूबाजूला कोणी आहे याची कल्पना नसल्याने त्या हलके झोके घेत तिथे बसल्या असताना हरिराम कपाटाआडून बाहेर आला.
जरासा आवाज होताच यमुनादेवींनी डोळे उघडले आणि चोरून प्रवेश करणाऱ्याकडे आश्चर्याने पाहिले.
“कृपया घाबरू नका.” हरिराम म्हणाला, “मी तुम्हांला त्रास द्यायला आलेलो नाही मला तुमचे उपकार हवेत.”
यमुनादेवी शांतपणे त्याला जमेस न धरतां फक्त समोर पहात होती.
हरिरामला वाटले त्या बहि-या असतील.
म्हणून तो पुन्हा तेच त्यांच्या कानांत बोलला.
परंतु त्या पूर्णत: मूकच राहिल्या.
हरिराम अजीजीने म्हणाला, “तुम्ही मला भाग्यवान करू शकतां.
फक्त मला ते तीन पत्त्यांचे गुपित सांगा आणि…”
हरिराम थांबला कारण यमुनादेवी बोलू पहात होत्या.
“ती केवळ मस्करी होती, मी शपथेवर सांगते ती केवळ मस्करी होती.”
त्यांच्या दुर्बल मुखांतून शब्द उमटले.
हरिराम म्हणाला, “ती चेष्टा नव्हती.
तुम्हाला तुमचा पुतण्या आठवतोय ?
केवळ तुमच्यामुळे तो मोठं कर्ज फेडू शकला.”
क्षणभर म्हाता-या यमुनादेवींच्या चेहऱ्यावर मनांत येणाऱ्या रागाचा ताण दिसला पण पुढच्या क्षणी तो चेहरा परत निर्विकार झाला.
थोडं थांबून हरिरामने विचारलं, “तुम्ही मला ते गुपित सांगणार आहांत की नाही ?”
त्याला कांही उत्तर मिळाले नाही.
मग हरिरामने खिशांतले पिस्तुल बाहेर काढले व तो म्हणाला, “म्हाताऱ्या चेटकीणी, मी तुला ते मला सांगायला लावीनच.
पिस्तुल पाहून यमुनादेवींनी दुसऱ्यांदा जिवंत असल्याचे चिन्ह दाखवले आणि डोके मागे सारत हात हवेत उडवले जणू त्या स्वतःचे रक्षण करू पहात होत्या.
मग ते हात खाली लोंबकळले आणि त्या शांत झाल्या.
हरिराम त्यांचा बाव्हटा धरून त्यांना पुन्हां धमकी देणारच होता, तोच त्याच्या लक्षांत आले की त्या मेल्या आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~
स्वतःच्याच खोलीत बसलेली, अजून वेश न बदललेली नंदिनी तिथे तो हरिराम असणार अशी अपेक्षा करत होती पण तो खोलीत नाही हे पाहून तिला सुटका झाल्यासारखे वाटले.
आश्चर्य म्हणजे त्याच रात्री नृत्याच्या वेळी राजारामने तिला सांगितले होते, “तुला वाटते त्यापेक्षा मी अधिक जाणतो. तुला तो सैनिकी अधिकारी जास्त आवडतो ना!”
तिने विचारले होते, “कुणाबद्दल बोलतो आहेस ?”
तिला भिती वाटली की आपले साहस याला कळले की काय ?
त्यावर तो म्हणाला होता. “तोच इंजिनिअरींग तुकडीतला विशेष माणूस, त्याचं नांव हरिराम आहे.”
तो पुढे म्हणाला होता, “हा हरिराम, रोमांचक व्यक्ती आहे.
तो रामासारखा भासतो पण त्याचे हृदय रावणाचे आहे.
असे म्हणतात की किमान तीन गुन्हे त्याच्या अंतर्मनाला छळत असावेत.
अरे, पण तुला काय झाले ? तू एवढी फिकट कां पडलीस ?”
ती म्हणाली होती, “थोडं डोकं दुखतंय !
पण तू ह्या हरिरामबद्दल मला कां सांगतोयस ?”
तो म्हणाला होता, “कारण त्याचा तुझ्यावर डोळा आहे.”
तिने विचारलं, “त्याने कधी पाहिलं मला ?”
“कदाचित एखाद्या समारंभात किंवा रस्त्यावर ! “ तो म्हणाला.
त्यांचा संवाद तिथेच थांबला होता.
राजारामच्या शब्दांनी तिच्या मनावर खोल परिणाम केला होता.
आपण किती मूर्खपणे वागलो ह्याचा ती विचार करत असतानाच तिच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि हरिराम तिच्या समोर उभा ठाकला.
ती थरथरत मागे सरली.
तिने घाबरत विचारले, “तू कुठे होतास ?”
शांत स्वरांत उत्तर आले, “मी यमुनादेवींच्या शयनकक्षांत होतो.
त्या आता मेल्या आहेत.”
“अरे देवा ! काय सांगतोयस तू ?”
तो पुढे म्हणाला, “आणि मला वाटतय मीच त्यांच्या मृत्यूचं कारण आहे.”
नंदिनीला राजारामचे शब्द आठवले.
हरिराम बसला आणि त्याने तिला सर्व सांगितले.
नंदिनी भय आणि तिरस्कार ह्यासह ते बोलणं ऐकत होती.
म्हणजे तें प्रेमाने ओथंबलेलं पत्र, पाठलाग हे सर्व आपल्या अनमोल प्रेमासाठी नव्हतचं तर.
त्याला पैसा हवा होता, त्यासाठी गुपित हवे होते.
त्या बिचारीला वाटले एका अर्थी ती तिच्या मालकीणीच्या मृत्यूला कारण झालेल्या कृत्यांतली साथीदार ठरली.
ती खूप रडू लागली.
हरिराम शांतपणे तिच्याकडे पहात होता.
“तू राक्षस आहेस.” ती म्हणाली.
“मी त्यांना मारणार नव्हतो. माझ्या पिस्तुलांत गोळ्याही नव्हत्या.”हर्मन म्हणाला.
नंदिनीने विचारले, “तू घरांतून बाहेर कसा जाणार आहेस ?
मी बाईसाहेब झोपलेल्या असतांना त्यांच्या कक्षातून बाहेर जाणाऱ्या रस्त्याने तुला बाहेर सोडणार होते पण आता उजेड झाल्यामुळे ते शक्य नाही.”
हरिराम म्हणाला, “तू मला फक्त कसं जायचं ते सांग.
मी मार्ग शोधून काढीन.”
तिने त्याला सर्व सूचना दिल्या व शेवटच्या बाहेरच्या दरवाजाची छोटी चावी दिली.
तिचा थंडगार पडलेला हात दाबून हरिराम बाहेर पडला.
यमुनादेवींच्या मृ्त्यूबद्दल कुणालाही आश्चर्य वाटलं नाही कारण खूप काळापासून ते अपेक्षित होतं.
त्यांच्या शवयात्रेला सर्व हजर राहिले.
हरिराम, त्याच्याकड लक्ष जाईल असं न वागतां, सहजपणे इतरांत मिसळला.
सर्वांनी तिचे अंत्य दर्शन घेतल्यावर तो तिच्या शवापाशी गेला व शवासमोर साष्टांग नमस्कार करून तसाच बराच वेळ राहिला.
जेव्हां तो उठला तेव्हा त्याचा चेहरा भितीने प्रेतासारखाच पांढरा पडला होता.
कारण ते शव हलले असे त्याला वाटले.
मग त्याने शवाच्या चेह-याकडे नजर टाकली.
त्याला भास झाला की यमुनादेवींचा निर्जीव चेहरा आपल्याकडे चेष्टेने पहात आहे आणि एक डोळा मिचकावत आहे.
तो गर्रकन फिरला, एक पाऊल चुकला व खाली पडला.
त्याला इतरांनी उभा केला.
त्याचवेळी चक्कर आलेल्या नंदिनीला तिथून उचलून न्यावं लागलं.
संपूर्ण दिवसांत हरिराम पुन्हा पूर्वपदावर आला नाही.
तो मेसमधे न जेवतां बाहेरच जेवला आणि भिती दडपण्यासाठी खूप प्याला.
पण पिण्याने त्याची कल्पनाशक्ती त्याला अधिकच त्रास देऊ लागली.
घरी येऊन कपडे न बदलताच तो पडून राहिला.
रात्री तो दचकून जागा झाला.
कोणीतरी खिडकीपाशी उभं आहे असं त्याला वाटलं.
बहुदा आॅर्डर्ली असावा, त्याने दुर्लक्ष केलं.
पण थोड्याच वेळांत कुणाची तरी पावले वाजली.
सपातांचा आवाज येत होता.
त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि सफेद साडींतील एक स्त्री त्याच्या पलंगाजवळ आली.
भेदरलेल्या हरिरामने यमुनादेवींना ओळखले.
त्या म्हणाल्या, “मी माझ्या इच्छेविरूध्द आले आहे.
पण मला तशी आज्ञा केली गेली आहे की मी तुझी इच्छा पुरी करावी.
मी जादूने तुझा एक डाव प्रभावित करत आहे.
ते तीन जादूई पत्ते असतील, ‘तिर्री, सत्ती आणि एक्का.’
मात्र तीनही पत्ते रोज एक प्रमाणे एकदाच तीन दिवस वापरायचेत.
पुन्हां कधी हा जुगार खेळायचा नाही.
मग यमुनादेवींचे भूत परत फिरले आणि परत गेले.
पुन्हा जाताना हरिरामला तें खिडकीजवळ दिसले.
तो उठला, बाहेर जाऊन त्याने पाहिले.
आर्डर्ली जमिनीवर झोंपला होता.
भूताचा पत्ता नव्हता.
तो परत आत आला व त्याने ऐकलेले सर्व लिहून ठेवले.
ज्याप्रमाणे दोन वस्तु एकच जागा व्यापू शकत नाहीत त्याचप्रमाणे दोन कल्पना माणसाच्या मनांत एकाच वेळी राहू शकत नाहीत.
लौकरच ‘तिर्री, सत्ती आणि एक्का” तरूण अधिकाऱ्याच्या मनांत घुमू लागले व मेलेल्या यमुनादेवींचे विचार पळून गेले.
आता त्याच्या मनांत एकच विचार होता की हे महत्प्रयासांनी मिळवलेले हे गुपित वापरून पैसा कसा करायचा ?
सैन्यातली नोकरी सोडून पॅरीसला जावे आणि तिथे गुपित वापरून भाग्यवान व्हावे, असाही विचार त्याच्या मनांत आला.
~~~~~~~~~~~~~~~~~
योगायोगाने त्याच सुमारास मॅरियट नांवाच्या एका इंग्रज माणसाने, कलकत्त्यातच जुगाराचा क्लब सुरू केला होता.
त्याच्या दीर्घ अनुभवामुळे त्याच्यावर सर्वांचा विश्वास होता व तो आतिथ्याबद्दलही प्रसिध्द असल्याने लौकरच त्याच्याभोवती सधन लोक गोळा झाले.
मेजर शिंदेने हरिरामला आपल्याबरोबर क्लबमधे येण्याचे आमंत्रण दिले आणि तरूण हरिरामने ते आनंदाने स्वीकारले.
दोघे तिथे पोहोचले, तेव्हां क्लब अगदी भरलेला होता.
मोठे सैनिकी आणि सरकारी अधिकारी ब्रिज खेळत होते.
तरूण सोफ्यावर आरामांत सिगार ओढत, कांही खात पीत बसले होते.
मध्यभागी एक मोठं टेबलं होतं.
त्यावर वीस जण जुगार खेळत होते, जागेचा मालक मॅरियट हाच खेळ चालवत होता.
तो साठ वर्षांचा, केस पांढरे झालेला व आदर वाटावा असा होता.
त्याचा चेहरा प्रसन्न होता.
त्याचे डोळे चमकदार होते आणि हास्य सतत त्याच्या चेहऱ्यावर विलसत होतं.
मेजर शिंदेने त्याची व हरिरामची ओळख करून दिली.
दोघांनी हस्तांदोलन केलं आणि यजमानाने त्यांना सांगितलं की औपचारिकता सोडा आणि सामिल व्हा.
तो परत पत्ते पिसू लागला.
आधीच तीसपेक्षा अधिक पत्ते टेबलावर होते.
यजमान मॅरियट प्रत्येक फेरीनंतर थोडा थांबत होता आणि सर्वांना आपण किती जिंकलो वा हरलो ह्याचा हिशोब करू देत होता.
सर्वांच्या प्रश्नांची नम्र उत्तरे देत होता आणि त्याच्या चेह-यावरचं हास्य कायम होतं.
डाव संपल्यावर पत्ते परत पिसतांना हरिराम म्हणाला, “मलाही पत्ता निवडायला संधी द्या.”
असे म्हणून त्याने आपला हात एका जाड्या माणसाच्या डोक्यावरून टेबलाकडे नेलाही.
यजमान मॅरियटने कांही न बोलता मानेनेच होकार दिला.
हरिरामने पत्ता निवडला व आपण लावलेली रक्कम कागदावर लिहिली.
मालक मॅरियटने विचारले “किती आहे ती ? मला जरा नीट दिसत नाही.”
हरिराम शांतपणे म्हणाला, “पन्नास हजार रूपये.”
सर्वांच्या नजरा हरिरामकडे वळल्या. मेजर शिंदे म्हणाला, “बुध्दी फिरली काय तुझी ?”
यजमान मॅरियट हंसत म्हणाला, “तुम्ही लावलेली रक्कम खूपच भारी आहे, हे मी तुमच्या लक्षांत आणून देऊ इच्छितो.”
हरिराम म्हणाला, “त्याचं काय ?
तुम्ही ती स्वीकारताय की नाही, तें सांगा.”
यजमानाने होकार देत म्हटले “मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की रोकड तयार ठेवावी लागेल.
तुमचा शब्द माझ्यासाठी पुरेसा आहे.”
हरिरामने बॅगेतून चेक काढला आणि यजमानाकडे दिला.
त्याने तो तपासला व पत्त्याबरोबर ठेवला.
यजमानाने पत्ते काढायला सुरूवात केली.
उजवीकडे नववी तर डावीकडे तिर्री.
हरिरामने आपल्या हातातली तिर्री दाखवली आणि म्हणाला तिर्री जिंकली.
लोकांच्यात कुजबुज सुरू झाली. यजमान मॅरियट क्षणभर विचलित झाला, मग त्याचं हास्य परत आलं.
त्याने आपल्या खिशातून एक लाखाच्या नोटा बाहेर काढल्या व आवश्यक रक्कम मोजून हरिरामला दिली.
हरिरामने पैसे घेतले व तात्काळ तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तो परत तिथे आला.
सर्व कुतुहलाने त्याच्याकडे पहात होते आणि यजमानाने त्याचे हंसून स्वागत केले.
हरिरामने एक पत्ता बघून काढला.
त्यावर आपली रक्कम पंचाहत्तर हजार लावली.
यजमान मॅरियटने पत्ते पिसून वाटायला सुरूवात केली.
उजवीकडे नववी तर डावीकडे सत्ती.
हरिरामने लागलीच आपले कांर्ड दाखवले, सत्ती.
प्रेक्षक अचंभित तर यजमान जरा व्यथित.
पण मोजून एक लाख पन्नास हजार रूपये हरिरामला दिले.
हरिरामने यत्किंचितही आश्चर्य न दाखवता ते घेतले व तो लागलीच तिथून निघून गेला.
पुन्हा पुढच्या संध्याकाळी तो तिथे हजर झाला.
तो येताच बाकी सर्व खेळ बंद झाले सगळे पुढे काय होतंय तें पहायला उत्सुक होते.
हरिरामने आपला पत्ता निवडला.
एक्का.
हरिरामने दोन लाखांची बोली लावली.
पत्ते वाटणं सुरू झालं.
उजवीकडे राणी आणि डावीकडे एक्का.
आपला पत्ता उघड करत पत्त्याकडे न पहातांच हरिराम ओरडला, “एक्का जिंकला.
हा पहा. आणा चार लाख रूपये.”
मॅरियट शांतपणे म्हणाला, “तुझी राणी आहे. ती ह्या एक्क्याने मारली गेली.”
हरिरामचा थरकांप झाला; त्याने आपला पत्ता पाहिला.
तिथे त्याने निवडलेला एक्का नव्हता तर इस्पिकची राणी होती. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
एक्क्याऐवजी राणी निवडण्याची चूक तो करणं शक्यच नव्हतं.
मग एक्का गायब होऊन तिकडे व राणी इकडे असे कसे झाले?
तो त्या पत्त्याकडे पहात असतांनाच त्याला वाटले की त्या यमुनादेवीसारख्या दिसणा-या इस्पिकच्या राणीने आपला उजवा डोळा त्याच्याकडे पाहून मिचकावला.
तो स्वत:वरचा ताबा हरवून बोलला, “लबाड म्हातारडी!”
तो आपली चूक पहात असतानाच यजमान मॅरियटने दोन लाख मोजून घेतले.
तो जायला निघाला तेव्हा सर्वांनी त्याला वाट करून दिली.
पत्ते परत वाटले गेले.
खेळ चालू राहिला.
हरिराम वेडा झाला.
त्याला हॉस्पिटलमधे ठेवावे लागले, जिथे तो कुणाशीही बोलत नसे.
फक्त एकाच स्वरांत
‘तिर्री, सत्ती, एक्का ! तिर्री, सत्ती, राणी !’ एवढच बोलत असे.
~~~~~~~~~~~~~~~~~

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा : द क्वीन ऑफ स्पेडस

मूळ लेखक : ॲलेक्झँडर पुश्कीन (१७९९ – १८३७)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..