नवीन लेखन...

आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आणि खंडणी (संक्षिप्त रूपांतरीत कथा २५)

मी, येश्या म्हणजे यशवंत आणि काश्या म्हणजे काशीनाथ, आम्ही तेव्हा गडहिंग्लजजवळ होतो आणि आम्हाला एखाद्या मुलाला पळवून खंडणी मागायची कल्पना सुचली.
शहरांत लोकांना चीट फंडासारख्या स्कीममधे फसवणं हा आमचा धंदा.
तो करायला थोडं भांडवल लागतं.
काश्याकडे आणि माझ्याकडे मिळून जेमतेम दहा हजार रूपये होते.
आम्हाला आणखी पंधरा-वीस हजार रूपयांची गरज होती.
तेव्हा ही मूल पळवण्याची कल्पना सुचली.
जवळच एक गांव होतं.
बहुतेक शेतकरी. आपल्या कुटुंबावर, विशेषतः मुलांवर, खूप प्रेम करणारे.
शहरापासून दूर असलेल्या गावचे मूल पळवणे सोपे.
गाजावाजा कमी.
ह्या आडगांवात कदाचित एखादा पोलिस पोंचला असता.
तो सुध्दा चार दिवसांनी.
आम्ही गांवातल्या सरपंचाच पोरगंच पळवायच ठरवलं.
सरपंचाला गांवात मान होता.
तो थोडीफार सावकारी पण करायचा.
पोरगं ९-१० वर्षाच होतं.
त्याचे केस कुरळे होते आणि रंगाने तो थोडा उजळ होता.
त्या गोंडस पोरासाठी सरपंच पंचवीस हजार द्यायला एका पायावर तयार होणार ह्याची खात्री होती.
गांवापासून दोन मैलांवर एक डोंगर होता.
तिथे घनदाट झाडी होती.
डोंगराच्या मागच्या उतारावर एक गुंफा होती.
तिथे आम्ही आमचं सर्व सामान ठेवलं होतं.
संध्याकाळी जवळच्याच गांवातून जीप भाड्याने घेऊन आम्ही सरपंचाच्या घरावरून फेरी मारली.
सरपंचाच पोरगं दिसलं आम्हाला.
समोरच्या भिंतीवरल्या मांजराला दगडं मारत होतं.
काश्याने त्याला विचारलं, “ए पोरा, येतो काय फिरायला ? हे चाॅकलेट घे.”
पोराने एक विटेचा तुकडा नेम धरून काश्याच्या डोळ्यावर मारला आणि तो म्हणाला, “आलो की पण फक्त चाॅकलेटवर भागणार नाही. पाचशे रूपये द्यायला लागतील.”
असं म्हणत तो आमच्या जीपवर चढला.
आम्ही त्याला दोघांच्या मधे जागा दिली.
गावाच्या बाहेर येताच मी त्याचे तोंड दाबून धरले आणि दोघानी मिळून त्याला तोंड, हात पाय बांधून खाली आडवा टाकला.
मुलाने चांगलाच प्रतिकार केला पण आम्हां दोघांपुढे त्याचं कांही चाललं नाही.
आम्ही त्याला गुंफेत घेऊन आलो.
मी गाडी खालीच ठेवली होती.
काळोख झाल्यावर मी गाडी शेजारच्या गावात जाऊन परत दिली.
येतांना गुंफेपर्यंत चालत आलो.
पोराने बोचकारल्यामुळे अंगावर झालेल्या जखमांना काश्या हळद लावत होता.
गुंफेच्या तोंडाजवळ खडकामागे विस्तव होता.
मुलगा उकळणाऱ्या काॅफीकडे पहात होता.
त्याने एक लाल कापडाची पट्टी कपाळाच्या वर गुंडाळली होती आणि बहिरी ससाण्याची पिसे त्यात खोवली होती.
त्याच्या हातात छोटी काठी होती.
मला पाहताच माझ्यावर काठी रोखत तो म्हणाला, “नागनाथ,तिथेच थांब, आफ्रिकन जमातीच्या म्होरक्याच्या छावणीत प्रवेश करायची तुझी हिंमत कशी झाली ?”
काश्या आपली विजार वर करून पोटरीवर औषध लावत म्हणाला, “तो आता ठीक आहे.
आम्ही एक नाटक करतोय.
तो एका आफ्रिकन जमातीचा म्होरक्या आहे आणि मी त्याच्या टोळीने पकडलेला माणूस आहे.
उद्या सकाळी मला शिक्षा म्हणून माझे मुंडन करून मग डोक्याची चामडी काढायचा हुकुम आहे म्होरक्याचा.
येश्या, ह्या पोराची लाथ भारी लागते रे !”
पोरगं तर एकदम खुशीत होतं.
आयुष्यात प्रथमच मनासारखं करता येतयं असंच त्याला वाटत असावं.
गुंफेमधे रहाण्यात त्याला मजा वाटत होती आणि तो स्वतः बंदी आहे, हे तो विसरलाच होता.
त्याने मला नवेच नाव दिले, “नागनाथ”.
माझे डोळे सापासारखे दिसतात म्हणाला.
मला गुप्तहेर ठरवून म्होरक्याचे शिलेदार परत आले की उद्याच्या सूर्योदयाबरोबर मला खांबाला बांधून जाळून टाकण्याची शिक्षाही त्याने जाहिर केली.
आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो.
पोरगं घाईघाईने सगळं तोंडात कोंबत होतं.
काश्या आणि मी सावकाश खात होतो तोवर त्याने फन्ना पाडला.
समोसा तोंडात कोंबून तो बडबडू लागला, “मला खूप मजा वाटतेय-मी कधी पूर्वी असा सहलीला गेलो नव्हतो-माझ्याकडे एक पाळलेलं रानमांजर होतं-गेल्या वाढदिवसाला मला नऊ वर्षे पूर्ण झाली-मला शाळेत जायचा खूप कंटाळा येतो-उंदरांनी मामाकडल्या कोंबडीची सोळा अंडी खाल्ली-अशा आफ्रिकन जमाती खरंच आहेत कां-मला आणखी थोडा रस्सा दे-ही झाडं हलून हलून वारा तयार करतात का-माझ्याकडे पूर्वी कुत्र्याची पांच पिल्लं होती-तुझं नाक वाकडं कां आहे-माझ्या बापाकडे खूप पैसा आहे-आकाशातले तारे गरम असतात कां-गेल्या आठवड्यात शेजारच्या शाळेतल्या बबड्याला दोनदां बुकललं-मला मुली आवडत नाहीत-मी दोरा बांधून बेडूक पकडतो-बैल हम्मा करतात कां-संत्री गोल कां असतात-ह्या गुंफेत झोपायला गाद्या आहेत कां-वर्गातल्या अशोकला सहा बोटं आहेत-किती वस्तू मिळून बारा होतात ?”
एका दमात एवढं बडबडणाऱ्याच्या एवढ्याशा डोक्यात काय काय ठांसून भरलं होतं कुणास ठाऊक ?
पण बापाकडे खूप पैसा आहे म्हणाला ते ऐकून बरं वाटलं
थोड्या थोड्या वेळाने त्याला आठवण यायची की आपण टोळीचा म्होरक्या आहोत.
मग तो आपली काठी बंदुकीसारखी धरून गुंफेच्या दारापर्यत गस्त घालत असे.
मधेच त्याचे साथीदार आले कां ते पाहून येई.
थोड्या थोड्या वेळाने तो लढाईत देतात तशी आरोळी मारायचा आणि काश्याला कांपरं भरायचं.
सुरूवातीपासूनच त्याने पोराचा धसका घेतला होता.
मी पोराला म्हणालो, “ओ म्होरके, तुम्हाला घरी जायचंय काय ?”
पोरग म्हणालं, “छ्या ! कशाला घरी जायचं ? मला शाळेत जायला बिलकुल आवडत नाही. घरी कांही मजा नाही. मला असं बाहेरच आवडतं.ए नागनाथ, मला घरी परत नाय न्यायचं, हां ! सांगून ठेवतोय ! काय?”
मी म्हणालो, “आताच नाही रे !
थोडे दिवस इथे गुंफेतच राहू आपण.”
पोरगं म्हणालं, “हां, हे ठीक आहे.”
अकरा वाजता आम्ही चादरी गोधड्या घातल्या आणि पोराला दोघांच्यामधे झोपवलं.
बाहेर पानांची थोडी सळसळ झाली की त्याच्या कल्पक मनाला वाटे की कोणी शत्रु आला किंवा जनावर आलं तो माझ्या आणि काशाच्या कानांत सांगे,
“सावधान, बहुतेक बिबळ्या येतोय.”
त्याने आम्हाला तीन तास असं जागं ठेवलं.
शेवटी मला गुंगी येऊन अर्धवट झोप आली.
त्यांत मी स्वप्न पाहिलं की जहाजावरच्या केसांच्या झिपऱ्या असलेल्या, एका भयानक दिसणाऱ्या चांच्याने मलाच पळवलंय आणि एका झाडाला बांधून ठेवलंय.
पहाटे मला काश्याच्या भयंकर किंचाळ्यांनी जाग आली.
ते ओरडणं पुरूषाचं वाटलं नाही तर बायका झुरळ पहातांच घाबरून जोराने भान सोडून किंचाळतात त्या प्रकारचं होतं.
एक जाडा, सशक्त पुरूष गुंफेमध्ये पहाटेच असा किंचाळतांना ऐकणं दु:खद होतं.
काय झालं हे पहायला मी उडी मारून उठलो.
म्होरक्या काश्याच्या छातीवर बसला होता.
एका हाताने त्याने काश्याचे केस धरले होते.
त्याच्या दुसऱ्या हातात आम्ही पाव कापायला वापरतो ती सुरी होती आणि तो अगदी चिकाटीने आणि मेहनतीने काश्याचा चकोट करण्याचा व त्याची कातडी भादरण्याचा प्रयत्न करत होता.
काश्याला दिलेली शिक्षा तो अंमलात आणत होता.
मी पोराच्या हातातली सुरी काढून घेतली आणि त्याला परत झोपायला लावले पण तेव्हापासून काश्याची हिंम्मत तुटली.
तो आपल्या जागेवर परत झोपला पण पोरगं जोपर्यंत आमच्याबरोबर होतं, तोपर्यंत त्याने कधीच डोळे बंद केले नाहीत.
मी परत थोडी डुलकी काढली पण मला मध्येच आठवण झाली की सकाळ झाल्यावर खांबाला बांधून मला जाळण्याची शिक्षा म्होरक्याने सुनावली होती.
मी घाबरलो नाही की अस्वस्थ झालो नाही पण उठलो आणि बाहेर येऊन एका मोठ्या खडकाला टेकून उभा राहिलो आणि विडी पिऊ लागलो.
काश्याने मला विचारले, “येश्या, एवढ्या लवकर कसा उठलास ? घाबरलास ?”
मी म्हणालो, “मी आणि घाबरलो. छे ! खांदा भरून आला म्हणून मला वाटले, जरा बाहेर आलो.”
“खोटारडा आहेस !” काश्या म्हणाला, “तू घाबरला आहेस. तुला खांबाला बांधून जाळण्याची शिक्षा दिलीय ना त्याने.त्याच्या हातात काडेपेटी मिळाली तर तो शिक्षा अंमलातही आणेल.येश्या, हे भयानक आहे ना ! तुला वाटतं, अशा कार्ट्याला परत घरी नेण्यासाठी कोणी खंडणी देईल ?”
मी म्हटलं, “नक्कीच! असा गुंड-पुंड मुलगाच आईबापांचा लाडका असतो.
आता तुम्ही दोघे न्याहरीची तयारी करा.
मी डोंगरमाथ्यावरून टेहळणी करून येतो.”
मी त्या डोंगराच्या माथ्यावर गेलो आणि सभोवार पाहिले.
मी त्या गांवाच्या दिशेने पाहिलं.
मला वाटलं होतं की तिथले गांवकरी आतापर्यंत हातात विळे, लाठ्या, काठ्या घेऊन मूल पळवणाऱ्यांच्या शोधात बाहेर पडलेले दिसतील.
पण गांव एकदम शांत होता.
फक्त एका शेतात एकजण नांगरणी करत होता.
कोणी नदी, नाले शोधत नव्हतं आणि कुणाचीही कसलीही धावपळ नव्हती.
कुणी पालक बातमीची उत्सुकतेने वाट पहात बाहेर उभे असलेले दिसत नव्हते.
मला त्या डोंगरावरून ते गाव अगदी नेहमीसारखेच शांत झोपलेले दिसत होते.
मी विचार केला, “बहुतेक लांडग्यांनी शेळी पळवली, हे अजून ह्यांच्या लक्षातच आले नसावे. लांडग्यांचा विजय असो.”
मग मी डोंगर उतरून न्याहरी करण्यासाठी खाली आलो.
मी गुंफेत पोहोचलो तेव्हां काश्या भिंतीला पाठ लावून उभा होता आणि त्याला धांप लागली होती.
पोरगं थोड्या अंतरावर हातात नारळाच्या अर्ध्या एवढा धोंडा घेऊन नेम धरून त्याला मारायची धमकी देत होतं.
काश्या म्हणाला, “ह्याने माझ्या पाठीवर उकडलेला गरमगरम बटाटा ठेवला. मग पायांनी पाठीवरच चुरडला. मी रागाने त्याचे कान उपटले.”
मी पोराच्या हातातून दगड काढून घेतला.
पोरगं काश्याला म्हणालं, “मी तुला बघून घेईन. म्होरक्याला हात लावून आतापर्यंत कोणीही सुटलेला नाही, त्याला शिक्षा होतेच !”
न्याहरी झाल्यावर पोरगं खिशांतला एक चामड्याचा तुकडा हातात घेऊन गुंफेबाहेर गेलं.
“येश्या, ह्याचा आता काय बेत असावा. तो पळून जाईल काय ?”
काश्याने उत्सुकतेने विचारले.
“तशी शक्यता नाही. त्याला घराची बिलकूल ओढ दिसत नाही. आपल्याला खंडणी वसूल करण्यासाठी कांही तरी बेत ठरवला पाहिजे. गांवामधे फारशी गडबड दिसली नाही. कदाचित त्यांना हा पळवला गेलाय, हेच अजून लक्षांत आलं नसेल. तो शेजारच्या मावशीकडे वगैरे राहिला असेल, असा समज झाला असेल त्यांचा.
आज नक्की त्यांच्या लक्षांत येईल. आपला पन्नास हजार रूपये मागणारा निरोप त्याच्या बापापर्यंत पोचवायला हवा.”
तेवढ्यात आम्हाला लढाईच्या आरोळ्या ऐकू आल्या.
राक्षसांबरोबर युध्द सुरू करण्याआधी वानरांनी मारल्या असतील तशा.
म्होरक्याने खिशातून गोफण काढली होती आणि तो ती गरगर फिरवत होता, मी पटकन वांकून त्याचा मारा चुकवला आणि फट् असा आवाज झालेला ऐकला.
त्याचबरोबर काश्याचा ‘आह्’ असा कळवळल्याचा आवाज आला.
एक अंड्याएवढा दगड काश्याच्या कानशीलावर लागला आणि काश्या कळवळून ओंडक्यासारखा पडला तो नेमका बाजूला पाणी उकळत असलेल्या कथलाच्या टोपातच.
मी त्याला ओढून बाहेर काढला आणि अर्धा तास त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतत बसलो.
काश्या म्हणाला, “मला पुराणातली कुठली व्यक्ती आवडते माहीत आहे ?”
मी म्हणालो, “काश्या, काळजी करू नकोस. तू ठीक होशील.”
तो म्हणाला, “कंस आवडतो. गोकुळातली सगळी कार्टी मारायला पुतनेला पाठवणारा कंस. येश्या, तू मला एकट्याला सोडून नक्की जाणार नाहीस ना !”
मी बाहेर गेलो आणि पोरग्याची बकोट धरून त्याचे डोळे बाहेर येईपर्यंत त्याला गरागरा फिरवला.
मग त्याला म्हणालो, “जर माझं ऐकलं नाहीस तर तुला घरी परत सोडून येईन. सरळ वागणार की नाही बोल.”
तो म्हणाला, “मी मजा करत होतो. मी काही काश्यामामाला मारणार नव्हतो. चुकून लागलं त्याला. पण त्याने मला कां मारलं ? आता नाही मी परत असं करणार. नागनाथ, तुम्ही मला परत घरी नाही पाठवलंत आणि मला ‘सरदार’खेळ खेळू दिलात तर मी सरळ वागेन.”
“सरदार खेळ मला माहित नाही. तू काश्यामामाबरोबर ठरव काय खेळायचं तें. तो तुझा आजचा सवंगडी.
आता आत ये आणि त्याला दगड मारल्याबद्दल त्याची माफी माग. ताबडतोब.”
मी दोघांना एकत्र आणलं.
काश्याला बाजूला घेऊन सांगितलं की दुसऱ्या जवळच्या गावात जाऊन पहातो की ह्या गांवची काही बातमी कळते कां ?
शिवाय खंडणी मागणारं आणि ती कशी पोचवायची हे सांगणारं पत्रही पाठवायचय.
काश्या म्हणाला, “येश्या, तुला ठाऊक आहे की मी वाऱ्यावादळात, पाऊसपाण्यात, चोरी करताना, जुगारात लबाडी करताना, गाडीवर दरोडा घालतांना, पोलिसांची धाड आली असतांना, सदैव तुझी साथ दिली आहे.
कधीच कच खाल्ली नाही. पण हे दोन पायांच जिवंत अस्त्र मला नाही झेपत बाबा. तू मला सोडून जास्त वेळ बाहेर राहू नकोस !”
“मी दुपारी परत येईन. तोपर्यंत ह्या मुलाची करमणूक कर. आपण आता सरपंचाला पाठवायचे पत्र लिहूया.”
मी म्हणालो.
मग कागद आणि पेन्सिल घेऊन दोघे बसलो आणि पत्र तयार केले.
तोपर्यंत म्होरक्या अंगाला वाकळ लपेटून गुंफेच्या दारापर्यंत गस्त घालत होता.
काश्याने अजीजीने मला सांगितलं की ह्या द्वाड पोरासाठी पंचवीस हजार खंडणी कोणी देणार नाही तर रक्कम कमी माग.
तो म्हणाला, “मी आईबापांच्या मुलावरील प्रेमाची शंका घेत नाही पण आपण माणसांशी व्यवहार करतोय आणि कुणीही माणूस हे रानमांजर घेऊन जाण्यासाठी पंचवीस हजार खर्चायला तयार होईल असं वाटत नाही. तेव्हा वीस हजार खूप झाले. मला माझा वाटा कमी दे.”
काश्याला बरं वाटावं म्हणून मी वीस हजार लिहिले.
पत्र असं झालं होतं.
“सरपंच,
आम्ही तुमच्या मुलाला गांवापासून दूरवर एका ठिकाणी ठेवलंय.
चलाख गुप्तहेराला पण तो सांपडणार नाही.
फक्त पुढील अटींवर तो तुम्हाला परत मिळेल :
आम्ही तुमच्याकडे वीस हजार रूपयांची खंडणी मागत आहोत. पैसे आज मध्यरात्री पुढे सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचे.
ह्या अटी जर मान्य असतील तर आज रात्री आठ वाजतां उत्तर पाठवा.
घुबड पूल ओलांडल्यावर शेजारच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळच असणाऱ्या शेताच्या भिंतीशी तीन मोठे वृक्ष एकमेकांपासून तीनशे फूटावर आहेत.
तिसऱ्या झाडाच्या समोर भिंतीच्या बुडाशी एक छोटी लांकडी पेटी असेल.
तुमचा एक निरोप्या उत्तर त्यात ठेऊन लागलीच गांवी परतेल.
तुम्ही जर आमचा विश्वासघात केलात किंवा आमची मागणी पूर्ण केली नाहीत तर तुमच्या मुलाचं तोंड तुम्हाला परत दिसणार नाही.
ह्या अटी बदलणार नाहीत.
जर आमची मागणी पुरी केलीत तर मुलाला तीन तासांत गावात परत सोडण्यात येईल.
ह्या अटी जशाच्या तशा मान्य केल्या नाहीत तर पुन्हा ह्या बाबतीत पत्रव्यवहार केला जाणार नाही.
दोन खतरनाक इसम.
वर सरपंचाचा पत्ता लिहून मी ते पत्र खिशात ठेवलं.
मी निघणार तोच ते पोरगं येऊन मला म्हणालं, “नागनाथ मामा, तुम्ही बाहेर जाल तेव्हा मला खेळायला परवानगी दिलीय ना !”
मी म्हणालो, “हो खेळ ना !
काश्या खेळेल तुझ्याबरोबर.
कुठला खेळ म्हणाला होतास ?”
“सरदार-सरदार खेळणार आहे.”
“ठीक आहे. हा खेळ बहुदा त्रासदायक नसावा.”
काश्या पोराकडे संशयाने पहात म्हणाला, “मला काय करावं लागेल ?”
पोरगं म्हणालं, “मामा, तुला घोडा व्हायचंय. हात जमीनीवर ठेऊन गुडघे टेकवून चार पायावर उभं रहायचय.
मी सरदार आहे. मला पुण्याला जायचय. घोड्याशिवाय कसा जाणार ?”
मी काश्याला म्हणालो, “आपला बेत तडीस जाईतोवर त्याची मर्जी सांभाळ.”
काश्याने हात जमिनीवर टेकून घोडा केला आणि माझ्याकडे पाहिले.
सांपळ्यात पकडलेल्या सशाच्या डोळ्यातली भिती मला त्याच्या डोळ्यात दिसली.
त्याने कातर आवाजात पोराला विचारले, “पुण्यापर्यंत अंतर किती आहे ?”
सरदार झालेलं पोरगं म्हणालं, “१६० मैल आणि आपल्याला लौकर पोहोचायचंय तेव्हा तुला जोरांत पळावं लागेल.”
पोरगं काश्याच्या पाठीवर चढलं आणि टाच मारावी तसे दोन्ही पाय काश्याच्या बरगड्यांत मारले.
काश्या म्हणाला, “येश्या, कांही कर पण लवकर परत ये. आपण खंडणी पंधरा हजारच ठेवायला हवी होती. ए पोरा ! तंगड्या मारू नकोस. नाहीतर चांगला बडवून काढीन.”
मी शेजारच्या गांवाच्या पोस्ट आॅफीसजवळ उभा राहिलो.
बाजाराला आलेले लोक गप्पा मारत उभे होते.
एक मिशीवाला म्हणाला, “शेजारच्या गांवच्या सरपंचाचा पोरगा गायब हाय म्हणं. हरवला कां पळीवला, कुणास ठाऊक ?”
मला हीच माहिती हवी होती.
मी थोडा तंबाखू विकत घेतला.
उगीचच भाज्यांच्या किंमतीची चौकशी केली.
हळूच पत्र पोस्टात टाकले आणि सटकलो.
एका तासाने त्या गांवची पत्र न्यायला माणूस येईल, तो घेऊन जाईल पत्र.
मी परत गुंफेत आलो तर दोघांचा पत्ता नव्हता.
मी दोघांना सगळीकडे शोधले.
शेवटी “काश्या”, “सरदार” अशा हांका मारायचा धोकाही पत्करला पण उत्तर आले नाही.
मग मी तंबाखू मळत त्यांची वाट पहात बसलो.
अर्ध्या तासाने झुडुपात मला सळसळ ऐकू आली.
काश्या धडपडत बाहेर आला.
त्याचा सारखा तोल जात होता.
त्याच्यामागे हलक्या पावलांनी सरदार चेहऱ्यावर मिष्कील हंसू घेऊन उभा होता.
काश्या थांबला.
आपल्या कपाळावरचा घाम पुसत, काश्या मला उद्देशून बोलू लागला, “येश्या, तुला वाटेल की मी दलबदलू आहे पण माझा नाईलाज होता. मी एक सशक्त आणि स्वसंरक्षण कसं करावं ते जाणणारा माणूस आहे. एक वेळ अशी येते की सगळे मुखवटे गळून पडतात. पोराला मी त्याच्या घराकडे पाठवलं. पूर्वी हुतात्मे होऊन गेले. ज्यांनी भयंकर हाल सोसले पण ठाम राहिले. त्यांच्यापैकी कोणाच्याही वाट्याला असे राक्षसी हाल आले नसतील. मी आपल्या बेताशी आणि तुझ्याशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न केला पण शेवटी सहन करण्याला सीमा असते.”
मी विचारलं, “काय झालं, काश्या ?”
“मी घोडा झालो, सरदार स्वार झाले आणि पुण्यापर्यंतचा १६० मैलांचा प्रवास केला असेल, एक इंच कमी नसेल.
मग मला हरभरे म्हणून दगड चावायला दिले. मग दोन तास त्याच्याबरोबर रस्ता दोन्ही बाजूला कसा जातो, ह्याबद्दल हुज्जत घालावी लागली. रस्ता हिरवाच कां, निळा कां नाही, ह्याच्यावर वाद झाला ? माणूस किती सहन करणार ? शेवटी त्याची काॅलर पकडून डोंगरावरून खाली आणला. वाटेत माझ्या पायांवर त्याने लाथा मारून पाय काळे-निळे केले. दोनदा हाताला चावला. पण शेवटी तो घरी गेला. मी त्याला त्याच्या गावात जायचा रस्ता दाखवला आणि शेवटी एक लाथ मारून त्याचे दहा फूट चालणे कमी करून गावाकडे पाठवला. आपली खंडणी गेली. माफ कर पण नाहीतर काश्याला वेड्यांच्या इस्पितळात रहायला लागलं असतं.”
हे सांगताना काश्या हाश हुश करत होता, धापा टाकत होता पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांती होती.
मी काश्याला म्हटले, “काश्या, तुमच्या घराण्यात कोणी अचानक धक्का बसून गेलेला नाही ना !”
काश्या म्हणाला, “नाही, माझा बाप मलेरियाने गेला.”
मी म्हणालो, “मग ठीक आहे. मागे पहा.”
काश्या मागे वळला आणि ते हंसत असलेलं पोरगं पाहून मटकन खालीच बसला.
तासाभरानंतर मी काश्याला माझा बेत सांगितला.
“आजच्या आज मध्यरात्रीपर्यंत आपण खंडणी घेऊन निघून जाऊ.”
हा बेत ऐकून काश्याला थोडा धीर आला आणि तो पोराकडे बघून हंसला.
जरा बरं वाटलं की तो पोराबरोबर जपानी युध्दाच्या खेळांत रशियन व्हायलाही तयार झाला.
माझी खंडणी मिळवण्याची योजना धंदेवाईक मुले पळवणाऱ्यांपेक्षा चांगलीच होती.
ज्या झाडासमोर त्यानी उत्तर पेटीत ठेवायचे होते, ते रस्त्यावरून सहज दिसणारे होते कारण आजूबाजूच्या शेतात सध्या काहीच नव्हतं.
पोलिसांनी रस्त्यातुनच मला पाहिलं असतं.
पण मी कांही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो.
मी कितीतरी आधीच जाऊन झाडाच्या गर्द फांद्यात लपून बसलो होतो आणि तिथेच थांबणार होतो.
बरोबर वेळेवर गांवाकडून एक सायकल येतांना दिसली.
तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा सायकलला पेडल मारत आला.
त्याने डबा शोधून काढला, खिशातली चिठ्ठी डब्यात ठेवली आणि परत पेडल मारत निघूनही गेला.
मी तरीही एक तास थांबलो.
माझी खात्री पटली की कांही दगा नाही.
मी हळूच झाडावरून खाली उतरलो.
चिठ्ठी घेतली आणि भिंतीला लगटून चालत सरळ जंगलाकडे पोहोचलो व गुंफेचा रस्ता पकडला.
गुंफेत पोहोचल्यावर मी चिठ्ठी उघडली, कंदिलाजवळ आलो आणि काश्यालाही ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचू लागलो.
चिठ्ठी पेनने लिहिली होती आणि अक्षर गिचमीड होतं.
दोन खतरनाक इसमांस,
सभ्य गृहस्थांनो : माझ्या मुलाला माझ्या स्वाधीन परत करण्यासाठी खंडणी मागणारे. तुमचे पत्र आजच्या पोस्टाने मिळाले. मला वाटते तुमच्या मागण्या जरा जास्तच आहेत. मी तुम्हाला ह्या पत्राद्वारे सुधारीत प्रस्ताव देत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही तो स्वीकाराल. तुम्ही बंटीला परत माझ्या ताब्यात द्या आणि मला फक्त पाच हजार रूपये द्या, म्हणजे मी त्याला तुमच्या हातून काढून घेईन. तुम्ही रात्री आलात तर बरं होईल कारण दिवसा आलात आणि बंटीला परत करतांना आमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला पाहिलं तर ते तुमचं काय करतील, त्याची जबाबदारी माझी नाही.
तुमचा आदर करणारा,
सरपंच.
“ही शुध्द चांचेगिरी आहे, भामटेगिरी आहे. उध्दटपणा आहे. ह्यांना…”
मी म्हणत होतो पण तेवढ्यात माझं लक्ष काश्याकडे गेलं.
त्याच्या डोळ्यात अजीजी होती.
एका सशक्त, निष्ठूर व्यक्तीच्या डोळ्यात असते अशी अजीजी.
तो म्हणाला, “येश्या, पाच हजार म्हणजे कांही जास्ती नाहीत आणि आपल्याकडे आहेतही. आणखी एक रात्र इथे हे पोरगं राहिलं तर मला वेड्यांच्या इस्पितळात पोचवेल. हा सरपंच सद्गृहस्थ तर आहेच शिवाय उदारही असला पाहिजे नाहीतर एवढं व्रात्य कार्ट परत घ्यायला एवढीच खंडणी नसती मागितली. आपण संधी नको घालवायला !”
मी म्हणालो, “काश्या, खरं सांगायचं तर आपण शेळी समजून आणलेल्या ह्या कारट्याने माझ्या मेंदूचा पण भुगा केलाय.आपण आजच त्याला त्याच्या घरी पोंचवू, पांच हजारांची खंडणी देऊ आणि ह्या राज्यातून बाहेरच जाऊ.”
आम्ही पोराला रात्री त्याच्या घरी घेऊन गेलो.
आम्ही त्याला सांगितलं की त्याच्या बापाने त्याच्यासाठी चांदीची मूठ असलेली तलवार आणलीय.
तेव्हा तो जायला तयार झाला.
जेव्हा आम्ही सरपंचाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते.
आमच्या पूर्वीच्या बेताप्रमाणे मी ह्यावेळी झाडाखालच्या पेटीतून वीस हजार रूपये खंडणी घेणार होतो.
प्रत्यक्षात काश्या पांच हजार रूपये खंडणी मोजून सरपंचाना देत होता.
जेव्हा पोराच्या लक्षांत आलं की आम्ही त्याला घरी सोडून जाणार, तेव्हा तो किंचाळून, काश्याच्या पायाला घट्ट विळखा घालून जळूसारखा चिकटला.
सरपंचानी प्लॅस्टर ओढून काढावं तसा त्याला हळूहळू खेंचून काढून आपल्या ताब्यांत घेतला.
काश्याने सरपंचाना विचारलं, “तुम्ही त्याला असा किती वेळ धरून ठेवू शकाल ?”
सरपंच म्हणाले, “आता मी पहिल्यासारखा बळकट राहिलो नाही तरी दहा मिनिटे धरून ठेवीन.”
काश्या म्हणाला, “ठीक आहे. तेवढ्यात मी ह्या जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याचीही हद्द ओलांडून कर्नाटकांत पोहोचेन.”
काळोखी रात्र असूनही आणि जाडजूड काश्यापेक्षा जोरात पळणारा असूनही मी जेव्हा पळणाऱ्या काश्याला गांठला तेव्हा तो त्या गांवाच्या वेशीपासून चांगला दोन मैल दूरवर पोंहोचला होता.
— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..