नवीन लेखन...

ओढ्याच्या पल्याड (संक्षिप्त रूपांतरीत कथा ५)

ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं.
खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं.
जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत.
मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं.
त्याबाहेर ती जात नसे.
हाच तिचा खुळेपणा होता.
ती हट्टीकट्टी काळसर रंगाची मध्यमवयाची थोराड बाई होती.l
तिचं खरं नाव जयंती होतं पण मळ्यावरचे सर्वच तिला खुळी म्हणूनच ओळखत.
कारण एकदा बालपणी भितीने ती शहाणपण हरवून बसली होती आणि पुन्हां कधीच ती पूर्ण शहाणी झाली नव्हती.
त्यावेळी पाठच्या झाडीत आरडाओरड, भांडण आणि बंदुकांचा आवाज तिने ऐकला होता.
नंतर थोड्या वेळाने मळ्याचे मालक बळवल्लींचा तरूण मुलगा प्रभाकर चेहरा काळाठिक्कर पडलेल्या आणि संपूर्ण रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिच्या आईच्या त्याच खोपटात आलेला तिने पाहिला होता.
त्याचे मारेकरी त्याच्या पाठलागावर होते.
तिची बालबुध्दी ते दृश्य पाहून भयचकीत झाली होती.
ती त्या खोपटात आता एकटीच रहात होती.
तिच्या आजूबाजूची खोपटं तिथून दुसरीकडे हलवली होती पण खुळी तिथेच राहिली होती.
पुरुषांपेक्षा जास्त ताकद असलेली खुळी आपल्या छोट्या शेतात मका, कापूस, तंबाखू लावून त्यांच्यापेक्षा जास्त पीक घेई.
तिच्या खुळ्या कल्पनेत काय असेल त्याव्यतिरीक्त ओढ्यापल्याडचं खरं जग कसं आहे हे तिला अनेक वर्षांपासून ठाऊक नव्हतं.

मळ्यावरच्या लोकांनाही तिच्या वागण्याची संवय झाली होती आणि त्यांना त्याच कांही वाटत नसे.
प्रभाकर बळवल्लीची आई वारली तेव्हांही तिने ओढा ओलांडला नव्हता आणि ओढ्याच्या काठावर येऊन छाती पिटून तिथेच मोठ्याने शोक केला होता.
प्रभाकर आता मळ्याचा मालक झाला होता.
मध्यम वयाच्या प्रभाकरला तीन सुंदर मुली आणि एक दहा वर्षांचा गोड मुलगा होता.
खुळी त्याच्यावर खूप माया करत असे आणि त्याला चिकू म्हणत असे.
तेच त्याचे नाव सर्वत्र झाले होते.
त्या मुलींनाही खुळीच्या कल्पनेतल्या ओढ्यापल्याडच्या गोष्टी ऐकायला आवडत असे.
पण तिला चिकूशिवाय कुणाचा लळा लागला नव्हता.
चिकू तिच्या हातावर थापटत असे, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपत असे, तिच्या कुशीत शिरत असे.
आता तो मोठा म्हणजे दहा वर्षाचा झाला होता आणि त्याच्या हातांत बंदूक (शॉटगन)आली होती.
त्या वर्षी ओढ्यांतलं पाणी पूर्ण आटलं होतं.
लहान मुलं सुध्दा ओढा ओलांडून सहज येत.
गुरं मोठ्या प्रमाणांत चरायला येत.
रात्री त्यांच्या खुसपुशीची सोबत खुळीला आवडत असे.

तो शनिवार होता.
सगळे शेजारच्या गावातल्या बाजारांत आपला माल विकायला गेले होते.
बायका घरकामांत गुंतल्या होत्या.
खुळी मोदक करण्यांत गुंतली होती.
मोदक करताना तिला चिकूची आठवण असेच.
आज तिने केशर घालून मोदक जास्त स्वादीष्ट केले होते.
तिने जेव्हा त्याला ओढा ओलांडून येताना पाहिले तेव्हां ती ‘चिकू’ ‘चिकू’ अशा हांका मारून त्याला बोलावू लागली.
चिकू तिच्याकडेच येत होता.
त्याचे सर्व खिसे बदाम, अक्रोड, अंजीर, खिसमीस यांनी भरलेले होते.
त्या दिवशी त्याच्या घरी झालेल्या मेजवानीच्या वेळी खुळीला देण्यासाठी त्याने सर्व भरभरून घेतलं होतं.
खुळीपुढे त्याने खिसे रिकामे केले.
खुळीने लाडाने त्याच्या गोबऱ्या गालांचा गालगुच्चा घेतला.
दोन मोदक तोंडात कोंबून, एका हातांत बंदूक (शाॅटगन) घेऊन तो मागच्या जंगलात शिरला.
जातांना खुळीला म्हणाला, “मी तुला हरीण मारून घेऊन येतो.”
खुळी हंसून म्हणाली, “खार मारून आणलीस तरी पुरे मला.”
चिकू म्हणाला, “हट. खारीने पोट थोडंच भरेल. मी हरीण आणतो, बघ.”

एका तासानंतर चिकूच्या बंदूकीचा आवाज मागच्या बाजूला जवळच आला.l
तिला त्याचं कांही वाटलं नसतं पण पाठोपाठ चिकूच्या विव्हळण्याचा, “मेलो, मेलो” असा आवाज आला आणि ती दचकली.
हातातले काम टाकून तिचे शरीर साथ देईल तेवढ्या वेगाने त्या विव्हळण्याच्या आवाजाच्या दिशेने धांवली.
तिला भिती वाटत होती तेच झाले होते.
चिकू जमिनीवर विव्हळत पडला होता आणि “मेलो, मी मेलो” असे ओरडत होता.
“खुळी, मी मरतोय आतां. गेलो मी.”
खुळीने हात त्याच्याभोवती धरले आणि म्हणाली, “नाही, चिकू, कांही होणार नाही.
तुझा हात खुळीच्या गळ्याभोवती घाल.
हे कांहीच नाही. बरं होईल.”
असं म्हणत तिने त्याला आपल्या सशक्त बाहूंनी उचललं.
बंदूक घेऊन चालतांना कशाला तरी अडखळून चिकू पडला आणि त्याचवेळी त्याच्या नकळत बंदूकीचा बार निघाला.
गोळी त्याच्याच पायात कुठेतरी घुसली.
त्याला वाटले आपला शेवट जवळ आला.
आतां खुळीच्या खांद्यावर डोकं ठेवून चिकू कण्हत होता, भितीने रडतही होता.
“खुळीमाई, खूप दुखतंय. मला फार लागलंय ग ! सहन नाही होत.”
“रडू नको बाळा, डाॅक्टर गौडा सहज बरं करतील.”
खुळी त्याची समजूत काढत होती.

खुळी लांब लांब ढांगा टाकत त्याला उचलून शक्य तितकी भरभर चालत होती.
तिने आता आपलं शेत ओलाडलं होतं आणि शेत आणि ओढ्याच्या मधल्या पाणथळ जागेतून ती ओढ्याकडे चालली होती.
तिच्या हातांमध्ये अमूल्य ओझं होतं.
जसजशी ती ओढ्याकडे पोहोचत होती तसतशी तिच्या मनांत ओढ्यापल्याडच्या अनोळखी जगाबद्दलची लहानपणापासून बाळगलेलीl अनामिक आणि अकारण भिती दाटून येत होती.
ती इकडे तिकडे पहात होती.
ती ओढ्याच्या कांठावर पोहोचली आणि थांबली.
तिथूनच ती मदतीसाठी मोठ्या मोठ्याने हांका मारू लागली.
“अहो, मालक. ए नागम्मा, ए शंकऱ्या” पण कोणाचंही हांकेला उत्तर आलं नाही.
चिकूच्या डोळ्यांतले उष्ण अश्रू तिच्या मानेवर जाणवत होते.
तिला मळ्यावरल्या ज्यांची ज्यांची नांव माहित होती, त्या सर्वांच्या नांवाने तिने हांका मारल्या.
ती आरडली, ओरडली पण तिचा आवाज कुणी ऐकला नाही आणि कोणाचही तिच्या करूण हांकाना उत्तर आलं नाही.
चिकू सारखा रडत होता आणि त्याला आईकडे जायचं होतं.

खुळीने निराशेने सभोवार एक नजर टाकली.
ती खूपच घाबरली होती.
चिकूला तिने उराशी गच्च धरले होते आणि त्याला तिच्या हृदयाचे ठोके हातोडा आपटत असल्यासारखे कानावर येत होते.
तिने डोळे बंद केले आणि अचानक ती ओढ्याच्या मध्याच्या दिशेने उतरू लागली आणि ओढा पार करेपर्यंत बिलकुल थांबली नाही.
ओढ्याच्या दुसऱ्या काठावर येऊन तिने डोळे उघडले आणि थरथरत उभी राहिली.
मग ती झाडांमधल्या पायवाटेने भराभर निघाली.
ती आता चिकूशी कांही बोलत नव्हती पण स्वत:शी बडबडत होती.
“देवा रे देवा, ह्या खुळीवर दया कर. माझ्यावर दया कर रे.”
तिचं मन सांगत होतं त्या अंदाजाने ती योग्य दिशेने चालली होती.
थोड पुढे आल्यावर मोठी वाट दिसायला लागली तशी त्या अपरिचित, भयंकर जगाच्या भितीने तिने पुन्हा डोळे गच्च मिटले.
तिथेच खेळणाऱ्या एका लहान मुलीने तिला पाहिले आणि ती आश्चर्याने ओरडलीच, “खुळी, खुळी ! बघा, बघा, खुळीने ओढा ओलांडला.”
तो आवाज मळ्यावरल्या आजूबाजूच्या घराच्या रांगातून घुमला.
“इकडे बघा, इकडे, खुळीने ओढा ओलांडला.”
मुलं, म्हातारे पुरूष, म्हाताऱ्या बाया, कडेवर मुलं घेतलेल्या तरूण बायका, सर्वजण हे आश्चर्यकारक दृश्य पहायला जमल्या.
अनेकांना हा काही तरी अपशकुन वाटून आता काय होणार याची भिती वाटली.
कोणीतरी ओरडले, “ती चिकूला घेऊन जातेय.”
बरीच गर्दी तिच्या मागेच चालू लागली.
खुळीने वळून त्यांच्याकडे रागाने नजर टाकली.
लालबुंद आग ओकणारे ते डोळे तिने रोखतांच गर्दी थबकली.

कोणीतरी पुढे जाऊन प्रभाकर बळवल्ली आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर गॅलरीमधे बसले होते तिथे जाऊन सांगितले, “मालक, खुळीने ओढा ओलांडला आणि ती चिकूला घेऊन चालली आहे.
ही धक्कादायक बातमी कुटुंबाला प्रथमच कळली.
इकडे खुळी जवळच पोहोचली होती.
ती लांब लांब ढांगा टाकत होती.
तिचा श्वासोच्छ्वास खूप धावून दमलेल्या बैलासारखा जोराजोरात होत होता.
ती जिन्याच्या पायऱ्यांपाशी पोहोचली.
पायऱ्या चढण्याचे त्राण तिच्यात नव्हते.
तिला जिना चढणे अशक्य होते.
तोपर्यंत खाली आलेले प्रभाकर तिला समोर दिसले आणि त्यांच्या हातांत चिकूला तिने सोंपवले.
मग अचानक खुळीला लाल वाटणारे सगळे जग काळोखाने भरून आले, जसे ते तिच्या लहानपणी जखमी रक्ताळलेल्या प्रभाकरला बघून भरून आले होते.
मग तिला चक्कर आली.
कोणी आधार देण्याच्या आधीच खुळी जमीनीवर कोसळली.

जेव्हां खुळी परत शुध्दीवर आली तेव्हा ती तिच्या घरी होती.
तिच्या खोपटांत, तिच्या बिछान्यावर होती.
दरवाजांतून, खिडकीतून चंद्रप्रकाश येत होता.
त्याच प्रकाशांत एक म्हातारी खुळीसाठी कसले तरी सुवासिक चाटण तयार करत होती.
खूप रात्र झाली होती.
तिथे आलेले बरेच लोक निघून गेले होते.
बराच वेळ थांबून प्रभाकरही गेला होता.
प्रभाकरबरोबर आलेले डॉक्टर गौडा म्हणाले होते, “कदाचित खुळी यातच दगावेल.”
पण मृत्यू तिच्या बाजूने निघून गेला होता.
ती स्पष्ट आणि स्थिर आवाजांत जवळच उभ्या असलेल्या तानीला म्हणाली, “तानी, मला एक छानसं सरबत बनवून दे.
मी आतां शांत झोपणार आहे.”
सरबत घेऊन खरंच ती गाढ झोंपली.
तिला गाढ झोंप लागलेली पाहून तिच्यावर नजर ठेवून बसलेली तानीसुध्दा बिलकुल आवाज न करतां हलक्या पावलांनी तिथून हळूच पळाली आणि आपल्या नव्या घराकडे निघून गेली.

पहाटेच्या थंड वाऱ्याच्या स्पर्शाने खुळी जागी झाली.
ती शांतपणे उठून उभी राहिली.
जणू कांही, काल तिचं अस्तित्व पणाला लावणारं कोणतच वादळ तिच्या आयुष्यात येऊन तिला हादरवून गेलं नव्हतं.
तिने तिचे नवे कपडे चढवले.
तिला आठवले की आज रविवार होता.
तिने स्वत:साठी एक कप दाट काॅफी केली आणि ती चवीने प्याली.
मग ती आपले खोपट सोडून निघाली आणि स्वत:च्या ओळखीच्या शेतातून आणि समोरच्या कुरणांतून ओढ्याच्या कांठावर परत आली.
पण पूर्वीप्रमाणे ती कांठावर थांबली नाही तर जणू कांही ती रोजच ओढा ओलांडत असे अशा प्रकारे स्थिर आणि लांब पावलांनी तिने ओढा ओलांडला.
दुसऱ्या कांठावरील कापशीच्या झाडांमधून ती थोडी पुढे आली आणि तिला समोर थोडंसं दव वर पडलेला पांढरा कापूस सकाळच्या कोवळ्या उन्हात दूर दूरपर्यंत चांदीसारखा चमचम करतांना दिसू लागला.
खुळीने दीर्घ श्वास घेतला.
ती सावकाश इकडे तिकडे पहात कुठे जायचंय हे न ठरल्यासारखी चालू लागली.
काल ज्या घरांतून मुले, माणसे तिच्या मागे लागली होती, ती आज शांत होती.
अजून वस्ती जागी नव्हती झाली.
फक्त पक्षी आपापल्या घरट्यांतून बाहेर येऊन किलबिल करत होते.

जेव्हां खुळी मालकाच्या घराजवळ पोहोचली आणि बागेतल्या मऊ गवतावर चालू लागली, तेव्हां तिला त्या स्पर्शाची फार मौज वाटली.
श्वासागणिक येणारे मंद सुवास कुठून येताहेत हे पहायला ती क्षणभर थांबली.
ते सुवास तिच्या खूप दूरच्या भूतकाळांतील आठवणी जागवत होते.
तिची नजर पारिजात, थोड्या अंतरावरचा गुलाबाचा ताटवा, फुललेला मोगरा ह्यांच्यावर गेली.
आजूबाजूच्या माडांच्या रांगा दिसल्या.
दवबिंदूनी भिजलेलं ते सृष्टीवैभव तिला अद्भूत वाटलं.
समोर मालकाच्या घराच्या पायऱ्या दिसत होत्या.
थोड्या सावधपणे पण स्थिर पावलांनी ती जिना वर चढून गेली.
वर पोहोचल्यावर तिने मागे वळून पाहिले.
केवढा कठीण चढ होता तो.
वरून तिला ओढ्यापुढची रूपेरी धनुष्यासारखी नदी दिसली.
खुळीने चिकूच्या घराची कडी वाजवली.
चिकूच्या आईनेच दार उघडलं.
खुळीला पाहून वाटलेलं आश्चर्य लपवत ती म्हणाली, “खुळी, तू ? एवढ्या सकाळीच आलीस ?”
खुळी म्हणाली, “हो, अम्मा, मी माझा लाडका चिकू कसा आहे, ते पहायला आलेय.”
चिकूची आई म्हणाली, “चिकू आतां ठीक आहे.
डाॅक्टर म्हणाले की इजा फार गंभीर नाही.
आता तो झोपला आहे. तू थोड्या वेळाने ये, तोवर तो उठलेला असेल.”
“नाही अम्मा. मी चिकू उठल्याशिवाय कुठेही जाणार नाही. इथेच थांबणार आहे.”
असं म्हणून खुळी जिन्याच्या सर्वांत वरच्या पायरीवर बसली.
समोरच तिला उगवणारा सुर्य आपली सोनेरी किरणे ओढ्या पल्याडच्या या नव्या सुंदर जगावर पसरतांना दिसत होता.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – बियाँड द बेयु

लेखिका – केट शॉपीन (Kate Chopin) (१८५०-१९०४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..