नवीन लेखन...

चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)

प्रस्तावना – मागच्या आठवड्यात मी ॲम्ब्रोज बिअर्स या अमेरिकन लेखकाची चरित्र-कथा सादर केली होती.
एका वाचकाने इच्छा प्रदर्शित केली की मी त्याची एक कथाही सादर करावी.
पांच पूर्वी केल्याच होत्या.
आता त्याची ‘चिकमावगा’ (एक जमात) ही त्याच्या लिखाणाची सर्व वैशिष्ट्ये ठळक करणारी सुप्रसिध्द कथा प्रस्तुत करत आहे.
*********
एका हिवाळ्यात दुपारी एक लहान मूल आपल्या धाब्याच्या घरापासून दूर भरकटलं आणि कुणाच्याही लक्षांत न येता रानांत शिरलं.
ते मनाप्रमाणे फिरायला मिळणार म्हणून खुशीत होतं.
ह्या मुलाच्या रक्तांत धाडस, नव्या जगाचा शोध घेणं, हे हजारो वर्षे नव्या नव्या जागांच्या शोधात भटकणाऱ्या पूर्वजांकडून आपोआपच आलेलं होतं.
शेकडो वर्षे ते जिंकत आले होते व सभोवती दगडाच्या भिंती असलेली नगरं वसवत होते.
जमात पाळण्यात असल्यापासून आतापर्यंत तिने दोन खंड पादाक्रांत केले होते व एक समुद्र ओलांडून आता तिसऱ्या खंडात युध्द करून तिथे आपली वस्ती करायला निघाले होते.
तो गरीब मळेवाल्याचा सहा वर्षाचा एक मुलगा होता.
तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता.
मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही.
त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती.
आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता.
त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता.
त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता.
समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती.
त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.
आता तो युध्द जिंकला होता आणि परत आपल्या छावणीकडे परतणं हा शहाणपणा होता.
पण अनेक थोर विजेत्यांप्रमाणे त्यालाही आपल्या लढत रहाण्याच्या इच्छेवर काबू ठेवता आला नाही.
ओढ्याच्या कांठावरून पुढे जात असतांना त्याला नवा व बलवान शत्रु कान उभारून आणि पंजे पुढे करून बसलेला दिसला; ससा होता तो.
मुलाने आश्चर्याने किंकाळी फोडली आणि अतिशय भीतीने रडत ‘आई’ ‘आई’ हांका मारत, पडत, आजूबाजूच्या कांटेरी झाडांनी त्वचा रक्ताळ होईपर्यंत ओरबाडला जात, हृदयांत धडधड वाढलेला, आंधळेपणाने जंगलात दिशाहीन धांवू लागला.
एक तास गेल्यावर तो थकून ओढ्याजवळच दोन मोठ्या दगडांच्या फटीत तलवार, जी आता शस्त्र नाही तर मित्र होती, हातात ठेवूनच हुंदके देत आडवा झाला.
पक्षी गात होते, खारी शेपट्या वर करून झाडावर उड्या मारत होत्या.
इकडे मळ्यावर गोरी आणि काळी माणसं घाईघाईने झुडुपा झुडुपातून शोध घेत होती आणि आईचे हृदय आपल्या हरवलेल्या मुलासाठी तुटत होतं.
बरेच तास गेले.
संध्याकाळचा गारव्याने झोपी गेलेलं मूल जागं झालं.
शरीराला थंडी वाजत होती तर हृदयांत भीती होती.
आता तो रडत नव्हता.
त्याने विश्रांती घेतली होती.
तो बाहेर आला आणि थोडा पुढे मोकळ्या मैदानात आला.
ओढा जवळच वहात होता. संधिप्रकाश सरून काळोख दाटू लागला होता.
ओढ्यांतील पाण्याकडे पाहून त्याला आता भीती वाटली.
ओढा ओलांडून आला त्या दिशेला जायची हिम्मत नाही झाली.
तो फिरला आणि अचानक एक विचित्र सरकणारी विचित्र आकृती त्याला दिसली.
कुत्रा, डुक्कर ! नाही, कदाचित ते अस्वल असावं.
त्याची हालचाल विचित्र होती.
त्याला उत्सुकता आणि भीती दोन्ही वाटत होती.
मगाशी दिसलेल्या शत्रुसारखे लांब कान तरी नव्हते.
तो टक लावून पहात होता.
त्या आकृतीत त्याला कांही ओळखीचं जाणवू लागलं.
ती आकृती सतत पुढे सरकत होती.
संशय फेडण्यापूर्वीच त्याच्या लक्षांत आलं की तिच्या मागेही तशाच अनेक आकृत्या पुढे पुढे सरकत होत्या.
डावीकडे, उजवीकडे, सगळीकडे त्याच आकृत्या ओढ्याच्या दिशेने सरकत होत्या.
ते पुरूष होते.
ते आपल्या हातांवर आणि पायांवर रांगत पुढे सरकत होते.
घरी कधीतरी त्याला खेळवायला त्यांचा काळा नोकर असे करून दाखवत असे.
ते दुसरं कांहीच करत नव्हते पण जोडी जोडीने, किंवा एकत्र पुढे पुढे सरपटत येत होते.
काही उठायचा प्रयत्न करत पण पडत.
मग सर्व परत पुढे सरकतच होते.
ते डझनानी, नव्हे शेकड्यांनी येत होते.
त्यांच्या मागचे जंगल जणू कांही त्यांनी व्यापून टाकले होते व तिथून ते पुढे येत होते.
जणू कांही ते मैदानच पुढे सरकत होतं.
मध्येच एखादा थांबत होता आणि मग तो पुढे यायचाही थांबत होता.
तो मृत झालेला असायचा.
आजूबाजूचे कांही क्षण, दोन क्षण तिथे थांबत, प्रार्थनेसाठी हात जोडत, मग परत पुढे सरकू लागत.
ते पुरूष होते.
हात व गुडघे ह्यांच्या आधारे पुढे सरकत होते.
हे सर्व कांही त्या मुलाच्या लक्षांत येत नव्हतं.
एखाद्या मोठ्या माणसालाच तें कळलं असतं.
ते त्याला परके वाटले नाहीत.
माणसे त्याने पाहिली होती.
त्यांची त्याला भीती वाटली नाही.
त्याला एवढच समजत होतं की ही मोठी माणसं अगदी लहान बाळासारखी सरपटत पुढे येताहेत.
तो त्यांच्यांत सहज फिरू लागला.
लहान मुलाच्या कुतूहलाने त्यांचे चेहरे न्याहाळू लागला.
सगळे गोरे होते व लाल झाले होते.
चेहरे व हालचाली ह्यामुळे त्याला सर्कशीत पाहिलेल्या विदूषकाची आठवण झाली आणि तो हंसू लागला.
ते पुढे पुढे सरकतच होते.
ते खरचटण्याने रक्तबंबाळ भासत होते.
ते पुढे सरपटतच होते.
त्याचे हंसणे व त्यांचा गंभीर दृष्टीकोन परस्परविरोधी आहेत, हे ना त्या मुलाला कळत होतं, ना त्यांच्या लक्षांत येत होतं.
त्याला ते मजेदार दृश्य वाटत होते.
घरी कधी तरी त्याची करमणूक करायला रांगणाऱ्या काळ्या नोकराच्या पाठीवर तो ‘घोडा, घोडा’ करत असे.
तो एकाच्या पाठीवर बसला.
तो माणूस आपल्या छातीवर पडला, मग पटकन सांवरत त्याने ह्याला पाठीवरून फेंकून दिले.
जसे एखाद्या न शिकवलेल्या घोड्याने स्वाराला फेकावं तसं.
मग मुलाला त्याचा चेहरा दिसला.
त्याचा खालचा जबडा गायब होता.
दांतही नव्हते.
तो भाग रक्ताने लाल झालेला होता.
त्याचा एकूण अवतार एखाद्या मोठ्या मांसभक्षक पक्ष्यासारखा दिसत होता.
तो गुडघ्यांवर उभा राहिला, मुलगा समोर पायांवर उभा होता.
त्याने आपली मूठ मिटून हात आडवा हलवत “नाही” अशी खूण केली.
मुलाला खूप भीती वाटली व तो तिथून पळून झाडाकडे जाऊन उभा राहिला व काय चाललंय हे पाहू लागला.
तो माणूस परत सरपटत पुढे जाऊ लागला आणि मधमाशांच्या जथ्थ्याप्रमाणे ते सरकतच राहिले, मात्र आवाज न करतां, शांतपणे.
हे सर्व कांही त्या मुलाच्या लक्षांत येत नव्हतं.
एखाद्या मोठ्या माणसालाच तें कळलं असतं.
ते त्याला परके वाटले नाहीत.
माणसे त्याने पाहिली होती.
त्यांची त्याला भीती वाटली नाही.
त्याला एवढच समजत होतं की ही मोठी माणसं अगदी लहान बाळासारखी सरपटत पुढे येताहेत.
तो त्यांच्यांत सहज फिरू लागला.
लहान मुलाच्या कुतूहलाने त्यांचे चेहरे न्याहाळू लागला.
सगळे गोरे होते व लाल झाले होते.
चेहरे व हालचाली ह्यामुळे त्याला सर्कशीत पाहिलेल्या विदूषकाची आठवण झाली आणि तो हंसू लागला.
ते पुढे पुढे सरकतच होते.
ते खरचटण्याने रक्तबंबाळ भासत होते.
ते पुढे सरपटतच होते.
त्याचे हंसणे व त्यांचा गंभीर दृष्टीकोन परस्परविरोधी आहेत, हे ना त्या मुलाला कळत होतं, ना त्यांच्या लक्षांत येत होतं.
त्याला ते मजेदार दृश्य वाटत होते.
घरी कधी तरी त्याची करमणूक करायला रांगणाऱ्या काळ्या नोकराच्या पाठीवर तो ‘घोडा, घोडा’ करत असे.
तो एकाच्या पाठीवर बसला.
तो माणूस आपल्या छातीवर पडला, मग पटकन सांवरत त्याने ह्याला पाठीवरून फेंकून दिले.
जसे एखाद्या न शिकवलेल्या घोड्याने स्वाराला फेकावं तसं.
मग मुलाला त्याचा चेहरा दिसला.
त्याचा खालचा जबडा गायब होता.
दांतही नव्हते.
तो भाग रक्ताने लाल झालेला होता.
त्याचा एकूण अवतार एखाद्या मोठ्या मांसभक्षक पक्ष्यासारखा दिसत होता.
तो गुडघ्यांवर उभा राहिला, मुलगा समोर पायांवर उभा होता.
त्याने आपली मूठ मिटून हात आडवा हलवत “नाही” अशी खूण केली.
मुलाला खूप भीती वाटली व तो तिथून पळून झाडाकडे जाऊन उभा राहिला व काय चाललंय हे पाहू लागला.
तो माणूस परत सरपटत पुढे जाऊ लागला आणि मधमाशांच्या जथ्थ्याप्रमाणे ते सरकतच राहिले, मात्र आवाज न करतां, शांतपणे.
संध्याकाळी काळोख होण्याऐवजी आजूबाजूला उजेड दिसू लागला.
ओढ्या पलिकडे विचित्र लाल प्रकाश दिसू लागला.
झाडे त्या प्रकाशात काळी दिसत होती.
तो उजेड अधून मधून ह्यांच्या लाल व जखमी चेहऱ्यावर पडत होता तर कधी कधी ह्यांची धातूची बटणे चमकवत होता.
मुलगा कांही आंतरिक ओढीने आपली लाकडी तलवार घेऊन त्या सरकणाऱ्या मित्रांच्या पुढे जाऊन उभा राहिला.
जणू कांही तो त्यांचे नेतृत्व करत होता.
पुढे जातांना तो हातातली तलवार फिरवत होता आणि सर्वांना जणू मार्ग दाखवत होता.
मधेच मागे वळून आपले सैन्य आपल्या मागे येतय की नाही, हे पहात होता.
अशा नेत्याला असे सैनिक नक्कीच पूर्वी कधी मिळाले नसतील.
पाण्याकडे जाणाऱ्या पुढच्या वाटेवर अनेक विचित्र वस्तु पसरलेल्या दिसत होत्या.
बऱ्याच वस्तु त्याला ओळखतांही येत नव्हत्या, एखादे गुंडाळी केलेले व दोन्ही बाजूंनी शिवून टाकलेले ब्लॅंकेट, पाठीवर उचलायची जड पिशवी, मोडकी बंदूक, थोडक्यांत माघार घेणाऱ्या सैन्याने पळून जातांना टाकलेले अवशेष.
खाडीजवळच्या चिखलांत माणसांचे व घोड्यांच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसत होते.
नीट पहाणाऱ्याला लक्षांत आलं असतं की हे ठसे दोन्ही दिशांना जाणारे आहेत.
येणारे व जाणारे.
हल्ला करायला आले तेव्हा आणि माघार घेतली तेव्हांचे.
ह्या नशीबवान सैनिकांच्या आधीच्या तुकड्या कांही तास आधीच जंगल भेदून शेकडो, हजारोंच्या संख्येने पुढे गेल्या होत्या.
जेव्हां त्यांच्या एकामागे एक येणाऱ्या तुकड्या मधमाशांप्रमाणे त्या मुलाच्या चोहोंबाजूंनी पुढे गेल्या होत्या, तेव्हा तो थकून गाढ झोंपलेला होता.
त्याला त्यांच्या हालचालीची खटखट जागवू शकली नव्हती.
तो जिथे झोपला होता, तिथून थोड्याच अंतरावर त्यांनी युध्द केलं होतं.
पण त्याला बंदुकांचे बार, तोफांचा भडीमार, कॅप्टन्सचे हुकुम आणि ओरडणे, काही ऐकू आले नव्हते.
तो आपली लहानशी लाकडी तलवार हाती घेऊन गाढ झोपला होता.
आजूबाजूच्या वातावरणामुळे कदाचित त्याने ती तलवार हातांत थोडी अधिकच घट्ट धरली होती.
परंतु लढाईला भव्यता देण्यासाठी मरण पावलेले देह लढाईच्या भव्यतेबद्दल जितके अनभिज्ञ होते, तितकाच तोही त्या बाबतीत अजाण होता.
जंगलापलिकडील खाडीजवळ धूराचा पडदाच पसरला होता.
सर्व आसमंत आता धुरकट दिसत होता.
धुक्याच्या परीघावर सोनेरी वाफेची कडा दिसत होती.
पाण्यात अधून मधून लाली दिसत होती.
मधूनच पाण्यातून डोकं वर काढणारे खडकही वर लाल दिसत होते पण हे सर्व रक्त होते.
जे जास्त जखमी झाले नव्हते, त्यांनी खाडी ओलांडताना लागलेलं रक्त होतं ते.
आता मुलगाही त्या खडकांवरूनच आतुरतेने, ज्या दिशेला आग लागली होती, तिकडे चालला होता.
जसा तो दुसऱ्या बाजूला पोहोचला तसा तो मागे वळून आपल्या साथीदार सैनिकांना पाहू लागला.
ते पाण्यातून खाडी पार करत होते.
तिघे-चौघे पाण्यावर तरंगताना दिसत होते पण त्यांची डोकीच दिसत नव्हती.
त्या अजाण मुलाचेही डोळे विस्फारले.
जरी त्याला ह्या सर्वाचा अर्थ कळत नसला तरी त्याची बालबुध्दी देखील हे दृश्य स्वीकारायला तयार होत नव्हती.
नदीत उतरताच त्यांनी तहान भागवली पण बऱ्याच सैनिकांच्या अंगात आता नदी पार करायचं त्राण उरलं नव्हतं.
त्याने त्याही पलिकडे आपल्या तुकड्या कुठे दिसताहेत कां पाहिलं पण आता तुकड्या तितक्या भरीव दिसत नव्हत्या.
तरीही त्याने आपली टोपी हलवून त्यांना इशारा केला व पुढे दिसणाऱ्या धुराच्या व आगीच्या खांबाकडे यायची खूण केली.
आपले सैन्य आपल्याशी एकनिष्ठ आहे, ही खात्री मनाशी बाळगत तो त्या छोट्या झाडांच्या जंगलात शिरला आणि सहज दुसऱ्या बाजूला दिसणाऱ्या लाल प्रकाशाकडे बाहेर आला.
मग त्याने एका भिंतीवरून उडी मारली आणि धावतच एक शेत पार केले.
स्वत:च्या सावलीबरोबर खेळत तो आग लागलेल्या त्या घरांपर्यंत पोहोचला.
सर्व निर्मनुष्य आणि भकास दिसत होतं.
आसपास एकही माणूस नव्हता.
त्याला त्याचं कांही वाटलं नाही.
तो मजेत होता.
त्या ज्वाळांच्या बरोबर तोही आनंदाने नाचत होता.
त्याने आगीत टाकायसाठी कांही गवत, लाकडे मिळवायचा प्रयत्न केला पण त्याला त्या आगीच्या जितक्या जवळ जाणं शक्य होतं तिथून आगीत फेकता येईल अशी वस्तू त्याला मिळाली नाही.
निराश होऊन त्याने आपले एकमेव हत्त्यार, ती लाकडी तलवार, त्यांत फेंकून दिली, जणू कांही निसर्गातील बलवान ताकदींसमोर तो शरण गेला होता.
त्याची सैनिकी कारकीर्द आता संपली होती.
त्याने मोहरा बदलला तर त्याला कांही दुसऱ्या इमारती दिसल्या व त्या थोड्या ओळखीच्या वाटल्या.
जणू त्याने त्या स्वप्नात पाहिल्या होत्या.
तो आश्चर्याने त्यांच्याकडे पहात उभा राहिला.
क्षणातच सर्व मळा त्याच्याभंवती फिरला.
त्याच्या छोट्या जगांत उलथापालथ झाली.
ती जळणारी इमारत, हे आपलेच घर आहे, हे त्याच्या लक्षांत आले.
क्षणभर तें समजल्याने तो स्तब्ध होऊन उभा राहिला.
नंतर लटपटत्या पायांनी त्याने घराला अर्धा वळसा घातला.
तिथे आगीच्या उजेडांत एक स्त्रीचा देह पडलेला दिसत होता.
गोरा चेहरा, पसरलेल्या हातांनी बरेच गवत घट्ट धरलेले, कपडे विस्कटलेले, लांब काळे केस गुंतलेले आणि बऱ्याच ठिकाणी रक्त साकळलेले, कपाळाचा बराच भाग नष्ट झालेला आणि तिथे पडलेल्या छिद्रातून बाहेर आलेला मेंदू, त्यावर जमून फुगलेल्या रक्ताचा मुकुट.
मुलगा त्यावरून हात फिरवू लागला आणि विचित्र हातवारे करू लागला.
त्याने कांही विचित्र न समजणारे असे आवाज केले, जे एप वानराचे ओरडणे आणि कोंबडीचे किरकिरणे ह्या दोघांच्या मधले काहीतरी — आत्मा नसलेले, अपवित्र आवाज, सैतानाच्या भाषेंतले.
तें मूल मुके आणि बहिरे होते.
मग तें थरथरत्या ओठांनिशी त्या विनाशाकडे पहात स्तब्ध उभे राहिले.

— अरविंद खानोलकर.

मूळ लेखक – ॲम्ब्रोज बिअर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..