नवीन लेखन...

दुस-यांच्या नजरेतून (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४१)

“आपला गालिचा फारचं खराब झालाय. जेव्हां जेव्हां एखादा पाहुणा येतो, तेव्हां मला या गालिचाची लाज वाटते.” सौ. मालिनी घाडगे म्हणाल्या.
आपल्या बायकोला नेहमी खूष पाहू इच्छिणारे, तिच्याशी जमवून घेणारे श्रीयुत घाडगे गालिचाकडे पहात म्हणाले, “नव्या गालिचाची किंमत साधारण …..” त्यांच वाक्य पत्नीने पूर्ण करावं अशी अपेक्षा करत ते थांबले.
सौ. घाडगेनी ते वाक्य पूर्ण केलं, “फक्त पांचशे रूपये. मी हिशोब केलाय. सामंतांच्या दुकानांत चाळीस फूट लांबीचं दहा रूपये फूट प्रमाणे चारशे रूपयाला गालिचाच कापड मिळेल. त्याला किनार वगैरे लावायला थोडा खर्च येईल. किनार लावण्याचे काम मी स्वत:च करीन.”
“फक्त पांचशे रूपये!” श्री घाडगे गालिचाकडे नजर टाकत म्हणाले.
तो गालिचा गेली पांच वर्षे त्यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत होता.
त्यांना तो अजूनही छान दिसत होता.
नवा जर पन्नास-शंभर रूपयांना मिळत असता तर त्यांनी सहजपणे तो काढून टाकला असता पण पांचशे म्हणजे जरा जास्तच वाटत होते.
दर वर्षी सांसारिक जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि वस्तुंच्या किंमतीही. जमा आणि खर्च यांचा मेळ घालणे त्यांना दिवसेंदिवस कठीण होत होते.
ते अशा विचारांत मग्न असतांना सौ.घाडगे म्हणाल्या, “अहो, तुम्हाला माहित आहे कां, पुढल्या आठवड्यात माझी मावसबहिण शालिनी आपल्याकडे येणार आहे. आता मला कांही तिला छानछौकीने सजवलेलं घर दाखवायचं नाही पण असं ऐकते कीं तिचा नवऱ्याचं उत्पन्न सतत वाढतयं, ते श्रीमंत होताहेत. आपले विवाह साधारण एकाच वेळी झाले. निदान आपण होतो त्यापेक्षा गरीब झालोय असं तिला वाटायला नको. हा गालिचा पण आपण बदलू शकत नाही, असा तिचा समज व्हायला नको.”
निर्णय घ्यायला आता आणखी सबळ कारणांची आवश्यकता नको होती.
श्री घाडगेंनी एका कपाटांत सहाशे रूपये जमवून ठेवले होते.
त्यांनी आपल्या एका मित्राकडून घेतलेली हजार रूपयांची उधारी त्यांना लौकरांत लौकर फेडायची होती.
त्यानी हे पैसे जमवून ठेवलेत, हे सौ. घाडगेंना माहित होतं.
ते काटकसर करून कष्टाने कशाकरता जमवलेत हेही त्यांना ठाऊक होतं.
घरात अचानक आलेल्या आजारात ती उधारी घेणं भाग पडलं होतं.
जसजशी ती रक्कम उधारी फेडायला लागणाऱ्या आकड्याकडे सरकत होती, तसंतसं श्री घाडगेंना बरं वाटत होतं.
त्यांना ती उधारी प्रथम फेडणं गरजेचं वाटत होतं पण आतां ते शक्य नव्हतं.
मावसबहिण शालिनी येणार आहे, हे कारण निर्णय घ्यायला खूप होतं.
शालिनीला गालिचा छान दिसला पाहिजे, ह्याबद्दल ते पत्नीपेक्षा थोडे अधिकच आग्रही होते.
मग मावसबहिणीच्या डोळ्यांना सुखविण्यासाठी दिवाणखान्यांत नवा गालिचा आणला गेला.
जुना वर एका शयनकक्षात गेला.
गालिचाला शोभतील अशा इतरही कांही वस्तु घ्याव्या लागल्याच.
त्यांत श्री घाडगेनी कर्जफेडीसाठी कष्टाने जमवलेली संपूर्ण रक्कम खर्च झाली.
नवा गालिचा आल्यावर दिवाणखाना सौ. घाडगेंच्या मनासारखा होईल असे त्यांना वाटत होते पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
नव्या गालीच्यामुळे आता वेताच्या खुर्च्या, मेज, भिंतीवरचा रंगीत कागद, इ. सर्व शालिनीला जुनं व विशोभित दिसेल असं सौ. घाडगेंना वाटू लागलं.
आधी कधी त्यांना खिडक्यांना बसवलेल्या व्हेनेशियन ब्लाईंडच्या पट्ट्या जुनाट वाटल्या नव्हत्या.
पण आतां त्यांना त्या डोळ्याला खुपू लागल्या.
दुसऱ्या दिवशी त्या पतिराजांना म्हणाल्या, “ह्या पट्ट्या फारच विचित्र दिसताहेत. काही ठीकाणी तुटल्या आहेत. त्या कितीला आणल्या होत्या आपण? कांही आठवतंय?”
पतिराज म्हणाले, “१०० रूपयांना आणल्या होत्या.”
सौ. घाडगे म्हणाल्या, “इतक्या महाग!”
श्री घाडगे म्हणाले, “होय, शंभर रूपये. मला पक्क आठवतंय.”
कमी खर्चात आपलं उद्दीष्ट साध्य करता यावं या विचाराने सौ. घाडगे म्हणाल्या, “समजा ह्यातच आपण कांही नव्या पट्ट्या बसवून आणल्या तर किती खर्च येईल?”
“फार नाही खर्च येणार त्यासाठी.” श्री घाडगे म्हणाले. “मग आपण तसं करूया कां?” सौ. घाडगेंनी विचारलं.
पत्नीच्या निर्णयाला मान डोलावणारे श्री घाडगे म्हणाले, “करूया ना!”
सौ. घाडगे म्हणाल्या, “मग आजच तुम्ही त्या दुकानात जाऊन त्याला ह्या काढून न्यायला सांगा. आवश्यक नव्या पट्ट्या लावून लवकर द्यायला सांगा. येत्या बुधवारी शालिनी येईल.”
श्री घाडगे कामावर जातांना प्रथम त्या दुकानांत जाऊन त्याला काम सांगून आले.
नंतर ते आपल्या कचेरीत आले.
तिथे त्यांच्या टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती.
ज्या मित्राने हजार रूपये दिले होते, त्याची ती चिठ्ठी होती.
“प्रिय मित्रा, जर शक्य असेल तर मी तुला उधार दिलेले हजार रूपये परत करशील का? तू जर उद्यापर्यंत ते परत केलेस तर माझ्यावर मोठेच उपकार होतील. मला एक मोठी रक्कम चुकती करायचीच आहे आणि अचानक मला यावयाच्या मोठ्या रक्कमेचा एक चेक परत आलेला आहे.”
श्री घाडगेंच्या मन:स्थितीने अचानक वाईट वळण घेतले.
दिवाणखान्यात केलेल्या सुधारणांमुळे पत्नीला सुरूवातीला झालेल्या आनंदाचा त्यांनाही थोडा संसर्ग झाला होता पण आता त्या आनंदाची जागा दु:खद पश्चात्ताप आणि आत्मनिर्भत्सना यांनी घेतली.
सुमारे दोन तासांनी श्री घाडगेंनी मित्राला उत्तर पाठवलं.
दोन तास ते नुसताच फोल विचार करत होते की एवढे पैसे कसे उभे करता येतील! त्यांना पगारातून आगाऊ रक्कम मागता आली असती पण एक तर अशी आगाऊ रक्कम त्यांना त्यांच्या कंपनीत मिळणं कठीणच होतं आणि त्यानंतर ते पुढील महिन्याचा घरखर्च कसा भागवणार होते?
शेवटी अत्यंत दु:खी मन:स्थितीत त्यांनी मित्राला आपण उधारी एवढ्यांत परत करू शकत नसल्याबद्दल क्षमायाचना करणारे आणि लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देणारे उत्तर लिहिले.
त्यांनी आपली चिठ्ठी मित्राला पाठवल्यानंतर थोड्याच वेळांत मित्राने रागारागाने लिहिलेली एक चिठ्ठी त्यांना आली.
“तू मैत्रीला चांगला जागलास! तू उधारी परत करण्यासाठी जी मुदत मागितली होतीस ती तर केव्हाच संपून गेलीय. मी सभ्यपणे वाट पहात होतो पण मी अडचणीत असतांना, घरी नवा गालिचा आणि फर्निचर खरेदी करणारा पण माझी उधारी द्यायला नकार देणारा गृहस्थ माझा मित्र असूच शकत नाही.”
श्री घाडगेंनी ती कडवट शब्दातील चिठ्ठी दोनदां वाचली व पुन्हा घडी घालून खिशांत ठेवली. त्यानी सौ. घाडगेंना त्याबद्दल कांही सांगितलं नाही.
सौ. घाडगेंचे आपल्या नव्या गालिच्याचे गुणगान सतत त्यांच्या कानावर येत होते व त्यांच्या कमकुवत स्वभावामुळे पत्नीच्या लहरीला मान तुकवल्याची त्यांना आठवण करून देत होते. नीट विचार करून निर्णय घेण्याऐवजी त्यांनी तिला खूष ठेवण्यासाठी निर्णय घेतला, हे आता त्यांना चुकीचे वाटत होते.
ते जरी पत्नीला कांही म्हणाले नाहीत तरी त्यांचे कांहीतरी बिनसले आहे, हे पत्नीला उमगले परंतु कशामुळे ते त्रस्त आहेत, ह्याचा तिला अंदाज आला नाही.
शेवटी शालिनीच्या भेटीचा दिवस आला. व्हेनिशियन ब्लाईंडज् अजून आणून बसवल्या नव्हत्या.
आणखी एक आठवडा तरी त्या मिळण्याची शक्यता नव्हती.
उघड्या खिडक्यांमुळे दिवाणखाना भकास वाटत होता.
उनही आत येत होते. सौ. घाडगेनी तात्पुरते कापडाचे जुने पडदे वापरण्याच्या विचार केला पण त्यांनाच तो पटला नाही कारण नव्या गालिचाची शोभा त्यांनी घालवली असती.
सौ. घाडगे पतिराजांना म्हणाल्या खिडक्यांवर कांही तरी लावायला हवे नाही तर शालिनीला आपण तिचं योग्य स्वागत केल्यासारखं वाटणार नाही.
श्री घाडगे म्हणाले, “शालिनीचं स्वागत आपण आपुलकीने करू. खिडक्या सजवून आणि गालिचाने नाही.”
ज्या पध्दतीने श्री घाडगेनी हे उत्तर दिले त्यामुळे सौ.घाडगे थोड्या आश्चर्यचकीत झाल्या. आपल्याला पतिराजांनी चापल्यासारखे त्यांना वाटले.
तरी त्या म्हणाल्या, “खिडक्यांना कांहीतरी दुसरं आणू कां?”
श्री घाडगे निश्चयी सुरात म्हणाले, “नाही. आपण आधीच बराच खर्च केला आहे.”
सौ. घाडगेना पतीचे वागणे फारसे आवडले नाही.
त्या दु:खी झाल्या.
थोडा वेळ कुणी कांहीच बोललं नाही.
सौ घाडगे शालिनीला कसा दिवाणखाना ओकाबोका वाटेल ह्याचा विचार करत राहिल्या तर श्री घाडगे मित्राचे कर्ज, मित्राचा राग आणि मित्र तुटणे, ह्याचा विचार करत होते.
अनेक दिवसांनंतर पती-पत्नीत थोडी अस्वस्थता निर्माण झाली होती.
दुसऱ्या दिवशी शालिनी आली. ती कांही सौ. मालिनीच्या घरी पहाणी किंवा तपासणी करायला आली नव्हती किंवा तिला आपल्या परिस्थितीची आणि मावसबहिणीच्या परिस्थितीची तुलनाही करायची नव्हती.
ती प्रेम आणि आपुलकीने त्या दोघांना भेटायला आली होती.
तिला नेहमीच वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या मालिनीबद्दल ओढ वाटत आली होती आणि मधल्या दूर रहाण्यामुळे ती ओढ अधिकच वाढली होती.
परंतु तिचा भेटीचा आनंद लगेचच मावळला होता.
निदान शालिनीला तरी तसे जाणवले.
पहिला दिवस संपेपर्यत तिच्या लक्षात आले की मालिनीची सतत आपल्यावर छाप पाडण्याची धडपड चालली आहे.
तिचा आणि श्री घाडगे यांचा संसार कसा उत्तम आर्थिक स्थितीत आहे, हे पटवून देण्याची धडपड मालिनी करते आहे.
तिला आपलं मन उघडं करण्यात रस नाही.
समजा मालिनी शालिनीला भेटायला आली असती तर शालिनीने क्षणभरही तिच्या स्वागतासाठी कांही तयारी करण्याचा विचारच केला नसता.
तिने जे कांही स्वागत केलं असतं तें हृदयापासून केलं असतं.
शालिनीला आपली मावसबहिण, जिच्याबरोबर तिने लहानपणी अनेक वर्षे आनंदात, मजेत घालवली होती, ती आताही तशीच हवी होती.
त्यावेळची सर्व गोष्टीत लहान मुलीच्या उत्सुकतेने भाग घेणारी बहिण आता व्यवहारी, दिखाऊ वाटली.
आता तिला मालिनीच्या सहवासाचा कंटाळा येऊ लागला.
दोघी दूर गेल्यापासून शालिनी अनेक नव्या भल्याबुऱ्या प्रसंगाना सामोरी गेली होती. आपल्या सर्व नव्या अनुभवांबद्दल तिला आपल्या मालिनीला भरभरून सांगायच होतं.
तसंच मालिनीकडून तिला मनसोक्त ऐकायचं होतं पण मालिनी तर बाह्य देखाव्यात अडकली होती.
शालिनीला मालिनीच्या दिवाणखान्यातील फर्निचरशी कांही देणं घेणं नव्हतं.
कां असावं?
मालिनी सतत त्या व्यावहारीक दिखाव्याचे संदर्भ देत होती.
पूर्वी भावना, विचार आणि स्वप्नं बोलून दाखवणारी व आता अनुभव आणि वय यांनी अधिक परिपक्व मैत्रिणीसारखी मालिनी ही बहिण भेटेल असं वाटत असतांना, जी मालिनी तिला भेटली तिने शालिनीच्या मनांतील तिची मूर्ती भंग पावली.
हाय! हाय! तिच्या डोळ्यांतली पूर्वीची ती चमक मंद झाली होती.
शेवटी जाण्याच्या दिवशी सकाळी जेव्हां सौ. घाडगेनी तिच्याकडे चाळीसाव्या वेळी खिडकीच्या वेनिशियन ब्लाईंडस न आल्याचे व त्यामुळे आपल्याला मरणप्राय दु:ख होत असल्याचे म्हटले, तेव्हा शालिनी तिला म्हणाली, “माले, मी तुला कडकडून भेटायला आले होते. तुझं फर्निचर पहायला नाही. मी तुझ्या हृदयात डोकावायला आले होते, माझं हृदय तुझ्याकडे उघडं करायला आले होते. तुझ्या घरातील फर्निचर पहायला नव्हते आले. मला तुझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारायच्या होत्या. आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हंसायचं होतं. नंतरच्या आयुष्यातले अनुभव सांगायचे होते. पूर्वी जसं आपल्यांत कांही गुपित नसे व आपण मनसोक्त बडबडत असू तसं बोलायचं होतं. माझं इतर गोष्टीकडे लक्षच गेलं नसतं. मला परत गेल्यावर तुझी परिस्थिती कशी आहे म्हणून कोणी विचारलंच असतं तर मी त्यांना असंच सांगितलं की माझी मावसबहिण आपल्या संसारात रमली आहे. खरं तर हे बोलायचं नव्हतं मला पण मी बोलून गेले. आता कांही शब्द परत घेतां येत नाहीत.”
सौ. घाडगेंना नुसतंच वाईट वाटलं असं नाही तर कोणी तरी फटकारल्यासारखं वाटलं आणि स्वाभिमानाला ठेंच पोहोचवल्याचं दु:ख झालं.
त्यांनी ते लपवायचा खूप प्रयत्न केला पण प्रत्यक्षात त्या आणखीच कोरड्या वाटल्या. त्यांना जाणवलं की आपला व शालिनीचा एकत्र झालेला प्रवास लग्नानंतर संपून ती दूर गेली होती.
सुदैवाने पुन्हां त्या दोघी थोडा काळ एकत्र आल्या होत्या पण आता मात्र त्या कायम दूरच रहाणार होत्या.
आणखी कांही तासांनी शालिनी त्यांचा निरोप घेऊन निघाली.
शालिनी येताच त्या दोघी ज्या आवेगाने भेटल्या होत्या तो आवेग आता दोघींमधेही नव्हता. सौ. घाडगेंना निरोप घेतल्यावर फार दु:ख झालं.
स्वत:बद्दल असमाधान वाटलं.
त्यांच्या मैत्रिणीने आयुष्यात जी विचारांची परिपक्वता मिळवली होती, ती त्यांना मिळवता आली नव्हती.
परंतु ह्यापेक्षाही अधिक दु:ख तिच्या वाट्याला यायचं होतं.
पतिराजांच्या कोटाच्या खिशांतली, त्यांच्या जुन्या मित्राने रागाने लिहिलेली ती चिठ्ठी तिच्या हाती आली व तिच्या दु:खाला पारावार राहिला नाही.
आपली बहिण आपल्या सुंदर नव्या गालिचाबद्दल प्रशंसेचे उद्गार काढेल असे वाटले होते, ते तर झाले नव्हतेच.
ती तर नाराज होऊन दूर गेलीच होती पण तिच्या पतिराजांनीही त्या गालिचापायी एक जुना, जवळचा मित्र गमावला होता आणि पतिराज आता मनातल्या मनांत कुढत होते.
कमकुवत मनाच्या सौ. घाडगेनी हा गालिचा घ्यायचा हट्ट करून आनंद मिळवायचा प्रयत्न केला होता व प्रत्यक्षात दु:खी होऊन बसल्या होत्या.
अशा विचारांच्या दडपणांनी स्तब्ध होऊन त्या बसलेल्या असतानाच त्यांची एक शेजारीण त्यांना भेटायला घरांत आली व दिवाणखान्यात येऊन दाखल झाली.
शेजारीण म्हणाली, “किती छान गालिचा आहे. कुठून आणला?”
शेजारीण खरे कौतुक करत म्हणाली. “अशाच नक्षीचे आणखी गालिचे असतील ना त्याच्याकडे?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “नाही, हा त्यातला शेवटचाच होता.”
शेजारणीला वाईट वाटले.
तिला तो इतका आवडला होता की अशाच गालिचासाठी तिची शहरातील सर्व दुकानं शोधायची तयारी होती.
सौ. घाडगेंना अचानक मनांत आलं आणि त्यांनी विचारलं, “हा हवा कां तुम्हाला? तुम्ही नेऊ शकता. मी आणला पण माझ्या यजमानांना फारसा आवडला नाही. तुमचा दिवाणखाना अगदी एवढाच आहे. आम्ही ह्याची किनार वगैरे लावलेली आहे. आम्ही हा पांचशे रूपयांना घेतला. सगळा खर्च त्यातच आला. तुम्ही तेवढेच द्या आणि घेऊन जा.”
शेजारणीने विचारलं, “मनापासून सांगताय हे तुम्ही?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “अगदी मनापासून सांगत्येय.”
शेजारीण म्हणाली, “मग ठरलं तर!”
सौ. घाडगे म्हणाल्या, “ठरलं!”
शेजारीण म्हणाली “केव्हां नेतां येईल मला?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “जमिनीवरून काढला आणि गुंडाळला की केव्हांही.”
शेजारीण म्हणाली, “मग तुम्ही काढायला सुरूवात करा. तुम्ही गुंडाळी करायच्या आत मी पांचशे रूपये घेऊन परत येते बघा.”
आणि तसंच झालं.
सौ. घाडगेंनी तो गुंडाळायच्या आधीच शेजारीणीने पाचशे
रूपये आणून दिले. व्यवहार पूर्णही झाला.
सौ. घाडगे गालिचावाचून रिकाम्या जमिनीकडे पहात होत्या.
पण त्यांच्या हातात शंभरच्या पांच नोटा होत्या आणि ह्या क्षणी त्यांना ते अशा डझन गालिचापेक्षा भारी वाटत होते.
फार वेळ विचार करत बसायला त्यांना वेळ नव्हता.
जुनं कार्पेट वरून आणून परत दिवाणखान्यात घालायचं होतं.
ती ते करत असतानाच खिडक्यांच्या ब्लाईंडस घेऊन दुकानाचा माणूस आला व नव्या पट्ट्या बसवलेल्या ब्लाईंडस लावून गेला.
संध्याकाळी श्री घाडगे परत आले.
दिवाणखान्यात पाऊल ठेवतांच ते आश्चर्याने म्हणाले, “हे काय? नवा गालिचा कुठे गेला?” तिने त्यांना अधिक आश्चर्यात टाकत हातातल्या पाच करकरीत नोटा दाखवल्या.
तिच्या डोळ्यात पाणी तरळत होते.
ते म्हणाले, “हे कुठून आले? कसे आले?”
सौ. घाडगे म्हणाल्या, “शालिनी येऊन गेली. ह्या गालिचाची तिच्यावर कांही छाप पडली नाही. तेव्हांच माझ्या दृष्टीने तो सुंदर राहिला नाही. मी त्याचा शेजारणीबरोबर सौदा केला व विकून टाकला. त्याचेच हे पाचशे रूपये. हे तुम्ही घ्या आणि मित्राचे देणे प्रथम देऊन टाका.”
श्री घाडगे म्हणाले, “मालिनी, तू छान केलंस! त्या गालिचाने कदाचित आपल्या घरातलं सुख आपण गमावून बसलो असतो. माले, लक्षात ठेव. ह्यापुढे आपण आपल्या नजरेनेच पहायचे. लोकांच्या नजरेला कसं दिसेल, लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, ह्याचा विचार करायचा नाही. आपण कसे आहोत, हे आपल्यालाच सर्वांत जास्त माहित असते. फक्त सुंदर सजावटीतून घरात आनंद नांदत नाही तर आपण योग्य गोष्टी केल्याच्या समाधानातून तो लाभतो. आपलं मन स्वच्छ ठेवू या आणि आपलं जीवन आपोआप छान होईल. दुर्गुणी लोकांच्या महालांपेक्षा, जिथे गुण नांदतात त्या साध्या घरात खरं सुख आणि शांती नांदते. हा विचार फार फार जुना व अनुभवी लोकांनी मांडलेला आहे पण प्रत्येकाला तो समजायला आयुष्यांत एखादी तशी घटीका येते. आपल्या जीवनांत ती आता आली आहे.”
तसा आनंद त्यांच्या जीवनात आला.
ह्या लहानशा घटनेने त्यांचे विचार बदलले आणि पुढील संपूर्ण आयुष्याला त्यांना नवे वळण देतां आले.
अशी चूक त्यांनी पुन्हा केली नाही.
आणखी तीन वर्षे त्यांच्या जुन्या गालिचाने त्यांचा दिवाणखाना सजवण्याचं काम पार पाडलं.
मग त्यांनी तो बदलला.
तो बदल त्यांनी स्वत:च्या नजरेने केला होता, दुसऱ्यांच्या नजरेने नाही.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – अदर पीपल्स आईज्

मूळ लेखक – टी. एस. आर्थर (१८०५-१८८५)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..