नवीन लेखन...

प्रवाशाची विचित्र व भयानक पलंगाची गोष्ट – भाग दुसरा (संक्षिप्त रूपांतरीत कथा २१)

मी खोली तपासली.
पलंगाखाली पाहिले कपाटात पाहिले.
खिडकी तपासून पाहिली.
दार आतून सर्व कड्या लावून घट्ट बंद केले.
दाराशी एक टेबलही लावले.
अंगावर रग ओढून पलंगावर झोपलो.
मला समाधान वाटत होते की मी सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे.
माझा धनाने भरलेला रुमाल मी उशी खाली ठेवला.
मला लौकरच लक्षांत आलं की मी झोपू शकत नव्हतो, इतकंच नव्हे तर मी डोळेही मिटू शकत नव्हतो.
माझे डोळे सताड उघडे होते.
तापांत असावं असं वाटतं होतं.
माझ्या शरीरातली प्रत्येक शीर न शीर थरथरत होती.
मी कधी उशीत तोंड खुपसून तर कधी उताणा पडून, कधी पाय पोटाशी घेऊन, कधी पाय ताणून, कधी हात डोक्यावर धरून तर कधी हात पांघरूणाबाहेर काढून, सर्व प्रकारे झोपून पाहिले.
पण झोप येईना.
रात्र बहुदा झोंपेवाचून जाणार होती.
मी काय करू शकत होतो.
वाचायला तिथे पुस्तक नव्हतं.
मनांत नाना विचार होते.
मनाला सांवरण्यासाठी काही केलं नाही तर भितीतच माझी रात्र जाणार होती.
खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशांत मी खोलीतील वस्तूंवरून नजर फिरवत असतांना एका लेखकाने अशावेळी काय कल्पना केली होती त्याची मला आठवण झाली.
त्याने अशाच परिस्थितीत आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची मनांत नोंद केली होती.
ती सुध्दा त्या वस्तूच्या मूळ रूपापासून ती आताच्या स्थितीला येईपर्यत तीचा प्रवास कसा झाला असेल त्यासकट.
म्हणजे खुर्ची, मूळचं झाड, लाकूड, वगैरे.
पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
आतांच्या भीतीदायक परिस्थितीचेच विचार मन:पटलावर परत परत उमटू लागले.
मग मी नुसताच खोलीतल्या वस्तूंकडे पहात राहिलो.
पहिला दिसत होता तो माझा पलंग.
कलकत्यासारख्या शहरांत कोणा अस्सल ब्रिटीशाने स्वतःच्या पध्दतीचा बनवून घेतलेला ठोकळेबाज चार खांबी पलंग होता तो.
अड्डेवाल्याने लिलावात घेतलाय की काय ?
वरची जाड छतवजा फळी पाहिली.
पलंगावरचे पडदे पाहिले.
खोलीत आलो तेव्हा किंवा नंतरही मी पडदे पाहिलेच नव्हते जणू.
मी प्रतिक्षिप्त क्रियेनेच पडदे दूर सारले होते.
हात धुवायच्या संगमरवरी स्टँडवरून पाणी टपटप खाली पडत होतं.
दोन खुर्च्या होत्या.
त्यावर माझा कोट, पँट पडले होते.
एक खण असलेले कपाट, त्याच्या पितळेच्या तुटलेल्या कड्या, वेशभूषा करायचं टेबल, त्यावरचा छोटा आरसा, इ. कडे बघत होतो.
माझं लक्ष मोठ्या खिडकीकडे गेलं.
नंतर वर टांगलेल्या एका जुनाट चौकटबध्द केलेल्या कुणाच्या तरी मोठ्या चित्राकडे माझी नजर गेली.
कोणीतरी स्पॅनिश हॅट घातलेला माणूस होता.
चित्रावरून तरी तो पक्का खलनायक वाटत होता.
तो वर पहात होता.
बहुदा त्याला फांशी देण्यांत येत असेल व तो त्या फासाकडे पहात आहे असेच वाटत होते.
मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात एवढेच दिसत होते.
ते चित्र जरा उंचावरच होते व मला मान वर करून पहावे लागत होते.
मी त्याच्या टोपीची पिसे मोजली.
तीन सफेद तर दोन हिरवी.
टोपीचा वरचा भाग गोल नव्हता तर कोन करणारा होता.
कोणी असेल त्याला जर फाशी देण्यात येत असेल तर ती शिक्षा योग्यच असावी असाच त्याचा चेहरा पाहून वाटत होते.
त्या चित्राबद्दल मी असे विचार करत असताना माझे विचार आणखी भरकटू लागले.
मला मसुरीला घालवलेली एक रात्र आठवली.
ती सहलीनंतरची रात्र होती.
चंद्रप्रकाशात गाडीतून प्रवास करताना पाहिलेलं सर्व निसर्गसौंदर्य मला आठवलं.
पूर्वी कधी मला त्या रात्रीची अशी आठवण आली नव्हती.
माणसाच्या ज्या कांही क्षमता त्याला तो अमर असल्याचं भासवतात, त्यांत ‘स्मरणशक्ती’ ही प्रमुख असावी!
मी इथे विचित्र आणि कठीण अवस्थेत अडकलो होतो, भोंवती सगळी अनिश्चितता होती, कदाचित संकटही,
आणि मला सर्व संवाद, हंसणं, इ. सह त्या सहलीनंतरच्या प्रसंगांची पूर्णपणे आठवण येत होती, हे नवलच.
हे नवल केवळ चंद्रप्रकाशामुळे घडलं होतं.
त्यावेळी एका मुलीने म्हटलेल्या गाण्याच्या ओळीही मला आठवू लागल्या होत्या आणि तेवढ्यांत अचानक तंद्री तुटली.
मी परत वर्तमानात आलो.
परत ते त्या स्पॅनिश टोपीवाल्याचं चित्र पाहू लागलो.
तर अहो आश्चर्यम् !
मला त्या माणसाचे डोळेच दिसत नव्हते.
मला वाटले त्याने टोपी डोळ्यांवर ओढली की काय ?
पण नीट पहातो तर टोपीच दिसत नव्हती.
नव्हे त्या माणसाचे पूर्ण डोकेच दिसत नव्हते.
पलंग हलत होता की काय ?
मी उताणा झोपून वर पाहू लागलो.
मी वेडा झालो होतो की पुन्हां शुध्द हरपण्याएवढा प्यायलो होतो ?
की खरंच पलंगाची छताची फळी खाली खाली सरकत होती ?
नक्कीच, ती फळी माझ्या दिशेने सरकत होती.
अशीच खाली आली असती तर मला तिने चिरडून टाकलं असतं.
खरंच फळी सरकत्येय कां बघण्यासाठी मी उशीवरची मान उजवीकडून डावीकडे फिरवली व परत चित्र पाहू लागलो.
अरे बाप रे !
आतां तर त्या स्पॅनिश टोपीवाल्याचा फक्त कमरेखालचा भाग दिसत होता.
मी स्वभावत:च धीट आहे.
अनेक संकटातून पार पडलो आहे कधीही घाबरून अवसान हरवून बसलो नाही.
मला ती भुताटकी वाटली नाही.
तरीही जेव्हा माझ्या लक्षांत आले की लौकरच ती फळी मला बिछान्यातच चिरडून टाकेल तेव्हां क्षणभर मला हतबल वाटलं, भीतीने गार पडतोय असं वाटलं.
ही मारायची घाणेरडी यांत्रिक पध्दत होती आणि मी झोपलो होतो तिथेच माझा जीव घ्यायला ती फळी भरभर जवळ सरकत होती.
मी न हलतां, न बोलतां, श्वासही न घेतां वर बघत होतो.
घाबरल्यामुळे मी बिछान्याला खिळल्यासारखा पडलो होतो.
तेवढ्यात मेणबत्तीही विझली.
फळी जवळ येत होती.
लाकडाचा वास येऊ लागला आणि त्याच क्षणी माझ्या स्वरक्षण करण्याच्या प्रेरणेने मला तंद्रीतून बाहेर काढलं आणि अगदी अखेरच्या क्षणी लोळत, सरकत बिछान्याच्या कडेवरून मी हळूच खाली पडलो.
फळीचे एक टोक माझ्या खांद्याला पुसटसे चाटून गेले.
मी गुडघ्यांवर बसून पहात होतो.
पलंगाचं छत ही साधी फळी नव्हती तर एक मोठी जाड गादीच होती.
सभोवती लांकडी चौकट होती.
आतां ती गादी पूर्णपणे खालच्या झोपण्याच्या गादीवर जोराने दाबली जात होती.
तिच्या वरच्या बाजूला मध्यभागी एक मोठा लांकडी स्क्रू होता.
ज्याने ती सरकत सरकत खाली आली होती.
दोन गाद्यांमधे चिरडून मारण्याचं साधं काम्प्रेसर सारखं काम करणार यंत्र होतं ते.
पंधराव्या सोळाव्या शतकांत ‘इंन्क्विझिशनच्या’ काळांत युरोपमधे लोकांना मारायला वापरायला तयार केलं असावं, असं यंत्र एकोणीसाव्या शतकात बसवलेलं होतं.
ते अजिबात आवाज न करता खाली आलं होतं.
माझे विचारचक्र सुरू झाले.
मी जेमतेम श्वास घेत होतो.
मला कळत होतं की ही मला मारून टाकण्याचीच योजना होती आणि मनांत पुन्हां भीती दाटून येत होती.
मला कॉफीतून गुंगीचं औषध देण्यांत आलं असावं.
परंतु माझ्यावर त्याचा उलट परीणाम झाला होता.
माझी झोप उडाली होती.
मला जो ताप वाटत होता आणि त्रास वाटत होता, त्या जागेपणानेच मला वाचवले होते.
मी किती अंधविश्वासाने तो सैनिक आणि अड्डेवाला यांच्यावर विश्वास टाकून ह्या खोलीत झोपायला आलो.
माझी जिंकलेली पुंजी सांभाळण्यासाठी मी त्यांच्यावर विसंबून फसलो होतो व चालत त्यांच्याच सापळ्यात येऊन अडकलो होतो.
माझ्यासारखे जिंकणारे आणखी किती जण असेच इथे मारले गेले असतील, याची कल्पना करवेना.
अशीच दहा मिनिटे गेली असतील आणि ते छत पुन्हा वर जाऊ लागलं.
बिलकूल आवाज न करतां.
त्या दुष्टांना वाटलं असावं की आपलं काम झालं.
ते वर जाऊन परत आपल्या जागी स्थिर झालं.
आता तो साधासुधा पलंग वाटू लागला.
मी माझ्या पायांवर उभा राहिलो.
कपडे घातले.
इथून लौकरांत लौकर कसं पळायचं त्याचा मी विचार करू लागलो.
मी जरा जरी आवाज केला असतां तरी मी मेलो नाही, हे त्यांना कळलं असतं.
बाहेर कुणाचीही चाहूल नव्हती.
दारांतून पळून जाणे अशक्य होते.
दार आतून घट्ट बंद करण्यासाठी मी लावलेले लाकडी टेबल
सरकवल्यास आवाज झाला असता.
शिवाय दाराकडील वाट बरीच लांब होती व मी नक्कीच पकडला गेलो असतो.
सुटकेचा एकच मार्ग दिसत होता.
तो म्हणजे खिडकी.
मी आवाज न करतां खिडकीशी पोहोचलो.
ती घराच्या मागच्या बाजूला उघडत होती.
मी पहिल्या मजल्यावर होतो.
अतिशय हलक्या हाताने मी खिडकी उघडली.
जरासाही आवाज खतरनाक ठरला असता.
खूनी घरात लक्ष तर ठेवलं जाणारच.
ती पांच मनिटं मला पाच तासांसारखी वाटली.
अखेरीस आवाज न करता खिडकी उघडण्यात मी यशस्वी झालो.
बाहेर पाहिलं.
त्या उंचीवरून उडी मारणं म्हणजे पुन्हां आत्मघातच.
एवढ्यांत डाव्या बाजूला मला पाईप दिसला.
पाईपवरून चढणे अथवा उतरणे हा माझ्या हातचा मळ होता.
मी ही गोष्ट लहानपणापासून अनेकदा केलेली होती.
मी एक पाय बाहेर टाकला आणि मला माझी पुंजी ठेवलेला उशीखालचा रुमाल आठवला.
मी तो सोडून जाऊ शकत होतो पण मला ती पुंजी त्या चोरांना मिळायला नको होती.
मी परत हलकेच पलंगापाशी गेलो.
पुंजीसह रुमाल काढून घेऊन मानेवरच्या पट्ट्यात ठेवला.
क्षणभर दरवाजाबाहेर आवाज आल्यासारखे वाटले.
पण तो वाऱ्याचा आवाज होता.
ताबडतोब मी खिडकी ओलांडून पाईपवरून सहज खाली आलो.
खाली पाय ठेवताच मी जवळच्या पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.
मी पोलिस स्टेशनला पोहोचलो तेव्हां तिथे कलकत्त्यांत नुकत्याच झालेल्या व न उलगडलेल्या खूनाबद्दल चर्चा चालू होती.
माझे मराठी माणसाचे इंग्रजी सुरूवातीला इन्स्पेक्टर साहेब ऐकत नव्हते कारण त्यांना मी प्यालेला इसम वाटत होतो.
एकूण प्रकार लक्षांत येताच मात्र माझी गोष्ट पूर्ण होण्याच्या आधीच ते उठले.
पोलिसांची एक तुकडी बरोबर घेतली व ते निघाले.
इतरांना भराभर सूचना दिल्या.
इन्स्पेक्टर लहान असतांना प्रथम बाहेर खेळायला जातांना जितके खुशीत होते असतील, तेवढेच ह्या जुगारी अड्ड्यावर छापा टाकण्याच्या कामगिरीवर खूष दिसले.
पोलिसांनी अड्डयाला घेरले.
मला एका पोलिसाआड लपवले.
नंतर त्यानी जुगारी अड्ड्याचे बंद दार ठोठावायला सुरूवात केली.
ते ओरडले. “दरबाजा खोलून, आमी पोलिस”.
तेव्हां अनेक कड्या-कोयंडे काढण्याचा आवाज झाला व शेवटी दार उघडले.
एक भीतीने फिकट पडलेला वेटर समोर आला.
त्याला ते म्हणाले, “आम्ही इथे आलेल्या मराठी माणसाला पहायला आलोत.”
वेटर म्हणाला, “तो तर तेव्हाच गेला.”
इन्स्पेक्टर म्हणाले, “त्याचा मित्र गेला. तो इथेच राहिला.”
वेटर म्हणाला, “मी शपथेवर सांगतो, तो इथे नाही.
तो….”
इन्स्पेक्टर म्हणाले, “ मीही शपथेवर सांगतो, तो इथेच राहिला. त्याला तुमचा पलंग आणि बिछाना आरामदायक वाटला नाही, म्हणून तो आमच्याकडे तक्रार घेऊन आला.
तो आमच्या बरोबरच आहे.
आता आम्हांला तुमच्याकडल्या बिछान्यांत ढेकूण आहेत की पिसवा, ते पहायचेय.”
इन्स्पेक्टरनी त्या वेटरला ताब्यात घ्यायला सांगितले.
घरांतील प्रत्येकाला, त्या म्हाताऱ्या सैनिकासकट, सर्वांना पोलिसांनी ताब्यांत घेतलं.
मी ती खोली व पलंग इन्स्पेक्टरना दाखवला.
त्यांनी तो नीट पाहिला.
आम्ही बरोबर त्या खोलीच्या वरच्या खोलीत गेलो.
तिथे कांही संशयास्पद दिसत नव्हतं पण इन्स्पेक्टरनी पाय आपटून चाचपणी केली व एके ठिकाणचा लाकडी तळ फोडायला सांगितला.
तो फोडल्यावर आंत त्या लाकडी स्क्रूचा वरचा भाग दिसू लागला.
अगदी उत्तम प्रकारे तो लाकडी दांड्याने खालच्या खोलीतील बेडशी जोडण्यात आला होता. त्याला भरपूर वंगण लावलेले होते.
यांत्रिक युक्ती वापरून तो एखाद्या प्रेस सारखाच बसवलेला होता.
इन्स्पेक्टरनी तो कसा वापरतां येऊ शकतो, तेही पाहिलं.
मग तो चालवण्याचं काम पोलिसांवर सोपवून ते मला घेऊन खालच्या खोलीत आले.
त्या पलंगाचे छत हळूहळू खाली येऊ लागले होते पण आवाज येत होता.
मी त्याबद्दल विचारताच इन्स्पेक्टर म्हणाले, “माझे पोलिस प्रथमच हा प्रेस चालवत आहेत. तुम्हाला मारू पहाणारे तो वापरण्यात तरबेज झाले होते.”
ती व्यवस्था प्रवाशाला दोन गाद्यांत चिरडून मारायसाठीच होती, याबद्दल इन्स्पेक्टरांची खात्री झाली.
आम्ही पोलिस स्टेशनवर परत आलो.
सगळ्यांचे जाब जबाब लिहून घेण्यात आले.
मी इन्स्पेक्टरना विचारले, “तुम्हाला काय वाटते ?
मला मारण्याचा प्रयत्न झाला तसेच इतर कुणाला मारण्यात आले असेल ?”
इन्स्पेक्टर म्हणाले, “देशमाने, मी आतापर्यंत दोन डझनाहून जास्त प्रेतं भागीरथी (हूगळी अथवा गंगा) नदीतून काढलेली पाहिली आहेत.
त्या सर्वांच्या खिशांत आत्महत्त्या करत असल्याची चिठ्ठी असे.
त्यापैकी बरेच जण ह्या जुगारी अड्ड्यावर जाऊन जिंकलेले प्रवासी कशावरून नसतील ?”
पोलिसांनी कसून चौकशी केली.
सर्वांना वेगवेगळे करून प्रश्न विचारले.
त्यातून स्पष्ट झाले की तो म्हातारा सैनिकच त्या जागेचा खरा मालक होता.
तो सैन्यांतून पळालेला व कारवाई झालेला होता.
त्याने अनेक गुन्हे केले होते.
त्याच्याकडे बराच चोरीचा मालही मिळाला.
त्याला, अड्डेवाला म्हणून बसणाऱ्याला आणि कॉफी बनवणाऱ्या बाईला त्या पलंगाची व त्याच्या गैरवापराची माहिती होती.
त्या दोघांना मृत्युदंडाची तर त्या बाईला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
इतरांना संशयाचा फायदा घेऊन सोडून देण्यात आले.
एवढं मात्र नक्कीच झालं की मी तेव्हांपासून जुगार खेळणं सोडलं.
समाप्त.
– अरविंद खानोलकर.
मूळ लेखक : विल्की कॉलीन्स
मूळ कथा : द ट्रॅव्हेलर्स स्टोरी ऑफ हॉरीबल अँड स्ट्रेंज बेड
तळटीपः मूळ कथा पॅरीसमधे घडली असे दाखवले आहे. इन्क्विझीशनचा उल्लेख त्यामुळेच आहे. तेराव्या शतकांत धर्मावरून अतिशय कडक शिक्षा फर्मावण्यांत येत व अत्यंत क्रूरपणे अनेकांना वेगवेगळ्या भयानक शिक्षा देऊन मारलं जात असे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..