नवीन लेखन...

भिंतीच्या पलिकडे (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४)

मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो.
पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो.
मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता.
सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं.
पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही.
सशक्त चणीचा, देखणा आणि खानदानी श्रीमंत मोहन मला आठवत होता.
मोहन अभ्यासू होता.
मोठे उत्पन्न असलेल्या इस्टेटीचा एकमेव वारस होता.
इतरांना हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी त्याला सहज उपलब्ध होत्या पण त्याला त्यांत रस नव्हता.
मोहन थोडा भावनाप्रधान आणि अंधश्रध्दाळूही होता.
तो तांत्रिक पंथाविषयी खूप वाचन करत असे.
परंतु त्याची विचारशक्तीही तशीच सुदृढ असल्यामुळे तो कुठल्याही एका पंथाच्या नादी लागला नव्हता.

मी त्याला भेटायला गेलो ती उत्तरेच्या हिवाळ्यातली एक अतिशय गारठवणारी रात्र होती.
रस्ते निर्मनुष्य होते, वारे वहात होते.
झाडे उडून दुसरीकडे जायला उत्सुक वाटत होती.
माझ्या टॅक्सीवाल्याने मोहन रहायचा तो दुमजली बंगला सहज शोधून काढला.
बंगल्याबाहेरची बाग झाडांअभावी उदास दिसत होती.
बंगल्याच्या उजव्या कोपऱ्यात एक दिवा दिसत होता.
माझ्या अंगावर उगाचच कांटा उभा राहिला आणि मी थरथर कापत असतानाच पावसाची सर आल्याने मला बंगल्याच्या दरवाजातील कमानीकडे धांव घ्यावी लागली.
मी भेटायला केव्हां येऊ असं विचारायला त्याला चिठ्ठी पाठवली होती, तिला त्याने उत्तर दिलं होतं, “केव्हांही, दार उघडेच असेल, ढकल आणि आंत ये.”
मी तेच केले.
जिन्याच्या मध्यावर मंद दिवा होता.
मी कुठेही न धडपडतां उजेड असलेल्या कोपऱ्यातल्या खोलीच्या दारांत पोहोचलो.

मोहन माझ्या स्वागतासाठी दाराशी आला.
मी आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पण माझ्या आठवणीतील मोहन हा नव्हता.
मोहन जरा अकाली प्रौढ झालेला वाटला.
त्याचे सारे केस पांढुरके दिसत होते.
तो बारीक झाला होता आणि पाठीतून वाकलाही होता.
खोली गरम ठेवण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीजवळच्या खूर्चीवर तो बसला व मलाही समोर बसवून घेतले.
त्याने सिगारेट माझ्यापुढे धरली व झुरके घेत आम्ही दोघे थोडा वेळ इकडचे तिकडचे बोललो.
परंतु मला सारखी त्याच्यातल्या बदलाची आणि त्याच्या चेहऱ्यावरील औदासिन्याची छाप सलत होती.
त्यालाही ते जाणवले असावे.
तो मला अचानक म्हणाला, “नाराज आहेस ? तुला मी पूर्वीचा वाटत नाही ना ? मी, मी नाही राहिलो…”
काय म्हणावं ते मला सुचेना.
मी पुटपुटलो, “तसं नाही, पण कांही…”
तो म्हणाला, “तुला माझी भाषा कळत नाही ना !
पण मी जिथे जाणार आहे तिथे बहुदा चांगली भाषा असेल.”
मी त्याच्या बोलण्यांत विशेषतः अकाली मरण्याच्या कल्पनेत वाहवत न जाण्याचे ठरवले.
मी म्हणालो, “त्याला खूप वेळ आहे अजून.
माणसाचं आयुष्मान वाढलंय आता !”

आमचे बोलणे अचानक तुटले व शांतता पसरली.
आमच्या बोलण्याने रूळ बदलले होते.
बोलण्याला चांगली दिशा कशी द्यावी हे मला उमजत नव्हते.
शांतता पसरलीय असं वाटत असतानांच माझ्या मागच्या भिंतीवर कोणीतरी हळूवार पण स्पष्ट “टक्” असा आवाज केलेला मला ऐकू आला.
कुणातरी व्यक्तीने सांकेतिक आवाज करावा तसा तो वाटला.
त्या आवाजात उत्तराची अपेक्षा होती.
मी मोहनकडे पाहिलं.
माझ्या चेहऱ्यावरच कुतुहल त्याच्या लक्षांत नाही आलं.
तो स्वतःत हरवल्यासारखा त्या भिंतीकडे एकटक वेगळ्याच नजरेने पहात होता.
तो माझे तिथले अस्तित्वही विसरला होता.
आपली इथली उपस्थिती अडचणीची असेल असं वाटून मी त्याचा निरोप घेत म्हणालो, “मोहन, मी निघतो.”
तो भानावर आला.
माझा हात धरून मला पुन्हा बसवत म्हणाला, “खरंच तिथे कांही नाही, कोणी नाही.”
परंतु परत भिंतीवर तसाच आवाज आला.
हळूवार पण स्पष्ट.
मी परत जायला उठलो.
मोहन म्हणाला, “त्याची कांही जरूरी नाही.
ह्या घरात फक्त ह्या खोलींत आपण दोघे आहोत.
तिथे कोणी नाही.”
असे म्हणत तो उठला व त्याने त्या भिंतीवरील एकुलती खिडकी उघडून टाकली.
“बघ बाहेर कोणी नाही.”
मीही कांही न सुचून त्याच्याबरोबर खिडकीतून बाहेर डोकावलो.
बाहेर पाऊस पडत होता आणि फक्त बंगल्याची कुंपणाची भिंत दिसत होती.
मोहनने खिडकी बंद केली.
आम्ही परत आपापल्या जागी बसलो.

त्यांत विचित्र कांहीच घडलं नव्हतं.
आवाज येण्याची अनेक कारणं संभवत होती.
मग मोहनने माझं समाधान करण्यासाठी खिडकी उघडून कां दाखवली ?
त्यामागे त्याचा कांही हेतु जाणवत होता पण तो गप्प होता.
मी अस्वस्थ होऊन त्याला म्हणालो, “तू तुला हव्या त्या चमत्कारिक गोष्टींत रममाण हो पण मी एक साधा वास्तवांत रहाणारा माणूस आहे. मला ह्या चमत्कारिक गोष्टींच वावडं आहे. मी जातो माझ्या हाॅटेलवर.”
मी खोंचून बोललो.
पण त्याने नाराजी दाखवली नाही.
तो म्हणाला, “बस. तुझ्या येण्याने मला फार आनंद झाला. तू जे कांही ऐकलस तो भास नव्हता. मी ह्यापूर्वी दोनदा तो आवाज ऐकला आहे. आज तूही तो ऐकलास.
आता माझी खात्री झाली की तो भास नव्हता. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.
थोडा धीर धर. मी तुला संपूर्ण गोष्ट सांगतो.”
बाहेर पाऊस मधेच वाढत होता.
मध्यरात्र तर कधीच उलटून गेली होती.
मोहनबद्दलची सहानुभूती आणि रहस्य ऐकण्याची उत्सुकता यामुळे मी माझ्या मित्राच्या स्वगताचा स्वतःहून श्रोता बनलो.

“दहा वर्षांपूर्वी ह्याच शहरांत दुस-या टोकाला मी एका बैठ्या घरांत रहात होतो.
ती एकाला एक लागून असलेल्या घरांची लांब रांग होती.
प्रत्येक घरासमोर छोटी बाग होती.
त्या बागेला छोटं कुंपण होतं.
कुंपणानी घरे स्वतंत्र केली होती.
बराकीसारखी वाटतं.
कुंपणाच्या फाटकापासून घराच्या दारा पर्यंत फरशीचा रस्ता होता.
एक दिवस अचानक ती मला तिच्या बागेत दरवाजाकडे जातांना दिसली.
तिच्या सौंदर्याचे वर्णन मी करणार नाही.
पण स्त्री सोंदर्याच्या माझ्या ज्या कल्पना होत्या त्या सर्व तिच्यात साकारलेल्या होत्या.
तिचे कपडे साधे होते पण सौंदर्य स्वर्गीय होतं.
एखाद्या भक्ताने देवीच्या दर्शनाने मान लववावी तशी मी मान तुकवली पण डोळे तिच्यावरच खिळलेले होते.
तिने प्रत्युत्तर म्हणून आपले काळेभोर सुंदर डोळे क्षणभर माझ्यावर रोखले.
त्यांत राग नव्हता.
माझा श्वास क्षणभर रोखला गेला.
मी तसाच उभा होतो.
मग ती आपल्या दरवाजाकडे निघून गेली.
मी तिथेच घोटाळलो.
माझे वागणे मलाच सभ्यपणाचे वाटले नाही.
मी घरांत परत गेलो.
राहवेना म्हणून दुपारी मी बागेत जाऊन डेलियाची फुले पहात उभा राहिलो पण ती कांही पुन्हां दिसली नाही.
मी जड पावलांनी परत घरी गेलो.

त्यानंतर ती न दिसल्याने एक दोन रात्री मी तळमळत घालवल्या.
मग ती पुन्हां दिसली.
माझे डोळे तिच्यावर आपोआप रोखले गेले.
तिनेही मला पाहिले.
तिच्या सुंदर डोळ्यात तिने मला ओळखल्याची खूण दिसत होती.
माझं हृदय धडधडत होतं.
पण ह्यावेळी मी तिला पाहतोय ह्याची जाणीव दिली नाही.
जास्त वेळ पहातही राहिलो नाही.
त्यानंतर अनेकवेळा अनेक ठिकाणी आमची सतत अशी नजरानजर होतच राहिली.
पण मी कधी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला नाही.
मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे खरंच होतं परंतु माणूस आपल्या विचारापासून वेगळा थोडाच असतो.
स्वतःला नाकारणारा मी, स्वतःला खानदानी समजणारा मी, माझे खानदान आणि तिचे कुटुंब (तिचे नांव मला घरमालकिणीकडून कळले होते) ह्यांतली तफावत, पूर्ततेने खरं प्रेम संपतं हा माझा विचार, माझी रहाणी, इ. सर्व गोष्टी मला तिच्या पासून दूरच ठेवत होत्या.
मग मी सर्वाचा विचार करून तिच्यापासून दूरच रहायचा विचार केला.
नजरानजर होणार नाही ह्याची काळजी घेऊ लागलो.
तिला टाळू लागलो.
माझे अव्यक्त प्रेम हे माझे गोड स्वप्न होते, ते मोडायचे नाही असे ठरवून मी सर्व व्यवहार करत होतो.
खरं तर मी मूर्खांच्या नंदनवनात होतो.

एका संध्याकाळी सैतानानेच माझ्या डोक्यात ती कल्पना घातली असावी. घरमालकीणीकडून कळलं होतं की तिच्या आणि माझ्या घरामधली भिंत एकच होती.
म्हणजे मधल्या भिंतीच्या पलिकडे ती.
माझ्या डोक्यावर भूत स्वार झालं होतं.
मी त्या भिंतीवर हाताने हळूवार पण स्पष्ट ‘टक’ असा आवाज केला.
अर्थात कांही उत्तर आले नाही.
मी जिद्दीने दहा मिनिटांनी पुन्हां तसाच आवाज भिंतीवर केला.
तरीही अपेक्षित उत्तर आले नाही.
मग मी गप्प बसलो.
एका तासानंतर मला भिंतीवर पलीकडून हळूवार पण स्पष्ट आवाज आला.
उत्तर देणारा.
मी वाचत होतो ती पुस्तकं टाकली आणि भिंतीजवळ गेलो.
मी हळुवारपणे स्पष्टपणे भिंतीवर तीन वेळा टकटक केली.
माझ्या संदेशाला लागलीच उत्तर मिळाले.
अगदी तसेच, त्याच अंतराने तीन टकटक असे आवाज पलीकडून आले.
माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
मग हा खेळ रोज संध्याकाळी सुरू झाला.
ते बराच वेळ चाले.
मी थांबवेपर्यत चाले.
ह्या काळांत मी हरखून गेलो होतो.
परंतु तिला प्रत्यक्ष न भेटण्याचा माझा हेका मी चालूच ठेवला होता.
मग एके दिवशी अपेक्षिल्याप्रमाणे माझ्या आवाजाला उत्तर येणे बंद झाले.

ती माझ्या घाबरटपणाला कंटाळली असावी.
मग मी ठरवले की आता तिला भेटायचे.
पूर्वी आमची जिथे जिथे नजरानजर व्हायची तिथे तिथे मी जाऊ लागलो.
पण बरेच दिवस झाले तरी ती कुठेच दिसेना.
ओळख करून घेणं दूरच राहिले.
ती मला दिसतही नव्हती.
ती मला ऐकूही येत नव्हती.
मी माझ्या खिडकीत बसून राहिलो पण ती जाता-येतांनाही दिसली नाही.
ती तिथून निघून गेली असावी असा समज करून घेऊन मी नैराश्यांत बुडालो.
माझ्या घरमालकिणीने तिच्याबद्दल काढलेले कांही उद्गार मला आवडले नव्हते म्हणून घरमालकिणीलाही तिच्याबद्दल विचारावेसे मला वाटले नाही.
मग नियतीने ठरवलेली ती एक रात्र आली.
मी विचारांनी थकून लौकर झोपलो होतो.
मध्यरात्री माझी झोप मोडली आणि मी ताडकन् बिछान्यात उठून बसलो.
कां ते प्रथम मला कळलंच नाही.
मग भिंतीवर हळूवार पण स्पष्ट टक टक ऐकू आली.
नेहमीसारखीच सांकेतिक आणि उत्तराची अपेक्षा करणारी टक टक.
त्या आवाजांत थोडा कंप जाणवत होता.
एक, दोन, तीन…..
मग थोड्या वेळाने पुन्हां एक, दोन, तीन…
तोच आवाज.
मी उठलो, उत्तर द्यायसाठी भिंतीजवळ गेलो आणि माझा अहं आड आला.
मला इतके दिवस वाट पहायला लावली काय ?
मग आता मी ही वाट पहायला लावणार.
मी हात मागे घेतला.
पुढची रात्र झोंपलो नाहीच.
सारखा स्वतःचं आडमुठं वागणंच कसं बरोबर होतं, हेच स्वतःला पटवत होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी थोड्या उशीराने मी घराबाहेर पडत असतांना माझी घरमालकिण समोर आली.
ती म्हणाली, “इनामदार, तुम्हांला बातमी कळली कां ?”
मी बेफिकीरी दाखवत म्हणालो, “कोणती बातमी ?”
ती म्हणाली, “तुमच्या शेजारी रहात असलेल्या आजारी मुलीबद्दलची ? तुम्हाला माहित नव्हतं ? ती गेले कांही आठवडे आजारी होती आणि आता…”
मी चमकलो आणि म्हणालो,
“आता ? आता काय झालं ?”
“आता ती मरण पावली.”
गोष्ट इथे संपली नाही.
मला नंतर कळले की काल मध्यरात्री आजारी मुलीने हट्टच धरला की तिची कॉट सरकवून ह्या भिंतीलगत ठेवावी.
तिच्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना वाटले की ती आजारात भ्रमिष्ट होऊन तसं सांगत्येय तरी त्यांनी तिला हव्या त्या भिंतीलगत कॉट लावली.
ते तिचे शेवटचेच शब्द होते.
मग तिने जाण्याआधी आमचे तुटलेले संबंध जोडायचा एक हळवा प्रयत्न केला होता.
एका बाजूला ती आणि एका बाजूला हटवादी, आढ्यताखोर, अहंमन्य, पशुवत मी.
आता मी ह्यावर काय उपाय करणार होतो ?
आजच्यासारख्या रात्री मृतात्मे वाऱ्याबरोबर सैरभैर होऊन आणि मृत्यूचं बोलावणं घेऊन परत येतात कां ?
आजची ही तिची त्यानंतरची तिसरी भेट.
त्या दिवसानंतर पहिल्यांदा अशी टकटक झाली, तेव्हां मी खरं खोट करत बसलो.
दुसऱ्या वेळी बऱ्याच वेळा टकटक झाल्यावर मी प्रतिसाद दिला होता पण मग आवाज बंद झाला.
आजची तुझ्याही कानावर टकटक आली ती तिसरी आणि शेवटची.
संपली माझी गोष्ट”
मी त्याचा निरोप घेत हात दाबून माझी सहानुभूती जाणवू दिली.
त्यानेही ती तशीच नि:शब्द स्वीकारली.
मी तिथून निघून आलो.
त्याच रात्री मोहन हे जग सोडून गेल्याचे मला नंतर कळले.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – बियाँड द वॉल

लेखक – ॲम्ब्रोज बीअर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..